Friday, May 10, 2024

#सहजोक्त.

 


#तुकोबा नावाचे जीवनविद्यापीठ.


संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, माझे आवडते संत. कारण त्यांचे अभंग  साहित्य अभ्यासक व्यक्तींसाठी  मौलिक अध्यासन आहे.

आजकाल अलक, सिक्स वर्ड स्टोरी वगैरे साहित्य प्रकार प्रचलित आहेत.

पण तुकोबांनी त्या काळात अत्यन्त अल्प शब्दात, तेही चार ओळीच्या काव्यातून कित्येक कथा  आपल्या गाथेतून सांगितल्या आहेत.

आता हाच श्लोक बघा ना!👇👇



माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥

काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥

शुकें नळिकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥

तुका म्हणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव कांहीं तेथें ॥३॥



माकड मदाऱ्याच्या फशी कां पडतो? तर मोहामुळे.  नेमके निसटण्याच्या वेळी फुटाण्यात मन गुंतले आणि कायमचा जेरबंद झाला. माकडावर अन्याय आहे कां, शिकाऱ्याने केलेला?  नाही !

"जीव: जीवस्य जीवनम् |"

माकडाच्या जवळ क्षमता होती, तरी हा मोहाचा बळी ठरला! शिकाऱ्याचे जीवन शिकारीवरच असणार, हो की नाही?

तीच गत फिरत्या नळीवर लटकणाऱ्या पोपटाची आहेत. स्वतःच्या पंखाचे बळ विसरून नळीच्या फिरण्याने घाबरून अजून अजून गुलामगिरीत अडकण्याचं खापर शिकाऱ्यावर फोडणे चूकच, नाही कां?



 'यह मजबूर है, किंतु आप नही', अशा आशयाची  पुढील पंक्ती आहे.......


'तुका म्हणे एक ऐसे पशुजीव ।

न चले उपाव कांहीं तेथें ॥३॥'


मानव हा विचारी, विवेकी असतो, असंच तुकोबांना वाटत असावे.


पोपट आणि माकडाची कथा भरमसाठ शब्दात सांगता येते, सांगितलीही जाते.

पण इथे या अभंगात चार ओळीत, सोप्या शब्दात सांगितली आहेत.

शिवाय तात्पर्य काढायची मुभा वाचकाच्या सदसदविवेकबुद्धीवर सोपवली आहेत.  जीवनाच्या ज्या ज्या म्हणून क्षेत्रात असाल तेथे तेथे, हा अभंग, दृष्टांतासारखा योजून द्राष्टांतिक समजून घेता येईल.

आणि जीवनमान सुधरवता येईल.

म्हणून तर संत तुकाराम महाराज, "जगद्गुरु"  आहेत.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, April 13, 2024

#सहजोक्त -

 चाफेकळी 

परवा सकाळी फिरताना वादळाने पडलेली चाफ्याची फांदी दिसली. कळ्यांनी लगडलेली  ती  फांदी मी घेऊन आली. घरी आल्यावर ओल्या मातीत खोचून टाकली. आज फुरसतीत फांदी बघितली. थोडी सुकली, थकली वाटली.

कळ्यांनी पण माना टाकल्या जराशा. एक कळी मातीत पडली. मी उचलली आणि बघू लागली. अर्थात फोटो काढलाच.

चाफ्याची कळी म्हणजे चाफेकळी. लाल आणि मोठ्या पाकळ्याच्या चाफ्याची नाजूक आणि सुंदर अशी चाफेकळी बघून मन प्रसन्न झाले.


चाफ्याच्या झाडाच्या निमित्त्याने मन आठवणीच्या हिंदोळ्यावर झूलू लागले.


आमच्या घरी (माहेरी ) पिवळसर पांढरा आणि गुलाबीसर लाल असे दोन चाफ्याची झाडे होती. निष्पर्ण झाल्यावर फुलांनी बहरायचा. फुलांचा सडा पडायचा. त्याच्या काळ्या जरा छोट्या आणि जाड होत्या. शेजारच्या घरी मोठ्या पण पातळ पांढऱ्या पाकळ्यांचा चाफा होता. कॉलनीत एके ठिकाणी गडद लाल चाफाही होता.  तेव्हा चाफेकळीकडे निरखून पाहावे, असे सुचलेक नाही. फक्त फुलं गोळा करायची, हार ओवायचे, इतकेच. फारतर झाडावर चढायचे. पण झाडावर चढले की आजी ओरडायची की, "ते झाड कच्चे असते, पडशील, उतर" वगैरे.

आज कळीचे निवांत निरीक्षण करताना 

बालवाडीत शिकवलेली कविता आठवली. ती अशी...


अरंगळी,करंगळी,

मधले बोट, चाफेकळी,

अंगठा, तळहात,

मळहात, मनगट, 

कोपरा, खांदा,

गळागुटी, हनुवटी,

तोंडाचं बोळकं, 

शेम्बडाचं नळकं,

काजळाच्या डब्ब्या,

देवाचा पाट,

देवाच्या पाटावर चिमण्यांचा किलकिलाट.

बालवाडीत ही कविता साभिनय म्हणत असू.


पुढे -मराठी साहित्य, कविता वाचताना-  चाफ्याचे झाड आणि फुलांचा वेगवेगळ्या संदर्भात उल्लेख आलेला, पहिला.

शृंगारिक काव्यात नायिकेच्या नाकाला चाफेकळीची उपमा देतात.  तर कधी नवतारुण्यवती नायिकेलाच चाफेकळी म्हटले आहे.

आज सर्वांगसुंदर चाफ्याची कळी पाहिल्यावर या उपमांची सार्थकता पटली.




बालकवी यांची, " तूं तर चाफेकळी!" अपूर्ण कविता बघा ना!


"गर्द सभोंतीं रान साजणी

 तूं तर चाफेकळी!

काय हरवलें सांग शोधिसी 

या यमुनेच्या जळीं?"


ती वनमाला म्हणे "नृपाळा, हें तर माझे घर;

पाहत बसतें मी तर येथें जललहरी सुंदर,

हरिणी माझी, तिला आवडे फारच माझा गळा;

मैना माझी गोड बोलते, तिजला माझा लळा.

घेउनि हातीं गोड तिला त्या कुरणावरतीं फिरे--

भाऊ माझा, मंजुळवाणें गाणें न कधीं विरें""

रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतिल रमणी! तुला;

तूं वनराणी, दिसे न भुवनीं तुझिया रूपा तुला.

तव अधरावर मंजुळ गाणीं ठसलीं कसलीं तरी;

तव नयनीं या प्रेमदेवता धार विखारी भरी!क्रीडांगण जणुं चंचल सुंदर भाल तुझें हें गडे,

भुरु भुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळे उडे.

अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालावरी;

भुललें तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या घरीं.

"सांज सकाळीं हिमवंतीचे सुंदर मोतीं धडें;

हात लावितां परि नरनाथा तें तर खालीं पडे.

ती वनबाला म्हणे नृपाळा "सुंदर मी हो खरी, --.........




आरती प्रभू यांच्या कवितेतही "चाफेकळी"चा उल्लेख आहे.


तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी, 

तू बहरांच्या बाहूंची…

ऐल राधा, तू पैल संध्या, 

चाफेकळी प्रेमाची….

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी, 

तू बहरांच्या बाहूंची….

तू नवी जुनी, तू कधी कुणी,

 खारीच्या ग डोळ्यांची….        

 तू हिरवी कच्ची, तू पोक्त सच्ची, 

तू खट्टीमिठ्ठी ओठांची….

 एकूण काय तर नवमल्लिका, कमलनयना, वगैरे वगैरे फुलांच्या उपमा जशा विख्यात आहेत, तसे चाफेकळी सुद्धा जराशी ख्यातकीर्त 

आहे, असे म्हणायला वाव आहे.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.



Monday, January 8, 2024

#सहजोक्त.




अहिंसा १.० आणि २.०


अहिंसा ही फार मोठी शक्ती आहे.  शक्तिमान, बलवान माणूसच खरा अहिंसेचा  पुजारी असतो. आपण बलाढ्य असलो की आपल्या कोणीही वाटेला जात नाही. अर्थात अहिंसा प्रस्थापित होते. पूर्वापार आपला देश असाच सर्वश्रेष्ठ अहिंसक होता.


अहिंसा १.० :


नवस्वातंत्र्य काळात "एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करावा", अशा आदर्शवादी तत्वज्ञानाचे अंधनुकारण केल्या गेले. तेव्हा आपली सैनिकीशक्ती बऱ्याच वरच्या क्रमांकाची होती. आपल्या समोर चीनने "अहिंसक तिबेट" गिळंकृत केला. आम्ही आपले अहिंसक बनून  "हिंदी-चिनी भाई भाई" करत राहिलो.  आम्ही 1965 जिंकूनही युनो मध्ये अपील करून बसलो, काश्मीर धुमसत राहिले. 


व्यक्तिगत पातळीवर  सुद्धा स्वतःची कुवत विचारात न घेता "मी तुला माफ करतो, मी अहिंसक आहे"! असे ऐकवणे हास्यास्पद ठरते. दुबळ्या अहिंसेच्या अंधानुकरणाचे अनुषंगिक फळ म्हणजे खलप्रवृत्ती वाढीला लागणे , सज्जनशक्ती तटस्थ होत होत भिरू होणे, हे होय. आणि ही स्थिती देशासाठी घातक असते. दुबळ्यांची अहिंसा, स्वतःच्या बचवासाठी केलेला पलायनवाद  असतो. 


अहिंसा २.० :


मालदीव नावाच्या छोट्या देशातील तीन मंत्र्यांनी आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांची नालस्ती केली. सामान्यलोकांनी त्यावर प्रतिक्रिया म्हणून सोशलमीडियावर "बॉयकॉटमालदीव" अभियान सुरु केले.

योगायोग बघा, आपल्या विश्वसंचारी पंतप्रधानांचा दौरा  नेमका लक्षद्विपला  झाला.  आणि बॉयकॉट मालदीव पासून सुरु झालेले अभियान "चलो लक्षद्विप" पर्यंत पोहोचले.


भारत जगातील सर्वांत मोठी ग्राहकशक्ती आहे. भारतीय पर्यटकांवर अनेक देशांची आर्थिकघडी अवलंबून आहे. मालदीवही त्यातील एक. भारतीय पर्यटकांनी आपला मालदीव दौरा भराभर रद्द करणे सुरु केले. आर्थिक नुकसान लक्षात येताच तीनही मंत्र्यांना डच्चू  देत मालदीव सरकारने शरणागती पत्करली. ही आपल्या बलाढ्य क्रयशक्तीची कमाल आहे. सामान्य लोकांनी अहिंसक मार्गाने हिसका दाखवला!


पंतप्रधानकार्यालय, विदेश-मंत्रालय आदींना

कोणतीही प्रतिक्रिया द्यावी लागली नाही की निषेध व्यक्त करावा लागला नाही, धमकी, डटावणीचीही गरज पडली नाही! लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेमुळे "सापही मेला आणि लाठीही तुटली नाही" असे झाले.


खरोखर आपला देश  बदलतो आहे. देश खऱ्या अर्थाने समर्थ अहिंसक होत आहे. आत्मभान वाढते आहे. 


"राजा कालस्य कारणम् |" असे महाभारतात म्हटले आहे. 


©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Sunday, May 28, 2023

सहजोक्त.

 

लहानपणी आजी दररविवारी न्हाऊ घालायची. माझे लांबसडक केस, शिकेकायी किंवा काळ्या मातीने धुवून द्यायची. शिकेकायी लावून धुतल्यावर थोडे खोबरेल तेल एका हाताच्या ओंजळीत घ्यायची. थेंबभर तेल जमिनीवर टाकायची, थेंबभर तेल दक्षिण देशीला हवेत शिंपडायची. शिंपडताना म्हणायची,         

         "जिथे कुठे असशील,  तिथे सुखाचा रहा ".

         जरा मोठी झाल्यावर (आजीच्या भाषेत शिंग फुटल्यावर ) तिला विचारले,"हे असं कां करतात?"  

          "पृथ्वी सर्वांचा भर सहते, तिला स्नेह मिळावा म्हणून पृथ्वीला थेंबभर तेल द्यावे ग" असे म्हणत  तिने  अश्वाथाम्याची कथा सांगितली.

"त्याने पाच उपपांडवांना मारल्यावर द्रौपदी समोर आणतात. द्रौपदी  पुत्रवियोगाने अत्यन्त दुःखी पण विवेकी विचारांची असते. अश्वाथाम्याच्या  शिरावर जन्मजात मणी असतो. केवळ मणी काढून टाकून त्याला सोडून देतात. सप्त चिरंजीवांपैकी असलेला अश्वाथामा डोक्यावर भळभळती जखम घेऊन नर्मदा किनारी शूलपाणीच्या जंगलात फिरतो. जखमेवर लावायला तेल मागतो.  आपण केलेल्या दुष्ट कृतीचा त्याला सतत पश्चाताप होतो. द्रौपदीनेच पहिल्यांदा त्याला जखमेत भरायला तेल दिले. त्याने वरदान दिलंय की जी महिला स्वतःच्या डोक्यात लावण्याआधी  थेंबभर कां होईना आठवणीने तेल देईल, तिच्या अपत्यांना शल्य रहाणार नाही.   संतती सुखाची व शल्य रहित असावी, तसेच अश्वाथाम्याला शाप सहन करायला बळ मिळावे म्हणून हे थेंबभर तेल द्यायचे त्याला."  ओल्या केसाच्या टोकावरचे तेल दिल्यामुळे केसाची टोक कायम कोरडेच रहातात, असेही तिने सांगितले.


तार्कीक विचार केला तर कथेला काहीच अर्थ नाही.

 पण मानवी वर्तनाचा व अफाट मनःशक्तीचा  विचार केला तर सहवेदना, संवेदना, तरलता याची नाजूक गुंफणं या कथेत जाणवते.

 'पृथ्वी पण स्त्री आहे. ती आपल्याला पोसते, सहते. तिलाही स्निग्धता मिळावी, स्नेह मिळावा', ही भावना परकोटीची कृतज्ञता व्यक्त करणारी आहे.' पृथ्वीविषयी कृतज्ञता बाळगायला हवीच.

 अश्वाथाम्याची कथा बोधप्रद आहे. 

दुष्टपणे वागूच नये. दुष्ट वागणाऱ्या प्रत्येकालाच त्याने केलेल्या वाईट कृत्याची शिक्षा मिळायलाच हवी व कठोरपणे राबवायलाही हवी. शिक्षा माफ करू नये. सर्वोत्तम शिक्षा तीच जी पश्चाताप करायला भाग पडते व वर्तनात सकारात्मक बदल घडवते.   शिक्षा ही ज्याची त्यानेच भोगायची असते. पण शिक्षा भोगत असलेल्याला शिक्षा भोगण्यास सुसह्य वातावरण नक्की तयार करावे. दुष्ट माणसाचा दुष्टपणा नाहीसा होईल असेच समाजाने वळण द्यावे.  असे अनेक पदर या कथेला आहे, असे मला वाटते.


आताशा न्हाताना ही कथा आठवते आणि नकळत आजीच्या भावनेला स्मरून  तशी कृती आपसूक घडते.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 #भारतीय संस्कृती, श्रेष्ठ संस्कृती!



Monday, April 3, 2023

सहजोक्त.


#जयंती.

जशी जशी हनुमान जयंती जवळ येतेय, तसा तसा एक संदेश प्रसारित होतोय की, जयंती नव्हे जन्मोत्सव म्हणावे. गेल्या वर्षी ही असा संदेश वाचण्यात आला, नि यंदाही वाचला!


हनुमान चिरंजीव आहेत. म्हणजे त्यांना मरण नाही. पण त्यांचा जन्म झालंय. मग जन्मोत्सव होणारच ना! मग जयंती? ती चूक कां? जन्मोत्सव की जयंती? काय खरे? काय म्हणावे? अशी द्विधा होते अशा वेळी.


मराठी शब्द आपण सहज उपयोगात आणतो. बरेचदा ते शब्द कसे तयार झाले? याविषयी आपल्याला नीट माहिती नसते. माहित करून घेण्याची गरजही नसते. अनेक मराठी शब्दांच्या व्युत्पत्ती मराठी व्याकरणापेक्षा संस्कृत व्याकरण व निरक्तात सहज सापडतात.  संस्कृत व्याकरणानुसार अर्थ समजून घेणे सर्वांना शक्य नाही. मग असे संभ्रम पसरणे सोईचे होते. असो.


जयंती विषयीचा संदेश वाचून मी विचारात पडली. जरा पुस्तकातून शोधाशोध केली. थोरामोठ्याशी चर्चा केली. त्यावरून माझं मत इथे मांडतेय.


मुळात "जयंती"  हा शब्द संस्कृतच आहे, हे नक्कीच. मूळ धातू "जय्" याचा अर्थ  जिंकणे. जयंती असे मराठीत लिहितात तर संस्कृतात जयन्ती असे लिहितात .

'जयन्ति' असाही एक शब्द संस्कृतात आहे.  ते क्रियापद  तृतीय पुरुषी बहुवचनी असून 'जिंकतात' असा त्याचा अर्थ आहे.

मराठीतील जयंती शब्दासाठी "जयन्ती" हा लेखनपर्याय आहे. 'जयंती' शब्दाचा 'जन्म'  शब्दाशी तसा संबंध नाही, अक्षर साम्य वगळता.

संस्कृतात "जयन्ती" शब्द कृदंत आहे. ते स्त्रीलिंगी एकवचनी असून त्याचा अर्थ "जिंकणारी", असा होतो. या कृदंताचा उपयोग  विशेषण म्हणून करतात. उदाहरणार्थ 

"जयन्ती मंगला काली, भद्रकली कपालिनी|

दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वहा स्वधा नमोस्तुते नमोस्तुते ||"

या श्लोकात  जयंती म्हणजे जिंकणारी असाच अर्थ आहे.

हनुमानाची  किंवा कोणत्याही थोर व्यक्तिमत्वाची  जयंती असो, "जयन्ती" शब्दाचा अर्थ घेताना वरील अर्थाने घ्यावा .

"स जातो येन जातेन

याति वंश: समुन्नतिम् |

परिवर्तिनि संसारे

मृत: कॊ वा न ज्ञायते ||"

ज्याच्या जन्मामुळे वंश व कुळाचा उद्धार होतो, तोच जन्मला. बाकी, सतत बदलणाऱ्या या जगात कोण जन्मला काय किंवा मेला काय? दखल कोण घेणार?


तर अशा थोरामोठ्यांच्या जन्माने साधारण तिथी सुद्धा "जयन्ती" ठरते. पुण्य संपादन करून मनुष्य लोकांतून स्वर्गात प्रयाण करण्याच्या तिथीला पुण्यतिथी म्हणतात.

'शब्दकल्पदृमात' जयंती शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे.......

जयं पुण्यञ्च कुरुते

जयन्तीमिति तां विदुः ।

रोहिणीसहिता कृष्णा

 मासे च श्रावणेऽष्टमी ।।

अर्द्धरात्रादधश्चोर्द्ध्वं

कलयापि यदा भवेत् ।

जयन्ती नाम सा प्रोक्ता

 सर्व्वपापप्रणाशिनी ।।

 जी जय व पुण्य करते, तिला जयन्ती म्हणून  जाणतात. श्रावणात कृष्ण पक्षातील  अष्टमी, रोहिणी नक्षत्र,  अर्धरात्रीच्या आधी व नंतर  जेव्हा एका कलेनंही जी असते, तेव्हा तिला जयन्ती म्हणतात. सर्व पापं नाशणारी ती असते.


तर सारासार विचार करता, सगळेच सजीव जन्म घेतात, जन्मोत्सव सर्वांचाच असतो. कोणाचा मोठ्ठया प्रमाणात तर कोणाचा अत्यल्प प्रमाणात!

पण जन्मलेल्या कोणाचीही जयंती साजरी करायला त्याचे कर्तृत्व महत्त्वपूर्ण ठरते. हनुमान आपले आराध्य आहेतच म्हणून त्यांची जयंती साजरी करायलाच हवी.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


Monday, October 17, 2022

#सुभाषित-सहजोक्त..

 


यस्यास्ति वित्तं सः नरः कुलीनः, 

सः पण्डितः सः श्रुतवान् गुणज्ञः ।

सः एव वक्ता सः च दर्शनीयः,

 सर्वे गुणाः काञ्चनम् आश्रयन्ते ॥

 

या श्लोकाचा भावार्थ थोडक्यात असा -  ज्या व्यक्तीजवळ पैसा आहे तोच कुलीन  , तोच विद्वान् , तोच ज्ञानी , तोच वक्ता , तोच दिसायलाही उत्तम कारण सर्वेच सद्गुण सोन्याच्या (श्रीमंतीच्याच) आश्रयाने रहातात.  


"असेल  पैसा , तोवर  बैसा" , 

"दाम करी काम , बिबी करे सलाम" 

 'बाप बडा न भय्या , सबसे बडा रुपय्या' 

 असे अनेक  वाक्प्रचार समाजात प्रसिद्ध आहेत .

त्याला कारणही तसेच आहे. जनसामान्यांना तसाच अनुभव असतो. 

सुभाषितेही समाजातील वास्तव आपल्या समोर उलगडतात. सुभाषिते समाजनीती शिकवतात. समाजाची रीतभात द‍खवितात तसेच  समाजवृत्तीचेही सामान्यीकरण दर्शवितात.  


ह्याच श्लोकाच्या समर्थनार्थ अजून एका श्लोकाचा दाखला देता येईल. 

किं वाससा तत्र विचारणीयम् 

वासः प्रधानं खलु योग्यतायाः । 

पीताम्बरं वीक्ष्य ददौ स्वकन्याम् 

दिगम्बरं वीक्ष्य विषं समुद्रः ॥

समुद्राने विष्णुने नेसलेले रेशमी पीतांबर बघून त्याच्या सांपत्तिक स्थितीचा अंदाज घेऊनच आपली कन्या लक्ष्मी त्याला दिली. या उलट दिगंबरावस्थेतील शंकराला पाहून विष  दिले .  श्लोक जरी गमतीदार पद्धतीने मांडला असला तरी लग्नाच्या बाजारात आजही  स्वभाव- कुलीनतेपेक्षा पॅकेजचे पारडे जड नाही ; असं कोण म्हणेल ? 

  "पैसा" महत्त्वाचा नाही , असे म्हणणारे एकतर स्वतःचे पोट पूर्ण भरलेले असल्यामुळे  वास्तवापासून अनभिज्ञ असतील किंवा पक्के दांभिक असतील किंवा ठार व्यवहारशून्य तरी असतील. 

 फक्त लग्नाच्याच बाजारात ,'बडा रुपय्या' असे चित्र आहे कां ?  नाही . साधारणपणे नातेवाईकांत , समाजातही हेच दिसते की मोठे पद , मोठी संपत्ती वगैरे असेल तर मानसन्मान मिळतो. गरीब नातेवाईक असेल तर आला काय गेला काय ? कोणी फारशी दखल घेतच नाही. श्रीमंतांचा जन्मदिवस , छोटी-मोठी अचिव्हमेंट भरभरून साजरी केल्या जाते. या उलट गरीबाचे होते.

गरीबाचे  सद्गुण लपतात , न् श्रीमंताचे दुर्गुण!  गरीबाचे अल्पसे न्यूनही  मोठ्ठ्या स्कॅमसारखे बढवून चढवून सांगितले जाते तर श्रीमंताचे भले मोठे लफडेही , त्याची कौतुक-लीला ठरते.   पैसा समाजात प्रतिष्ठा मिळवून देतो , हे त्रिवार सत्य आहे.  दोन्हीही श्लोक समाजमानसिकता विशद करतात , यात शंकाच नाही.  

आजकाल तर या मानसिकतेला संघटितपणाची  जोड मिळाली आहे. म्हणजे जे कोणी एकदा उच्चभ्रू-स्तरात गेले की त्यांचा गट तयार होतो.  ते अशा गटात सहसा कोणाला प्रवेश देत नाहीत , उलट एखाद्यामध्ये समोर येण्याची चुणूक दिसली तर मुळापासून त्याला हतोत्साही वा मार्गविचलित करायची कुठलीच संधी सोडत नाहीत. यातूनही तो  प्रगती करू लागला तर कुभांड , बदनामी , कुटाळक्या करून  समाजात त्याच्या लौकिकावर लांछन आणतातच आणतात.  (सुशात सिंह राजपूत , हे थोडे याच प्रकारातील उदाहरण होते.)  या मानसिकतेवरही  सुभाषित असेलच असेल.  शोधावे लागेल. 

सुभाषित-भांडागारातील अनेक श्लोक आजही कालसुसंगत आहेत.  ह्यातून संस्कृतसुभाषितांची महती आधोरेखित होते.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


 

Monday, October 10, 2022

#सहजोक्त.

.


तुकोबांच्या अभंगांचे मनन करताना , 'कसं वागावं?' ह्याचं  अवचित मार्गदर्शन घडते. आपलं वागणं , परत सुधरवण्याची  बुद्धी होते. दुसऱ्यातील न्यून बघण्यापेक्षा आपल्या स्वतःला घडविण्यासाठी हे अभंग अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.

संत तुकाराम महाराज म्हणजे  त्रिकालदर्शी , सर्ववंद्य , जगद्गुरु  आहेत ;  यात शंकाच नाही.  

आता हाच अभंग बघा ना . 

૪९ ) ढालतलवारें गुंतले हे कर ! 

म्हणे मी जुंझार कैसा झुंजो !!१!!

पेटी पडदळे सिले टोप ओझे ! 

हे तो जाले दुजे मरणमूळ !!२!!

बैसविले मला येणें अश्वावरी !

 धावू पळू तरी कैसा आता ? !!३!!

असोनि उपाय म्हणे हे अपाय !

 म्हणे हायहाय काय करू !!४!!

तुका म्हणे हा तो स्वयें परब्रह्म ! 

मूर्ख नेणे वर्म संतचरण !!५!!

 (अभंग क्र. ४३४८)

  स्वतः विषयी भयंकर अभिमान असलेल्या सैनिकाला युद्धावर पाठवण्यासाठी ढाल , तरवार ,  पेटी-पडदळे ,  सिलेटोप वगैरे  घालून घोड्यावर चढवूनही दिले .  त्याला या सर्व साधनांचे ओझे वाटू लागले.  जे जे उपाय सांगितले ते सगळे त्याला अपाय वाटू लागले.   तो सारखा  नाराजी द‍ाखवू लागला  व  तक्रारी करू लागला की ,  "मी झुंजार आहो पण लढूच कसा?" 

  या सैनिकासारखेच ,  जीवनात बरीचशी सुखं मिळाली असूनही आपल्या तक्रारी कमी होत नाहीत.   दुसऱ्याला काय चांगलं मिळालं  न्  आपल्याला काय कमी मिळालंय ,  ह्याच्याच संशोधनात  आपली आपल्या आयुष्यातील सुख उपभोगण्याची क्षमता संपते. 

   तुकाराम  महाराज म्हणतात ,  खरे तर  'आपण परब्रह्म आहोत' ,  ह्याची जाणीव होण्यासाठी सद्गुरुला शरण जायची बुद्धी असावी लागते.  

  जिज्ञासा , समर्पण , विनम्रता , कृतज्ञता  तसेच सातत्य  हे दैवी गुण आहेत.   हे गुण जिथे , ज्याच्यात आढळतील त्या व्यक्तीला उपरोल्लिखित सैनिकासारखा अनुभव येणारच नाही. 

  हा अभंग वाचल्यावर साधारणतः आपल्या अवती भवती अशा प्रवृत्तीचे कोण कोण आढळतात ,  हेच बघण्यात वेळ जातो.  पण जरा स्वतःतच सखोल बघितले तर ? कितेक प्रसंगी आपण असे वागतो ना ?  असं नेमकं केव्हा वागतो  ?  असे परखड निरीक्षण केले तर ?  

 आपलच आयुष्य सुखावह , समाधानकारक होईल  हे निश्चितच . 

  संतसाहित्य वाचण्यापेक्षा वागण्यासाठी आहे, होय ना ?

  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे .