Thursday, January 4, 2018

#सहजोक्त



नावाला अर्थ असावा या मताची मी आहे. त्यातल्या त्यात व्यक्तीच्या नावाला तर अर्थ असलाच पाहिजे असे माझे ठाम मत आहे. माझं मत बाळगण्याचा मला अधिकार आहे.
माझ्या घरी अाधीच्या पिढीपासून ते पुढच्या पिढीपर्यंत सगळ्यांची नावे अर्थपूर्ण व वैशिष्ट्य युक्त आहे. माझी आजी अतिशय बुद्धिमती व कल्पक होती. आम्हा सर्व नातवंडांचे नामकरण तिनेच केले इतकेच नाही तर त्यांच्या पत्नींची नावं काय ठेवावीत हेही तिने डायरीत लिहून ठेवले होते.आमच्या मुलांची नावे आमच्या आईच्या सल्ल्याने ठेवली. आमच्या कुटुंबातील काही नावांचा इथे उल्लेख करतेय.
माझे वडिल श्रीश म्हणून त्यांनी माझ्या आईचे नाव श्री . श्री म्हणजे लक्ष्मी .श्रीचा म्हणजे लक्ष्मीचा ईश म्हणजेच  श्रीश म्हणजे विष्णु.
आम्ही तिघे भावंडं .माझा मोठा भाऊ  प्रणव म्हणजे अोंकार म्हणजे ज्ञानाची सुरुवात ज्या अक्षराने होते ते, तर वहिनीचे नाव ठेवले ऋचा म्हणजे ऋग्वेदातील मंत्र .
मधली मी . माझं नाव प्रज्ञा . अर्थ बुद्धी.
लहान भावाचे नाव प्रबोध म्हणजे ज्ञानाची जाणीव होणे. त्याच्या पत्नीचे नाव प्राची ,अर्थ पूर्व दिशा ,जिथून सूर्योदय होतो.
प्रणव-प्रज्ञा-प्रबोध म्हणजे पहिले ज्ञानाक्षर-बुद्धी-ज्ञानाची जाणीव .आमच्या नावातच सुसंगती आहे असे नाही तर आमच्या भावनाही तशाच आहे.
माझा मुलगा अद्वैत (ईशान) . अद्वैत म्हणजे आत्म-परभाव लोप होऊन एकवटणे. ईशान म्हणजे सर्वांवर सत्ता चालवणारा.
प्रणवचे  दोन मुलगे ,पहिला स्वक्ष म्हणजे सु+अक्ष सुंदर डोळे असलेला (विष्णुसहस्रनामातील एक नाव) , तर दुसरा शर्व अर्थात वाईटाचा विनाशकरणारा शंकर.
प्रबोधची दोन अपत्य . मोठी स्रग्वी . स्रज् म्हणजे फुलांची माळ ,स्रग्विन् म्हणजे गळ्यात फुलांची (वैजयंती) माळ घातलेला विष्णु.हे ही विष्णुसहस्रनामातील एक नाव आहे.  तसा स्रग्वी हा पुल्लिंगी शब्द .पण मराठीचे वळणच तसं आहे .सविता ,निलिमा ,गरिमा  ही मूळ पुल्लिंगी शब्द आपल्याकडे स्त्रियांची नावं आहेत. असो. त्याचा दुसरा मुलगा सिद्धार्थ . हेही विष्णुचेच नाव.
माझ्या बाबांच्या नावाचा अर्थ विष्णू आहे आणि आमच्या पासून ते आमच्या मुलांची नावं देखिल विष्णु संबंधी आहे.
नामकरण एकदाच (मुलींचे क्वचित दोनदा) होते त्यामुळे ते सार्थच ठेवावे .
 बाकी नावं काय ठेवावे    हा  प्रत्येकाचा    लाडका उद्योग असू शकतो.
©डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे.

No comments:

Post a Comment

सहजोक्त.

  . शिवी ... अबबो आता शिवीवर पण लिहायचे कां? 😊 हं! लिहिता येऊ शकते. मराठी भाषेत 'शिवी' शब्द कुठून, कसा आला असेल बरे? मराठी भाषेतील ...