Tuesday, December 31, 2019

#सहजोक्त.


गेले दोनतीन दिवस कडाक्याचा गारठा , त्यात  काल पासून पाऊस ! मग काय ढगाळ-हिवाळा ! सारीकडे पेंगुळणारे वातावरण ! सकाळी फिरायला जायला निघणार तर पाऊस , मृद्गंधासह !    मग काय , 'आधीच  उल्ल्हास , त्यात पौष मास!' फिरायला जायला तयार झालेली मी परत बिछान्यात , दुलईत गडप झाली.  पृथ्वीच्या कक्षेतून उपग्रह पाठवणं सोपंय पण अशा झोपाळू हवेत स्वतःला बिछान्यातून बाहेर काढणं अवघड !
काय मस्त झोपरं झोपरं वातावरण आहे आज दिवसभर ! स्वतःला शालीत लपेटून खिडकीपासच्या  दिवाणावर ,  मोठ्या मग भरून कडक कॉफीचा भुरका घेत निवांत पीत बसायचं , मंद आवाजात गझल  किंवा जुनी हिंदी गाणी ऐकायची असं ठरवलं मनात . न् एफेम् रेडिअो लावला. जे गाणं लागलं तेही आवडतंच गाणं होतं  .
मौसम पिच्चरमधलं ते गुलजारने लिहिलेलं गाणं दोन वेगवेगळ्या मुडमध्ये गायलेलं आहे. मला भूपेंद्रच्या अावाजातील संथ न् गंभीर चालीतलं गाणं जास्त भावतं . न् तेच रेडिअोत लागलं नेमकं .

  कधी तरी अशा वातावरणात फक्त न् फक्त स्वतःसाठी वेळ ठेवावा राखून . आजूबाजूला कोणीच नको. स्वतःच्या हृदयाचे ठोकेही सहज ऐकू यावेत न् धमण्यातून वाहणा-या रक्ताची हालचाल कळावी इतकं तन्मय व्हावं स्वतःत !
  मंद आवाजातील सुरेल गाणी सुद्धा हळूहळू विरून जावीत. आत्मलीन , आत्ममग्न होऊन आपल्याच पंचज्ञानेंद्रियांनी अनुभवावे फुरसती क्षण . कुठली गडबड नको , गोंधळ नको  , कोणाचेही नियंत्रण नको. बस श्वास घ्यावा नि सोडावा. स्मरण , चिंतन , मनन , उजळणीही नकोच नको. शून्यवत् व्हावं आत-बाहेर .
  एरवी व्यवहारिक जीवनात चार-ट्रॅकवर  धावपळ करावी. चोवीस तासातले अठ्ठेचाळीस तास भरपूर व्याप-ताप लावून घ्यावेत , यशस्वीपणे निभवावे. पण दोन-तीन महिन्यातून एकदा तरी आपणच आपल्यासाठी असावे ,  विशेष  क्षण  जागवे , नाही कां ?
  असे खास क्षण मनाला अधिक चैतन्यमय करतात , येणारे बिकट आव्हानही लीलया पेलण्याची ताकद देतात.
रोज रोज तेच तेच दैनिक कामं करून मरगळ येतेच . असा एखादा 'फुकट व्यर्थ' घालवण्याचाही  दिवस असावा ना नशीबात. नेमकं तसं मिळालं नाही तर मग काय ? हेच या गाण्यात लिहिलय गुलजारने.

दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात दिन -
बैठे रहे तसव्वुर-ए-जानाँ किये हुए .॥
 जाड़ों की नर्म धूप और आँगन में लेट कर
 आँखों पे खींचकर तेरे आँचल के साए को
 औंधे पड़े रहे कभी करवट लिये हुए ॥१॥
  वादी में गूँजती हुई खामोशियाँ सुनें आँखों में भीगे भीगे से लम्हे लिये हुए ॥२॥  दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात...
  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
  

Monday, December 30, 2019

#सहजोक्त.



#कविता.
क्षणा क्षणाचे हे जीवन ,कणा कणाने जगावे ।
मणामणाच्या दडपणाने मरणा आधी कां मरावे ।।
मानते जगणे नाही सोपे ,जागोजागी येथे धोके ।
सुखांशाच्या प्रतीक्षेचे शोधत जाणे नुसते मोके ।।
आजवर जे घडून गेले ,कशास गुंता पुन्हा तेथे ।
परतून येते न ते कधीही ,मनोरंजनी व्यर्थ स्मरते ।।
हवे हवेसे किंवा नकुसे ,अनुभव मर्मांकित वा हृद्य ।
पुनरपि वांछा कितीही तुम्ही,पुन: प्रत्ययाशक्य सद्य।
घडून गेले भूत जाहले ,भावी स्वप्न,म्हणूनि अप्रत्यक्ष।
वर्तमान जे आज या क्षणी, उपभोगावे मना तू दक्ष ।
आयुष्याचे सात रंग हे भले असो वा बुरे तरीही।
अंतरंगुनी मनापासूनी टिपून घ्यावे रीत खरी ।।
© डॅा प्रज्ञा देशपांडे

Sunday, December 29, 2019

#सहजोक्त.


श्रद्धा-अंधश्रद्धा.

वेदांमध्ये  *श्रद्धासूक्त*  आहेत.
*श्रद्धया कृतम् इति श्राद्धम्* असे मानतात. शिष्याला उपदेश करतात पहिले *श्रद्धस्व* असे सांगतात. भगवद्गीतेतही *श्रद्धावान् लभते ज्ञानम्*  असे म्हटले आहे. *धम्मपदातही* श्रद्धेचे महत्व मानले आहे. श्रद्धा महत्वाचीच आहे. त्याचे आलंबन योग्य वा अयोग्य असू शकते. ते सापेक्षही असू शकते . पण श्रद्धेशिवाय ज्ञान अशक्यच.
*अंधश्रद्धा*  हा शब्द मराठीत *लोकनायक बापुजी अणे*  यांनी आणला म्हटले तर वावगे ठरू नये. *तिलकयशोर्णव* या त्यांच्या संस्कृत महाकाव्यात *अंधश्रद्धजना: एते नित्यं धूर्तै: वंचिता:* असा उल्लेख आलाय.

श्रद्धा- अंधश्रद्धा ह्या भावनाच आहेत. बरेचदा एखाद्याची श्रद्धा दुस-यासाठी अंधश्रद्धा ठरू शकते. अनेकदा *आपला तो सोन्या दुस-याचा तो कार्टा* अशी अवस्था *श्रद्धा-अंधश्रद्ध* या बद्दल असते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Thursday, December 26, 2019

#सहजोक्त.

#सहजोक्त.

काही चाळता चाळता एक श्लोक वाचण्यात आला . कधी कधी अवचितपणे काही समर्पक गवसतं ते असं !
वक्तारः किं करिष्यन्ति श्रोता यत्र न विद्यते ।
नग्नक्षपणके देशे रजकः किं करिष्यति ॥
संस्कृत असूनही सरळ न् सोपं आहे समजायला.  "श्रोतेच नसतील तर वक्त्याने काय बरं करावं ? नागासाधुंच्या प्रदेशात धोब्याने काय काम  करावे बरे  ?" .
जेथे ज्या गोष्टीची गरजच नाही तेथे ती गोष्ट असून नसल्या सारखीच असते. मग अश्या वेळी ती नसलेली अधिक चांगली.
श्लोकाच्या स्पष्टीकरणासाठी व्यवहारातील अनेक उदाहरणं  देता येतील.आपल्या आयुष्यात अनेकदा , श्लोकातील  वक्त्यासारखी वा धोब्यासारखी अवस्था झाली असेलही.
आता हेच पहा की श्रोते नाही , सर्व व्यवस्था नीट केलेली आहे , हॉल सज्ज आहे. आता वक्त्याने काय करावे ? एकतर सोडून निघून यावे अथवा ज्या भाषणाची तयारी केली ते भाषण परिपूर्ण तयारीने सादर करावे. एवीतेवी कोणी असो अथवा नसो , आपला सराव होतो , आपण आपला सराव कां सोडायचा ? तीच गोष्ट नागासाधूंच्या देशाची. ते कपडे घालणारच नाहीत असां विचार न करता , कष्टसाध्य कां असेना , रजकाचा (धोब्याचा) व्यवसाय चालेल , यासाठी अतोनात प्रयत्न करायला हवे.
 श्लोकातील वक्ता अथवा धोब्यासारखी  वेळी  आली तर आपण नेमकं काय केलं ? यावर आपलं आजचं व्यक्तिमत्व न्  यशापयश अवलंबून असते.
 बरेचदा परिस्थिती अशीच असते .  मग  खापर फोडणे , निराश होणे , कोल्हाला द्राक्षे आंबट वाटणे , अर्ध्यातून पळून जाणे ,  परत त्या वाटी न जाणे ,  चुन्या सारखं सतत उबजणे इत्यादी इत्यादी न वागता ;  संथं , सातत्याने  कृतिशील सर्जनत्व अबाधित राखणे  , हाच खरा पुरुषार्थ !
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.



Monday, December 16, 2019

#वाकळ ~ एक संस्कार .

#सहजोक्त.
वाकळ शिवणे ही सध्याच्या काळात लुप्त झालेली कला आहे. वागळ , गोधडी म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ करण्याचा उपक्रम असे .   गरीबांची रजई असलेली वाकळ हळूहळू ग्रामीण भागातूनही  जवळ जवळ हद्दपार झालीय . शिलाईमशीनवर शिवतात काहीजण वाकळ , पण ती खरी वाकळ नाहीच . वाकळ शिवायला कसब , धीर न् ममत्व लागतं , "मोले घेतले शिवाया"  चालत नाही.
आमच्या लहानपणी खेड्यात घरोघरी वाकळीच असायच्या . उन्हाळ्यात आंथरण्यासाठी , हिवाळ्यात पांघरण्यासाठी तर कधी पार्टिशन म्हणूनही वाकळ उपयोगात येत असे.
वाकळ थंडीत गरम तर गर्मीत  हवी-हवीशी असे .
आजकाल महिला उद्योगात काही ठिकाणी वाकळ शिवतात , विकतात पण 'ती' सर नाहीच येत.
वाळत शिवण्याची पूर्वतयारी वर्ष वर्ष आधी करावी लागते. घरातील सर्वांचे वापरून वापरून फारच जुने , जीर्ण झालेले कपडे नीट धुवून जमा करून ठेवायचे. शर्ट , बंडी , झबले ,फ्रॉक इत्यादी इत्यादी कपड्यांच्या शिलाया उसवायच्या मग प्रत्येक छोटा मोठा चौकोन एकमेकांना जोडत जोडत मोठमोठे आयत-चौकोन तयार करायचे. फारच छोटे चौकट-कापटं असेल तर बाजूला राखून ठेवायचे , वाकळीवरचे डिझाईन काढायला. इकडे लुगडे , धोतर , साड्या ,  लुंग्या , अोढण्या यांनाही स्वच्छ धुवून एकमेकांना जोडायचे. म्हणजे एकमेकांवर ठेऊन नव्हे तर टोकाला टोक जोडत कमीत कमी चार न् जास्तीत जास्त ( सोय न् इच्छेनुसार) कितीही जोडायचे . आता या लांबच लांब जोड-कापडाला  साडेपाच / सहाफूट किंवा अधिक अश्या बेताने घड्या घालाव्या . मध्ये भरण म्हणून छोट्या कपड्यांपासून बनवलेल्या चौकटी , जुन्या कांबळीचे चौकोनी तुकडे टाकावे मग बाहेरून आत असे धावदोरा घालत जावे. धावदोरा इतका सफाईदार असावा की खालून व वरून गुंतागुंत नको. एकसारखं डिझाईन दिसावं . अशी पाचसहा स्तर असलेली वाकळ तयार झाली की मग छोट्या छोट्या चिंध्यांपासून पानं-फुलं , चिमण्या  , चांदणे असे वरून डिझाईनदार पॅच करावे. मग पूर्ण वाकळ तयार झाली की छान स्वच्छ धूवून कडक वाळवावी. ही झाली खरोखरची वाकळ. अशी मऊसुत , प्रेमळ-उबदार वाकळ बनवायला कधीकधी वर्षानुवर्षाच्या कपड्यांची साठवणूक करावी लागायची. जुन्या काळी वाकळ शिवणे , हे मुख्य काम नसून घरादाराची ,शेतीची कामे करून फावल्या वेळात करायचा उद्योग होता. चिकाटी , निटनेटकेपण , निरालस प्रयत्न  ,  प्रचंड कौशल्य न् घरातील प्रत्येक सदस्याविषयी मनापासून प्रेम   इत्यादी मुख्य  भांडवलावर वाकळ तयार होते.
आजकाल -  बाजारत जा , (सॉरी मॉलमध्ये जा ), पैसे फेक , (सॉरी कार्ड स्वाईप कर  किंवा गुगलपे कर ) नि मखमली रजई घे , असा प्रकार आहे . हे खरं स्वस्त न् ऐतखाऊ प्रकरण झालं आहे . उलट वाकळ तयार करणं अत्यंत किचकट व  मौलव्यान प्रक्रिया आहे.

एक एक चिंधी सुद्धा जोडून वाकळ तयार करणारी संस्कृती जेव्हा होती तेव्हा जातीपाती असूनही प्रेमाचे धागे न् मायेची ऊब कमी झाली नव्हती.  आज सारंच  नाते न् समाज पैशांच्या किमतीनुसार  स्टँडर्ड  ऊब विकत घ्यायला निघालाय . मग वाकळ शिवायचे संस्कार न् वाकळ देण्या- घेण्याची ऐपत  उरलीय  कुठे ?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Monday, August 26, 2019

रेडिअो

#सहजोक्त.
 कॉलेजला जाताना नेहमी प्रमाणे , FM रेडिअो सुरु होता. अचानक गाणे कानी पडले. नेहमी सारखं विचारचक्र सुरु झाले. शब्द होते ...

क्यों जिन्दगी की राह
में मजबूर हो गए
इतने हुए करीब के हम दूर
हो गए

तसं हे गाणं जुनंच आहे.  कॉलेजच्या दिवसांत ऐकले होतंच .  आज आयुष्याचे चढ-उतार अनुभवलेल्या मध्यम वयात हे  गाणं वेगळाच अर्थ सांगून गेलं .
संसार , जो समोर समोर त्याच्याच गतीने सरकतो ,जो कधीच परतून येत नाही.
 लहानपणी भावबंधांनी घट्ट जुऴलेले मित्रमैत्रिणींचे नाते ,जन्मभराचे  कायमचेच राहील , अशी भाबडी आशा असते. पुढे शिक्षणामुळे , नोकरीमुळे , लग्नामुळे हळूहळु   त्या भावना तितक्या तीव्र राहिल्या नाहीत , हे जाणवते. बरेच वर्षांनी पुनर्भेटीचा प्रसंग आला तरी  , " सारे जरी ते तसेच , धुंदी आज ती कुठे?" हे लक्षात येतेच.
 जन्माचं ,रक्ताचं , मैत्रीचं , कायद्याचं , व्यावसायिक असं कोणत्याही लेबलचं नातं असो , मनातून घट्ट जुळलेलं असो की नसो , सतत एकसारख्याच तीव्र , उत्स्फूर्त भावना नसतातच . "अतिपरिचयात् अवज्ञा" होते वा 'नावडतीचे मीठ अळणी ' किंवा 'चलो एक बार फिर से  अजनबी बन जाये' असे वाटू लागतेच .  जुन्या आठवणी बेचैन करतात , "कोई लौटाये मेरे बिते हुए दिन" , "दिल धूंडता है फिर वही फुरसत के रात दिन.." असं मनातून दाटून येतं . पण कधी खरोखर दोन दिवसांची फुरसत मिळाली तर , " ती मजा , ते क्षण , ते  सारे पुन्हा सानंदाने उपभोगू " असं मनातून ठरवतोही .पण लक्षात येतं की , "वृद्धत्वी निज शैशवास जपणे"  वास्तवात होतच नाही. दृष्य-अदृष्य अोझ्यांनी ते निरागस कोवळे मन कधीच जरड , निबर होऊन गेलेय , याची जाणीव होते . 
 अशा वेळी आतून पटते की , "क्यों जिन्दगी की राह
में मजबूर हो गए
इतने हुए करीब के हम दूर
हो गए"
पुढचा अंतरा तर बहुतेक  सर्वाच्या अनुभवाचाच असतो.

"ऐसा नहीं के हम को कोई भी
खुशी नहीं
लेकिन ये जिन्दगी तो
कोई जिन्दगी नहीं
क्यों इसके फैसले हमे
मंजूर हो गए"
 लहानपणीची काही स्वप्न  पूर्ण करण्यासाठी अतिशय कष्ट करून , जगात सन्मानाने जगायला जे जे हवं ते सारं मिळवण्यात बरेच वर्ष घसतो माणूस . मनाजोगं आयुष्य मिळवितोही .  पण काही तरी , कुठेतरी नेमकं हरवतं , छोटसं काही बिघडतं , ते हळवे-निरागस क्षण लोप पावतात  न् तरीही स्पर्धेच्या या युगातील घोडदौड सुरुच ठेवावी लागते .  हीच भावना सुधीर फडके त्यांच्या स्पष्ट पण कातर आवाजात म्हणून जातात ,
 " जे जे हवे  से जीवनी
 ते सर्व आहे लाभलेले
 तरीही उरे काही उणे.." 
 प्रत्येकाच्याच आयुष्यात असे , रिकामे  , सुने , व्यर्थ , बोझिल ,वांझ क्षण येतात. 'आला क्षण गेला क्षण' करीत जगणारे  जगतच रहातात  ,  त्या क्षणातून ना त्यांचे भले होत ना जगाचे काही अडत.  'चलता है भाई'  म्हणत गतानुगतिक संसरत राहातात .
 पण  कलाकार वा साधक या अशा क्षणांनी अधिक समृद्ध होतो . दर्द ,खलीश ,कसक , सल ,चुभन , वेदना ,भळभळती जखम ,चटका  कलाकारांना आतून ढवळून , तोडून मोडून टाकतो , पार उध्वस्त करतो न् मग जन्माला येते ती अजरामर कलाकृती ,जी कालजयी ठरते.  मंथनातून निघालेलं विष पचवण्याची ताकद असल्या शिवाय कोणाला तरी अमृत मिळेल काय ? तुटून ,कोसळून पडल्या शिवाय फिनिक्सभरारी घेता येणार नाही.  त्यामुळे "क्यों इसके फैसले हमे मंजूर हो गए"  अशी वेळ आली तरी चरैवेती चरैवेती करत रहावे ,
 काय माहीत जीवनात पुढच्या क्षणावर आपलेच नाव सुवर्णाक्षरांनी रेखाटले असेल, नियतीने !
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, July 2, 2019

#सहजोक्त

#जीवन-यात्रा.
घंटोंशी ते बोलत बसणे ,विषय असो वा तो ही नसो
नव्या नव्या त्या नात्यामध्ये भला बहाणा असो नसो
 बघता बघता अनुरक्तीने लिंपित झालो परोपरी  नवथरतेचे दिस सराले स्थिरावलो मग संसारी ॥

सरावले मग नाते जेव्हा वेळ जणु वैरी झाला
कधी कुठे न् कसां मिळेना दोघांमध्ये  रमण्याला
कुटुंब-करियर आणि समाजही वेळेचे हो वाटेकरी
उगाच सबबी सांगत सुटता बंध मुळचे अस्वस्थ जरी ॥
हळुहळू मग प्रतिमा मोठी झाली प्रत्यक्षाहुनी थोर
तिलाच जपण्या गेला अवघा नात्यांचाही हा तोल ॥
गोड गोजिरे पहिले सारे पलटुनी गेले बघता बघता
कर्तृत्वाच्या प्रतापमृगजळी  भाग्याने डाव साधला॥


वळूनि बघता जीवनपथ जो रम्य हवासा कधी वाटे
कितेक मोती आणिक रत्ने व्यर्थ दवडली इति भासे
काय कमविले ,काय गमविले विचार करता भय दाटे
शून्यातून या जगती आलो ,रमूनि ,परतुया  शून्याते  ॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.







Tuesday, April 9, 2019

#शब्दचिंतन.


कधी कधी शब्द कसे बदलतात , हे भाषेचं कोडं उलगडत नाही. कोणता शब्द कधी वर्णविपर्यस्त झाला ? अर्थपरिवर्तन कधी झाले हे कळत नाही. बरेच शब्द परंपरेने रूढ होतात. त्यांचा मूळचा अर्थ जाऊन नवा अर्थ चिकटतो , कधी, कसे , कोणी , हे प्रश्न गौण ठरतात. भाषेची हीच तर खरी गंमत आहे.
माझे आजोबा भा. ह. मुंजे (आईचे वडिल) अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. महाराष्ट्रात अर्थशास्त्राची पुस्तके पहिल्यांदा मराठीतून आणण्याचे व अर्थशास्त्रीय संज्ञांना मराठीत प्रतिशब्द देण्याचे कार्य त्यांनी केले. इंग्रजी ,संस्कृत व मराठी या तीनही भाषांवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. लहानपणी त्यांचा सहवास मिळाला , सर्व नातवंडात एकुलती एक नात म्हणून मी त्यांची अतिशय लाडकी होती , हे माझे परमभाग्य.
आजोबा ,अजूनही स्मरतात . त्यांची किरकोळ शरीरयष्टी ,सुरकुतलेलं अंग , धोतर ,काळी टोपी , एका हातात काठी व दुसरा हात मी पकडलेला ; असे त्यांच्या बहीणीकडे रोज न चुकता जाणारे. दुपारी वामकुक्षी घेण्यापूर्वी आम्हा नातवंडांना रामायण-महाभारतातील गोष्ट सांगणारे. कल्याण , The Truth वाचणारे , तत्कालीन प्राध्यापकवर्ग व विद्वानांना आदरणीय असलेले , तरीही आमच्यासाठी प्रेमळ व साधे असे आजोबा . आम्ही नातवंडेच नाही तर आजुबाजूचे सारेच जण त्यांना भय्यासाहेब म्हणत असू.
आजोबा अतिशय परंपरावादी व जुन्या वळणाचे होते ,हे नक्कीच . . एकदा कौतुकाने ,नव्हाळीचा म्हणून मावशीने माझ्यासाठीे पंजाबीड्रेस शिवला होता. मी घातला . त्यांना अजिबात आवडला नव्हता. हा आपला पोशाख नव्हे ,आपण परकर-पोलकं घालावं , असं ते म्हणाले. कितीही रागावले तरी ते मारत नसत , अपशब्द त्यांच्या तोंडी कधीच नसत.
त्याच काळात "कुर्बानी" सिनेमा व त्यातील "आप जैसा कोई मेरी जिंदगी में अाये...." हे गाणं रेडिअोतून प्रचंड गाजलेलं व प्रसिद्ध झालं होतं . गाण्याची मला आवड न् सगळ्या मैत्रीणी हेच गाणं म्हणणा-या , मग मी पण ते गाणं घरात म्हणू लागली . अाजोबांना ती सुरावट व ते शब्द बिलकुल आवडले नाही. मला समजावणीच्या सुरात म्हणाले , " *बेटा ,देवाने दिलेल्या गळ्यातून देवाची भक्ती होईल असं गायला हवं ग*." माझी बाजू घेत नक्कीच आई-मावशी काहीतरी बोलल्या असाव्यात . त्यावर ते म्हणाले ,"आर्त आळवणी मीरेनेही केली ना ? मग तसा भाव गाण्यातून यावा , उत्तानभाव नको."
जास्तीत जास्त मराठी शब्द योजावे यासाठी ते जागरुक असत. कोणालाही बाहेर जाताना ,"टाटा" म्हटले कि ते हमखास रागवायचे , "जय जय" म्हणावं , असं सांगायचे. *हिंदी-ऊर्दू-इंग्रजी शब्दांची भेसळ न करता ते स्वतः अस्सल मराठी-भाषा बोलत न् आम्हाला अनुकरण करायला संधी देत असत. कधी चुकून किंवा शब्द न आठवल्यामुळे आम्ही मराठी-इतर शब्द वापरला तर , न रागवता मराठी शब्द सांगून वाक्य पूर्ण करून देत असत*. सायंकाळी हातपाय धुतल्यावर " आई , नॅपकीन/टॉवेल दे " असे म्हटले की हमखास "हातपुशा,अंगपुशा दे म्हणावं " , असं शांत-प्रेमळ शब्दात कितीदा तरी त्यांनी सांगितले आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही होतं . ........................मी तिसरीत असताना त्यांना देवाज्ञा झाली . .....ते वारले . एक पर्व संपले.
परवा बोलताना कोणी तरी , "अरे यार!" हे संबोधन योजले , अन् आजोबा आठवले. "यार" हा शब्द वापरायचा नाही ; असा त्यांचा दंडक ! शोले ,जंजीर सिनेमातील गाण्यांमुळे यारी ,दोस्ती हे शब्द मैत्री शब्दाहून भारी वाटायचे. मग आजोबा उगाच रागवतात , त्यांना कळत नाही ,असा बालभ्रम मनात उमटायचा. 

संस्कृतसाहित्य ,शाक्तपंथ बद्दल काहीतरी वाचत असताना , वीज चमकावी तसा एक शब्द अवचित 'समजून' गेला. तो शब्द होता "यार"! अन् आजोबा कां रागवायचे , हे सकारण कळले. 

व्यवहारात भाषा-परिवर्तनामुळे नेहमी र<>ल , व<>ब , य<>ज असे वर्णपरिवर्तन होते. रयी >> लयी (विपुल ,खूप ) , वर्षात >> बरसात , यात्रा>>जत्रा इत्यादी अनेक उदाहरणे आहेत. 
संस्कृतात "जार" हा शब्द आहे. त्या शब्दाला विशिष्ट पंथ ,संप्रदाय ,विधी यांचे कंगोरे आहेत . जार-जारिणी , जारकर्म , असे संज्ञात्मक शब्द आहेत. सोप्या भाषेत 'जार' म्हणजे 'कामेच्छा पूर्ण करणारा साथीदार' ! 
'जार>> यार' असा त्याचा वर्णविपर्याय होतो. 

*"शास्त्रात् रूढिः बलीयसी!" हे त्रिवार सत्य आहे. मूळ अर्थ अतिशय वेगळ्याच पंथाचे असूनही वापरून वापरून ते पार गुळगुळीत होतात न् कुठेच टोचत नाहीत , हेही भाषेचे वैशिष्ट्यच समजावे*!! . मूळ अर्थ सभ्यतेला धरून नाही , हे माहीत असूनही
बरेचदा बोली भाषेत , दैनिक संवादात असे अनेक शब्द कोणीही वापरतात . छोटीशी यादी वानगी म्हणून देत आहे. रांड ,रांडलेक ,साल्या , चायला ,आयला , हरामजादा , हरामखोर ,भडवा इत्यादी इत्यादी .

*पण "यार" , या शब्दाने कधी , केव्हा , कशी मूळ अर्थाशी प्रतारणा केली व "सभ्यपणे" स्वतःला चांगल्या अर्थाने प्रतिष्ठित केले , हे शोधणे एक भन्नाट भाषिक-उपक्रम ठरेल* !! 
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, January 26, 2019

#सहजोक्त.


# पुरस्कार न् सन्मान  वगैरे वगैरे
ते तसे नेहमीच त्यांच्या    ऒळखीचे होते
घरीदारी त्यांचे नियमित येणेजाणे होते
त्यांना सतत फार मदत यांची होत होती
मग उतराई-योजना जाहिरसत्काराने केली ॥
तिला उच्च पदावर जायचेच होते जेव्हा
पुरस्काराची शिडी गरजेची  होती तेव्हा
याने केला सत्कार न् तिला दिला पुरस्कार
एकमेका सहायासी योजना असे असरकार ॥
प्रभाव मोठा याचा न् सर्विसही याची उदंड
याच्या प्रभावळीत फायदाच असतो अखंड
पुरस्कार देऊन झाले ,नागरी सत्कारही केले
फॅनक्लब स्थापुन रिकरिंग वसूल होऊ लागले ॥
फिल्मही अमाप झाल्या ,  छापून गौरवग्रंथा
आता  काय करू ज्याने वाहती राहील गंगा
आई त्याची झाली आता जगज्जननी थोर
जिच्या पोटी निपजले हे कर्तृत्ववान पोर ॥
पुरस्कार-सत्काराचे किस्से अनेक असतात
गल्ली ते दिल्ली व्यापक व्यासपीठे सजतात
भर्कन मोठे होण्याची प्रत्येकास आहे तहान
सगळ्यांची सोय करतो माझा भारत महान ॥
अनेक धंदे  फळतात आता कष्टाविणा एकत्र
लोकशाहीच्या नावाने उभे दबावगटाचे शस्त्र
घोटाळेही आदर्श ठरतात ,भानगडींचे भूषण
पद्म असो वा रत्न असू द्या , खटपटींना पोषण ॥
एकमेका सहाय करूनी अवघे धरिती सुपंथ
अवगुण आता गुणच ठरतात , नका करू खंत
अहो रूपं अहो ध्वनी, आदि पाठ आहेत ना म्हणी
 उदाहरणांचे पिक आता दिसे लोकी जनी॥
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.






Thursday, January 24, 2019

कविता

# डाग !
निळा गळा ज्याचा आहे हालाहलाची ठेव
कर्पुरगौर जो महादेव तो देवांचाही देव ॥

हरिणाकृती डाग शोभताे  शुभ्र  चंद्रावर
रसिक-प्रेमी-कवी-जनास आहे जो प्रेरक॥

चोवीस कॅरेट सोने घडवी पहा, मर्यादित दागिणे
 डाग जरासा देता घडती ,कलाकुसरी नजराणे ॥

 सुंदर सुमुखी गौरांगीच्या तीळ विलसतसे काळा
 गालावरती सुहास्यासह जणु सौंदर्य सोहळा ॥

  गोपबालकांसाठी मिरवी 'माखनचोर' पदा
  मनमोहन श्री वासुदेव हा , जगी वन्द्य सदा ॥

  कसा कुठे बुद्ध्या-अवचित पडता कधी डाग
डागही चांगला असतो म्हणणे पडते तेव्हा भाग ॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, January 15, 2019

तीन कविता

जे घडून गेले आहे ,बिघडवून गेले आहे
 खंत तयाची  मजला आजही सलते आहे.
 जे कधीही घडणे नाही ,वास्तव जन्मी अवघ्या
 उगाच मन कां रमते बघून स्वप्नी तयाला  ॥१॥
 निराश नीरस अवघे जेव्हा घेरून येती मज क्षण
आठवून मग स्वप्निलसे क्षणी उजळे माझे मन
 घडले ,गेले भूत जाहले कशा उगा हो साठवण
भूत-भविष्य सब झूठ न्  सत्य वर्तमान चिरंतन ॥२॥©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

  क्षण क्षण करता करता भरकन वर्षे सरून गेली
हिशेब करीत जगण्याची सवय मात्र तशी राहिली
किती जगलो किती जगू? हे ही नीट माहीत नाही
यालाच आता जगणं म्हणून काळ पुढे लोटत राहील ॥©डॉ. प्रज्ञा देशपांडे



आशेचा दोर न् स्वप्नाकांक्षेची भरारी
करावी अशी  संक्रमणाची तयारी

भविष्यगगनी निळ्या या अथांग
करावा विहार मुक्त आणि उदंड

असावा परि संध चक्रीसवे जो
जोडोनी धागा स्नेहाळसा तो

नको ताटतूट ,नको भरकट
असो बंध भूमीवरि मजबुत

  नाते धरेशी  घट्टसे वर्तमानी
    नि आस भावी जपोनि मनी
   ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
महानुभाव पंथातील व्रतवैकल्ये (?)

प्रास्ताविक
        भारतदेश अनेक पंथ, उपासना पध्दतीने नटलेला सर्वांग परिपूर्ण विचारधारांनी प्रगल्भ झालेला देश आहे. भारतातील अनेक पंथामध्ये 'महानुभाव पंथ' हा अतिशय वैशिष्टपूर्ण असा पंथ आहे.

