Saturday, February 8, 2025

#सहजोक्त

 #शब्दचिंतन-अलग 

भाषेचीही गंमत असते. एखादा शब्द कानी पडला की "तो अमुक अमुक भाषेचाच आहे, मग आपल्या भाषेत तो वापरता कामा नये" , असे अस्मितेचे फतवे निघू लागतात. शब्दाचे मूळ विचारात घेतल्याच जात नाही. असो.


'अलग' शब्द हिंदीच आहे, असे अनेकांना वाटते. कारण बॉलिवूड गाण्यात असतो हा शब्द. आमच्या नागपुरी बोलीत 'अल्लग' म्हणतात. पण हा शब्द खरोखर 'हिंदी' आहे कां? 

 विलग, लग्न, संलग्न, लागणे, लगडणे इत्यादी शब्द मराठीत आहेत, होय ना? 

मराठीत जे जे शब्द आहेत, त्यातील कित्तेक शब्द तत्सम (संस्कृत मधून जसेच्या तसे घेतलेले ),  तद्भव (संस्कृत मधून घेताना जरा बदल केलेले ) असतात.  

आता याच शब्दांचे बघा.  संस्कृत "लग्" धातू, पहिला गण, परस्मैपद.  असा हा मूळधातू.  त्याचे, चिकटणे , जुळणे, संग असणे इत्यादी अर्थ होतात.

 आता या धातूपासून  कृदंत, क्रियापदे तयार होतात. जसे 

लग्न >>जुळणार आलेले.

संलग्न >> सम्यक रित्या जुळलेले.

विलग >> वेगळे झालेले.

अलग >> न जुळलेले.

लागणे >> वाक्य =झाडाला फुले लागली. 

( इथे लागणे म्हणजे, फांदीला जुळली, उगवून चिकटली , असे अर्थ होतात.) 

लगडणे >> खूप प्रमाणात लागणे, असा अर्थ होतो. 


मग, अलग शब्द मराठीत चालणार नाही कां? 

तत्सम शब्द मराठीत योजला तर बिघडले कुठे? 


तत्सम शब्दांना मराठीपासून विलग न करता, मराठी वाक्यात संलग्न करून घ्यावे. मराठीला अलग करू नये. तत्सम शब्द लागले तर हरकत काय? भाषेत तत्सम शब्द लगडू द्या की? नाही कां?

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर.

Thursday, January 30, 2025

सहजोक्त

 ३१.१.२०१७ ©डॉ.प्रज्ञा देशपांडे


.भाषा (भाष्, बोलणे )पासून "जी बोलल्या जाते ती भाषा"  या अर्थाने हा शब्द आहे.

 अन् खरे तर  "भाषा" शब्दाची हीच मूळ व्याख्या आहे , तसेच बोलणे ,संवाद साधणे हेच तिचे मूळ उद्दिष्ट आहे.


बोली, उपभाषा, प्रमाणभाषा, शुद्धभाषा,  मिश्रभाषा, प्राचीनभाषा, आधुनिकभाषा, ज्ञानभाषा इत्यादि प्रकार हा म्हणजे शब्दविलास होय.


अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा , तसेच कामक्रोधहर्षादि मूळभावनांच्या पूर्ततेसाठीच भाषेचा उपयोग असतो.

अस्मिता-साहित्य-संस्कृती इत्यादि म्हणजे फ़ुटलेले घुमारे आहेत. ते चूकीचे आहेत , असे अजिबात नाही .

पण  "खाली पेट भजन न भाये गोपाला"     हे त्रिकालाबाधित त्रिवार सत्य आहे.


भाषेचा उगम केव्हा झाला?

प्राचीनतम भाषा कोणती?

कोण्या भाषेतून कोणती भाषा जन्मली?

सर्वाधिक बोलली जाणारी भाषा?

मूलनिवासी भाषा कोणती??

श्रेष्ठ  भाषा कोणती??

आजची मृतभाषा कोणती?

जागतिकभाषा कोणती??

अशा प्रश्नमालिका सोडविण्याचा या लेखाचा उद्देश नाही आणि ह्या '"अनादि-अखंड-अनंत" प्रश्नमालिका सोडविण्या इतपत दांडगी माझी प्रज्ञा नाही नि भाषिकव्यासंग ही नाही!! असो.


एक सामान्य व्यक्ती म्हणून  "भाषा" विषयाबाबत  माझे विचार व्यक्त करीत आहे. 


 कोणतीही भाषा १००% नवी नाही नि १००% जुनी ही नाही. 

 आई ज्याप्रमाणे अपत्याला जन्म देते त्या प्रमाणे कोणी एक भाषा कोण्या एका भाषेला जन्म देत नाही.

   भाषा  ही भूगोल-समाज-कालसापेक्ष असते.


  प्रत्येक व्यक्ती तीच  भाषा वेगळी-वैशिष्ट्यपूर्ण बोलत असते. 

भाषेचे मूळ, शब्द आहेत तर शब्दांचे मूळ ध्वनि म्हणजे नाद होय.

  " मुख" हेच नाद प्रगटीकरणाचे मूळ साधन आहे.

 जगात जितके लोक आहेत त्या सगळ्यांची मुखरचना भिन्न व वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे उच्चारणशैली प्रत्येकाची भिन्न असते.


   साध्या 'अ' चे उदाहरण बघू. कोमल-मध्यम-तीव्र ,लघु-गुरु-प्लूत, सानुनासिक-अननुनासिक याप्रकारे अठरा भेद होतात. त्यात व्यक्तिवैशिष्ट्याने अगणित उच्चार तयार होतात.


   इथेच "भाषा-अंतर" व्हायला खरी सुरवात होते. म्हणून तर म्हणतात , "नवा वाणी मुखे मुखे"!

  भाषिकभेदाची सुरवात इथेच होते. 


  उदाहरणार्थ त्रयोदशी>तेरस>तेरा 

  अक्षय्य>अख्खय>आखजी>आख्खा

  आषाढी>आखाडी

  यमुना> जमना

  बर मग ठिक आहे> बर्मगठिका

  देवयानी>देबजानी

  इंद्रवर>इंदिवर

  अमरेंद्र>अमरिंदर

  लुप्त हंसा> लुप्तांझा

  ओनामा >ओम् नम: 

  ओनामासिधम> ओम् नमो सिद्धम् 

  अशाप्रकारे उच्चारण भेद हे भाषा-विभाषेचे मूळ कारण असावे, असे वाटते.


  मानवीवंशापासूनच भाषेचा जन्म झाला असावा. वर सांगितल्या प्रमाणे भाषांतर होता होता अनेक भाषा तयार झाल्या असाव्यत. त्यामुळे कोणत्या भाषेतून कोणता शब्द आला हे ठरवणे कष्टसाध्यच आहे. शिवाय शक्याशक्यते नुसार या भाषेतील शब्द त्या भाषेत जाऊन परत या भाषेत येऊ शकतोच ना.  तसेच या दोन्ही भाषेतून तिसऱ्या भाषेत या सर्व शब्दांसह तिचा स्वतंत्र शब्द असू शकतोच ना.


उदाहरणार्थ  पक्षी (संस्कृत) > पख्खी(पाली) >पक्षी ,पाखरू (मराठी)


  [पालीपासून संस्कृत झाली की संस्कृतपासून पाली , मराठी आधी का या भाषा , या वादात पडाण्यासाठी ही उदाहरणे दिली नसून मला याच भाषा ज्ञात आहेत. इतर भाषांचा अभ्यास  नाही .म्हणून याच भाषांची उदाहरणे मी देते.] 


  पूर्वी दळणवळण साधने तितकी उपलब्ध नव्हती. शिवाय तंत्रज्ञानही प्रगत नव्हते. त्यामुळे एकच भाषा वा मर्यादित बोली यांच्याद्वारे व्यवहार होत होते. देवाण-घेवाण क्वचितच होत असे.


आज सगळीच वर्दळ वाढलीय . त्यामुळे मानवांप्रमाणे भाषांचाही प्रवास-प्रगती वाढतेय यात शंका नाही.

 मग शब्द-शैली-ढब-तंत्र यांची देवाण-घेवाण होणे अपरिहार्य आहेच.


मानवीसमूहाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे "अहंपण"!  मी-माझे-मम यातूनच ममत्व निर्माण होते. त्यातून भाषाही सुटत नाही.

पण कधी कधी मानवी प्रवृत्तीपेक्षाही शब्दांची विष्णुवृत्ती- (हा धार्मिक शब्द नाही ,शिरण्याची प्रवृत्ती)- अधिक तीव्र असते. 

त्यामुळे कोणत्याही भाषेतील शब्द कुठल्या भाषेतील शब्दांशी साम्य बाळगतील हे सांगता येत नाही.

 उदाहरणार्थ निअर (जवळ या अर्थाने) इंग्रजी भाषेतील शब्द त्याच अर्थाने पण उच्चार वेगळा 'निअरे' राजस्थानीत आढळतो. 

असे अनेक उदाहरणं कोसो दूरच्या भाषांमध्ये सापडतात. 

कोणी कोणाचा शब्द घेतला यावर वाद करण्यापेक्षा भाषा शब्दसमृद्ध झाली हा परिणाम मोठा नाही कां? 

मी माझ्या भाषेत परके शब्द घेणार नाहीच हा दुरभिमान आहे तसेच अधिकाधिक परकेच शब्द योजेन हा ही कणा नसल्याचा पुरावा आहे. इथे विवेक हवा. माझ्या मूळ भाषिक- अस्तित्वाला धोका न आणता ,भाषिकप्रवृत्तीला जपत जपतच मी शब्द स्वीकारेन  असा दृष्टिकोण असावा. 

तसेच माझ्या भाषेतील याच अर्थाचे सर्व शब्द त्याच्या इतर अर्थच्छटांसह जपत नव्या शब्दाची भर घालण्यात कमीपणा वाटू नये.

गरज भासल्यास कोणत्याही भाषेतून शब्द आयात करावे . तसेच आपल्या भाषेतील शब्द सहज दुसऱ्या भाषेत पेरावे. शेवटी भाषा ही बोलण्यासाठी (टचटच नाही) हे मूळ उद्दिष्ट कोणीच विसरू नये. 

जगा -जगवा -जगू द्या. 

तद्वत  बोला- बोलू द्या-बोलवा.

(सर्वा मुखी मंगल बोलवावे मधिल बोलवा... ) हेच सूत्र महत्त्वाचे.


©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, January 15, 2025

#विसरसीमेच्या स्मरणकुपीतून......

 

2) अंभोरा 

  आयुष्यात घडलेले प्रसंग, भेटलेल्या व्यक्ती, अनुभवलेल्या घटना या स्मृतीतून कधीच जात नाहीत. फक्त कालौघात त्यावर धूळ बसते, इतकेच. पण काही कारणाने ती धूळ झटकल्या गेली,

की मूळ स्मृती जशीच्या तशी समोर येते.


अंभोऱ्याला आमचे लक्ष्मीनारायणाचे प्राचीन मंदिर (250+वर्षे जुने ) असल्यामुळे घरातील मंडळी आम्हाला घेऊन जायची तिथे. अंभोऱ्याला आमच्या देवळाजवळ,  गावाच्या शेवटच्या टोकाला, नदीकाठी पण टेकाडावर असं चार तसम्याचे आमचे घर होते. मी बघितले तेव्हा ते जीर्ण, आणि खचलेले होते. पण त्या घरात राहणारे राजुकाका मुंजे आणि  मुंजेआजी  नेहमीच ते घर नीटनेटके ठेवायचे. आंगणत सकाळी सडासारवण, तुळशी भोवती रांगोळी, ओसरी, माजघर, स्वयंपाक घर सारवून स्वच्छ ठेवलेले असे. 

मुंजे आजी माध्यम बांध्याच्या, सावळ्या आणि अतिशय शिस्तप्रिय, कडक, अत्यंत कष्टिक होत्या. 1967पासून  मुंजे आजी (श्रीमती वत्सला अंबादास मुंजे ) , आजोबा छोट्या राजुकाका सह  इतक्या खेडेगावात आमच्या मंदिराचे पुजारी आणि व्यवस्थापक म्हणून राहत होते .  अंबादास आजोबांच्या मृत्यु नंतर  आजीने अतिशय शिस्तीत राजुकाकाचे  पौरोहित्य शिक्षण नागपुरातील अंबादासपांडे गुरुजी यांचेकडून करुन घेतले. आजही राजुकाका 'गुरुजी' म्हणून पंचक्रोशीत चांगले नाव कमावून आहे.

माझ्या आईचे माहेर म्हणजे मुंजे. पण मुंजे आजी आणि आईकडील मुंजे घराणे यांच्यात आडनावशिवाय काहीच सबंध नाही. 

परंतु मोठीआई (आईची आई =श्रीमती रत्नप्रभा भास्करराव मुंजे )  मुंजे आजीला बहीण आणि राजुकाकाला पुत्रवत समजत होती.  गंगा दशहरा म्हणून दहा दिवस आजीचा मुक्काम अंभोऱ्यात असे. एकदोनदा अस्मादिकांचाही मुक्काम आजी सोबत म्हणून अंभोऱ्यात झालाय लहानपणी. 

तेव्हा खेड्यात बराच वेळा लाईन नसायची. घरात झिरोचे किंवा कमी व्होल्टचे पिवळे लाईट असायचे. शक्यतो सर्व कामे दिवसा, उजेडी करायचे. पाखरे निजली की आपणही निजून जायचे. 

मोठी आई पोथ्या पुराण वाचायची. वाती वळत बसायची. भाज्या निवडून ठेवायची. मुंजे आजी त्यांचे दैनिक कामे नेटाने करायच्या. राजुकाका देऊळ स्वच्छ करून देवाची पूजाअर्चा करून परिसरातील यजमानाकडे पूजेला निघून जायचा.  

माझ्या बरोबरीचे सोडा, बोलायलाही कोणी नसायचे.  मग मुंजे आजी मला फुले तोडून आण, फुलांचे हार कर अशी कामे सांगायच्या. त्या नदीवर गेल्या की मलाही घेऊन जायच्या. नदीवर कपडे कसे धुवायचे, हे प्रात्यक्षिकासह मला शिकवले त्यांनी.  नदीत भोंवरे कुठेय? उथळ पाणी कुठेय? शेवाळलेले खडक कुठेय? हे सर्व त्या आजी पाण्यात कपडे धूता धूता सांगायच्या.   

अंभोऱ्यात माझा मुक्काम बराच वेळ  नदीच्या पाण्यात किंवा आमच्या देवळाच्या सभामंडपात असायचा. मनसोक्त गाणे जोर जोरात म्हणायचे.  एकटीनेच भेंडया खेळायच्या.  नदीच्या काठी बसून दगड नदीत भिरकवायचे, किती तरंग निघाले, ते मोजायचे. वाळूतून शिंपले, शंख गोळा करायचे. मोठ्या शिंपल्याला दगडावर घासून  बटाटे-सोलणी तयार करायचे. मध्यम आकाराचे शिंपले, तिखट-मिठाच्या पाळ्यात चमचा म्हणून वापरायला गोळा करायचे. उगवत्या सूर्याची, पाण्याला सोनझळाळी  देत पसरणारी किरणे बघायची , तसेच वाळूत देऊळ, घर वगैरे तयार करायचे. आकाशातून  उडणारे, आकार बदलणारे  थवे बघत शांतपणे घंटोंशी बसून राहायचे. हवेचा आवाज ऐकायचा.  वेगवेगळ्या झाडांच्या पानांच्या सळसळीचे आवाज वेगवेगळे असतात, ते नीट ऐकायचे.  विविध पक्षी बघायचे. शिवाय सकाळ संध्याकाळी देवळात  स्तोत्र, अभंग म्हणायचे. ना कुठली चिंता, ना घाई, ना काळजी! इतकी फुरसत पुन्हा  कधी मिळालीच नाही.

कोणतेही साधने, वस्तु, खेळणे यांच्या शिवाय स्वतःच स्वतःची करमणूक करून घेण्याची कला, या काळात साधून गेली. कोरोना काळात याचा खूप उपयोग झाला. 

तेव्हा अंभोरा इतकं छोटं खेडे होते की जीवनावश्यक वस्तु आणायलाही कुही पर्यंत जावे लागे. आठवडी बाजार सुद्धा मेंढ्याला (मेंढा नावाचे गाव ) भरायचा. त्यामुळे वस्तु, पदार्थ अत्यन्त काटकसरीने वापराचे प्रशिक्षण आजीच्याच हाताखाली मिळाले.  

नकळत जीवनोपयोगी किती तरी गोष्टी या काळात सहज समजल्या. आज मागे वळून बघताना जाणवते की, अतिशय समृद्ध आणि विविधतापूर्ण बालपण जगायला मिळाले.  

इतकी छान मंडळी छोट्या कालावधीसाठी कां असेना, आयुष्यात आली, यासाठी देवाचे मानावे तितके आभार कमीच आहे.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर.



Monday, January 13, 2025

#विसरसीमेच्या स्मरणकुपीतून......


1) अंभोरा 

काल बरेच वर्षांनी 'अंभोरा' येथे जाणे झाले.

 नदीवरचा पूल, नवी लिफ्ट, पुलावर सर्वत्र दिव्यांचा झगमगाट, गाड्याच गाड्या सगळीकडे , प्रचंड गर्दी, कोणत्याही जत्रेच्या ठिकाणी असतात, तशी खाण्यापिण्याची, वस्तूंची दुकानें, बकालपणे पसरलेला कचरा, गर्दीचा बेशिस्त वावर, सेल्फी/रील करीत फिरणारी गर्दी असे सारे दृश्य पहिले. 

अजूनही हे पर्यटनस्थळ विकसित होतेच आहे. भौतिक विकास प्रक्रिया सुरूच आहे. आशा करू या की जितका भौतिक विकास गतिमान होतोय, तितकाच गुणवत्तापूर्ण विकास येथील स्थानिक मानवी समुदायाचा होईल आणि येथे येणारे पर्यटकसुद्धा जबाबदार, सजग होतील.  


दहा-बारा वर्षांपूर्वी माझ्या  कारने आईबाबांना नेले होते, तेव्हा इथे पूल बनविणे सुरु होते. तेव्हाचा तो नजारा बघून आईने म्हटले होते,'आपलं अंभोरा वाटत नाही'. 


आताचे अंभोरा बघून काल तर मला गलबलून आले,  फ्लड लाईटच्या झगमगाटात, मंद समईच्या सोज्वळ प्रकाशतील आमचे 'लक्ष्मीनारायण मंदिर' जणू हरवून गेले.

 वास्तविक वर्तमानात व्यावसायिक भरभराटीत येऊ पाहणाऱ्या 'धार्मिकपर्यटन स्थळाने',  जुन्या अनवट, साध्यासुध्या , सात्विक, आपुलकी जपणाऱ्या आमच्या अंभोऱ्याला स्वप्नवत करुन टाकले! 


काल तिथे फिरून फिरून मी लहानपणी अनुभवलेलं माझं गाव, मोडकळीस आलेला आमचा वाडा, ते गर्द झाडीझुडी असलेले विस्तीर्ण आंगण, आणि नदीपर्यंत पाऊणशेच्या वर दगडी पायऱ्या असलेले शांत मंदिर शोधत होती.  घराच्या मागचा मोठ्ठा वृक्ष आजही तसाच आहे, फक्त आता तिथे 'आपलं' घर नाही. मंदिराच्या बाजूने नदीच्या पात्रात हळूच नेऊन सोडणारी  उतरंडी पायवाट आता अर्ध्यातच तुटली आहे कारण नदीचा प्रवाह अधिक उंच झालाय. घराच्या जागेवर आता  स्वच्छता संकुल बांधले सरकारने. पूर्वेकडून मंदिरात प्रवेश घेण्यासाठी मार्गच उरला नाही, पाणीच पाणी सर्वत्र झालंय. आता मंदिराच्या वीसपंचेवीस पायऱ्या शिल्लक आहेत. कतळाचा कोरीव गरुडखांब बुडाला वाढलेल्या नदीच्या पात्रात. टेकडीवजा बेटावर असलेले चैतन्येश्वर मंदिर, आता भरीव पुलाने  मोठया विस्तृत रस्त्याला जोडले आहे.  चैतन्येश्वर आणि आमच्या मंदिराच्या मधून पूर्वी झुळझूळ वाहणारा उथळ प्रवाह आता पूर आल्यागत मोठा पण संथ झालाय. आमच्या मंदिरा मागे असलेली शेत, जंगल आता उरलेच नाही. सर्वत्र अनिर्बंध मानवी वावर  जोरात सुरु आहे.  

अजून काय होतं असं तेव्हा, जे अजूनही मनात रेंगाळत आहे?  

पुढच्या भागात सांगते.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर.

Wednesday, January 8, 2025

#सहजोक्त.

 #शब्दचिंतन.

कधी कधी नेहमी वापरात असलेल्या शब्दाचा 'अर्थ' अवचित, विनासायास कळतो आणि मनाला खूप आनंद होतो.

असंच काहीसे झाले, थोड्या वेळापूर्वी.

तरुण म्हणजे तरुण, युवक,जवान, म्हातारा नसलेला, बालक नसलेला वगैरे वगैरे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हा शब्द सर्वांना परिचित आहेच.

शब्दकोष धुंडाळताना  अचानक या शब्दाची व्युत्पत्ती गवसली.

तरुण= तरति /प्लवते प्रमोदसलिले इति! 

प्रमोदसलीलात म्हणजे आनंदाच्या डोही (पाण्यात)  तरंगणारा म्हणजे तरुण!!   

 जो कायम  हर्षित, सुखात, प्रेमात आल्हादीत, आमोदीत राहतो, तो तरुण. 

वयाने युवा असून कायम दुर्मुखलेले "तरुण" नाहीतच. 

उलट  वय उलटून गेल्यावरही कायम हसतमुख, दिलखुलास जगणारे "तरुण" ठरतात.

      म्हणजे 'तरुण' हा शब्द शारीरिक वय दर्शविणारा नसून मनोभूमिका दर्शक शब्द आहे. 

तुमचे काय मत आहे? 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, December 24, 2024

#सहजोक्त ~शब्दचिंतन.

 

काशी -वाराणसी -बनारस.

नावात काय नाही? नावातच सर्व आहे.  किंवा 'ते सर्व'  त्यात आहे , म्हणून 'ते' त्याचे नाव आहे, नाही कां?

काशी ऊर्फ वाराणसी  ऊर्फ बनारस असे तीन नावं असलेले भारतातील धार्मिकदृष्ट्या अत्यन्त महत्वाचे एक शहर आहे. 

वर ऊर्फ लिहिले म्हणजे ही तीन नावे  पर्यायवाची आहेत काय? अजिबात नाही. कसे 👇👇 वाचा.


#काशी =>>  या शब्दाची संस्कृत व्युत्पत्ती 👇अशी 

[काशते शिवत्रिशूलोपरि ।  

काशृङ्   दीप्तौ + अच् गौरादित्वात् ङीष् ।  काश +   इन् ङीप् वा ।  

अथवा 

काशयति प्रकाशयतीदं   सर्व्वं या । 

 काश् + णिच् अच् गौरादित्वात्   ङीष् ।  स्वनामख्याततीर्थम् । ]

प्रलयकाळी  साक्षात शंकर, आपल्या आवडत्या काशीनगरीला त्रिशूलावर उचलून घेतात. पृथ्वीवरील सर्वात चकाकदार नगरी म्हणून "काशी" तीर्थनगरी होय.

अयोध्या, मथुरा, माया, काशी,  कांची,  अवंतिका।

पूरिवती, चैव सप्तैताः मोक्षदायिकाः ॥ 

पुराणकाळापासून या सात नगरी प्रख्यात आहेत. यात काशीचेही नावं आहे.

काशी ही सनातन (सर्वात प्राचीन ) नगरी आहे. प्रलयकाळात सर्व जग लयाला जाते आणि त्या नंतर नवीन सृष्टी तयार होते. फक्त काशी हीच अशी शंकराची लडकी नगरी आहे, जिचा लयच होत नाही कारण शंकर तिला उचलून घेतात.


#वाराणसी =  काशी नगरीला वाराणसी हे नावं तिच्या भौगोलिक वैशिष्ट्यामुळे पडले आहे.

"वरुणा" नावाची गंगेची उपनदी  प्रयागराज जिल्ह्याच्या 'फूलपुर' गावातून उगम पावते. जवळ पास 100 किलोमीटर प्रवास करून साराय मोहना भागाजवळ 'आदिकेशव' घाटाजवळ ती गंगेला मिळते.

"असी" नदी वाराणसीच्या कंदवा भागातून निघून चितईपुर, करौंदी, करमाजीतपुर, नेवादा, सराय नंदन, नरिया, साकेत नगर नगवा या भागातून जवळ जवळ आठ किलोमीटर प्रवास करून अस्सी घाटावर गंगेत मिळते. 

तर अशा रितीने, वरुणा आणि अस्सी या दोन नद्यांच्या मधील भूभाग म्हणजे "वाराणसी", हे नाव प्रसिद्ध झाले.


#बनारस =>>   साहित्यशास्त्रात नऊ रस प्रसिद्ध आहेत.

श्रृंगार-वीर-करुणाद्भुत-हास्‍य-भयानका: । 

बीभत्‍सरौद्रौ शान्‍तश्‍च रसा: नव प्रकीर्तिता: ।। 

साहित्यशास्त्रात  शृंगार , वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बिभत्स, रौद्र, शांत 

 हे नऊ रस आहेत.

अन्नपदार्थात सहा रस  प्रसिद्ध आहे. 

षड्रसा: पुरुषेणेह भोक्तव्या: बलमिच्छता |

अम्लस्तिक्त: कषायश्च मधुरो लवणः कटुः ||

अम्ल =आंबट,  तिक्त = कडू, कषाय =तुरट, मधुर =गोड, कटु =तिखट असे सहा रस जेवणात नेहमीच असायला हवा, ज्यामुळे समतोल आहार मिळेल. 

तर असे सर्व क्षेत्रातील  बना-बनाया  'रस' आस्वादण्यास सहज उपलब्ध आहे आणि येथील (प्राचीन काळातील ) जनसामान्य त्यात कुशल होते ; म्हणून "बनारस" हें  या शहराचे सार्थ नाव आहे. 

[अतिप्राचीन काळी]या शहरातील सर्वच लोकं रस उपभोगण्यास सक्षम  होते म्हणून ते 'रसिया' म्हणजे रसिक आहे. 

तर अशा रितीने  काशी हें नाव, शहराचे अध्यात्मिक+धार्मिक महत्त्व दर्शविते.

वाराणसी हें नाव, शहराची (तत्कालीन ) भौगोलिक व्याप्ती दर्शविते.

तर 14 विद्या आणि चौसष्ट कला यांचे माहेरघर असलेल्या या शहरातील लोकांची वृती/स्वभाव सांगणारे नाव म्हणजे बनारस.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर.




Saturday, September 7, 2024

#सहजोक्त.

 करंजी-मोदक.

'अन्न हे पूर्णब्रम्ह', मानणारी आपली संस्कृती. आपले सर्वच सणवार, हे खऱ्या अर्थाने उत्सव असतात. बाह्य आणि आंतरिक आनंद ओसंडून वहावा, याची पूर्ण सोय आपल्या प्रत्येक उत्सवात दिसते. तसंच व्यक्तिगत उपासनेपासून ते सामाजिक उपासनेतून सकारात्मकता जपण्याचे कसबही जपताना दिसतात आपले सण.

आज गणेश स्थापना. गणपतीबाप्पासाठी 21 मोदक तळत होती. सासूबाईंचे वाक्य आठवले.

'बहिणी शिवाय भाऊ असू नये. मोदकासोबत एक तरी करंजी करावीच करावी.' मग केली करंजी! 

 देवीच्या नवरात्रात नुसत्या सोळा करंज्या करून भागात नाही. एक तरी मोदक तळावा,  म्हणतात. बहिणाला भाऊ हवाच.

करंजी म्हणजे बहिणीचे प्रतीक आणि मोदक म्हणजे भावाचे प्रतीक.

आपली संस्कृती कन्या-पुत्र दोहोंचाही सन्मान करणारी होती प्राचीन काळापासून. म्हणूनच तर अशा रूढी वर्षानुवर्षे घराघरातून पाळल्या जात असत ना? आपली संस्कृती प्रत्यक्ष शास्त्रापदेश देते पण प्रतीकातून, वर्तन सुधारण्यासाठी प्रेरणा देते. समजून उमजून सुयोग्य वर्तनाची संधी देते. 


पूर्वी "अष्ट पुत्रा सौभाग्यवती हो", म्हणत असताना त्या आठ अपत्यात कन्या गृहीत होतीच होती.  "ज्येष्ठा गौर"  मिरवत आणण्यासाठी घरची कन्या हवीच हवी. भाच्याची जावळे आत्याच्याच मांडीवर काढायचा दंडक होता.

बाळाचे नाव आत्याच कानात सांगेल. तसेच उपवर वधू वा वराच्या मागे मामानीच उभे राहायचे असते. मुंजीबंधन वेळी बटूच्या मागे मामाच उभा राहतो. अन्नप्राशन मामाच्याच मांडीवर आणि हातून करायचे. लग्नातील वधूची पिवळी अष्टपुतळी साडी मामानीच नेसवायची. तर तिसरे वर्ष लागले की आत्याने भाचीला रेशमी हिरवा परकरपोलका शिवायचा, तसेच हिरवी गरसळी (माळ) घालायची. रूढ धार्मिक प्रसंगात भाऊबहिणी महत्वाचे आहेतच. याचाच अर्थ प्रत्येक घरी भावाला बहीण आणि बहिणीला भाऊ हवाच हवा.

दाक्षिणात्य काही जातीत, मुलगी नसलेल्या घरी मुली देऊ नये, असा दंडक होता.


मूळ रूढी-परंपरा काळानुसार बदलविल्या गेल्या. संयुक्त कुटुंब विलग झाले. कुटुंब लहान होता होता, (अपत्यांची संख्या ) आठाचे चार, चाराचे तीन तीनाचे दोन, दोनाचे एक आणि आता तर एकही नको  असे झालेय. 

बरे इतकी कुटुंब छोटी छोटी होऊनही देशाची लोकसंख्या बेसुमार वाढलीय!!  त्यामुळे छोट्या कुटुंबाची 'सुरक्षितता' (विशेषतः सामाजिक /मानसिक /भावनिक) दावणीवर लागली आहे. 


कुटुंबं व्यवस्थेच्या मुळातील हेतू, कारणे काळाच्या ओघात धूसर झाली. 

सोईनुसार अर्थ लावणे आणि हवे ते बदल करणे सुरु झाले. शिवाय 'जुने ते सर्व कर्मकांड आणि वाईटच', असे मत सुशिक्षित लोकांना पटू लागले. 

जसे, वरदक्षिणा ही रूढी काळाच्या ओघात हुंडा म्हणून विकृत केल्या गेली, तर हक्काची "साडीचोळी" ही रूढी नष्टच केल्या गेली.


जुने ते सगळे छानच होते कां? सांगता येत नाही. कारण तत्कालीन समाजाला योग्य अशा त्या रूढीपरंपरा होत्या.  पण सगळ्याच पूर्णपणे वाईट निश्चित नव्हत्या, हे मात्र 100% खरे. 


गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून बऱ्याच घरात एकच अपत्य आहे. त्यामुळे आत्या, मामा, काका, मावशी वगैरे नाते नव्या पिढीच्या प्रत्यक्ष अनुभवात नाही. चुलत-चुलत, मावशीच्या नणंदेच्या पुतण्या, आत्याच्या जावेची मुले, आत्तेसासू, मामेसासू, साटेलोटे वगैरे तर फारच गोंधळायला होते. नात्याची ही बहुपदरी वीण, मानलेल्या नात्यातून काही अंशी समजते. पण त्या नात्यात तितके नैसर्गिक वात्सल्य असेलच असे नाही. म्हणून तर "गुड टच, बॅड टच" शिकवावे लागते, लहानमुलांना.


 भावंडातील परस्पर अनुबंध -पुस्तके वाचून- समजत नाही. "शेअरिंग इज केअरिंग" हे कृत्रिमरित्या शिकवावे लागते. आपोआप रुजत नाही. एकाच शाळेत शिकणारी भावंडे, परस्परांची काळजी घेत असत , जडणघडण आपोआप होत असे. धोके, खाचखळगे आपोआप लहानांना मोठ्यांकडून कळत असत. संगोपन, सहवेदना वगैरे घरूनच अंगवळणी पडत. सहजीवनाचे शिक्षण घरातून आणि शाळेतूनही मिळत होते.


"करंजी-मोदक" ही नुसती खाद्य संस्कृती नव्हे तर कुटुंब व्यवस्था जपणारी सामाजिक संस्कृतीही आहे. नेमकी मधल्या पिढीने क्षणिक सुखासाठी वा अज्ञानातून सामाजिक वीण उसावली. 

परिणाम आता समाजात दिसतोय, होय ना?

"करंजी-मोदक" संस्कृती पुन्हा प्रतिष्ठित होऊ दे, हीच गणपतीबाप्पाच्या चरणी प्रार्थना.

बुद्धी दे गणनायका 🙏🙏🙏

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर.




सहजोक्त.

  . शिवी ... अबबो आता शिवीवर पण लिहायचे कां? 😊 हं! लिहिता येऊ शकते. मराठी भाषेत 'शिवी' शब्द कुठून, कसा आला असेल बरे? मराठी भाषेतील ...