Wednesday, September 23, 2026

शिवस्तुती - कैलासराणा - भाग 2

 



#सहजोक्त.

मराठीतील ही शिवस्तुती वाचल्या बरोबर तसा अर्थ कळतोच. 

"साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे,

नित्याच्या अवलोकने जन परि होती पहा आंधळे!" 

असे म्हणतात, ते खोटे नाही. रोज म्हणायचे म्हणून बरेच जणं शिवस्तुती म्हणतात. पण जसं जसे सखोल चिंतन करावे तसं तसे अर्थाचे पदर उलगडत  जातात. आता हेच कडवे बघा. 

गंगानदीच्या पवित्र तिरावर तारक ब्रह्ममंत्र आहे. हे विश्वेशा, विश्वंभरा त्रिलोचना, हे शंभो, तुझ्याशिवाय मला कोण बरे तारेल? 

इतका सरळ अर्थ आहे.

 चला कडवे वाचू, त्यानंतर सविस्तर अर्थ पाहू. 


भागीरथी तीर सदा पवित्र ।

 जेथें असे तारक ब्रह्ममंत्र ।

विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी ।

 तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १३॥


या कडव्यातील शब्दांच्या मागे एक मोठी पौराणिक पार्श्वभूमी आहे, ती थोडक्यात समजून घेऊया..." 

            गंगावतरण  कथा.

•गंगानदीला भागीरथी म्हणतात. त्यामागे गंगावतरण  कथा आहे. ती अशी, 

मुळात गंगेचा उगम भगवान विष्णूंच्या चरणांतून झाला  असे मानतात.  पण तिचे संगोपन ब्रह्मदेवांनी आपल्या कमंडलूत केले. त्यामुळे गंगा ही ब्रह्मदेवांची मानसकन्या किंवा कमंडलूत निवास करणारी मानली जाते. तसेच, जेव्हा गंगेला पृथ्वीवर जाण्याचा शाप मिळाला, तेव्हा तिला पृथ्वीवर पाठवण्याची योजना ब्रह्मदेवांनीच आखली होती.

इक्ष्वाकु वंशातील अयोध्यानिवासी भगीरथ हे एक महान राजे होते. त्यांच्या पूर्वजांना म्हणजे राजा सगराच्या ६०,००० पुत्रांना,  कपिला मुनींच्या शापापासून मुक्त करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला सद्गती देण्यासाठी भागीरथांनी ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांनी भागीरथाला गंगा पृथ्वीवर पाठवण्याचा वर दिला.

ब्रह्मदेवाच्या वरदानानंतर गंगा पृथ्वीवर अवतरली. भागीरथाच्या अपार कष्टामुळे आणि तपश्चर्येमुळे गंगा पृथ्वीवर आली, म्हणून गंगेला 'भागीरथी' (भगीरथाची कन्या) असे नाव पडले. गंगेने भागीरथाच्या पूर्वजांचा उद्धार केला. 

स्वर्गातून पृथ्वीवर पडण्याचा, गंगेचा वेग एवढा प्रचंड होता की ती थेट पृथ्वीवर आली असती तर पृथ्वीचा विनाश झाला असता. म्हणून गंगेचा वेग नियंत्रित करण्यासाठी भगीरथाने भगवान शंकराची आराधना केली. शंकराने भगीरथाच्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि गंगेला आपल्या जटेत सामावून घेण्याचे मान्य केले.

जेव्हा गंगा स्वर्गातून अत्यंत वेगाने खाली आली, तेव्हा भगवान शंकराने तिला आपल्या जटांमध्ये (केसांमध्ये) बांधून घेतले. गंगेचा अहंकार मोडून काढण्यासाठी त्यांनी तिला जटेत अडकवून ठेवले. नंतर भगीरथाच्या विनंतीवरून त्यांनी जटेतील एक लहान धार गंगोत्री येथे पृथ्वीवर सोडली. त्यामुळे शंकराला 'गंगाधर' असेही म्हटले जाते.


                तारक ब्रह्ममंत्र.

 पौराणिक मान्यतेनुसार, काशीमध्ये मरण पावणाऱ्या प्रत्येक जीवाच्या उजव्या कानात भगवान शिव स्वतः  'तारक ब्रह्ममंत्र'  म्हणजे राम नाम फुंकतात आणि त्याला मोक्ष मिळवून देतात. 

 वाराणसी (काशी) येथील गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेले मणिकर्णिका घाट हे यासाठी सर्वात पवित्र स्थान मानले जाते.

'तारक ब्रह्ममंत्र' म्हणजे दुसरे काही नसून "राम" नाम किंवा "राम रामाय नमः" हा षडाक्षरी मंत्र आहे.

संत नामदेवांच्या अभंगातही याचा उल्लेख आढळतो. जसे 

"तारक ब्रह्ममंत्र रामनाम जाण । 

विश्वनाथ श्रवण करीतसे ॥"

 

              •विश्वेश (विश्व + ईश)

विश्वाचा स्वामी किंवा जगाचा ईश्वर.

हे विशेषण शिवाची सर्वोच्च सत्ता दर्शवते. या विश्वाची निर्मिती, संचालन आणि शेवटी त्याचा लय (विनाश) करण्याची अंतिम शक्ती शिवाकडे आहे. ते संपूर्ण विश्वाचे राजे आणि रक्षक आहेत, हे या नावातून स्पष्ट होते.

         • विश्वंभर (विश्वम् + भर)

संपूर्ण विश्वाचे पालनपोषण करणारा.

 हे विशेषण शिवाचे दयाळू आणि पालक रूप दर्शवते. सर्व सजीव सृष्टीला अन्न, ऊर्जा आणि जीवन देण्याची जबाबदारी शिव सांभाळतात. जरी शिव हे विनाशाचे दैवत मानले जात असले, तरी 'विश्वंभर' म्हणून ते जगातील प्रत्येक जीवाचे पोषण करणारे परमपिता आहेत.

         •त्रिनेत्रधारी (त्रि + नेत्र + धारी)

 तीन डोळे धारण करणारा. हे विशेषण शिवाचे अनोखे रूप आणि दिव्य ज्ञान दर्शवते.

शिवाचे पहिले दोन डोळे सूर्य आणि चंद्राचे प्रतीक आहेत, जे भौतिक जग पाहतात.

त्यांचा तिसरा डोळा (अग्नीचे प्रतीक) कपाळाच्या मध्यभागी असतो. हा डोळा विवेक, अध्यात्मिक ज्ञान आणि अंतर्दृष्टीचे प्रतीक आहे.

जेव्हा जगात पाप अतिप्रमाणात वाढते, तेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी शिव आपला तिसरा डोळा उघडतात 

ही तिन्ही विशेषणे मिळून शिवाचे पूर्ण रूप स्पष्ट करतात—

ते या विश्वाचे मालक (विश्वेश) आहेत, 

त्या विश्वाचे पालन करणारे दाते (विश्वंभर) आहेत, आणि 

परम ज्ञानी व संकटसमयी जगाचे रक्षण करणारे संहारक (त्रिनेत्रधारी) आहेत.

आज आपले तेरा कडवे पूर्ण झालेत. 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.





#सहजोक्त.

प्रयाग वेणी सकळा हराच्या ।

 पादारविंदीं वहाती हरीच्या ।

मंदाकिनी मंगल मोक्षकारी । 

तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १४॥

या कडव्याचा एकूण अर्थ समजतो, वाचल्यावर, होय ना?  साधारणपणे हे कडवे -प्रयागराज (की देवप्रयाग?) येथील त्रिवेणी संगम, विष्णुच्या चरणातून उत्पन्न मूळ गंगा, तसेच हरिहर ऐक्य  आणि मोक्षदायीनी गंगा इत्यादी-  गोष्टींवर रचले आहे, इतका अर्थ कळतो.


आता जरा सविस्तर बघू या. 

पौराणिक मान्यतेनुसार पृथ्वीवर अवतरण्या पूर्वी,  मुळात गंगा नदी ही विष्णुच्या पायातून प्रवाहित झाली. नंतर ब्रह्मदेवाच्या कमंडलू मध्ये स्थिर झाली. याच मान्यतेवर आधारित ओळ आहे, "पादारविंदीं वहाती हरीच्या". 


हीच गंगा  जेव्हा कमंडलूतून, स्वर्गातून पृथ्वीवर येण्यास निघाली, तेव्हा अतिशय संथ गतीने वाहू लागली. 'मंद' म्हणजे शनैः शनैः किंवा हळूहळू आणि 'आकिनी' म्हणजे चालणारी.

