Sunday, July 19, 2026

सहजोक्त.

 

.

शिवी...

अबबो आता शिवीवर पण लिहायचे कां? 😊 हं! लिहिता येऊ शकते.

मराठी भाषेत 'शिवी' शब्द कुठून, कसा आला असेल बरे?

मराठी भाषेतील 'शिवी' (गाळ/अपशब्द) या शब्दाची उत्पत्ती 'शप्' या संस्कृत धातूपासून झाली आहे. 'शप्' म्हणजे शाप देणे. व्युत्पत्ती अशा प्रकारे झाली असावी.

संस्कृत= 'शप्' (शाप देणे)

प्राकृत='सवइ' / 'सिवइ'

मराठी= शिवी (अपशब्द, निंदा किंवा कोणाला उद्देशून रागाने काढलेले अनुचित उद्गार)

तर अशी ही "शिवी".

मराठीत "शिवी" उगाचही दिली जाते. वाक्यागणिक शिव्या देणे, ही आजकाल "रावडी स्टाईल " किंवा एक तथाकथित 'कूल' असण्याची पद्धत समजली जाते. बरेचदा असे लक्षात येते की अनेक जण, स्वतःला अर्थ कळत नसूनही केवळ फॅशन म्हणून शिवी योजतात! विशेषतः लहान मुले आणि मुली सुद्धा मोठ्यांचे ऐकून, अनुकरण करत सहज शिव्या देतात.

रागणे स्वाभाविक असते, तो व्यक्त करायला 'शिवी' ही रागाची शाब्दिक अभिव्यक्ती आहे. एक प्रकारे ही शाब्दिक हिंसाच होय. फुलांची लाखोळी वाहणारी मराठी मंडळी गरज पडल्यास 'शिव्यांची लाखोळी' वाहण्यातही मागे नाहीत.

पण या शिवीचा एक सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूही आपल्याला पाहायला मिळतो. मानवी भावनांचा सुयोग्य निचारा करण्याची सोय आपल्या संस्कृतीमध्ये सणवारांच्या माध्यमातून केलेली आहे. होळीच्या धुरवडीच्या दिवशी मनमोकळ्या शिव्या देण्याची प्रथा आहे. 'झररर..... फो....' करून अस्सल, इरसाल शिव्या दिल्या तर, 'बुरा ना मानो, होली है' करून रंग पोतायचा, ही रूढी. 

वर्षाभरातील मनातील सगळा मळभ, राग आणि कटुता या दिवशी शिव्यांच्या माध्यमातून बाहेर पडावी आणि मन मोकळे व्हावे, हाच कदाचित यामागील लोकसंस्कृतीचा उद्देश असावा.

विविध भाषांमधील रूपे

शिव्या सर्वच भाषेमध्ये असतात. भाषेचा तो एक अविभाज्य (पण नकारात्मक) भाग आहे. वेगवेगळ्या भाषांत त्याला खालीलप्रमाणे म्हटले जाते:


•इंग्रजी = Abusive word / Swear word

•हिंदी = गाली

•गुजराती=गाल (गाळी)

•तेलुगू= తిట్టు (Thittu)

•संस्कृत=अपशब्द 

संस्कृत भाषेमध्ये याच शब्दाला अनेक पर्यायवाची शब्द आहेत; 

जसे की

 कुवचनम्, 

दुरुक्तिः, 

अपशब्दः, 

दुरालापः इत्यादी.

संस्कृत ही देवभाषा आहे, तर त्यात शिव्या नसतीलच, असा बरेच जणांचा गैरसमज असतो. पण असे नाही. संस्कृतमध्येही शिव्या आहेत, पण आजच्या मराठी किंवा इतर आधुनिक भाषांच्या तुलनेत त्या फारच 'सात्विक' किंवा सौम्य वाटाव्यात अशाच आहेत.

उदा. मूर्ख, जडबुद्धी, धूर्त, कापुरुष, वंचक, दुष्ट, पामर, खल, कुरूप, लोभी, पाखंडी, पापी, दुराचारी इत्यादी इत्यादी.

संस्कृतचे बौद्धिक आणि 'सन्मानजनक' टोमणे!

संस्कृत भाषेचे अजून एक विशेष म्हणजे समोरच्याला अत्यंत सन्मानजनक वाटणाऱ्या शब्दांतून अपशब्द किंवा वाक्प्रचार योजणे. ऐकणाऱ्याला वाटते की आपले कौतुक चालले आहे, पण प्रत्यक्षात तो एक अतिशय बौद्धिक टोला असतो. जसे की:

वैशाखनंदन= (ऐकायला एखाद्या राजाच्या मुलासारखे वाटते, पण याचा खरा अर्थ होतो— 'गाढव'!)

सुकुमारबुद्धी=  (अतिशय सुकोमल बुद्धी असलेला, म्हणजेच 'मूर्ख' किंवा 'मतिमंद'.)

घृतबुद्धी= (गोठलेले तूप जसे पाण्याच्या तळाशी जाऊन बसते, तसा हा बुद्धीचा तळ गाठलेला, म्हणजेच 'अतिशय ढ' माणूस!)

महिषी=(राणीसारखा सन्माननीय शब्द वाटतो, पण याचा अर्थ 'म्हैस' असाही होतो.)

अनार्यपुत्र= (ज्याला वागण्याची सभ्यता नाही असा 'दुर्जन' किंवा 'नालायक' माणूस.)

एरंडोपि द्रुमायते= (जिथे एकही मोठे झाड नाही, तिथे एरंडाचे झाड स्वतःला कल्पवृक्ष समजते; म्हणजेच 'मूर्खांच्या गावात गाढव शहाणे'.)

गच्छ सूकरं भद्रं ते= (तुझे कल्याण असो, आता मुकाट्याने डुकरासारखा निघून जा!)


याच्या पाठीमागे एक रंजक कथा आहे. 

 एकदा एक उर्मट डुक्कर जंगलाच्या राजाला म्हणजेच सिंहाला युद्धाचे आव्हान देते. चिखलात माखलेल्या त्या डुकराशी लढून स्वतःला विनाकारण घाण करून घेण्यात सिंहाला काहीच रस नसतो. सिंह शांतपणे दोन पावले मागे सरकतो आणि म्हणतो, "गच्छ सूकरं भद्रं ते..." म्हणजेच "हे डुकरा, तुझे कल्याण असो, तू इथून निघून जा. शहाण्या लोकांना नीट ठाऊक आहे की सिंह आणि डुक्कर यांच्या ताकदीत काय फरक आहे!" मथितार्थ हाच की, मूर्ख आणि गलिच्छ प्रवृत्तीच्या माणसाच्या आहारी जाण्यापेक्षा त्याला बाजूला सारून पुढे निघून जाणे हाच खरा शहाणपणा!


शेवटी...

काळाच्या ओघात शिव्यांचे स्वरूप मात्र खूप बदलले आहे. सणापुरती किंवा संतापाचा निचरा करण्यासाठी तोंडातून अनवधानाने बाहेर पडणारी शिवी आता रोजच्या संभाषणात हक्काचे स्थान मिळवून बसली आहे. पूर्वी जी शिवी केवळ 'रागाच्या भरात' बाहेर पडायची, ती आता मित्रांमधील 'प्रेम' व्यक्त करण्याचे किंवा संवादाला 'तडका' देण्याचे माध्यम बनली आहे.

शिवी हे माणसाच्या आदिम प्रवृत्तीचे शाब्दिक रूप आहे. ती जिभेवर यायला वेळ लागत नाही, पण ती रोखून संयमाने शब्द मांडणे ही खरी सुसंस्कृतपणाची लक्षणे आहेत.

मराठीतही सामान्य शब्दांपासून ते अगदी इरसाल आणि गलिच्छ शिव्यांची मोठी मालिका उपलब्ध आहे. पण सुसंस्कृत किंवा सामान्य सामाजिक जीवनात त्यांचा वापर टाळलेलाच बरा. आपण मुखातून काढत असलेल्या शिव्यांचे अर्थ नीट जाणून घेऊन मगच त्याचा विवेकी वापर करावा. आपल्या संवादातून आणि भाषेमधून समाजाला अवकळा आणणारे गलिच्छ अपशब्द कधीही योजू नयेत, यातच आपल्या भाषेची आणि संस्कृतीची प्रतिष्ठा राखली जाईल.

त्यामुळे, जर कधी रागाच्या भरात तोंडून काही बाहेर पडणारच असेल, तर आजच्या गलिच्छ शिव्यांपेक्षा संस्कृतप्रचूर अशा ‘वैशाखनंदना’ किंवा ‘घृतबुद्धी’ अशा शब्दांचा वापर केलेला काय वाईट? किमान ऐकणाऱ्यालाही आपण 'विद्वत्तापूर्ण' शिवी खाल्ल्याचे एक वेगळेच समाधान मिळेल! 😉

- (©डॉ. प्रज्ञा देशपांडे )


Wednesday, March 4, 2026

#सहजोक्त

.


क्षमा शस्त्रं करे यस्य 

दुर्जनः किं करिष्यति। 

अतृणे पतितो वह्निः

 स्वयमेवोपशाम्यति॥

ज्याच्या हातात क्षमा नावाचे शस्त्र आहे, त्याचे दुर्जन काय वाकडे करेल?  गवत नसलेल्या जमिनीवर अग्निज्वाला पडली तर ती आपसूक विझून जाईल.

 हे सुभाषित मला शालेय जीवनात होते.

तेव्हा ते अजिबात पटले नव्हते. तेव्हाच काय, अगदी अलीकडे पर्यंत पटत नव्हते. 

पण गेल्या काही वर्षात मत बदलले.  कारण 'क्षमा' शब्दाचा खरा अर्थ कळला.


मुळात क्षमा शब्दाचा आपण ढोबळमानाने अर्थ घेतो "माफी" आणि तिथेच गल्लत होते आपली.   आणि तोच अर्थ घेऊन वरील सुभाषित वाचले की माफी म्हणजे भेकडपणा असे वाटणे स्वभाविक आहे. 


क्षमा या शब्दाचा अर्थ  सहनकरणे, धीर धरणे, सोसून घेणे, सामर्थ्य असणे,  सहिष्णू असणे इत्यादी होतो. 


 (क्षमते आत्मोपरिस्थितानां जीवानामपराधं या ।  क्षम् अच् षित्वादङ् वा ततष्टाग् । )  क्षितिः ।   स्वतःच्या परिस्थितीला सहून घेणे किंवा जीवांच्या अपराधाला धैर्याने सामोरे जाणे होय. 


[(क्षमस्य भावः इति ।  क्षम + तल् । )   योग्यता ।  सामर्थ्यम् । 

क्षमा बाहुलकात्  क्षान्ति: अत एव क्षमू सहने इति | ]

मूळ धातू क्षमू =क्षम् = सहन करणे, या अर्थी आहे. 

याच धातू पासून क्षमा, क्षमता, सक्षम, क्षमन इत्यादी शब्द तयार होतात.

क्षमा शब्दाचा  कदाचित संकुचित अर्थच आपल्या डोक्यात भरल्या गेला आहे. 

 क्षमता, सक्षम  हे शब्द आपण भाषेत योजतो ना?  इथे आपण काय अर्थ घेतो?  

तोच अर्थ 'क्षमा' या शब्दासाठी घ्यायला हवा.


आता वरचे सुभाषित परत एकदा बघू.

सुभाषितात, एक दाखला दिला आहे तो अतिशय समर्पक आहे. 

गवत नसलेल्या भूमीवर ठिणगी पडली, तर ती आपोआप विझते.   अग्नीचा गुणधर्म जळणे आणि जाळणे हाच आहे. अग्नी स्वतः जळतो आणि जळण्याची 'क्षमता' जळण्याचा गुण असलेल्याला जाळतो.  'गवत' जळण्यास 'सक्षम' आहे. 'कोरडी भूमी' जळण्यास 'अक्षम'  आहे. 

 जाळणारे, डिवचणारे, चिडविणारे, हेवा करणारे, मनस्ताप देणारे, दुखविणारे, हिणविणारे, अपमान करणारे, व्यर्थ वेळ घालवायला भाग पाडणारे अनेक व्यक्ती, प्रसंग, घटना आपल्या अवती भवती असतात, घडतात.  आपण 'गवत' बनून जळू लागलो, तर? आपले अस्तित्व संपेल. आज आपण तर उद्या आपल्याच सारखे दुसरे 'गवत' सापडेलच 'आग लावणाऱ्याला', कारण त्याचा तोच त्याचा ' धंदा' असतो. आपला पिंड जर सर्जक असेल तर अशांना 'भाव' देऊच नये. 'दुर्लक्षाय नमः!' हाच महामंत्र आहे. 

आणि हेच आपण  आपली क्षमता वाढविली, दुर्लक्ष केले, मनाला लावूनच घेतले नाही म्हणजे आपण क्षमा केली, धैर्य ठेवले, त्या वेळेला अलिप्त राहिले तर?   'असे आगलावे' लोकं त्यांच्या स्वभावनुसार दुसरे 'टार्गेट' शोधू लागतात. आपण मनातून स्थिर होतो, पुढे 'योग्य' खबरदारी, घ्यायला, उपाय करायला, मनाची तयारी करायला वेळ मिळतो. 

म्हणून कितीही दुर्जन आले तरी धीरगंभीर लोकांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि यशावर परिणाम होत नाही.

 क्षमता वाढवा, क्षमा करा, सक्षम बना. मस्त जगा.


©डॉ. प्रज्ञा देशपांडे.




सहजोक्त.

  . शिवी ... अबबो आता शिवीवर पण लिहायचे कां? 😊 हं! लिहिता येऊ शकते. मराठी भाषेत 'शिवी' शब्द कुठून, कसा आला असेल बरे? मराठी भाषेतील ...