#सहजोक्त.
अनुहातशब्द गगनीं न माय ।
त्याचेनि नादें भव शून्य होय ।
कथा निजांगें करुणा कुमारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥
भावार्थ:
अनाहत नाद आकाशामध्येही सामावत नाही. त्या दिव्य नादाच्या लहरींमध्ये हा संपूर्ण संसार (भव) आणि त्याचे मोह-माया शून्य होऊन नष्ट होतात. तुमच्या कथेचे स्मरण मनाला आत्मिक आनंद देणारे आहे. हे भो शंभो, अशा या संकटातून आणि संसारातून मला तुमच्याशिवाय तारून नेणारा इतर कोणीही नाही.
वरवर पाहता या कडव्याचा हा साधा अर्थ आपल्याला कळतो. परंतु, यातील काही विशेष शब्द अत्यंत गहन आणि अध्यात्मिक अर्थ उलगडून दाखवतात. ते आपण सविस्तर पाहूया:
१. अनुहात शब्द म्हणजे 'अनाहत नाद'
या नादाची निर्मिती कोणत्याही बाह्य ऊर्जेविना किंवा आघाताविना होते; म्हणूनच तो 'अनाहत' (ज्यावर आघात झालेला नाही) आहे.
आधुनिक विज्ञान ज्याला विश्वाचा जन्म देणारा महाविस्फोट (Big Bang) आणि त्याच्या मागे उरलेली वैश्विक कंपने (CMB - Cosmic Microwave Background) म्हणते, त्यालाच प्राचीन भारतीय ऋषींनी ध्यानस्थ अवस्थेत अनुभवून 'अनाहत नाद' किंवा विश्वाचा आदिध्वनी म्हटले आहे. हा ध्वनी कधीही नष्ट होत नाही, तो निसर्गात निरंतर सुरू असतो.
हा ध्वनी मानवी शरीरातील चौथ्या चक्राशी म्हणजेच 'अनाहत चक्राशी' (हृदय चक्र) संबंधित आहे. जेव्हा साधकाची चेतना या चक्रावर स्थिर होते, तेव्हा हा नाद स्पष्ट ऐकू येऊ लागतो. मन अत्यंत चंचल असते, पण अनाहत नाद मनाला सहज आकर्षून घेतो. एकदा का साधकाचे लक्ष या नादावर केंद्रित झाले, की मनाचे इतर सर्व विचार आपोआप थांबतात.
योगशास्त्रात या नादाचा पाठलाग करण्याच्या प्रक्रियेला 'नादानुसंधान' म्हणतात. बासरी किंवा घंटेच्या आवाजापासून सुरू झालेला हा प्रवास शेवटी साधकाला 'मेघ नादा'कडे घेऊन जातो, जिथे मन पूर्णपणे विलीन होऊन समाधी अवस्था प्राप्त होते. या नादामध्ये मन इतके तल्लीन होते की, अहंकाराचा नाश होऊन फक्त परमानंदाची अनुभूती उरते. अशा या अनाहत नादाची सवय झाली आणि साधक त्यात एकरूप झाला, की "त्याचेनि नादें भव शून्य होय" अशी योग्याची अवस्था होते.
२. कथा निजांगें करुणा कुमारी
सतीच्या विरहाने वैराग्य निर्माण झालेल्या शंकराला कुमारी असलेल्या पार्वतीने आपल्या तपोबळाने पती म्हणून प्राप्त केले. पार्वती ही जगन्माता आहे आणि तिच्यातील कारुण्यभावामुळेच ही जीवसृष्टी निर्माण झाली. अशा आपल्या प्रिय पत्नी पार्वतीला, भगवान शिव एकांतात 'ब्रह्म हेच अंतिम सत्य' असलेल्या अमरकथा सांगत असतात.
अध्यात्मिक साधनेत जेव्हा साधक शिवभक्तीने संसार शून्यवत मानून सतत अनाहत नादाच्या धुंदीत राहतो, तेव्हा त्याला या कथा बाहेरून ऐकण्याची गरज उरत नाही. ती अनुभूती त्याच्या स्वतःच्याच अंगी (निजांगे) म्हणजेच अंतःकरणात आपोआप प्रकट होते.
ज्याप्रमाणे 'कुमारी कन्या' ही मायेचे किंवा संसाराचे विकार न शिवलेली शुद्ध ऊर्जा मानली जाते, त्याचप्रमाणे ईश्वराची ती परम कृपा साधकाच्या अंतरात्म्यात 'करुणा कुमारी' बनून प्रकट होते आणि त्याला मोक्षाकडे नेते.
३. 'कुमारी' शब्दाचा शास्त्रीय अर्थ
"अष्टवर्षा भवेद्गौरी दशवर्षा च कन्यका ।"
"सम्प्राप्ते द्वादशे वर्षे कुमारीत्यभिधीयते ॥"
म्हणजे आठव्या वर्षी गौरी, दहाव्या वर्षी कन्यका आणि बारावे वर्ष आले की तिला 'कुमारी' म्हटले जाते.
या कडव्यातील पहिल्या तीन ओळींचा गाभा आणि त्यातील शब्दांचे मर्म जर आपण नीट समजून घेतले, तर अध्यात्माचा किती गहन आणि अलौकिक अर्थ आपल्यासमोर उलगडतो, नाही का?
© डॉ. प्रज्ञा देशपांडे
#सहजोक्त
शांति स्वलीला वदनीं विलासे ।
ब्रह्मांडगोळीं असुनी न दिसे ।
भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २२॥
भगवान शंकरा, तुझ्या वदनावर नेहमी शांती आणि आत्मसुखाचा विलास असतो. तू या संपूर्ण ब्रह्मांडात सर्वत्र व्यापलेला असूनही डोळ्यांना सहसा अगोचर आहेस. तू भिल्ल रूपातील पार्वतीचा पती आणि स्वतः परमोच्च ब्रह्मचारी आहेस. हे शंभो, तुझ्याशिवाय मला संकटातून तारणारे (उद्धार करणारे) दुसरे कोण असेल बरे?
या कडव्यातील काही शब्दांचा सविस्तर अर्थ बघू.
• लीला
'लीला' हा मूळ संस्कृतमधील शब्द मराठीत तत्सम शब्द म्हणून आला आहे. 'लीला' या शब्दाची व्युत्पत्ती 'लल्' या मूळ धातूपासून होते. 'लल्' या धातूचा अर्थ खेळणे, लाड करणे, विलास करणे किंवा बालसुलभ खेळकरपणा असा होतो. याच धातूपासून पुढे 'लीला' (स्त्रीलिंगी नाम) हा शब्द तयार झाला, ज्याचा मूळ अर्थ 'खेळ' (Play) किंवा 'क्रीडा' असा होतो.
• विलास
'विलास' या शब्दाची व्युत्पत्ती संस्कृतमधील 'वि + लस्' या धातूपासून झाली आहे. 'लस्' म्हणजे चमकणे, खेळणे, आनंद व्यक्त करणे किंवा विलोभनीय दिसणे. मराठी आणि संस्कृत शब्दकोशांनुसार हा शब्द प्रामुख्याने आनंद, उल्लास, क्रीडा किंवा सौंदर्याचा प्रकाश या अर्थाशी जोडलेला आहे.
वरील कडव्यात मात्र "शोभून दिसतो" असा अर्थ योग्य ठरतो.
शांति स्वलीला वदनीं विलासे = जगाची, ब्रह्मांडाची निर्मिती ही शंकराची लीला म्हणजे सहज केलेला खेळ आहे. या खेळातून त्यांना शांती लाभते आणि त्यांचेच तेज चेहऱ्यावर शोभून दिसते.
• ब्रह्मांडगोळीं
ब्रह्मांडगोळीं > ब्रह्मांडाचा गोळ म्हणजेच संपूर्ण विश्व किंवा जग. इथे सप्तमीचा 'ई' प्रत्यय आहे, म्हणून 'ब्रह्मांडगोळीं' म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये.
ब्रह्मांडगोळीं असुनी न दिसे म्हणजे हे संपूर्ण विश्व ही शंकराची निर्मिती आहे, तरीही तो सहज दिसत नाही. जसे कापड/वस्त्र हे धाग्याचे किंवा कापसाचे असूनही धागा वेगळा दिसत नाही; पाण्याचा घडा संपूर्ण मातीचा बनलेला असतो परंतु माती वेगळी दिसत नाही. तसेच शंकराने सर्व ब्रह्मांड बनवले, पण या जगतातून तो वेगळा दिसतच नाही.
• भिल्ली भिल्लीणीची कथा
'शिव'ची पत्नी 'शिवानी', तशी 'भव'ची पत्नी 'भवानी'. पार्वतीने भिल्लीणीचे रूप धारण केले. यामागे एक कथा आहे:
एकदा कैलास पर्वतावर भगवान शिव माता पार्वतीला परम ज्ञान आणि वेदांचे गूढ रहस्य सांगत होते. शिवजी जेव्हा हे अत्यंत महत्त्वाचे ज्ञान देत होते, तेव्हा पार्वती देवीचे लक्ष विचलित झाले आणि त्यांना डुलकी (झोप) आली.
भगवान शिवांनी जेव्हा पाहिले की पार्वतीचे लक्ष नाही, तेव्हा ते क्रोधित झाले. ज्ञान ग्रहण करताना अनादर किंवा दुर्लक्ष करणे हा मोठा अपराध मानला जातो. शिवजींनी पार्वतीला शाप दिला, "तू काही काळासाठी देवलोक सोडून पृथ्वीवर भिल्ल घराण्यात जन्म घेशील." (काय हिंमत होती, बायकोला शाप दिला! म्हणून महादेव आहेत ते! 😊)
शिवाच्या शापामुळे माता पार्वतीने पृथ्वीवर एका भिल्ल राजाच्या घरात कन्या म्हणून जन्म घेतला. तिचे नाव 'ललिता' ठेवले गेले. ती निसर्गाच्या सानिध्यात वाढली आणि अत्यंत रूपवान, सुजाण व शिकार करण्यात निष्णात बनली.
काही काळानंतर, कैलास पर्वतावर माता पार्वतीशिवाय भगवान शिव अत्यंत उदास आणि एकाकी झाले. त्यांना आपल्या शापाचा पश्चाताप झाला. पार्वतीला परत मिळवण्यासाठी आणि तिची परीक्षा घेण्यासाठी शिवजींनी स्वतः एका 'भिल्ल' तरुणाचे रूप धारण केले आणि ते पृथ्वीवर आले. भिल्ल राजाच्या नगरीत येऊन शिवजींनी आपल्या नृत्य, संगीत आणि शिकार कौशल्याने सर्वांना मोहित केले. भिल्ल राजाने आपल्या कन्येचा विवाह या पराक्रमी भिल्ल युवकाशी करून देण्याचे ठरवले.
विवाहाच्या वेळी जेव्हा दोघांचे हात एकमेकांच्या हातात आले, तेव्हा माता पार्वतीला तिच्या मूळ रूपाची आणि शिवजींची आठवण झाली. भगवान शिवांनीही आपले मूळ रूप प्रकट केले.
• शिव ब्रह्मचारी
'शिव' म्हणजे पवित्र. 'ब्रह्मचारी' हा शब्द 'ब्रह्म' आणि 'चर' या दोन मूळ संस्कृत शब्दांपासून तयार झाला आहे.
ब्रह्म म्हणजे वेद, पवित्र ज्ञान, परमेश्वर, सत्य. 'चर्' या मूळ धातूपासून 'चर' शब्द तयार झाला. चर म्हणजे चालणे, वागणे, आचरण करणे किंवा तत्पर असणे.
'ब्रह्मणि चरति इति ब्रह्मचारी' म्हणजे जो ब्रह्माचे (वेदांचे किंवा सत्याचे) आचरण करतो, तो ब्रह्मचारी होय.
प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार, गुरुगृही राहून वेदांचा अभ्यास करणाऱ्या आणि शिस्तीचे पालन करणाऱ्या विद्यार्थ्याला 'ब्रह्मचारी' म्हटले जायचे. कालांतराने या शब्दाचा मुख्य अर्थ इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारा, विशेषतः कामवासनेचा त्याग करून पवित्र आयुष्य जगणारा असा रूढ झाला.
समन्वय आणि समारोप
तर असा ब्रह्मचारी शिव आणि भिल्ल-भवानी यांच्या संयोगामुळे हे ब्रह्मांड निर्माण झाले आहे. दाम्पत्य कसे असावे? तर शिव-पार्वतीसारखे! वरवर बघता दोघांमध्ये समानता दिसतच नाही, परंतु दोघेही एकमेकांना पूरक, पोषक आणि संवर्धक आहेत. [याआधीच्या कडव्याचे विश्लेषण परत वाचावे, कृपया]
तर एकंदरीत, या कडव्याची तिसरी ओळ ही पहिल्या आणि दुसऱ्या ओळीसाठी आधार आहे, आणि चौथी ओळ हा या श्लोकाचा समारोप आहे.
© डॉ. प्रज्ञा देशपांडे.
#सहजोक्त.
पीतांबरें मंडित नाभि ज्याची ।
शोभा जडीत वरि किंकिणीची ।
श्रीदेवदत्त दुरितांतकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २३॥
अर्थ:
ज्या भगवंताच्या (शंकराच्या) कंबरेभोवती पिवळे रेशमी वस्त्र (पीतांबर) नेसलेले आहे आणि त्यावर रत्नांनी जडवलेली सुंदर किंकिणी (कंबरपट्टा/घंटी) शोभून दिसत आहे. पाप व दुःखांचा नाश करणाऱ्या, हे श्रीदेवदत्त रूपातील महादेवा! तुझ्याशिवाय या संकटांतून किंवा भवसागरातून मला पार नेणारा दुसरा कोण आहे?
शब्द अन् शब्द वाचला की वरील अर्थ लागतो आणि तो सहज कळतोही.
परंतु, ही शिवस्तुती केवळ पठणापुरती मर्यादित नसून सखोल चिंतन करण्यासारखी आहे. "शिवस्तुती" केवळ शंकराचा महिमा गाणारे स्तोत्र नसून, मध्ययुगीन संप्रदायांचा सांस्कृतिक व आध्यात्मिक इतिहास अतिशय सूचक शब्दांत मांडणारा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे, असे मला मनापासून वाटते.
आता याच कडव्याचा जरा बारकाईने विचार करूया.
"पीतांबरें मंडित नाभि ज्याची । शोभा जडीत वरि किंकिणीची ।"
हे वर्णन मुळात शंकराचे वाटतच नाही! हे सर्व वर्णन तर विष्णूचे वाटते; कारण विष्णू ही राजसिक राहणीमान असलेली देवता मानली जाते, तर शंकर नेहमी दिगंबर, भस्मधारी आणि स्मशाननिवासी!
"श्रीदेवदत्त दुरितांतकारी ।"
ही तिसरी ओळ तर स्पष्टपणे श्रीगुरुदेव दत्तात्रेयांचाच निर्देश करते.
आणि मग चौथी ओळ— "तुजवीण शंभो मज कोण तारी" —पुन्हा एकदा शंकराची अनन्य भक्ती व्यक्त करते.
पहिल्या दोन ओळी विष्णूच्या, तिसरी ओळ दत्ताची आणि शेवटी पुन्हा शंकराची आळवणी! कवीने अशी गुंफण का बरे केली असावी? तुम्हाला काय वाटते?
माझ्या अल्पचिंतनातून मला जे सुचतेय, ते मी मांडते.
पूर्वी शैव आणि वैष्णव या दोन पंथांमध्ये प्रचंड मतभेद आणि वैर होते. मध्ययुगात या पंथांमध्ये समन्वय साधण्याची एक वैचारिक प्रक्रिया जोमाने सुरू झाली. त्यातूनच 'श्रीगुरुदेव दत्त' हे दैवत उदयाला आले आणि लोकमानसात प्रतिष्ठित झाले.
त्या काळातील मध्ययुगीन संप्रदाय आणि त्यांच्या गुरुपरंपरांवर नजर टाकली तर हे स्पष्ट होते:
नाथ संप्रदाय:
या संप्रदायाची मूळ गुरुपरंपरा आदिनाथ (भगवान शिव) यांच्यापासून सुरू होते. आदिनाथांनंतर या परंपरेत भगवान दत्तात्रेय यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यानंतर मत्स्येंद्रनाथ (मच्छिंद्रनाथ) आणि गोरक्षनाथ (गोरखनाथ) यांनी या पंथाचा मोठा विस्तार केला.
दत्त संप्रदाय:
याची मूळ परंपरा आदिगुरू भगवान दत्तात्रेय यांच्यापासून सुरू होते, ज्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश (शिव) यांचे एकत्रित रूप मानले जाते. पुढे श्रीपाद श्रीवल्लभ (पहिला अवतार) आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज (दुसरा अवतार) अशी ही परंपरा पुढे जाते.
संत एकनाथ संप्रदाय:
वारकरी संतांच्या गुरुपरंपरेतही हा समन्वय दिसतो:
आदी नारायण ➔ ब्रह्मदेव ➔ अत्रिऋषी ➔ दत्तात्रेय ➔ जनार्दन स्वामी ➔ संत एकनाथ
तसेच, तांत्रिक साधना करणाऱ्या तत्कालीन पंथांमध्येही पुढे समन्वयवादी विचार वाढीस लागून शिव आणि दत्त या संकल्पनांचे एकत्रीकरण झाले असावे. म्हणूनच, दत्तअवतारात तिन्ही देवांचे रूप एकवटलेले असतानाही 'आदिनाथ' म्हणून शंकराला विशेष स्थान दिले गेले आहे.
एकाच श्लोकात विष्णूचे रूप, दत्ताचे नाव आणि शंकराची हाक आणून कवीने बहुधा हाच 'हरिहर अभेद' आणि संप्रदायिक समन्वयाचा संदेश दिला असावा.
तुम्हाला यावर काही विशेष किंवा वेगळे सुचत असेल, तर नक्की सांगा. मलाही ते जाणून घ्यायला आवडेल.
© डॉ. प्रज्ञा देशपांडे.
#सहजोक्त.
जिवाशिवाची जडली समाधी ।
विटला प्रपंच तुटली उपाधी ।
शुद्धस्वरें गर्जति वेद चारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २४॥
शंकराची अनन्यभावे भक्ती केल्यामुळे जीवाशिवाची समाधी जडली. प्रापंचिक माया कंटाळून सुटून गेली आणि प्रापंचिक उपाध्या संपल्या. चारही वेद शुद्ध स्वराने हेच गर्जत आहेत. हे शंभो, तुझ्या शिवाय मला कोण बरे तारून नेईल?
जिवाशिवाची जडली समाधी ।
•मानवाचा जीव म्हणजे आत्मा.
•शिव म्हणजेच परमात्मा. शैवपंथीय असल्यामुळे त्यांच्यासाठी ब्रम्ह म्हणजे 'शिव' होय.
•पातंजल अष्टांग योगात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान यांनंतरची शेवटची आठवी पायरी म्हणजेच समाधी होय.
समाधी म्हणजे ध्यान साधनेची आणि मानसिक एकाग्रतेची सर्वोच्च अवस्था होय.
जिवाशिवाची जडली समाधी म्हणजे ध्यान साधनेची आणि मानसिक एकाग्रतेची अशी सर्वोच्च अवस्था की ज्यात जीव आणि शिव एक झालेय.
विटला प्रपंच तुटली उपाधी ।
•प्रपंच (प्रपञ्च्यते इति । ) म्हणजे विपर्य्यास, विस्तर , वैपरीत्य, भ्रम, माया, सञ्चय, प्रतारण इत्यादी. तर अशा प्रपंचाचा फोलपणा कळाल्यामुळे जीव विटून गेला, विरक्त झाला.
•उपाधी म्हणजे अशी बाह्य गोष्ट जी एखाद्या मूळ वस्तूवर लादली जाते आणि त्यामुळे त्या मूळ वस्तूचे खरे रूप बदलल्यासारखे भासते. सोप्या शब्दात उपाधी म्हणजे असे आवरण किंवा मर्यादा जिच्यामुळे भ्रम निर्माण होतो. या वाक्याच्या संदर्भाने अर्थ असा की 'मी' जीवात्मा वेगळा आहे आणि ते परम शिवतत्त्व वेगळे आहे, असा भ्रम नाहीसा होतो.
हे दोन्ही वाक्य मिळून हेच सांगितले आहे की शंकराची सोप्यापद्धतीने पण अनन्यभावे भक्ती केली केली , मोक्ष मिळतो.
शुद्धस्वरें गर्जति वेद चारी ।
•चार वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद.
वेद आपल्या चार महावाक्यांमध्ये सारांश सांगतात.
प्रज्ञानं ब्रह्म (ऋग्वेद) – सर्वोच्च ज्ञान हेच ब्रह्म (ईश्वर) आहे.
अहं ब्रह्मास्मि (यजुर्वेद) – मीच तो ब्रह्म आहे.
तत्त्वमसि (सामवेद) – ते परमतत्त्व तूच आहेस.
अयमात्मा ब्रह्म (अथर्ववेद) – हा आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे.
"स्वतःमधील आणि संपूर्ण सृष्टीमधील एकाच ईश्वरी तत्त्वाला ओळखणे, सर्वांशी प्रेमाने व सदाचाराने वागणे आणि आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे" हेच 'शुद्धस्वरें गर्जति वेद चारी ।' यातून सुचविले आहे. कठीण वेदांभ्यासातून जे साध्य होते, ते साध्या शिवभक्तीतून होते.
म्हणून "तुजवीण शंभो मज कोण तारी ॥" ही आर्त आळवणी केली आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
#सहजोक्त.
निधानकुंभ भरला अभंग ।
पहा निजांगें शिव ज्योतिर्लिंग ।
गंभीर धीर सुरचक्रधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २५॥
शंकराच्या अवस्थेचे वर्णन या कडव्यात आहे.
एक एक ओळीचा सविस्तर अर्थ बघू या.
निधानकुंभ भरला अभंग ।
निधान म्हणजे खजिना, निधी, ठेवा, आश्रयस्थान, भांडार वगैरे. निधानकुंभ म्हणजे खजिना किंवा मौल्यवान वस्तू साठवलेला कुंभ. अभंग म्हणजे ज्याला कधीही क्षय नाही, जो अखंड, अविनाशी आणि परिपूर्ण आहे असा. मौल्यवान तत्त्वांनी खचाखच व्यापलेला शंकर!
पहा निजांगें शिव ज्योतिर्लिंग ।
निजांग म्हणजे स्वतःचे मूळ रूप किंवा आत्मस्वरूप. शिव म्हणजे पवित्र.
ज्योतिर्लिंग म्हणजे शिवाच्या सर्वोच्च, स्वयंभू आणि अनंत प्रकाशाचे स्वरूप होय.
"निधानकुंभ भरला अभंग
पहा निजांगें शिव ज्योतिर्लिंग" या दोन्ही ओळीतून शंकराची विशेषणे योजून वर्णन केलेले आहे.
कवी म्हणतात, अखंड आणि अविनाशी असा भरलेला निधानकुंभ, पवित्र असा, आत्मस्वरूपी, स्वयंभू आणि अनंत प्रकाशाचे स्वरूप असलेला शंकर.
गंभीर धीर सुरचक्रधारी ।
याही ओळीत शंकराची तीन विशेषणे आहेत.
गंभीर हा शब्द 'गम्' (जाणे किंवा गती असणे) या मूळ धातूपासून झालाय. संस्कृतमध्ये 'गम् + ईरन्' 'गभीर' आणि अनुस्वारासह 'गंभीर' असे रूप तयार होते.
संस्कृतमध्ये याचा अर्थ 'खोल' किंवा 'अगाध' असा होता. उदा. गंभीर नद किंवा समुद्र ज्याची खोली मोजता येत नाही असा अथांग जलाशय.
काळाच्या ओघात या शब्दाचा वापर मानवी स्वभाव आणि परिस्थिती दर्शवण्यासाठी लाक्षणिक अर्थाने होऊ लागला. ज्याप्रमाणे खोल पाण्याची संथ हालचाल असते, त्याचप्रमाणे जो व्यक्ती चंचल नाही, शांत आणि विचारी आहे तो 'गंभीर'. इथे हे शंकराचे विशेषण आहे.
धीर म्हणजे धैर्यशील. मुळात धीर शब्द दोन प्रकारे निर्माण झाला असे म्हणतात. (1) 'धी' (बुद्धी/ज्ञान) या नामापासून तयार झाला आहे. 'धी' (मूळ धातू ध्ये - विचार करणे) + 'र' (प्रत्यय). याचा शाब्दिक अर्थ 'बुद्धीने युक्त असलेला' किंवा 'विचारशील' असा होतो.
(2) 'धियं राति' (धियं राति रा-क) म्हणजेच 'जो बुद्धी देतो किंवा बुद्धी धारण करतो' तो धीर.
शंकराला दोन्ही विशेषणे लागू होतात.
याच ओळीत अजून एक विशेषण योजले आहे, 'सुरचक्रधारी'.
या श्लोकात सुर शब्द आलाय, सूर नाही. सुर म्हणजे दीप्ति, तेज, ऐश्य, ऐश्वर्य्य इत्यादी तर सूर म्हणजे सूर्य, देवता इत्यादी अर्थ होतो.
खरे तर चक्रधर किंवा चक्रधारी ही विष्णुची विशेषणे आहेत. शंकर कधीच चक्र धारण करणारा नाही. मग 'सुरचक्रधारी' कां म्हटले गेले?
सुदर्शन चक्राबद्दल एक पौराणिक कथा आहे.
जेव्हा भगवान विष्णू वैकुंठ चतुर्दशीला काशी येथे महादेवांची पूजा करत होते, तेव्हा त्यांची भक्ती परीक्षा घेण्यासाठी महादेवांनी एक कमळ पुष्प कमी केले. विष्णूंनी १००० कमळांनी शिवाची पूजा करण्याचा संकल्प केला होता. एक पुष्प कमी पडल्यावर त्यांनी स्वतःचा डोळा- जो 'कमलनयन' असतो- तो अर्पण करण्याचा निर्णय घेतला.
विष्णूंच्या या अगाध भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना दुष्टांचा नाश करण्यासाठी 'सुदर्शन चक्र' प्रदान केले. सर्वप्रथम शंकराने तेजस्वी सुदर्शन चक्र हाती घेऊन विष्णुला दिले. म्हणून तो सुरचक्रधारी आहे.
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥
पहिल्या तीन ओळींत योजलेल्या आठ अलौकिक विशेषणांनंतर, या शेवटच्या ओळीत साधकाचा परिपूर्ण शरणागत भाव प्रकट होतो. जेव्हा माणूस आपल्या अहंकाराचा त्याग करून शंकराच्या या विराट आणि कल्याणकारी स्वरूपाला शरण जातो, तेव्हा 'तुझ्याशिवाय मला या भवसागरातून तारणारा दुसरा कोणीही नाही' हे आत्मनिवेदन आपोआपच ओठांवर येते.
निधानकुंभ भरला अभंग ।
पहा निजांगें शिव ज्योतिर्लिंग ।
गंभीर धीर सुरचक्रधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी
आता या कडव्याचा एकंदरीत अर्थ थोडक्यात असा, पहिल्या तीन ओळींत योजलेल्या आठ अलौकिक विशेषणांनी युक्त असलेल्या, अनंत आणि कल्याणकारी शंकराशिवाय या जगात जिवाला तरून नेणारा दुसरा कोणताही त्राता नाही.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment