🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏
#श्री रेणुका मातेची आरती.
ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यांच्या विषयी अधिक काहीच माहिती नाही.
ही आरती मी लहानपणी मावशीच्या घरी, नवरात्र काळात ऐकली आहे. तत्कालीन बोली भाषेतील ही अत्यन्त उत्कट भक्तीने भारलेली आरती आहे.
या बोलीभाषेत एक गोडवा आहेच, सोबत बोली भाषेचा ठसकापण आहे. यातील काही शब्द अतिशय वेगळे वाटतात.
लोलो लागला अंबेचा भेदाभेद कैचा।
आला कंटाळा विषयाचा, धंदा मुळ मायेचा ।।
लोलो ॥ धृ.॥
अंबेचा लळा लागला. लोलो लागणे, हा बोलीभाषेतील लडीवाळ वाक्प्रचार. ( लो) मृदू शब्दाची पुनरुक्ती भाषेला गोडवा देते.
अंबेचा लळा लागल्यामुळे सारे भेद नाहीसे झाले.
"कैचा" हा ही एक बोली भाषेतील शब्द. कैसा, कुठला, कसा काय, कुठून आला इत्यादी विविध अर्थ त्यात आहे.
जीवात्मा-परामात्मा भेदाभेद सुटला. आप-पर भाव सुटला. मूळ मायेचा पसारा म्हणजे संसार. तिचाच हा उद्योग (धंदा) म्हणून ( ऐहिक) विषयांचा (इंद्रियजन्य सुखाचा) कंटाळा आला.
सांख्य दर्शनाचे सार या दोन ओळीत सांगितले आहे.
प्रपंच खोटा, हा मृगपाणी, घोरे फिरतो प्राणी।
कन्या सुत-दारा,-धन माझे, मिथ्या वदतो वाणी।
अंती नेतिल हे, यमदूत, न ये संगे कोणी ।
निर्गुण रेणुका, कुळदेवी, जपतो मी निर्वाणी ॥
लोलो ॥ १॥
हा प्रपंच, संसार म्हणजे मृगजळा सारखा खोटा आहे, जीव (प्राण ज्यात आहे, तो प्राणी) संसार भयाने फिरत असतो.
"मुलगी, मुलगा, पत्नी, घर, धन माझे" असे जे म्हणतात ते सारे खोटे आहे.
अंत समयी यमदूत न्यायला येतील तेव्हा कुलदेवता निर्गुण रेणुकेशिवाय दुसरे बाकी कोणीच कमी येणार नाही . म्हणून मी सतत तिचे नामजप करीत असतो.
"कन्या सुत-दारा-धन माझे मिथ्या वदतो वाणी।"
याच अर्थाची एक गाथा (श्लोक )पाली भाषेतील धम्मपद ग्रंथाच्या बाल वग्गात आहे,
पुत्तो मत्थि धनम्मत्थि इति बालो विहति ।
अत्ता हि अत्तनो नत्थि कुतो पुत्तो कुतो धनं ।। ३।।
त्याचा अभंगानुवाद डॉ. श्री. भा. वरणेकर सरांनी केलेला आहे. तो असा
पुत्र माझा धन हि माझे । धन्य नाव गाव माझे ।।
ऐसी ममता धरी मनी । मूर्ख दुःखी होय जीवनी||
नाही आपुले आपण । कैचा पुत्र कैचे धन ।। ।।
पंचभुतांचा, अधिकार, केलासे सत्वर ।
नयनी देखिला, आकार, अवघा तो ईश्वर।
नाही सुखदुःख, देहाला, कैचा अहंकार।
पाहे परमात्मा, तो ध्यानी, भासे शून्याकार ।
लोलो ॥ २ ॥
(मायेतून मुक्त झाल्यामुळे, आणि सतत नामजप करण्यामुळे) पंच महाभूतांचा अधिकारी तू मला केलेस. त्यामुळे माझ्या डोळ्याला सर्वत्र ईश्वराचाच आकार दिसला. त्यामुळे अहंकार निमाला. मग या देहाला कशाचे सुख आणि कशाचे दुःख? अहंकार नष्ट झाल्यामुळे देहाच्या सुखदुःखाच्या पलीकडे गेलो. ध्याना मध्ये आकारविरहित परमात्मा दिसतो.
ध्यानात निराकार परमात्मा दिसतो, मात्र दिसणाऱ्या सर्वच साकार (चराचरात) ईश्वर दिसतो. ही विसंगती नव्हे. उलट, हेच खरे ज्ञान आहे की आकाराला आलेले सारे काही, त्या निराकारातूनच आलेय. त्यामुळे, 'मला आकार दिला' याचा अहंकार कशाचा बाळगायचा? नाही कां?
ध्याता मुद्रा ही, उन्मनी, लागे अनुसंधानी।
निद्रा लागली, अभिध्यानी,जे का निरंजनि ।
लीला वर्णीता,स्वरुपाची,शिणली शेषवणी।
देखिली भवानी, जननी, त्रैलोक्यपावनी ।।
लोलो ।। ३ ।।
जिच्या स्वरूपाचे आणि लीलेचे वर्णन करताना सर्व प्रकारच्या वाणी थकून गेल्या आहेत, अशी त्रैलोक्याला पावन करणारी आई भवानी मी ध्यानात पहिली.
तुझ्या नाममुद्रेचे ध्यान करता करता चित्त तुझ्याशी अनुसंधान पावते, मन उन्मनी अवस्थेत जाते.
[उन्मनी अवस्था ही एक संस्कृत संज्ञा असून तिचा अर्थ "मन नसणे" किंवा "मनाच्या पलीकडे" असा होतो. योगिक तत्त्वज्ञानामध्ये, ही चेतनेची अशी अवस्था आहे जिथे योगी पूर्णपणे जागृत किंवा झोपेमध्ये नसतो, तर या दोन अवस्थांमधील संक्रमणाच्या स्थितीत असतो. या अवस्थेत व्यक्तीचे मन विचारहीन होते आणि द्वैत संपते, म्हणजेच तो आणि मी एकच असल्याची जाणीव होते. ]
निरंजनी अभिध्यान करता करता, इतरांच्या दृष्टीने झोपी गेलो असे वाटते.
[निरंजनी म्हणजे दोषमुक्त, शुद्ध आणि निष्कलंक. संस्कृत शब्द निरंजन (नी: + अंजन) म्हणजे "अशुद्धता किंवा ज्ञानाचा अभाव असलेला" असा होतो.]
गोंधळ घालीन मी अंबेचा घोष अनुहाताचा
दिवट्या उजळूनिया सदोदित पोत चैतन्याचा।
अहं सोहं हे उदो उदो बोले चारी वाचा ।।
लोलो ।॥ ४ ॥
चारच ओळीच्या या कडव्यातील एकेक शब्द, संकल्पना खूपच महत्त्वाच्या आहेत. आधी सरळ अर्थ सांगते मग एकेकाचे स्पष्टीकरण बघूया.
माझा चैतन्यरूपी पोत पेटवून शरीर रूपी दिवट्या उजळवून अनाहत घोष करीत, आई अंबेचा मी गोंधळ घालीन. चारही वाणींनी अहं-सोहं या महावाक्याचा उदयकार करीन.
(बोलीभाषा व संस्कृत यातील शब्द फरक बघा जसे अनुहात=अनाहत, अनुसया= अनसूया)
•देवीचा गोंधळ हा महाराष्ट्रात केला जाणारा एक पारंपरिक कुलाचार आहे, ज्यात 'गोंधळी' नावाचे लोक संबळ, तुणतुणे यांसारखी वाद्ये वाजवून, देवीची स्तुती करणारी गीते गातात आणि कथा सांगून देवीची उपासना करतात.
"गोंधळ घालणे" हा एक प्राचीन लोककला प्रकार मानला जातो. या परंपरेची सुरुवात भगवान परशुरामांनी बेटासूर राक्षसाच्या वधानंतर देवीची उपासना करण्यासाठी केली होती, अशी आख्यायिका आहे.
•अनाहत नाद म्हणजे एक वैश्विक, सूक्ष्मातीसूक्ष्म आणि न ऐकू येणारा आवाज आहे, जो भौतिक जगाच्या पलीकडे असतो आणि केवळ प्रगत योगी ध्यानात असताना अनुभवू शकतात. 'अनाहत' म्हणजे ज्याला आघात झाला नाही आणि 'नाद' म्हणजे आवाज, त्यामुळे याला 'अन-स्ट्रक साउंड' किंवा 'न तयार केलेला आवाज' असेही म्हणतात. हा एक प्रकारचा शाश्वत ध्वनी आहे, जो शरीरातील अनाहत चक्रातून अनुभवला जातो, जिथे प्रेम, शांती आणि सुसंवाद यांसारखे दैवी गुण असतात.
•योगिक तत्त्वज्ञानानुसार, मानवी वाणीच्या चार अवस्था खालीलप्रमाणे आहेत:
परा= ही वाणी नाभीकमलात स्थित असते आणि केवळ महान ईश्वरभक्त व योग्यांनाच तिचा अनुभव येऊ शकतो.
पश्यन्ती= ही वाणी हृदयस्थानी असते आणि गूढ गोष्टी समजून घेण्यासाठी किंवा अंतर्ज्ञानासाठी मदत करते.
मध्यमा= ही कंठस्थानी असते, जिथे आपण मनात बोलतो किंवा मनाशी संवाद साधतो. ही मनाची विचार प्रक्रिया आहे.
वैखरी= ही वाणी जिभेने उच्चारली जाते, म्हणजेच जी ऐकू येते ती ही वाणी.
या वाणी नामस्मरणाच्या प्रगतीचे वेगवेगळे टप्पे दर्शवतात, ज्यात सामान्य व्यक्ती वैखरी वाणीतून सुरुवात करते आणि हळूहळू परा वाणीच्या अनुभवाकडे वाटचाल करते.
•अहं-सोहम= वैदिकतत्त्वज्ञानानुसार चार महावाक्य आहेत. (1)प्रज्ञानं ब्रह्म (2) तत्त्वमसि, (3)सोSहं, (4)अहं ब्रह्मास्मि. परमयोगी "सोहं-हंसो" असे अनुभूतीतून जपत असतात.
इथे रेणुकेचे अनन्य भक्त केवळ नामजपातून परमहंसपद/परमयोगी पद मिळवतात.
पाहता मुळपीठ पर्वत सकळामध्ये श्रेष्ठ ।
जेथे जगदंबा अवधूत दोघे भोपे भट।
जेथे मोवाळे, विंजाळे, प्रणिता, पाणिलोट ।
तेथे तानाजी देशमुख झाला ब्रह्मनिष्ठ ।।
लोलो ॥ ५॥
•जेथे जगदंबा आणि अवधूत-दत्त प्रकट झाले.
• जेथे तिची सेवा भोपी आणि भट असे दोघेही करतात.
•जेथे मातृतीर्थ (बोलीभाषेत मोवाळे) आहे.
• जेथे किल्ल्यातील ब्रह्म तीर्थ (बोलीभाषेत विंजाळे) आहे.
•जिथले पाणलोट प्राणहीता (बोलीभाषेत =प्रणिता ) नदीमध्ये जमा होते.
असे ते माहूर गड हे सर्वच मूळपीठांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. त्याच ठिकाणी तानाजी देशमुख (आरतीकार) ब्रह्मनिष्ठ झाले.
•मूळपीठ म्हणजे ती ती स्थाने जेथे आदिशक्ती विविध रूपात पहिल्यांदा प्रकटली. जसे रेणुका= मातापूर, महालक्ष्मी= कोल्हापूर, भवानी= तुळजापूर वगैरे वगैरे.
•(1) भोपी= यांचे कार्य पूजेच्या साहित्य गोळा करणे, स्नानादि सेवा करणे, पूजासाहित्याची देखभाल करणे.
•(2) भट= मंत्रोच्चार, षोडषोपचार पूजा करणे.
•मोवाळे= मातृतीर्थ
•विंजाळे = देवीच्या गडावर किल्ला आहे, त्यात ब्रह्म तीर्थ आहे. त्यांचे पाणी गोमुखातून येते.
•प्राणहीता नदीला प्रणिता म्हटले आहे.
•पाणलोट = म्हणजे जमिनीचा असा भूभागाचा भाग जिथे पडणारे सर्व पाणी, एकाच जलस्रोताकडे जमा होते इथे प्रणिता नावाच्या नदीत जमा होते.
आरती दिसायला पाच कडव्यांची आणि बोली भाषेतील आहे. पण आरतीकर्ता तानाजी देशमुख हे परामोच्च कोटीचे साधक, अधिकारी पुरुष नक्कीच होते. कारण या आरतीत निव्वळ शब्द नाहीत, अनुभूति आहे. या आरतीचा अधिकाधिक अभ्यास केला तर अजून गहन अर्थ लागू शकतो.
माझ्या अल्पमतीतून जसे सुचले ते व्यक्त केले.
आज आपली अकरावी माळ समर्पित केली.
नवरात्रीचा आपला हा उपक्रम इथेच थांबवते.
सर्व वाचकांचे आभार, धन्यवाद 🙏
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर
लेख पूर्ण वाचून झाला की कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट नक्की करा, कृपया.
आणि तुम्हाला माझे ब्लॉग लेखन आवडत असेल तर माझ्या नावसह ही link शेयर करायला विसरू नका. 😊
No comments:
Post a Comment