#सहजोक्त.
पहिल्या श्रावण सोमवार पासून आपण एक एक स्तोत्र वाचत आलोय.
आजपासून त्या वाचलेल्या स्तोत्राचा अर्थ, स्पष्टीकरण, रसग्रहण वगैरे बघू या.
आपला चतुर्मास सहज पूर्ण जाईल यात. चालेल ना?
"कैलासराणा शिवचंद्रमौळी" परंपरेने चालत आलेले, अज्ञात कवीचे स्तोत्र. अनेकांना मुखोद्गत आहे. अनेकांना अर्थदेखील माहितीच आहे.
तरी परत एकदा अर्थ समजून घेऊ या.
"तुजवीण शंभो मज कोण तारी" हे वाक्य जणू कॅची वन लाईनर आहे! ही ओळ प्रत्येक कडव्याचे शेवटचे चरण आहे. "मला तारणारे,तुझ्या शिवाय दुसरे कोणीच नाही रे बाबा!" असे शंकराला आळवले आहे, प्रत्येक कडव्यात.
कैलासराणा शिवचंद्रमौळी ।
फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १॥
साधे सोपे शब्द. रचना सुद्धा सरल आणि रसाळ. मौळी - झळाळी, हारी-तारी असे यमक साधले आहे. साध्या शब्दातून शंकराची मूर्ती डोळ्यासमोर उभी केलीय, रचनाकाराने, नाही कां?
•कैलासराणा =कैलास पर्वताचा राणा म्हणजे राजा.
•शिव =म्हणजे पवित्र, पावन.
•चंद्रमौळी= म्हणजे चंद्र ज्याच्या माथ्यावर विराजित आहे तो. आता विषय असा की पवित्र चंद्र की चंद्र धारण केलेला पवित्र शंकर की पवित्र चंद्र धारण केलेला पवित्र शंकर? तुम्ही विचार करा, कारण सामासिक शब्दाचा विग्रह विवक्षेनुसार होतो.
•फणींद्र= फणी म्हणजे फणा उगारून जिभा बाहेर काढलेला नाग. इंद्र म्हणजे प्रमुख. फणींद्र म्हणजे नागांचा प्रमुख.
वेणीफणीतील फणी शब्द सुद्धा फणा शब्दापासून तयार झालाय. (विंचरण्याच्या) फणीला दात असतात. अनेक फणा असलेला नागराज जसा असतो, तसा कंगव्या/ फणी मध्ये अनेक दात असतात.
•माथा = म्हणजे भाळ, कपाळ. आताशा हा शब्द व्यावहारिक मराठीत कमी वापरतात.
•मुकुटी झळाळी = मुकुट. मुकुटावर तेज. आजकाल झळाळी शब्द सुद्धा जरा विस्मरणात गेलाय. झगमग, झगमगाट , ब्राईटनेस (ब्राईटनेसपणा 😊 सुद्धा ) वगैरे शब्द जास्त वापरल्या जातात.
माथ्यावर असलेल्या नागराज मुकुटासारखा लखलखतो आहे.
•कारुण्यसिंधू = सामासिक शब्द. दयेचा सागर
•भवदुःखहारी = शंकर या शब्दाला पर्यायी शब्द 'भव' सुद्धा आहे. भव आणि त्याची भवानी.
पण इथे 'भव' म्हणजे ही अस्तित्वात असलेली सृष्टी. हा संसार, ही सृष्टी, दुःखज आहेच. कष्टाशिवाय कोणतेही सर्जन होऊच शकत नाही. भवदुःखाचे हरण फक्त शंकरच करू शकतो.
म्हणूनच कवी म्हणतो, तुजवीण शंभो मज कोण तारी🙏
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
1/09/26 मंगळवार.
#सहजोक्त.
आज दुसरे कडवे बघू. "तुजवीण शंभो मज कोण तारी" ही ओळ प्रत्येक कडव्याच्या शेवटी आहेच.
रवींदु दावानल पूर्ण भाळीं ।
स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी ।
ब्रह्मांडधीशा मदनांतकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २॥
•रवींदु = रवी म्हणजे सूर्य आणि इंदु म्हणजे चंद्र.
शंकराचे दोन नेत्र आहेत.
•दावानल पूर्ण भाळी = म्हणजे भडकलेला अग्नी, जो शंकराच्या पूर्ण कपाळभर पसरलेला तिसरा डोळा आहे.
•स्वतेज नेत्रीं = स्वतः शंकराच्या डोळ्यातील तेज. सूर्य, चंद्र आणि अग्नी हे स्वयंप्रकाशी आहेत.
•तिमिरौघ जाळी= तिमिर म्हणजे अंधार. अंधाराचे ओघ जाळणारे तिन्ही डोळे.
•ब्रह्मांडधीशा = अखिल ब्रह्मांड ज्याच्या अधीन आहे, असा शंकर.
•मदनांतकारी= मदनाचा अंत करणारा. (लवथवती विक्राळा... या आरतीत ही संकल्पना सविस्तर स्पष्ट केली आहे.)
कोपीष्ट शंकराने डोळ्याने,मदनाचे म्हणजे कामदेवाचे शरीर जाळले परंतु त्या नंतर रती म्हणजे मदनाच्या पत्नीला वर दिला की मदन शरीराने नाही तर मनात जिवंत राहील. तेव्हा पासून मदन ऊर्फ कामदेवाला अनंग म्हणतात.
याही कडव्यात यमक अलंकार आहे.
मराठी व्याकरणात यमकाला 'अंत्यमिलन' असेही म्हणतात. जेव्हा कवितेच्या चरणात किंवा ओळीच्या शेवटी (किंवा एकाच ओळीत) सारखे उच्चार असलेले पण वेगवेगळे किंवा भिन्न अर्थ असणारे शब्द पुन्हा पुन्हा येतात, तेव्हा यमक अलंकार होतो. हा एक शब्दालंकार आहे, ज्यामुळे कवितेला किंवा पद्याला एक गोड नाद व सौंदर्य प्राप्त होते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
#सहजोक्त.
आज तिसरे कडवे बघू. दिसायला सोपे आहेच. परंतु चिंतन केले की सखोलता जाणवते.
जटा विभूती उटि चंदनाची ।
कपालमाला प्रित गौतमीची ।
पंचानना विश्वनिवांतकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३॥
पहिले शब्दार्थ बघू
•जटा = वाढलेले डोक्यावरचे केसं.
•विभूती = चिताभस्म
•उटी चंदनची = चंदनाची उटी
•कपाळमाला = कपाल म्हणजे मुखवट्याची कवटी
नागपुरी मराठीत खोपड़ी.
•प्रीत गौतमीची= गोदावरी नदीला दक्षिण गंगा किंवा गौतमी म्हटले जाते, जी शिवाच्या जटेत वास करते.
•पंचानना = शिवपुराणानुसार भगवान शंकराची पाच मुख्य रूपे किंवा मुखे आहेत. 👇
1) ईशान (आकाश तत्त्वाचे प्रतीक)
2) तत्पुरुष (वायू तत्त्वाचे प्रतीक)
3) घोर / अघोर (अग्नि तत्त्वाचे प्रतीक)
4) वामदेव (जल तत्त्वाचे प्रतीक)
5) सद्योजात (पृथ्वी तत्त्वाचे प्रतीक).
ही पाच मुखे निसर्गातील पाच मूलभूत घटकांचे (पृथ्वी, जल, अग्नी , वायू आणि आकाश) प्रतिनिधित्व करतात.
सृष्टीची निर्मिती, पालन, संहार (नाश), तिरोभाव आणि अनुग्रह हे पाच कार्ये या पाच मुखांद्वारे चालतात, म्हणून शंकराला पंचानन म्हटले जाते.
•विश्वनिवांतकारी = विश्वाला म्हणजे अखिल ब्रह्माण्डाला निवांत करणारा, आराम देणारा शंकर.
शंकराची शब्दमूर्ती साकारताना कवी म्हणतात.....
जटा धारण करणारा, चिताभस्म फासलेला, चंदनची उटी लेपलेला तसेच डोक्यावर प्रेमाने गंगा धारण केलेला, गळ्यात नरमुंडमाळा धारण करणारा पंचानन म्हणजे पाच मुख असलेला शंकर. अशा शंकराशिवाय मला कोण बरे तारून नेईल?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
#सहजोक्त.
रामदास स्वामी विरचित,'लवथवती विक्राळा' आरती आणि अज्ञात कवीने रचलेली ही 'शिवस्तुती'. वर्ण्य विषय सामान असल्यामुळे या दोहोंच्या वर्णनामध्ये बरेचसे साम्य आढळते.
जसे पंचानन, मदनान्तकारी, मदनारी वगैरे...
आजचे चौथे कडवे बघा ना.
वैराग्ययोगी शिव शूलपाणी ।
सदा समाधी निजबोधवाणी ।
उमानिवासा त्रिपुरांतकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ४॥
•वैराग्ययोगी =
वैराग्य शब्दाची व्युत्पत्ती पुढील प्रमाणे -
वि (उपसर्ग) + रञ्ज/रंज् (धातू) + घञ् (प्रत्यय) = विराग
'विराग' या शब्दाला 'ष्यञ्' किंवा 'अण्' प्रत्यय लागून 'वैराग्य' हा शब्द तयार होतो (विरागस्य भावः इति वैराग्यम्.
"दृष्टानुश्रविकविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यम्" (१.१५ पतंजली योगसूत्र ) – म्हणजेच पाहिलेल्या (इहलोकातील) आणि ऐकलेल्या (परलोकातील) सर्व भोगांबद्दल कोणतीही तृष्णा किंवा इच्छा न राहणे म्हणजे वैराग्य होय.
'राग' म्हणजे आसक्ती आणि 'वैराग्य' म्हणजे आसक्तीचा संपूर्ण अभाव (अनासक्ती).
योगी = 'योग' हा शब्द संस्कृतमधील 'युज्' या धातूपासून बनला आहे. 'युज्' चा अर्थ जोडणे, एकत्र करणे, युक्त होणे, किंवा मन एकाग्र करणे असा होतो.
संस्कृत व्याकरणानुसार 'योग' या शब्दाला 'इन्' (किंवा इनि) प्रत्यय लागून 'योगिन्' (Yogin) हा मूळ प्रातिपदिक (base) शब्द तयार होतो. त्याची प्रथमा विभक्ति म्हणजे योगी शब्द.
• शिव = मोनियर-विलियम्स संस्कृत शब्दकोशानुसार 'शिव' (शिव:) या विशेषणाचा शब्दशः अर्थ 'शुभ', 'अनुकूल', 'दयाळू' किंवा 'मैत्रीपूर्ण' असा आहे. आणि महादेव शंकर तसेच आहेत.
• शूलपाणी =' शूलं पाणौ यस्य सः' (संस्कृत विग्रह).
"ज्याच्या हातात त्रिशूळ आहे असा तो". (बहुव्रीहि समास) भगवान शिव नेहमी आपल्या हातात त्रिशूळ धारण करत असल्यामुळे त्यांना 'शूलपाणि' म्हटले जाते.
• सदा समाधी = शंकर भगवान नेहमी समाधी अवस्थेत असतात.
• निजबोधवाणी = ज्याची वाणी नेहमी आत्मज्ञानातून निपजते, असा शंकर.
•उमानिवासा = उमा हीच ज्याचे निवासस्थान आहे, असा शंकर. "हम आप के दिल में रहते हैं" असे जे म्हणतात, त्याच्याही ऍडव्हान्स अवस्थेचे वर्णन "उमानिवासा" या शब्दातून केले आहे.