 स्वर्गलोकातून किंवा उच्च प्रदेशातून गंगा अत्यंत शांत, पवित्र आणि मंद गतीने वाहते, म्हणून तिला 'मंदाकिनी' हे नाव मिळाले. अशी मंदाकिनीनदीने ने भगीरथ राजाचे पूर्वजांना मोक्ष दिला.  इतकेच नाही तर श्रद्धेने गंगेत डुबकी लावणाऱ्या भक्तांना ती मोक्ष देते. म्हणून,"मंदाकिनी मंगल मोक्षकारी" म्हटले आहे.


गंगावतरणानंतर गंगोत्री जेथे शंकराच्या जटेतून भागीरथी नदी प्रवाहित झाली. पुढे ही येणारी भागीरथी नदी आणि बद्रीनाथकडून येणारी अलकनंदा नदी यांचा "देवप्रयाग" येथे संगम होतो.  मिळते.  जेथे दोन किंवा अधिक नद्यांचा संगम होतो, त्याला 'प्रयाग' असे म्हटले जाते.  याच संगमानंतर या संयुक्त प्रवाहाला अधिकृतपणे 'गंगा' नदी असे म्हणतात. शंकराच्या जटेतून  वाहणारी ही जणू "प्रयाग वेणी सकळा हराच्या"  अशी गंगा. 



"प्रयाग वेणी सकळा हराच्या"  याच ओळीसाठी जरा वेगळा संदर्भ असा की.


तीर्थराज प्रयागराज येथे  वेणीचे दान करण्याचा विधी प्रामुख्याने महाराष्ट्रातील आणि दाक्षिणात्य विवाहित स्त्रियांकडून केल्या जातो. 

ज्याप्रमाणे गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम होतो, त्याचप्रमाणे स्त्रीच्या वेणीमध्ये तीन धाग्यांची गुंफण असते. या विधीत स्त्रिया आपल्या वेणीचा किंवा केसांचा एक छोटा भाग कापून पवित्र त्रिवेणी संगमाच्या पाण्यात अर्पण करतात. 

वेणी दान केल्याने सात जन्मांपर्यंत तोच पती मिळावा, पतीला दीर्घायुष्य लाभावे, कुटुंबाला सौभाग्य प्राप्त व्हावे आणि सात जन्मांचे पाप नष्ट होऊन वेणीदानाचे पुण्य लाभावे, अशी धार्मिक श्रद्धा आहे. 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.



#सहजोक्त.

आज शिवस्तुतीच्या 15 व्या कडव्याचा थोडक्यात अर्थ बघू. 

शंकराची महती शब्दातीत आहे आणि तेच मोक्ष देणारे आहेत, पण माणूस हे जाणू शकत नाही. 

जे मनापासून शंकराला शरण जातात, त्यांचा शंकर स्वीकार करतात. म्हणून हे महादेवा, या जगात तुझ्याशिवाय मला तारेल असा दुसरा कोणताही आधार नाही.


कीर्ती हराची स्तुति बोलवेना । 

कैवल्यदाता मनुजा कळेना ।

एकाग्रनाथ विश्व अंगीकारी ।

 तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १५॥


आता या कडव्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.


कीर्ती हराची स्तुति बोलवेना=    "शिवमहिम्न-स्तोत्रातील"  32 व्या  स्तोत्राचा सारांश 

वरील एका वाक्यातून कवीने मांडला आहे. 

असित-गिरि-समं स्यात् कज्जलं सिन्धु-पात्रे सुर-तरु-वर-शाखा लेखनी पत्रमुर्वी । 

लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं 

तथापि तव गुणानामीश पारं न याति ॥ ३२ ॥


कैवल्यदाता मनुजा कळेना= या वाक्याचा सरळ अर्थ कळायला सोपाच आहे. पण कवीने काही हेतूने विशिष्ट शब्द योजलेले आहेत, ते बघू या. 


'कैवल्यदाता' म्हणजे भगवान शंकर महादेव कारण ते भक्तांना संसारचक्रापासून (जन्म-मरणाच्या फेऱ्यातून) मुक्ती देऊन 'कैवल्य पद' प्रदान करतात. 



 शंकर हे दक्षप्रजापतीची कन्या दाक्षायणी सतीचे पती होते.  महादेव शंकराची योग्यता दक्ष जाणू शकले नाहीत. त्यांनी वेळोवेळी शंकराचा अपमान केला.  शंकराची पत्नी सतीने अपमान सहन न होऊन दक्ष-यज्ञात स्वतः होऊन अग्नीत दहन करून घेतले. सती-शंकर यांना अपत्य नव्हते. 


