Friday, August 22, 2025

#सहजोक्त.


अतिथ कोण ?

काही काही रूढी कशा रूढ झाल्या , त्यामागची कारणमीमांसा काय , ही कोडीच असतात ! आपापल्या प्रकृतीने ती सोडवायची असतात. 

ज्येष्ठच अपत्याची आसनी करतात , ते कां , हे कळत नाही. 

आता हेच बघा ना पिठोरी अमावस्या म्हणजेच मोठ्या (बैल) पोळ्याची अमावस्या , श्रावणातील शेवटचा दिवस. 

कृषिसंस्कृती असलेल्या ग्रामीण महाराष्ट्रात या दिवशी बैल-जोडीचा फारच मान असतो. बैलाला पुरणपोळी , त्यांचे स्कंधमर्दन (खांडमर्दन) , दिवस भर शेतीच्या कामातून सुट्टी , सायंकाळी बैल सजवणे न् गावात पोळा भरवणे , पाटलाच्या हातून बैलजोडीची पूजा , मग गावातील मानवाईकांच्या घरोघरी बैलजोडीला घेऊन फिरणे , बोजारा मागणे , साधारणतः सर्वच खेड्यातून हे दृश्य दिसते. 

आज अनेक ठिकाणी मातृपूजनही करतात. म्हणजे खास मराठी ,"मदर्सडे" ! 

आमच्या गणगोतात आजचे दिवशी , एक रूढी पाळतात व  पहिल्या पुत्राचा सन्मान करतात. 

सायंकाळी दिवेलावणी झाली की , रांगोळी काढून पाट मांडायचा , अक्षवाणाचे ताट तयार करायचे , चांदीच्या वाटीत आळवलेलं दूध ठेवायचे . देवाला अोवाळले की मुलाला अोवाळायचे .मुलाच्या सुखीसमृद्ध जीवनाची मागणी देवाजवळ करायची .  निरांजनाचे ताट देवासमोर ठेवायचे. हातात चांदीची दूध भरलेली वाटी पदराने झाकून  घ्यायची. मुलाकडे पाठ करून  दुस-या पाटावर बसायचे. पाठमोरंच विचारायचे , "अतिथ (अतिथी ) कोण ?" ;  मुलाने  , ' मी ++++ (स्वतःचे नाव घ्यायचे) ' . असे तीन वेळा केल्यावर ती वाटी त्याला प्यायला द्यायची. 


दुसरे दिवशी तन्हापोळा . त्या दिवशी मातीची बैलजोडी पाटावर पूजेला मांडतात. बाजूला घर काढतात. (म्हणजे ज्वारी वा गव्हाने सभोवती चौकट करायची)  बैलजोडीच्या बाजूला मोठ्या व जाड काकड्या सुतवून (म्हणजे दोरा गुंडाळून) ठेवायच्या. 

सायंकाळी दिवेलागणी झाल्यावर , भावांची वाट बघायची. भावाने बहिणीकडे यायचे , बहिणीने अोवाळायचे न् भावाच्या पाठीवर काकडी फोडायची. फोडलेल्या काकडीच्या फोडींचा प्रसाद वाटायचा. पोळ्या पर्यंत भावाच्या बहिणींनी काकडी खायची नाही. भावाच्या पाठीवर फोडल्यावर मग ककडी खाण्यास सुरुवात करायची.  


माझ्या लहानपणी हे सारे कुळाचार तंतोतंत पाळले जात होते. 

आई व मुलाचे एक वेगळेच भावविश्व असते . लहानपणी व मोठं झाल्यावरही बरेच मुलं मातृभक्त ,आईवेडे असतात. हा सण आई-मुलाच्या या नात्याला अजून वात्सल्याचा पदर जोडतो. 

पूर्वी मराठी-संस्कृतीत रक्षाबंधन हा सण नव्हता. त्यावेळी भावा-बहिणीच्या प्रेमाचा हा सण अगदी हौसेने साजरा व्हायचा. पावसाळ्यात परसदारी काकड्या असूनही , केवळ भावाची भरभराट होवो , या भावनेने काकडी खायची नाही , हा कटाक्ष पोळ्या पर्यंत  पाळला जाई. 

ह्या  रूढी कां पाळतात , याचे शास्त्रशुद्ध कारण वा तर्क मला माहीत नाही.  पण एक कौतुकसोहळा म्हणून ह्या रूढी जमेल तश्या  मी पाळल्या  आहेत. 


आता मुलगा काय न् भाऊ काय , शिक्षण-नोकरी निमित्ताने बाहेरगावी राहातात . वेळेवर कोणीच नसतात. तेव्हा मात्र या सणांच्या निमित्ताने सारं आठवतं . शेवटी सणवार  , मन जोडायला , उत्साह वाढवायला न्  एकत्र नांदायला शिकवण्यासाठीच असतात ना ? 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment