Monday, March 26, 2018

#सहजोक्त.



खल्वाट चंड किरणे अतितप्त झाला.
छायार्थ ताडतरुमूल समीप गेला. ।
तत्काल थोर पडले फ़ळ तो निमाला.
 ये जेथ दैवहत होईल तेथ घाला.॥
 ‎
 ‎खल्वाट =डोक्यावर केसं नसलेला (टकलु)
 ‎चंड= प्रखर
 ‎अतितप्त= फार तापला
 ‎ताडतरुमूल= ताडाच्या झाडाच्या बुंध्याशी
 ‎समीप= जवळ
 ‎निमाला= मेला ,मृत झाला.
 ‎दैवहत = दुर्दैव ,कमनशीब
 ‎घाला येणे = मोठं संकट येणे.
 ‎अर्थ = कोणी एक टकलामनुष्य( वाटसरु) प्रखर उन्हाने अतिशय तापला. सावली मिळावी म्हणून ताडाच्या बुंध्याशी गेला. त्याच वेळी ताडाचे मोठेफ़ळ त्याच्या डोक्यावर पडले न् तो मेला.
 ‎जेथे दैवच खराब होते तेथे हमखास संकट येणारच !
 ‎हा श्लोक "अर्थांतरन्यास अलंकाराचे" उदाहरण आहे.शेवटच्या अोळीच्या स्पष्टीकरणासाठी वरचे उदाहरण दिले आहे .

मराठी पंडितकाव्य परंपरा अतिशय प्रगल्भ व सर्वंकष होती. मोरोपंर ,रघुनाथपंडित ,वामन पंडित आदी अनेक दिग्गजांनी संस्कृतग्रंथांना नुसते अनुवादून मराठीत आणले नाही; तर त्यामूळ संकल्पनेला स्वप्रतिभेने अत्युच्च्य पातळीवर नेऊन अजरामर केले.
वर दिलेला हा श्लोक मराठी तर खाली संस्कृत श्लोक देतेय.

खल्वाटो दिवसेश्वरस्य किरणैः सन्तापितो मस्तके । गच्छन्देशमनातपं विधिवशात्तालस्य मूलं गतः।
तत्राप्यस्य महाफलेन पतता भग्नं सशब्दं शिरः।
प्रायो गच्छति यत्र भाग्यरहितस्तत्रैव यान्त्यापदः।।

याच श्लोकाचा पाठभेद असा

खल्वाटो दिवसेश्वरस्य किरणैः संतापितो मस्तके
वाञ्छन्देशमनातपं विधिवशाद् तालस्य मूलं गतः।
तत्राप्येकफलेन मूर्ध्नि पतता भग्नं सशब्दं शिरः
प्रायो गच्छति यत्र भाग्यरहितस्तत्रापि यान्त्यापदः॥

भाषा विकास >भाषा-अंतर >टीका (अर्थविस्तारासह भावानुवाद) . सहज सुंदर साधलाय,दोन्ही भाषेला साजेसा.

©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment

#सहजोक्त

. क्षमा शस्त्रं करे यस्य  दुर्जनः किं करिष्यति।  अतृणे पतितो वह्निः  स्वयमेवोपशाम्यति॥ ज्याच्या हातात क्षमा नावाचे शस्त्र आहे, त्याचे दुर्जन...