Saturday, February 18, 2017

नैसर्गिक

आज सहज फिरता फिरता
   रस्त्यांवर गळलेली पाने पाहिली,

हिरव्यां सह पिवळी सुद्धा
 वा-यासंग फिरत होती.।।१।।

 काय गंमत आहे निसर्गाची!
दोन्ही रंग एकमेकांना

 खुलवून रस्ता शोभवित होती.
आपल्याच धुंदीत मिरवत होती।।२।।

पिवळ्या-हिरव्याची रंगसंगती
निसर्गनिर्मित छानच होती

पिवळ्याला ना वैषम्य  होते
ना हिरव्याला तो खेद ।।३।।

निसर्ग नेहमीच स्वाभाविक अन्
नैसर्गिकच असतो ना!

कोवळेपण-बहर-पानगळ
 सर्व सहज किती झेलतो ना !।।४।।

कोवळेपणाची नवलाई नाही
बहराचा माज नाही

पानगळ होता कुठे म्हणून
जराशीपण खंत नाही।।५।।

निसर्गाचा क्षण न् क्षण
म्हणजे एक उत्सव असतो

प्रत्येक स्थिति-स्थित्यंतरे
चैतन्ययुक्त प्रतिसादच असतो।।६।।

जे जसे पडले दान
त्यातून तसे घेतले भान

परिस्थिती काही असो
कधी खंत ना अभिमान।।७।।

काय हरकत आहे मानवांनो
होऊ या की आपण नैसर्गिक

जे म्हणून समोर येईल
प्रतिसाद द्या की स्वाभाविक।।८।।

चूक-बरोबर,योग्य-अयोग्य
अपेक्षित -अनपेक्षित सोडा सारे

ओझे फेका अन् मुखवटेही
न्यायाधीश बनणे सोडा रे।।९।।

आतल्या सादेला प्रतिसाद द्या
निसर्गाला दाद द्या

तीळ-तीळ मरणापेक्षा
कण-कण उजळू द्या।।१०।।

निसर्गाच्या निसर्गलीला
डोळे उघडून बघा ना

निसर्गाकडून तुम्ही देखिल
काही तरी शिका ना ! ।।११।।
©Dr.PRADNYA DESHPANDE

Tuesday, February 14, 2017

रजनीगंधा फुल तुम्हारे..

रजनीगंधा फुल तुम्हारे....

जुनं गाणं,अवचित कानी आलं ,मन स्मृतीत रेंगाळले.
निशिगंधाचे फुलं ,अंगणात ताटव्यात डोलाने बागडतात ,हवेच्या झुळूकीसरशी गंधेंद्रियांच्या माध्यमातून मनाला गंधाळतात .मन सुगंधित ,प्रसन्न ,हळुवार,रसिक होते .
झुळूक अलवार-अचानक येते. सतत एकसाारखी नाही. तरी मनात तो स्मृतिगंध रेंगाळत राहतो ,मनाला ताजं-तवानं करत राहतो.
आठवणीतीलही  रजनीगंध  धुंद करतो-चित्तवृत्ती प्रफुल्लित करतो.अगदी अशीच सजणाच्या प्रेमाची जाणिव तिच्या अनुरक्त मनाला शांतवते.
शब्दबद्ध होत गाणं फुलतं..................
"रजनीगंधा फुल तुम्हारे ,महके यू ही आंगन मे..यू ही महके प्रीत पियाकी मेरे अनुरागी मनमे ..."

तिचे मन अनुरक्त आहे .ती त्याच्या प्रेमात आहे.तिच्या मनात त्याच्याविषयी मधुर भावना आहेत.म्हणून तिच्या मनात  त्याची प्रीत महकते आहे ,
तिला सुगंधित करते आहे.
"तस्यतदेव हि मधुरं
 यस्य मनो यत्र संलग्नम्" ,
त्याची तिच्या विषयी भावना काय?
 हे कळायला मार्ग नाही .कारण हे तिने म्हटलेले गीत आहे. तसेही...... कोणाला काय वाटते?....... पेक्षा आपल्याला जे वाटते तेच सगळीकडे अनुभूतीला येते.

आजच्या इन्संट जमान्यात कोणाच्या आठवानेही चित्तवृत्ती प्रसन्न व्हाव्यात ,हे आश्चर्यच!
मनाने ,भावनेने एखाद्यात खोल गुंतल्या शिवाय
असे "महकणे" समजायला अवघडच !
पुढचे कडवे तर आजकालच्या व्यवहारात समजण्याच्या पलीकडचेच आहे.

"अधिकार ये जबसे साजन का
हर धडकन पर माना मैने
मै जब से उनके साथ बंधी
भेद तभी जाना मैने
कितना सुख है बंधन  मे"!

आज जिकडे तिकडे मुक्तीचे वारे वाहात आहेत. स्त्रीमुक्ती ,सांस्कृतिक मुक्ती ,आर्थिक मुक्ती वगैरे वगैरे.. अशा वेळी "बंधनात सुख"!!!
 विडंबनच वाटावे ,होय ना?
ती म्हणते जेव्हापासून मी माझ्या श्वासावर त्यांचा अधिकार आहे हे मानलं तेव्हा पासून मी बंधनात पडली नि बंधनात काय सुख आहे ते मला उमगले"!!

अरेरे काय पुराणमतवादी विचार बरे या स्त्रीचे !! लग्न झाल्यावर नव-याचेही बंधन न मानणा-या
 मुक्त स्वातंत्रवादी बायका कुठे नि ही लग्न न होता केवळ मनाने वरलेल्या प्रियकराचे बंधन श्वासावर  आहे. हे चक्क कबुल करते वर बंधन सुखदायक वाटते तिला !!! अगदीच निराशाजनक हो !!

"आशा नाम मनुष्यानां काचिद्भूत श्रुंखला।
यया बद्धा प्रधावन्ति ,मुक्ता तिष्ठन्ति पङ्गुवत् ॥

काळ कोणताही असो *आशा* बलवत्तर असते.  आशेने जे बांधले गेले ते धावतात .मात्र मोकळे असलेले निराश लोकं पंगु प्रमाणे थांबून जातात.

"प्रियकर माझा आहे . तो कायम मला जपेल. सुखात ठेवेल.प्रेमबंध नीट जपेल. जगाच्या आक्रिताला सामोरा जाईल तो. मला सगळ्या संकटातून काढेल तो".असे आशेचे मनोरे तिच्या मनात उभारले जात असतील.आणि याच आशेच्या बंधनामुळे ती सुख अनुभवत असेल.
 ज्यांना ही आशा नाही ,प्रिय अशी सुखस्वप्ने नाहीत ते  *बंधन* म्हणजे जोखडच समजणार ना!

आज प्रथमिक वर्गांमध्ये फस्टक्रश होतं ,माध्यमिक वर्गांमध्ये डिपलव्ह , कॉलेजात जाईपर्यंत रिलेशनशीप न् खरे लग्नाच्या वेळेपर्यंत सर्वबंधमुक्त...............
असे वातावरण असतांना हे गाणे म्हणजे दिवास्वप्नच ना!
पण खरच !
ज्यांनी ख-या प्रेमाचे मोरपीस ह्रदयावर हळुवार फिरलेले अनुभवलेय ,
ज्यांनी स्वत:ला अातून उमललेले बघितले आहे
 नि ज्यांनी हे बंधन कोणत्याही परिस्थितीत आनंदाने सांभाळले.
भाळणे ते सांभाळणे या प्रवासात ज्यांनी प्रत्येक क्षण उत्सव रूपाने साजरा केलाय.........
 त्या सर्व भाग्यवंत युगलांना शतश: प्रणाम  !

©डॉ. प्रज्ञा देशपांडे..

Monday, February 13, 2017

जीवनम् ।(संस्कृत कविता)

जीवनम् ।(संस्कृत कविता)

जीवनं जीवनं,जीवनं हि तदा
त्वं मयाहं त्वया सहितं नु सदा ॥

जीवितं जीवितं जीवनं त्वया विना
कथं तु जीविता इयं वंचना साहना ॥

त्वया सह क्षणैकं मे संजीवनमिव सदा
फुल्लतरलचित्तरङ्गैर्व्यापृतं मन: सर्वदा ॥

वरं वनं सह त्वया  विना काननं  हि गृहम्
आवृता परिवृता सदा त्वयास्म्यहम् ॥

सदैव सङ्गतो भव सदानुरक्तो मयि
जीवनमिदं मम समर्पितं मया त्वयि ॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

काल एके ठिकाणी "अमराठीकाव्यस्पर्धेत"ही माझी रचना पाठवली. प्रथमक्रमांक आला.
संस्कृत ,भाषा आहे .त्यामुळे सगळ्या भावना तिच्यातून व्यक्त करता येतात.
अतिशय नियमबद्धभाषा असूनही नवनिर्मिती शक्य आहे.
इतर भारतीयभाषांप्रमाणेच लक्षपूर्वक वाचले तर अर्थ कळतो.
तरीही कवितेचा सारांश असा
(१)जेव्हा तू माझ्य़ा व मी तुझ्या सोबत असू तेव्हाच जीवन खरे जीवन असेल.

(२)तुझ्याशिवाय जे जगले ती वंचना नि सहनाशक्ति होती

(३)तुझ्यासह एक क्षण नवसंजीवक असून मन प्रफुल्लित-तरल-प्रसन्न करणारा असतो.

(૪)तुझ्यासह वनवास सुखाचा तुझ्याविना घर जणु वनवासच.

(५)माझ्यावर अनुरक्त तू नेहमी सोबत रहा .माझे जीवन तुला समर्पित आहे.

संस्कृतमध्येही रचना/ निर्मिती होते. भाषा ,कोणतीही असो गोडच असते. मग जुनी म्हणून हिला कां सोडा ?? म्हणून कविता रचली.
 🙏🏼

Saturday, February 11, 2017

शब्दचिंतन

#शब्दचिंतन

काल नवा शब्द कळला...."अपैशुन्य"!  पिशुन म्हणजे  रानटी,हिस्र हा संस्कृतमध्ये अर्थ माहित होता.
पण माऊलींच्या शब्दकळा नि अर्थगर्भता अद्वितीयच. मराठीतील  भरजरी महावस्त्र म्हणजे "ज्ञानेश्वरी".

माऊली म्हणताता.......

तैसे आपुले निगुणे।पुढीलांचे उणे।फेडूनिया पाहणे ।तयाकडे॥
वाचूनि न विंधिजे वर्म।नातुडविजे अकर्मी।न बोलविजे नामी।सदोष तिही॥
वरी कोणे एके उपाये।पडिले ते उभे होये।तोचि किजे परीघाये नेदावे वर्म॥
(ज्ञानेश्वरी १६.१૪९.५)

सरलार्थ....
त्याच प्रमाणे आपल्या चांगुलपणाने दुस-यांचा कमीपणा नाहीसा करून मग त्याच्या कडे पाहावे.
ए-हवी असे न करता कोणाच्या वर्मावर टोचू नये.पापकर्मामध्ये कोणास गुंतवू नये.आणि ज्या नामामध्ये याच्या दोषांचा उल्लेख होतो अशा नामांनी यास हाक मारू नये.

खरोखर "माऊली" माऊलीच आहेत.  संस्कृतनुसार "अपैशुन्य"चा अर्थ दुष्टपणा/जनावरपणा नसणे किंवा संस्कारित असणे इतकाच होईल.
पण माऊलीच्या अमृतस्पर्शाने मराठी संपन्न झाली.
अपैशुन्यचा अर्थ (माऊलींच्या नुसार) =दुस-याच्या दोषांवर टीका न करता त्याला सन्मार्गी लावण्यासाठी आपल्या गुणांचा उपयोग करणे.

खरोखर जेथे इतकी सहज शब्दश्रीमंती योजली जाते तेथे वात्सल्यपूर्ण निर्मळ मन असणारच.
दुस-याचे दोष दाखवू नये उलट त्याला कमीपणा न आणता आपल्या चांगुलपणाने ते दूर करून त्याला मोठे करावे.....केवळ थोरच...
.छानच ....मननीय...चिंतनीय...वर्तनीय........

माऊली अजोड आहेत. पसायदान तेच मागू शकतात.
🙏🙏🙏
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

शब्दचिंतन

#शब्दचिंतन

काल नवा शब्द कळला...."अपैशुन्य"!  पिशुन म्हणजे  रानटी,हिस्र हा संस्कृतमध्ये अर्थ माहित होता.
पण माऊलींच्या शब्दकळा नि अर्थगर्भता अद्वितीयच. मराठीतील  भरजरी महावस्त्र म्हणजे "ज्ञानेश्वरी".

माऊली म्हणताता.......

तैसे आपुले निगुणे।पुढीलांचे उणे।फेडूनिया पाहणे ।तयाकडे॥
वाचूनि न विंधिजे वर्म।नातुडविजे अकर्मी।न बोलविजे नामी।सदोष तिही॥
वरी कोणे एके उपाये।पडिले ते उभे होये।तोचि किजे परीघाये नेदावे वर्म॥
(ज्ञानेश्वरी १६.१૪९.५)

सरलार्थ....
त्याच प्रमाणे आपल्या चांगुलपणाने दुस-यांचा कमीपणा नाहीसा करून मग त्याच्या कडे पाहावे.
ए-हवी असे न करता कोणाच्या वर्मावर टोचू नये.पापकर्मामध्ये कोणास गुंतवू नये.आणि ज्या नामामध्ये याच्या दोषांचा उल्लेख होतो अशा नामांनी यास हाक मारू नये.

खरोखर "माऊली" माऊलीच आहेत.  संस्कृतनुसार "अपैशुन्य"चा अर्थ दुष्टपणा/जनावरपणा नसणे किंवा संस्कारित असणे इतकाच होईल.
पण माऊलीच्या अमृतस्पर्शाने मराठी संपन्न झाली.
अपैशुन्यचा अर्थ (माऊलींच्या नुसार) =दुस-याच्या दोषांवर टीका न करता त्याला सन्मार्गी लावण्यासाठी आपल्या गुणांचा उपयोग करणे.

खरोखर जेथे इतकी सहज शब्दश्रीमंती योजली जाते तेथे वात्सल्यपूर्ण निर्मळ मन असणारच.
दुस-याचे दोष दाखवू नये उलट त्याला कमीपणा न आणता आपल्या चांगुलपणाने ते दूर करून त्याला मोठे करावे.....केवळ थोरच...
.छानच ....मननीय...चिंतनीय...वर्तनीय........

माऊली अजोड आहेत. पसायदान तेच मागू शकतात.
🙏🙏🙏
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

Thursday, February 9, 2017

I love you म्हणणे

किती सोपं आहे आजकाल ,
आय लव्ह यु म्हणणं
 नेमकं मनात काही असो ,
तोंडावर फक्त सांगणं
 लहान-मोठं कोणीही असो,
 लव्ह यु म्हणतात
भावनेचा पत्ता नाही,
शब्दच्छल मांडतात।।१।।
जबाबदारीचे दुसरे नाव
 म्हणजे असते प्रेम
जिवापाड एखाद्याला
 जपणे असत प्रेम
काळजी घेत फुलवत ठेवणं
 याला म्हणतात प्रेम
खाचखळग्यातून अलगद
 तारणे हेच खरे प्रेम ।।२।।।
 आय लव्ह यु म्हणत
 प्रदर्शनाची गरज काय?
जातीच्या सुंदरा
आरश्याची गरजच काय??
न म्हणताच ,वागण्यातून
हळुवारपणे कळून येते
फुलाचे उमलणे झुळकी
सरशी आसमंत दरवळतो।  ।।३।।
नजरेतून स्नेह
 कायमच पाझरतो
स्पर्शातून वात्सल्य
 ओसंडून वाहाते
बोलण्यातून माया
 तशीच व्यक्त होते
आपसूकच जपणे
 कृतीतून सिध्द होते ।।४।।
हृदयात प्रेम रुजले
 की दुनिया आनंदी होते
कण न कण उजळून
जणु नवा जन्मच लाभतो
क्षणोक्षणी चैतन्य बहरून
 शरीराला वेढून असते
जगणे म्हणजे केवळउत्सव
तनामनात साजरा होतो ।।५।।
ख-या प्रेमात शब्दच
 जणु निश्शब्द होतात
दूर-जवळ  भौतिक अंतर
आपोआप लोपते
भावनिक एकतानता
सहज साधून जाते
मी -तू नुरून पूर्ण
 आकाश -पृथ्वी एकवटते।।६।।
किती सोपं आहे
 तसं वरपांगी जगणं
लव्ह यु म्हणत
गावभर वाण वाटत फिरणं
 दोन ग्रॅमचे दागिने
 चलनी अन् मस्त
तरी सुद्धा बाजारात
 सोनं नाही स्वस्त ।।७।।
©Dr. Pradnya Deshpande

Friday, February 3, 2017

पुषादितवार


आज रथसप्तमी.
आठवण आली लहानपणाची.
कॉलनीत घरोघरी आज लगबग असायची.
सूर्य-रथ अशी रांगोळी तुळशीजवळ काढायची. चुलीवर बोळक्यात खिचडी शिजवायची.
आज हळदी-कुंक कार्यक्रमाचा शेवटचा दिवस.
आता एकदम चैत्रातील हळदीकुंकवाची वाट बघणे.आज माघ महिना लागला.
पण पौषात मकरसंक्रमणापासून घरोघरी सूर्यपूजन होत असे.
दर रविवारी आजी तुळशीजवळ रांगोळीने  सूर्यनारायण काढायची.
त्यावर तिळ-गुळ,बोर,ऋतूद्भव फळे ठेवायची. सुगड्यात कोरडी खिचडी ठेवायची.
दुपारी सगळी कामधामं आटपून आजी तुळशीपाशी बसायची . तिच्या मैत्रिणी पण जमायच्या ,तिजारे आजी,बैतुले आजी वगैरे. मग मी माझ्या मैत्रिणी तिथे येऊन बसत असू.
 मग आजी "पुषादितवाराची कहाणी" सांगायची.
 . सुरवात अशी असे "एका राणोबाई तुमची कहाणी...." पाचसहा कहाण्या आजी सांगायची. प्रत्येक रविवारी त्याच त्याच कहाण्या.
त्या कहाण्या वैज्ञानिक- तार्किक-वास्तविक वगैरे नव्हत्या.बोध- मर्म वगैरे पण नव्हतं त्यात काही. म्हातारी - गावखेडं-झाडं हेच वर्ण्य विषय.सूर्याच्या कृपेने काय मिळाले त्यांना ...ते रसाळ पद्धतीने वर्णन व आजीची सांगण्याची हातोटी. मज्जा यायची ऐकायला. दरवर्षी हाच उपक्रम -तिच्या भाषेत व्रत अखंड सुरु असे.
 आज विचार करते, काय मिळाले त्यातून ? नकळत भाषिकसंस्कार झाले ,कल्पनाविश्व समृद्ध करण्याचे कारण झाले ,कहाणी सांगण्याचे बीज रोवले गेले,,नियमिततेने केलेला उपक्रम म्हणजे व्रत हे कळले,भाषेची गोडी लागली..........अजून बरच काही जे शब्दांच्या पलीकडले आहे.
 आज वाटते ,आम्ही नशिबवानच . ट्युशन-क्लास-करियर,असे काहीच आमच्या पालकांच्या डोक्यात नव्हते. "फुंकर मारून फ़ुल उमलवण्याची घाई कोणालाच नव्हती" .आमच्या गतीने-कुवतीने आम्ही जात होतो ........खरच सुखीच होतो...
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
३.२.२०१७

शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...