शब्दचिंतन
इंग्रजीतील फ्रेंड शब्दासाठी अनेक पर्यायी शब्द आहेत.जसे मित्र ,सखा,सवंगडी,वयस्य,जीवलग ,यार ,साथी,
मितवा,सहचर ,,सुहृद ,दोस्त इत्यादी इत्यादी.
पैकी यार-दोस्त हे नक्कीच फारसी-अरबी शब्द .
मितवा हा हिंदी शब्द अर्थात मित पासून मितवा ,गोडवा जास्त ना! मित शब्द नक्कीच मित्र पासून तयार झालाय.
क्षेत्र,गोत्र,नेत्र ,वक्त्र,श्रोत्र ,स्तोत्र ,गात्र ,पात्र, ,शास्त्र, पवित्र,जनित्र या सगळ्या शब्दांमध्ये 'त्र 'साधनदर्शक प्रत्यय आहे.तसाच मित्र शब्द असावा का?? नेत्र म्हणजे नेण्याचे साधन ,वक्त्र म्हणजे बोलण्याचे साधन मग मित्र म्हणजे मोजण्याचे साधन ?? मनाची मोजमाप करायचे साधन तर नव्हे ??
सखा -सखी ज्याच्याशी सख्य असते.अतिशय जवळचा ,एक दिल -एक जान असा जो तोच सखा.मित्र अनेक असू शकतात पण सखा दुर्लभच.
सवंगडी ,मराठमोळा शब्द. बालवयाचे ,एकत्र खेळणारे ते सवंगडी.
वयस्य तर हमखास समवयस्कच हवेत. आबालवृद्ध कोणीही चालेल पण समवयस्कच हवेत.
जीवलग ,ज्याच्यावर जीव जुळलाय ,जीव लागलेला तो जीवलग.
प्रत्येक मित्र सखा असेलच असे नाही तसेच सखा जीवलग होणे ही विरळच .
सुहृद् ,,ज्याचे हृदय सुंदर आहे तो .अर्थात जो मनातून आवडतो त्याचं ह्रदय सुंदरच असणार ना !
सहचर म्हणजे जो सोबत असतो . सहचर मित्रच असण्याची गरज नाही .सहकारी जसे सोबत काम करतात तसे सहचर सोबत विचरण करतात.साथ देतो तो साथी.
या सर्व शब्दांना समानार्थी म्हणतात.पण हे योग्य नाही. इतक्या अर्थच्छटा आहेत यात. पण लक्षात कोण घेतो?? इथे माणसाच्या भावच्छटांंना जाणणे दुरापास्त तिथे शब्दच्छटा कोण बघणार??
दाखवेगिरीच्या ,जाहिरातच्या जमान्यात गरजही कोणाला पडलीय सख्य जपण्याचे वा जीव लागण्याचे ......
मग काय मित्र ,सखा,वयस्य,,जीवलग काहीही म्हणाना ! "बोलाचीच कढी बोलाचाच भात " नाही कां??
© डॉ. प्रज्ञा देशपांडे.