🙏🙏आठवी वी माळ 29/09/2025🙏🙏
पद
आज आपण विष्णुदासांचे एक पद पाहू.
आम्ही चुकलो जरी तरी काही।
तू चुकू नको अंबाबाई ।। धृ. ।।
तुझे नाव 'आनंदी' साजे ।
तुझा महिमा त्रिभुवनी गाजे।
तुझे सगुणरुप विराजे।
तुला वंदिति सन्मुनि, राजे।
गुण गाति वेदशास्त्रेही ।। आम्ही० ॥ १ ॥
धृपद आणि पहिले कडवे अतिशय सोपे आणि प्रत्येक दोन चरणान्ती यमक जुळविले आहे. जसे काही-बाई, साजे-गाजे-विराजे-राजे,
शास्त्रेही -काही-बाई. या कडव्यातील सर्वच शब्द अतिशय सोपे आहेत, अर्थ लगेच कळतो, वेगळ्या स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही.
आम्ही अनाथ, दीन भिकारी
तू समर्थ, प्रभु, अधिकारी।
आम्ही पतित पातकी भारी।
तू पावन भव संभारी
तू पर्वत, आम्ही रजराई ॥ आम्ही० ॥ २ ॥
याही कडव्यात यमक आहेच. शब्द सोपेच आहे.
काही शब्दांचे फक्त अर्थ सांगते.
•दीन= गरीब
•प्रभु = मालक, स्वामी
•संभारी= आधार असलेली. सम्पन्नता, ऐश्वर्य असलेली.
•रजराई= अतिशय सूक्ष्म धुळी-कण.
आम्ही कुपुत्र म्हणवून घेऊ ।
तू नको कुमाता होऊ।
आम्ही विषय-ढेकळे खाऊ।
तू प्रेमामृत दे खाऊ ।
आम्ही रांगू तू उभि राही ।। आम्ही० ॥ ३॥
आम्ही कुपुत्र म्हणजे लायकी नसलेले पण तुझे पुत्र आहोत. पण तू मात्र वाईट आई नको होऊ.
आम्ही विषयरूपी ढेकूळ (मातीचा वेडावाकडा खडा) खाणारी [लहान मुले मातीची ढेकळे खात असत, जुन्या काळी] तू मात्र प्रेमाने अमृत रूपी खाऊ खायला दे.
आम्ही रांगत रांगत चालतो, तू फक्त उभी राहून आम्हाला बघ, सांभाळ.
{देव्यपराधक्षमापन स्तोत्रात म्हटले आहे,
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति॥
मुलगा वाईट निपजू शकतो पण आई कधीच वाईट नसते.
हे कडवे वाचून या श्लोकाचे स्मरण झाले. अगदी हाच आशय विष्णुदासांनी व्यक्त केलाय.}
आम्ही केवळ जडमूढ प्राणी।
चैतन्यस्वरूप तू शहाणी।
फट् बोबडी आमुची वाणी।
तू वदू नको आमुच्या वाणी।
आम्हा रडु, तू गाणे गाई ।। आम्ही० ।। ४ ।।
आई आणि मुलातील फरक तीव्र विरुद्ध शब्दांत सांगितला आहे. जसे मुले जडमूढप्राणी तर आई साक्षात चैतन्यरूप.
आम्ही बोबडे बोलतो, तू (चौथी वाचा बोलणारी) आमच्या सारखी बोबडी बोलू नकोस.
आमचे बोलणे म्हणजे सतत रडगाणे मात्र तुझे बोलणे मधुर गीत होय.
आम्ही चातक तुजविण कष्टि।
तू करि कृपामृतवृष्टि।
म्हणे विष्णुदास धरि पोटि।
अपराध आमुचे कोटि ।
अशि आठवण असू दे हृदयी ।। आम्ही० ॥ ५ ॥
आम्ही चातक, तू दिसली नाहीस की कष्टी होतो, तू तुझ्या कृपेचा आमच्यावर वर्षाव कर.
विष्णुदास म्हणतात आई गं, तू आमचे कोट्यानुकोटी अपराध पोटात घे आमची आठवण कायम तुझ्या हृदयात राहु दे.
आज आपली आठवी माळ विष्णुदास यांच्या कवित्वाला आणि रेणुका देवीला समर्पित केली.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर
लेख पूर्ण वाचून झाला की कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट नक्की करा, कृपया.
आणि तुम्हाला माझे ब्लॉग लेखन आवडत असेल तर माझ्या नावसह ही link शेयर करायला विसरू नका. 😊
खूप छान ताई...मुलगा वाईट असू शकतो पण आई कधीच वाईट असू शकत नाही. मनाला भावलं...
ReplyDeleteधन्यवाद
DeleteVery true
ReplyDeleteधन्यवाद, सखी
DeleteChhan,uttam
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteवा!खूप छान मॅडम! मुलगा वाईट असू शकतो पण आई कधीच वाईट असू शकत नाही. सोप्या शब्दात खूप छान अर्थ सांगितला मला!
ReplyDeleteधन्यवाद
Deleteअप्रतिम 👌👌
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूप छान. खरच आई कधीच वाईट नसते. मुलाचे शेकडो अपराध ती पोटात घेते. तीच भावना आहे इथे.
ReplyDelete