दक्ष प्रजापती त्यांची अजून एक मुलगी होती. 

तिचे नाव अदिती. तिचा मुलगा आदित्य सूर्यदेव (विवस्वान). त्यांचा मुलगा वैवस्वत मनु.

म्हणजेच, दक्ष प्रजापती हे वैवस्वत मनुचे पणजोबा होय. 

आणि याच मनुची संतती पुढे मनुज, मानव म्हणून ओळखल्या जातात. 

पणजोबा दक्ष यांनी जसे शंकराचा महिमा जाणला नव्हता तसेच आजही मनुज (दक्षची पंतवंडे ) शंकराचा "कैवल्यदाता" असा महिमा जाणत नाहीत. अज्ञानातून वेगवेगळ्या देवांना शरण जातात.



एकाग्रनाथ विश्व अंगीकारी= 

एकाग्रनाथ हा एक सामासिक शब्द आहे. त्याचा विग्रह तीन प्रकारे होऊ शकतो. 

(1) एकाग्र असा नाथ (कर्मधारय) – 

महादेव हे 'समाधिस्थ' आणि 'योगेश्वर' आहेत. 

(2) एकाग्रतेचा नाथ (षष्ठी तत्पुरुष) – 

शंकर हे ध्यानाचे आणि स्थिर चित्ताचे 'अधिपती' आहेत.  

(3) एकाग्र आहे नाथ ज्याचा, असा तो भक्त (बहुव्रीही) – भक्ताच्या दृष्टीने आपला स्वामी  महादेव हा स्थिर आणि समर्थ आहे. 

 या तीन विग्रहांमुळे  वरील वाक्याचे तीन अर्थ होतात. 

(1) महादेव हे 'समाधिस्थ' आणि 'योगेश्वर' आहेत, हे सर्व जगाने स्वीकारले आहे. 

(2) शंकर हे ध्यानाचे आणि स्थिर चित्ताचे 'अधिपती' आहेत. वं त्यांनी विश्वाला जसंच्या तसे स्वीकारले आहे. 

(3) सर्व विश्वातील भक्तांनी  -आपला स्वामी  महादेव हा स्थिर आणि समर्थ आहे,-  हे अंगीकारले आहे. 

शंकर हे असे दैवत आहेत जे देव, दानव, मानव, भूत-प्रेत, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता, जो कोणी त्यांच्याकडे  समचित्ताने धाव घेतो, त्या सर्वांचा स्वीकार (अंगीकार) करतो . विष प्राशन करून संपूर्ण विश्वाचे रक्षण करणारा आणि सर्वांना आश्रय देणारा देव म्हणजेच महादेव, यांचा शिवाय कोण बरे जगाला तारू शकेल? 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.




#सहजोक्त.

आज शिवस्तुतीतील  सोळावे कडवे आपण घेणार आहे.  आपल्या भारतात अनेक उपासना, पंथ, उपपंथ होते, आणि आहेत. शिवस्तुती ही  शैवपंथाच्या उपपंथाना मान्य असावी, असे या कडव्यावरून वाटते.  कडव्याचा वरवर अर्थ,

 वाचल्या बरोबर समजतोच. 

परंतु सखोल चिंतन केले तर, पहिल्या तीन ओळी शैवपंथाच्या तीन उपपंथाना लक्षित करतात.

सर्वांतरीं व्यापक जो नियंता । 

तो प्राणलिंगाजवळी महंता

अंकीं उमा ते गिरिरूपधारी । 

तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १६॥

एकेक ओळीचा सविस्तर अर्थ बघू या. 


(1) सर्वांतरीं व्यापक जो नियंता =

सर्वांच्या अंतरी रहाणारा, सर्वव्यापी आणि नियंत्रण करणारा देव, महादेव. शैवपंथीयांच्या दृष्टीने चराचरात शंकर आहेत. तेच सर्व सृष्टी चालवतात.

ही ओळ म्हणजे शैव पंथीयांची मूलभूत मान्यता होय.


(2) तो प्राणलिंगाजवळी महंता=  ही ओळ वीरशैव पंथियांच्या तत्त्वज्ञानाला लक्षित करणारी आहे.


शैव पंथात, विशेषतः वीरशैव (लिंगायत) परंपरेत, 'प्राणलिंग' ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रगत आध्यात्मिक संकल्पना आहे. वीरशैव तत्त्वज्ञानातील 'षट्स्थल' (सहा पायऱ्यांचा आध्यात्मिक मार्ग) सिद्धांतानुसार, प्राणलिंग हे शिवाचे ते रूप आहे जे साधकाच्या प्राणात (प्राणशक्ती किंवा अंतःकरणात) वास करते.

प्राणलिंग म्हणजे साधकाच्या शरीरातील आत्मशक्ती किंवा चेतना, जिला भक्ती आणि ध्यानाद्वारे शिवाचे रूप मानले जाते.

वीरशैव संप्रदायात शिवाची तीन रूपे मानली जातात.

इष्टलिंग: जे- अनुग्रहाच्या वेळी- शरीरावर (गळ्यात किंवा छातीवर) धारण करण्यासाठी गुरु देतात. हे डोळ्यांनी दिसणारे स्थूल रूप आहे.

प्राणलिंग: जेव्हा साधक इष्टलिंगाच्या उपासनेद्वारे आंतरिक अनुभूती घेतो, तेव्हा ते लिंग त्याच्या प्राणात किंवा मनात स्थित होते. हे सूक्ष्म रूप आहे.

भावलिंग: ही सर्वोच्च अवस्था आहे, जिथे आत्मा आणि शिव यांमधील भेद संपतो. हे कारण रूप आहे.


'प्राण' म्हणजे जीवनाचा मुख्य आधार (श्वास/चेतना) आणि 'लिंग' म्हणजे शिवाचे प्रतीक. जेव्हा साधकाची चेतना किंवा प्राणशक्ती पूर्णपणे शिवमय होते, त्याला प्राणलिंगी स्थल (षट्स्थलांपैकी चौथी पायरी) म्हणतात. या अवस्थेत साधकाला बाहेर पूजा करण्याची गरज उरत नाही, कारण त्याच्या शरीरातील प्राणच शिवाचे रूप बनतात.


इष्टलिंगाची पूजा ही प्रामुख्याने बाह्य आणि डोळ्यांनी पाहून (दृष्टीयोग) केली जाते. याउलट, प्राणलिंगाची पूजा ही पूर्णपणे आंतरिक आणि मानसिक असते. यामध्ये साधक आपल्या मनाचा, बुद्धीचा आणि प्राणाचा उपयोग करून अंतर्यामी शिवाचे ध्यान करतो.


प्राणलिंगाची अनुभूती येणे म्हणजे साधक केवळ कर्मकांडात अडकून न राहता, अध्यात्माच्या उच्च पातळीवर पोहोचला आहे. येथे साधकाला हे समजते की ईश्वर बाहेर कुठे नसून तो स्वतःच्याच प्राणामध्ये आणि आत्म्यामध्ये जिवंत रूपात अस्तित्वात आहे.

शैव पंथात महंत म्हणजे अध्यात्मिक नेतृत्व करणारी आणि धार्मिक संस्थांचे नियंत्रण करणारी आदरणीय व्यक्ती होय.

 सामान्य माणसाला आपल्याच शरीरात किंवा प्राणात देव आहे हे समजत नाही. हे ज्ञान करून देण्याचे काम 'महंत' म्हणजेच सद्गुरू करतात. गुरू स्वतः आत्मज्ञानी असल्यामुळे ते नेहमी त्या प्राणलिंगाच्या (ईश्वराच्या) अनुसंधानात म्हणजेच त्याच्या 'जवळ' असतात. जो खरा महंत किंवा संत असतो, त्याचे अस्तित्व ईश्वरापासून वेगळे नसते. त्याचा प्राण आणि शिवतत्त्व एकच झालेले असते. त्यामुळे "तो महंत नेहमी प्राणलिंगाच्या जवळच (एकतेने) राहतो," असे म्हटले जाते.



(3) अंकीं उमा ते गिरिरूपधारी= या ओळीतून  शिवशक्ती यांचे एकत्रीकरण  सुचविले आहे. 

अंक म्हणजे मांडी. शंकर आणि उमा हे दोघेही एकासनावर बसले आहेत. आधीच्या कडव्यात आपण याविषयी सविस्तर वाचले आहे.

