#शब्दचिंतन.
शब्द तयार होतात वर्णांपासून. नाम , क्रियारूप इत्यादि प्रकार शब्दांचे असतात. शब्दांना अर्थ असतो.
दैनिक वापरात अनेक वर्षे असलेला शब्द कसा तयार झाला असेल ? याचा विचारही मनात येत नाही. अनेक शब्द मूळधातूपासून तयार झालेले कृदन्त वगैरे असते. पण आपल्याला लक्षातही येत नाही . तसेच माझे झाले.
काल एक शास्त्रग्रंथ वाचताना "अध्याय" या शब्दाची व्युत्पत्ती वाचनात आली. व्युत्पत्ती वाचली न् डोक्यात लख्ख प्रकाश पडला .
अध्याय म्हटलं की 'धार्मिक ग्रंथातील एक भाग ' असं सामान्यपणे वाटते.
'न् अशा प्रकारे त्यांच्या जीवनातील तो अध्याय संपला' , 'न् अशा प्रकारे त्यांच्या जीवनातील ते प्रकरण संपले' अशी वाक्यरचना मराठीत रूळलेले आढळतात. इथे अध्याय आणि प्रकरण हे दोनही शब्द वरपांगी समान वाटतात. नाही कां ?
काव्यप्रकाश या ग्रंथात उल्लास हा शब्द योजला आहे.
रामायण या ग्रंथात कांड असा शब्द योजला आहे. भगवद्गीतेत अध्याय आहेत. मुद्राराक्षसात अंक आहेत. महाभारतात पर्व , अष्टाध्यायीत अधिकरणं आहेत.
अशा प्रकारे जुन्या ग्रंथात छोट्या-छोट्या भागांना अध्याय , प्रकरण , उल्लास , आह्निक , कांड , अंक , पर्व , पाद , अधिकरण वगैरे शब्द वापरलेले आढळतात.
ग्रंथाचे 'विषयांशानुसार केलेले विभाग' या अर्थाने हे सर्व समान आहेत असे वाटते. पण तसे नक्कीच नाही. वर उल्लेखलेल्या प्रत्येक शब्दाची खास , वेगळी व्युत्पत्ती आहे. न् तेव्हाच्या ग्रंथकारांना न् अभ्यासकांना त्या त्या शब्दाच्या अर्थच्छटेतील बारकावे नक्कीच परिचयाचे होते. म्हणून आपापल्या ग्रंथातील छोट्या, छोट्या भागांना सरसकट एकच नाव न देता ग्रंथविषयाला अनुसरून नाव दिले आहे.
"अध्याय" या शब्दाची व्युत्पत्ती अशी ,
"*अधीयतेऽस्मिन्ननेन वाऽर्थविशेष इत्यध्यायः ।*
*तेन अधीयते इत्यध्यायः ।*"
म्हणजे ज्यामुळे , ज्याच्याद्वारे , ज्याच्याने अध्ययन केले जाते तो अध्याय. अधि+ इ धातूचा अर्थ, स्मरण करणे / विचार करणे असा होतो. याच धातू पासून अध्ययन-अध्यापन (मराठीत शिकणे ,शिकवणे या अर्थाने रूढ शब्द) हे शब्द प्रचलित आहेत. स्वतःहून विचार केल्याशिवाय शिकताच येत नाही म्हणून अध्ययन म्हणजे 'शिकणे' इतकाच गुळगुळीत अर्थ घेऊ नये . स्वतःहून विचार करण्याची प्रक्रिया किंवा विचारान्ती स्मरणात ठेवण्याची क्रिया , जेव्हा सुरू होते तेव्हाच खरे 'शिकणे' असते. या अर्थाने अध्ययन-अध्यापन हे शब्द समजून घ्यावे .
तर "अध्याय म्हणजे ज्याच्या मुळे स्वतःहून विचार करण्याची वृत्ती वाढेल असा ग्रंथ-भाग" , हा अर्थ जास्त सयुक्तिक ठरेल , होय ना ? न् या पुढे "अध्याय" शब्दाचा अर्थपूर्ण वापर करता येईल , असं वाटते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment