Wednesday, June 25, 2025

#सहजोक्त.

  




#आषाढस्य प्रथम दिवसे.....

कालिदास , महाकवि कालिदास , कविकुलगुरु कालिदास .....म्हणजे अभिजात वैश्विक साहित्याची मंगल  सुभगता !  केवळ संस्कृत साहित्यालाच कालिदासाने आपल्या प्रतिभेने अंकित केले असे नाही ,  तर  ज्या ज्या माध्यमाने  अभिव्यक्त व्हावे ती सर्व माध्यमे कालिदासाच्या अभिजात-कुलीनतेची अनुदिते ठरली , असं म्हटलं तर अतिशयोक्ति नाही. 

  सर्वच प्राचीन साहित्यिक , कलाकार वगैरेंप्रमाणे कालिदासांचेही व्यक्तिगत आयुष्य , जन्म-मृत्यू तिथी ,  कुलवृत्तान्त इत्यादि अज्ञातच आहे. पण लोककथांमधून अतिशय सामान्य कुळात जन्मलेला , निर्बुद्ध  मुलगा असे वर्णन आढळते.   

  इसवी सन पूर्व दोन शतके  ते  इसवी सनाचे दोन वा तीन शतके इतका प्रदीर्घ कालखंड कालिदासाचा मानतात.   शृंग राजवटीपासून ते गुप्त राजवटी पर्यंतचा काळखंड कालिदासाचा आहे , असे सप्रमाण सिद्ध करणारे अनेक  पुरावे सादर करणारे विद्वान आजही आहेत. 

  कालिदास  कालिमातेचा अनुग्रहीत होता ते कार्तिकेयाचा अनुग्रहीत होता , असेही अनेक संशोधकांनी सिद्ध केले आहे. (कालस्य , महाकालस्य अपत्यं पुमान् इति कालिः । तस्य दासः कालिदासः।)  

  

 वेगवेगळे अभ्यासक ,  कालिदासाचे जन्मस्थान  मालव प्रांत , विदर्भ , बंगाल  , काश्मीर  , गढवाल  वगैरे  वगैरे स्थान आहे असे मांडतात .  तसेच याच्या पुष्ट्यर्थ कालिदासच्या साहित्यातील त्या त्या प्रांतांचे प्रत्ययकारी वर्णन उद्घृत करतात. या सर्वांवरून  आपण सर्व रसिकांनी  आपल्या मनात हेच ठामपणे ठसवावे की कालिदास हे परिपूर्ण , भारतीय व्यक्तिमत्त्व होते. 

भारतीयांचा सनातन सांस्कृतिक वारसा असलेल्या रामायण-महाभारत-पुराणादींमधून कथाबीज घेऊन भारतीयांच्या सुवर्ण काळाला अपेक्षित  साहित्य निर्माण करणारा कालिदास नक्कीच महाकवी पदाला पात्रच होते . किंबहुना कलिदासाच्या   साहित्यावरून महाकवित्वाचे निकष ठरविले की काय ? कळत नाही.  

थोर साहित्याचार्य आनंदवर्धन यांनी कालिदासाला सर्वप्रथम  " महाकवी" ही पदवी दिली.  

तर गीतगोविंदकार जयदेवांनी  त्यांना कविकुलगुरू म्हटले. 

 कालिदासाने  नाट्य ,काव्य अशा सहित्यप्रकारांची निर्मिती केली.

तीन नाटक(रूपक) (१) अभिज्ञान शाकुन्तलम्, (२) विक्रमोर्वशीयम् आणि  (३) मालविकाग्निमित्रम्; 

दोन महाकाव्य  (१) रघुवंशम् ,  (२) कुमारसंभवम्; 

 दोन खण्डकाव्य (१) मेघदूतम्  तसेच (२)  ऋतुसंहारः । 

 या सातच साहित्यकृतीतून सर्व साहित्यविश्वाला आजही  रमविणारा कालिदास खरोखर कविकुलगुरू आहेच आहे. 

   वैदर्भी-रीतीत लिहिलेले कालिदासाचे  साहित्य आजही औचित्यपूर्ण आहे.

