Wednesday, October 1, 2025

लो लो लागला

 🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏

#श्री रेणुका मातेची आरती.

ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यांच्या विषयी अधिक काहीच माहिती नाही. 

ही आरती मी लहानपणी मावशीच्या घरी, नवरात्र काळात ऐकली आहे. तत्कालीन बोली भाषेतील ही अत्यन्त उत्कट भक्तीने भारलेली आरती आहे. 

या बोलीभाषेत एक गोडवा आहेच, सोबत बोली भाषेचा ठसकापण आहे. यातील काही शब्द अतिशय वेगळे वाटतात.  


लोलो लागला अंबेचा भेदाभेद कैचा। 

आला कंटाळा विषयाचा, धंदा मुळ मायेचा ।।

 लोलो ॥ धृ.॥ 


अंबेचा लळा लागला. लोलो लागणे, हा बोलीभाषेतील लडीवाळ वाक्प्रचार. ( लो) मृदू शब्दाची पुनरुक्ती  भाषेला गोडवा देते. 

अंबेचा लळा लागल्यामुळे सारे भेद नाहीसे झाले. 

"कैचा" हा ही एक बोली भाषेतील शब्द. कैसा, कुठला, कसा काय, कुठून आला  इत्यादी विविध अर्थ त्यात आहे. 

 जीवात्मा-परामात्मा भेदाभेद सुटला. आप-पर भाव सुटला. मूळ मायेचा पसारा म्हणजे संसार. तिचाच हा उद्योग (धंदा)  म्हणून ( ऐहिक) विषयांचा (इंद्रियजन्य सुखाचा) कंटाळा आला.

सांख्य दर्शनाचे सार या दोन ओळीत सांगितले आहे.




प्रपंच खोटा, हा मृगपाणी, घोरे फिरतो प्राणी। 

कन्या सुत-दारा,-धन माझे, मिथ्या वदतो वाणी।

 अंती नेतिल हे, यमदूत, न ये संगे कोणी ।

 निर्गुण रेणुका, कुळदेवी, जपतो मी निर्वाणी ॥ 

लोलो ॥ १॥

हा प्रपंच, संसार म्हणजे मृगजळा सारखा खोटा आहे, जीव (प्राण ज्यात आहे, तो प्राणी) संसार भयाने फिरत असतो.

"मुलगी, मुलगा, पत्नी, घर, धन  माझे"  असे जे म्हणतात ते सारे खोटे आहे.

अंत समयी यमदूत न्यायला येतील तेव्हा कुलदेवता निर्गुण रेणुकेशिवाय दुसरे बाकी कोणीच कमी येणार नाही . म्हणून मी सतत  तिचे नामजप करीत असतो.


"कन्या सुत-दारा-धन माझे मिथ्या वदतो वाणी।"

 याच अर्थाची एक गाथा (श्लोक )पाली भाषेतील धम्मपद ग्रंथाच्या बाल वग्गात आहे, 

पुत्तो मत्थि धनम्मत्थि इति बालो विहति । 

अत्ता हि अत्तनो नत्थि कुतो पुत्तो कुतो धनं ।। ३।।


त्याचा अभंगानुवाद डॉ. श्री. भा. वरणेकर सरांनी केलेला आहे. तो असा 

पुत्र माझा धन हि माझे । धन्य नाव गाव माझे ।।

ऐसी ममता धरी मनी । मूर्ख दुःखी होय जीवनी||

 नाही आपुले आपण । कैचा पुत्र कैचे धन ।। ।।



पंचभुतांचा, अधिकार, केलासे सत्वर ।

 नयनी देखिला, आकार, अवघा तो ईश्वर। 

नाही सुखदुःख, देहाला, कैचा अहंकार।

 पाहे परमात्मा, तो ध्यानी, भासे शून्याकार । 

लोलो ॥ २ ॥ 

(मायेतून मुक्त झाल्यामुळे, आणि सतत नामजप करण्यामुळे)  पंच महाभूतांचा अधिकारी तू मला केलेस. त्यामुळे माझ्या डोळ्याला सर्वत्र ईश्वराचाच आकार दिसला. त्यामुळे अहंकार निमाला. मग या देहाला कशाचे सुख आणि कशाचे दुःख?  अहंकार नष्ट झाल्यामुळे देहाच्या सुखदुःखाच्या पलीकडे  गेलो. ध्याना मध्ये आकारविरहित परमात्मा दिसतो. 

ध्यानात निराकार परमात्मा दिसतो, मात्र दिसणाऱ्या सर्वच साकार (चराचरात) ईश्वर दिसतो. ही विसंगती नव्हे. उलट, हेच खरे ज्ञान आहे की आकाराला आलेले सारे काही, त्या निराकारातूनच आलेय. त्यामुळे, 'मला आकार दिला' याचा अहंकार कशाचा बाळगायचा?  नाही कां? 




ध्याता मुद्रा ही, उन्मनी, लागे अनुसंधानी।

 निद्रा लागली, अभिध्यानी,जे का निरंजनि । 

लीला वर्णीता,स्वरुपाची,शिणली शेषवणी। 

देखिली भवानी, जननी, त्रैलोक्यपावनी ।।

 लोलो ।। ३ ।। 

जिच्या स्वरूपाचे आणि लीलेचे वर्णन करताना सर्व प्रकारच्या वाणी थकून गेल्या आहेत, अशी त्रैलोक्याला पावन करणारी आई भवानी मी ध्यानात पहिली.

तुझ्या नाममुद्रेचे ध्यान करता करता  चित्त तुझ्याशी अनुसंधान पावते, मन उन्मनी अवस्थेत जाते.

[उन्मनी अवस्था ही एक संस्कृत संज्ञा असून तिचा अर्थ "मन नसणे" किंवा "मनाच्या पलीकडे" असा होतो. योगिक तत्त्वज्ञानामध्ये, ही चेतनेची अशी अवस्था आहे जिथे योगी पूर्णपणे जागृत किंवा झोपेमध्ये नसतो, तर या दोन अवस्थांमधील संक्रमणाच्या स्थितीत असतो. या अवस्थेत व्यक्तीचे मन विचारहीन होते आणि द्वैत संपते, म्हणजेच तो आणि मी एकच असल्याची जाणीव होते. ]

निरंजनी अभिध्यान करता करता, इतरांच्या दृष्टीने झोपी गेलो असे वाटते.

[निरंजनी म्हणजे दोषमुक्त, शुद्ध आणि निष्कलंक. संस्कृत शब्द निरंजन (नी: + अंजन)  म्हणजे "अशुद्धता किंवा ज्ञानाचा अभाव असलेला" असा होतो.]  



गोंधळ घालीन मी अंबेचा घोष अनुहाताचा 

दिवट्या उजळूनिया सदोदित पोत चैतन्याचा।

 अहं सोहं हे उदो उदो बोले चारी वाचा ।। 

लोलो ।॥ ४ ॥ 

चारच ओळीच्या या कडव्यातील एकेक शब्द, संकल्पना खूपच महत्त्वाच्या आहेत. आधी सरळ अर्थ सांगते मग एकेकाचे स्पष्टीकरण बघूया.

माझा चैतन्यरूपी  पोत पेटवून  शरीर रूपी दिवट्या उजळवून  अनाहत घोष करीत, आई अंबेचा मी गोंधळ घालीन. चारही वाणींनी अहं-सोहं या महावाक्याचा उदयकार करीन. 

(बोलीभाषा व संस्कृत यातील शब्द फरक बघा जसे अनुहात=अनाहत, अनुसया= अनसूया) 


•देवीचा गोंधळ हा महाराष्ट्रात केला जाणारा एक पारंपरिक कुलाचार आहे, ज्यात 'गोंधळी' नावाचे लोक संबळ, तुणतुणे यांसारखी वाद्ये वाजवून, देवीची स्तुती करणारी गीते गातात आणि कथा सांगून देवीची उपासना करतात.

"गोंधळ घालणे" हा एक प्राचीन लोककला प्रकार मानला जातो. या परंपरेची सुरुवात भगवान परशुरामांनी बेटासूर राक्षसाच्या वधानंतर देवीची उपासना करण्यासाठी केली होती, अशी आख्यायिका आहे. 


•अनाहत नाद म्हणजे एक वैश्विक, सूक्ष्मातीसूक्ष्म आणि न ऐकू येणारा आवाज आहे, जो भौतिक जगाच्या पलीकडे असतो आणि केवळ प्रगत योगी ध्यानात असताना अनुभवू शकतात. 'अनाहत' म्हणजे ज्याला आघात झाला नाही आणि 'नाद' म्हणजे आवाज, त्यामुळे याला 'अन-स्ट्रक साउंड' किंवा 'न तयार केलेला आवाज' असेही म्हणतात. हा एक प्रकारचा शाश्वत ध्वनी आहे, जो शरीरातील अनाहत चक्रातून अनुभवला जातो, जिथे प्रेम, शांती आणि सुसंवाद यांसारखे दैवी गुण असतात. 


•योगिक तत्त्वज्ञानानुसार, मानवी वाणीच्या चार अवस्था खालीलप्रमाणे आहेत: 

परा=  ही वाणी नाभीकमलात स्थित असते आणि केवळ महान ईश्वरभक्त व योग्यांनाच तिचा अनुभव येऊ शकतो. 

पश्यन्ती= ही वाणी हृदयस्थानी असते आणि गूढ गोष्टी समजून घेण्यासाठी किंवा अंतर्ज्ञानासाठी मदत करते.

मध्यमा= ही कंठस्थानी असते, जिथे आपण मनात बोलतो किंवा मनाशी संवाद साधतो. ही मनाची विचार प्रक्रिया आहे. 

वैखरी= ही वाणी जिभेने उच्चारली जाते, म्हणजेच जी ऐकू येते ती ही वाणी. 

 या वाणी नामस्मरणाच्या प्रगतीचे वेगवेगळे टप्पे दर्शवतात, ज्यात सामान्य व्यक्ती वैखरी वाणीतून सुरुवात करते आणि हळूहळू परा वाणीच्या अनुभवाकडे वाटचाल करते. 

•अहं-सोहम= वैदिकतत्त्वज्ञानानुसार चार महावाक्य आहेत. (1)प्रज्ञानं  ब्रह्म (2) तत्त्वमसि,  (3)सोSहं, (4)अहं ब्रह्मास्मि. परमयोगी "सोहं-हंसो" असे अनुभूतीतून जपत असतात.

इथे रेणुकेचे अनन्य भक्त केवळ नामजपातून  परमहंसपद/परमयोगी पद मिळवतात. 



पाहता मुळपीठ पर्वत सकळामध्ये श्रेष्ठ ।

 जेथे जगदंबा अवधूत दोघे भोपे भट।

 जेथे मोवाळे,  विंजाळे, प्रणिता, पाणिलोट ।

 तेथे तानाजी देशमुख झाला ब्रह्मनिष्ठ ।।

 लोलो ॥ ५॥

 

•जेथे जगदंबा आणि अवधूत-दत्त प्रकट झाले. 

• जेथे तिची सेवा भोपी आणि भट असे दोघेही करतात. 

•जेथे मातृतीर्थ (बोलीभाषेत मोवाळे) आहे.

• जेथे किल्ल्यातील ब्रह्म तीर्थ (बोलीभाषेत विंजाळे) आहे.

•जिथले पाणलोट प्राणहीता (बोलीभाषेत =प्रणिता ) नदीमध्ये जमा होते. 

असे ते माहूर गड हे सर्वच मूळपीठांमध्ये  सर्वात श्रेष्ठ  आहे. त्याच ठिकाणी तानाजी देशमुख (आरतीकार) ब्रह्मनिष्ठ झाले. 


