🙏🙏दहवी माळ 01/10/2025🙏🙏
।। महालक्ष्मीची आरती ।।
आज आपण जी आरती बघणार आहोत, ती माहूरच्या गड मंदिरात नेहमीच म्हटली जाते.
या आरतीतही शब्द सोपे आणि अर्थ सरळ आहे.
जय जय नदिपति प्रिय तनये ।
भवानी, महालक्ष्मि, माये ॥ध्रु०॥
आदिशक्ती विविध रूपातून प्रकट होते. या आरतीत आदिशक्तीच्या विविध रूपांचे नावं आलेली आहेत.
नदीपती म्हणजे समुद्र, त्याची प्रिय कन्या म्हणजे लक्ष्मी. भव म्हणजे शंकर, भवानी म्हणजे भवाची पत्नी पार्वती, तसेच महालक्ष्मी तुझा विजय असो, विजय असो.
आदि क्षिरसागररहिवासी|जय जय कोल्हापुरवासी |
अंबे भुवनत्रयिं भ्रमसी|सदा निज वैकुंठीं वससी |
दुर्लभ दर्शन अमरांसी|पावसि कशि मग इतरांसी |
(चाल) करुणालये मोक्षदायिनी
भक्त जे परम - जाणती वर्म - सदा पदिं नरम
कृपेनें त्यांसी सदुपायें| संकटीं रक्षिसि लवलाहे॥१॥
मुळात तू क्षीरसागरात राहणारी, कोल्हापुरात राहतेस, अंबे, तू त्रिभुवनात फिरतेस, वैकुंठात राहतेस. देवांनाही तुझे दर्शन दुर्लभ आहे, मग तू इतरांना कशी बरे पावशील?
"तू करूणेचे आश्रयस्थान आहेस, तू मोक्ष देणारी आहेस", असे गुज (वर्म, रहस्य) जे परम भक्त जाणतात आणि तुझ्या चरणी विनम्र आहेत ; तुझ्या कृपेनें, तू सदुपायाने क्षणात संकटापासून वाचवतेस.
अमरेश्वर विधिहरिहर |मिळाले असुरांचे भार|
मंदाचल नग रवि थोर | केला वासुकिचा दोर|
ढवळिला सागर गर गर|रगडिले जलचर-मीन-मगर
(चाल) लाजती कोटि काम पोटीं
तुझें सौंदर्य -गळालें धैर्य -म्हणती सुर आर्य |
जाळितो रतिपति सोसुं नये |होतां जन्म तुझा सुनयने ॥२॥
या कडव्यात समुद्रमंथन प्रसंग, लक्ष्मीचा जन्म प्रसंग सांगितला आहे.
इंद्र, ब्रह्मदेव, विष्णु, शंकर तसेच सर्व असुर एकत्र आले. मंद नावाच्या पर्वताची रवि (घुसळणी) केली. वसुकी नावाच्या सर्पाची दोरी केली. समुद्राला गरगर ढवळले, त्यामुळे समुद्रातील जलचर, मगर, मासोळ्या वगैरे रगडल्या गेले. (मग अनेक रत्न निघू लागले. त्यात तू पण होतीस) तुझा जन्म होतच. हजारो कामदेव लाजले. तुझे सौंदर्य बघून देवासुरांचे धैर्य गळले ते म्हणू लागले की रतिपती मदन जाळतो आहे, सोसवत नाही.
त्रिभुवनस्वरुपें तूं आगळी|वरिलासी त्वां वनमाळी|
तुजसम न मिळे वेल्हाळी |शंकर मकरध्वज जाळी|
न मिळे स्पर्शहि पदकमळीं |पदरज लागो तरि भाळीं (चाल) पितांबर शोभतसे पिवळा
बहारजरतार -हरिभरतार -तरि मज तार
स्तवितां तुज जरि गुणग्रहे |दशशतवदनाही भ्रम ये ||३॥
तू त्रिभुवन सुंदरी आहेस, तू वनमाली (कृष्ण) विष्णु याची पतिवर म्हणून निवड केलीस.
हे भवानी, तू सती असताना मरण पावली, त्यामुळे शंकर, वैरागी झाले त्यांनी मदन/कामदेव म्हणजेच मकरध्वज याला जाळून टाकले, तेव्हा पासून कामदेव हा अनंग म्हटल्या गेला.
हे माते, तुझ्या चरणकमळाचा स्पर्श मिळणे फारच दुर्लभ, पण किमान तुझ्या पायाची धूळ तरी मला लाभो.
तुझ्या अंगी पिवळा पितांबर, रेशमी पातळ शोभते. पातळ जरतारी आणि भरजरी आहे. तुझा पती विष्णु-हरी आहे. तर आता मला तू तार, उद्धार कर.
भक्ताच्या गुणाला तू जाणतेस, तुझी दहा वेळा शंभरवेळा जरी स्तुती केली तरी केली की नाही असा भ्रम आहे.
सनकादिक ब्रह्मज्ञानी ।ध्याती चरण तुझे ध्यानीं |
दृढासन घालुनि निर्वाणीं |बैसले महामुनि तपिं ध्यानीं|
तरी मी मंदबुद्धि जननी । तुझे गुणवर्णु कसे वदनीं |
(चाल) जरी हा विष्णुदास
तूझा बहु अपात्र -करी सुपात्र-कृपा तिळमात्र
करोनी मोक्षपदीं वाहे । अंबे लवकर वर दे ये ॥४॥
हे आदिशक्ती भगवती, जननी सनक आदि ब्रह्मज्ञानी लोकं तुझ्या चरणाचे ध्यान करतात. हे सर्व महामुनी दृढ आसन घालून निर्वाण अवस्थेत (मोक्ष मिळावा यासाठी अगदी आर या पार अवस्थेत,) तापचरण करायला बसले आहेत.
हे आई, मी तुझा मंदबुद्धी बालक आहे. तुझे गुण मी कसे बरे वर्णन करू?
मी विष्णुदास तुझा भक्त, अत्यंत अपात्र आहे, पण तू मला सुपात्र करून घे. माझ्यावर तिळमात्र (अत्यल्प ) कृपा कर आणि मला मोक्षपद मिळवून दे. हाच वर मला दे.
आजची आरती सर्व देवी, आदिशक्ती यांना आळवणी आहे.
या आरतीत अनेक पुराण कथा आहेत.
तसेच अनेक विशेषणे पौराणिक संदर्भातून योजले आहे.
आज आपली दहावी माळ समर्पित केली.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर
लेख पूर्ण वाचून झाला की कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट नक्की करा, कृपया.
आणि तुम्हाला माझे ब्लॉग लेखन आवडत असेल तर माझ्या नावसह ही link शेयर करायला विसरू नका. 😊