🙏🙏सहावी माळ 27/09/2025🙏🙏
श्री रेणुका मातेची आरती
आदिशक्तीची विविध रूपे भारतात विविध नावांनी ओळखल्या जातात. आदिशक्ती जिथं सर्वप्रथम प्रकटली ते तिचे मूळपीठ. रेणुकेला भारतभर विविध प्रादेशिक नावांनी पूजले जाते, ज्यात आई येल्लम्मा, एकविरा, यमाई, एलाई अम्मन, पद्माक्षी रेणुका, उच्छंगी मरियम्मा आणि इलाई अम्मा इत्यादी महत्वपूर्ण आहेत. तर ही रूपे ज्या स्थानी प्रकटली ती सर्व उपस्थाने होय.
या आरतीत एकविरा रूपातील आदिशक्ती रेणुका हिचे विष्णुदासांनी स्तवन केले आहे.
जयदेवी जयदेवी जयजय एकविरे।
श्रीरेणुके जननी जय जगदोद्धारे ॥
जय जय ॥ धृ.॥
आदि नमोस्तुते सकळारंभे आनंते।
जय उदयोस्तु नारायणी श्रीभगवते ।
जय जगदंबे अंबे परम कृपावंते।
जय जय षाड्गुणयुक्ते अंबे श्रीमंते ॥ १ ॥
जगाचा उद्धार करणाऱ्या रेणुकेचा एकविरा आईचा जयकार असो ॥ धृ.॥
अनंत अशी आदिशक्ती सर्वप्रथम तुला नमस्कार असो. जगदंबा, परम कृपाळू अंबा सहा गुणांनी युक्त, श्रीमन्त अशा हे नारायणी, भगवती तुझा उदय होवो.
•यश, श्री (लक्ष्मी), औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे सहा गुण आहेत. या गुणांमुळे देवी 'षड्गुणसंपन्न' असतें.
श्रीमृगराजाचल मुळपीठासन मूर्ती ।
सतत विराजे गाजे दिग्मंडळी कीर्ती।
न्हाणिती नित्य सरस्वती यमुना भागीरथी।
सुरवर मुनिजन भावे, पूजार्चन करिती ।।
जय जय ॥ २॥
मूळपीठ माहूर येथे सिहंसनावर आरूढ अशी तुझी मूर्ती विराजमान आहे. तुझ्या पराक्रमाची कीर्ती दिग्मंडळात गाजते. गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्या तुला न्हाऊ घालतात. श्रेष्ठ देव, मुनिजन, भक्तिभावाने तुझी पूजा, अर्चना करतात.
•स्नान करविणे या क्रियापदासाठी न्हाणविणे, किती छान आहे ना? मराठीतील कित्येक शब्द आजच्या मराठीत दिसत नाहीत.
मुगुट कुंडले मंडित पीतांबर पिवळा।
कुंकुम कज्जल केशर उटि कंकण माळा ।
कणक स्तंभ मय-मंडपी शोभे वेल्हाळा ।
त्रिकाळ होतसे मंगळ भुवनी सुखसोहळा ।।
जय जय ॥ ३ ॥
डोक्यावर मुकुट, कानात कुंडले, अंगावर पिवळा पितांबर. काजळ, कुंकू, केशर उटी, कंकणे, माळा आदी सर्व ल्यायलेली आदिशक्ती सोन्याचे स्तंभ असलेल्या मांडवात शोभून दिसते. तिची तिन्ही त्रिकाल पूजा अर्चना होते.
घालुनि रांगुळी उजळुनि धुपदिप सुगंधी।
सुवर्णपात्री पंचामृत क्षिर बासुंदी।
वरण भात घृत पापड डाळ बेसन बुंदी।
प्रार्थिती स्वार्थ-आनंदे जेवी आनंदी ।।
जय जय ।। ४ ।।
रांगोळी घातलीय. धूप दीप लावून वातावरण सुगंधित झाले आहे. सोन्याच्या पात्रात पंचामृत, दूध, बासुंदी, वरण, भात त्यावर तूप, पापड, डाळ, बेसनाच्या बुंदीचे लाडू असे चारही ठाव जेवण वाढून चांगल्या इच्छेने आनंदाने विनंती करतो की हे आनंदी तू जेवण कर.
•स्वार्थ= या शब्दाचे दोन प्रकारे विग्रह करता येईल. स्व+अर्थ =स्वतः च्या साठी.
सु+ अर्थ = चांगल्या इच्छेने.
इथे दुसरा अर्थ अपेक्षित आहे.
फल तांबूल दक्षिणा, सुभूषण सुमने।
भरली ओटी मौतिक माणिक मणि सुमने।
करूनि आरती वाहिली पुष्पांजली सुमने
विष्णुदास म्हणे करि पूर्णार्चन सुमने ।।
जय जय ।। ५ ।।
जेवणा नंतर, तांबूल, दक्षिणा, फळे, दागिने आणि धत्तूर फळ (काटेरी फळ ), माणिक, मोती आणि गहू यांनी ओटी भरली. त्यानंतर सुंदर मान असलेल्या रेणुकेची आरती करून मग पुष्पांजली वाहिली.
अशा प्रकारे विष्णुदास कवी अत्यन्त चांगल्या मनाने पूर्ण पूजा करितात.
या कडव्यात सुमन शब्द चार अर्थाने आला आहे. धोत्र्याचे काटेरी फळ, गहू, चांगल्या मनाची रेणुका माता आणि चांगल्या मनाचे कवी विष्णुदास.
"षोडशोपचारपूजा" मधील सोळा उपचार पुढील प्रमाणे (1)आवाहन , (2) आसन, (3)पाद्यपूजा , (4)अर्घ्य, (5)आचमन, (6)स्नान , (7)वस्त्र-उपवितक, (8)गंध-पुष्प-भूषा-अलंकार , (9) धूपदीप , (10) नैवेद्य, (11) तांबूल , (12) प्रदक्षिणा , (13)नमस्कार, (14)स्तोत्र, (15) निराजन , (16) उद्वसन (विसर्जन).
ह्या आरतीतून यातील बरेच उपचार उल्लेखले आहेत. जसे👉
पहिल्या कडव्यात देवते चे आवाहन केले आहे.
दुसऱ्या कडव्यात देवतेचे स्नान, सम्मार्जन , पूजन, अर्चन केले आहे.
तिसऱ्या कडव्यात कुंकूम, केशर, उटी, वस्त्र, आभूषणे अर्पण इत्यादी आहे.
चौथ्या कडव्यात रंगावली, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी आनंदपूर्वक अर्पण केले आहे.
पाचव्या कडव्यात तांबूल, फुलांचे दागिने, ओटी भरणे, आरती, मंत्रपुष्पांजली वगैरे करून पूजा पूर्ण झालेली असे सांगितले आहे.
तर अशाप्रकारे ही एक परिपूर्ण आरती आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर
लेख पूर्ण वाचून झाला की कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट नक्की करा, कृपया.
आणि तुम्हाला माझे ब्लॉग लेखन आवडत असेल तर माझ्या नावसह ही link शेयर करायला विसरू नका. 😊
वाह .. खूप छान लिहिलंयस प्रज्ञा
ReplyDelete👌👌👌👏👏
खूपच छान
ReplyDelete