#सहजोक्त.
बाईचे वय हा फारच कळीचा मुद्दा असतो. कोणत्याही स्त्रीला तिचे वय विचारणे हा शिष्टाचाराचा भंगच नसून फार मोठा अपराध आहे , असं समजतात.
"आँटी मत कहो ना !" हे केवळ स्त्रियांसाठीच असतं , असं कुटाळ , कुविचारी मंडळी मानतात. 'संतुर' हे महिलास्पेशल समजतात , हीपण पुरुषी मानसिकताच. बाकी "प्रत्येकालाच मिरवताना चिरतारुण्य हवे असते न् जबाबदारी पडली की वृद्धत्वाचे फायदे हवे असतात !" , हे ही समाजात दिसते.
जोक , टोमणे सोडून द्या . पण क्वचित विरळच स्त्री स्वार्थकेंद्री वागते. बहतेक सगळ्याच स्त्रिया आपलं कुटुंब , आप्त स्वकियांचा गोतावळा लीलया सांभाळत , नोकरी/उद्योग वगैरे करीत घराला हातभार लावत असतात. या सगळ्यांमध्ये त्या घरातल्यांची शुश्रुषा परिचर्या करतात न् स्वतःकडे हमखास दुर्लक्ष करतात . कोणी प्रामाणिकपणे कबूल करो अथवा न करो , स्त्रियाच संसाराचा कणा असतात. सगळ्यांसाठी झिजता झिजता तिचे आयुष्य संपून जाते. नेमकी स्वतःसाठी न् स्वतःपुरता ती जगतच नाही . मग प्रश्न पडतोच की तिचे नेमके वय काय मानावे ?
यावर उपाय सुचला . कोणत्याही स्त्रीचे वय दोन पद्धतीने मोजावे.
आणि महत्त्वाचे म्हणजे जिचे वय मोजायचे आहे तिला महिला न म्हणता मुलगी म्हणावे !
पद्धत क्रमांक १ >
तसं जगातील समस्त मुलींचे कमाल वय १६ हेच असते , हा ठराव कायद्याने संमत करून घ्यावा. सोळाव्या वर्षांच्या नंतर फक्त अनुभव वाढत असतो.
जसं => वय १६ वर्षे + अनुभव ३૪ वर्षे.
महिलेचे वय ५० वर्ष ठरविणारे शुद्ध वेडे असतात , त्यांना कायद्याने कठोर शिक्षा देण्याची तरतूद असावी.
पद्धत क्रमांक २ >
तिला पहिले अपत्य ज्या वर्षी झाले , तेच तिचे कायमचे वय . कारण आई म्हणून बाळासोबत तिचाही नवाच जन्म होत असतो. तिचे व्यक्तिगत प्राधान्यक्रम केवळ अपत्याभोवती फिरत असतात. पूर्वीची ती न् नंतरची ती पार वेगळीच असते.
जसे => तिला २६ व्या वर्षी अपत्य झाले . म्हणजे स्वतंत्र व्यक्ती म्हणून ती कायम २६ वर्षांचीच मानावी. अपत्यजन्मानंतर तिच्यातील "आई" पण जन्माला आली ना ! म्हणून जसे जसे मूल वाढेल तसे तसे आईचे वय ठरवायचे. म्हणजे ती किती वर्षांची ? तर मुलाच्या आईपणाच्या वयाचीच !!
तिचे वय २६ +१
२६+२ .....या प्रकारे मोजावे. उगाच ૪० /५० असं अविवेकी मोजणी करू नये.
अजून कोणाला कोणती पद्धत सुचत असेल तर नक्की सांगा.
तर हे झाले "महिला-वय-महात्म्य"!
पुरुषांनाही उगाच मन कोतं करून घेऊ नये . वय मोजण्याचे विविध उपाय त्यांनीही सुचवावेत. एखादा लेख "त्याचे वय" यावरही लिहिता येईल.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
डॉ प्रज्ञा तुम्ही खूप छान सुचवलं आहे.
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete