23/09/2025 दुसरी माळ.
श्री रेणुका मातेची आरती
परमभक्त विष्णुदास यांनी रेणुकादेवीच्या अनेक आरत्या रचल्या आहेत. रचल्या आहेत, म्हणण्यापेक्षा ध्यानात त्यांना स्फूरल्या, हे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल. आज 👇ही आरती बघू या.
जय जय रेणुके, सदा सदय तू प्रसन्न रूपमूर्ती। । मृगराजाचल पावक अघ नग दाहक महिवर्ती ।
सिद्धसाधु सम पतित पापि नर नमने उद्धरती ।। जय ॥ धृ ।।
दिनरक्षक, जगसाक्ष यश ध्वज चुंबित गगनाला। अति उत्कंठित देवमुनी जन येती नमनाला।
तारिसी त्यांसी वाटे हे मम कौतुक न मनाला ।
उदंड तरती मजसम नर जे दरिते आचरती ।।
जय जय ॥ १ ॥
विषय प्रपंची गुंतनि नर जगी वाया गेले ।।
ते अनुकंपामृतधन वर्षेनि त्या पावन केले।
चंड-मुंड तव शत्रु परंतु मोक्षपदी बसले ।
सांप्रत मजप्रति ताराया का धरिली मनी आढी ती ।। जय जय ।। २ ।।
सन्मुख घट स्थापित, लोंबती सुमनांच्या माळा
कंठी मुक्ताहार कटी शोभतो पीतांबर पिवळा वांच्छिती विधी-हरि-हर त्वदरज लागो तरि भाळा
तव गुणमहीमा भक्त विरामा निशिदिनी मुखी गातो ।। जय जय ।। ३ ।।
नवदिनी नवरात्री पर्वती वाद्य ध्वनी गर्जे
अंब, अंब जगदंब उदय, रव दिग्मंडळी गाजे जगज्जननी हे दीनदयाळे, नाव तुला साजे
विष्णुदास म्हणे, करि करुणालये, करुणा मजवरती ।। जय जय ।। ४ ।।
चार कडव्यांची ही आरती, तशी फारशी प्रचलित नाही. तशी विष्णुदासांची भाषा सोपी आहे, शब्द सुद्धा क्लिष्ट नाहीत. पण काही शब्द आजच्या मराठी प्रचलनात नाही.
जय जय रेणुके, सदा सदय तू प्रसन्न रूपमूर्ती। । मृगराजाचल पावक अघनग दाहक महिवर्ती ।
सिद्धसाधु सम पतित पापि नर नमने उद्धरती ।। जय ॥ धृ ।।
रेणुकेचा विजय असो. तू नेहमीच दयाळू, प्रसन्न, रुपवती आहेस.
सिंह, पर्वत यांना पावन करणारी आहेस. पापराशीचे दहन करणारी आहेस. तसेच संपूर्ण पृथ्वीची संचालिका आहेस.
शरण आलेल्या सिद्ध, साधू, पतित, पापी इत्यादी सर्व मानवांना तू उद्धारते.
दीनरक्षक, जगसाक्ष यशध्वज चुंबित गगनाला।
अति उत्कंठित देवमुनी जन येती नमनाला।
तारिसी त्यांसी वाटे हे मम कौतुक न मनाला ।
उदंड तरती मजसम नर जे दरिते आचरती ।।
जय जय ॥ १ ॥
देवीचा यशस्वी ध्वज दीन रक्षक म्हणजे दुबळ्यांचे रक्षण करणारा, जगाला साक्षीभूत असून गगनाला भिडला आहे.
देव, मुनीजन तुला नमस्कार करायला उत्सुकतेने (आनंदाने) येतात, तू त्यांना तारतेस याचे मला काहीच कौतुक नाही. उलट (भीतीने व्रताचरण करणाऱ्या) माझ्या सारख्या सामान्यलोकांना तू तारून नेतेस , हे खरे कौतुक आहे.
•इथे "दरिते" हा विशेष शब्द आहे. दरित म्हणजे घाबरलेले, भ्यायलेले. दर् = भिणे या अर्थाचा संस्कृत मूळधातू आहे. याच धातूची काही रूपे मराठीत आजही प्रचलित आहेत.
जसे दारा (पत्नी= जिच्या येण्याने भावंडे घाबरतात.)
आदर = हाही भीतियुक्तच असतो.
आदरणीय = भीती असल्या शिवाय शक्यच नसतो.
विषय प्रपंची गुंतुनि नर जगी वाया गेले ।।
ते अनुकंपामृतधन वर्षोनि त्या पावन केले।
चंड-मुंड तव शत्रु परंतु मोक्षपदी बसले ।
सांप्रत मजप्रति ताराया का धरिली मनी आढी ती ।। जय जय ।। २ ।।
विषय आणि प्रपंच यात गुंतून मानव या जगात वाया गेले, त्यावेळी तू अनुकंपा रूपी अमृत धनाची वृष्टी करून पावन केले. चंड- मुंड हे खरे शत्रू होते पण तुझ्या हातून मृत्यु मिळाल्यामुळे मोक्षलाभ झाला. पण सध्या मला तारण्यासाठी कां ग अढी ठेवली मनात?
विष्णुदास रेणुकादेवीशी नेहमीच संवादशैलीत बोलतात.
•रेणुका देवीचे भक्त असो की शत्रू ; दोहोंचाही लाभ झाला. म्हणूनच म्हणतात; मैत्र असो वा वैर हे नेहमी कुलीन, कुलवन्त, खानदानी, घरंदाज लोकांशी करावे.
"ऐ ख़ुदा दुश्मन भी मुझ को ख़ानदानी चाहिए" असे या काळातील राहत इंदोरी म्हणतो, ते उगाच नाही.
• विषय म्हणजे शरीराने उपभोग्य कृती आणि प्रपंच म्हणजे [प्रपञ्च्यते इति । प्र + पचि व्यक्तीकरणे + घञ् । ) विपर्य्यासः । विस्तरः । इत्यमरः ॥ “ विपर्य्यासो वैपरीत्यं भ्रमो वा मायेति स्वामी ॥ “ इति भरतः ॥ =थोडक्यात मायेच्या भ्रमातून निर्माण झालेला पसारा]
सन्मुख घट स्थापित, लोंबती सुमनांच्या माळा
कंठी मुक्ताहार कटी शोभतो पीतांबर पिवळा वांच्छिती विधी-हरि-हर त्वदरज लागो तरि भाळा
तव गुणमहीमा भक्त विरामा निशिदिनी मुखी गातो ।। जय जय ।। ३ ।।
( नवरात्र-उत्सवाची तयारी सुरु झाली), सन्मुख घट बसवला, त्यावर फुलाच्या माळा सोडल्या. रेणुकादेवीच्या गळ्यात मोत्यांची माळ आहे. तसेच तिने पिवळा पितांबर नेसला आहे. विधी म्हणजे ब्रह्मदेव, हरी म्हणजे विष्णु, हर म्हणजे शंकर हे तिन्ही देव तुझ्या चरणाची धूळ, स्वतःच्या भाळी लावायला इच्छितात. तुझ्या गुणांचा महिमा गात रहाणे हाच तुझ्या या भक्ताचा विरंगुळा आहे आणि मी रात्रंदिवस मुखावाटे तुझा महिमा गातोय.
नवदिनी नवरात्री पर्वती वाद्य ध्वनी गर्जे
अंब, अंब जगदंब उदय, रव दिग्मंडळी गाजे जगज्जननी हे दीनदयाळे, नाव तुला साजे
विष्णुदास म्हणे, करि करुणालये, करुणा मजवरती ।। जय जय ।। ४ ।।
नऊ दिवस आणि नऊ रात्री माहूर गडावर वाद्यांचे ध्वनीसोबत , "अंबे, अंबे, जगदंबे तुझा उदय असो" असा आवाज सर्व दिशातून येतोय. रेणुकादेवी, तुला जगाची आई, दीनदयाळू ही नावे शोभून दिसतात.
विष्णुदास म्हणतात, तू करुणालय म्हणजे कारुण्याचे आश्रयस्थान आहेस. मग माझ्यावर करुणा कर.
काल आपण अष्टक बघितले, आज आरती.
वर्ण्य विषय एकच असूनही लेखनात एकसूरीपणा नाही, हे विष्णुदास यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे.
शब्दसंपदेचा सुद्धा अतिप्रचंड संग्रह आहे, त्यांच्यापाशी. आज आपली दुसरी माळ रेणुकाचरणी वाहिली. 🙏🙏
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर.
फारच सुंदर...
ReplyDelete🙏🙏🙏
DeleteKhup ch sunder apratim
ReplyDelete🙏🙏🙏धन्यवाद
Delete