Friday, August 18, 2017

#सहजोक्त .लेखांक४

#आरती. .  लेखांक ४
#लवथवती विक्राळा. .
शंकर एक आराध्य दैवत. विनाशकारक देव सृष्टीचा लय कर्ता पण शब्दसृष्टीचा कर्ता. त्याची ही आरती. हाच एकमेव देव ज्याची पत्नी ही अगदी
 प्रिय- प्राणेश्वरी-सहचरी-सहधर्मचारिणी आहे. म्हणून हा देव सर्वात जास्त आवडतो.  म्हणूनच याची पूजा कन्यकांनी करावी कि जेणे करून पती  शंकराप्रमाणे पत्नीची कदर करणारा , समानपणे वागणारा मिळेल.  असो.

लवथवती विक्रळा ब्रह्मांडी माळा ।
विषे कंठ काळा, त्रिनेत्री ज्वाळा ॥

तांडवनृत्य करणा-या , तिसरा डोळा उघडलेल्या रौद्ररूप शिवाचे हे वर्णन . तसे कर्मकांडानुसार उग्रदैवताची आराधना करू नये म्हणतात पण इथे तर पहिल्याच अोळीत देवतेचे उग्रभाव प्रगटले आहेत.  तांडवनृत्य करताना ज्याच्या गळ्यातील विकराळ , महाभयंकर नरमुंडमाळ हिंदकळत आहे . ज्याचा गळा विषामुळे निळा-काळा झालाय. ज्याच्या तिन्ही डोळ्यातून ज्वाळा निघत आहेत. शंकराच्या तीन डोळ्यांपैकी एक चंद्र ,एक सूर्य तर एक अग्नी आहे.
या अोळीत उग्र दैवताचे वर्णन तर घडले आता लगेच त्याला उतार.

लावण्यसुंदर मस्तकी बाळा
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥

शंकराच्या मस्तकावर लावण्यसुंदर अशी बाला आहे.
मराठीत 'ल' चा  'ळ' होतो. जसे. .  . .
कुल=कुळ
कला=कळा
निला=निळा
जल=जळ इत्यादी .
बाळा म्हणजे बाला.  म्हणजेच सौभाग्यकांक्षिणी स्त्री.  सोप्या शब्दात नवरा काय ,कशासाठी हवा हे समजू शकणारी सज्ञान तरूणी.  शंकराच्या डोक्यावर लावण्यवती गंगा आहे जिच्यापासून झुळझुळ, निर्मळ जळ वाहते .

सुंदरच रचना!
या दोन्ही अोळीत लवथवती , झुळझुळ  हे नादमय शब्द चपखल योजले आहेत . क्रोधात लवथवणारच .प्रेमात झुळझुळणारच . विसंगतीपूर्ण अर्थयुक्त शब्द ,वाक्य जवळ जवळ,  हा ही एक अलंकारच म्हणावा !
वर रौद्ररूपातील रौद्ररसयुक्त वर्णन तर
 दुसर्‍या अोळीत निर्मळ , प्रेमळ असे शांत, श्रुंगाररसयुक्त वर्णन!
  त्रिनेत्र ज्वाळा अोकत आहेत तर पाणी झुळझुळ वाहते आहे.


जयदेव जयदेव जय श्रीशंकरा
आरती  अोवाळू तुज कर्पूरगौरा ।

शंकराचा जयजयकार केला आहे.शंकर कापरासारखा गोरा आहे. फेअर अँड लव्हली न लावताही फेअर !!

कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा॥
विभुतीचे उधळण शितीकंठ निळा
ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ॥

कर्पुराप्रमाणे गौरवर्णीय असलेला हा शंकर भोळा आहे.त्याचे डोळे विशाल, मोठे-मोठे आहेत. त्याची अर्धांगिनी (शब्दश:  पण आणि लक्षार्थाने पण) ;  पार्वती  मंदारपुष्पमालांनी सजून त्याच्या अर्धासनावर बसलेली आहे .
त्याच्या अंगावर  चिताभस्म विभूतीचे उधळण  आहे.
ज्याचा मूळातील पांढरा गळा आता विषप्राशनामुळे  निळा झाला आहे.  असा हा शंकर उमावेल्हाळ   आहे.
'वेल्हाळ' एक मस्तच मराठी शब्द . गोष्टीवेल्हळ, वेल्हाळगौर असे शब्द वापरतो आपण .
 वेल्हाळ म्हणजे दिवाना ,वेडा .  उमेचा म्हणजे स्वत:च्या पत्नीचा दिवाना . खरोखर सलाम आपल्या पुराणकथांना  ! गंगा कितीही डोक्यावर बसू देत ,हा मात्र उमेचाच दिवाना !
 "मान गये उस्ताद"!  म्हणूनच महादेव आहात.

देवी-दैत्यी सागरमंथन पै केले।
त्यामाजी अवचित हालाहल जे उठले।
ते त्वा असुरपणे प्राशन केले
नीलकंठ नम प्रसिद्ध झाले।।

या अोळीत जरा जुन्या मराठीच्या पाऊलखुणा आहेत. पै हे पादपूरणार्थ अव्यय आहे.
याला मुळचा अर्थ नाही.
देवी-दैत्यी या शब्दांत तृतीयेचा 'ई' प्रत्यय आहे.
त्वा हा ही तद्भव शब्द आहे. (सध्याच्या प्रचलित नागपुर ग्रामीण बोलीत "तुवा असं काहून मनलं ?" म्हणतात ना ? त्यातील हा त्वा  आहे .)
देवांनी आणि दानवांनी सागरमंथन केले , त्यातून अनपेक्षित , अचानक, एकाएकी , अवचित हालाहल नावाचे जहाल विष बाहेर पडले . इतर रत्ने घेण्यास सगळे समोर पण हे मात्र कोणीच स्वीकारले नाही. त्यावेळी असूरपणे म्हणजे अतिशय पराक्रमाने, उत्साहाने तू ते प्राशन केले .
असूर या शब्दाचा राक्षस हा अर्थ मागाहून  रूढ झाला. आधी त्याचा अर्थ पराक्रमी असा होता. तसेही राक्षस अफ़ाट पराक्रमी होते.
सामान्य देव मृत्यू पावले असते वा त्यांचे सर्वांग निळे झाले असते पण तुम्ही महादेव ! तुमचा गळा निळा झाला.  म्हणून तुमचे नाव निळकंठ पडले.

व्याघ्रांबर फणिवर सुंदर मदनारी
पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी
रघुकुळ टिळक रामदासा अंतरी ॥

शंकर गजाजीन घालतात वा व्याघ्रांबर  घालतात. येथे शंकराचे वर्णन करताना त्यांनी व्याघ्रांबर घातले आहे असे म्हणतात.  फणिवर म्हणजे श्रेष्ठ नाग धारण केलेला शंकर ,सुंदर असून मदन अरी आहे , म्हणजे मदनाचा शत्रु आहे. शंकराची पिंड म्हणजे पति-पत्नीच्या एकत्वाचे प्रतीक अन् तो मदनारी!! कसे शक्य आहे हे ? उमेचा वेल्हाळ ! तरी मदनरी?

 इथेच गंमत आहे.जीवनात सर्वच रंग हवेत, योग्य तेथे योग्य मात्रेत .  रंगांची सरमिसळ नको किंवा एका रंगातून दुसर्‍या रंगात शिरताना जुन्या रंगाची उजळणी नको.  हा तसाच आहे.  म्हणून तो मदनारी आहे.
 पंचानन म्हणजे सिंहासारखा पराक्रमी.
 मनमोहन म्हणजे मन मोहविणारा.
 मुनिजनांना सुखकारक ठरणारा ,
 असा हा शंकर रघुकुळाला भूषवाह असलेल्या रामदासाच्या अंतरंगात शतकोटीचे बीज वाचेतून प्रकटू दे .

 आता पर्यंत प्रचलित तीन आरतींचे रसग्रहण मला भावले तसे यथामती केले. "तेच बरोबर" असा माझा दावा नाही. यापेक्षा अधिक चिंतन करून कोणी मांडू शकतीलच अशी आशा नव्हे खात्री आहे.
 "देवार्पणमस्तु।"
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर

No comments:

Post a Comment

लो लो लागला

  🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏 #श्री रेणुका मातेची आरती. ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यां...