Friday, June 23, 2017

# सहजोक्त


#सहजोक्त.

केव्हाचा कोसळतोय संतत धारा पाऊस
चिंब भिजण्याची चराचराला हौस॥

अशाच पावसाची धरणीला आस होती
जलधारांची  तिच्यावर अखंड  वृष्टी  होती ॥

तापलेल्या मृण्मयीला  गरज होती अोलाव्याची
नको आता कृपणता ,बरसात कर ना मायेची ॥

तुझ्या वर्षावाने होईल हिरवीगार वसुंधरा
नवसर्जनशाली ठरेल सस्यश्यामल हि धरा ॥

बरस रे अवनीवर , मेघराजा बिनघोर मनापासून
कृतार्थ तुझेही जीवन होईल बघ या समर्पणातून  ॥

©डॉ.प्रज्ञा देशपांडे
नागपूर 

Thursday, June 22, 2017

# सहजोक्त

#सहजोक्त
२३.।२०१७

अस्तित्व देवाचं नक्की आहेच खास
ठेवा अगर नका ठेऊ तुम्ही विश्वास ॥

तुम्ही पूजा वा नका आठवू त्याला
तो मात्र जपतो हरघडी तुम्हाला ॥

तुमच्याही नकळत तो सोबत असतो
तुम्हाला अलगद  तारत असतो तो ॥

भले-बुरे प्रसंग जेव्हा येतात जीवनात
पूर्णता आणतात ते व्यक्तिमत्वात ॥

मनापासून स्वत:वर खूप प्रेम करा
कायमच तो राहतो तुमच्या अंतरा ॥

स्वत:वर ठेवा पूर्ण खरा विश्वास
झोकून द्या सातत्याने कर्तव्यास ॥

अखंड अविरत चांगली कामं करा
हेवे-दावे -दिखाऊपणा सारे विसरा ॥

यशापयश ,हारजीत मूल्यमापन सोडा
प्रतिक्षण उत्तमतेचा ध्यास मात्र धरा ॥

नका शोधू त्याला तुम्ही दूर-बाहेर कुठे-कुठे
तुमच्याशिवाय अस्तित्व आहे त्याचे भिन्न कुठे?

निर्मळ विचार ,शुद्ध आचार , हीच पूजा खरी
आता तरी जाणा वर्म जगण्याचे तुम्ही परोपरी ॥

©डॉ.प्रज्ञा देशपांडे.
नागपूर







Sunday, June 18, 2017

#सहजोक्त

#सहजोक्त

चराचर व्यापी , प्राणांचा ही प्राण
विठ्ठला तू भक्तवत्सल रे महान ॥

तुझ्या कृपेने जडमूढ उद्धरले
विश्वात सा-या मांगल्य पसरले ॥

तूच कर्ता ,करविता ,कारण
तू साध्य-साधक-साधन॥

दीनांची माऊली , तू भक्तवत्सल
कृपावंत दाता हा माझा विठ्ठल॥

  पंढरपूर व्हावे माझे  अवघे अंग
  आत्मा म्हणजे साक्षात् पांडुरंग  ॥

  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे
  नागपूर.

Thursday, June 8, 2017

#सहजोक्त

#सहजोक्त.


मनाच्या गाभा-यात प्रसन्न घुमणारा
आर्त सादेला उत्कट प्रतिसाद देणारा ॥


तुझा आवाज खोल हृदयात शिरणारा
कानातून पार अंतरंगात झिरपणारा ॥

मनाला मोरपिसी हळुवार उमलवणारा
आतून मुलायम नि शांत सुखावणारा ॥

सैरभैर वादळातही चित्त स्थिरावणारा
काहीसा  गूढ ,गंभीर नि अोढाळणारा ॥

दिवसभर हाकेच्या टप्प्यात जाणवणारा
तरीही सुदूर आसमंतापल्याड असणारा ॥

काळजातून सदा काळजी घेणारा
तरी कायमच अपरिचित वाटणारा ...॥

थंड,संथ ,स्नेहाळ नि हळवा जरासा
तुझाच आवाज आश्वासक हवाहवासा...॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर

Monday, June 5, 2017

#सहजोक्त.

#सहजोक्त

आज सकाळी जाग आली ती ,दोन काव्यपंक्ती दिसल्या व उच्चारणासह कानात शिरल्या.उठून बसले .
फोनमध्ये टाईप केल्या. काल सुचलेली कविता ब्लॉगवर टाकली...
 ब्लॉगवाचक रूपेश म्हणाला ,"ताई ,संस्कृतात पण लिही ".
 मग सकाळच्या सुचलेल्या अोळी पूर्ण केल्या .त्या अशा......

वाणी सरस्वती देवी
सर्वदा बुद्धिदायिनी
तस्याः नित्यं कृपाशक्तिः
काव्याय मां प्रचोदयात्।।

©डॉ. प्रज्ञा देशपांडे
नागपूर

#सहजोक्त

#सहजोक्त.

तू अोबडधोबड दगड होता,
मी श्रद्धा गुंफली
नि तू देव झाला॥

मी निव्वळ माती होती ,
तू वळण दिले
 नि सुबक मूर्ती घडली॥

मी छोटं रोपटं होते ,
तू मशागत केली
 नि डौलदार वृक्ष झाला॥

मी गंजलेला लोह होते,
तू परिस स्पर्शिला
 नि झळाळून सोने झाले॥

मी कोरा कागद होते ,
तू शब्द स्फुरले
 नि सहजीवनचे महाकाव्य रचले॥

क्षुद्र हे जीवन होते,
  तू हृदयाशी धरले
 नि मी भवभयापार जीवन्मुक्त झाले  ॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे
नागपूर.

Thursday, June 1, 2017

# सहजोक्त


#सहजोक्त




देवा ,एकतरी स्थान असं दे
की जिथे अढळपद असेल.

देवा ,एकतरी नातं असं दे
ज्यात कायम अभय असेल

देवा एकच दृष्टी अशी दे
की नजरेत कायम तूच असेल.

देवा ,एकतरी काम असं दे
की निष्काम सारं जीवन असेल

देवा ,एक अशी संधी दे
की द्वैत संपून अद्वैत असेल.


देवा ,एकतरी क्षण असा दे
ज्यात चारही मुक्ती असेल.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...