Monday, April 23, 2018

#सहजोक्त.

#सहजोक्त.
उन्हाळा आला की काही खास पदार्थांची हमखास आठवण येते. छत्तीसगढी बाँसीभात ,ज्वारीपिठाची आंबिल ,गव्हाची फेणी (शेवयी सारखा खाद्यपदार्थ),खमंग सातु (खारा व चटपटा ,उन्हाळकाकडी सह खायचा ) तांदुळाचे उकडीचे पापड,त्याची उकड ,ज्वारीचे अोले धापडे ,दुपारी कच्चा चिवडा ,मुरमु-याचा चिवडा ,गुलकंद शेक ,आंब्याच्या पोळ्या ,खारवड्या ,लह्यवड्या ,बोरवड्या ,बोरकुट भिरकवलेले उकडलेले बोरं ,अशा विविध  घरगुती  खाद्य प्रकारांची रेलचेल.
असाच एक उन्हाळी पदार्थ म्हणजे कांद्याचे लोणचे.
माझी आजी दर उन्हाळ्यात तात्पुरते टिकणारे भोकराचे लोणचे व कांद्याचे लोणचे करायची. आम्ही मग दुपारच्या जेवणात भाजी ऐवजी कांद्याचेच लोणचे खायचो.माझं लग्न झाल्यावरही नातजावायाला आवडते म्हणून तीच करून पाठवायची. मला तशी स्वयंपाकाची आवड कमीच . पण मग पाहून पाहून शिकले. कांद्याच्या लोणच्यात आजी घरी तयार करून मसाला भरायची . मी मात्र रेडिमेड लोणचे मसालाच वापरते. बाजारातून पिलूकांदे (अगदी छोटे कांदे,जे उन्हाळ्यातच मिळतात आमच्याकडे) आणायचे. त्याचा शेंड्याचा भाग कापायचा ,देठाचा भाग राहू द्यायचा. मग त्याला कमळाकार कापायचे. कांद्याचे फुल तयार होते. त्यात लोणचे मसाला भरायचा. कैरीचा किस वा बारिक फोडी त्यात  घालायच्या . मग फोडणीचे थाड तेल वरून अोतायचे. अर्ध्या तासात लोणचे मुरते. फ्रीजमध्ये दिनतीन दिवस टिकते . (अर्थात खाणा-यांच्या तावडीतून सुटले तर!)
तसा हा सोपा व नागपुरी उन्हाळ्यासाठी वरदान प्रकार ,करून पाहायला हरकत नाही.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, April 20, 2018

#सहजोक्त.



परवा दहावीपाठ्यपुस्तकाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण झाले. तज्ज्ञमार्गदर्शक म्हणून कार्यरत होती. या पाठ्यपुस्तकात वेगवेगळ्या विभागात वणिज् , सार्थवाह व श्रेष्ठी असे तीन शब्द आले आहेत. व्याकरण विभागात वणिज् हा जकारान्त शब्द आहे. 'अमूल्य कमलम्' या पाठात सार्थवाह हा शब्द 
आला आहे. तर नाट्यस्तबकम् वा नाट्ययुगलम्   या पाठात श्रेष्ठी हा शब्द आला आहे. हे तीनही शब्द एकाच पाठ्यपुस्तकात येणं हा ही माझ्या दृष्टीने योगायोगच आहे.
सन् २००० मध्ये   ,"डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्णपदासह "M.A पाली पदवी मला प्राप्त झाली. जीवनात ज्या काही छान गोष्टी लाभल्या त्यात ही MA पालीची  दोन वर्षे महत्त्वाची ठरतात. मला आयुष्यात ज्या दिग्गज गुरुवरांनी घडवले त्यातील एक गुरुजन मला याच वर्षात लाभले. पालिप्राकृत विभागाचे विभागाध्यक्ष डॉ. भागचंद जैन ,माझे गुरु. जैनसर म्हणजे "नमन्ति फलिनो वृक्षः " अशी उक्ती सार्थ करणारे. सर चार विषयात पीएच्डी आणि तीन विषयात डीलिट ह्या सर्वोच्च पदव्या प्राप्त झालेले आहेत. हिंदी ,संस्कृत ,पालि व प्राकृत या भाषांवर त्यांचे प्रभुत्व निर्विवाद आहे. या भाषांतील तत्त्वज्ञान हा त्यांचा व्यासंगाचा विषय आहे.
पालिसाहित्यात भगवान् बुद्धाचे चरित्र व पालित्रिपिटक यांचा अभ्यास करावा लागला MA ला असताना. पालिसाहित्यात सार्थवाह ,श्रेष्ठी हे शब्द बरेचदा आले  आहेत. मी या शब्दांना समानार्थक समजायचे. तसे ते समान जातकुळीचे आहेतही. पण डॉ. जैन सरांनी एकदा या तीनही शब्दांचा अर्थ सांगितला. वणिज् म्हणजे व्यापारी ,किराणाभुसार किंवा वाणसामानाचा दुकानदार,आजच्या काळात डिपार्टमेंट स्टोरचालक. सार्थवाह म्हणजे सरांच्या शब्दात ,,"कारवॉ ले कर इस शहर से दुसरे शहर जाने वाला" आजच्या काळात होलसेलडिस्ट्रिब्युटर ,तर श्रेष्ठी म्हणजे राजदरबारात ज्याला सन्मानस्थान आहे तो ,आजच्या भाषेत राज्यसभा सदस्य.  मला त्यांच्या या शब्दच्छटांचा अर्थ पटला. सार्थवाह या शब्दात वहन करणारा असा अर्थ अनुस्यूत असू शकतो. श्रेष्ठी या संस्कृत शब्दाचा पालीत सेठ्ठी असा होतो . तोच हिंदीत सेठ झाला तर मराठीत शेठ वा शेटजी झाला.
दहावीच्या या शब्दांमुळे गतमस्मृतीला उजाळा मिळाला.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, April 10, 2018

#चित्रकविता.

#चित्रकविता

आजही तो तसाच वळवाचा  कोसळतोय    ।

त्यांच्या मिलनाची खुण म्हणून  मृद्गंध पसरतोय।

वळवाचा तो तसाच परत जाईल माघारी ।

 रुजणं न्  सृजनक्रिया जरी नाहीच होणार खरी ।

पुन्हा नक्कीच तो बरसेल वर्षाऋतुत संततधारा ।

धरित्रीला सजवून तो जरूर करेल वसुंधरा ॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Sunday, April 1, 2018

#सहजोक्त.



"उकिरड्याचेही भाग्य पालटते मग आपण तर माणुस आहोत" ,माझ्या सासुबाई असं नेहमी म्हणायच्या.
सकाळी पटांगणात फिरताना उगवलेल्या सूर्याला नमस्कार करीत होते. मोठ्या इमारतीमागून सूर्याची स्वारी वर येत होती.ती इमारत पाहून   मनातचक्र सुरु झाले   न् सासुबाईचे ते  वाक्य आठवले.

जन्मापासून ते आजवर मी जेथे रहाते तो रहिवासी भाग असून उच्चमध्यमवर्गीय लोकांची ती वस्ती आहे. माझ्या बालपणी हा भाग अगदी साधा  संथ पण एकमेकांविषयी स्नेहाळ जिव्हाळा बाळगणारा होता. सर्वांच्या घरी साधारणपणे समान परिस्थिती होती.
घरात बेडरूम नावाची गोष्टच नव्हती.पुढचे आंगण पहिली खोली ,माजघर ,देवघर,स्वयंपाकघर ,व्हरांडा ,बाहेर संडास-बाथरूम,मागचं आंगण अशी सगळीकडे समान रचना होती. सगळ्यांकडे  रेडिअो ,सायकल असायची.बैठकीत चार खुर्च्या ,पलंग ,टेबल क्वचित कोणाकडे सोफ़ा. सगळेच जण महिन्याच्या सुरुवातीला भरल्या खिशाचे तर शेवटी रिकाम्या खिशाचे असत. घरोघरी साधारणपणे घरी बनवलेले पदार्थ होते. लिव्हिंगसँडर्डच्या भंपक कल्पना नव्हत्या.आमच्या कॉलोनीत आंतरराष्ट्रिय स्तरावर नावाजलेल्या विद्वानांसह स्थानिक पातळीवर प्रभावी व्यक्तिमत्त्वे व कोणतीही अोळख नसलेले सामान्य लोकंही गुण्यागोविंदाने रहात होते. त्यांचे त्यांचे क्षेत्र कॉलनीतील सहजीवनात दडपण वा विसंवादी ठरत नव्हते. सगळ्यांचे कुटंबजन चारचौघांत कोणताही गंड न बाळगता न् न जाणवून देता मिसळत असत.
मी व माझे दोन भाऊ. कॉलनीत आमच्या वयाची बच्चेकंपनी भरपूर.कॉलनीत भरपूर वृक्षराजींसह मोठं पटांगण , त्यामुळे शाळा सुटल्यावर खेळायला संपन्न वातावरण होते. घरचेही दिवेलागणी पर्यंत रागावत नसत.
अशा अनेक कारणांनी प्रोफ़ेसर्स कॉलोनी नावाचा आमचा भाग आम्हाला खुपच आवडायचा. कॉलनीत जवळजवळ प्रत्येक घरी तीन वा चार क्वचित त्यांच्यावर मुले होतीच होती. पण दोनतीन घरं त्याला अपवाद होती. त्यातील एक घर थोर गणितज्ज्ञ मंगळगिरी यांचेही होते .मंगळगिरी आजोबा व आजी  दोघेही  सगळ्यांशी मिसळून वागत . हळदीकुंकू -दसरा,सोनं वाटप यासारख्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असे. आडव्या रांगेतील सेन यांचे घर त्यामानाने अतिशय अलिप्त होते.

कॉलनीत त्यावेळी घरोघरी संक्रांत-चैत्रगौर यांचे हळदीकुंकु साजरे केले जाई. त्याप्रसंगी आई कागदावर कॉलनीतील सगळ्या काकू-आजींची नावे लिहून देत असे . मग मी ,मीरा ,अपर्णा घरोघरी तो कागद व पेन्सिल घेऊन फिरत असू. प्रत्येक घरातून सही आलीच पाहिजे असा आईचा आग्रह!
कागद हाती पडल्याबरोबर मी अोरडायची ,"सेनकडे जाणार नाही !!" कारण त्यांच्याकडे दोन आजीच होत्या न् त्यांचं बंगाली वळणाचं मराठी किंवा हिंदी मला कळायचं नाही.मग आई मीराला सांगायची अन् तिच्यासोबत मग अस्मादिक तेथे जायला तयार व्हायचे.
सेनच्या घराशी तसा कोणाचाच घरोबा नव्हता. दोन वयस्क बंगाली  स्त्रियांशिवाय तेथे कोणीच नव्हतं. त्या दोघी एकमेकांच्या नणंद-भावजया होत्या. नणंद म्हणजे प्राध्यापक सेन मॅडम ,त्यांचाच तो बंगला . त्यांची भावजय त्यांच्या सोबत रहात असे. त्या दोघीजणी शिष्ट नव्हत्या पण तरी सुद्धा कोणात मिसळत नसत. येता-जाता तोंडावर तोंड पडले की त्या मोठ्यांशी बोलत. आमच्या सारख्या मुलांशी त्या बोलत नसत किंवा आम्हीच त्यांच्या वा-याला उभे राहत नसू.सेनचे घर नि घरातील मंडळी या विषयी एक गुढ वलय वाटायचे आम्हाला.
आमच्या लहानपणी घरोघरी काय किंवा रस्त्यावर काय विद्युत प्रगती झालेली नव्हती. घरात एखादी ट्यूबलाईट व बाकी पिवळे बल्ब असत. तेच रस्त्यावरही अगदी टोकांवर पिवळे पथदीप असत ,ज्यावर प्रचंड किडे कायमच असत.  कॉलनीत घरोघरी भरपूर झाडं ,कॉलनीतील मोकळ्या जागांवरही झाडे असत . त्यामुळे दिवेलागणी नंतर रातकिड्यांचे आवाज ,लुकलुकणारे काजवे,डराव-डराव करणारे बेडकं ,रंग बदलणारे सरडे ,खेकडे ,गोगलगाई ,पैसा नावाच्या लाल अळ्या ,विविध रंगी फुलपाखरे ,मैना ,चिमण्या ,कावळे ,पोपट आदी पक्षी;  त्यां-त्या सिझनमध्ये सहज दिसायचे.

सायंकाळानंतर कॉलोनीतील आडव्या रांगेत आम्ही जातच नसू. त्यातल्या त्यात बोबडेंचे घर ही हद्द होती. सेनच्या घराकडे तर बघत पण नसू.
आजी,आई ,मावशी ह्या सेनबायांची चौकशी करीत असत.पुढे पुढे ते एकाट घर पार सुनं सुनं झालं . कारण त्या दोनपैकी एक आजी वारल्या. काही दिवसांनंतर त्या दुस-या आजी कुलुप लावून त्यांच्या मूळगावी परत गेल्या. आता ते घर खरोखर निर्जन झाले.
अाधीसुद्धा त्या घराचे आंगण अोकेबोके होते आता तर अधिकच फावले. त्या घराच्या आंगणात एकही फळाचे झाड नव्हते ना नीटसे फुलाचेही. फक्त कटलेल्या पतंगी वा उसळलेला चेंडू घेण्यासाठी तेथे मुले क्वचित जात असत. वा पावसाळ्यात तुंबलेल्या गडरलाईन मोकळी करायला आलेल्या मजुरांना वाट दाखवायला एखादा उत्सही बंड्या तेथे जाई.
बाकी कितीतरी वर्ष ती वास्तु पडिकच होती.
 म्हणजे बांधल्यापासून ते सेनकुटुंब जाई पर्यंत तसं ती वास्तु नांदती नव्हतीच . इतर घरांत जसे गोकुळ होते तसं तेथे नव्हतच काही.
 ‎ पण नंतरही बरेच वर्ष काहीही हालचाल नव्हती. काही वर्षांनी  बाहेरच्या एका व्यापा-याने ती वास्तु विकत घेतली असे कळले. ती वास्तु तशीच निर्जन राहिली. मग काही वर्षांनी त्या माणसाकडून
 ‎दुस-याने ती खरेदी केली असे कानी आले.
 ‎ पण वास्तूत काही बदल झाला नाही. मधे काही महिने तिथे एक संगणकवर्ग सुरु झाला होता. पण नंतर तिच्या भाळी असलेले निर्जनपण ती वास्तु पुन्हा मिरवू लागली. आश्चर्य म्हणजे पडित वास्तुत काही अनैतिक उद्येग चालतात तसे इथे काहीच होत नव्हतं. चोर,भिकारी सुद्धा तेथे फिरकत नव्हते. तसं त्या वास्तुबद्दल काही आगळवेगळंही कानी येत नव्हतं . पण तरी ती निर्जनच होती.
 ‎आता नव्या मालकाने तेथिल मूळ वास्तु तोडून जमिनदोस्त केली. मग साग्रसंगीत भूमिपूजन केले. त्यानंतर जवळजवळ दोन वर्षे बांधकाम सुरु होते. छान चार मजली मोठी अद्ययावत सुखसोईंनी युक्त इमारत त्या जागी आज उभी आहे .
पण आश्चर्य हेच की आज पाचसहा वर्षे होऊनही तेथे कोणी नांदायला आलेले नाहीच. चौकीदार व त्याचं कुटुंब त्या वास्तुची देखभाल करतो.
ती मोठी इमारत पाहून सारं बालपण व तेव्हाचे ते प्रसंग आठवले.
नशिब ,दैव ,भाग्य,लक हे जसं मानवाला लागू असते तसं एखाद्या स्थावर मालमत्तेला लागू पडते कां ? सहज तरंग उमटले मनावर
सेनचे घर व त्यावरची श्रीमंत इमारत पाहून!!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे .

Wednesday, March 28, 2018

#शब्दचिंतन.


काल लेखनात एक शब्द योजला "जिजीविषा"! अनेक सजग वाचकांनी विचारले की हा शब्द कोणता ? चुकीने चूक लिहिला कां ? विजिगीषा हवा कां? काही जणांनी गुगलडिक्शनरीच पाठवली. . . या सर्व वाचकांचे मनापासून आभार. कारण त्यांच्यामुळेच मी शब्दचिंतन करतेय.

शब्दांमागे काय व्याकरण-प्रक्रिया असते. तिला  सामान्य व्यवहारात बघायची गरज नाही.
जसे बिजापासून वृक्ष. वृक्षापासून पान-फुल-फळ आदि लाभतात तसे मूळ लक्षात घेतले की वाढलेला पसारा आपसुक समजतो.
भाषेचंही तसंच आहे. शब्दनिर्मितीची प्रक्रिया जाणली की भाषिक समज वाढून भाषा सुलभ होते.

दैनंदिन व्यवहारात आपण जिज्ञासा ,पिपासा ,मीमांसा इत्यादी शब्द सहज उपयोगात आणतो.
हे शब्द वेगवेगळे आहेत पण एकाच प्रक्रियेतून तयार होतात.ही प्रक्रिया जाणणे रंजक आहे.
व्याकरणात इच्छार्थके म्हणजे इंग्रजीत त्याच्या deservetives आणि संस्कृतात "सन्नन्तक" म्हणतात. धातूपासून तयार होणारी ही रूपे हे तीन प्रकारची असतात. (१)इच्छार्थक क्रियापद ,(२)इच्छार्थक विशेषण,(३)इच्छार्थक नाम
यापैकी मराठी भाषेत विशेषण व नाम प्रचलित आहेत.
त्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी "करणे"या धातूची मदत घेऊ  (१) करण्याची इच्छा असणे ,(२)करण्याची इच्छा असलेला ,(३) करण्याची इच्छा.
पुढे मराठीत सहज उपयोगात येणारी इच्छार्थक विशेषणे व नाम रूपे दिली आहेत.
जिज्ञासु (जाणण्याची इच्छा असलेला)    ~जिज्ञासा (जाणण्याची इच्छा) ,
जिगीषु  (  जिंकण्याची इच्छा असलेला)   ~जिगीषा (जिंकण्याची इच्छा ) ,
विजिगीषु  (   विजयी होण्याची इच्छा असलेला)   ~विजिगीषा (विजयी होण्याची इच्छा ) ,
मुमुक्षु  (मुक्तीची इच्छा असलेला)     ~ मुमुक्षा (  मुक्तीची इच्छा) ,
जिजीविषु (जगण्याची इच्छा असलेला )  ~जिजीविषा (जगण्याची इच्छा),
पिपासु  (पिण्याची  इच्छा असलेला)  ~ पिपासा (पिण्याची इच्छा ),
बुभुक्षु (भुकेची इच्छा असलेला ) ~बुभुक्षा ( भुकेची   इच्छा असलेला ,
 तितिर्षु  (तरण्याची   इच्छा असलेला)   ~ तितीर्षा (तरण्याची इच्छा) ,
विवक्षु ( बोलण्याची इच्छा) ~विवक्षा( बाेलण्याची इच्छा) ,
शुश्रूषु (ऐकण्याची इच्छा) ~   शुश्रूषा (ऐकण्याची इच्छा)

"मला जाणून घ्यायची इच्छा आहे ", इतकं मोठं वाक्य म्हणण्यापेक्षा ,"मला जिज्ञासा आहे". हे सुटसुटीत होतं. "जाणण्यास इच्छुक असलेला मी" ऐवजी ,"जिज्ञासु मी."म्हणणे सरळ पडते.
अशाप्रकारे इच्छार्थक रूपांमुळे भाषा अधिक सुटसुटीत होते.  इच्छार्थक रूपे भाषेत प्रचलित करायला हरकत नसावी.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, March 27, 2018

#सहजोक्त.


पंचतंत्र .भाग २
मागच्या भागात पंचतंत्राची थोडक्यात अोळख करून दिली होती. या भागात  त्यात थोडी भर घालू या."पंचतंत्र" हा सामासिक शब्द आहे. पांच तंत्रांचा समुदाय .द्विगू समास आहे हा. पंचतंत्रमध्ये एकूण ६૪ कथा आहे. पंचतंत्रात नीतिशास्त्राची तत्त्वे कथारूपाने सांगितली आहेत. ग्रंथाच्या स्वरूपाबद्दल स्वतः रचयिता विष्णुशर्मा म्हणतात.
"यन्नवे भाजने लग्नः संस्कारो नान्यथा भवेत् ।
कथाच्छलेन बालानां ,नीतिस्तदिह कथ्यते ॥"
अर्थ असा की - नव्या भांड्यावर पडलेला पोचा कायम रहातो ,जात नाही. ह्याच दाखल्यानुसार बालकांना कथेच्या माध्यमातून  राजनीति-व्यवहारनीति-युद्धनीती सांगण्यात आली आहे.
 आजकालचा ज्ञानरचनावाद माहित नसतानाही प्राचीन -भारतात सरस कथांमधून मोठमोठे शास्त्र उलगडून सांगत असत.याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा ग्रंथ होय.
या ग्रंथातातील कथा पांच भागात म्हणजे तंत्रात विभागल्या आहेत.  या भागांची नावं आणि त्यातील कथांची संख्या  याची माहिती अशी...
१) मित्रभेदः = यात दोन मित्रंमध्ये कसे भांडण झाले ? त्याचा लाभ कोणी घेतला? अशी कथा आहे. या कथेशिवाय इतरही कथा आहेत.

२)मित्रसंप्राप्तिः = यात मित्र असण्याचे फायदे व मित्र कसा लाभला अशी कथा व याशिवाय इतर कथाही आहेत.

३)काकोलुकीयम् = काक म्हणजे कावळा तर उलुक म्हणजे घुबड,उल्लू.  कावळा व घुबड यां पात्रावर आधारलेल्या कथा आहे.

૪) लब्धप्रणाशः = हाता तोंडाशी आलेलं नष्ट होणे. याही भागात प्राण्यांच्या रूपकातून मनोवैविध्याच्या कथा सांगितल्या आहेत.

५) अपरीक्षित  कारकम् = न पारखता पाऊल टाकले तर वाईट परिणामांना सामोरे जावे लागते.अशा आशयाच्या कथा मानवी उदाहरणांतून दिल्या आहेत.

या ग्रंथाची रचना अतिशय रोचक पद्धतीने केली आहे. कथा व त्या कथेतून दुसरी कथा . कथेच्या आशयाला गभीरपणा (खोली देणारा) श्लोक वा अनेक श्लोक त्या त्या प्रसंगी त्या त्या पात्राच्या तोंडी दिले आहेत.
पुढील भागात पाचवे तंत्र म्हणजे अपरीक्षित कारक याचा विचार करू.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 ‎

Monday, March 26, 2018

#सहजोक्त.


फुलं जरा वेडीच असतात.नाजूक तर इतकी असतात की सहज म्लान होतात ,सुकतात .
त्यांचं जीवनही किती क्षणिक असते.
पण जग जिंकण्याचा त्यांचा स्वभाव अचंबित करतो. आपल्या सुगंध-वर्णादी गुणांनी ते अक्षरशः डोक्यावर बसतात. कोमल देहात किती कणखरता जोपासतात ? बाहेरच्या विपरित वातावरणाला  न जुमानता बहरतातच स्वतःच्या अंतःप्रेरणेने. .
त्यांचा दुर्दम्य सकारात्मकता तर परिसीमा आहे जिजीविषेची ! क्षणभंगूरता असूनही अधिराज्य गाजवतात जिवंत मनांवर !!
किती देऊन जातात ना फुलं विश्वाला !!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...