# पुरस्कार न् सन्मान वगैरे वगैरे
ते तसे नेहमीच त्यांच्या ऒळखीचे होते
घरीदारी त्यांचे नियमित येणेजाणे होते
त्यांना सतत फार मदत यांची होत होती
मग उतराई-योजना जाहिरसत्काराने केली ॥
तिला उच्च पदावर जायचेच होते जेव्हा
पुरस्काराची शिडी गरजेची होती तेव्हा
याने केला सत्कार न् तिला दिला पुरस्कार
एकमेका सहायासी योजना असे असरकार ॥
प्रभाव मोठा याचा न् सर्विसही याची उदंड
याच्या प्रभावळीत फायदाच असतो अखंड
पुरस्कार देऊन झाले ,नागरी सत्कारही केले
फॅनक्लब स्थापुन रिकरिंग वसूल होऊ लागले ॥
फिल्मही अमाप झाल्या , छापून गौरवग्रंथा
आता काय करू ज्याने वाहती राहील गंगा
आई त्याची झाली आता जगज्जननी थोर
जिच्या पोटी निपजले हे कर्तृत्ववान पोर ॥
पुरस्कार-सत्काराचे किस्से अनेक असतात
गल्ली ते दिल्ली व्यापक व्यासपीठे सजतात
भर्कन मोठे होण्याची प्रत्येकास आहे तहान
सगळ्यांची सोय करतो माझा भारत महान ॥
अनेक धंदे फळतात आता कष्टाविणा एकत्र
लोकशाहीच्या नावाने उभे दबावगटाचे शस्त्र
घोटाळेही आदर्श ठरतात ,भानगडींचे भूषण
पद्म असो वा रत्न असू द्या , खटपटींना पोषण ॥
एकमेका सहाय करूनी अवघे धरिती सुपंथ
अवगुण आता गुणच ठरतात , नका करू खंत
अहो रूपं अहो ध्वनी, आदि पाठ आहेत ना म्हणी
उदाहरणांचे पिक आता दिसे लोकी जनी॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment