.
क्षमा शस्त्रं करे यस्य
दुर्जनः किं करिष्यति।
अतृणे पतितो वह्निः
स्वयमेवोपशाम्यति॥
ज्याच्या हातात क्षमा नावाचे शस्त्र आहे, त्याचे दुर्जन काय वाकडे करेल? गवत नसलेल्या जमिनीवर अग्निज्वाला पडली तर ती आपसूक विझून जाईल.
हे सुभाषित मला शालेय जीवनात होते.
तेव्हा ते अजिबात पटले नव्हते. तेव्हाच काय, अगदी अलीकडे पर्यंत पटत नव्हते.
पण गेल्या काही वर्षात मत बदलले. कारण 'क्षमा' शब्दाचा खरा अर्थ कळला.
मुळात क्षमा शब्दाचा आपण ढोबळमानाने अर्थ घेतो "माफी" आणि तिथेच गल्लत होते आपली. आणि तोच अर्थ घेऊन वरील सुभाषित वाचले की माफी म्हणजे भेकडपणा असे वाटणे स्वभाविक आहे.
क्षमा या शब्दाचा अर्थ सहनकरणे, धीर धरणे, सोसून घेणे, सामर्थ्य असणे, सहिष्णू असणे इत्यादी होतो.
(क्षमते आत्मोपरिस्थितानां जीवानामपराधं या । क्षम् अच् षित्वादङ् वा ततष्टाग् । ) क्षितिः । स्वतःच्या परिस्थितीला सहून घेणे किंवा जीवांच्या अपराधाला धैर्याने सामोरे जाणे होय.
[(क्षमस्य भावः इति । क्षम + तल् । ) योग्यता । सामर्थ्यम् ।
क्षमा बाहुलकात् क्षान्ति: अत एव क्षमू सहने इति | ]
मूळ धातू क्षमू =क्षम् = सहन करणे, या अर्थी आहे.
याच धातू पासून क्षमा, क्षमता, सक्षम, क्षमन इत्यादी शब्द तयार होतात.
क्षमा शब्दाचा कदाचित संकुचित अर्थच आपल्या डोक्यात भरल्या गेला आहे.
क्षमता, सक्षम हे शब्द आपण भाषेत योजतो ना? इथे आपण काय अर्थ घेतो?
तोच अर्थ 'क्षमा' या शब्दासाठी घ्यायला हवा.
आता वरचे सुभाषित परत एकदा बघू.
सुभाषितात, एक दाखला दिला आहे तो अतिशय समर्पक आहे.
गवत नसलेल्या भूमीवर ठिणगी पडली, तर ती आपोआप विझते. अग्नीचा गुणधर्म जळणे आणि जाळणे हाच आहे. अग्नी स्वतः जळतो आणि जळण्याची 'क्षमता' जळण्याचा गुण असलेल्याला जाळतो. 'गवत' जळण्यास 'सक्षम' आहे. 'कोरडी भूमी' जळण्यास 'अक्षम' आहे.
जाळणारे, डिवचणारे, चिडविणारे, हेवा करणारे, मनस्ताप देणारे, दुखविणारे, हिणविणारे, अपमान करणारे, व्यर्थ वेळ घालवायला भाग पाडणारे अनेक व्यक्ती, प्रसंग, घटना आपल्या अवती भवती असतात, घडतात. आपण 'गवत' बनून जळू लागलो, तर? आपले अस्तित्व संपेल. आज आपण तर उद्या आपल्याच सारखे दुसरे 'गवत' सापडेलच 'आग लावणाऱ्याला', कारण त्याचा तोच त्याचा ' धंदा' असतो. आपला पिंड जर सर्जक असेल तर अशांना 'भाव' देऊच नये. 'दुर्लक्षाय नमः!' हाच महामंत्र आहे.
आणि हेच आपण आपली क्षमता वाढविली, दुर्लक्ष केले, मनाला लावूनच घेतले नाही म्हणजे आपण क्षमा केली, धैर्य ठेवले, त्या वेळेला अलिप्त राहिले तर? 'असे आगलावे' लोकं त्यांच्या स्वभावनुसार दुसरे 'टार्गेट' शोधू लागतात. आपण मनातून स्थिर होतो, पुढे 'योग्य' खबरदारी, घ्यायला, उपाय करायला, मनाची तयारी करायला वेळ मिळतो.
म्हणून कितीही दुर्जन आले तरी धीरगंभीर लोकांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि यशावर परिणाम होत नाही.
क्षमता वाढवा, क्षमा करा, सक्षम बना. मस्त जगा.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment