Tuesday, January 24, 2017

प्रकृती



सूर्य तळपतो आकाशात
सगळ्यांना जीवन देतो.
स्वत:तील उष्मा चराचरात पसरवतो.
कामच त्याचे ते की, किरण
पसरवून सगळ्यांना ऊर्जित करतो !
सकाळी कोवळा ,दुपारी चंड
 नि परतीच्या वेळी मृदू असे
 कमीजास्त तेज करणे
त्याचे त्याला छान साधते.
गरजेचे ही आहे तसे वर्तन
 त्याच्या दिनक्रमासाठी.॥१॥


सृष्टीतील वैविध्य प्रतिसाद
देते त्याला विविधतेने.
त्यांचेही बरोबरच आहे,
सजीवपणाचे लक्षण जपतात बिचारे.
झाडे बहरतात ,कधी करपतात.
कळी उमलते ,फूले कोमेजतात.
पक्षी उडतात, कोटराचा आश्रय घेतात.
जेवढे जीव तेवढे प्रतिसाद.
याला जीवसृष्टीतील संसारचक्र म्हणतात.॥२॥

पण ही वसुंधरा याच
घटकांनी नाही ना बनलेली.
वसू आहेत अनेक म्हणून तर
वसुंधरा म्हणवते ना स्वत:ला.
मूळात ती मृण्मयी आहे.
मातीचेच तिचे वैभव.
 मातीचेही प्रकार प्रकार
जपते एकाच न्यायानेपण.
चिकणमाती ,खडकाळ माती
,सुपीक माती,बंजर माती ,
वालुकामय कोरडी माती.
प्रत्येक मातीची धारणा वेगळी .
अनेक धारणांना एकवटून
 धरा सार्थ ठरते.॥३॥

वाळू तशी रूप मातीचे, मूळ दगडाचे
,गुणाने रेताड,हातातून सुटणारी ,
कायम अलिप्त राहणारी.
पाण्यात राहून कोरडेपणाच जपणारी .
अवगुण हा तिचा खरा गुण ठरतो,
कारण पक्केघर बांधायलाहि
 फारच कामाची .
वालूकामय वाळवंट
स्थितप्रज्ञेने जपणारी.॥૪॥

तळपणारा सूर्य सहज गतीने
तापवतो वाळूला.
पहिले तर ती जाम पेटतच नाही .
आधीचा थंडपणा सोडतच नाही
. मात्र संतत प्रखर किरणांनी
 तिला हा सतत तापवतो .
तपश्चर्येने त्याच्या ,कण नि कण मोकळा
 होऊन ती ताप ताप तापते .
॥५॥

याचे बरे ,हा जातो मावळतीला .
ती मात्र  अंगार झेलत
भाजते आतून स्वत:लाच.
तापून अधिकच कोरडी
नि अणुमय होते.
याला पुन्हा आश्चर्य वाटते की
कशाला साठवते बरे ही  उष्णता ?
मी तर तापवून मावळतो नेहमी सारखा !॥६॥

कसे समजावे याला?
तिच्या तरी कुठेय नशिबी अोलेपण?
 कशी बरे अपेक्षिता तिच्यातून शितलपण?
तुझ्या -तिच्या प्रकृतीतच खरा फरक आहे.
 गुण-अवगुण सारे मानण्यावर अवलंबून आहे.
कोणी तापते जगात म्हणून संतापणारे ही आहेत.
 स्वभावाचा वेगळेपणा ही पण  प्रकृतीच आहे.॥७॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
२૪.१.२०१७

4 comments:

  1. आता काय बोलू,तुमचे~आमचे,सर्वांंचेच अतूट नाते त्या वसुंंधरेशी!...ती देणारी!आपण घेणारे!

    ReplyDelete
  2. आता काय बोलू,तुमचे~आमचे,सर्वांंचेच अतूट नाते त्या वसुंंधरेशी!...ती देणारी!आपण घेणारे!

    ReplyDelete
  3. काय छान संबंध जुळवता मॅडम तुम्ही! संस्कृत शिक्षिका आहात पण मराठी सुद्धा माहोल रचता ।

    सुर्य आणिक वाळु याचा असा संबंध प्रथमतःच वाचला। अप्रतिम।

    ReplyDelete