आपल्या अर्धांगिनीच्या रोमारोमात आपण असावे आणि आपण तिचा रोमरोम जाणून वागावे, या शिवाय अधिक सफल्य दाम्पत्यजीवनाचे कशात असेल बरे?
•त्रिपुरांतकारी = याची मोठी रंजक कहाणी आहे.
पौराणिक कथांनुसार तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली नावाच्या तीन अत्यंत शक्तिशाली असुर (राक्षस) भावांचा समूह म्हणजे त्रिपुरासूर. ते तिघेही महाभयानक राक्षस तारकासुराचे पुत्र होते. शिवपुत्र कार्तिकेयाने तारकासुराचा वध केल्यानंतर, त्याच्या या तिन्ही पुत्रांनी देवांचा बदला घेण्याचा निश्चय केला.
बदला घेण्यासाठी या तिन्ही भावांनी जंगलात जाऊन ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली. त्यांची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव प्रसन्न झाले. अमरत्वाचा वर मिळणे अशक्य असल्याने त्यांनी ब्रह्मदेवाकडून एक विशेष वर मागून घेतला.
त्यांनी स्वतःसाठी तीन अभेद्य आणि उडणारी नगरे (किल्ले) मागितली.
मय दानवाने (असुरांचा शिल्पकार) त्यांच्यासाठी ही तीन नगरे तयार केली. तारकाक्षासाठी सोन्याचे, कमलाक्षासाठी चांदीचे आणि विद्युन्मालीसाठी लोखंडाचे नगर बनवण्यात आले. या तीन नगरांमुळेच त्यांना एकत्रितपणे 'त्रिपुरासूर' (तीन पुरांचा/नगरांचा असुर) असे नाव पडले.
ही तिन्ही नगरे वेगवेगळ्या दिशेला आणि आकाशात फिरत असत. हजार वर्षांतून फक्त एकदाच (एक क्षणासाठी) ही तिन्ही नगरे एका सरळ रेषेत येणार होती. ब्रह्मदेवाच्या वरानुसार, जेव्हा ही तिन्ही नगरे एका रेषेत येतील आणि जो कोणी एकाच बाणाने या तिन्ही नगरांचा वेध घेईल, त्याच व्यक्तीच्या हातून त्रिपुरासुराचा वध होऊ शकत होता.
हे वरदान मिळाल्यामुळे त्रिपुरासूर प्रचंड उन्मत्त आणि शक्तिशाली बनले. त्यांनी तिन्ही लोकांवर (स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ) ताबा मिळवला आणि देव, ऋषी-मुनी व मानवांवर अनन्वित अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अभेद्य किल्ल्यांमुळे देवांनाही त्यांचा पराभव करणे अशक्य झाले होते. अखेर त्रस्त होऊन सर्व देव भगवान शिवाच्या शरण गेले.
हजार वर्षे पूर्ण झाल्यावर तो दुर्मिळ क्षण आला, जेव्हा ही तिन्ही उडणारी नगरे आकाशात एका सरळ रेषेत आली. त्रिपुरासुराचा संहार करण्यासाठी सर्व देवांनी मिळून भगवान शिवासाठी एक भव्य दिव्य रथ आणि अस्त्रे तयार केली.
मेरू पर्वताचे धनुष्य, वासुकी नागाची दोरी (प्रत्यंचा) आणि स्वतः भगवान विष्णू हे त्या धनुष्याचा बाण बनले.
जशी ही तिन्ही शहरे एका रेषेत आली, तशी भगवान शिवांनी अत्यंत अचूकपणे एकच दिव्य बाण सोडला आणि त्या एकाच बाणाने तिन्ही नगरे जळून खाक झाली आणि त्रिपुरासुराचा अंत झाला.
म्हणून तेव्हा पासून शंकराला त्रिपुरारी, त्रिपुरान्तकारी वगैरे म्हणतात.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
#सहजोक्त.
आज पाचवे कडवे बघू.
या शिवस्तुतीचे एक वैशिष्ट्य म्हणजे यातील उपमा, विशेषणे वगैरेच्या पाठीमागे कथा आहे. कडव्यातील शब्द तसे सोपे आहेत, समजतात, कथाही ऐकलेल्या असतात. पण तो शब्द, आणि त्या मागची कथा यांचे एकत्र संकलन वाचणे रोचक ठरते.
उदार मेरू पति शैलजेचा ।
श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा ।
दयानिधी जो गजचर्मधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ५॥
•उदार मेरू = शंकराला उपमा दिलीय मेरू पर्वताची. मेरू पर्वताला "उदार मेरू" असे विशेषण देण्याचे मुख्य कारण त्याचे अथांग दातृत्व, विशालता आणि विश्वाला सामावून घेण्याची वृत्ती हे आहे. पौराणिक कथा आणि संतांच्या साहित्यात (उदा. संत ज्ञानेश्वरांच्या रचनांमध्ये) मेरू पर्वताला त्याच्या स्थिरतेसाठी आणि समृद्धीसाठी अत्यंत आदराचे स्थान दिले गेले आहे.
मेरू हा केवळ एक पर्वत नसून तो सोन्याचा आणि मौल्यवान रत्नांचा बनलेला मानला जातो. या पर्वताने ३३ कोटी देवता, गंधर्व, यक्ष आणि अप्सरा यांना स्वतःवर आश्रय दिला आहे. सर्वांना सामावून घेण्याच्या या गुणामुळे त्याला 'उदार' म्हटले जाते.
पौराणिक समजुतीनुसार, स्वर्गातून पृथ्वीवर येणारी गंगा नदी सर्वप्रथम मेरू पर्वताच्या शिखरावर पडते आणि तिथून तिचे चार प्रवाह होऊन ते संपूर्ण विश्वाला जीवनदान देतात. विश्वाचे पालनपोषण करणाऱ्या पाण्याचा तो मुख्य स्त्रोत असल्याने त्याला उदार मानले गेले आहे.
संत साहित्यात मनाची विशालता आणि अढळ भक्तीची तुलना मेरू पर्वताशी केली जाते. जो स्वतःपाशी असलेले सर्व काही (ज्ञान, संपत्ती, आश्रय) जगासाठी मुक्तहस्ते देतो, तो 'उदार मेरू'.
उपमा अलंकार साधार्म्य असलेल्या दोघांमध्ये होतो. आता मेरू पर्वताचे गुणधर्म सांगितले. तुम्ही चिंतन करा की शिव यांच्यात कोणते सामान गुण आहेत?
•पति शैलजेचा = पार्वतीचा पती शंकर. पार्वती, शैलजा, गिरीजा हे शब्द हिमालयाची कन्या असल्यामुळे समानार्थी वाटतात.
पण तसे नाही.
दगडांचे बनलेले विशाल डोंगर म्हणजे शैल. उंच टोकदार असेल तर गिरी.
आणि अशा 'शैल' युक्त, उंच टोकदार (गिरी) शिखरांच्या रांगांना म्हणजे अथांग विस्ताराला भौगोलिक भाषेत 'पर्वत' म्हटले जाते.
शैलची कन्या शैलजा. , गिरीची कन्या गिरीजा, पर्वताची कन्या पार्वती.
•श्रीविश्वनाथ = ज्याच्या शिवाय खालील विश्व अनाथ होते, तो विश्वनाथ. वाराणसीमध्ये राहणारा शंकर.
•म्हणती सुरांचा = देवांचा विश्वनाथ. जगाला सांभाळणारे देव. आणि देवांसह जगाला सांभाळणारा महादेव.
•दयानिधी = दयेचा सागर. जगाच्या दयेपोटी हलहल विष प्यायले तो नीलकंठ शंकर
•जो गजचर्मधारी= शंकर नेहमी हत्तीचे कातडे नेसतो, गुंडाळतो.
आज पाचवे कडवे झाले.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
Great effort to help readers understand meaning of strotras in depth
ReplyDelete