Thursday, September 13, 2018

#सहजोक्त.



आज वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळे साहित्य वाचायला व पहायला मिळाले. अर्थात ते साहित्य संस्कृत  नि मराठी या भाषांतील होते. ते वाचल्यावर मनात अनेक विचारतरंग उमटले.
चौदा विद्या व चौसष्ट कला यांची यादी वाचायला मिळाली. ती यादी अधिकृत असेलच असे नाही .पण त्यातील चौसष्ट कलांची सूची पाहिल्यावर जाणवले की या कला तत्कालिन समाजजीवन सहज-सुंदर जगण्याचे हमखास साधन असाव्यात. इतकेच नाही तर मानवी जीवनातील ऐहिक सुखसोयी व भावनिक गरजा पूर्ण करणाचेही साधन ठरत असाव्यात. अर्थात तो काळ कोणता ?  हेही निश्चित सांगता येत नाही . पण इसवी सनाच्या सुरवातीची काही शतके नक्कीच असू शकतो. त्यावेळच्या समाजरचनेला पोषक -पूरक-सहायक अशाच त्या कला होत्या.
 ६४ कला यांचा अधिपती म्हणजे  विघ्नहर्ता श्री गणपती अशी श्रद्धा आहे.. या चौसष्ट कला  पुढील प्रमाणे.

१. पानक रस तथा रागासव योजना - मदिरा,रसायन व पेय तयार करणे.
२. धातुवद- कच्चा धातू पक्का व मिश्रधातू वेगळा करणे.
३.  दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे.
४. आकर ज्ञान - खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे.
५. वृक्षायुर्वेद योग- उपवन, कुंज, वाटिका, उद्यान बनविणे.
६. पट्टिका वेत्रवाणकल्प- नवार, सुंभ, वेत इत्यादींनी खाट विणणे.
७. वैनायिकी विद्याज्ञान- शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे.
८.  व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे.
९.  वैजापिकी विद्याज्ञान- दुसऱ्यावर विजय मिळविणे.
१०. शुकसारिका प्रलापन- पक्ष्यांची बोली जाणणे.
११. अभिधान कोष छंदोज्ञान- शब्द व छंद यांचे ज्ञान असणे.
१२. वास्तुविद्या- महाल, भवन, राजवाडे, सदन बांधणे.
१३. बालक्रीडाकर्म- लहान मुलांचे मनोरंजन करणे.
१४. चित्र शब्दापूपभक्षविपाक क्रिया- पाकक्रिया, स्वयंपाक करणे.
१५. पुस्तकवाचन- काव्यगद्यादी पुस्तके व ग्रंथ वाचणे.
१६. आकर्षण क्रीडा- दुसऱ्याला आकर्षित करणे.
१७. कौचुमार योग- कुरुप व्यक्तीला लावण्यसंपन्न बनविणे.
१८. हस्तलाघव- हस्तकौशल्य तथा हातांनी कलेची कामे करणे.
१९. प्रहेलिका - कोटी, उखाणे वा काव्यातून प्रश्न विचारणे.
२०. प्रतिमाला - अंत्याक्षराची योग्यता ठेवणे.
२१. काव्यसमस्यापूर्ती - अर्धे काव्य पूर्ण करणे.
२२. भाषाज्ञान - देशी-विदेशी बोलींचे ज्ञान असणे.
२३. चित्रयोग - चित्रे काढून रंगविणे.
२४. कायाकल्प - वृद्ध व्यक्तीला तरुण करणे.
२५. माल्यग्रंथ विकल्प - वस्त्रप्रावरणांची योग्य निवड  करणे.
२६. गंधयुक्ती - सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे.
२७. यंत्रमातृका - विविध यंत्रांची निर्मिती करणे.
२८. अत्तर विकल्प - फुलांपासून अर्क वा अत्तर बनविणे.
२९. संपाठ्य - दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे.
३०. धारण मातृका - स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे.
३१. छलीक योग- चलाखी करून हातोहात फसविणे.
३२. वस्त्रगोपन- फाटकी वस्त्रे शिवणे.
३३. मणिभूमिका - भूमीवर मण्यांची रचना करणे.
३४. द्यूतक्रीडा - जुगार खेळणे.
३५. पुष्पशकटिका निमित्त ज्ञान - प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे.
३६. माल्यग्रथन - वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनविणे.
३७. मणिरागज्ञान - रंगावरून रत्नांची पारख करणे वा ओळखणे.
३८. मेषकुक्कुटलावक - युद्धविधी- बोकड, कोंबडा इ.च्या झुंजी लावणे.
३९. विशेषकच्छेद ज्ञान - कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे करणे.
४०. क्रिया विकल्प - वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे.
४१. मानसी काव्यक्रिया - शीघ्र कवित्व करणे.
४२. आभूषण भोजन - सोन्या-चांदी वा रत्नामोत्यांनी काया सजवणे.
४३. केशशेखर पीड ज्ञान - मुकुट बनविणे व केसात फुले माळणे.
४४. नृत्यज्ञान - नाचाविषयीचे शास्त्रोक्त सखोल ज्ञान असणे.
४५. गीतज्ञान - गायनाचे शास्त्रीय सखोल ज्ञान असणे.
४६. तंडुल कुसुमावली विकार - तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे.
४७. केशमार्जन कौशल्य - मस्तकाला तेलाने मालीश करणे.
४८. उत्सादन क्रिया - अंगाला तेलाने मर्दन करणे.
४९. कर्णपत्र भंग - पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे.
५०. नेपथ्य योग - ऋतुकालानुसार वस्त्रालंकाराची निवड करणे.
५१. उदकघात - जलविहार करणे. रंगीत पाण्याच्या पिचकारी करणे.
५२. उदकवाद्य - जलतरंग वाजविणे.
५३. शयनरचना - मंचक, शय्या व मंदिर सजविणे.
५४. चित्रकला - नक्षी वेलवुट्टी व चित्रे काढणे.
५५. पुष्पास्तरण - फुलांची कलात्मक शय्या करणे.
५६. नाट्यअख्यायिका दर्शन - नाटकांत अभिनय करणे.
५७. दशनवसनांगरात - दात, वस्त्रे, काया रंगविणे वा सजविणे.
५८. तुर्ककर्म - चरखा व टकळीने सूत काढणे.
५९. इंद्रजाल - गारुडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे.
६०. तक्षणकर्म - लाकडावर कोरीव काम करणे.
६१. अक्षर मुष्टिका कथन - करपल्लवीद्वारे संभाषण करणे.
६२. सूत्र तथा सूचीकर्म - वस्त्राला रफू करणे.
६३. म्लेंच्छीतकला विकल्प - परकीय भाषा ठाऊक असणे.
६४. रत्नरौप्य परीक्षा - अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे.
जीवन सुसह्य करणा-या तर या कला आहेतच. कलांची नावे लक्षात घेतली न्  भाषिक अंगाने विचार केला तर या कला समाजात रुजून सुस्थापित होण्याच्या प्रदीर्घ काळात नक्कीच संस्कृत ही सर्वसामान्यांचीही बोलीभाषा असावी ; असा निष्कर्ष काढला तर वावगे ठरू नये.
कोणतीही भाषा निवळ प्रमाण ,व्याकरणनिष्ठ असून चालत नाही तर ती जनसामान्यांच्या दैनंदिन व्यावहारिक-सामाजिक-भावनिक गरजांची पूर्ताता करणारी असेल तरच ती जिवंत भाषा ठरते. या अर्थाने विचार केला तर वरील कलांच्या नामोल्लेखांतून त्या काळात संस्कृत निश्चितच बोलीभाषा होती ,हेच म्हणावे लागेल.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर.

Sunday, September 9, 2018

#सहजोक्त.

#स्तोत्रचिंतन .
स्तोत्र ,मंत्र हे असे साहित्य आहे की जे श्रद्धेने वाचले ,उच्चारले तर फायदा होतो. नेटवर काही शोधत होती न् बरेच दिवसांनी एक स्तोत्र हाती लागलं. माझा मुलगा लहान असताना ते मी म्हणायची. व्यर्थ बडबड करण्यापेक्षा काही चांगले म्हटले तर चांगलेच असते. शिवाय स्तोत्रांमुळे जिभेला वळण लागते. उच्चारणदोष कमी होतात.
हे स्तोत्र वासुदेवानंदसरस्वती विरचित आहे.  यथामती अन्वयासह  सार्थ-बालाशिष-स्तोत्रम् देत आहे. त्याच खाली नागपुरातील विद्वान् डॉ. के. रा. जोशी यांनी केलेला श्लोकात्मक अनुवादही देत आहे.
स्वांशेनेदं ततं येन स त्वमीशात्रिनन्दनम् ।
मुञ्च मुञ्च विपद्भ्योऽमुं रक्ष रक्ष हरे शिशुम् ॥१॥
अन्वय = हे अत्रिनन्दन , येन इदं (जगत्) स्व-अंशेन ततं  (विस्तारितम्) सः त्वम्  अमुं शिशुं विपद्भ्यः मुञ्च ,हे हरे ,अमुं शिशुं रक्ष ॥
अर्थ = हे अत्रिनंदना ,ज्या तू हे जग स्वतःच्या अंशाने  विस्तारिले (त्या तू) ह्या बालकाला विपत्तींपासून वाचव ,हे हरे (विशेषण ) या बालकाचे रक्षण कर.

प्रातर्मध्यंदिने सायं निशि चाप्यव सर्वथा ।
दुर्दृग्गोधूलिभूतार्तिर्ग्रहमातृग्रहादिकान् ॥
अन्वय= (हे देव ,अमुं शिशुं त्वं)  प्रातः-मध्यंदिने-सायं ,च निशि  ; दुर् दृक् -गो-धूलि-भूत-अर्तिः-ग्रह-मातृग्रह-आदिकान् सर्वथा अपि अव ।
(हे देवा ,या शिशुला तू) दिसावयास कठिण अशी गोधूली,भूत-दुःख -नवग्रह-मनाचा कारक चंद्र-आदीं पासून सकाळ-दुपार-सायंकाळ-रात्र (या सर्व काळात) सर्वप्रकारे रक्षण कर .
छिन्धि छिन्ध्यखिलारिष्टं कमण्डल्वरिशूलधृक् ।
त्राहि त्राहि विभो नित्यं त्वद्रक्षालंकृतं शिशुम् ॥
अन्वय= हे कमण्डल्वरिशूलधृक् ,अखिलं अरिष्टं छिन्धि ,हे विभो त्वत् रक्ष-अलंकृतं शिशुं नित्यं त्राहि ॥
हे कमण्डलु-अरिशूलधृक् (दत्तगुरुंचे विशेषण) (या शिशुचे) संपूर्ण  अरिष्ट (संकट)  छिन्न करून टाक.,हे शक्तिमान् देवा ,तुझ्या रक्षणाने अलंकृत अशा या बालकाला नेहमी (संकटांपासून) वाचव .
सुप्तस्थितं चोपविष्टं गच्छन्तं क्वापि सर्वतः।
भो देवावश्विनावेष कुमारे वामनामयः॥
अन्वय = हे देवाश्विनावेष ,अस्मिन् कुमारे वामनामयः सुप्तं स्थितं च उपविष्टं ,गच्छन्तं  क्वापि सर्वतः ।
अश्विनीकुमारांच्या वेषातील हे देवा ,झोपलेल्या ,बसलेल्या ,थांबलेल्या ,कुठेही जात असलेल्या या बालकाच्या सगळी कडल्या  पीडा कमी कर ,(नष्ट कर) .
दीर्घायुरस्तु सततं सहअोजोबलान्वितः ॥
या मुलाचे सतत अोज-बलयुक्त दीर्घ अायुष्य असू द्या.
इतिश्री प.प. वासुदेवानन्दसरस्वतीविरचितं बालाशिषस्तोत्रम् ॥
अशा प्रकारे परमपूजनीय  श्री. वासुदेवानंद विरचित बालाशिष स्तोत्र समाप्त.
डॉ. के. रा. जोशीकृत श्लोकात्मक अनुवाद.

तुझ्याच अंशे बाल निर्मिला अत्रिनंदना परमेशा !
सर्व संकटे दूर करोनी रक्ष रक्ष रे जगदिशा !! १!!

प्रातःकाली सायंकाली दिवसा रात्री केंव्हाही !
शिशुवरी तव कृपा असू दे चिंता त्याची तू वाही !!२!!

दुष्ट नजर त्य कधी न लागो ग्रहादि पीडा तू तोडी !
गोरजपीडा भूतप्रपीडा तोडी, फोडी तू मोडी !! ३ !!

त्रिशूलधारी हे परमेशा सर्व अरिष्टा छेदोनी !
तुझ्या रक्षणे अलंकारिले बालक तू ही पाहोनी !! ४!!

अश्विनीवेषा हे जगदिशा कुमार माझा तू रक्षी !
झोपी जावो उभा असो वा असो कुठेही तू साक्षी !! ५ !!

दीर्घायु हे बालक होवो ओजबलने युक्त असो !
मुमुक्षत्व तू मला देउनी बालकचिंता तुला असो !! ६ !!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, September 7, 2018

#सहजोक्त.


स्तोत्रचिंतन -भाग ५
आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं
करोमि दुर्गे करुणार्णवेशि |
नैतच्छठत्वं मम भावयेथाः
क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति ||१०||
हे करुणेचा सागर असेली दुर्गामैय्या ,दुःखात चूर असलेला मी (निव्वळ स्वार्थाने) तुझे स्मरण करतो याला माझी लबाडी समजू नकोस कारण तहानभूक लागलीकीच आईची  आठवण येते ना !

जगदम्ब विचित्रमत्र किं
परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि |
अपराधपरम्परापरं
न हि माता समुपेक्षते सुतम् ||११||
हे जदगम्बे ,माझ्यावर तुझी परिपूर्ण करुणा आहे तर यात काय विचित्रपणा आहे सांग बरे ,अपराध परंपरा असलेल्या मुलाला आई उपेक्षित नाही ना !!

मत्समः पातकी नास्ति
 पापघ्नी त्वत्समा न हि |
एवं ज्ञात्वा महादेवि
यथायोग्यं तथा कुरु ||१२||
हे महादेवी ,माझ्या सारखा पातकी दुसरा कोणीच नाही आणि तुझ्या सारखी पाप नष्ट करणारी दुसरी कोणी नाही . हे सारे जाणून ये योग्य असेल तेच कर.
शंकराचार्यांनी रचलेले हे स्तोत्र खरोखर मानवी भावना स्पष्ट करणारे आहे.
शेवटच्या श्लोकात याचना ,प्रार्थना ,मागणी न मागता जे तुला योग्य वाटेल ते तू कर असे म्हणतात कारण मुलाला खात्री असतेच की आई अयोग्य करणारच नाही.
इति "देव्यपराधक्षमापनस्तोत्र" संपूर्ण.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

#सहजोक्त .



#सहजोक्त - कविता.
बाईचे शिक्षण म्हणजे काय असते ?
खुलभर दुधाची कथा असते
कारल्याच्या वेलाची पेरणी असते
चांगला नवरा गटवायची सोय असते
सावित्रीच्या वस्याची व्यथा असते ॥ १॥
बाईचे करियर म्हणजे काय असते ?
यश मिळाले तर सर्वांचे त्यात श्रेय असते
अपयश  तिच्या मनमानीचे फळ असते
पद मिळाल्यास कर्तृत्वाहून जोरात नशीब असते
पदानुसार वागली तर गची म्हणे बाधा असते ॥ २॥
बाईची नोकरी म्हणजे काय असते ?
पूर्ण संसार पेलून संसाराला हातभार ठरते
उगाच षौक करण्याचे साधन असते
पैसा मिळविताना घराकडे दुर्लक्ष असते
असून अडचण न् नसून खोळंबा असते ॥३॥
बाईचे जीवन नेमकं काय असते ?
ऐकण्यात असेल तर कुलीन असते
नाठाळ असेल तर उठवळ असते
स्वतःला समर्पून सगळ्यांना सांभाळणे असते
आखलेल्या चौकटीत जगण्याचा आभास असते॥ ૪॥
एकूणच बाई म्हणजे काय असते ?
संसार चक्राची जननी असते
पुस्तकात गायची महती असते
प्रत्यक्षात ती दुय्यम नागरिक असते
तरी ती तिच्यावर संतुष्ट असते ॥५॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.








कविता.
बाईचे शिक्षण म्हणजे काय असते ?
खुलभर दुधाची कथा असते
कारल्याचा वेलची पेरणी असते
सावित्रीच्या वस्याची व्यथा असते ॥ १॥
बाईचे करियर म्हणजे काय असते ?
यश मिळाले तर सर्वांचे त्यात श्रेय असते
अपयश  तिच्या मनमानीचे फळ असते
पद मिळाल्यास कर्तृत्वाहून जोरात नशीब असते
पदानुसार वागली तर गची म्हणे बाधा असते ॥ २॥
बाईची नोकरी म्हणजे काय असते ?
पूर्ण संसार पेलून संसाराला हातभार ठरते
उगाच षौक करण्याचे साधन असते
पैसा मिळविताना घराकडे दुर्लक्ष असते
असून अडचण न् नसून खोळंबा असते ॥३॥
बाईचे जीवन नेमकं काय असते ?
ऐकण्यात असेल तर कुलीन असते
नाठाळ असेल तर उठवळ असते
स्वतःला समर्पून सगळ्यांना सांभाळणे असते
आखलेल्या चौकटीत जगण्याचा आभास असते॥ ૪॥
एकूणच बाई म्हणजे काय असते ?
संसार चक्राची जननी असते
पुस्तकात गायची महती असते
प्रत्यक्षात ती दुय्यम नागरिक असते
तरी ती तिच्यावर संतुष्ट असते ॥५॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.








Thursday, August 30, 2018

#सहजोक्त.


स्तोत्रचिंतन  - भाग ૪

चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं
 भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटीफलमिदम् ||७||
 शंकराचे वर्णन करतांना शंकराचार्य म्हणतात की , चिताभस्मलेपन करणारा ,विषभक्षण करणारा, दिगंबर  ,जटाधारी ,गळ्यात भुजगेंद्रहार धारण करणारा ,पशुपतिनाथ ,कपालधारी भूतनाथ असा शंकर जगदीश्वर ही पदवी धारण करतो ते केवळ तुझे पाणिग्रहण केले म्हणूनच  बरे ,हे भवनी !

 न मोक्षस्याकांक्षा भवविभववाञ्छापि च न मे
न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः |अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै
मृडानी रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः ||८||
चंद्रानने (चंद्रा सारखे सुंदर मुख असलेली ) ना मला मोक्षाची इच्छा आहे , ना भौतिक सुखांची ; ना मला विज्ञानाची (मोक्ष प्राप्तीचे विशेष ज्ञान)  ना सुखाची इच्छा आहे.म्हणूनच हे आई , मी  विशेष मागणी मागतो की (इथे संयाचना हा फार सुंदर शब्द योजला आहे, याचना म्हणजे मागणी न् संयाचना म्हणजे योग्य प्रकारची विशेष मागणी ) मृडानी ,रुद्राणी ,शिवा ,शिवानी ,भवानी असे तुझे नाम  जपण्यातच माझा जन्म जाऊ दे.

नाराधितासि विधिना विविधोपचारैः
किं रुक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभिः |
श्यामे त्वमेव यदि किञ्चन मय्यनाथे
धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव ||९||
हे श्यामे (देवीला गौरीही म्हणतात न् श्यामाही )
रुक्षचिंतनपर वाणीने ,विविध विधींच्या उपचारांनी तुझी आराधना केली नाही.तरी तुझीच कृपा आहे की माझ्यासारख्या अनाथावर तू कृपाछत्र धरतेस.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, August 29, 2018

#सहजोक्त.


स्तोत्रचिंतन -भाग ३
 आईने मातृभावाने पुत्राचे अपराध पोटात घ्यावे त्याला क्षमा करावी हे मागणे या स्तोत्रातून श्रीमद्शंकराचार्य व्यक्त करीत आहेत. एखादं चुकार मुलं मोठी चूक करतं न् मग आईचा अनुनय करीत तिच्याशी लाडीगोडी करतो तसे हे श्लोक आहेत.

जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता
 न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया |
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे
 कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||४||
  शंकराचार्य म्हणतात , हे जगदंबे ,जगज्जननी ना मी तुझी सेवा केली ना तुला माझं बरेच धन अर्पिले तरीही तू माझ्यावर निरुपम (म्हणजे ज्याची तोडच नाही ,अतुलनीय ) प्रेम करते. कारण मुलगा भलेही वाईट निपजेल पण आई कधीच वाईट नसते. .

परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया
मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि |
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम् ||५||
बाबा कोपले तर बचावाचे एकच माध्यम म्हणजे आई. बाबांकडून काही मोठं मिळवून घ्यायचे असेल तर आई मध्ये हवीच . हेच याही श्लोकात दिसते.
जीवन जगतांना विविध भोगात लिप्त झालो, सारे देव विस्मरणात गेले माझ्या. यातच  वयाची पंच्यांशीही उलटून गेली ,(आयुष्याचे फार कमी दिवस राहिले.) गणेशजननी ,आता जर तुझे सहाय (आधार) मिळाला नाही तर निराधार असा मी (या विशाल जगात) कोणाला  बरे शरण जाऊ ? सांग ना ! (तुझ्याशिवाय आता मला कोणीच वाचवू शकत नाही. )

श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकैः |
तवापर्णे कर्णे विशति मनु वर्णे फलमिदं
 जनः को जानीते जननि जननीयं जपविधौ ||६||
 कुत्र्याचे मांस भक्षण करणारा (ज्ञानोपासक नसलेला) सुद्धा (तुझ्या कृपेने) मधाळ गोड वाणीने बहुभाषक होतो.दरिद्रीसुद्धा (तुझ्या कृपेने) निर्भय होऊन कोट्याधिशासारखा वावरू लागतो. हे अपर्णे, हे सारे ,तुझे नाव कानावर पडल्याचेच  (कानातून मनात भिनल्यामुळे ) फलित आहे. हे जननी तुझ्या जपामुळे  काय काय सुपरिणाम होतात ,हे कोण बरे जाणू शकेल ? (अशक्यप्राय गोष्टी तुझ्या जपाने सहजशक्य कशा होतात हे कोण जाणू शकेल ?)
 जप करणे म्हणजे केवळ वाणीने तो शब्द उच्चारणे नव्हे तर सदा सर्वकाळ तेच रूप व शब्द ध्यानी मनी स्वप्नी रुजवणे हे होय. इतक्या तीव्रतेने अखंड ईशस्मरण केले की जीवनाचे कल्याण होणारच ना ?
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, August 22, 2018

#सहजोक्त.


स्तोत्रचिंतन -भाग २
 देवीला मातृरूपाने पूजणे हे स्वाभाविक आहे. जगात आई एवढा लाड दुसरे कोणीच करीत नाही. आई एवढी सत्ता कोणावरच गाजवता येत नाही. म्हणूनच आदिशंकराचार्यांनी देव्यपराधक्षमापन स्तोत्र रचले.या स्तोत्राचे  पहिले तीन श्लोक असे

 न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथाः |
न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं
परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम् ||१||
हे आई ,मी मंत्र (विशिष्ट  शब्दोच्चार ) ,यंत्र (विशिष्ट आकार),स्तुती (शब्दस्तुती), आवाहन(भावनिक साद) ,ध्यान(देविरूपाचे सतत स्मरण) ,स्तुतिकथा ,मुद्रा (हातांचे वा अंगांचे विशिष्ट आकार),विलपन(कारुण्य प्रदर्शक मंत्र) इत्यादि पूजाविधी मी जाणत नाही.  पण आई मी हे (नक्कीच) जाणतो की तुझे अनुसरण करणे ,क्लेश दूर करणारे आहे.
दक्षिणतंत्र पद्धतीत अनेक मुद्रा-भाव आहेत. ते काहीही  न जाणता मी इतकेच जाणतो की तुझेच अनुसरण करणे हेच खरे सुखाचे आधान आहे.

विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्या च्युतिरभूत् |
तदेतत् क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||२||
पूजापद्धती विषयक अज्ञानामुळे ,धनलोभाने ,आळसामुळे वा नियतीच्या शक्याशक्यतेमुळे हे आई तुझ्या चरणांपासून मी
ढळलो  तरी ; जगाचा उद्धार करणारी ,कल्याण करणारी हे आई माझा अपराध पोटात घाल.
पुत्र वाईट निपजू शकतो पण आई कधीच वाईट नसते.
जीवन जगण्याच्या रगाड्यात नेमकं वर्मच हरवून बसतो आपण . जन्मताच जसे निरागस असतो ते मन हळू हळू जनरहाटीत प्रदूषित होते. परतीच्या प्रवासात हे लक्षात येते.लेकरू चुकतेच पण आईने सांभाळावे ना त्याला सर्व परिस्थितीत !

पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः |
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||३||
आई ग ,पृथ्वीवर  तुझे अनेक पुत्र आहेत पण त्यामध्ये माझ्यासारखा एखादाच विरळातील विरळ आहे. (विषयासक्त झालेल्या )माझा हा (तुझ्यापासून दूर जाण्याचा ) त्याग योग्य नाहीच . हे शिवे(शिवाची पत्नी ) ,मुलगा वाईट निपजू शकतो पण आई कधीच वाईट नसते.
निसर्गचक्रानुसार आई होणं हे स्वाभाविक आहे पण "आईपण" एकदा समजलं की कोणतीच आई  कुमाता होऊच शकत नाही.
मुलगा कितीही मोठा झाला तरी  आईसाठी तो लहानच असतो.आईला अनेक मुलं असली तरी तिचा प्रत्येकाशी स्वतंत्र व विशेष अनुबंध असतोच .प्रत्येक मूल वेगळं असतं.
"कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति" ही काही श्लोकात समान अोळ आहे. ती एक प्रकारची टॅगलाईनच आहे या स्तोत्राची.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.



सहजोक्त.

  . शिवी ... अबबो आता शिवीवर पण लिहायचे कां? 😊 हं! लिहिता येऊ शकते. मराठी भाषेत 'शिवी' शब्द कुठून, कसा आला असेल बरे? मराठी भाषेतील ...