Wednesday, September 30, 2026

शिवस्तुती -कैलास राणा -भाग 5

 


सहजोक्त

मंदार बिल्वें बकुलें सुवासी ।

माला पवित्र वहा शंकरासी ।

काशीपुरीं भैरव विश्व तारी ।

तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २६॥

जाई जुई चंपक पुष्पजाती ।

शोभे गळां मालतिमाळ हातीं ।

प्रतापसूर्य शरचापधारी ।

तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २७॥

या दोन्ही कडव्यात शंकराला आवडणारी फुले व पाने वर्णिली आहेत. दोन्ही कडव्यांचा एकत्र अर्थ आणि विशेष सौंदर्य खालीलप्रमाणे पाहूया.

मंदार, बेल आणि बकुळ यांच्या पवित्र माळा शंकराला अर्पण कराव्यात. शंकराच्या गळ्यात जाई, जुई, चाफा इत्यादी फुलांच्या माळा शोभून दिसतात, तर हातात मालती फुलांची माळ आहे. काशी ही शंकराची अत्यंत आवडती नगरी; काशीपुरीचे तसेच संपूर्ण विश्वाचे रक्षण तो 'कालभैरव' रूपात करीत असतो. साक्षात सूर्यासारखा तेजस्वी-पराक्रमी आणि हातात 'पिनाक' नावाचे दैवी धनुष्य धारण करणारा हा महादेवच आहे. [चाप = धनुष्य, शर = बाण]

हे शंभु महादेवा, तुझ्याशिवाय मला या भवसागरातून कोण बरे तारून नेणार?

विशेष टिपणी: • पुराणांमध्ये पिनाक धनुष्याला केवळ एक शस्त्र न मानता, ते भगवान शिवाचे अजेय सामर्थ्य, दिव्यता आणि विश्वाचा समतोल राखणारे दैवी प्रतीक मानले गेले आहे.

• काही पौराणिक कथांमध्ये असे वर्णन आढळते की, कामदेव भस्म झाल्यावर त्याचे सुंदर धनुष्य जमिनीवर पडले आणि त्याचे पाच तुकडे झाले. त्या पाच तुकड्यांमधून अनुक्रमे चंपक (चाफा), चमेली, बकुळ, गुलाब आणि मालती हे पाच सुगंधी फुलांचे वृक्ष निर्माण झाले. म्हणूनच शंकराला ही सुगंधी फुले वाहिली जातात, नाही का?


अलक्षमुद्रा श्रवणीं प्रकाशे ।

संप संपूर्ण शोभा वदनीं विकासे ।

नेई सुपंथें भवपैलतीरीं ।

तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २८॥


या शिवस्तुतीतील कडव्याचा अर्थ सर्वसामान्यपणे असा घेतला जातो—

“अतिशय मौल्यवान मुद्रा कानामध्ये आहेत आणि त्याच्या प्रकाशाने संपूर्ण मुखमंडळाची शोभा वाढली आहे. हे शंकरा, तूच सुमार्गाने मला भव म्हणजे संसाराच्या पैलतीरावर घेऊन जा; तुझ्याशिवाय दुसरे कोण बरे मला तारून नेईल?”


पण इतका उथळ किंवा केवळ बाह्य स्वरूपाचा अर्थ घ्यावा का? माझ्या मते अजिबात नाही. या ओळींमधून नाथसंप्रदायातील अत्यंत गूढ आणि योगपर तत्त्वज्ञानाचे सूचन केले आहे. हे कसे, ते पाहूया.


'श्रवण' म्हणजे केवळ बाह्य कानाची चेतना नव्हे. कानावर शोभतात ती बाह्य कुंडले; पण कानाला खरी शोभा देणारे असते ते 'श्रुत' म्हणजेच आंतरिक नादानुसंधान. नाथ संप्रदायात कानाला टोचून त्यात 'दर्शनी मुद्रा' किंवा 'कांचन मुद्रा' घालण्याची प्रथा आहे (ज्याला 'कानफाटा' योग्यांची मुद्रा म्हणतात). परंतु, इथे वर्णन केलेली 'अलक्षमुद्रा' ही केवळ धातूची वा काचेची बाह्य मुद्रा नसून अंतर्मनात प्रकाशणारी आत्मज्ञानाची मुद्रा आहे. नाथपंथीय उपासक अंतःकरणात सतत 'अलखनिरंजन' हा नाद जागवत असतात.


'अलख' हा शब्द संस्कृतमधील 'अलक्ष' या शब्दाचे तद्भव रूप आहे. 'लक्ष्य' म्हणजे जे डोळ्यांना दिसू शकते, ज्याच्यावर मन केंद्रित केले जाऊ शकते. त्यापुढे 'अ' लागल्यामुळे 'अलक्ष्य' (अलख) म्हणजे असे शिवतत्त्व—जे चर्मचक्षूंना दिसत नाही, ज्याला बाह्य आकार नाही आणि जे मानवी बुद्धी किंवा तर्काच्या पलीकडचे आहे.


नाथ पंथाचे साधू किंवा जोगी नेहमी "अलख निरंजन" अशी साद घालतात.


अलख: अदृश्य, अगम्य आणि अद्भूत असा परमेश्वर (शिव).


निरंजन: 'अंजन' म्हणजे काजळ, अज्ञान, माया किंवा दोष. 'निरंजन' म्हणजे जो सर्व दोषांपासून आणि मायेच्या काजळापासून अलिप्त, अत्यंत शुद्ध व स्वयंप्रकाशित आहे.


"मी त्या निराकार, अत्यंत शुद्ध आणि मायेच्या आवरणाहून वेगळ्या असलेल्या परमेश्वराचे ध्यान करतो किंवा त्याला पुकारतो" — या सर्वोच्च भावाचा एका वाक्यातील उद्घोष म्हणजे "अलख निरंजन"!


शंकराच्या (शिवतत्त्वाच्या) सतत सानिध्यातून आणि या अंतर्मुख साधनेतून योग्याच्या कानात जेव्हा हा अनाहत नाद आणि ज्ञानरूपी मुद्रा प्रकाशते, तेव्हा 'अलक्षमुद्रा श्रवणीं प्रकाशे, संपूर्ण शोभा वदनीं विकासे!' अशी अवस्था प्राप्त होते. ही शोभा बाह्य सौंदर्याची नसून तपश्चर्येतून निर्माण झालेल्या आंतरिक 'ब्रह्मतेजाची' आणि 'ओजाची' असते, जी साधकाच्या चेहऱ्यावर अखंड विलसत राहते.


येथे म्हटले आहे—"नेई सुपंथें भवपैलतीरीं". हा 'सुपंथ' (सुमार्ग) म्हणजे केवळ बाह्य कर्मकांड किंवा रूढ आचार-विचार नव्हे, तर नाथपंथी योग्यांचा आंतरिक नादानुसंधान, सोहं-साधना आणि शिवतत्त्वाच्या ध्यानाचा हा श्रेष्ठ योगमार्ग होय!


'अलख निरंजन' ही नाथपंथीय घोषमुद्रा आणि ही आंतरिक अलक्षमुद्राच योग्याला या 'सुपंथाने' मोक्ष प्राप्त करून देते. म्हणूनच शेवटी अत्यंत व्याकुळतेने आणि ठामपणे अर्पण भाव व्यक्त केला आहे—"हे शंकरा, अशा या परमयोगाविना आणि तुझ्या कृपेविना या भवसागरातून तारून नेणारे दुसरे कोणीच नाही."



नागेशनामा सकळां जिव्हाळा ।

मना जपें रे शिवमंत्रमाळा ।

पंचाक्षरी ध्यान गुहाविहारी ।

तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २९॥

या श्लोकाचा अर्थ आकलनात घेण्यापूर्वी त्यामागील पौराणिक कथा, वेदान्त आणि योगपरंपरेतील मान्यता समजून घेणे आवश्यक आहे.

१. 'नागेश' आणि 'पंचाक्षरी मंत्र' यांमागील कथा:

कथा १: दारुकावन आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग
दारुकावन क्षेत्रात दारुका ही राक्षसी आणि तिचा पती दारुक भक्तांचा अन् ऋषींचा छळ करत असत. या वनात नागांचाही अधिवास होता आणि तेही या त्रासाने त्रस्त होते. दारुकेने शिवभक्त 'सुप्रिय' याला बंदी बनवले. सुप्रियाने कारागृहातच शिवाची कठोर तपश्चर्या करून 'नमः शिवाय' या पंचाक्षरी मंत्राचा अखंड जप सुरू केला. भक्ताच्या हाकेला धावून येत शिवाने तेथे प्रकट होऊन राक्षसांचा संहार केला. भक्तांच्या आणि नागांच्या रक्षणार्थ शिव तेथे 'नागेश' (नागांचा आणि सर्पांचा देव) या नावाने ज्योतिर्लिंग रूपात विराजमान झाले.

कथा २: वासुकी आणि शिवाचा अलौकिक संबंध
समुद्रमंथनातून बाहेर पडलेले हलाहल विष सृष्टीच्या रक्षणासाठी शिवाने प्राशन केले. त्या विषाचा दाह शांत करण्यासाठी सर्पराज वासुकीने शिवाच्या गळ्यात स्थान घेतले. शिवाने सर्पांना आपले आभूषण बनवून सन्मानित केले, म्हणूनच शिवाला 'नागेश' किंवा 'नागेश्वर' म्हटले जाते.

२. 'गुहाविहारी' या शब्दाची सखोल संकल्पना:

'गुहाविहारी' म्हणजे गुहेमध्ये वास करणारा किंवा विहार करणारा. याचे मुख्यत्वे दोन अर्थ होतात:

वेदान्त अर्थ (हृदयगुहा):
वेदान्त तत्त्वज्ञानात मानवी शरीरातील 'हृदय' या स्थानाला 'गुहा' (हृदयगुहा) असे म्हटले जाते; कारण ते अतिशय गूढ, सूक्ष्म आणि अंतर्मुख स्थान आहे. कठोपनिषदासारख्या ग्रंथांमध्ये आत्म्याला "गुहाहितं" (गुहेत राहणारा) म्हटले आहे. जो शिव सर्व जीवांच्या हृदयरूपी गुहेत आत्मरूपाने निवास करतो आणि अंतःकरणात विहार करतो, तोच 'गुहाविहारी'.

पौराणिक व योगिक अर्थ (वैराग्य आणि ध्यान):
शिव हे आदियोगी आणि ऐहिक सुखांपासून अलिप्त राहणारे विरागी देव आहेत. ध्यान, समाधी आणि अखंड तपश्चर्येसाठी ते हिमालयातील एकांत, दुर्गम अशा नैसर्गिक गुहांचा (उदा. अमरनाथ, केदारनाथ) आश्रय घेत असत. अमरनाथच्या कथेत पार्वतीदेवींना अमरत्वाचे गूढ ज्ञान (अमरकथा) सांगण्यासाठी शिवाने अशा एकांत गुहेची निवड केली, जिथे इतर कोणत्याही जीवाचा हस्तक्षेप असणार नाही. अशा प्रकारे ध्यानमग्न राहून आत्मज्ञान देणारे रूप म्हणजेच 'गुहाविहारी'.

श्लोकाचा एकत्रित भावार्थ:

समुद्रमंथनातील हलाहलाचा दाह सोसून वासुकीला गळ्यात धारण करणारा आणि भक्तांच्या रक्षणासाठी नागेश्वर रूपात प्रकट झालेला 'नागेश' हा सर्वांच्या आपुलकीचा अन् जिव्हाळ्याचा विषय आहे. भक्ता सुप्रियाप्रमाणे संकटातून तारणाऱ्या 'नमः शिवाय' या 'पंचाक्षरी' शिवमंत्राची माळ हे मना, तू सतत जपत राहा! अमरनाथच्या गुहेत ध्यानात रंगणाऱ्या आणि प्रत्येक जीवाच्या हृदयगुहेत आत्मरूपाने वसणाऱ्या त्या 'गुहाविहारी' शंकराचे चित्तात ध्यान धर; कारण हे शंभो, या भवसागरातून पार उतरवणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणताही तारणहार नाही!



एकांति ये रे गुरुराज स्वामी ।

चैतन्यरूपीं शिवसौख्यनामीं ।

शिणलों दयाळा बहुसाल भारी ।

तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३०॥


हे कडवे नाथसंप्रदायाला अनुसरून असावे असे वाटते. शंकर हे या संप्रदायाचे आद्यगुरू आहेत. त्यामुळे ते सर्व नाथपंथीयांचे 'गुरुराज स्वामी' आहेत.


'एकांत' म्हणजे एकट्याने किंवा एकांतात राहणे, हा अर्थ सर्वांनाच माहिती आहे. परंतु संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीसारख्या प्राचीन साहित्यात 'एकांत' हा शब्द केवळ निर्जन जागा नसून 'कायमचे स्थान', 'चित्ताची अंतर्मुख अवस्था' किंवा 'मोक्षाचे अंतिम ठिकाण' या अर्थानेही वापरला गेला आहे. उदा.


जें आकाराचा प्रांतु ।

जें मोक्षाचा एकांतु ।

जेथ आदि आणि अंतु ।

विरोनि गेलीं ॥


या कडव्यातसुद्धा 'एकांत' म्हणजे साधकाची अंतर्मुख अवस्था आणि मोक्षाचे अंतिम ठिकाण असाच अर्थ घ्यायला हवा. जेव्हा साधक बाह्य जगतातून पूर्णपणे अंतर्मुख होतो, तेव्हाच त्याला हे चैतन्यरूप प्राप्त होते.


या श्लोकाचा एकूण भावार्थ असा —

संसाराच्या खस्ता अनेक वर्षांपासून खात खात मी शिणून गेलो आहे. 'शिव' या नावातच चैतन्य आणि सुख सामावले आहे. हे आदिगुरू शंकरा, तू माझी अंतर्मुख अवस्था आणि अंतिम मोक्षाचे स्थान आहेस; तू ये. तुझ्याशिवाय दुसरे कोण बरे मला या संसारातून तारून नेईल?


'शिवस्तुती' हे मराठीमधील प्रदीर्घ स्तोत्र आहे. ३० कडवे शिवाचे वर्णन, पूजन, अर्चन आणि उपासना सांगणारे आहेत. आता शेवटचे म्हणजे ३१ वे कडवे फलश्रुती आहे.

शास्त्राभ्यास नको, श्रुती पढुं नको तीर्थांसि जाऊं नको । योगाभ्यास नको, व्रतें मख नको तीव्रें तपें तीं नको ॥ काळाचें भय मानसीं धरुं नको दुष्टास शंकूं नको । ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको ॥३१॥

संपूर्ण शैव संप्रदायाचे संगोपांग महिमान गाणारे हे स्तोत्र आहे, हे आपण पाहिलेच आहे. आता अनन्यभावे फक्त आणि फक्त शंकराची आराधना करणाऱ्या भक्ताने कसे वागावे, हे या कडव्यात सांगितले आहे.

शास्त्र-अभ्यास, जो आचरण्यास कठीण असतो, तो नाही केलास तरी चालेल. श्रुती म्हणजे वेद-अभ्यास. एक वेद शिकायला बारा वर्षे लागतात, तेही नाही केलेस तरी चालेल. जुन्या काळी तीर्थक्षेत्री जाणे हे फारच दुर्लभ आणि दुष्प्राप्य होते; कारण यातायातीची साधने नव्हती, तीर्थस्थानी सोयी नव्हत्या. त्यामुळे कोणी तीर्थाटनास गेले, की जिवंत परत येणे दुरापास्त होते. म्हणून 'तीर्थांसि जाऊं नको', हे ओघाने आलेच.

आजकाल 'योगा' खूपच बोकाळला आहे. योगा आणि योगाभ्यास यात फरक आहे. मुळात पतंजली ऋषींनी (बाबा रामदेव यांचे पतंजली नाही 😊) 'योग' शब्दाची व्याख्या केली आहे:

"योगश्चित्तवृत्तिनिरोधः॥" (योगः चित्त-वृत्ति-निरोधः)

म्हणजे चित्ताच्या (मनाच्या) विविध वृत्ती, विचार आणि तरंग पूर्णपणे शांत करणे किंवा त्यांना नियंत्रित करणे म्हणजे 'योग' होय.

'निरोध' हा संस्कृत भाषेतील अतिशय महत्त्वाचा आणि सखोल अर्थ असलेला शब्द आहे. योगशास्त्र, व्याकरण आणि बौद्ध तत्त्वज्ञानात या शब्दाला विशेष स्थान आहे.

नि (उपसर्ग) + रुध् (मूळ धातू) + घञ् (प्रत्यय) = 'निरोध'

ज्याचा अर्थ होतो — पूर्णपणे रोखून धरणे, अटकाव करणे, नियंत्रण मिळवणे किंवा प्रवाह थांबवणे. "योगश्चित्तवृत्तिनिरोधः॥" या वाक्यात 'निरोध' म्हणजे विचारांना बळजबरीने दाबणे नव्हे, तर मनाची चंचलता शमवून त्याला शांत आणि अंतर्मुख करणे असा अर्थ होतो.

योग दोन प्रकारचे आहेत:

बहिरंग योग: यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार (शरीर आणि इंद्रियांच्या शुद्धीसाठी).

अंतरंग योग: धारणा, ध्यान आणि समाधी (मन आणि चित्ताच्या शुद्धीसाठी).

मुळात असा योगाभ्यास करणे हे योग्याचे कार्य सोपे नाहीच; म्हणून म्हटले आहे, 'योगाभ्यास नको'. कोणतेही व्रत आणि मख म्हणजे यज्ञ करणे फारच जिकिरीचे आणि सायासाचे काम असते; म्हणून 'व्रतें मख नको' आलेच. तापचरण सुद्धा सोपे नसते. रावणाने सुद्धा शंकराला प्रसन्न करण्यासाठी हिमालयात जाऊन हजारो वर्षे घोर आणि उग्र तपश्चर्या केली. रावणाला दहा शिरे (मस्तके) होती. शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्याने दर हजार वर्षांच्या कठोर तपांनंतर आपले एक-एक शिर कापून अग्नीत अर्पण केले. अशा प्रकारे त्याने आपली ९ शिरे कापून अर्पण केली. जेव्हा तो दहावे शिर कापणार होता, तेव्हा भगवान शिव त्याच्या भक्तीवर आणि दृढ निश्चयावर अत्यंत प्रसन्न झाले आणि प्रकट झाले. त्यामुळे, "तीव्रें तपें तीं नको॥" हे ओघाने आलेच.

शंकर स्वतः "महाकाल" आहेत. सर्व ब्रह्मांडचा आधार शंकर असल्यामुळे, शिवभक्तांना 'काळाचें भय मानसीं धरुं नको' हे वेगळे सांगायची गरज नाहीच. देवाधिदेव, महाकाल शंकर साक्षात दैवत असल्यावर 'दुष्टास शंकूं नको' — दुष्ट लोकांना घाबरण्याचे काहीही काम नाही; तसेच मनात दुष्ट शंका (नकारात्मक विचार / Negative Thoughts) सुद्धा घेऊ नयेत.

सर्व देवांमध्ये 'आशुतोष' म्हणजे अत्यंत लवकर पावणारा देव म्हणजे शंकर. त्याच्या फक्त स्मरणाने पतित लोक भवभयातून तरून जातात. अशा एकमेव अद्वितीय शंकराला अजिबात सोडू नकोस.

मर्म न समजून वरवर अर्थ बघितला, तर "हे नको, ते नको म्हणजे काहीच करू नको" इतकेच फक्त लक्षात राहते आणि नेमकं काय करायचे ते मात्र लक्षात घेत नाहीत; कळले तरी वळत नाही. त्यामुळे या कडव्याला सखोल, परत परत वाचू या. बाकी सर्व उपासना पंथ हे आचरणास फारच कठीण आहेत, आचारले तरी प्रत्यक्ष समजणे दुरापास्त आहे, समजले तरी त्यातून मोक्ष मिळवून घेणे अत्यंत दुर्लभ आहे. म्हणून शैवपंथीय भक्तांनी अनन्यभावाने, अखंडित अशी शंकर-उपासना सातत्याने करावी; हेच या शिवस्तुतीचे मर्म आहे.

आपण मात्र शिवस्तुती उमजून वाचून यथाशक्ती उपासना करू या, नाही का?

© डॉ. प्रज्ञा देशपांडे.




Thursday, September 24, 2026

शिवस्तुती -कैलास राणा भाग4

 #सहजोक्त.

अनुहातशब्द गगनीं न माय ।

त्याचेनि नादें भव शून्य होय ।

कथा निजांगें करुणा कुमारी ।

तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥

भावार्थ:

अनाहत नाद आकाशामध्येही सामावत नाही. त्या दिव्य नादाच्या लहरींमध्ये हा संपूर्ण संसार (भव) आणि त्याचे मोह-माया शून्य होऊन नष्ट होतात. तुमच्या कथेचे स्मरण मनाला आत्मिक आनंद देणारे आहे. हे भो शंभो, अशा या संकटातून आणि संसारातून मला तुमच्याशिवाय तारून नेणारा इतर कोणीही नाही.

वरवर पाहता या कडव्याचा हा साधा अर्थ आपल्याला कळतो. परंतु, यातील काही विशेष शब्द अत्यंत गहन आणि अध्यात्मिक अर्थ उलगडून दाखवतात. ते आपण सविस्तर पाहूया:

१. अनुहात शब्द म्हणजे 'अनाहत नाद'

या नादाची निर्मिती कोणत्याही बाह्य ऊर्जेविना किंवा आघाताविना होते; म्हणूनच तो 'अनाहत' (ज्यावर आघात झालेला नाही) आहे.

आधुनिक विज्ञान ज्याला विश्वाचा जन्म देणारा महाविस्फोट (Big Bang) आणि त्याच्या मागे उरलेली वैश्विक कंपने (CMB - Cosmic Microwave Background) म्हणते, त्यालाच प्राचीन भारतीय ऋषींनी ध्यानस्थ अवस्थेत अनुभवून 'अनाहत नाद' किंवा विश्वाचा आदिध्वनी म्हटले आहे. हा ध्वनी कधीही नष्ट होत नाही, तो निसर्गात निरंतर सुरू असतो.

हा ध्वनी मानवी शरीरातील चौथ्या चक्राशी म्हणजेच 'अनाहत चक्राशी' (हृदय चक्र) संबंधित आहे. जेव्हा साधकाची चेतना या चक्रावर स्थिर होते, तेव्हा हा नाद स्पष्ट ऐकू येऊ लागतो. मन अत्यंत चंचल असते, पण अनाहत नाद मनाला सहज आकर्षून घेतो. एकदा का साधकाचे लक्ष या नादावर केंद्रित झाले, की मनाचे इतर सर्व विचार आपोआप थांबतात.

योगशास्त्रात या नादाचा पाठलाग करण्याच्या प्रक्रियेला 'नादानुसंधान' म्हणतात. बासरी किंवा घंटेच्या आवाजापासून सुरू झालेला हा प्रवास शेवटी साधकाला 'मेघ नादा'कडे घेऊन जातो, जिथे मन पूर्णपणे विलीन होऊन समाधी अवस्था प्राप्त होते. या नादामध्ये मन इतके तल्लीन होते की, अहंकाराचा नाश होऊन फक्त परमानंदाची अनुभूती उरते. अशा या अनाहत नादाची सवय झाली आणि साधक त्यात एकरूप झाला, की "त्याचेनि नादें भव शून्य होय" अशी योग्याची अवस्था होते.

२. कथा निजांगें करुणा कुमारी

सतीच्या विरहाने वैराग्य निर्माण झालेल्या शंकराला कुमारी असलेल्या पार्वतीने आपल्या तपोबळाने पती म्हणून प्राप्त केले. पार्वती ही जगन्माता आहे आणि तिच्यातील कारुण्यभावामुळेच ही जीवसृष्टी निर्माण झाली. अशा आपल्या प्रिय पत्नी पार्वतीला, भगवान शिव एकांतात 'ब्रह्म हेच अंतिम सत्य' असलेल्या अमरकथा सांगत असतात.

अध्यात्मिक साधनेत जेव्हा साधक शिवभक्तीने संसार शून्यवत मानून सतत अनाहत नादाच्या धुंदीत राहतो, तेव्हा त्याला या कथा बाहेरून ऐकण्याची गरज उरत नाही. ती अनुभूती त्याच्या स्वतःच्याच अंगी (निजांगे) म्हणजेच अंतःकरणात आपोआप प्रकट होते.

ज्याप्रमाणे 'कुमारी कन्या' ही मायेचे किंवा संसाराचे विकार न शिवलेली शुद्ध ऊर्जा मानली जाते, त्याचप्रमाणे ईश्वराची ती परम कृपा साधकाच्या अंतरात्म्यात 'करुणा कुमारी' बनून प्रकट होते आणि त्याला मोक्षाकडे नेते.

३. 'कुमारी' शब्दाचा शास्त्रीय अर्थ

"अष्टवर्षा भवेद्गौरी दशवर्षा च कन्यका ।"

"सम्प्राप्ते द्वादशे वर्षे कुमारीत्यभिधीयते ॥"

म्हणजे आठव्या वर्षी गौरी, दहाव्या वर्षी कन्यका आणि बारावे वर्ष आले की तिला 'कुमारी' म्हटले जाते.

या कडव्यातील पहिल्या तीन ओळींचा गाभा आणि त्यातील शब्दांचे मर्म जर आपण नीट समजून घेतले, तर अध्यात्माचा किती गहन आणि अलौकिक अर्थ आपल्यासमोर उलगडतो, नाही का?

© डॉ. प्रज्ञा देशपांडे



#सहजोक्त

शांति स्वलीला वदनीं विलासे ।

ब्रह्मांडगोळीं असुनी न दिसे ।

भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी ।

तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २२॥


भगवान शंकरा, तुझ्या वदनावर नेहमी शांती आणि आत्मसुखाचा विलास असतो. तू या संपूर्ण ब्रह्मांडात सर्वत्र व्यापलेला असूनही डोळ्यांना सहसा अगोचर आहेस. तू भिल्ल रूपातील पार्वतीचा पती आणि स्वतः परमोच्च ब्रह्मचारी आहेस. हे शंभो, तुझ्याशिवाय मला संकटातून तारणारे (उद्धार करणारे) दुसरे कोण असेल बरे?


या कडव्यातील काही शब्दांचा सविस्तर अर्थ बघू.


• लीला

'लीला' हा मूळ संस्कृतमधील शब्द मराठीत तत्सम शब्द म्हणून आला आहे. 'लीला' या शब्दाची व्युत्पत्ती 'लल्' या मूळ धातूपासून होते. 'लल्' या धातूचा अर्थ खेळणे, लाड करणे, विलास करणे किंवा बालसुलभ खेळकरपणा असा होतो. याच धातूपासून पुढे 'लीला' (स्त्रीलिंगी नाम) हा शब्द तयार झाला, ज्याचा मूळ अर्थ 'खेळ' (Play) किंवा 'क्रीडा' असा होतो.


• विलास

'विलास' या शब्दाची व्युत्पत्ती संस्कृतमधील 'वि + लस्' या धातूपासून झाली आहे. 'लस्' म्हणजे चमकणे, खेळणे, आनंद व्यक्त करणे किंवा विलोभनीय दिसणे. मराठी आणि संस्कृत शब्दकोशांनुसार हा शब्द प्रामुख्याने आनंद, उल्लास, क्रीडा किंवा सौंदर्याचा प्रकाश या अर्थाशी जोडलेला आहे.


वरील कडव्यात मात्र "शोभून दिसतो" असा अर्थ योग्य ठरतो.

शांति स्वलीला वदनीं विलासे = जगाची, ब्रह्मांडाची निर्मिती ही शंकराची लीला म्हणजे सहज केलेला खेळ आहे. या खेळातून त्यांना शांती लाभते आणि त्यांचेच तेज चेहऱ्यावर शोभून दिसते.


• ब्रह्मांडगोळीं

ब्रह्मांडगोळीं > ब्रह्मांडाचा गोळ म्हणजेच संपूर्ण विश्व किंवा जग. इथे सप्तमीचा 'ई' प्रत्यय आहे, म्हणून 'ब्रह्मांडगोळीं' म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये.


ब्रह्मांडगोळीं असुनी न दिसे म्हणजे हे संपूर्ण विश्व ही शंकराची निर्मिती आहे, तरीही तो सहज दिसत नाही. जसे कापड/वस्त्र हे धाग्याचे किंवा कापसाचे असूनही धागा वेगळा दिसत नाही; पाण्याचा घडा संपूर्ण मातीचा बनलेला असतो परंतु माती वेगळी दिसत नाही. तसेच शंकराने सर्व ब्रह्मांड बनवले, पण या जगतातून तो वेगळा दिसतच नाही.


• भिल्ली भिल्लीणीची कथा

'शिव'ची पत्नी 'शिवानी', तशी 'भव'ची पत्नी 'भवानी'. पार्वतीने भिल्लीणीचे रूप धारण केले. यामागे एक कथा आहे:


एकदा कैलास पर्वतावर भगवान शिव माता पार्वतीला परम ज्ञान आणि वेदांचे गूढ रहस्य सांगत होते. शिवजी जेव्हा हे अत्यंत महत्त्वाचे ज्ञान देत होते, तेव्हा पार्वती देवीचे लक्ष विचलित झाले आणि त्यांना डुलकी (झोप) आली.


भगवान शिवांनी जेव्हा पाहिले की पार्वतीचे लक्ष नाही, तेव्हा ते क्रोधित झाले. ज्ञान ग्रहण करताना अनादर किंवा दुर्लक्ष करणे हा मोठा अपराध मानला जातो. शिवजींनी पार्वतीला शाप दिला, "तू काही काळासाठी देवलोक सोडून पृथ्वीवर भिल्ल घराण्यात जन्म घेशील." (काय हिंमत होती, बायकोला शाप दिला! म्हणून महादेव आहेत ते! 😊)


शिवाच्या शापामुळे माता पार्वतीने पृथ्वीवर एका भिल्ल राजाच्या घरात कन्या म्हणून जन्म घेतला. तिचे नाव 'ललिता' ठेवले गेले. ती निसर्गाच्या सानिध्यात वाढली आणि अत्यंत रूपवान, सुजाण व शिकार करण्यात निष्णात बनली.


काही काळानंतर, कैलास पर्वतावर माता पार्वतीशिवाय भगवान शिव अत्यंत उदास आणि एकाकी झाले. त्यांना आपल्या शापाचा पश्चाताप झाला. पार्वतीला परत मिळवण्यासाठी आणि तिची परीक्षा घेण्यासाठी शिवजींनी स्वतः एका 'भिल्ल' तरुणाचे रूप धारण केले आणि ते पृथ्वीवर आले. भिल्ल राजाच्या नगरीत येऊन शिवजींनी आपल्या नृत्य, संगीत आणि शिकार कौशल्याने सर्वांना मोहित केले. भिल्ल राजाने आपल्या कन्येचा विवाह या पराक्रमी भिल्ल युवकाशी करून देण्याचे ठरवले.


विवाहाच्या वेळी जेव्हा दोघांचे हात एकमेकांच्या हातात आले, तेव्हा माता पार्वतीला तिच्या मूळ रूपाची आणि शिवजींची आठवण झाली. भगवान शिवांनीही आपले मूळ रूप प्रकट केले.


• शिव ब्रह्मचारी

'शिव' म्हणजे पवित्र. 'ब्रह्मचारी' हा शब्द 'ब्रह्म' आणि 'चर' या दोन मूळ संस्कृत शब्दांपासून तयार झाला आहे.


ब्रह्म म्हणजे वेद, पवित्र ज्ञान, परमेश्वर, सत्य. 'चर्' या मूळ धातूपासून 'चर' शब्द तयार झाला. चर म्हणजे चालणे, वागणे, आचरण करणे किंवा तत्पर असणे.


'ब्रह्मणि चरति इति ब्रह्मचारी' म्हणजे जो ब्रह्माचे (वेदांचे किंवा सत्याचे) आचरण करतो, तो ब्रह्मचारी होय.


प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार, गुरुगृही राहून वेदांचा अभ्यास करणाऱ्या आणि शिस्तीचे पालन करणाऱ्या विद्यार्थ्याला 'ब्रह्मचारी' म्हटले जायचे. कालांतराने या शब्दाचा मुख्य अर्थ इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारा, विशेषतः कामवासनेचा त्याग करून पवित्र आयुष्य जगणारा असा रूढ झाला.


समन्वय आणि समारोप

तर असा ब्रह्मचारी शिव आणि भिल्ल-भवानी यांच्या संयोगामुळे हे ब्रह्मांड निर्माण झाले आहे. दाम्पत्य कसे असावे? तर शिव-पार्वतीसारखे! वरवर बघता दोघांमध्ये समानता दिसतच नाही, परंतु दोघेही एकमेकांना पूरक, पोषक आणि संवर्धक आहेत. [याआधीच्या कडव्याचे विश्लेषण परत वाचावे, कृपया]


तर एकंदरीत, या कडव्याची तिसरी ओळ ही पहिल्या आणि दुसऱ्या ओळीसाठी आधार आहे, आणि चौथी ओळ हा या श्लोकाचा समारोप आहे.


© डॉ. प्रज्ञा देशपांडे.





#सहजोक्त.

पीतांबरें मंडित नाभि ज्याची ।


शोभा जडीत वरि किंकिणीची ।


श्रीदेवदत्त दुरितांतकारी ।


तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २३॥


अर्थ:


ज्या भगवंताच्या (शंकराच्या) कंबरेभोवती पिवळे रेशमी वस्त्र (पीतांबर) नेसलेले आहे आणि त्यावर रत्नांनी जडवलेली सुंदर किंकिणी (कंबरपट्टा/घंटी) शोभून दिसत आहे. पाप व दुःखांचा नाश करणाऱ्या, हे श्रीदेवदत्त रूपातील महादेवा! तुझ्याशिवाय या संकटांतून किंवा भवसागरातून मला पार नेणारा दुसरा कोण आहे?


शब्द अन् शब्द वाचला की वरील अर्थ लागतो आणि तो सहज कळतोही.


परंतु, ही शिवस्तुती केवळ पठणापुरती मर्यादित नसून सखोल चिंतन करण्यासारखी आहे. "शिवस्तुती"  केवळ शंकराचा महिमा गाणारे स्तोत्र नसून, मध्ययुगीन संप्रदायांचा सांस्कृतिक व आध्यात्मिक इतिहास अतिशय सूचक शब्दांत मांडणारा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे, असे मला मनापासून वाटते.


आता याच कडव्याचा जरा बारकाईने विचार करूया.


"पीतांबरें मंडित नाभि ज्याची । शोभा जडीत वरि किंकिणीची ।"


हे वर्णन मुळात शंकराचे वाटतच नाही! हे सर्व वर्णन तर विष्णूचे वाटते; कारण विष्णू ही राजसिक राहणीमान असलेली देवता मानली जाते, तर शंकर नेहमी दिगंबर, भस्मधारी आणि स्मशाननिवासी!


"श्रीदेवदत्त दुरितांतकारी ।"


ही तिसरी ओळ तर स्पष्टपणे श्रीगुरुदेव दत्तात्रेयांचाच निर्देश करते.


आणि मग चौथी ओळ— "तुजवीण शंभो मज कोण तारी" —पुन्हा एकदा शंकराची अनन्य भक्ती व्यक्त करते.


पहिल्या दोन ओळी विष्णूच्या, तिसरी ओळ दत्ताची आणि शेवटी पुन्हा शंकराची आळवणी! कवीने अशी गुंफण का बरे केली असावी? तुम्हाला काय वाटते?


माझ्या अल्पचिंतनातून मला जे सुचतेय, ते मी मांडते.


पूर्वी शैव आणि वैष्णव या दोन पंथांमध्ये प्रचंड मतभेद आणि वैर होते. मध्ययुगात या पंथांमध्ये समन्वय साधण्याची एक वैचारिक प्रक्रिया जोमाने सुरू झाली. त्यातूनच 'श्रीगुरुदेव दत्त' हे दैवत उदयाला आले आणि लोकमानसात प्रतिष्ठित झाले.


त्या काळातील मध्ययुगीन संप्रदाय आणि त्यांच्या गुरुपरंपरांवर नजर टाकली तर हे स्पष्ट होते:


नाथ संप्रदाय:


या संप्रदायाची मूळ गुरुपरंपरा आदिनाथ (भगवान शिव) यांच्यापासून सुरू होते. आदिनाथांनंतर या परंपरेत भगवान दत्तात्रेय यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यानंतर मत्स्येंद्रनाथ (मच्छिंद्रनाथ) आणि गोरक्षनाथ (गोरखनाथ) यांनी या पंथाचा मोठा विस्तार केला.


दत्त संप्रदाय:


याची मूळ परंपरा आदिगुरू भगवान दत्तात्रेय यांच्यापासून सुरू होते, ज्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश (शिव) यांचे एकत्रित रूप मानले जाते. पुढे श्रीपाद श्रीवल्लभ (पहिला अवतार) आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज (दुसरा अवतार) अशी ही परंपरा पुढे जाते.


संत एकनाथ संप्रदाय:


वारकरी संतांच्या गुरुपरंपरेतही हा समन्वय दिसतो:


आदी नारायण ➔ ब्रह्मदेव ➔ अत्रिऋषी ➔ दत्तात्रेय ➔ जनार्दन स्वामी ➔ संत एकनाथ


तसेच, तांत्रिक साधना करणाऱ्या तत्कालीन पंथांमध्येही पुढे समन्वयवादी विचार वाढीस लागून शिव आणि दत्त या संकल्पनांचे एकत्रीकरण झाले असावे. म्हणूनच, दत्तअवतारात तिन्ही देवांचे रूप एकवटलेले असतानाही 'आदिनाथ' म्हणून शंकराला विशेष स्थान दिले गेले आहे.


एकाच श्लोकात विष्णूचे रूप, दत्ताचे नाव आणि शंकराची हाक आणून कवीने बहुधा हाच 'हरिहर अभेद' आणि संप्रदायिक समन्वयाचा संदेश दिला असावा.


तुम्हाला यावर काही विशेष किंवा वेगळे सुचत असेल, तर नक्की सांगा. मलाही ते जाणून घ्यायला आवडेल.


© डॉ. प्रज्ञा देशपांडे.



#सहजोक्त.

जिवाशिवाची जडली समाधी ।

 विटला प्रपंच तुटली उपाधी ।

शुद्धस्वरें गर्जति वेद चारी ।

 तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २४॥


 शंकराची अनन्यभावे भक्ती केल्यामुळे  जीवाशिवाची समाधी जडली. प्रापंचिक माया  कंटाळून सुटून गेली आणि प्रापंचिक  उपाध्या  संपल्या.  चारही वेद  शुद्ध स्वराने  हेच गर्जत आहेत.   हे शंभो, तुझ्या शिवाय मला कोण बरे तारून नेईल? 


जिवाशिवाची जडली समाधी ।

•मानवाचा जीव म्हणजे आत्मा.

•शिव म्हणजेच परमात्मा.  शैवपंथीय असल्यामुळे  त्यांच्यासाठी ब्रम्ह  म्हणजे 'शिव' होय. 

 •पातंजल अष्टांग योगात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान यांनंतरची शेवटची आठवी पायरी म्हणजेच समाधी होय. 

समाधी म्हणजे ध्यान साधनेची आणि मानसिक एकाग्रतेची सर्वोच्च अवस्था होय.

जिवाशिवाची जडली समाधी म्हणजे ध्यान साधनेची आणि मानसिक एकाग्रतेची अशी सर्वोच्च अवस्था की ज्यात जीव आणि शिव एक झालेय. 


विटला प्रपंच तुटली उपाधी ।

•प्रपंच (प्रपञ्च्यते इति । )  म्हणजे  विपर्य्यास,  विस्तर , वैपरीत्य, भ्रम, माया,  सञ्चय, प्रतारण इत्यादी.  तर अशा प्रपंचाचा फोलपणा कळाल्यामुळे जीव विटून गेला, विरक्त झाला. 

•उपाधी म्हणजे अशी बाह्य गोष्ट जी एखाद्या मूळ वस्तूवर लादली जाते आणि त्यामुळे त्या मूळ वस्तूचे खरे रूप बदलल्यासारखे भासते. सोप्या शब्दात उपाधी म्हणजे असे आवरण किंवा मर्यादा  जिच्यामुळे भ्रम निर्माण होतो.  या वाक्याच्या संदर्भाने अर्थ असा की  'मी' जीवात्मा वेगळा आहे आणि ते परम शिवतत्त्व वेगळे आहे, असा भ्रम नाहीसा होतो. 

हे दोन्ही वाक्य मिळून हेच सांगितले आहे की शंकराची सोप्यापद्धतीने पण अनन्यभावे भक्ती केली केली , मोक्ष मिळतो. 


शुद्धस्वरें गर्जति वेद चारी ।

•चार वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. 

वेद आपल्या चार महावाक्यांमध्ये  सारांश सांगतात.

प्रज्ञानं ब्रह्म (ऋग्वेद) – सर्वोच्च ज्ञान हेच ब्रह्म (ईश्वर) आहे.

अहं ब्रह्मास्मि (यजुर्वेद) – मीच तो ब्रह्म आहे.

तत्त्वमसि (सामवेद) – ते परमतत्त्व तूच आहेस.

अयमात्मा ब्रह्म (अथर्ववेद) – हा आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे.

"स्वतःमधील आणि संपूर्ण सृष्टीमधील एकाच ईश्वरी तत्त्वाला ओळखणे, सर्वांशी प्रेमाने व सदाचाराने वागणे आणि आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे" हेच   'शुद्धस्वरें गर्जति वेद चारी ।'   यातून सुचविले आहे.  कठीण वेदांभ्यासातून जे साध्य होते, ते साध्या शिवभक्तीतून होते. 

म्हणून "तुजवीण शंभो मज कोण तारी ॥" ही आर्त आळवणी  केली आहे.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.





#सहजोक्त.

निधानकुंभ भरला अभंग ।

पहा निजांगें शिव ज्योतिर्लिंग ।

गंभीर धीर सुरचक्रधारी ।

तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २५॥


शंकराच्या अवस्थेचे वर्णन या कडव्यात आहे.

एक एक ओळीचा सविस्तर अर्थ बघू या.


निधानकुंभ भरला अभंग ।

निधान म्हणजे खजिना, निधी, ठेवा, आश्रयस्थान, भांडार वगैरे. निधानकुंभ म्हणजे खजिना किंवा मौल्यवान वस्तू साठवलेला कुंभ. अभंग म्हणजे ज्याला कधीही क्षय नाही, जो अखंड, अविनाशी आणि परिपूर्ण आहे असा. मौल्यवान तत्त्वांनी खचाखच व्यापलेला शंकर!


पहा निजांगें शिव ज्योतिर्लिंग ।

निजांग म्हणजे स्वतःचे मूळ रूप किंवा आत्मस्वरूप. शिव म्हणजे पवित्र.

ज्योतिर्लिंग म्हणजे शिवाच्या सर्वोच्च, स्वयंभू आणि अनंत प्रकाशाचे स्वरूप होय.

"निधानकुंभ भरला अभंग

पहा निजांगें शिव ज्योतिर्लिंग" या दोन्ही ओळीतून शंकराची विशेषणे योजून वर्णन केलेले आहे.

कवी म्हणतात, अखंड आणि अविनाशी असा भरलेला निधानकुंभ, पवित्र असा, आत्मस्वरूपी, स्वयंभू आणि अनंत प्रकाशाचे स्वरूप असलेला शंकर.


गंभीर धीर सुरचक्रधारी ।


याही ओळीत शंकराची तीन विशेषणे आहेत.


गंभीर हा शब्द 'गम्' (जाणे किंवा गती असणे) या मूळ धातूपासून झालाय. संस्कृतमध्ये 'गम् + ईरन्' 'गभीर' आणि अनुस्वारासह 'गंभीर' असे रूप तयार होते.

संस्कृतमध्ये याचा अर्थ 'खोल' किंवा 'अगाध' असा होता. उदा. गंभीर नद किंवा समुद्र ज्याची खोली मोजता येत नाही असा अथांग जलाशय.


काळाच्या ओघात या शब्दाचा वापर मानवी स्वभाव आणि परिस्थिती दर्शवण्यासाठी लाक्षणिक अर्थाने होऊ लागला. ज्याप्रमाणे खोल पाण्याची संथ हालचाल असते, त्याचप्रमाणे जो व्यक्ती चंचल नाही, शांत आणि विचारी आहे तो 'गंभीर'. इथे हे शंकराचे विशेषण आहे.


धीर म्हणजे धैर्यशील. मुळात धीर शब्द दोन प्रकारे निर्माण झाला असे म्हणतात. (1) 'धी' (बुद्धी/ज्ञान) या नामापासून तयार झाला आहे. 'धी' (मूळ धातू ध्ये - विचार करणे) + 'र' (प्रत्यय). याचा शाब्दिक अर्थ 'बुद्धीने युक्त असलेला' किंवा 'विचारशील' असा होतो.

(2) 'धियं राति' (धियं राति रा-क) म्हणजेच 'जो बुद्धी देतो किंवा बुद्धी धारण करतो' तो धीर.

शंकराला दोन्ही विशेषणे लागू होतात.

याच ओळीत अजून एक विशेषण योजले आहे, 'सुरचक्रधारी'.


या श्लोकात सुर शब्द आलाय, सूर नाही. सुर म्हणजे दीप्ति, तेज, ऐश्य, ऐश्वर्य्य इत्यादी तर सूर म्हणजे सूर्य, देवता इत्यादी अर्थ होतो.


खरे तर चक्रधर किंवा चक्रधारी ही विष्णुची विशेषणे आहेत. शंकर कधीच चक्र धारण करणारा नाही. मग 'सुरचक्रधारी' कां म्हटले गेले?

सुदर्शन चक्राबद्दल एक पौराणिक कथा आहे.

जेव्हा भगवान विष्णू वैकुंठ चतुर्दशीला काशी येथे महादेवांची पूजा करत होते, तेव्हा त्यांची भक्ती परीक्षा घेण्यासाठी महादेवांनी एक कमळ पुष्प कमी केले. विष्णूंनी १००० कमळांनी शिवाची पूजा करण्याचा संकल्प केला होता. एक पुष्प कमी पडल्यावर त्यांनी स्वतःचा डोळा- जो 'कमलनयन' असतो- तो अर्पण करण्याचा निर्णय घेतला.

विष्णूंच्या या अगाध भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना दुष्टांचा नाश करण्यासाठी 'सुदर्शन चक्र' प्रदान केले. सर्वप्रथम शंकराने तेजस्वी सुदर्शन चक्र हाती घेऊन विष्णुला दिले. म्हणून तो सुरचक्रधारी आहे.


तुजवीण शंभो मज कोण तारी ॥

पहिल्या तीन ओळींत योजलेल्या आठ अलौकिक विशेषणांनंतर, या शेवटच्या ओळीत साधकाचा परिपूर्ण शरणागत भाव प्रकट होतो. जेव्हा माणूस आपल्या अहंकाराचा त्याग करून शंकराच्या या विराट आणि कल्याणकारी स्वरूपाला शरण जातो, तेव्हा 'तुझ्याशिवाय मला या भवसागरातून तारणारा दुसरा कोणीही नाही' हे आत्मनिवेदन आपोआपच ओठांवर येते.


निधानकुंभ भरला अभंग ।

पहा निजांगें शिव ज्योतिर्लिंग ।

गंभीर धीर सुरचक्रधारी ।

तुजवीण शंभो मज कोण तारी


आता या कडव्याचा एकंदरीत अर्थ थोडक्यात असा, पहिल्या तीन ओळींत योजलेल्या आठ अलौकिक विशेषणांनी युक्त असलेल्या, अनंत आणि कल्याणकारी शंकराशिवाय या जगात जिवाला तरून नेणारा दुसरा कोणताही त्राता नाही.


©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, September 23, 2026

शिवस्तुती- कैलासराणा - भाग 3

 #सहजोक्त.

कर्पूरगौर स्मरल्या विसावा । 

चिंता हरी जो भजकां सदैवा ।

अंतीं स्वहीत सुचना विचारी । 

तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १८॥

कापरासारख्या गोऱ्या वर्णाच्या हे शिवा, तुझे स्मरण केल्याने मनाला विसावा मिळतो. तू भक्तांच्या चिंता हरण करतोस आणि अंतकाळात आत्महिताचा मार्ग दाखवतोस. हे शंभो, तुझ्याशिवाय या जगात मला तारून नेणारे दुसरे कोणीही नाही, तूच माझा रक्षक आहेस."


अर्थ तसा सोपाच आहे. फक्त काही शब्दांचा विचार करू.

•कर्पूरगौर =  शंकराचे वर्णन करताना साधारणपणे त्याला कापुरासारखा गोरा असे म्हणतात.  म्हणजे शंकराच्या गोरेपणाला कापुराची उपमा दिली आहे.

कारण शिवाचे निर्मळत्व, शीतलता, पवित्रता आणि भक्ताचा अहंकार नष्ट करण्याची त्यांची क्षमता या गुणांना अधोरेखित  व्हायला हव्यात. 


कर्पूर हा त्रिदोष शामक मानला जातो; विशेषतः हा वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना संतुलित करण्यास मदत करतो. तसाच शंकर सुद्धा त्रिविध ताप (आध्यात्मिक, अधिभौतिक,अधिदैविक) दूर करणारे आहेत.

•भजक = हा एक छान शब्द आहे.  भजन करणारा भक्त, असा त्याचा अर्थ आहे. 

•हरी = इथे -हरण करतो, दूर करतो- असा अर्थ आहे. 

•अंतीं स्वहीत सुचना विचारी =  भक्ताचा शेवट होताना, भक्ताच्या  हिताच्या सूचना आणि विचार , भक्ताला करायला सक्षम करतोस. 

अशा शंकरा शिवाय कोण बरे मला उद्धारू शकेल? 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.



#सहजोक्त.

विराम काळीं विकळ शरीर । 

उदास चित्तीं न धरीच धीर ।

चिंतामणी चिंतनें चित्तहारी ।

 तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १९॥

 जीवनाच्या शेवटी मृत्यूच्या वेळी जेव्हा हे शरीर थकते व विकळ होते, तेव्हा मन उदास होते आणि चिंता व भीतीमुळे मन स्थिर राहत नाही. अशा वेळी मनाला सुख व शांतता देणाऱ्या आणि भक्तांच्या चिंता दूर करणाऱ्या हे शंभो (भगवान शिव), तुझे नामस्मरण व चिंतन हेच एकमेव आधाराचे स्थान आहे. हे शंकरा, तुझ्याशिवाय मला या संसारसागरातून सोडवणारा दुसरा कोणीही नाही. 

या कडव्याचा अर्थ सोपाच आहे.

आपण फक्त काही शब्दांचे अर्थ बघू.

•1] विकळ =  

उपसर्ग 'वि' = 'नाही', 'रहित' किंवा 'विकृत/विपरीत' असा अर्थ होतो. 

मूळ धातू 'कल्' –  'मोजणे', 'भाग करणे' किंवा 'स्वरूप देणे' असा अर्थ होतो. 

अच्' म्हणजे 'अ' प्रत्यय लागून 'विकल' हे विशेषण तयार होते. 

 ज्याचा एखादा भाग किंवा कला (अंश) कमी झाला आहे, जो पूर्ण नाही, म्हणजेच 'अपूर्ण', 'विकल' किंवा 'दोषयुक्त'. 


व्युत्पत्तीच्या नियमांनुसार काळानुरूप या शब्दाचा वापर मानवी भावना आणि शारीरिक स्थिती दर्शवण्यासाठी होऊ लागला: 

शारीरिक अर्थ (अंगहीन): ज्याचे अवयव निकामी किंवा दोषयुक्त झाले आहेत तो; उदा. 'विकलांग' (विकल + अंग). [1]

मानसिक अर्थ (व्याकुळता): मनाची एकाग्रता भंग पावून जेव्हा माणूस अस्वस्थ किंवा दुःखी होतो, तेव्हा त्याला 'विकळ' किंवा 'विव्हळ' म्हटले जाते.


मराठी शब्दकोश आणि प्राचीन साहित्यात 'विकळ' या शब्दाचे प्रमुख ४ अर्थ आढळतात: 

दुःखित किंवा गालितगात्र: अत्यंत थकलेला किंवा दुःखी.

 उदा. वामन पंडितांच्या भामाविलासात: 

"परम विकळ मी तूं या स्मृती ही उडाल्या।"


विसकटलेला किंवा अस्ताव्यस्त: विस्कळीत झालेला.

अधू किंवा व्यंग: शारीरिक दृष्ट्या कमजोर किंवा अपंग.

हतबुद्ध किंवा असहाय्य: दीन अवस्था प्राप्त झालेला. 

थोडक्यात सांगायचे तर, 'वि' (रहित) + 'कला' (अंश/शक्ती) म्हणजेच ज्याची शक्ती, बुद्धी किंवा अवयव पूर्ण राहिलेले नाहीत, असा तो 'विकळ'. 

•2] उदास 

उत् (उपसर्ग) + आस् (धातू) = उदास (उदास्)

येथे 'उत्' म्हणजे वर किंवा बाहेर पडणे आणि 'आस्' म्हणजे बसणे (किंवा स्थिती). 


काळानुरूप या शब्दाच्या अर्थात मोठा बदल झाला आहे:

मूळ अर्थ (तटस्थ किंवा विरक्त): संस्कृतमध्ये याचा मूळ अर्थ 'वर किंवा बाजूला बसलेला' असा होतो. म्हणजे जो कोणत्याही संसारात किंवा वादात पडत नाही, जो तटस्थ, निरपेक्ष, विरक्त किंवा बेफिकीर आहे. ज्ञानेश्वरी आणि जुन्या महानुभाव साहित्यात 'उदास' हा शब्द याच विरक्तीच्या अर्थाने वापरलेला आढळतो (उदा. "तरि जो या देहावरी । उदासु ऐसिया परी ।" - ज्ञानेश्वरी). 

आधुनिक अर्थ (दुःखी किंवा खिन्न): कालांतराने, जो माणूस जगापासून किंवा संसारापासून विरक्त होतो, तो आनंदापासूनही दूर जातो अशी समजूत झाली. यातूनच 'उदास' या शब्दाला 'खिन्न', 'दुःखी', 'निरुत्साही' किंवा 'कष्टी' हा आजचा प्रचलित अर्थ प्राप्त झाला. 

थोडक्यात असे की , संसारात असूनही 'अलिप्त किंवा विरक्त राहणे' या मूळ अर्थापासून बदलत जाऊन हा शब्द आज 'मन दुःखी असणे' या अर्थासाठी वापरला जातो. 

•3] चित्त =

या शब्दाची व्युत्पत्ती 'चित्' (किंवा 'चिन्') धातूपासून झाली आहे.  ज्याचा अर्थ 'चेतन असणे', 'जाणणे', 'चित्त असणे' किंवा 'चिंतन करणे' असा होतो. 

"चेतयति अनेनेति चित्तम्" (किंवा चेतत्यनेनेति)

 ज्याच्याद्वारे   चेतना अनुभवली जाते, जाणले जाते किंवा साठवले जाते, त्याला 'चित्त' असे म्हणतात. 


वेदान्त आणि योगदर्शनात चित्त हे अंतःकरणाचा (मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त) एक प्रमुख भाग मानले जाते. 

महर्षी पतंजलींनी योगसूत्रात ("योगश्चित्तवृत्तिनिरोधः")  चित्ताच्या वृत्तींच्या नियंत्रणाला 'योग' म्हटले आहे.


•4] चिंतामणी= "चिंतितान् अर्थान् यच्छति इति चिंतामणी "म्हणजे  चिंतलेले पूर्ण करणारा मणी.

इथे शंकराचे विशेषण म्हणून हा शब्द आलाय. 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.







#सहजोक्त.

सुखावसाने सकळें सुखाचीं । 

दुःखावसाने टळती जगाचीं ।

देहावसानें धरणी थरारी । 

तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २०॥

सर्व सुखांचा आणि जगातील दुःखांचा अंत झाल्यावर आणि मृत्यूसमयी थरथरणार्या या पृथ्वीवर हे शंभो, तुझ्याशिवाय माझा उद्धार करणारा दुसरा कोणीही नाही.

शब्दार्थ बघू या.

•सुखावसान=  सुख + अवसान = सुखावसान

सुख:  सु+ख . ह्यातील 'सु' हा उपसर्ग आहे. त्याचा अर्थ 'चांगला' असा होतो. आणि 'ख' या एकक्षरी शब्दाचा अर्थ 'अवकाश'(space )असा होतो. सुख म्हणजे आपल्या अवती भवतीचे अवकाश चांगले असणे. कारण अवतीभावती आनंद, चांगुलपणा असेल तरच खरे सुख. अन्यथा अवकाश दुष्ट, किंवा दूषित असेल तर दुःख होय. 

अवसान: अंत, समाप्ती किंवा शेवट (हा शब्द संस्कृत धातू 'सो' किंवा 'अव-सो' पासून बनला आहे, ज्याचा अर्थ 'थांबणे' किंवा 'संपणे' असा होतो).

•दुःखावसान: दुःख + अवसान 

दुःख, दु:+ ख म्हणजे दुष्ट किंवा दूषित अवकाश. आपल्या अवती भवती जर दूषित आभामंडळ असेल तर आपण दुःखी होतो, होय ना. 

•देह : 'दिह्'  या मूळ धातूपासून तयार झाला आहे. 

'दिग्धीति देहः'  अर्थात,जो सतत वाढतो तो देह.

 'दिह्' या धातूचा मूळ अर्थ 'वाढणे' (वृद्धी होणे), 'माखणे' किंवा 'लेप देणे' असा होतो. 

 मानवी किंवा प्राण्यांचे शरीर जन्माच्या वेळी लहान असते आणि ते सुरुवातीच्या काळात सातत्याने वाढत जाते (वृद्धी पावते). सतत वाढण्याची किंवा विकसित होण्याची क्षमता असणाऱ्या या भौतिक रचनेला म्हणूनच 'देह' असे म्हणतात. तर काही ग्रंथांनुसार, हाडांच्या सांगाड्यावर मांस, त्वचा आणि रक्ताचा 'लेप' देऊन (माखून) जे रूप तयार होते, त्याला 'देह' म्हटले जाते. 

•धरणी : संस्कृतमधील 'धृ' ह्या मूळ धातूपासून  धरणी शब्द तयार झाला.  मूळ धातूचा अर्थ 'धारण करणे' किंवा 'सांभाळणे' असा होतो. 

"धियते लोकः अनया इति धरणी" 

किंवा "या सर्वं धरति सा धरणी"

 जी (सर्व चराचर सृष्टीला, प्राण्यांना, झाडांना आणि पर्वतांना) स्वतःवर धारण करते किंवा सर्वांचा भार सहन करून त्यांना आधार देते, ती म्हणजे 'धरणी'.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.




शिवस्तुती -कैलास राणा -भाग 5

  सहजोक्त मंदार बिल्वें बकुलें सुवासी । माला पवित्र वहा शंकरासी । काशीपुरीं भैरव विश्व तारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २६॥ जाई जुई चंपक पुष...