कालिदासाच्या साहित्यातून  भारतीय संस्कृतीच्या सर्वोत्तमत्वाचे दर्शन अनायास घडते.    कालिदासाच्या साहित्यातून १૪ शास्त्रे व ६૪ कलांचेही समयोचित प्रकटीकरण दिसते.  "सत्यं-शिवं-सुंदरम्" या तत्त्वावर उभी असलेली भारतीय संस्कृती , अतिशय मनोरम पद्धतीने कालिदासाहित्यातून आपल्यावर गारूड घालते.   इतके असूनही कलिदासाचे साहित्य विद्वज्जड , शुष्क नाही.  उलट मानवी भावभावनांच्या गुंतागुंतींचे चित्रण असो की निसर्गचित्रण किंवा प्रसंगवर्णन , कालिदासाच्या साहित्यकृती ,  य़ा मौलिक व अनुपम आहेत. कालिदासाने चितारलेली ही शब्दचित्रे  वाचली की , 'अरे , असंच मलाही वाटलं होतं , हेच माझ्या मनातही आलं , अगदी असाच अनुभव येतो ' असे प्रतिसाद वाचकांच्या मनात सहज येतात. 

भारतातील जवळ जवळ सर्व भाषांमध्ये कालिदासाचे साहित्य अनुवादित झाले आहे. विदेशी भाषांमध्येही कालिदाससाहित्य अनुवादिल्या गेले आहे. इतकेच नाही तर कालिदासाच्या साहित्याचा प्रभाव आजही साहित्य-संगीत-कला आदी क्षेत्रावर आहेच आहे. 

"मेघदूत" ही कालिदासाच्या साहित्याला अद्वितीय स्तरावर  नेणारी कलाकृती आहे.   जनरीतीनुसार सजीवाला दूत न करता , अलौकिक प्रतिभेतून  "मेघ" या निर्जीव साधनाला दूतत्व बहाल करण्याची कल्पना ही निव्वळ अद्वितीय  आहे.  कालिदासाच्या याच काव्याच्या प्रेरणेतून इंग्रजी साहित्यात "मेसेंजर पोएट्री" चे नवे दालन  उघडले गेले. 

कालिदासाचे मोठेपण हे काळातीत आहे.  जाति-वंश-श्रेष्ठता , सत्ता , वडिलोपार्जित वारसा  इत्यादी काहीही नसून केवळ साहित्यसेवेतून एका  सारस्वताने मिळविलेला हा अजरामर-सन्मान प्रेरक ,  अनुकरणीय व अनुसरणीय आहे. 

याचेच नित्य स्मरण जनसामान्यांना व्हावे म्हणून ," आषाढस्य प्रथमदिवसे....." या मेघदूतातील पंक्तीनुसार  दरवर्षी आषाढ-प्रतिपदेला "कालिदास-दिन" साजरा केला जातो. 

कवि प्रभाकर नारायण कवठेकर  एका श्लोकात या महाकावीचे वर्णन असे करतात...

प्रोढित्वेऽपि न प्रौढोक्तिः नम्रत्वेऽपि समुन्नतिः । 

 विभक्तिस्ते पदेष्वेव भक्ति र्वागर्थयो रतिः ।।

साम्राज्यानि विलीनानि तव साहित्यमक्षरम् ।

 हृदये रसिकाणा तत् सार्वभौमं विराजते ।।

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


ऋतुसंहार.

कविकुलगुरु कालिदास , हे निव्वळ महाकवी नव्हते तर  उत्साही व सकारात्मक जीवनाचे भाष्यकार ही होते. 

जन्मस्थान माहीत नाही.  वंश ? अज्ञात पण नक्कीच अप्रसिद्ध व हीन .  मायबाप कोण ? तेही माहीत नाही.   अर्थिक हालाखी , बौद्धिक दरिद्र्य असे सर्व न्यूनगंड-पोषक वातावरण लाभलेले ,   केवळ स्वतःच्या तीव्र इच्छाशक्ती व अफाट कष्ट व सारस्वती-उपासनेने कालिदास "महाकवी" झाले. 

बालपण व नवतारुण्य जरी विपरीत , अवहेलनापूर्ण  व कष्टप्रद अवस्थेत गेले तरी कालिदासांच्या सहित्यातून कुठेही त्या परिस्थितीचा दुरान्वयानेही निराश उल्लेख आढळत नाही. उलट आयुष्याकडे अत्यंत सकारात्मकतेने  बघणारा  , भारतीयत्वाचा पाईक ,  त्यांच्या साहित्यकृतीतून कायमच जाणवतो आपल्याला .  

कालिदासाचे सात ग्रंथ विख्यात आहेत. 

त्यात   (१) विक्रमोर्वशीयम् , (२) अभिज्ञान शाकुंतलम् , (३) मालविकाग्निमित्रम्;  हे तीन नाटके , 

  (१) रघुवंशम् ,  (२) कुमारसंभवम् , ही दोन महाकाव्ये तर 

  (१) मेघदूतम्  तसेच (२)  ऋतुसंहारः  ही 

   दोन खण्डकाव्ये सामावलेली आहेत. 

   साहित्याच्या विविध प्रकारात लीलया संचरणारे कालिदास खरोखर अलौकिक प्रतिभेचे धनी होत. 

    सात पैकी "ऋतुसंहार"  ही रचना  कलिदासांचीच आहे की नाही यावर कीथ सारख्या प्रख्यात अभ्यासकानेही शंका व्यक्त केली आहे.

    कारण कालिदासाच्या  इतर साहित्यावर 'मल्लिनाथाने' टीका लिहिल्या आहेत पण या ग्रंथावरील टीका उपलब्ध नाही.  तसेच या ग्रंथातील श्लोकांची उद्धरणे साहित्यग्रंथात आढळत नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या काव्यातील श्लोकातून  कालिदासाची "ती" अलौकिकता आढळत नाही.  वगैरे वगैरे. 

    पण अनेकांच्या मते ही रचना कालिदासांचीच आहे. ती अतिशय प्रारंभिक रचना असल्यामुळे त्यात नवथरता पदोपदी जाणवते.  

   खरे तर  ग्रंथाच्या नामकरणापासूनच कालिदास-प्रतिभास्पर्श जाणवतो.  ऋतुंचे एकत्रित वर्णन  , संकलन , संयोजन  म्हणजेच ऋतुसंहार.  ऋतुंचे वर्णन कालिदासपूर्वसुरींनी केले नव्हते काय ?   केलेच होते . वाल्मिकी रामायणात ऋतुंची वर्णने आहेतच की. पण मग कालिदास कसा वेगळा दिसतो ?  तर उत्तर हे की ,  कालिदास पूर्व साहित्यात निसर्गाचे वस्तुनिष्ठ वर्णन आढळते. पण कालिदासाने  निसर्गाचा  मानवासह सजीवांच्या मनोभावनांवर  होणारा परिणाम  तसेच मानवी भावनांना प्रतिसाद देणारा जिवंत निसर्ग चितारला आहे ! ऋतुसंहार हे प्रारंभिक काव्य असूनही त्यात  ही वैशिष्ट्ये दिसतातच . 

   ऋतुसंहारात विविध छंदांतील एकूण १५૪ श्लोक आहेत.  कालिदासांची सकारात्मक जीवनदृष्टी  ऋतुसंहाराच्या  संरचनेतून प्रकर्षाने जाणवते. सहा ऋतुंचे वर्णन करताना ऋतुंचा क्रम ग्रीष्म , वर्षा , शरद , हेमंत , शिशिर , वसंत  असा घेतला आहे. ग्रीष्म तसा हवा हवासा ऋतू नाही , पण  कालिदासाने त्यातील वेचक चांगल्या बाबी  अतिशय प्रसन्न शैलीत मांडल्या आहेत. सत्तावीसाव्या श्लोकात कालिदास म्हणतात ,

   "गजगवयमृगेन्द्रा वह्निसंतप्तदेहाः

   सुह्रद इव समेता द्वंद्वभावं विहाय ।

   हुतवहपरिखेदादाशु निर्गत्य कक्षाद्

   विपुलपुलिनदेशां निम्नगां संविशन्ति ॥

  उन्हाळी दाहक झळांमुळे , आपापसातील वैरभाव विसरून हत्ती , गवे , सिंहादि प्राणी   नदीच्या पात्रात डुंबतात.  

  शेवटच्या श्लोकातही नागरिक  प्रेमी-प्रेमिका चांदण्यांत उपवने वा गच्चीतील गुलाब ताटव्यांच्या जवळ रमण करतात.  

   म्हणजे उन्हाळा जरी श्रुंगाररसपोषक नसला तरी त्यातील जे जे छान आहे ते २८ श्लोकांतून इथे मांडले आहे. 

   वर्षाऋतूतील मेघ-प्रवासावर संपूर्ण मेघदूतच रचले आहे , तरी ऋतुसंहार व मेघदूतातील श्लोकांमधील कल्पना वैविध्य आपल्याला स्तिमित करते. 

   उन्हाळ्या नंतर येणारा पावसाळा सर्वच जीवसृष्टीला हवा हवासा वाटतो. प्रेमीजन , मत्त गज , चातकपक्षी , बगळे , हरिणं , मोर , इतकेच काय ?  वृक्ष-वेली वगैरे सर्वच नवचैतन्य ल्यायलेले जाणवतात. 

   नद्या सुद्धा  -मार्ग अडविणाऱ्या तटावरील झाडांना - वेगवान गढूळ पाण्यांनी पाडून  आपल्या प्रियकराला भेटायला निघालेल्या संभ्रमित प्रेयसी प्रमाणे समुद्राकडे जातात.

  काही  चमत्कृतिपूर्ण रचनाही आहे , वर्षावर्णनात. 

    वहन्ति वर्षन्ति नदन्ति भान्ति

    ध्यायन्ति नृत्यन्ति समाश्रयन्ति ।

    नद्यो घना मत्तगजा वनान्ताः 

    प्रियाविहिनाः शिखिनः प्लवङ्गमाः ॥

    नद्या ,  ढगं ,मत्तगज , संपूर्ण वनप्रदेश ,   प्रियाविहीन व्यक्ती , मोरं , माकडं  वगैरेंची अवस्था पाऊस पडल्यावर कशी होते ?  तर ते ( वर उल्लेखलेला प्रत्येकच घटक)

 वाहतात , बरसतात , (नाद) लयबद्ध आवाज करतात , शोभतात , ध्यान करतात , नाचतात , आश्रय घेतात.   म्हणजे शेवटच्या दोन पंक्तीत सात कर्ते दिलेय तर पहिल्या दोन पंक्तीत  सहा क्रियापदे आहे. प्रत्येक कर्त्याला ते सहाही क्रियापदं लागू होतात.  

 २९ श्लोकांच्या ह्या वर्षावर्णनाचा शेवट अतिशय रमणीय केला आहे.

  बहुगुणरमणीयो योषितां चित्तहारी

  तरुविटपलतानां बान्धवो निर्विकारः।

  जलदसमय एषः प्राणिनां प्राणभूतो

  दिशतु तव हितानि प्रायशो वाञ्छितानि ॥

  तर असा हा बहुगुणी , रमणीय , तरुणींचे चित्त हरणारा , तरुझुडुपवेलींचा निर्विकार बान्धव  म्हणजे जणू सर्वच प्राणीमात्रांचा प्राण आहे. हा जलदसमय (पावसाळा)  तुझ्या बहुतांश हितावह इच्छा पूर्णत्वाला नेवो. 

  वर्षाऋतुनंतर शरद ऋतू येतो.  संस्कृतमध्ये शरद् हा हलन्त दकारान्त स्त्रिलिंगी  शब्द आहे.  

  सृष्टीचे देखणे  व सौष्ठव रूप  शरदऋतूतच दिसते.

पहिल्याच श्लोकात सुंदर वर्णन आहे.

काशांशुका विकचपद्ममनोज्ञवक्रा

सोन्मादहंसरुतनूपुरनादरम्या ।

आपक्वशालिललितानतगात्रयष्टिः

प्राप्ता शरन्नववधूरिव रम्यरूपा ॥ 

तेजस्वी रेशमी वस्त्र ल्यायलेली , संपूर्ण उमलेल्या कमलिनी प्रमाणे मनोज्ञ-घाटदार , पक्वधान्य भारानी झुकलेल्या सडसडीत वृक्षाप्रमाणे असलेली,   रम्यरूप धारण करणारी शरदरूपी नववधू आता आली आहे.  

अठ्ठावीस श्लोकांमधून निसर्गाच्या समृद्ध तृप्ततेचे श्रुंगारिक वर्णन  आहे.  कालिदास-काव्य श्रुंगार-रस-प्रधान आहे. श्रुंगार रसाचा मूळ भाव "रति" हा आहे. आणि श्रुंगाररसाच्याच विकसित रूपांना वात्सल्यरस व भक्तिरस म्हटले आहे.  व्यवहार असो , अध्यात्म असो किंवा निसर्ग ;  श्रुंगार-भक्ति-वात्सल्या शिवाय निर्माणच होऊ शकत नाही.  सर्जनाचा आधार श्रुंगारच असतो.  म्हणून कालिदासाच्या साहित्यात त्याचा उपयोग अधिक आढळतो. 

शरदऋतुनंतर अठरा श्लोकांत हेमंतऋतुचे वर्णन आहे. अतिशय उत्तान श्रुंगारिक वर्णनाचे हे श्लोक आहेत. हेमंतऋतुनंतर सोळा श्लोकांमधून शिशिर ऋतु  रंगविताना कालिदासाने तत्कालिन समाज-रूढी , विलासप्रियता वर्णिली आहे.  हेमंत व शिशिर ऋतूतील काहीसे उघड व उत्तान श्रुंगारिक वर्णन आहे.

महाकवी  कलिदास हे नुसते साहित्यशास्त्रच नाही तर , कामशास्त्र , आयुर्वेद यांचेही जाणकार असावे हे  हेमंत आदिऋतुवर्णनातून जाणवते. परचक्रांच्या आक्रमणपूर्वीचा तो काळ असल्यामुळे  सांस्कृतिक भेसळ नव्हती. धर्म-अर्थ-काम-मोक्षादी प्राप्तीसाठी   निरालस , निर्भिड व उत्सवी  वर्तन जनसामान्यांचेही  असायचे . 

 साधारण याच काळातील हे काव्य आहे.

 वसंतऋतु विषयक ३५ श्लोकातून श्रुंगाररसप्रधानतेची उत्तरोत्तर चढती कमान आहे. 

 त्या काळात केवळ राजकुलातीलच नाही तर जनसामान्यही  मदनोत्सवादि कार्यक्रमात  सहभागी होत असत. 

 "प्रणयक्रीडेत मग्न प्रेमीजनांचे मन भेदण्यासाठी वसन्तयोद्धा आलाय" अशी

 पहिल्या श्लोकातूनच  सुरुवातीलच आपल्या प्रियेला  ग्वाही देत पुढचे ३૪ श्लोक उत्तरोत्तर प्रणयरम्य वर्णनाची रंगवली आहे. 

 

 श्रुंगार-रस-प्रधान असे हे पस्तीसही श्लोक  वाचनीय आहेत. पण आकारभयास्तव इथं निवडक देत आहे.

 

द्रुमाः सपुष्पाः सलिलं सपद्मं

स्त्रियः सकामाः पवनः सुगन्धिः । ।

सुखाः प्रदोषा दिवसाश्च रम्याः

 सर्वं प्रिये चारुतरं वसन्ते ॥६. २ ॥

  नेत्रेषु लोलो मदिरालसेषु

गण्डेषु पाण्डुः कठिनः स्तनेषु ।

मध्येषु नम्रो जघनेषु पीनः

स्त्रीणामनङ्गो बहुधा स्थितोऽद्य ॥ ६.१० ॥

पुंस्कोकिलश्चूतरसेन मत्तः

 प्रियामुखं चुम्बति सादरोऽयम् । गुञ्जद्द्विरेफोऽप्ययमम्बुजस्थः 

 प्रियं प्रियायाः प्रकरोति चाटु ॥ ६. १४ ॥

  वसंतऋतूचे वर्णन करताना दोन श्लोकात 'पुस्कोकिल' असा उल्लेख आहे.

"कोकीळ गातो , कोकिळा नव्हे".    आधुनिक पक्षीशास्त्रातील तत्त्व प्राचीन कालिदासाला माहीत होते. हे  "पुंस्कोकिल"  या शब्द योजनेतून विशेष उल्लेखनीय वाटतो.   


कालिदासाच्या इतर साहित्यातही प्रणयप्रसंग चितारले आहेत. त्या चित्रणात एक कुलीन , घरंदाजपणा जाणवतो.  इथे  विशेषतः शेवटच्या तीन ऋतुवर्णनात भडक श्रुंगारिक वर्णन  जास्त आहे. 

    

 

मुळात ऋतुंचे एकत्रित गुणवर्णन करावेसे वाटणे , हीच मोठी कल्पकता आहे. त्यातही ग्रीष्मासारख्या शुष्क ऋतूपासून प्रणयपोषक वसंतऋतुपर्यंत खुलवत , रमवत नेण्याचे कसब असामान्य होय. मानवी मनातीलच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीतील प्रणयी वर्तन कालिदासाने चितारले आहे.   "Love is in air" हे वाक्यच जणू या खंडकाव्यातून कालिदासाने अधोरेखित केले आहे. 

© डॉ. प्रज्ञा देशपांडे. 






Thursday, June 12, 2025

#शब्दचिंतन.

 #कमळ -शब्द चिंतन.


संस्कृत साहित्यात 

कमल ( क =पाणी, अल=सुशोभित करणारे )  

ते दोन प्रकारचे असतात.

सूर्यविकासी (सकाळी उगवणारे )  

तर  चंद्रविकासी  


कुमुद = (कु =पृथ्वी वर , मुद =आनंद देणारे )  हे ही पांढरे असते.

श्वेतकमळ = पुंडरीक (दुसऱ्या फुलांचा गर्व हरण करणारे ) 


कमळ शब्दाचे अनेक पर्यायी शब्द आहेत.


जसे 

अमरकोशानुसार 👇

1 नलिनम् 

२अरविन्दम् 

३ महोत्पलम् 

४ सहस्रपत्रम् 

५ कमलम् 

६ शतपत्रम् 

७ कुशेशयम्

 ८ पङ्केरुहम् 

९ तामरसम् 

१० सारसम् 

११ सरसीरुहम् 

१२ विसप्रसूनम् 

१३ राजीवम् 

१४ पुष्करम् 

१५ अम्भोरुहम् 

१६   पङ्कजम् 


रत्नावली नुसार 👇

१७ अम्भोजम् 

१८ अम्बुजम् 

१९ सरसिजम् 

२० श्रीवासम् 

२१ श्रीपर्णम् 

२२ इन्दिरालयम् 

२३ जलेजातम् 

२४ अब्जम् 

२५कञ्जम् 

२६ नलम् 

२७ नालीकम् 

२८ नालिकम् 

२९ वनजम् 

३० अम्लानम् 

३१ पुटकम् 

३२अब्जः 


याशिवाय अनेक नावे आहेत, जसे 

१ कैरवम्   

 चन्द्रकान्तम् 

३ गर्द्दभम् 

४ कुमुत् 

५ धवलोत्पलम् 

६ कह्लारम् 

७ शीतलकम्

 ८ शशिकान्तम् 

९ इन्दुकमलम् 

१० चन्द्रिकाम्बुजम् 

११ गन्धसोमम् 


वरील शब्द जरी कमल/कुमुद शब्दाचे पर्यायवाची असले तरी त्या प्रत्येक शब्दाला स्वतंत्र अर्थ आहे. फुलाच्या गुणवैशिष्ट्यानुसार ती नावे आहेत.  प्रत्येक नावाची व्युत्पत्ती समजून घेणे, रंजक आहे.

नुसता 

"कमळ"  शब्द म्हटल्या बरोबर साहित्य (सर्वभाषिक ) व्याकरण,

व्युत्पत्तीशास्त्र, वनस्पती शास्त्र, समाजशास्त्र, राजनीती वगैरे अनेक अर्थाने अभ्यासण्याजोगा विषय आहे.


एका मुद्द्यावरून अनेक विषयांना स्पर्श करीत शिकवणे याला बहुआयामी शिक्षण म्हणतात. ही शिक्षण पद्धती सध्या जगातील अव्वल देशात कुठे कुठे प्रचलित आहे.

असा अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाच्या इंटरनॅशनल स्कूल मध्ये होता.

इति कमलाख्यान!

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Thursday, June 5, 2025

#सहजोक्त.


"ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी , भेटीत तृष्टता मोठी ..." 

गाणं कानी पडलं , कुमार गंधर्व नि वाणी जयराम यांचा आवाज , गीतकार  बाळ कोल्हटकर यांनी रचलेले हे गीत पहाडी रागात  संगीतबद्ध केले आहे वसंत देसाई यांनी .  


गाण्यातील शब्दांच्या अर्थच्छटा , एकेक भावना खरी करत हृदयावर रेखाटणाऱ्या ! हे गाणे सर्वच प्रकारच्या ऋणानुबंधावर भाष्य करणारे आहे. मला जसे उलगडले तसे इथे मांडणार आहे.


                   ||ध्रु||

ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी

भेटीत तृष्टता मोठी ||ध्रु||

जनन-मरणाचे चक्र अखंड गतिमान ठेवणारा संसार. 

संसार म्हणजे योग्य रीतीने समोर जाणारा. म्हणजेच त्याला एक सतत्यपूर्ण गती हवी आणि एक ठहराव पण हवा.  ऋणानुबंधामुळे संसार असतो.

 ऋणानुबंध , हा शब्दच मुळात अर्थप्रवाही आहे. जगात जन्माला आल्या पासून तर जग सोडून जाई पर्यंत जे जे बंध , अनुबंध , संबंध  जुळतात ते सारे ऋणानुबंधामुळेच ! रक्ताचे ,  नात्याचे , मैत्रीचे , व्यावसायाचे , ओळखीचे असे सारे सारे संबंध  मुळात ऋणानुबंधानेच होतात बहुधा . काही अनुबंध जुळतात ते फक्त  ऋण चुकविण्यासाठीच !  ऋणानुबंधाच्या गाठी तशा गुंतागुंतीच्याच असतात.  जनन-मरणाच्या अव्याहात चालणाऱ्या या चक्रात नेमकी कोणाची, कोणाशी, कशी, कुठे गाठ पडली ते कळणे शक्य नाही.  ऋणानुबंधाच्या गाठीमुळे  एक जीव दुसऱ्या जीवाशी भेटतो. या भेटीमध्ये तृष्टता असतें.  तृष्टता म्हणजे कठोरपणा , कोरडेपणा , उद्धटपणा , तुटकपणा इत्यादी. 

गाण्याच्या या एका ओळीत किती गहन अर्थ आहे, होय ना? 



                ||1||

त्या कातरवेळा थरथरती कधि अधरी

त्या तिन्हीसांजांच्या आठवणी त्या प्रहरी

कितिदा आलो, गेलो, रमलो

रुसण्यावाचुनि परस्परांच्या 

कधी न घडल्या गोष्टी


कातरवेळ,  अधर, तिन्हीसांज  वगैरे शब्द  वाचले तर शृंगार-रस युक्त काव्य वाटते. पण तसे नाहीय.

तिन्हीसांज म्हणजे सायंकाळ. 

उतारवयातील  असा टप्पा ज्यात कर्तृत्व करून झालेय,  कृतकृत्यता सुद्धा आहे. नवे करण्यासारखे काहीही नाही. शांतपणे मृत्यूची वाट पाहण्याचा हा काळ. हीच ती आयुष्याच्या तिन्हीसांजेची कातर वेळ आहे.  जीवनाच्या या प्रहरात आपल्या ओठातून आठवणीं बाहेर पडतात आणि आपल्याला थरथरवतात.  यातून ऋणानुबंधाच्या गाठी अवचित पडतात.

आपण कितीदा जन्मलो, संसारात रमलो, परत गेलो (मरून गेलो).   विशेष ऋणानुबंधात  परस्परांवर हक्काने 'रुसणे' हाच महत्त्वाचा अनुबंध असतो. 


         ||2||

कधि तिने मनोरम रुसणे

रुसण्यात उगीच ते हसणे

म्हणून ते मनोहर रुसणे

हसणे, रुसणे, रुसणे, हसणे

हसण्यावरती रुसण्यासाठी,

 जन्मजन्मिच्या गाठी. 

हे कडवं  अत्यूत्तम आहे कारण यात 'ती आणि तो' यांच्या ऋणानुबंधाचे खास भाष्य आहे. सात जन्माच्या नात्याचे गूढ यात उकलले आहे.  पहिल्या वाक्यातच बघा ना 

'कधि तिने मनोरम रुसणे'  यात 'तिने रुसणे' हे व्यवहारात नेहमीचेच आहे. पण रुसणे 'मनोरम' असते कां?  मन ज्यात रमते, ते मनोरम. 'ती' रुसली कि आपले सर्व लक्ष 'तिच्या'कडे लागते. कशाने रुसली? काय कारण झाले? कसे समजावू? कसा रुसवा दूर करू? कुठला उपाय असेल? वगैरे वगैरे विचारचक्र सुरु राहते. म्हणजे मन तिच्या त्या आपल्यावरील हक्काने रुसण्यात आणि  तिला समजविण्यात सतत रमते. आपण तिला खुलविण्याचा प्रयत्न करीत असतो आणि ती -'रुसण्यात उगीच ते हसणे'- अशी वागत असते. नव्या नवलाईच्या दिवसात छोट्या छोट्या गोष्टमुळे रुसवे-फुगवे असतातच. 'तिलाही' माहिती असते कि या मुद्द्यावर रुसण्यात अर्थ नसतो, पण 'त्यांचे' लक्ष वेधायाचे असते म्हणून रुसून बसली आहे. 'त्यालाही' माहिती आहे, कि 'ती' उगाच रुसली आहे, आणि आपण व्यर्थ 'तिची' समजूत काढत आहोत. पण तरीही 'तो' मनवतो आहे म्हणून 'तीही' उगाच हसते आहे. "तुम रुठी रहो, मैं मनाता रहू" असे सुरु असते. दोघांचेही मन या प्रकारात एकमेका समोर हरण्यात धन्यता मानत असतें. म्हणून ते रुसणे 'मनोहर' रुसणे असतें. 

एकमेकांवर अशा हसण्याच्या, रुसण्याच्या कारणामुळे ऋणानुबंधाच्या गाठी पक्क्या होतात. आणि त्या चुकविण्यासाठी  'तिला-त्याला'  जन्म घ्यावे लागतात. अशा रीतीने 'ती-तो' साता जन्माच्या गाठीत बांधले जातात. 



        ||3||

कधि जवळ  सुखाने बसलो

दुःखात सुखाला हसलो

कधि गहिवरलो, कधि धुसफुसलो

सागरतीरी आठवणींनी वाळूत मारल्या रेघा,

जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमली ना गट्टी...


 हे  कडवे फक्त युगल किंवा पतिपत्नी यांनाच लागू होत नाही, तर प्रत्येक नात्याला (रक्ताचे, मैत्रीचे, व्यावसायिक किंवा मानलेले, आजकाल आभासी सुद्धा ) लागू होते. 

आयुष्यात कधी सुखाने जवळ बसलो. कधी आपण दु:खात असताना सुखाला हसलो, कधी गहिवरून आलो, कधी धुसफूसलो. कधी निवांत वेळी सागरकिनाऱ्यावर वाळून  रेघोट्या ओढत बसलो. कधी आठवणी काढत बसलो.  

पुढचे वाक्य अत्यन्त आशयघन आहे. "जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमली ना गट्टी"... 

गेल्या जन्मातील अनुबंधाचे ऋण चुकवण्यासाठी नवा जन्म घेतला.  परत परत जन्म घेतला. पण अनुबंध अनुकूल झाले नाही, गट्टी जमली नाही, उलट तृष्टता वाढली. पुन्हा ऋणानुबंध तयार झाले, पुन्हा ते फेडण्यासाठी जन्म घ्यावाच लागला. 

ऋणानुबंधमुळेच आदी शंकराचार्य म्हणतात,

 "पुनरपि जननम् पुनरपि मरणम् |

पुनरपि जननीजठरे शयनम्" ||


अत्यन्त सखोल, अध्यात्मिक चिंतन  अतिशय कमी शब्दात या मराठी भावगीतातून  उलगडले आहे, नाही कां?

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.




लो लो लागला

  🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏 #श्री रेणुका मातेची आरती. ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यां...