तारीख: 07 Oct 2015 20:35:11 |
शिक्षणावर बोलू काही
पूर्वी ‘देव अनादी-अनंत अविनाशी’ आहे असे म्हणायचे. आज देवाचे माहीत नाही पण कचरा, प्रदूषण, भ्रष्टाचार व ट्युशन्स मात्र नक्कीच खात्रीपूर्वक अनादी (म्हणजे यांचा उगम कधी झाला ते माहीत नाही), अनंत (म्हणते यांचा अंत कधी होईल ते सांगता येत नाही), अविनाशी (म्हणजे याचा विनाश अशक्यच आहे) आहेत. कचरा, प्रदूषण, भ्रष्टाचार हा आपल्या सदराचा विषय नाही. मात्र शिक्षणाला पूरक म्हणून सुरू झालेली ‘ट्युशन’ संपूर्ण शिक्षण क्षेत्राला व्यापून पुन्हा शिल्लक उरलीय्, यातच तिची महती सामावलीय. पूर्वी फक्त ‘ढ’ मुलांना ट्युशन होती. पूर्वी शाळेपूर्वी वा शाळेनंतर किंवा सुट्ट्यांमध्ये ट्युशन असायच्या. आता ट्युशनमधून वेळ मिळाला तर शाळा-कॉलेज असू शकते. शाळा-कॉलेजमध्ये सत्रानुसार फी भरावी लागते. त्यातही वेगवेगळ्या आरक्षण, सवलतीनुसार फीमध्ये कन्सेशन मिळते. मात्र ट्युशनमध्ये शिकवणे सुरू होण्याआधी अर्धी रक्कम व शिकवणे सुरू झाल्याबरोबर उरलेली रक्कम भरावी लागते. कोणाला कमी कोणाला जास्त असा भेदभाव येथे नाही. कॉलेज-शाळेच्या बेंचवर धूळ असू शकते पण ट्युशनची बेंचेस गुळगुळीत. शाळा-कॉलेजमध्ये लाईट, पंखे सुद्धा ‘लक्झुरी’ समजावे तर ट्युशनमध्ये एसी, सेंट्रल कुलिंग असणारच. शाळेत गुरुजी घसा खोेकलून फळा-खडूच्या धुळीत शिकवितात येथे मात्र ग्लासबोर्ड, ई-लर्निंग इत्यादींची रेलचेल.
शाळेत, कॉलेजमध्ये उपस्थितीला ‘ढेंगा’ दाखविणारे सर्व विद्यार्थी ट्युशनमध्ये नियमित, दररोज बायोमेट्रिक करवितात. पूर्वी शाळा-कॉलेजमध्ये ऍडमिशन झाल्यावर ट्युशनमध्ये प्रवेश घेतला जाई. आता ट्युशनवाल्यांनी सांगितलेल्या शाळा-कॉलेजात प्रवेश घेतला जातो. शाळा-कॉलेजात पन्नासच्यावर विद्यार्थी संख्या असली तर ‘शिक्षकांचे पुरेसे लक्ष नसते’ अशी तक्रार करणारे पालक दीडशे ते दोनशेच्या ट्युशनला पाल्याला सहज पाठवतात. मुलांच्या वह्या नियमित तपासत नाहीत, अशी शाळेच्या पालकसभेत ओरड करणारे पालक वह्यांवर चेक ऍन्ड सिनचे ठप्पे मारणार्या वा सरळ छापील नोट्स देणार्या ट्युुशनला ‘ग्रेट’ समजतात. शाळेत कधी कोणत्या कार्यक्रमात ‘अध्यक्षीय भाषण’ लांबले तर उशीर झाला तर ‘अभ्यासाचा बहुमूल्य वेळ फालतू वाया गेला’ अशी ओरड करणारे विद्यार्थी ट्युशन टिचरचे ‘बर्थ डे’ सेलिब्रेशन प्लानिंग आठवड्यापासून ट्युशननंतर तासन्तास थांबून करतात. स्वत: पेपर तपासून विद्यार्थ्यांच्या चुका भर वर्गात समजावून दिल्या तर शाळेच्या शिक्षकाने ‘प्रेशर’ दिल्यामुळे विद्यार्थी ‘बरेवाईट’ करण्याची भीती वाटते. पण ट्युशनमध्ये तपासनिकांकडून तपासलेले पेपर सर्वांसमोर दाखवितात, भर वर्गात नापास विद्यार्थ्यांची नाव घेतात तेव्हा हे ‘प्रेशर’ कुठे जाते कळत नाही? परीक्षा शुल्क १०० रुपयांवरून १५० रुपये केले तरी ओरडणारे पालक दरवर्षी हजारोंनी वाढणार्या ट्युशन फीबद्दल मूग गिळून गप्प का? पूर्वी ट्युशनचा पत्ता विचारला तर ‘अमुक एका बंगल्याच्या बाजूला’ असा असे. आता मात्र लोक पत्ता सांगताना ‘या प्रख्यात ट्युशन क्लासच्या बाजूला’ असे सांगतात. खरंच! कितना बदल गया इन्सान!!!
- डॉ. प्रज्ञा देशपांडे
९३७१५७४३३०
No comments:
Post a Comment