Saturday, September 27, 2025

रेणुकेचा अभंग

 


🙏🙏सातवी माळ 28/09/2025🙏🙏

  अभंग


अभंग  अक्षरवृत्त आहे, यालाच छंद असेही म्हणतात.

छंद म्हणून अभंगाचे दोन प्रमुख प्रकार पडतात. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग. 

मोठा अभंग=  प्रत्येक चरणाचे चार खंड पडतात. पहिल्या तीन खंडांत प्रत्येकी सहा अक्षरे असतात. तर शेवटच्या खंडात चार अक्षरे असतात.

 दुसऱ्या व तिसऱ्या चरणखंडाच्या शेवटी यमक जुळविलेले असते. 

तर शेवटचा खंड चरणाला पूर्णत्व देणारा असतो.

उदा० 

सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी ।। 

कर कटेवरी । ठेवोनिया ।।

 लहान अभंग= प्रत्येकी आठ अक्षरांचे दोन चरणखंड असतात.

 व शेवटी यमक जुळवलेले असते. 

उदा० 

जे का रंजले गांजले ।

 त्यांसी म्हणे जो आपुले ।।

 अभंग रचनेत अक्षरसंख्येचे बंधन नेहमीच काटेकोरपणे पाळले जाते असे नाही. उच्चारानुसार कमीजास्त अक्षरेही वापरली जातात,  हे या छंदाचे वैशिष्ट्य आहे.

"अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची"  ही उक्ती प्रसिद्ध आहे.

विष्णुदासांनी "अभंग रचना" देखील केली आहे.

आज जे उदाहरण पाहू ते, लहान अभंग या प्रकारातील आहे. 


नित्य मातृतीर्थी स्नान। नित्य रेणुकादर्शन ॥ १ ॥

आदिमाये तुजपाशी। सर्वदेव तीर्थे काशी ॥ २ ॥

उजळोनी ज्ञानज्योती नित्य ओवाळू आरती ॥ ३ ॥

करु तीर्थामृतपान। हेची जप तप ध्यान ॥ ४ ॥

 करू त्रिकाळ वंदन । तोडू यमाचे बंधन ॥ ५ ॥

करु नित्य प्रदक्षिणा। तन, मन, धन दक्षिणा ।। ६॥

तुझ्या बसोनी द्वारात । गुण गाऊ दिन रात ॥ ७॥

नित्य पाहु तुझे मुख। हेचि आम्हा ब्रम्हसुख ।। ८।।

नित्य विष्णुदास म्हणे । कृपा लोभ असू देणे ।।९।।


लहान अभंग असल्यामुळे  आठ -आठ अक्षरांचे दोन चरण (म्हणजे ओळी ) आहेत. दोन्ही चरणात यमक साधले आहे. जसे  स्नान-दर्शन, पाशी -काशी,  ज्योती -आरती, पान-ध्यान  इत्यादी 

अर्थच्या दृष्टीने अत्यंत सोपा असल्यामुळे वेगळ्या स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही.

वर्ण्य विषय रेणुका, हा एकच ठेवूनही एकसुरीपणा नसणे, ही विष्णुदासांच्या रचनेची खासियत आहे, हे नक्की.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर

लेख पूर्ण वाचून झाला की कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट नक्की करा, कृपया. 


आणि तुम्हाला माझे ब्लॉग लेखन आवडत असेल तर माझ्या नावसह ही link शेयर करायला विसरू नका. 😊









Friday, September 26, 2025

रेणुका मातेची आरती.

 


🙏🙏सहावी माळ 27/09/2025🙏🙏


 श्री रेणुका मातेची आरती

आदिशक्तीची विविध रूपे भारतात विविध नावांनी ओळखल्या जातात. आदिशक्ती जिथं सर्वप्रथम प्रकटली ते तिचे मूळपीठ. रेणुकेला भारतभर विविध प्रादेशिक नावांनी पूजले जाते, ज्यात आई येल्लम्मा, एकविरा, यमाई, एलाई अम्मन, पद्माक्षी रेणुका, उच्छंगी मरियम्मा आणि इलाई अम्मा इत्यादी महत्वपूर्ण आहेत. तर ही रूपे ज्या स्थानी प्रकटली ती सर्व उपस्थाने होय.  

या आरतीत  एकविरा रूपातील आदिशक्ती रेणुका हिचे विष्णुदासांनी स्तवन केले आहे. 


जयदेवी जयदेवी जयजय एकविरे।

 श्रीरेणुके जननी जय जगदोद्धारे ॥

 जय जय ॥ धृ.॥ 

आदि नमोस्तुते सकळारंभे आनंते। 

जय उदयोस्तु नारायणी श्रीभगवते ।

 जय जगदंबे अंबे परम कृपावंते। 

जय जय षाड्गुणयुक्ते अंबे श्रीमंते ॥ १ ॥

जगाचा उद्धार करणाऱ्या रेणुकेचा एकविरा आईचा जयकार असो ॥ धृ.॥ 

अनंत अशी आदिशक्ती सर्वप्रथम तुला नमस्कार असो. जगदंबा, परम कृपाळू अंबा सहा गुणांनी युक्त, श्रीमन्त  अशा हे नारायणी, भगवती तुझा उदय होवो. 

 •यश, श्री (लक्ष्मी), औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे सहा गुण आहेत. या गुणांमुळे देवी 'षड्गुणसंपन्न'  असतें.



श्रीमृगराजाचल मुळपीठासन मूर्ती ।

 सतत विराजे गाजे दिग्मंडळी कीर्ती।

 न्हाणिती नित्य सरस्वती यमुना भागीरथी।

 सुरवर मुनिजन भावे, पूजार्चन  करिती ।। 

जय जय ॥ २॥

मूळपीठ माहूर येथे सिहंसनावर आरूढ अशी तुझी मूर्ती विराजमान आहे. तुझ्या पराक्रमाची कीर्ती दिग्मंडळात गाजते. गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्या तुला न्हाऊ घालतात. श्रेष्ठ देव, मुनिजन, भक्तिभावाने तुझी पूजा, अर्चना करतात. 

•स्नान करविणे या क्रियापदासाठी न्हाणविणे, किती छान आहे ना?  मराठीतील कित्येक शब्द आजच्या मराठीत दिसत नाहीत.



 मुगुट कुंडले मंडित पीतांबर पिवळा।

 कुंकुम कज्जल केशर उटि कंकण माळा ।

 कणक स्तंभ मय-मंडपी शोभे वेल्हाळा । 

त्रिकाळ होतसे मंगळ भुवनी सुखसोहळा ।।

 जय जय ॥ ३ ॥ 


डोक्यावर मुकुट, कानात कुंडले, अंगावर पिवळा पितांबर. काजळ, कुंकू, केशर उटी, कंकणे, माळा आदी सर्व ल्यायलेली आदिशक्ती सोन्याचे स्तंभ असलेल्या मांडवात शोभून दिसते. तिची तिन्ही त्रिकाल पूजा अर्चना होते.


घालुनि रांगुळी उजळुनि धुपदिप सुगंधी।

 सुवर्णपात्री पंचामृत क्षिर बासुंदी। 

वरण भात घृत पापड डाळ बेसन बुंदी।

 प्रार्थिती स्वार्थ-आनंदे जेवी आनंदी ।। 

जय जय ।। ४ ।। 

रांगोळी घातलीय. धूप दीप लावून वातावरण सुगंधित झाले आहे. सोन्याच्या पात्रात पंचामृत, दूध, बासुंदी, वरण, भात त्यावर तूप, पापड, डाळ, बेसनाच्या बुंदीचे लाडू असे चारही ठाव जेवण वाढून  चांगल्या इच्छेने आनंदाने विनंती करतो की हे आनंदी तू जेवण कर.

•स्वार्थ= या  शब्दाचे दोन प्रकारे विग्रह करता येईल. स्व+अर्थ =स्वतः च्या साठी.

सु+ अर्थ = चांगल्या इच्छेने. 

इथे दुसरा अर्थ अपेक्षित आहे.



फल तांबूल दक्षिणा, सुभूषण सुमने।

 भरली ओटी मौतिक माणिक मणि सुमने।

 करूनि आरती वाहिली पुष्पांजली सुमने

 विष्णुदास म्हणे करि पूर्णार्चन सुमने ।।

 जय जय ।। ५ ।।

जेवणा नंतर, तांबूल, दक्षिणा, फळे,  दागिने आणि धत्तूर फळ (काटेरी फळ ), माणिक, मोती आणि गहू यांनी ओटी भरली. त्यानंतर सुंदर मान असलेल्या रेणुकेची आरती करून मग पुष्पांजली वाहिली. 

अशा प्रकारे विष्णुदास कवी अत्यन्त चांगल्या मनाने पूर्ण पूजा करितात.  


या कडव्यात सुमन शब्द चार अर्थाने आला आहे. धोत्र्याचे काटेरी फळ, गहू, चांगल्या मनाची रेणुका माता आणि चांगल्या मनाचे कवी विष्णुदास.



"षोडशोपचारपूजा" मधील सोळा उपचार पुढील प्रमाणे  (1)आवाहन , (2) आसन, (3)पाद्यपूजा , (4)अर्घ्य, (5)आचमन, (6)स्नान , (7)वस्त्र-उपवितक, (8)गंध-पुष्प-भूषा-अलंकार , (9) धूपदीप , (10) नैवेद्य, (11) तांबूल , (12) प्रदक्षिणा , (13)नमस्कार, (14)स्तोत्र, (15) निराजन , (16) उद्वसन (विसर्जन).

ह्या आरतीतून यातील बरेच उपचार उल्लेखले आहेत. जसे👉



पहिल्या कडव्यात देवते चे आवाहन केले आहे.

दुसऱ्या कडव्यात  देवतेचे स्नान, सम्मार्जन , पूजन, अर्चन केले आहे.

तिसऱ्या कडव्यात कुंकूम, केशर, उटी, वस्त्र, आभूषणे अर्पण इत्यादी आहे.

चौथ्या कडव्यात रंगावली, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी आनंदपूर्वक  अर्पण केले आहे.

पाचव्या कडव्यात तांबूल, फुलांचे दागिने, ओटी भरणे, आरती, मंत्रपुष्पांजली वगैरे करून पूजा पूर्ण झालेली असे सांगितले आहे. 

तर अशाप्रकारे ही एक परिपूर्ण आरती आहे.


©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर

लेख पूर्ण वाचून झाला की कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट नक्की करा, कृपया. 


आणि तुम्हाला माझे ब्लॉग लेखन आवडत असेल तर माझ्या नावसह ही link शेयर करायला विसरू नका. 😊








Thursday, September 25, 2025

रेणुका मातेचे अष्टक

 



पाचवी माळ २६\०९\२०२५ शुक्रवार .


रेणुका मातेचे अष्टक

आज  दूसरे आणि अतिशय आशयघन अष्टक बघू. या आधी सुद्धा जे  अष्टक घेतले होते , ते म्हणजे विष्णुदासांची अनुभूती होती . आजचे अष्टक , ही आत्यंतिक तळमळीतून केलेली आर्त विनवणी आहे. अष्टक असूनही यात १३ कडवे आहेत.  तेराही कडव्यांची शेवटची ओळ किंवा शेवटचे चरण समान आहे.

हक्काच्या आणि प्राणप्रिय व्यक्तीने अपेक्षा पूर्ण केली नाही किंवा डावलले की अतिशय जास्त वाईट वाटते. स्वतःचा  वैताग येतो, त्या नंतरची अवस्था म्हणजे  प्राणप्रिय व्यक्ती आणि आपल्या नात्यावरच शंका घ्यायची! शेवटी तिची लाज काढायची!  रेणुका ही विष्णुदासांची हक्काची आणि प्राणप्रिय आई आहे. त्यामुळे ते म्हणतात , "लाज याची रेणुके, तुला सारी" . 


पतिताची दुरित कृती केली 

पतितपावन ही कीर्ति आयकेली

 म्हणुनि पडलो येउनी तुझ्या दारी 

लाज याची रेणुके, तुला सारी ।। १।।

विष्णुदास म्हणतात , मी अनेक पाप केले ,पतीत झालो. तू पतितपावन आहेस ,अशी कीर्ती ऐकून मी तुझ्या दरी येऊन पडलो. इतके दिवस तुझ्या दारी पडून आहे, याची मला नव्हे , तुलाच लाज वाटायला हवी. 

इतके दिवस तुझ्या दारी पडून राहूनही तू उद्धार केला नाहीस. या साऱ्याची लाज तुलाच असायला  हवी. 


 मूळपीठ स्वस्थानि वास केला 

सतत जपलो मी नाममालिकेला 

बहुत दिन गे, घातली तुझी वारी 

लाज याची रेणुके तुला, सारी ॥ २ ॥

परशुरामाची रेणुका ही मातृतीर्थतून उगम पावली , मग गडावर राहायला गेली. 'मातृतीर्थ', हे  मूळपीठ आहे. विष्णुदास यांनी मातृतीर्थाजवळ अनेक वर्ष राहून तपाचरण केले. रेणुकेचे ध्यान आणि अखंड जप, व्रत केले. तसेच मातृतीर्थ ते गड अशी वारी खूप दिवस केली. {आज रस्ते उत्तम झाल्यामुळे काही वाटत नाही पण १८ व्या शतकात मातृतीर्थ ते गड असे पायी चलणेही सोपे नसणार } इतके करूनही तू पावत नाहीस याची लाज तुला वाटू दे. 


 जरी आहे मी स्वार्थी कामसाधू 

तरी लोकांनी मानियेले साधू 

तुझ्या नावाची दाखवि ती थोरी 

लाज याची रेणुके तुला सारी ॥ ३ ॥

तुझ्या दृष्टीने मी अत्यंत स्वार्थी आणि काम साधवून घेणारा असेल पण लोकांनी मला तुझा परम भक्त , साधू मानले आहे . त्यामुळे माझ्यासाठी नाही तर तुझे पतितपावन हे नाव राखण्यासाठी तू दर्शन दे. आणि स्वतःची लाज राख. 



 नसे ब्रम्हांडी तुझ्या विण कोणी

 अता वेगे उडि घालि सुनिवाणी 

त्रिविध तापे तापली असे भारी 

लाज याची रेणुके तुला सारी ॥ ४॥

तुझ्या शिवाय दुसरे कोणीच या अक्ख्या ब्रह्माण्डात नाही. माझी आर्त विनवणी ऐकून तू वेगाने या (संकटात) उडी घाल. (मला संकटामुक्त कर.) ( ही पृथ्वी/प्रजा) त्रिविध तापाने तापली आहे.  

{आता तरी जरा लाज बाळग आणि सत्वर पाव.}



गृही व्यालेली कामधेनू माय 

ग्रामलोकांसी ताक मागु काय 

कृपण म्हणतिल निर्देवि हा भिकारी 

लाज याची रेणुके, तुला सारी ॥ ५ ॥ 

आपल्या घरात कामधेनू गोमाता व्यायलेली आहे, आणि आपण गावात ताक मागावे, जे फारच लाजिरवाणे आहे. (माझ्या जवळ तुझ्या सारखी कल्पवृक्ष माता असूनही, मी लोकांचे ताप दूर करू शकत नसेल तर)  लोकं मला,' हा वैरागी, भिकारडा'  म्हणत असतील तर, याची लाज तुलाच वाटू दे. 



जन्मता गाजे सिंहिणिचे तोक

 ग्रामसिंहाचे संगे करी शोक 

जंबुकाचे भय कंप घे शिकारी 

लाज याची रेणुके, तुला सारी ॥ ६ ॥

सिंहाचा छावा जन्मताच स्वपराक्रमाने गाजत असतो. पण तोच जन्मापासून कुत्र्याच्या संगतीत राहिला तर शेळपट होतो, लांडग्याचीपण भीती कायम त्याच्या डोक्यात बसते.  यात सिंहाचा दोष काय? 

तसेच माझ्या अगतिकतेची तुलाच लाज वाटायला हवी.

•तोक=  अपत्य (तौति पूरयति गृहमिति|) 

•ग्रामसिंह= कुत्रा.  [ अशा प्रकारचे संस्कृतभाषेत अपशब्दासाठीही अत्यन्त सुसंकृत अनेक शब्द आहेत. जसे वैशाखनंदन, सुकुमारबुद्धी, घृतबुद्धी वगैरे]  


 होय सर्पाची दासि गरुड-माता 

गलंलाने वैद्याचि रडे कांता

 समर्थाचा आश्रीत करी चोरी

 लाज याची रेणुके, तुला सारी ॥७॥ 

(कर्ती करविती रेणुका असून जर जगात सज्जनांना त्रास होत असेल जसे की)  गरुडाची आई सापांची दासी झाली. नवरा वैद्य असून,  बायको व्याधीने रडते. समर्थ व्यक्तीचा आश्रित असून चोरी करतो. तर जगन्नियंती माते, तुला या सर्वांमुळे स्वतः चीच लाज वाटायला हवी.



तुझ्या नामी विश्वास अल्प नाही 

म्हणुनि धावे दुष्कीर्ति कल्पना ही 

पतित पापी मी परम दुराचारी 

लाज याची रेणुके, तुला सारी ॥ ८॥ 

तुझ्या नामस्मरणावर थोडासाही भरवसा नाही. म्हणून डोक्यात तुझ्याबद्दल कुप्रसिद्धीच्या कल्पना येतात. मी साशंक होतो, आणि म्हणून मी फारच वाईट आचरण करतो, पापी होतो. 

पण या साऱ्याची लाज तुलाच वाटायला हवी करण कर्ती करविती तूच आहेस. 



तुझ्या  चरणाची भेट घ्यावी वाटे

 परि नेते प्रारब्ध आडवाटे 

गळा पडली दृढ संचिताचि दोरी

 लाज याची रेणुके, तुला सारी ॥ ९ ॥ 

तुझ्या चरणाची भेट घ्यावी असे मनात येते पण माझे संचित (प्रारब्ध) मला तुझ्या पर्यंत न नेता भलत्याच मार्गाने नेते. अशा तऱ्हेने संचितकर्माच्या मोठं मोठ्या गाठी पडल्या आहेत. यात तुलाच लाज वाटायला हवी. 



अहा ! दारिद्रये पीडित गृह-द्वारा 

कर्जदारहि धावोनि येती दारा 

त्यात रोगाची दाटली उभारी 

लाज याची रेणुके, तुला सारी ॥ १० ॥ 

माझ्यामुळे फार मोठ्या आर्थिक विपन्नावस्थेत माझी गृहिणी पडली. कर्जदार देखील घरावर धाड मारतात. त्यात रोगाने उचल खाल्ली. 

माझ्या या दुर्दैशेमुळे तुला स्वतःची लाज वाटायला हवी. 




चलित दिवसाची साथि काकि मामी

 परी निर्वाणी कुणि न ये कामी 

निर्धनाची मानिती ते शिसारी 

लाज याची रेणुके, तुला सारी ॥ ११ ॥ 

(सुख के सब साथी, दुःख में ना कोई, याच अर्थाचे हे 👇 कडवे)  चांगल्या दिवसात काकी, मामी वगैरे साथ देतात पण दिवस फिरले की कोणीच साथ नसते. कठीण समय येता कोण कामास येतो? हेच खरे, नाही कां?  निर्धन नातेवाईक, कोणालाच नको. सर्वांनाच त्याचा तिटकारा असतो.  पण याची लाज रेणुके तुलाच असायला हवी.



पहा बुडतो मी दुःखसागरांत 

कशी बसलिस तू स्वस्थची घरात 

कृपावंते ही विनंती अवधारी 

लाज याची रेणुके, तुला सारी ॥ १२ ॥ 

मी इथे दुःख सागरात बुडालो आहे, तू मात्र तुझ्या स्थानी स्वस्थ बसून आहेस. तू तर कृपाळू आहेस, मग माझी विनवणी कां मानत नाहीस? थोडी तर लाज बाळग. 



सर्व माझे अजि हारले उपाय 

म्हणुनि अंबे धरियले तुझे पाय 

विष्णुदासाची दीनजननी, तारी 

लाज याची रेणुके, तुला सारी ।। १३ ।।

माझे सर्वच उपाय आज हरले. आता अंबा बाई मी तुझे पाय धरतो. तू दीनाची, या विष्णुदासा ची आई आहेस. आता तरी लाज राख. मला या सर्व संकटातून बाहेर काढ. 


हे अष्टक म्हणजे आईसमोर मांडलेले गाऱ्हाणे, तक्रार आहे. आईशिवाय कोणावरच सत्ता चालत नाही. आईला मात्र भावनिक होत रडत-पडत काहीही बोलता येते. 

हे अष्टक त्यांचे उदाहरण आहे. 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर

लेख पूर्ण वाचून झाला की कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट नक्की करा, कृपया. 

आणि तुम्हाला माझे ब्लॉग लेखन आवडत असेल तर माझ्या नावसह ही link शेयर करायला विसरू नका. 








Wednesday, September 24, 2025

रेणुका मातेचे पद

 




🙏चौथी माळ 25/09/2025🙏

पद

आली आई भवानी स्वप्नांत ॥ धृ० ॥ 

श्रीवरदा सुप्रसन्न मूर्ति । 

जशी विज चमके गगनांत ॥ १ ॥ 

सरळ भांग, निळ भुजंगवेणी । 

काजळ ल्याली नयनांत ॥ २ ॥ 

रत्नजडित हार, पीत पितांबर । 

कंचुकि हिरवी अंगांत ॥ ३ ॥

 केशर कस्तुरि मिश्रित तांबुल ।

 लाल रंगला वदनांत ॥४॥

 कंकणें कनकाचीं खणखणती । 

वाजति पैंजण पायांत ॥ ५ ॥

 विष्णुदास म्हणे अशिच निरंतर । 

दे आवडी मज भजनांत ॥ ६ ॥

उषा मंगेशकर, प्रख्यात मंगेशकरी वारसा लाभलेल्या गायिका. आपल्या गायनाचा पोत लक्षात घेऊन वैशिष्ट्यपूर्ण गायन करणाऱ्या प्रख्यात गायिका.  नवरात्री मध्ये यांच्या आवाजातील हे गाणे ऐकले नाही, असे होणारच नाही . तर हे  'गाणे' मूळात विष्णुदास यांची पदरचना आहे. विष्णुदासांच्या स्वप्नात  आई भवानी रेणुका आली. तिचे वर्णन यात केले आहे . विष्णुदासांची शब्द रचना  जणू दृकश्राव्य  आहे बघा . हे गाणे ऐकताना किंवा पद वाचताना डोळ्या समोर रेणुकेचे  रूप येते . जसे जसे वर्णन वाचत जावे तसे तसे  सर्व दृश्य  समोर उभे राहते.  इतकेच नाही तर पदातील नादमाधुर शब्दातून तो तो ध्वनी कानी पडतो बघा. 


आली आई भवानी स्वप्नांत ॥ धृ० ॥ 

श्रीवरदा सुप्रसन्न मूर्ति । 

जशी विज चमके गगनांत ॥ १ ॥ 

विष्णुदास सांगतात , की ऐश्वर्य आणि वर देणारी , प्रसन्न मूर्ती  असलेली आई भवानी  स्वप्नात आली,  जशी वीज क्षणिक चमकते आकाशात , सर्व आसमंत उजळते आणि बराच काळ लोकांच्या मनात राहते.  तशी तिने माझे अंतरंग भारावून व   उजळून टाकले. 



सरळ भांग, निळ भुजंगवेणी । 

काजळ ल्याली नयनांत ॥ २ ॥  

रेणुकेचे मातृरूपाची छवी  विष्णुदासांच्या मनःपटलावर पक्की कोरली गेली असावी , कारण देवीचे वर्णन बरेचद समान आहे. इथेही बघा. तिचा भांग सरळ आहे, वेणी निळसर , सापासारखी सळसळणारी आहे. डोळ्यात काजळ घातले आहे. (असेच वर्णन 'जय जय जगदंबे' या आरतीतही आहे.  ) 


रत्नजडित हार, पीत पितांबर । 

कंचुकि हिरवी अंगांत ॥ ३ ॥

(असेच वर्णन 'जय जय जगदंबे' या आरतीतही आहे. ) 

गळ्यात रत्नजडित हार , अंगात हिरवी कंचुकी (कुठेच शिलाई, कातरणकाम, बाह्या  नसलेले  पोलके ) आणि पिवळे रेशमी लुगडे  घातले  आहे. 


 केशर कस्तुरि मिश्रित तांबुल ।

 लाल रंगला वदनात ॥४॥

(हे ही  वर्णन 'जय जय जगदंबे' या आरतीतही आहे. ) केशर, कस्तूरी मिश्रित तांबूल तिच्या तोंडात लाल  रंगला आहे . [तांबूल हे सौभाग्यशालिनी देवीचे आवडते खाद्य आहे. ]


 कंकणें कनकाचीं खणखणती । 

वाजति पैंजण पायांत ॥ ५ ॥

(असे देखील  वर्णन 'जय जय जगदंबे' या आरतीतही आहे. ) सोन्याची कंकणे (जरा जाड बांगड्या) हातात खणखण आवाज करीत आहेत. पायातील पैंजण वाजत आहेत. 

या कडाव्यातून विविध आभूषणाच्या नादाची श्राव्यानुभूती जाणवते.



 विष्णुदास म्हणे अशिच निरंतर । 

दे आवडी मज भजनांत ॥ ६ ॥

प्रत्यक्ष , अनुभूतीतून रेणुकादेवीला भेटणारे विष्णुदास , देवी जवळ काय मागणे मागतात ? तर "तुझे  भजन निरंतर , सतत अखंड करण्याची आवड मला लागो". 

ह्या पदाचे  हे कडवे वाचून , संत एकनाथांचे पद  आठवले ,

"माझ्या मना लागो छंद , गोविंद , नित्य गोविंद" |


आज आपली चौथी माळ समर्पित झाली. 

©डॉ प्रज्ञा देशपांडे 

नागपूर 

लेख पूर्ण वाचून झाला की कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट नक्की करा, कृपया. 

आणि तुम्हाला माझे ब्लॉग लेखन आवडत असेल तर माझ्या नावसह ही link शेयर करायला विसरू नका. 





शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...