आता "गिरिरूपधारी" ह्या विशेषणावर  भाष्य करू या.  आपल्याला माहितीच आहे की पार्वती म्हणजे गिरिजा, हिमालयपुत्री. शंकर कैलास पर्वतावर रहातात, हे ही मान्य. पण शंकरपार्वती मिळून "गिरिरूपधारी" कसे? 🤔

 व्याकरणानुसार, गिरी हा शब्द 'गॄ' किंवा 'गीर्' या मूळ धातूपासून तयार झाला आहे. 

 'गिरति धारयति पृथ्वीं ग्रियते स्तूयते गुरुत्वाद्वा'. म्हणजेच, "जो पृथ्वीला धारण करतो किंवा जो आपल्या अवाढव्य आकारामुळे (गुरुत्वामुळे) पूजनीय/स्तुतीस पात्र ठरतो" तो 'गिरि'.

आता असे बघा की शंकर म्हणजे आदिनाथ आणि पार्वती म्हणजे जगदंबा. यांच्या मिलनातूनच जग निर्माण होते. म्हणून ते'  गिरति धारयति पृथ्वीं ग्रियते स्तूयते गुरुत्वाद्वा'.  आहेत. म्हणूनच त्यांनी एकत्रितपणे गिरिरूप धारण केले आहे.

पार्वती सह असलेल्या हे शंभो तुझ्या शिवाय कोण बरे तारून नेईल? 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.



#सहजोक्त.

आज सतरावे कडवे बघू या.

तसे हेही कडवे वाचून, कळायला सोपे आहे, असे वाटते. 

सदा तपस्वी असे कामधेनू ।

 सदा सतेजशशिकोटिभानू ।

गौरीपती जो सदा भस्मधारी ।

 तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १७॥


नेहमी तपस्वी असलेला, भक्तांसाठी कामधेनू प्रमाणे सर्व कामना पूर्ण करणारा आहे.

नेहमी चंद्रा सारखा शीतल आणि कोटिसूर्याप्रमाणे तेजस्वी असतो. गौरीचा पती आणि नेहमी भस्म धारण करतो. अशा शंकरा शिवाय कोण बरे तारील? 


असा सरळ अर्थ घेतात, सामान्यपणे.

पण  कवीने  विशिष्ट शब्दच कां बरे योजले असावे? हा विचार मला अस्वस्थ करतो. जसे -तपस्वी, कामधेनू,  सतेज, कोटिभानु, गौरीपती, भस्मधारी - वगैरे. मग विचार केला आणि काही सुचले, जे सर्वांसमोर ठेवतेय.

(ओळ 1) सदा तपस्वी असे कामधेनू= 

• तपस्वी म्हणण्या मागे नाथसंप्रदायाचा संदर्भ घ्यायला हवा. 

नाथ संप्रदायाची श्रद्धा आहे की, भगवान शिव हेच सर्व जगाचे आणि नाथांचे मूळ गुरू आहेत. 

 पौराणिक व आध्यात्मिक परंपरेनुसार, योगविद्या, तंत्र आणि सिद्धमार्गाचे ज्ञान सर्वप्रथम भगवान शंकराने माता पार्वतीला आणि नंतर अन्य शिष्यांना दिले.  त्यामुळे  तपस्वी हे विशेषण शंकराला शोभून दिसते.

•कामधेनूच कां म्हटले? कल्पतरू, चिंतामणी वगैरे कां नाही? 

कामधेनू, कामना पूर्ण करते.

कल्पतरू, कल्पना केलेलं पूर्ण करतो.

चिंतामणी, चिंतिलेले पूर्ण करतो .

आपण सामान्य लोकं इच्छा, कामना, मनीषा यांना समानार्थी म्हणून वापरतो, पण तसे नाहीय.

एखादी गोष्ट मिळवण्याची सर्वसाधारण वृत्ती म्हणजे इच्छा. इच्छा ही तात्पुरती असू शकते, पण कामना

म्हणजे एखाद्या इच्छेच्या मागे विशिष्ट आसक्ती, ओढ किंवा स्वार्थ जोडला जातो. 

कामना ही थोडी सखोल असते. यात एखादी गोष्ट मिळवण्याची तीव्र लालसा किंवा आसक्ती असते. 

शंकर भगवान भक्ताची इच्छा पूर्ण करत नाहीत, तर शकराच्या भक्तीची ओढ, शंकरविषयक आसक्ती असेल तरच  भक्ताची कामना पूर्ण होते. 


सागरमंथनातून कामधेनू निघाली. म्हणजे चौदा रत्नापैकी ती एक आहे. कामधेनू आणि शंकर यांचा अजून एक संबंध आहे, बरे कां. 

भगवान शंकरांचे वाहन असलेला नंदी हा कामधेनूचा वंशज मानला जातो. काही ग्रंथांनुसार, कामधेनूची कन्या 'सुरभी' हिचा नंदी हा मुलगा आहे, म्हणजेच या नात्याने कामधेनू नंदीची आजी ठरते.


नंदी जसा शंकराच्या भक्तीत अखंड असतो, शंकराच्या तपात खंड पडू नये म्हणून नंदी कायम सावधपणे राखण करतो.  तसा भक्तांचासुद्धा भाव असेल तर  तपस्वी शंकर, कामधेनू ठरतात. 


(ओळ 2) सदा सतेजशशिकोटिभानू= 


संस्कृत व्याकरणानुसार, 'कोटि' हा शब्द 'कुट्' (कुटिल होणे, वळणे किंवा वाकणे) या धातूपासून किंवा 'कोट्' या रूपापासून बनला आहे असे मानले जाते. याचा  मूळ अर्थ "धनुष्याचे वक्र टोक" असा होतो.  देवतांच्या वर्णनात डोळे व त्यावरच्या भुवया  या नेहमी 'धनुकोटी' म्हटल्या जातात.


शंकराचे तीन डोळे म्हणजे   अग्नी, चंद्र, सूर्य होय.

तेज म्हणजे अग्नी, शशी म्हणजे शीतल चंद्र तसेच कोटिभानु म्हणजे सर्व स्तर /प्रकार युक्त असलेला सूर्य.

कोटी या शब्दाचा एक अर्थ संख्याविशेषण आहे परंतु त्याचा दुसरा अर्थ श्रेणी, प्रकार, स्तर असाही होतो. 

इथे कोटिभानु म्हणजे एककरोड भानु असा घेणे योग्य नाही. उलट सूर्य आणि त्यांचे विविध स्तर / प्रकार / श्रेणी जाणून घ्यायला हवी. 

सूर्य आणि त्यांचे विविध वर्गीकरण = 

(वर्गीकरण 1)=

द्वादश आदित्य (सूर्याची १२ रूपे)

पौराणिक कथेनुसार, महर्षी कश्यप आणि माता अदिती यांच्या पोटी जन्मलेल्या १२ पुत्रांना 'आदित्य' (सूर्याचे स्वरूप) म्हटले जाते. हे १२ आदित्य वर्षाच्या १२ महिन्यांचे आणि मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या अवस्थांचे प्रतिनिधित्व करतात.

अंशुमान: प्राणांचा प्रवाह आणि तेज वाढवणारा.

अर्यमा: पितृलोकाचे अधिपती आणि न्याय देणारे.

इंद्र: देवराज म्हणून शक्ती आणि ऐश्वर्याचे प्रतीक.

त्वष्टा: वनस्पती आणि सृष्टीच्या सौंदर्याची निर्मिती करणारे.

धाता: सृष्टीची रचना आणि उत्पत्ती सांभाळणारे.

पर्जन्य: ढगांची निर्मिती करून पाऊस पाडणारे.

पूषा: अन्न आणि पोषणाचे देव.

भग: ऐश्वर्य, संपत्ती आणि भाग्य देणारे.

मित्र: विश्वामध्ये स्नेह, कल्याण आणि शांती राखणारे.

वरुण: जलतत्त्वाचे नियंत्रण करणारे.

विवस्वान: अग्नी आणि उष्णतेचे मुख्य स्त्रोत (ऋग्वेदातील मुख्य सूर्य).

विष्णु: वामन रूपाने अधर्माचा नाश करणारे.


(वर्गीकरण 2)= त्रिकाल सूर्य (दिवसाच्या प्रहरानुसार भेद)

सूर्य एका दिवसात तीन प्रमुख देवतेच्या रूपांमध्ये बदलतो.

सकाळचा सूर्य हा ब्रह्मदेव आहे. सृष्टीच्या निर्मितीचे (उगवत्या ऊर्जेचे) प्रतीक आहे.

दुपारचा सूर्य हा शिव आहे.  हा मध्यान्हाच्या तीव्र तेजाचे आणि संहाराचे (ऊर्जेच्या परमोच्च बिंदूचे) प्रतीक आहे.

संध्याकाळचा सूर्य हा विष्णु आहे. अस्ताला जाणारा सूर्य , सृष्टीच्या पालनाचे आणि विश्रांतीचे प्रतीक आहे.


(वर्गीकरण 3)= सूर्याच्या सात किरणांचे वर्गीकरण (किरणभेद)

'कुर्मपुराण' आणि 'विष्णुपुराण' यांसारख्या ग्रंथांमध्ये सूर्याच्या रथाला असलेल्या ७ घोड्यांना सूर्याच्या ७ मुख्य किरणांचे रूप मानले गेले आहे. वैज्ञानिक भाषेत आपण ज्याला प्रकाशाचा 'स्पेक्ट्रम' (Spectrum) म्हणतो, त्याची वर्गवारी पुराणात अशी आहे:

१. सुषुम्णा: (चंद्रमा पोसणारा किरण)

२. हरिकेश: (नक्षत्रांना प्रकाश देणारा)

३. विश्वकर्मा: (बुध ग्रहाला ऊर्जा देणारा)

४. विश्वश्रवा: (शुक्र ग्रहाचा आधार)

५. संयदवसू: (मंगळ ग्रहाशी संबंधित)

६. अर्वाकवसू: (गुरू ग्रहाशी संबंधित)

७. स्वराट: (शनी ग्रहाला ऊर्जा देणारा) 

याव्यतिरिक्त, तंत्रशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात सूर्याची १२ अर्क स्थाने (तीर्थक्षेत्रे) आणि दैनंदिन उपासनेसाठी १०८ नामांचे वर्गीकरण देखील केले जाते. 

म्हणून  "सदा सतेजशशिकोटिभानू" या ओळीचा अर्थ  असे(वर वर्णन केलेले ) सर्व कोटिसूर्य ज्याचा एका नेत्रात आहे, तो शंकर  नेहमीच अग्नी, चंद्र आणि सूर्य असा त्रिनेत्रधारण करणारा असतो. 




(ओळ 3)गौरीपती जो सदा भस्मधारी=


शंकराची पहिली पत्नी सती ही होती. तर हिमालयकन्या पार्वती ही दुसरी पत्नी होय. 

पौराणिक कथेनुसार, भगवान शिवाची पत्नी पार्वती हिने सुरुवातीला काळ्या वर्णाची (काली) असल्याचा टोमणा ऐकल्यानंतर कठोर तपश्चर्या केली. तिच्या तपावर प्रसन्न होऊन जेव्हा  शिवाने तिच्यावर गंगाजल शिंपडले, तेव्हा तिचा वर्ण सोन्यासारखा लख्ख व उजळ झाला. यामुळे तिला 'महागौरी' किंवा 'गौरी' हे नाव मिळाले.  शंकर मुळातच कर्पूरगौर म्हणजे कापुरासारखे गोरे आहेत. आणि ते गौरीचे पती आहेत. 

ते सर्वांगाला भस्म लावतात कारण त्यामागे एक कहाणी आहे. 


एका पौराणिक कथेनुसार, जेव्हा माता सतीने यज्ञकुंडात आत्मदहन केले, तेव्हा शिव अत्यंत दुःखी झाले. त्यांनी सतीचे पार्थिव शरीराला लावून तांडव केले. विष्णूने चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले. त्यानंतर शिवाच्या हातात फक्त राख (भस्म) उरली. सतीच्या आठवणीत त्यांनी ते भस्म आपल्या शरीराला लावले.

गौरी ही पत्नी असूनही त्यांनी गौरीचे स्थान आणि मान पूर्ण सांभाळून सतीला आपल्या जीवनात स्थान दिले. म्हणून तर ते महादेव आहेत. 

(ओळ 4)तुजवीण शंभो मज कोण तारी=

अशा एकमेव शंकरा शिवाय मला कोण दुसरे तारून नेईल? 


©डॉ. प्रज्ञा देशपांडे.



No comments:

Post a Comment

शिवस्तुती- कैलासराणा - भाग 3

  #सहजोक्त. कर्पूरगौर स्मरल्या विसावा ।  चिंता हरी जो भजकां सदैवा । अंतीं स्वहीत सुचना विचारी ।  तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १८॥ कापरासारख्या ...