खरे बघता, 'नाव ठेवणे' हा मराठी मनाचा आवडता छंदच आहे. तो आजचाच नाही तर; तो फार पूर्वीपासूनचा आहे. तसे रूढीनुसार नवजात बालकाचे 'बाराव्या' दिवशी लहान-मोठ्यांच्या उपस्थितीत आई किंवा आत्या 'नाव' ठेवते. याला 'नामकरणसोहळा' किंवा बारसं म्हणतात. हे रीतसर ठेवलेले पहिले नाव. आप्तस्वकीय, मित्रमंडळी त्या नावाची 'नाव' करू लागतात. जसे मनोहरचे मन्या, मनु, मनो, मन; तर रंजनाचे रंजू, रंज इत्यादी. हे सर्व मूळ नामाचे गुणवैशिष्ट्यांसह केलेले विस्तारित नामकरणच होय. या वाढीव आणि विस्तारित नामकरणाचा विचार तूर्तास बाजूला ठेवू; आणि खऱ्या 'नामां'चा विचार करू.
मराठी ही एकमेव भाषा असावी; ज्यात मूळ नामाच्या लिंगानुसार नामकरण केले जात नाही. उदा. सविता म्हणजे सूर्य; नीलिमा म्हणजे निळेपणा; रश्मी म्हणजे किरण; ज्योती म्हणजे तेज, हे सर्व मूळ अर्थानुसार पुल्लिंगी आहेत. पण आपल्या मराठीत ही सर्व मुलींची नावे म्हटली जातात. श्रेयस, शुभम, यश, माणिक ही नावे मूळ अर्थानुसार नपुसकलिंगी आहेत; पण मराठी घरातील मुलांना ही असली नावे ठेवली जातात. एकूणच 'नाव ठेवणे' हा शब्दप्रयोग केवळ आणि केवळ, मराठी लोकांनी शब्दशः खरा केला, यात शंका नाही.
इतकी गमतीदार नाव असलेले मराठी लोक, 'आडनाव' सुद्धा तेवढेच गमतीदार लावत असतात. मराठी आडनाव हा संपूर्ण भारतात उत्सुकतेचा विषय झालेला आहे. कारण हिंदी मुलखात गुप्ता, वर्मा, शर्मा, श्रीवास्तव, यादव, द्विवेदी, चतुर्वेदी, आदी शब्दांवर आडनावे सांगतात, बंगालमध्ये चटर्जी, मुखर्जी, डे, पाल, सार; गुजरातेत शहा, पटेल, तर दक्षिण भारतीयांमध्ये जाती वा गावाचे नाव आडनाव म्हणून लावतात. पण आडनावांच्या बाबतीत 'मराठी पाउल पडते पुढे' हे तंतोतंत लागू पडते. मराठीतील आडनावांचे ढोबळमनाने वर्गीकरण असे होईल १) गावांवरून २)पदव्यांवरून ३) व्यवसायावरून ४) पशुपक्षी, वृक्ष, वनस्पती यावरून ५) खाद्यपदार्थावरून गावांवरून पडलेली आडनावे पहा. नागपूरकर, औरंगाबादकर, अमरावतीकर, नगरकर, एदलाबादकर, दाभाडकर, म्हणजे मूळ गावाला 'कर' लावला कि मराठी आडनाव झालं, असा सोपा निष्कर्ष कोणी काढायला गेला तर रामटेके, भंडारे, नागपुरे, काटोले, धारगावे, अशीही आडनावे दिसतात.
आता पदव्यांवरून पडलेली आडनावे पहा. शास्त्री, पंडित, गुरु, पंत, इत्यादी. शेक्सपीअरने आडनावात काय आहे? असे म्हटलेले नाही हेच नशीब. आता व्यवसायावरून पडलेली नावं. आचार्य, चिटणीस, टिपणीस, सोनार, कारखानीस, पाटील, दलाल, वैद्य, जोशी, खर्डनवीस इत्यादी. अर्थात आजकालच्या व्यवसायांवरून आडनाव ठेवण्याइतका मराठी माणूस पुरोगामी नाही; अन्यथा डिझायनर, वार्ताहर, शिक्षक, अशी आडनावेही मराठीत दिसली असती. पारशींनी मराठीतील ही न्यूनता आपल्या आडनावांनी भरून काढली. जसे इंजिनिअर, कॉंट्रॅक्टर, लोहावाला, दारूवाला, बाटलीवाला, लोखंडवाला, इत्यादी. मुळातच नोकरीपेक्षा मराठी माणसाचा उद्योजकतेवर विश्वास नसल्यामुळे आणि तेथे त्यांचा कोणी 'वाली' नसल्याने अशी आडनावे ठेवत नसावीत. असो.
मराठी माणूस हा खाद्यप्रिय आहे. मराठी पद्धतीचे जेवण सर्व भारतातील संतुलित आहार म्हणून प्रसिद्ध आहे. 'अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविशी जगदीशा' ही म्हण प्रसिद्धच आहे. याची जाणीव प्रत्येक मराठी व्यक्तीला आहेच. खाद्यावरून आडनावे मराठी माणसांना शोभूनही दिसतात. उदा. तुपे, तेले, हिंगे, भजे, वडे, वडाभात, गोळे, वरणे, शिरभाते इत्यादी.
मराठीत पशुपक्षी व वृक्षवल्ल्लींवरून आडनावे प्रचलित आहेत. असायलाही पाहिजे. कारण आपले संत तुकाराम महाराज म्हणूनच गेले की, 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' तर या प्रकारची उदाहरणे पाहू. वाघ, कोल्हे, लांडगे, डुकरे, पिंगळे, राजहंस, मोरे, कावळे, हळदे, झाडे, वडे, जडी, बुटी, मुके, पिंपळे, फुले, मोगरे, वाटाणे इत्यादी. मराठी लोक फार पूर्वीपासून पर्यावरणवादी आहेत हेच यावरून सिद्ध होते. आता गुणवाचक किंवा अवगुणवाचक आडनाव पाहू. वाघमारे, तितरमारे, खानझोडे, कीर्तने, लांडे, टकले, विडे, वाडे, खोले, बोबडे, आळशी, गुणे, अपराजित, रडके, तापस, रागीट, निर्मळ, सुंभ, समर्थ, दुबळे, चौकसे, चौरे इत्यादी.
काही आडनावे मात्र उगीच ठेवलेली वाटतात. ती उगाचच सांगण्यात अर्थ नाही. काहीही झाले तरी मराठी लोकांचीच आडनावे आहेत ना?
- डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे
अगदी मजेदार !
ReplyDelete