Tuesday, June 26, 2018

#सहजोक्त.


सोशल मिडियावर खुसखुशीत मेसेज येतात .कोण कर्ता ,कोणाची रचना हे कळायला मार्ग नाही.पण खरोखर त्या अज्ञात कर्त्यांना सादर नमन !
इकडे घटना घडली न् घडली लगेच समर्पक व अत्यल्प शब्दात प्रतिक्रिया तयार.
कालचेच बघान‍ा ! प्लास्टक बंदी झाली नि मेसेजेस इकडून तिकडे हास्य लकेर फैलावत दरवळू लागले.
स्थान -काळ-वेळ-जनमानसाची पूर्ण जाणीव ठेवणारे हे संदेश खरोखर मार्मिक असतात. कोल्हापुरच्या नावाने गाडीला कॅरीबॅग अडकविण्याचा धमकीवजा संदेश तर पुण्याच्या नावाने प्लास्टिकवर कापडीपिशवी कव्हर शिवून देण्याचा संदेश !
वडसावित्री निमित्त नवरा-बायको नावाच्या एव्हरग्रीन नात्यावर तिरकस संदेश !
दहावी-बारावीच्या वाढीव गुणवत्तेवर स्तुतिपर वा व्यंगात्मक संदेश ; जसे ,आमच्या काळी इतका ताप यायचा ,आता परसेंट मिळवतात.  जुने पैसे जसे आज रुपये तसे आमचे जुने मार्क आज भारी समजा !!इत्यादी.
मध्यंतरी भारतीय चलनात पहिल्यांदाच दोनशेची नोट आली . त्यावर खासच मिश्किल विनोद ,की जुन्या जावायांसाठी विशेष व्यवस्था केलीय. शंभर देणे बरे दिसत नाही न् पाचशे देणे बरे वाटत नाही !!
असे अनेक  विषयांवरचे विविध संदेश निनावी इकडून तिकडे पाठवले जातात.
थोडेही बरे केले की हातभर  श्रेय घेण्याची अहमहमिका असलेल्या या प्रसिद्धिलोलुप जगात स्वतःचे नावही न सांगता लोकरंजन ,प्रबोधन करणारे असे निनावी संदेश वाचले की मनापासून आनंद होतो.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

Monday, June 18, 2018

#सहजोक्त.


आमच्या लहानपणी सगळ्या घरांच्या कुंपणाला हिरवीगार , कडवट वासाची बागड  ऊर्फ मेंदी असायची. भींतीसारखी जाड ,हिरवीकंच राखण्यात गृहस्वामीचे कौतुक असे . सरसकट सगळ्यांचे जीवन सायकल सारखे विना प्रदूषण ,विना आवाजाचे अन् स्वतःच्या कुवतीच्या गतीने पुढ सरकणारेे होते. कुठेच कर्णकटू भोंगे वा अोव्हरटेक नव्हते. वेगाचा उन्माद नव्हता.
जाड भींतीसारख्या बागडीतून अंगणातले
आवाज ,अंधूक दृश्य रस्त्याहून दिसे न् घराच्या अंगणातून रस्त्यावरचे सारे दिसे.लाकडी फाटकाशी उभे राहिले तर सरळ मागच्या अंगणात काय सुरु आहे हे दिसणार ! इतकी सरळ ,पारदर्शी गृहरचना सगळ्यांचीच होती.  न मागता सर्वत्र  ट्रांसपरेंसी हेच त्याकाळाचे व्यवच्छेदक लक्षण .  सायंकाळी उन्हं  उतरल्यावर अंगणात पाणी शिंपडतांना मेंदीवरही शिंपडायचे. गार झुळूक अोघाने यायची.
दुपारी बक-या पाळणारे कळप घेऊन समोरच्या मैदानात येत. बक-यांना ,गाई-म्हशींना ही बागड खाद्य म्हणून चालत नसे कदाचित तिचे वेगळे कडवटपण कारण असावे. मग असे मेंढपाळ त्या मेंदीवर पिवळ्या रंगांचे वायर सारखा  वाढणारा पशुखाद्य असा  अमरवेल टाकायचे. त्या हिरव्याकंच बागडीवर पिवळाजर्द तो वेल ; रंगसंगतीनुसार तसा छानच दिसत असे. आम्ही वायर म्हणून अोढून खेळायचो त्याच्याशी. या हिरव्या बागडीला उग्रवासाची पांढरी फुले यायची . त्या फुलांचा गजरा कोणीच घालत नसे कारण त्या फुलांमुळे डोक्यात उवा होतात असा समज! या पिवळ्या वायरवेलालाही पांढरट तुरा येऊन बहार यायचा.
या पिवळ्या वेलीमुळे बागड सुकते ,पिवळीवेल परजीवी तर आहेच पण ज्यांच्या जिवावर जगते त्यांना जगू देत नाही ,त्यांचा जीवनरस शोषून घेते असा अनुभव आहे. म्हणून मोठी जाणती माणसं या पिवळ्या वायरीला खेचून काढायचे.
बरेच दिवसांनी बाळपणीचा हा अनुभव  दृष्टांतासारखा सुचला काही प्रसंगावरून  ! चालायचेच  !!!
बागड ,अमरवेल , मेंढपाळ ,गृहस्वामी , रंगसंगतीने डोळ्यांना सुख वाटणारे आमच्या सारखे दर्शक  आदी सगळे *जीवो जीवस्य जीवनम्।* साधणारे घटक
 होय ;  हे मात्र निर्विवाद !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, June 15, 2018

#चित्रकविता.


खरे तर तू भासच असावा
जरी  जाणवतो सर्वत्र मला
प्रत्यक्ष आहे कुठे  ठिकाणा
म्हणवीशी तरी अंतरात्मा ॥
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे

Wednesday, June 6, 2018

#चित्रकविता.


किती बरे करावा मनापासून धावा?।
कधी पावशील सांग ना मला तू देवा ?।

श्रद्धेमध्ये खोट नाही ,नाही खंड तपात।
सातत्याने ध्यानीमनी मग्न मी जपात ॥

तुझेच काय चुकते जरा  बघ बरं एकदा
किती काळ तिष्ठवशील असे तू अनेकदा ?।

देव आहे ठिक ,मान्य पसारा तुझा मोठा ॥
सावरता ही येत नाही  तर मिरवतो कां ताठा ?।

कां म्हणून भान दिले जगण्याचे आम्हाला ?।
तुझ्याविना जगण्यापेक्षा मरण धाड मला ॥

चराचरात व्यापला आहेस ,सांगू नकोस मला ।
असशील खरा देव  प्रकटून सोबत कर आम्हाला ॥

@डॉ.प्रज्ञा देशपांडे.

लो लो लागला

  🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏 #श्री रेणुका मातेची आरती. ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यां...