Saturday, August 19, 2017

#सहजोक्त - लेखांक ५

लेखांक ५
आरत्या म्हणून झाल्या कि शेवटी दोन कडव्यांची संस्कृत कर्पुरारती म्हणण्याचा प्रघात कुठे कुठे आढळतो.

कर्पुरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेंन्द्रहारं
सदा वसतं ह्रदयारविंदे भवं भवानीसहितं नमामि ॥

शेवटचे चरण "भवनी सहितं भवं  नमामि ।
म्हणजे भवानी (पार्वती) सह भवाला म्हणजे शंकराला मी नमस्कार करतो.आता वरच्या तीन अोळीत फक्त शंकराचे वर्णन अाहे. शेवटी मात्र हायकमांड सह आराध्याला नमस्कार केला आहे.
वरच्या तीन चरणांमध्ये शंकराची सर्व विशेषणे द्वितीया विभक्तीत योजली आहे कारण "नमामि" (मी नमस्कार करतो) या क्रियापदाला
कर्म द्वितीया विभक्तीत अपेक्षित आहे.  म्हणजे शंकराची सर्व विशेषणे द्वितीया विभक्तीत आहेत.
कर्पुरगौरम् =कापरा सारखा गोरा.
करुणावतारम् = करूणेचा अवतार.
संसारसारम् = संसाराचे, विश्वाचे सार /मर्म
भुजग इंद्र हारम् = भुजंग राजाचा हार धारण केलेला.
सदा वसन्तम् = नेहमी राहणारा /वसणारा
हृदयारविंदे = भक्तांच्य‍ा हृदयकमळात.
अशा शंकराला कवी पार्वतीसह नमस्कार करतो आहे.
आता दुसरे कडवे. . .

मंदारमालांकृतालकायै ,कपलमालांकितशेखराय
दिव्यांबरायै च दिगंबराय , नम: शिवायै च नमः शिवाय ॥

मंदर माला अलंकृत अलकयै = मंदारफुलांच्या माळांनी जिने केस (अलका) अलंकृत केले आहेत ,सजवले आहेत.  त्या पार्वतीला .

कपालमाला अंकित शेखराय = कपाल ( नरमुंड) माऴांनी युक्त शेखराला ,शंकराला .

दिव्य अंबरायै = दिव्य म्हणजे उची /भारी / महागडे  वस्त्र (अंबर) घातलेल्य पार्वतीला.

दिक् अंबराय = दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे त्या शंकराला.

नम: शिवायै = शिवा म्हणजे शिवानी म्हणजे शिवशंकरची पत्नी ,तिला. नमस्कार असो.

नम: शिवाय =  शिवाला म्हणजे शंकराला नमस्कार असो.

नम: हे अव्यय असून त्याचा अर्थ "नमस्कार असो" हा होतो. या अव्ययाला चतुर्थी विभक्तीची  अपेक्षा असते.

या श्लोकात पार्वती व शंकर अशा दोहोंना ही त्यांच्या विशेषणांसह नमस्कार केला आहे.
पैकी पार्वतीची विशेषणे स्त्रीलिंगी चतुर्थी विभक्तीत तर शंकराची विशेषणे पुल्लिंगी  चतुर्थी विभक्तीत आहेत.

शिव-पार्वती या दंपतीच्या स्वभावात ,रहाणीमानात आमूलाग्र भेद आहे. तो इथे ठऴकपणे दाखविलाही आहे. तरीही सर्व देवांमध्ये ही "जोडी नंबर एकच" आहे. कारण त्यांचा बाह्य भेद त्यांच्य‍ा अंतरंगातील अद्वैताला छेद देत नाही. अंतरंग समन्वय फारच महत्वाचा . "जो अंदर फिट ,वो बाहर भी हिट"!.

पाच लेखांमधून मराठमोळ्या संस्कृतीला जपणा-या आरती नामक अक्षरवाङ्मयाचा वेध घेण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला. या वाङ्मयाकडे भाषाभ्यासकांनी अधिक लक्ष द्यावे तसेच भाषेच्या विद्यार्थ्यांनी याही वाङ्नयाकडे अभ्यासविषय म्हणून पहावे ही विनंती.
सामान्य वाचकांनी अर्थ समजून आरतींचे उच्चार केले तरी हा वाग्यज्ञ सफल झाला हेच मी समजेन.
देवार्पणमस्तु ।
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर.



No comments:

Post a Comment