Sunday, December 6, 2015

स्त्री - त्रिकालभिनंदनार्हा !

‘‘स्त्रियश्चरित्रं पुरुषस्य भाग्यम्’’ 

हे वाक्य ऐकल्याबरोरबर मनात अर्थ केला जातो की, -स्त्रीचे सत्शीलत्व पुरुषाकरिता भाग्यच होय’. म्हणजेच सुशील स्त्री पुरुषाला दैवानेच लाभते! परंतु माझ्यामते या उक्तीचा अर्थ असा नाहीच. चरित्र म्हणजे वर्तन. स्त्रीचे चरित्र म्हणजे वर्तन अर्थात अनुकूल वर्तन पुरुषाकरिता भाग्यप्रद होय असेच या उक्तीतून अभिप्रेत आहे असे मला वाटते.स्त्रीचे वर्तन बरेचदा अनाकलनीय असते. दुसर्यांसाठी अनाकलनीय परंतु तिच्यासाठी ते मनःपूत म्हणजे तिच्या मनाला योग्य वाटेल असेच असते. मनःपूत म्हणजे स्वैर नाही उलट मुक्त, स्वतंत्र असे वर्तन होय. कसे? तर गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा इत्यादी वैदिक स्त्रिया ज्याप्रमाणे मनःपूत वागत असत त्याप्रमाणे.

लोपामुद्रा अगस्तीऋषींची पत्नी होती. विवाहसमयी दोघांमध्येही अलिखित संकेत ठरला होता की‘दोघांनीही एकमेकांचा मान सांभाळायचा’ दोघेही ब्रह्मवेत्ते होते. एकमेकांसह त्यांचा संसार उत्तम चालू होता. एकदा अगस्तिऋषी यात्रेला जाण्यास निघाले. लोपामुद्रेने विचारले कुठे निघालात? सर्व शिष्यांसमोर अगस्तींनी जे उत्तर दिले त्यामुळे तिच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली. लोपामुद्रा काहीच बोलली नाही. ऋषी निघून गेले. इकडे मानभंग झालेली  लोपामुद्रा कावेरीनदी रुपाने आश्रमाजवळून वाहू लागली. अगस्ती परतल्यावर त्यांना त्यांच्या चूकीच्या वागणूकीचा पश्चात्ताप झाला. पण आता वेळ निघून गेली होती. अशीच एक कथा मराठी वारकरी संप्रदायातही आहे. राका-बाका हे दोघे पतीपत्नी होते. दोघेही पांडुरंगाचे भक्त. दिवसरात्र विठ्ठलभक्तीत मग्न राहात होते. एकदा लाकडं आणण्यासाठी दोघेही जंगलात गेले. राकाला सोन्याचा दागिना दिसला. त्याला वाटले की  बाका स्त्री आहे, तिला दागिन्याचा मोह होईल. मग ती ईश्वरभक्तीपासून दूर होइल. असा विचार करुन त्याने दागिन्यावर माती  लोटली. दुरुन हे सर्व ती बघत होती. बाका विचारते, ‘‘हे काय चाललं आहे?’ राका स्वतःच्या मनातले विचार सांगतो. त्यावर बाका म्हणजे, ‘आहा रे, तुमची विठ्ठलभक्ती, माती आणि सोनं यात भेद करता होय?’’स्त्रिया अशा मनःपूत स्वतंत्र वचार करतात व स्वतःच्या विचारांनीच वागतात. म्हणून पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांना अनुकूल वर्तन करणारी स्त्री लाभणे त्यांच्या दृष्टीने भाग्यकारकच ठरते ना. म्हणून पुरुषमानसिकतेनुसार ‘स्त्रियश्चरित्रम् पुरुषस्य भाग्यम्’ ठरते.


केवळ भारतीय समाजातच नाही तर सर्व जगात स्त्रीला अबला म्हटल्या जाते. कां? खरे तर मानसिक दृष्टया महिला पुरुषांपेक्षा जास्त सुदृढ असतात. प्रेमभंगामुळे अनेक पुरुष ‘देवदास’ होतात, महिला मात्र खचत नाहीत. एखादी स्त्री दुर्दैवाने विधवा झाली तर ती कशीबशी आपल्या लेकरांना वाढवते. घरी-दारी जे जमेल, झेपेल ते काम करुन मुलांना सन्मानाने वाढवते. तिचं जीवन कितीही  दुःखमय असले तरी ती व्यसनात गुरफटत नाही. या उलट एखादा पुरुष विधूर झाल्याबरोबर दुसरं लग्न करुन मोकळा होतो. अथवा व्यसनात बुडून स्वतःची कर्तव्य, दुःख विसरण्याचा प्रयत्न करतो. शारीरिक दृष्ट्या सुध्दा स्त्री हृदय पुरुषहृदयापेक्षा बळकट असते. म्हणूनच ती प्रसववेदना सहन करु शकते. तसेच हृदयविकार सुध्दा स्त्रियांना कमी होतो. स्त्रीचा मेंदू एकावेळी चार कार्य करु शकतो. हेच पुरुषाचा मेंदू दोनच कार्य करु शकतो. स्त्री स्वतःच्या वजनापेक्षाही अधिक वनज उचलू शकते. पुरुष हे करु शकत नाही. स्त्री गर्भ विपरीत परिस्थितीतही वाढतो, पुरुषगर्भ गळून पडण्याची शक्यता जास्त असते. स्त्रियांमध्ये समायोजन शक्ती जास्त असते.अशी मनस्विनी स्त्री कठीण पण कोमल असते. कशी? तर बीजांकूराप्रमाणे. बीजांकूर कसा नाजूक, कोमल असतो. पण तरी कठीण भूकवच भेदून जमिनीबाहेर येतो. तशीच स्त्री शरीराने कोमल असून मनाने कणखर होऊन कठीण परिस्थितीवर मात करीत सन्मानाने जगते.


परचक्राच्या सतत आक्रमणामुळे मूळात सहिष्णु असलेली भारतीय संस्कृती बदलली. वैदिक काळात दिसून येणारे स्त्रीस्वातंत्र्य पुढे लुप्त होत गेले. स्त्री म्हणजे बंदिनी, रुढी-परंपरा,संस्कृती संस्कार इत्यादींच्या बन्धनात जखडलेली स्त्री,  म्हणजे बंदिनीच. पण बरेचदा हे बन्धन कुटुंबाच्या प्रेमामुळे, कर्तव्यभावनेने तिनेच स्वेच्छेने स्वीकारलेले असते. प्रत्येक स्त्री स्वतःची लक्ष्मणरेखा स्वतः निश्चित करते. त्यानंतर ती स्वतःच कधीही लक्ष्मणरेखा ओलांडत नाही. म्हणूनच आजही समाजात पुरुषांपेक्षा स्त्रियावंर अधिक विश्वास ठेवला जातो.स्त्रियांमध्ये अग्नीप्रमाणे स्वहा आणि स्वधा अशा दोन शक्ती असतात. स्वहा म्हणजे स्वतःहून आहूती होण्याची क्षमता तर स्वधा म्हणजे स्वतःला धारण करण्याची क्षमता. कोणतीही स्त्री स्वतःच्या कुटुंबासाठी स्वत्व अर्पण करण्यासही सिध्द होते. उलट परिस्थितीत ती कशाही प्रकारे स्वत्व राखते. पुराण काळापासून आजवरच्या अनेक स्त्रियांच्या उदाहरणातून हे सिध्दच झाले आहे. दुर्गा, चण्डिका, अहल्या, मन्दोदरी, सीता, कुन्ती, गांधारी, द्रौपदी, जिजाबाई, झाशीची राणी, दुर्गावती इत्यादी.


आजचा काळ विज्ञान तन्त्रज्ञानाचा काळ आहे. या तंत्रयुगातही स्त्रीमन,स्त्रीवर्तन,स्त्रीभावना मानसोपचार तज्ज्ञांच्याही संशोधनाचा विषय ठरतो. अजून तरी स्त्रीमन समजून घेणारे यंत्र विकसित झालेले नाही.सांख्य दर्शनानुसार ‘प्रकृतीच माया निर्माण करते. मायेत अडकलेला पुरुष संसार करतो. तो ज्ञानानेच मायाबंधनातून मुक्त होऊ शकतो. म्हणजेच पुरुषाला मुक्त होण्यासाठी सुध्दा प्रकृतीची आवश्यकता असतेच प्रकृतीशिवाय पुरुष सचेतन असूनही निष्क्रिय असतो.


मूळात जड असलेली (निर्जीव असलेली) प्रकृती, सचेतन परंतु निष्क्रिय पुरुषाला सक्रिय करुनच ज्ञानमार्गापर्यंत नेते. मगच तो पुरुष मोक्षमार्गावर जाऊ शकतो.’ मानवी जीवनातही स्त्रीच पुरुषाला प्रेरणा देते. कार्य करवून घेते. प्रोत्साहन देते. स्त्रीसाठीच, स्त्रियांमुळेच स्त्रियांच्या सहकार्यानेच पुरुष कार्यरत होतात. रामायण, महाभारत स्त्रिसाठीच घडले नां.स्त्रीमहिमा जाणूनच शब्दप्रभुंनी शक्ती, युक्ती, दया, क्षमा, शांती, लक्ष्मी, विद्या, भावना, बुद्धी, सत्तासुंदरी इत्यादी अनेक सुंदर शब्द स्त्रीलिंगामध्येच योजले असतील काय?स्वतःच्या उदरातून पुरुषाला जन्म देणारी, त्याचे लालन पालन करणारी, त्याचा अहंकार, अस्मिता जोपासणारी, स्वतःवर रुढीबंधने लादून घेणारी, पुरुषाला प्राधान्य देऊन स्वतःकडे दुय्यमत्व सहज घेणारी, इतकेही करुन आपण काही विशेष करतोय असं न दाखविणारी स्त्री खरोखरच त्रिकालभिनंदनीय नाही काय?

सौ. प्रज्ञा शरद देशपांडे
हडस कनिष्ठ महाविद्यालय
नागपूर.

1 comment:

  1. काय नेमकं अनालिसिस आहे तुमच..मान गये .... अगदी आदिकालापासून आता पर्यंत एका लेखन सर्व सामावलं गेलं. स्त्री सुद्धा अशीच सर्व समावेशक असते नाही...!

    ReplyDelete

#सहजोक्त

. क्षमा शस्त्रं करे यस्य  दुर्जनः किं करिष्यति।  अतृणे पतितो वह्निः  स्वयमेवोपशाम्यति॥ ज्याच्या हातात क्षमा नावाचे शस्त्र आहे, त्याचे दुर्जन...