पंथाविषयी वैशिष्टे :-
        या पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर आहेत. त्यानांच 'सर्वज्ञ' असेही म्हणत असत. त्यांचे गुरु गोविंदप्रभू होते. नागदेवाचार्य, केशिराजव्यास, कविश्वरव्यास, महादाईसा इत्यादी अनेक प्रसिद्ध महानुभावी आहेत. या पंथाचा प्रमुख ग्रंथ 'लीळाचरित्र' हा होय. त्याशिवाय सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, स्मृतीस्थळ, महादाईसाचे धवळे इत्यादी साहित्य प्रसिद्ध आहे.
       या पंथाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातील पहिले वैशिष्ट्य म्हणजे यांचे मराठी भाषाप्रेम. या पंथाचे बहुतेक साहित्य मराठी व काही साहित्य हे संस्कृत भाषेत लिहिलेले आहे, पण प्रामुख्याने मराठीतच. प्रथम आचार्य भटोबास म्हणजेच नागदेवाचार्य हे मराठीसाठी फारच आग्रही होते. केशिराजव्यास हे संस्कृतचे विद्वान होते. त्यांनी  संस्कृतमध्ये ग्रंथ निर्माण केले, आणिक ग्रंथ निर्मितीसाठी ते आचार्यांच्या परवानगी साठी गेले होते, पण भटोबासांनी त्यांना स्पष्ट सांगितले की "तुमचे अस्मात कस्मात मी नेणे गाः मज चक्रधरे निरुपिली मराठीः तियाची पुसा "
          याशिवाय पंथाची इतर वैशिष्ट्ये या प्रमाणे
१) या पंथात जातीभेद नाही.
२) स्री षुरुष समानता आहे.
३) उच्च निच हा भेद नाही.
४) गरीब श्रीमंत हा भेद नाही.
५) कर्मकांड मानत नाही.
६) विटाळ चंडाळ इत्यादी मान्य नाही.
७) द्वैतवादी पंथ आहे.
      महानुभाव पंथातील व्रतवैकल्ये
      मूळात या पंथाला व्रतवैकल्ये या शब्दाचेही वावडे आहे. आणि इतर उपासना पंथामध्ये जसे व्रतवैकल्ये असतात तशी या पंथामध्ये नाहीत. परंतु पंथ सुरळीत चालावा, उपासना अखंड असावी म्हणुन काही क्रिया चक्रधरानी अनुयायांसाठी आचारावयास सांगितल्या त्याला 'विधि' असे म्हणतात. ज्या क्रिया आचारायलाच हव्या त्याला 'विधि' तर ज्याचे आचरण निषिद्ध आहे त्याला 'निषेध' असे म्हणतात. सामान्यपणे लीळाचरित्रात जसे सांगितले आहे तसे आचरण करणे अभिप्रेत आहे. जे त्याप्रमाणे वागतात त्यांना अनुसरला असे म्हणतात.
        या पंथामध्ये जे संन्यस्त अनुयायी आहेत. त्यांच्यासाठी कडक विधि आहेत. हे विधी दोन प्रकारचे आहेत. १) नित्य विधी २) निमीत्त विधी
        नित्य विधी खालीलप्रमाणे आहेत
१] अटन २] विजन ३] भिक्षा ४] भोजन ५] स्मरण
६] प्रसादसेवा ७] निद्रा   
'हे सात नित्य विधी एकांकी व बहुतांच्या सांगाती असताही करावे.' असे सांगितले आहे. हे विधी नित्य नेमाने करावे असे सांगितले आहे.
       या सात नित्य विधींची माहिती थोडक्यात अशी -
अटन :- अटन म्हणजे फिरणे. पण हे पुन्हा तीन प्रकारचे आहे
१] स्थानवंदन करीत फिरणे :- चक्रधरस्वामींच्या लीळाचरित्रात ज्या ज्या स्थानांचा उल्लेख आलाय त्या त्या ठिकाणी जाणे.
२] अधिकारी लोकांशी भेटणे :- पंथामध्ये जे ज्ञातविरक्त असतील त्यांचे दर्शन घेण्यासाठी जाणे.
३] निरुद्देश फिरणे :- ईश्वर शोधनी विरहित अन्य कोणताही हेतू न ठेवता फक्त फिरणे
विजन :- एकांतात राहणे, चक्रधरस्वामीचे स्मरण करणे. याला विजन असे म्हणतात.
भीक्षा :- सर्वज्ञ चक्रधरानी भीक्षा मागावी अशी आज्ञा केली आहे पण त्यासाठी अनेक अटी सांगितलेल्या आहेत. "प्राणासी आहार द्यावा इंद्रियांसी न द्यावा" हे फारच महत्त्वाचे तत्व आहे. शिजविलेलेच अन्न मागावे, चातुरवर्ण्य चरैदभैक्षम्......म्हणजेच चारही वर्णीयांकडे भेदभाव न पाळता भीक्षा मागावी. भीक्षा मागताना एका घरी ' क्षण एक उभेया रहावे ' एक क्षण म्हणजे साधरणतः बावीस वेळा एक विशिष्ट 'नाम मंत्रजप' करीत एवढा वेळ होय.
    शिवाय उत्सव, मंगलकार्यप्रसंग, श्राध्द असेल अश्या घरी भीक्षेस जाऊ नये. महानुभाव पंथ संपुर्णपणे शाकाहारी होय. ज्या घराच्या परीसरात कोंबडीची विष्ठा दिसेल त्या घरात भीक्षा मागू नये. भीक्षा केव्हा मागावी तर "निर्धुम नगर झालेया गावांत भीक्षे रीगीजे" म्हणजे स्वयंपाक होऊन त्या घरच्यांची जेवणे वैगरे आटोपल्यानंर भीक्षा मागावी. म्हणजे फक्त पोटापुरते मिळेल. शिवाय "भीक्षा मागुनी नदीतीरा जाऊनी भोजन करावे" म्हणजेच कोणत्याही गोष्टींचा अगदी पाण्याचाही संग्रह करु नये. अपरिग्रह वृत्तीने जगण्यासाठीच भीक्षा मागावी.
        स्मरण :- महानुभावांचे आराध्य चक्रधर असले तरी ते मात्र 'पंचकृष्णा'ची भक्ती करतात. गोपालकृष्ण-श्रीदत्तप्रभू-चक्रपाणी-गोविंदप्रभू-चक्रधरस्वामी अशी पंचकृष्ण परंपरा आहे. पंथीय अनुग्रह घेऊन 'पंचनाम' जप माळ धारण करून करावा. त्यातही "पाचा गुण नामी त्रिकाळ स्मरिजे पाचवे ते निरंतर स्मरिजे" अशी आज्ञा आहे. या विषयी सूत्रपाठात उल्लेख आहे तो असा,"पश्चाता प्रहरी उठिजे तो सारस्वत काळ देवता ह्रदयासी ये" अशा प्रकारे स्मरणाचे महत्त्व येथे विषद केले आहे.
       प्रसादसेवा :- हा विधी सुध्दा या पंथाचे आगळे वेगळे पण सांगणारा आहे. स्थानपोथीत सर्वज्ञ कुठे थांबले कोणत्या लीळा कुठे घडल्या याचा उल्लेख आहे. त्या ठिकाणच्या पाषाणाला 'विषेश' असे म्हणतात. सर्वज्ञ आणि गोविंदप्रभू या दोघांचे वस्र, दात, नख, केस, इत्यादींचे अवशेष म्हणजे 'प्रसाद' होय. विशेष प्रसादाला नमस्कार आणि त्रिकाळ प्रसादसेवा ही करायलाच पाहिजे. या शिवाय ही सेवा करताना तेथील लीळा आठवाव्यात आणि नित्यदिनीचा पूजावसर आठवावा. यालाच प्रसादसेवा असे म्हणतात.
      निद्रा :- सर्वज्ञांचे त्यांच्या लीळांचे स्मरण करीत झोपावे. कारण 'यथा निद्रीस्त मागीले अध्यासेसीची उठी' म्हणजे 'जेणे अनुलक्षेसी निजला तेणेची अनुलक्षेसी उठिला' असे असते. म्हणजे झोपतांना ज्याचे स्मरण करावे तेच उठताना आठवते. यासाठीच सर्वज्ञांच्या लीळांचे स्मरण करीत निजावे, कारण निद्रेचा काळ हा 'ईश्वर प्रणिधनात' सत्कारणी घालावा. अशा प्रकारे हे सात नित्य विधी आहेत. नित्यविधींना 'माहेर' म्हटले आहे, कारण या विधीत स्वेच्छा, उत्स्फूर्तता असते.
       नैमित्यविधी :- काही निमीत्ताने केल्या जाणाऱ्या विधीना 'निमित्त्य विधी' असे म्हणतात. 'निमित्त्य विधीना' सासर असे म्हणतात. कारण येथे सक्ती कठोरपणा आहे. निमित्त्य विधी पुढीलप्रमाणे आहेत.
१] संग :- पंथाच्या श्रध्देने जो कोणी नवा व्यक्ती येईल त्याला संग द्यावा. "नवेयासी संग द्यावा" असे सुत्र येथे सांगितले आहे.
२] सांगात :- पंथाचे जे ज्ञानी अधिकारी [ ज्ञातविरक्त ] आहे त्यांचा समागम करावा. त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. या बाबत सुत्र असे "ज्ञाता विरक्तांचा सांगात करावा"
३] भेट :- पंथाचे तीर्थक्षेत्रे आणि आधिकारी [ज्ञातविरक्त] यांची भेट घ्यावी ती भेट अवचित किंवा बुध्दया जाऊन करावी. या संबंधी सुत्र सांगते "भ्रमत भ्रमता भेटी का आपजउनी भेटी"
४] सुश्रृषा :- जेष्ठ साधक व अशक्त रुग्ण अश्या पंथातील अनुसरलेल्या साधकांची वेळ प्रंसगी सेवा करावी. यालाच सुश्रृषा असे म्हणतात. "आपल्या पडीलीयाची सुश्रृषा करावी" असे सुत्र येथे या बाबत सांगता येते.
       वरील सर्व विधी हे पुर्वकालीक अनुसरलेल्या, संन्यस्त साधकांसाठी सांगितले आहेत. पण पंथाच्या प्रपंच करणाऱ्या उपासकांसाठी सुध्दा काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत.
   उपासकांसाठी विधी :- या पंथाच्या सांसारीक उपासकांचे चार प्रकार मानण्यात येतात.
१] नामधारक/संसारीक साधक :- असे उपासक नुकतेच अनुग्रह घेतलेले व पंचनाम माहित असलेले असतात.
२] वेधवंत :- असे उपासक पंथाचे पूर्वज्ञान पंथाला आकर्षित होऊन पंथात आलेले असतात.
३] बोधवंत :- या प्रकारचे उपासक पंथाविषयी संपुर्ण ज्ञान बाळगून असतात. आणि पंथीय श्रध्दा पूर्ण आदराने पाळत असतात.
४] वासनिक :- अश्या प्रकारचे साधक उपासक संख्येने कमीच असतात, अश्या उपासकांना पूर्णकालीक संन्यस्त साधक व्हायचे असते, पण काही सांसारीक जबाबदाऱ्यामुळे वचनपूर्ततेमुळे हे पंथात दीक्षा घेऊ शकत नाही.
     वर उल्लेखलेल्या सर्व अनुयायांनी उपासकांनी पुढील सात व्यसनांपासून दूर रहावे.
१] जुगार खेळणे
२] मांसाहार करणे
३] वेश्यागमन करणे
४] परस्री सेवना करणे
५] मद्यपान करणे
६] चोरी करणे
७] हिंसा करणे
       अहिंसेबद्दल या पंथाचा कडक कटाक्ष आहे. "हिंसा वर्ते तिये स्थानी महात्मेया असु नये" हे सुत्र हेच सांगते की प्रत्यक्ष तर सोडाच पण दुसरे कोणी हिंसेने वागत असतील तर तेथेही  राहू नये.
      हिंसा तीन प्रकारची मानतात.
१] आगान्तुक हिंसा म्हणजे मानसिक हिंसा
२] अनारब्ध हिंसा म्हणजे वाचिक हिंसा
३] प्रारब्ध हिंसा म्हणजे कृतीतून हिंसा
     अशा प्रकारे वरील 'विधीनिषेध' हे सर्वांसाठी सांगितले आहेत.
   समारोप :-
       आज भारतात इतर धर्मपंथाच्या तुलनेत महानुभाव पंथ संख्येने कमी आहे. पण वरील सर्व विवेचनावरून हे नक्कीच लक्षात येते की भारताच्या संस्कृतीमध्ये या पंथाने गुणात्मक अशी मोलाची भर नक्कीच घातली आहे.
                                           डॉ. प्रज्ञा देशपांडे [नागपूर]



        संदर्भ - गोपाल कपाटे
gopalkapate123@gmail.com
संपर्क- 9604708768 / 9405275212
निमोण ता संगमनेर जि अहमदनगर

लो लो लागला

  🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏 #श्री रेणुका मातेची आरती. ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यां...