Sunday, September 21, 2025

रेणुका -अष्टक

 


🙏🙏🙏पहिली माळ 22/09/2025 सोमवार 🙏🙏🙏

आज अश्विन शुद्ध प्रतिपदा, नवरात्री महोत्सवाचा आरंभदिवस. या नवरात्रात,भक्तश्रेष्ठ विष्णुदास यांनी लिहिलेली पद, अष्टक, आरती, वगैरे साहित्यातील मोजके वेचक आपल्या शब्दातून मांडावे, असे मनात आले.

माहूर येथील प्रसिद्ध वेदपाठशाला संचालक, वेदमूर्ती श्री निलेश गुरुजी  यांनी हा उपक्रम सफल होण्यास आशीर्वाद दिला. आई रेणुका हीच बुद्धी देणारी  आहे, उपक्रमाची प्रेरणा तीच आहे, लिहून पूर्ण करून घेण्याची जबाबदारीही तिचीच आहे. निमित्त मला केले यात माझे सौभाग्य आहे.🙏🙏


आज आपण श्री रेणुकेचे अष्टक यावर चिंतन करु. विष्णुदासांच्या अनेक प्रासादिक, भक्तिरसपूर्ण रचनांपैकी ही एक आहे. 

  चामर वृत्तातील ही रचना अनेक रेणुकाभक्तांना तोंडपाठ आहे.  चामर वृत्ताची चाल, ही ओजस्वी आणि वेगवान असते.

सातही कडव्यात "धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका" ही ओळ सामान आहे.  आई रेणुका  म्हणजे  धर्म अर्थ काम मोक्ष असे चारही पुरुषार्थ प्राप्त करून देणारी कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष म्हणजे ज्याच्या सानिध्यात कल्पिलेले साध्य होते. आजकालच्या भाषेत "अफर्मेशन, फुलफील होतात"😊 तर रेणुका आपल्या भक्तांना चारही पुरुषार्थ साधवून देते. 

सर्वप्रथम पूर्ण अष्टक आपल्यासमोर ठेवते.  मग एक एक कडव्याचा भक्तिरसास्वाद घेऊ या.


लक्ष-कोटी चंडकिरण सुप्रचंड विलपती अंब-चंद्र-वदन-बिंब दिप्तिमाजि लोपती 

सिंह शिखर अचलवासि मूळपिठनायका 

धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ १ ॥ 

आकर्ण अरुणवर्ण नेत्र श्रवणी दिव्य कुंडले 

डोलताति पुष्पहार, भार फार दाटले 

अष्टदंडि बाजुबंद, कंकणादि, मुद्रिका 

धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ।। २ ।। 

इंद्रनिळ, पद्मराग, पाच, हीर वेगळा

 पायघोळ बोरमाळ, चंद्रहार वेगळा

 पैजणादि भूषणानी लोपल्याति पादुका 

धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ ३ ॥ 

इंद्र, चंद्र, विष्णु, ब्रम्ह, नारदादि, वंदिती

 आदि अंत ठावहीन आदि शक्ति भगवती।

 प्रचंड चंड मुंड खंड विखंडकारि अंबिका, धर्म-अर्थ-काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ॥ ४॥ 

पर्वताग्रवासी पक्षि 'अंब अंब' बोलती।

 विशाल शालवृक्ष रानि भवानि ध्यानि डोलति। 

आवतार कृत्यसार जडमुढादि तारका।

 धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ॥ ५ ॥

अनंतब्रम्ह आटपाटि  पूर्वमूखा बैसलि 

अनंत गुण, अनंत शक्ति विश्वजननि भासलि । सव्याभागि दत्त-आत्रि, वामभागि कालिका

 धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ।॥ ६ ॥ 

पवित्र मातृक्षेत्र धन्य वास पुण्य आश्रमी

अंबदर्शनासी भक्त अभक्त येती आश्रमी

 म्हणूनि विष्णुदास निज लाभ पावला फुका 

धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ।। ७ ।।


आता एक एक कडवे यथाशक्ती, यथाबुद्धी उलगडते.

लक्ष-कोटी चंडकिरण सुप्रचंड विलपती अंब-चंद्र-वदन-बिंब दिप्तिमाजि लोपती 

सिंह-शिखर-अचलवासि मूळपिठनायिका 

धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ १ ॥

रेणुकापुत्र विष्णुदासांची रचना ही  निव्वळ भक्तीतून स्फुरलेली नसून तिच्यात प्रसादानुभूती जाणवते.  इथेच बघाना.


सिंहावर आरूढ असलेली, युद्धभूमीवरही अत्यन्त स्थिर असणारी रेणुका ही मूळ म्हणजे आदिशक्ती नायिका आहे. अशा रेणुका आईच्या गोल  मुखचंद्राच्या तेजामुळे;  लक्ष-कोटी प्रखर अशी प्रचंड किरणे विशेष रीतीने लपून जातात. 

 आई चंद्रासारखी शितल आहे, पण तिच्या समोर कठोर, घोर, उग्र असे  सारे काही लुप्त होतात.  सौम्यतेचा प्रभाव प्रखरतेला लुप्त करतो. विसंगती दर्शवून त्यातून किती सुरेख उलगड केली ना?

•खूप मोठी संख्या सांगताना 'हजारो-लाखो'  असा जो शब्दप्रयोग करतो तद्वत इथे 'लक्ष-कोटी' असा उल्लेख केला आहे. 

•नायिका म्हणजे युद्धादि रक्षण कौशल्यात तरबेज असलेली स्त्री नेत्री (नेता /लीडर शब्दाचे स्त्रीलिंगी रूप) . 

•अचलवासी म्हणजे अचलता जिच्यात राहते ती रेणुका. कितीही अस्थिर करणारी परिस्थिती असली तरी ती डगमगत नाही, ढळत नाही. 

विष्णुदासांची आई रेणुका ही अबलानारी नाही, तर नायिका आहे.


आकर्ण अरुणवर्ण नेत्र श्रवणी दिव्य कुंडले 

डोलताति पुष्पहार, भार फार दाटले 

अष्टदंडि-बाजुबंद , कंकणादि, मुद्रिका 

धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ।। २ ।।

(युद्धात गुंतलेल्या रेणुकेचे वर्णन करताना विष्णुदास म्हणतात) ती आकर्ण नयन आहे म्हणजे तिचे क्रोधाने लाल झालेले,  तेज:पुंज,मोठे  डोळे आहेत. तिच्या दोन्ही कानात दिव्य म्हणजे चमकदार कुंडले आहे. तिचे पुष्पहार हलत आहेत.  तिचे अष्टदंडी बाजूबंद, कंकण म्हणजे बांगड्या, अंगठ्या वगैरे साऱ्यांचा भार दाटला आहे.(आणि पुढच्या कडव्यात वर्णीलेल्या दागिण्याचा )

  •सुवासिनी स्त्रियांनी नेहमीच किमान पाच अलंकार घालावेत.   रेणुकेने अलंकार घातले आहेत, जरी ती युद्ध करते आहे तरी.

• बाजूबंदाचा विशेष प्रकार म्हणजे अष्टदंडी बाजूबंद. अष्टदंड (Octahedron) हा एक त्रिमितीय आकार आहे, ज्याला आठ पृष्ठभाग असतात. हे पृष्ठभाग सहसा त्रिकोणी असतात, विशेषतः जर तो 'नियमित अष्टदंड' (regular octahedron) असेल. अष्टदंडाची रचना दोन पिरॅमिड्स (Pyramids) जोडून तयार केलेल्या आकारासारखी असते, ज्याचा आधार (base) समान असतो.  आताशा हे असे प्राचीन दागिने दिसत नाहीत.


इंद्रनिळ, पद्मराग, पाच, हीर वेगळा

 पायघोळ बोरमाळ, चंद्रहार वेगळा

 पैजणादि भूषणानी लोपल्याति पादुका 

धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ ३ ॥

तिच्या चारही अंगठ्या इंद्रनील (नीलम), पद्मराग (कौस्तुभ मणी), पाचू आणि हिऱ्याच्या आहेत. शिवाय तिने पायघोळ बोरमाळा घातलीय आहे. चंद्रहारही आहे. पैंजण आदी पायांच्या आभूषणानी पादुका दिसेना झाल्या. 

•तत्कालीन भारतीय दागिने खरोखर अमूल्य असावेत.

• समद्र मंथनातून निघालेले पांचवें रत्न म्हणजे कौस्तुभ नामक पद्मराग मणी. पद्मराग हा संस्कृत शब्द आहे. कमल (पद्म) रंग (राग). या मण्याचा रंग नारंगी,  गुलाबी  असा मिश्र आहे.



इंद्र, चंद्र, विष्णु, ब्रम्ह, नारदादि, वंदिती

 आदि अंत ठावहीन आदि शक्ति भगवती।

 प्रचंड चंड मुंड खंड विखंडकारि अंबिका, धर्म-अर्थ-काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ॥ ४॥

 ती आदि-अंत याच्या पलीकडे आहे.  तसेच तिचे कोणते एक विशेष स्थान नाही (म्हणजे ती सर्वत्र आहे), ती आदिशक्ती, भगवती आहे. (जेव्हा सर्व देवांनी, देवीला युद्धाचे नायिकापद दिले, त्यानंतर युद्धभूमीवर तिने पराक्रम केला) त्या अंबिकेने प्रचंड (बलाढ्य) अशा चंड, मुंड आदि राक्षसांचे  खंड-विखंड केले. (अतिशय बारीक बारीक तुकडे म्हणजे खांडोळी केली) 

युद्धभूमीवर तिचा हा पराक्रम पाहून इंद्र,चंद्र, विष्णु, ब्रम्ह, नारदादि सर्व देव तिचे वंदन करु लागले.



पर्वताग्रवासी पक्षि 'अंब अंब' बोलती।

 विशाल शालवृक्ष रानि भवानि ध्यानि डोलति। 

आवतार कृत्यसार जडमुढादि तारका।

 धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ॥ ५ ॥

(शत्रूचा दारुण पराभव झाल्यावर ) वृक्षावरील पक्षी अंब, अंब असे बोलू लागले. शाल नावाचे 

मोठं मोठे वृक्ष त्या भवानीचे ध्यान करत डोलू लागले. अशा प्रकारे जडमूढ-जीवांना तारणाऱ्या रेणुकेच्या कर्तृवाचा सारांश सांगितला आहे. 

  विष्णुदासांचे सर्वच साहित्य हस्तलिखित  असल्यामुळे  त्याची प्रत उतरवताना मूळ शब्द बदलले असावेत, कदाचित वेगळे असावे अशी शंका येते. जसे या कडव्यात  "विशाल शालवृक्ष रानि भवानि ध्यानि डोलति"  इथे रानि  (जंगलात )  पेक्षा रणी (युद्भूमीवर) हा शब्द  वर दिलेल्या अर्थानुसार यथोचित वाटतो, नाही कां? 


अनंतब्रम्ह आटपाटि  पूर्वमूखा बैसलि 

अनंत गुण, अनंत शक्ति विश्वजननि भासलि । सव्याभागि दत्त-आत्रि, वामभागि कालिका

 धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ।॥ ६ ॥ 

 युद्ध जिंकलेल्या आपल्या आईचे वर्णन करताना विष्णुदास म्हणतात, साक्षात अनंत ब्रह्म असलेली रेणुका माझ्या सन्मुख (आमोरा समोर ) पूर्वाभिमुख (पूर्वेकडे तोंड असलेली) बसली आहे. तिच्या उजव्या बाजूला आत्रेय-दत्त आहे तर डाव्या बाजूला कालिका देवी आहे. अशी अनंत गुण आणि अनंत शक्तीसम्पन्न रेणुका मला विश्वजननीच भासली.

•रेणुकेला आदिशक्तीच्या रूपात वर्णीले आहे. 

•काली देवी ही हिंदू धर्मातील एक प्रमुख देवी असून, तिला कालिका देखील म्हणतात. ती वेळ, मृत्यू आणि विनाश यांच्याशी संबंधित आहे, तसेच दिव्य ज्ञान आणि मुक्ती देणारी देखील मानली जाते. 

•दत्त म्हणजे अनसुया आणि अत्री यांचे पुत्र. 

•भारतात तांत्रिक पूजाविधी प्रसिद्ध होते, आहेत.

दत्तसंप्रदायात तसेच शाक्तपंथात तांत्रिक पूजा आहेतच.  हे कडवे  त्याच्याकडे निर्देश करते.

•आटपाटी = मराठीतील सामान्य वापरातील अनेक शब्द लुप्त झाले  त्यातील हा एक. "आटपाट नगर होते......" इथे हाच शब्द आहे.  एका नदीच्या दोन्ही तीरांवर  वसलेल्या दोन शहर म्हणजे  आटपाट नगर.  आटपाट म्हणजे एकमेकांच्या अमोरा-समोर .


पवित्र मातृक्षेत्र धन्य वास पुण्य आश्रमी

अंबदर्शनासी भक्त अभक्त येती आश्रमी

 म्हणूनि विष्णुदास निज लाभ पावला फुका 

धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ।। ७ ।।

मातृतीर्थ-क्षेत्री राहणाऱ्या आणि ध्यान अवस्थेत देवी विजयाचे दृश्य , देवी स्वरूपी रेणुकेला आपल्या सन्मुख बसलेले प्रत्यक्ष अनुभवले त्यामुळे विष्णुदास म्हणतात,  मातृतीर्थ क्षेत्र खरोखर धन्य आहे  माझा येथील निवास सुद्धा मला पुण्यदायी ठरला आहे. कल्पवृक्ष असलेली रेणुका आईच्या संगतीत मला फुकटच (काही कष्ट न करिता ) सर्वच लाभ मिळाले, धर्म अर्थ काम मोक्ष साधले.

 या तीर्थ क्षेत्रात अनेक भक्त तसेच अभक्त सुद्धा आईच्या दर्शनाला येतात. 


आजचा लेख प्रदीर्घ आहे कारण  हे अष्टक फार मोठे आहे, आकार आणि आशयाच्या दृष्टीने.

विष्णुदासांचे साहित्य हा माझ्या भक्ती आणि अनुसरणाचा विषय आहे. चिंतन करतांना मला जसा उलगडला तसा अर्थ इथे मांडला. हे अष्टक  फक्त आई रेणुकेचे वर्णन करणारे नसून  आदिशक्तीच्या विजयोत्सवाचे, वीररसपूर्ण आहे, असे मला वाटते. 

"अष्टक आहे पण यात सातच कडवे कां"? हा प्रश्न मला नाही पडला. कारण विष्णुदास हे उच्च कोटीचे परमभक्त व साधक होते.  त्यांच्या साधनेतून त्यांना जे दिसले ते शब्दातून उतरले. सातच कडव्यात अनुभूतीची पूर्तता झाली. मग आठवे कडवे कां शोधायचे,  नाही कां? 

विष्णुदासांचे साहित्य वाचताना भक्तिरसाचा परिपोष करण्याचा हेतू असावा, असे मला वाटते. 

पहिली माळ  रेणुकार्पणमस्तु 🙏🙏🙏🙏

©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 





12 comments:

  1. खरोखरच खूप खूप छान नवीन माहिती..!

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ प्रज्ञा देशपांडेSeptember 21, 2025 at 8:49 PM

      🙏🙏🙏

      Delete
    2. अतिशय अवर्णनीय असे रेणुकामातेचे भावनात्मक अष्टकाचे विवेचन केले आहे. मुळात रेणुकामाता सर्वव्यापी असून तीची नानाविध रूपे नवरात्रीच्या पावन काळा मधे मनाला प्रसन्न करतात.उत्तम निरूपण केले तुम्ही.

      Delete
  2. खूपच सुंदर...... जय रेणुकामाता

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ प्रज्ञा देशपांडेSeptember 21, 2025 at 8:50 PM

      🙏🙏

      Delete
    2. खूप छान माहितीपूर्ण लेख

      Delete
    3. धन्यवाद

      Delete
  3. आई रेणुकेने योग्य 'प्रज्ञेची' निवड करून इतकी सुंदर माहिती आमच्यापर्यंत पोचवली...आमचे भाग्यच.

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ प्रज्ञा देशपांडेSeptember 22, 2025 at 1:30 AM

      😊🙏धन्यवाद

      Delete
  4. खरंच अप्रतिम शब्दसंपदा !

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ प्रज्ञा देशपांडेSeptember 23, 2025 at 6:23 AM

      धन्यवाद

      Delete
  5. माझी रेणुका माऊली कल्प वृक्षाची सावली 🙏🙏🙏

    ReplyDelete

लो लो लागला

  🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏 #श्री रेणुका मातेची आरती. ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यां...