Monday, November 19, 2018

#सहजोक्त.


"तुझे आहे तुजपाशी परि तू जागा चुकलासी" असं प्रत्येकाच्याच जीवनात अनुभवायला  येतं. सगळं असतं तर वेळ नसतो ,वेळ असतो तेव्हा बळ नसतं , न् सर्व जुळून आलं तरी प्रत्यक्षात उतरतच नसते. काय कारण असावे ?? दैवात नसते कां मुळात मनातच नसते , ते सारं प्राप्त करणं ??
जन्माला आल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत जगण्यासाठी , अस्तित्वासाठी वा कशाच्या तरी साठी प्रत्येकाचीच धडपड ,लढाई सुरुच असते.
जगाच्या दृष्टीने चारचौघांसारखे वा असामान्य असलेली व्यक्तिमत्वे अनेक बाबतील अतिशय दीनवाणे असतात. निसर्गातही बघा . एकीकडे डोंगर असेल तर दुसरीकडे गर्ता ही असणारच . इकडे वाळवंट तर तिकडे हिरवळ. सुंदर ,नाजुक मोराचे पाय बेढब ,अतिशय ठणक पाठीच्या कासवाचे काळीज अतिनाजुक. 
मानवी मन , मानवी मेंदू अन् मानवी सर्जनता ,हे सारं एका विशाल सागरासारखं आहे.
 असामान्य गुण अंगी बाळगणा-यांच्याही  व्यक्तिमत्वात विसंगती ,उणीव वा काळोख असतोच असतो .  त्या न्यूनाला कमीपणा म्हणून लपवावे वा मोकळेपणाने स्वीकारावे ? यावर त्या व्यक्तीचे खरे भोग ठरलेले असतात .
असं हे चमत्कारिक मानवी व्यक्तिमत्व , कितीही अोळखल्या सारखा भासू दे ,प्रत्येक वेळी काही तरी अनोखं ,नवंच रूप घेउन  समोर येते.
जगासमोर स्वतःला असामान्यता देणारा एखादा गुण प्रतिष्ठित झाल्यावर ती व्यक्ती सुद्धा त्याच पैलूच्या प्रेमात पडते न् बाकीचे न्यून लपवीते वा ते न्यून कसे अपरिहार्य आहे ,याचा मानसिक ढाल बनवून स्वतःचा बचाव करते. पण हे करणे गरजेचे आहे कां ?? बेढब पायामुळेच मोर वेगाने पळतो , त्याचे नाजूक सौंदर्य , जीव वाचवायला  कामी येत नाही. ,हे खरे ना ?
जगातले जेवढे म्हणून महान ,थोर व्यक्तिमत्वांच्या चारित्र्य चित्रणातून ही गोष्ट ठळकपणे  दिसून येते की त्यांचे वैगुण्य त्यांनी सहजतेने न स्वीकारल्यामुळे  बरेच महान् जणं शेवटी बिचारे ठरले.  उलट ज्यांनी स्वतःतील अलौकिक प्रतिभेचा ,स्वतःतील वैगुण्यासह सहज स्वीकार केला ; ते खरेखुरे चमकदार तारे ठरले. उदाहरणच द्यायचे तर
ज्ञानेश्वर माऊली ,यांचे आहे. समाजाने वाळीत टाकलेल्या मायबापाचे ते पोर होते. समाजाने  केलेल्या अवहेलना-वंचनेने आई-वडिलांना जीव द्यावा लागला . पोरके झाल्यावरही समाज बहिष्कार न् उपेक्षा कायमच होती. तत्कालिन समाजमान्य बुद्धिमंतांपेक्षा किती तरी बुद्धी असूनही ,समाजात प्रतिष्ठित ठरावे वा आईबाबांच्या मृत्यूचा बदला घ्यावा अशी कोणतीही इच्छा न बाळगता आंतरिक समाधान मिळवत जगत गेले ,पलायनवाद वा लोटांगणवाद न करता नित्यकर्म आचरत राहिले. शेवटी समाजाला त्यांचे मोठेपण स्वीकारावे  लागले कारण मुळातून स्वतः माऊलींनी स्वतःचा परिपूर्ण स्वीकार केलेला होता.
"पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना " , हे सत्य स्वीकारले तर "यथा मतिः तथा गतिः " हे सुद्धा स्वीकारावेच लागेल. प्रत्येकाने स्वतःचे स्वतःला पूर्णपणे स्वीकारले तर जगाने  डोक्यावर घेतले काय किंवा पायदळी तुडवले काय , त्याला फरक पडणार ??
जवळच्या समजल्या जाणा-या व्यक्तींच्याही प्रतिक्रिया ,प्रतिसाद वा प्रतिस्पंदांनी स्वतःतील "मी" वर परिणाम व्हायलाच नको. "तुम्ही करा वटवट ,माझा मी बळकट" हे कायमचे मनात ठेऊन चरैवेति चरैवेति करावे. असे वागले तर बाहेरची द्वंद्वे तर सोडा आतून पोखरणारी चिंता सुद्धा संपेल न् खरोखरचे महान् व्यक्तिमत्व आपले आपल्याला सहज गवसेल.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

2 comments:

लो लो लागला

  🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏 #श्री रेणुका मातेची आरती. ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यां...