पाचवी माळ २६\०९\२०२५ शुक्रवार .
रेणुका मातेचे अष्टक
आज दूसरे आणि अतिशय आशयघन अष्टक बघू. या आधी सुद्धा जे अष्टक घेतले होते , ते म्हणजे विष्णुदासांची अनुभूती होती . आजचे अष्टक , ही आत्यंतिक तळमळीतून केलेली आर्त विनवणी आहे. अष्टक असूनही यात १३ कडवे आहेत. तेराही कडव्यांची शेवटची ओळ किंवा शेवटचे चरण समान आहे.
हक्काच्या आणि प्राणप्रिय व्यक्तीने अपेक्षा पूर्ण केली नाही किंवा डावलले की अतिशय जास्त वाईट वाटते. स्वतःचा वैताग येतो, त्या नंतरची अवस्था म्हणजे प्राणप्रिय व्यक्ती आणि आपल्या नात्यावरच शंका घ्यायची! शेवटी तिची लाज काढायची! रेणुका ही विष्णुदासांची हक्काची आणि प्राणप्रिय आई आहे. त्यामुळे ते म्हणतात , "लाज याची रेणुके, तुला सारी" .
पतिताची दुरित कृती केली
पतितपावन ही कीर्ति आयकेली
म्हणुनि पडलो येउनी तुझ्या दारी
लाज याची रेणुके, तुला सारी ।। १।।
विष्णुदास म्हणतात , मी अनेक पाप केले ,पतीत झालो. तू पतितपावन आहेस ,अशी कीर्ती ऐकून मी तुझ्या दरी येऊन पडलो. इतके दिवस तुझ्या दारी पडून आहे, याची मला नव्हे , तुलाच लाज वाटायला हवी.
इतके दिवस तुझ्या दारी पडून राहूनही तू उद्धार केला नाहीस. या साऱ्याची लाज तुलाच असायला हवी.
मूळपीठ स्वस्थानि वास केला
सतत जपलो मी नाममालिकेला
बहुत दिन गे, घातली तुझी वारी
लाज याची रेणुके तुला, सारी ॥ २ ॥
परशुरामाची रेणुका ही मातृतीर्थतून उगम पावली , मग गडावर राहायला गेली. 'मातृतीर्थ', हे मूळपीठ आहे. विष्णुदास यांनी मातृतीर्थाजवळ अनेक वर्ष राहून तपाचरण केले. रेणुकेचे ध्यान आणि अखंड जप, व्रत केले. तसेच मातृतीर्थ ते गड अशी वारी खूप दिवस केली. {आज रस्ते उत्तम झाल्यामुळे काही वाटत नाही पण १८ व्या शतकात मातृतीर्थ ते गड असे पायी चलणेही सोपे नसणार } इतके करूनही तू पावत नाहीस याची लाज तुला वाटू दे.
जरी आहे मी स्वार्थी कामसाधू
तरी लोकांनी मानियेले साधू
तुझ्या नावाची दाखवि ती थोरी
लाज याची रेणुके तुला सारी ॥ ३ ॥
तुझ्या दृष्टीने मी अत्यंत स्वार्थी आणि काम साधवून घेणारा असेल पण लोकांनी मला तुझा परम भक्त , साधू मानले आहे . त्यामुळे माझ्यासाठी नाही तर तुझे पतितपावन हे नाव राखण्यासाठी तू दर्शन दे. आणि स्वतःची लाज राख.
नसे ब्रम्हांडी तुझ्या विण कोणी
अता वेगे उडि घालि सुनिवाणी
त्रिविध तापे तापली असे भारी
लाज याची रेणुके तुला सारी ॥ ४॥
तुझ्या शिवाय दुसरे कोणीच या अक्ख्या ब्रह्माण्डात नाही. माझी आर्त विनवणी ऐकून तू वेगाने या (संकटात) उडी घाल. (मला संकटामुक्त कर.) ( ही पृथ्वी/प्रजा) त्रिविध तापाने तापली आहे.
{आता तरी जरा लाज बाळग आणि सत्वर पाव.}
गृही व्यालेली कामधेनू माय
ग्रामलोकांसी ताक मागु काय
कृपण म्हणतिल निर्देवि हा भिकारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥ ५ ॥
आपल्या घरात कामधेनू गोमाता व्यायलेली आहे, आणि आपण गावात ताक मागावे, जे फारच लाजिरवाणे आहे. (माझ्या जवळ तुझ्या सारखी कल्पवृक्ष माता असूनही, मी लोकांचे ताप दूर करू शकत नसेल तर) लोकं मला,' हा वैरागी, भिकारडा' म्हणत असतील तर, याची लाज तुलाच वाटू दे.
जन्मता गाजे सिंहिणिचे तोक
ग्रामसिंहाचे संगे करी शोक
जंबुकाचे भय कंप घे शिकारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥ ६ ॥
सिंहाचा छावा जन्मताच स्वपराक्रमाने गाजत असतो. पण तोच जन्मापासून कुत्र्याच्या संगतीत राहिला तर शेळपट होतो, लांडग्याचीपण भीती कायम त्याच्या डोक्यात बसते. यात सिंहाचा दोष काय?
तसेच माझ्या अगतिकतेची तुलाच लाज वाटायला हवी.
•तोक= अपत्य (तौति पूरयति गृहमिति|)
•ग्रामसिंह= कुत्रा. [ अशा प्रकारचे संस्कृतभाषेत अपशब्दासाठीही अत्यन्त सुसंकृत अनेक शब्द आहेत. जसे वैशाखनंदन, सुकुमारबुद्धी, घृतबुद्धी वगैरे]
होय सर्पाची दासि गरुड-माता
गलंलाने वैद्याचि रडे कांता
समर्थाचा आश्रीत करी चोरी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥७॥
(कर्ती करविती रेणुका असून जर जगात सज्जनांना त्रास होत असेल जसे की) गरुडाची आई सापांची दासी झाली. नवरा वैद्य असून, बायको व्याधीने रडते. समर्थ व्यक्तीचा आश्रित असून चोरी करतो. तर जगन्नियंती माते, तुला या सर्वांमुळे स्वतः चीच लाज वाटायला हवी.
तुझ्या नामी विश्वास अल्प नाही
म्हणुनि धावे दुष्कीर्ति कल्पना ही
पतित पापी मी परम दुराचारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥ ८॥
तुझ्या नामस्मरणावर थोडासाही भरवसा नाही. म्हणून डोक्यात तुझ्याबद्दल कुप्रसिद्धीच्या कल्पना येतात. मी साशंक होतो, आणि म्हणून मी फारच वाईट आचरण करतो, पापी होतो.
पण या साऱ्याची लाज तुलाच वाटायला हवी करण कर्ती करविती तूच आहेस.
तुझ्या चरणाची भेट घ्यावी वाटे
परि नेते प्रारब्ध आडवाटे
गळा पडली दृढ संचिताचि दोरी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥ ९ ॥
तुझ्या चरणाची भेट घ्यावी असे मनात येते पण माझे संचित (प्रारब्ध) मला तुझ्या पर्यंत न नेता भलत्याच मार्गाने नेते. अशा तऱ्हेने संचितकर्माच्या मोठं मोठ्या गाठी पडल्या आहेत. यात तुलाच लाज वाटायला हवी.
अहा ! दारिद्रये पीडित गृह-द्वारा
कर्जदारहि धावोनि येती दारा
त्यात रोगाची दाटली उभारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥ १० ॥
माझ्यामुळे फार मोठ्या आर्थिक विपन्नावस्थेत माझी गृहिणी पडली. कर्जदार देखील घरावर धाड मारतात. त्यात रोगाने उचल खाल्ली.
माझ्या या दुर्दैशेमुळे तुला स्वतःची लाज वाटायला हवी.
चलित दिवसाची साथि काकि मामी
परी निर्वाणी कुणि न ये कामी
निर्धनाची मानिती ते शिसारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥ ११ ॥
(सुख के सब साथी, दुःख में ना कोई, याच अर्थाचे हे 👇 कडवे) चांगल्या दिवसात काकी, मामी वगैरे साथ देतात पण दिवस फिरले की कोणीच साथ नसते. कठीण समय येता कोण कामास येतो? हेच खरे, नाही कां? निर्धन नातेवाईक, कोणालाच नको. सर्वांनाच त्याचा तिटकारा असतो. पण याची लाज रेणुके तुलाच असायला हवी.
पहा बुडतो मी दुःखसागरांत
कशी बसलिस तू स्वस्थची घरात
कृपावंते ही विनंती अवधारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥ १२ ॥
मी इथे दुःख सागरात बुडालो आहे, तू मात्र तुझ्या स्थानी स्वस्थ बसून आहेस. तू तर कृपाळू आहेस, मग माझी विनवणी कां मानत नाहीस? थोडी तर लाज बाळग.
सर्व माझे अजि हारले उपाय
म्हणुनि अंबे धरियले तुझे पाय
विष्णुदासाची दीनजननी, तारी
लाज याची रेणुके, तुला सारी ।। १३ ।।
माझे सर्वच उपाय आज हरले. आता अंबा बाई मी तुझे पाय धरतो. तू दीनाची, या विष्णुदासा ची आई आहेस. आता तरी लाज राख. मला या सर्व संकटातून बाहेर काढ.
हे अष्टक म्हणजे आईसमोर मांडलेले गाऱ्हाणे, तक्रार आहे. आईशिवाय कोणावरच सत्ता चालत नाही. आईला मात्र भावनिक होत रडत-पडत काहीही बोलता येते.
हे अष्टक त्यांचे उदाहरण आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर
लेख पूर्ण वाचून झाला की कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट नक्की करा, कृपया.
आणि तुम्हाला माझे ब्लॉग लेखन आवडत असेल तर माझ्या नावसह ही link शेयर करायला विसरू नका.
नमस्कार जगदंब.परममातृभक्त विष्णुकवी महाराज म्हणजेच परमहंस परिव्राजकाचार्य पुरूषोत्तमानंद सरस्वती महाराज मातापुर म्ह.माहूरगड यांनी भगवती रेणुकेवर केलेल्या रचना या इतक्या रसाळ मधाळ व मी लेकरू तू माय रेणुके या भावातून आहेत. सरस्वतीकृपाप्रसादा सौ.प्रज्ञाताई देशपांडे नागपूर यांनी उत्कृष्ट चिंतन यावर मांडले आहे निश्चितच सर्व रेणुका भक्तांना याचा रसास्वाद आनंदाची पर्वणी ठरेल यात शंकाच नाही.निलेश वसंत केदार वेदाध्ययन ज्ञानपीठ ब्राह्मण गल्ली माहूरगड जिल्हा नांदेड 9823630701
ReplyDelete🙏🙏🙏🙏 जगदंब 🙏🙏🙏
Deleteखुपच छान विवेचन
Deleteखूप सुंदर विवेचन केले.. छान..
ReplyDelete🙏🙏
Deleteधन्यवाद
Deleteखूपच छान मॅडम!खरच एवढं प्रगल्भ चिंतन करून लेखन करणं सहजोक्त व्यक्त होणं हे फक्त तुम्हींच करू शकता!जय माता दी!जय जगदंब!
ReplyDelete🙏🙏धन्यवाद
Deleteखूप सुंदर विवेचन.... मॅडम तुम्ही फार सुरेख लिहिता .
ReplyDelete🙏🙏धन्यवाद
DeleteKhupach sunder
ReplyDeleteधन्यवाद
Delete