•मूळपीठ म्हणजे ती ती स्थाने जेथे आदिशक्ती विविध रूपात पहिल्यांदा प्रकटली. जसे रेणुका= मातापूर, महालक्ष्मी= कोल्हापूर, भवानी= तुळजापूर वगैरे वगैरे.

•(1) भोपी=  यांचे कार्य पूजेच्या साहित्य गोळा करणे, स्नानादि सेवा करणे, पूजासाहित्याची देखभाल करणे.

•(2) भट= मंत्रोच्चार, षोडषोपचार पूजा करणे.

•मोवाळे= मातृतीर्थ

•विंजाळे = देवीच्या गडावर किल्ला आहे, त्यात ब्रह्म तीर्थ आहे. त्यांचे पाणी गोमुखातून येते.

•प्राणहीता नदीला प्रणिता म्हटले आहे.

•पाणलोट = म्हणजे जमिनीचा असा भूभागाचा भाग जिथे पडणारे सर्व पाणी, एकाच जलस्रोताकडे जमा होते इथे प्रणिता नावाच्या नदीत जमा होते.



आरती दिसायला पाच कडव्यांची आणि बोली भाषेतील आहे. पण आरतीकर्ता तानाजी देशमुख हे परामोच्च कोटीचे साधक, अधिकारी पुरुष नक्कीच होते. कारण या आरतीत निव्वळ शब्द नाहीत, अनुभूति आहे.  या आरतीचा अधिकाधिक अभ्यास केला तर अजून गहन अर्थ लागू शकतो.

माझ्या अल्पमतीतून जसे सुचले ते व्यक्त केले.

आज आपली अकरावी माळ समर्पित केली.

नवरात्रीचा आपला हा उपक्रम इथेच थांबवते.

सर्व वाचकांचे आभार, धन्यवाद 🙏


©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर

लेख पूर्ण वाचून झाला की कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट नक्की करा, कृपया. 


आणि तुम्हाला माझे ब्लॉग लेखन आवडत असेल तर माझ्या नावसह ही link शेयर करायला विसरू नका. 😊







Tuesday, September 30, 2025

महालक्ष्मीची आरती

 


🙏🙏दहवी  माळ 01/10/2025🙏🙏

।। महालक्ष्मीची आरती ।।

आज आपण जी आरती बघणार आहोत, ती माहूरच्या गड मंदिरात नेहमीच म्हटली जाते. 

या आरतीतही शब्द सोपे  आणि अर्थ सरळ आहे. 


जय जय नदिपति प्रिय तनये । 

भवानी, महालक्ष्मि, माये ॥ध्रु०॥

आदिशक्ती विविध रूपातून प्रकट होते. या आरतीत आदिशक्तीच्या विविध रूपांचे नावं आलेली आहेत. 

नदीपती म्हणजे समुद्र, त्याची प्रिय कन्या म्हणजे लक्ष्मी. भव म्हणजे शंकर, भवानी म्हणजे भवाची पत्नी पार्वती, तसेच महालक्ष्मी तुझा विजय असो, विजय असो. 



आदि क्षिरसागररहिवासी|जय जय कोल्हापुरवासी |

अंबे भुवनत्रयिं भ्रमसी|सदा निज वैकुंठीं वससी |

दुर्लभ दर्शन अमरांसी|पावसि कशि मग इतरांसी |

(चाल) करुणालये मोक्षदायिनी

 भक्त जे परम - जाणती वर्म - सदा पदिं नरम

 कृपेनें त्यांसी सदुपायें| संकटीं रक्षिसि लवलाहे॥१॥ 

मुळात तू क्षीरसागरात राहणारी, कोल्हापुरात राहतेस, अंबे, तू त्रिभुवनात फिरतेस, वैकुंठात राहतेस. देवांनाही तुझे दर्शन दुर्लभ आहे, मग तू इतरांना कशी बरे पावशील? 

"तू करूणेचे आश्रयस्थान आहेस, तू मोक्ष देणारी आहेस",   असे गुज (वर्म, रहस्य) जे परम भक्त जाणतात आणि तुझ्या चरणी विनम्र आहेत  ; तुझ्या कृपेनें, तू सदुपायाने  क्षणात संकटापासून वाचवतेस.



अमरेश्वर विधिहरिहर |मिळाले असुरांचे भार|

 मंदाचल नग रवि थोर | केला वासुकिचा दोर|

 ढवळिला सागर गर गर|रगडिले जलचर-मीन-मगर 

(चाल) लाजती कोटि काम पोटीं

 तुझें सौंदर्य -गळालें धैर्य -म्हणती सुर आर्य |

जाळितो रतिपति सोसुं नये |होतां जन्म तुझा सुनयने ॥२॥

या कडव्यात समुद्रमंथन प्रसंग, लक्ष्मीचा जन्म प्रसंग सांगितला आहे.

इंद्र, ब्रह्मदेव, विष्णु, शंकर तसेच सर्व असुर एकत्र आले. मंद नावाच्या पर्वताची रवि (घुसळणी) केली. वसुकी नावाच्या सर्पाची दोरी केली. समुद्राला गरगर ढवळले, त्यामुळे समुद्रातील जलचर, मगर, मासोळ्या वगैरे रगडल्या गेले. (मग अनेक रत्न निघू लागले. त्यात तू पण होतीस)  तुझा जन्म होतच. हजारो कामदेव लाजले. तुझे सौंदर्य बघून देवासुरांचे धैर्य गळले ते म्हणू लागले की रतिपती मदन जाळतो आहे, सोसवत नाही. 


 त्रिभुवनस्वरुपें तूं आगळी|वरिलासी त्वां वनमाळी|

 तुजसम न मिळे वेल्हाळी |शंकर मकरध्वज जाळी|

 न मिळे स्पर्शहि पदकमळीं |पदरज लागो तरि भाळीं (चाल) पितांबर शोभतसे पिवळा 

बहारजरतार -हरिभरतार -तरि मज तार 

स्तवितां तुज जरि गुणग्रहे |दशशतवदनाही भ्रम ये ||३॥

तू त्रिभुवन सुंदरी आहेस, तू वनमाली (कृष्ण) विष्णु याची पतिवर म्हणून निवड केलीस.

हे भवानी, तू सती असताना मरण पावली, त्यामुळे शंकर, वैरागी झाले त्यांनी मदन/कामदेव म्हणजेच मकरध्वज याला जाळून टाकले, तेव्हा पासून कामदेव हा अनंग म्हटल्या गेला.

हे माते, तुझ्या चरणकमळाचा स्पर्श मिळणे फारच दुर्लभ, पण किमान तुझ्या पायाची धूळ तरी मला लाभो.

तुझ्या अंगी पिवळा पितांबर, रेशमी पातळ शोभते. पातळ जरतारी आणि भरजरी आहे. तुझा पती विष्णु-हरी आहे.  तर आता मला तू तार, उद्धार कर.

भक्ताच्या गुणाला तू जाणतेस, तुझी दहा वेळा शंभरवेळा जरी स्तुती केली तरी केली की नाही असा भ्रम आहे.



 सनकादिक ब्रह्मज्ञानी ।ध्याती चरण तुझे ध्यानीं |

दृढासन घालुनि निर्वाणीं |बैसले महामुनि तपिं ध्यानीं|

 तरी मी मंदबुद्धि जननी । तुझे गुणवर्णु कसे वदनीं |

(चाल) जरी हा विष्णुदास 

तूझा बहु अपात्र -करी सुपात्र-कृपा तिळमात्र 

करोनी मोक्षपदीं वाहे । अंबे लवकर वर दे ये ॥४॥

हे आदिशक्ती भगवती, जननी सनक आदि ब्रह्मज्ञानी लोकं तुझ्या चरणाचे ध्यान करतात. हे सर्व महामुनी दृढ आसन घालून निर्वाण अवस्थेत (मोक्ष मिळावा यासाठी अगदी आर या पार अवस्थेत,) तापचरण करायला बसले आहेत.

हे आई, मी तुझा मंदबुद्धी बालक आहे. तुझे गुण मी कसे बरे वर्णन करू?

मी विष्णुदास तुझा भक्त,  अत्यंत अपात्र आहे, पण तू मला सुपात्र करून घे. माझ्यावर तिळमात्र (अत्यल्प ) कृपा कर आणि मला मोक्षपद मिळवून दे. हाच वर मला दे. 


 आजची आरती सर्व देवी, आदिशक्ती यांना आळवणी आहे.

या आरतीत अनेक पुराण कथा आहेत.

तसेच अनेक विशेषणे पौराणिक संदर्भातून योजले आहे. 

आज आपली दहावी माळ समर्पित केली. 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर

लेख पूर्ण वाचून झाला की कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट नक्की करा, कृपया. 


आणि तुम्हाला माझे ब्लॉग लेखन आवडत असेल तर माझ्या नावसह ही link शेयर करायला विसरू नका. 😊











Monday, September 29, 2025

रेणुका देवीचा जोगवा

 


🙏🙏नववी  माळ 30/09/2025🙏🙏

  माहूरगड निवासी श्री रेणुका मातेचा जोगवा.


जोगवा म्हणजे देवीदेवतांसमोर पदर पसरून कृपाप्रसाद मागणे, ज्याला महाराष्ट्रातील ग्रामीण भागात भिक्षा मागणे असेही म्हणतात. या प्रथेतील उपासकांना 'जोगते' (पुरुष) किंवा 'जोगतिणी' (स्त्री) म्हणतात.   ते देवीच्या सेवेत सर्व इच्छा व अहंकार सोडून देतात त्यांचे प्रतीक म्हणून देवीला प्रिय असणाऱ्या कवड्यांची माळ घालतात आणि देवीच्या कृपेने कुटुंबात सुख-समृद्धी यावी यासाठी जोगवा मागतात. 

जोगवा हा एक पारंपरिक लोककला आणि नृत्य प्रकार देखील मानला जातो, ज्यामध्ये देवीला जोगवा मागताना गाणी गायली जातात, आणि  नाचतात.

संत एकनाथ यांनी रचलेले  जोगावा गीत प्रसिद्ध आहे. आज विष्णुदासांनी रचलेले जोगवा गीत  बघू




माहुर गडावरी, ग माहुर गडावरी गं तुझा वास, 

भक्त येती ते दर्शनास ।। माहुर ।।

 पिवळे पातळ गं। पिवळे पातळ बुट्टीदार, 

अंगी चोळी ती हिरवीगार, पितांबराची गं। पितांबराची खोविली कास ।। भक्त ।॥१॥

कडव्यातून अर्थ तसाही स्पष्ट कळून येतो.

रेणुका देवीला पिवळे पितांबर (रेशमी, सोवळे ) लुगडे आवडत असावे. कारण जवळपास प्रत्येक  गाण्यात पिवळ्या पातळाचे वर्णन आहेच.


 बिन्दीबिजवरा, गं बिन्दीबिजवरा गं

 भाळी शोभे, काफवाळ्याने कान ही साजे,

 इच्या नथेला गं, इच्या नथेला हिरवे घोस ।।२।।

या कडव्यात त्याकाळातील बिंदी, बिजवर, काफ वाळ्या, नथ  या दागिन्यांचा उल्लेख आहे.  


•बिंदी हा कपाळावरचा पारंपरिक दागिना आहे.बिंदीचा आकार छोटा असतो,

 •बिजवरा हे एक विशिष्ट प्रकारचे चंद्रकोरीच्या आकाराचे आभूषण आहे जे बिंदीपेक्षा मोठे असून कपाळाच्या मध्यभागी लावले जाते. 

•काफ वाळ्या =  कानातील दागिने. कान न टोचता कानाच्या पाळीवर घातला जाणारा काफ तर  साखळ्यांनी लोम्बणाऱ्या वाळ्या. 

•नथ नाकातील दागिना. हिची नथ हिरव्या मण्यांचा घोस असलेली आहे.



 सरी ठुसीत गं सरी ठुसीत मोहन माळ,

 जोडवे मासोळला, पैंजण चाळ, 

पट्टा सोन्याचा गं पट्टा सोन्याचा शोभे कमरेस । 

भक्त ॥ ३ ॥ 

या ही कडव्यात दागिन्यांचे वर्णन आहे.

•सरी = गळ्यात घालायची मण्यांची माळ.

• ठुशी= गळ्याला घट्ट असलेला, सोन्याच्या मण्यांचा दागिना.

• मोहनमाळ= सोन्याच्या मण्यांचा मोठा हार.

• जोडवे= पायाच्या बोटात अंगठी सारखे, त्यावर मासोळीची आकृती.

• पैंजण= जरा घट्ट आणि जाड 

• चाळ= घुंगरू, साखळ्या असलेले जरा लोम्बणारे.


जाई जुईची गं जाई जुईची आणिली फुले।

 तुरे, हार, माळीने गुंफियले, गळा शोभे तो गं

 रुप शोभे तो आनंदास ॥ भक्त येती ॥ ४ ॥

दागिनेच नाही तर फुलांच्या माळा, हार, गजरे घातलेय. तुझे रूप पाहून भक्तांना आनंद होतो.


हिला बसायला गं हिला बसायला चंदनी पाट, 

हिला जेवायला चांदीचे ताट, पुरणपोळी गं पुरणपोळीची आवड, सुरस ।॥ ५ ॥

रेणुकेच्या जेवणाचा थाट वर्णीला आहे. चंदनाचा पाट, चांदीचे ताट. पुरणपोळी ही विशेष.  


 मुखी तांबुल गं तो तांबुल पाचसे पानांचा, 

मुखकमली रंग लालीचा, 

खण नारळाची ओटी तुला ।। भक्त येती ६ ।।

जेवणानंतर 500 पानांचा तांबूल. तांबूलामुळे तोंड रंगलंय लालीलाल. खणा-नारळाची ओटी भरतात. 


 विष्णूदासाची गं विष्णूदासाची विनवणी, 

माझ्या जनार्दनी चरणी, माता भगिनीना गं

माताभगिनींना सौभाग्यदायीनी, व्हावे अखंड । अखन्डित पावनी, सदा उधळती गं हळदीस ।

 भक्त येती ते दर्शनास।। ७ ।।

विष्णुदास रेणुका आईच्या चरणी विनवणी करतात की सर्व माता भगिनींना अखंड सौभाग्यवती कर. त्या तुझ्यावर सतत हळद उधळू देत. 

सात कडव्यांचा हा जोगवा अतिशय सोपा  असून म्हणायला उत्तम आहे.

आज आपली नववी माळ अर्पित केली 🙏. 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर

लेख पूर्ण वाचून झाला की कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट नक्की करा, कृपया. 


आणि तुम्हाला माझे ब्लॉग लेखन आवडत असेल तर माझ्या नावसह ही link शेयर करायला विसरू नका. 😊










Sunday, September 28, 2025

रेणुका मातेचे पद

 🙏🙏आठवी वी माळ 29/09/2025🙏🙏

पद

आज आपण विष्णुदासांचे एक पद पाहू.


आम्ही चुकलो जरी तरी काही। 

तू चुकू नको अंबाबाई ।। धृ. ।।

 तुझे नाव 'आनंदी' साजे । 

तुझा महिमा त्रिभुवनी गाजे। 

तुझे सगुणरुप विराजे। 

तुला वंदिति सन्मुनि, राजे।

 गुण गाति वेदशास्त्रेही ।। आम्ही० ॥ १ ॥

धृपद आणि पहिले कडवे अतिशय सोपे आणि प्रत्येक दोन चरणान्ती यमक जुळविले आहे. जसे काही-बाई,  साजे-गाजे-विराजे-राजे, 

शास्त्रेही -काही-बाई. या कडव्यातील सर्वच शब्द अतिशय सोपे आहेत, अर्थ लगेच कळतो, वेगळ्या स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही.


आम्ही अनाथ, दीन भिकारी 

तू समर्थ, प्रभु, अधिकारी। 

आम्ही पतित पातकी भारी।

 तू पावन भव संभारी 

तू पर्वत, आम्ही रजराई ॥ आम्ही० ॥ २ ॥ 

याही कडव्यात यमक आहेच. शब्द सोपेच आहे. 

काही शब्दांचे फक्त अर्थ सांगते.

•दीन= गरीब

•प्रभु = मालक, स्वामी

•संभारी=  आधार असलेली. सम्पन्नता, ऐश्वर्य असलेली.

•रजराई= अतिशय सूक्ष्म धुळी-कण.



आम्ही कुपुत्र म्हणवून घेऊ । 

तू नको कुमाता होऊ।

 आम्ही विषय-ढेकळे खाऊ।

 तू प्रेमामृत दे खाऊ । 

आम्ही रांगू तू उभि राही ।। आम्ही० ॥ ३॥

आम्ही कुपुत्र म्हणजे लायकी नसलेले पण तुझे पुत्र आहोत. पण तू मात्र वाईट आई नको होऊ.

आम्ही विषयरूपी ढेकूळ (मातीचा वेडावाकडा खडा)  खाणारी [लहान मुले मातीची ढेकळे खात असत, जुन्या काळी]  तू मात्र प्रेमाने अमृत रूपी खाऊ खायला दे.

आम्ही रांगत रांगत चालतो, तू फक्त उभी राहून आम्हाला बघ, सांभाळ.

{देव्यपराधक्षमापन स्तोत्रात म्हटले आहे,

 कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति॥

मुलगा वाईट निपजू शकतो पण आई कधीच वाईट नसते.

हे कडवे वाचून या श्लोकाचे स्मरण झाले. अगदी हाच आशय विष्णुदासांनी व्यक्त केलाय.} 


आम्ही केवळ जडमूढ प्राणी। 

चैतन्यस्वरूप तू शहाणी।

 फट् बोबडी आमुची वाणी।

 तू वदू नको आमुच्या वाणी। 

आम्हा रडु, तू गाणे गाई ।। आम्ही० ।। ४ ।।

आई आणि मुलातील फरक तीव्र विरुद्ध शब्दांत सांगितला आहे.  जसे मुले जडमूढप्राणी  तर आई साक्षात चैतन्यरूप. 

आम्ही बोबडे बोलतो, तू (चौथी वाचा बोलणारी) आमच्या सारखी बोबडी बोलू नकोस.

आमचे बोलणे म्हणजे सतत रडगाणे  मात्र तुझे बोलणे मधुर गीत होय.


आम्ही चातक तुजविण कष्टि।

 तू करि कृपामृतवृष्टि।

 म्हणे विष्णुदास धरि पोटि। 

अपराध आमुचे कोटि । 

अशि आठवण असू दे हृदयी ।। आम्ही० ॥ ५ ॥

आम्ही चातक, तू दिसली नाहीस की कष्टी होतो, तू तुझ्या कृपेचा आमच्यावर वर्षाव कर. 

विष्णुदास म्हणतात आई गं, तू आमचे कोट्यानुकोटी अपराध पोटात घे आमची आठवण कायम तुझ्या हृदयात राहु दे. 

आज आपली आठवी माळ  विष्णुदास यांच्या कवित्वाला आणि रेणुका देवीला  समर्पित केली. 


©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर

लेख पूर्ण वाचून झाला की कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट नक्की करा, कृपया. 


आणि तुम्हाला माझे ब्लॉग लेखन आवडत असेल तर माझ्या नावसह ही link शेयर करायला विसरू नका. 😊




लो लो लागला

  🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏 #श्री रेणुका मातेची आरती. ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यां...