स्तोत्रचिंतन -भाग २
देवीला मातृरूपाने पूजणे हे स्वाभाविक आहे. जगात आई एवढा लाड दुसरे कोणीच करीत नाही. आई एवढी सत्ता कोणावरच गाजवता येत नाही. म्हणूनच आदिशंकराचार्यांनी देव्यपराधक्षमापन स्तोत्र रचले.या स्तोत्राचे पहिले तीन श्लोक असे
न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथाः |
न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं
परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम् ||१||
हे आई ,मी मंत्र (विशिष्ट शब्दोच्चार ) ,यंत्र (विशिष्ट आकार),स्तुती (शब्दस्तुती), आवाहन(भावनिक साद) ,ध्यान(देविरूपाचे सतत स्मरण) ,स्तुतिकथा ,मुद्रा (हातांचे वा अंगांचे विशिष्ट आकार),विलपन(कारुण्य प्रदर्शक मंत्र) इत्यादि पूजाविधी मी जाणत नाही. पण आई मी हे (नक्कीच) जाणतो की तुझे अनुसरण करणे ,क्लेश दूर करणारे आहे.
दक्षिणतंत्र पद्धतीत अनेक मुद्रा-भाव आहेत. ते काहीही न जाणता मी इतकेच जाणतो की तुझेच अनुसरण करणे हेच खरे सुखाचे आधान आहे.
विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्या च्युतिरभूत् |
तदेतत् क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||२||
पूजापद्धती विषयक अज्ञानामुळे ,धनलोभाने ,आळसामुळे वा नियतीच्या शक्याशक्यतेमुळे हे आई तुझ्या चरणांपासून मी
ढळलो तरी ; जगाचा उद्धार करणारी ,कल्याण करणारी हे आई माझा अपराध पोटात घाल.
पुत्र वाईट निपजू शकतो पण आई कधीच वाईट नसते.
जीवन जगण्याच्या रगाड्यात नेमकं वर्मच हरवून बसतो आपण . जन्मताच जसे निरागस असतो ते मन हळू हळू जनरहाटीत प्रदूषित होते. परतीच्या प्रवासात हे लक्षात येते.लेकरू चुकतेच पण आईने सांभाळावे ना त्याला सर्व परिस्थितीत !
पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः |
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||३||
आई ग ,पृथ्वीवर तुझे अनेक पुत्र आहेत पण त्यामध्ये माझ्यासारखा एखादाच विरळातील विरळ आहे. (विषयासक्त झालेल्या )माझा हा (तुझ्यापासून दूर जाण्याचा ) त्याग योग्य नाहीच . हे शिवे(शिवाची पत्नी ) ,मुलगा वाईट निपजू शकतो पण आई कधीच वाईट नसते.
निसर्गचक्रानुसार आई होणं हे स्वाभाविक आहे पण "आईपण" एकदा समजलं की कोणतीच आई कुमाता होऊच शकत नाही.
मुलगा कितीही मोठा झाला तरी आईसाठी तो लहानच असतो.आईला अनेक मुलं असली तरी तिचा प्रत्येकाशी स्वतंत्र व विशेष अनुबंध असतोच .प्रत्येक मूल वेगळं असतं.
"कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति" ही काही श्लोकात समान अोळ आहे. ती एक प्रकारची टॅगलाईनच आहे या स्तोत्राची.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment