Tuesday, January 2, 2018

#चित्रकविता

#चित्रकविता
आताशा भीति वाटते स्वप्न बघायचीपण॥
उगाच छळतात नंतर बनून आठवण॥
जे जसं समोर येईल त्याला तोंड देणे ॥
नाही तर मागाहून मनात कुढत बसणे ॥
सारे हिशोब नाहीच  चुकते करता  येत  ॥
तेच मग ठरतात भळभळती जखम थेट ॥
म्हणूनच मी स्वप्न पाहणं सोडलय ॥
कारण सत्याहूनही जास्त त्यांनीच मला छळलय  ॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे

Monday, January 1, 2018

#सहजोक्त


 रे रे रासभ, वस्रभारवहनात् कुग्रासमश्नासि किम् ?
 ‎राजाश्वावसथं प्रयाहि चणकाभ्यूषान् सुखं भक्षय ।
 ‎सर्वान् पुच्छवतो हया:इति वदन्त्यत्राधिकारे स्थिता:
 ‎राजा तेरुपदिष्टमेव मनुते सत्यं,तटस्था: परे ॥
 ‎ दोनतीन दिवसांपासून हा श्लोक डोक्यात घोळतो आहे. अर्थ असा की," हे धोब्याच्या गाढवा ,कपड्यांचे अोझे वाहून (देखील) वाईट अन्न कां बरे खातोस ? राजाच्या अश्वशाळेत जा आणि तेथे भाजलेले हरभरे खुशाल खा. ह्या ठिकाणी असलेले अधिकारी ,शेपटीधरी प्राण्यांना घोडा समजतात नि राजाही त्यांच्यावर विश्वास ठेवतो, इतर लोक तटस्थ असतात."
 ‎अन्योक्ती प्रकारातील अतिशय मार्मिक असा हा श्लोक. आजही सार्थ आहे. संस्कृतातील सुभाषिते आजही समर्थ कां ? कारण आजही त्यांची उपयुक्तता ताजी आहे.
 ‎तत्कालिन परिस्थितीवर भाष्य करणारा हा श्लोक आजही यथार्थ नव्हे कां?
 ‎क्षेत्र कोणतेही घ्या ,काळ कोणताही असू द्या परिस्थिती बदललेली नाही. हेच खरे.
 ©डॉ. प्रज्ञा  देशपांडे.
 ‎

Saturday, December 30, 2017

सहजोक्त

#सहजोक्त .
श्रद्धा-अंधश्रद्धा
वेदांमध्ये *श्रद्धासूक्त* आहेत.
*श्रद्धया कृतम् इति श्राद्धम्* असे मानतात. शिष्याला उपदेश करतात पहिले *श्रद्धस्व* असे सांगतात. भग्वद्गीतेतही *श्रद्धावान् लभते ज्ञानम्* असे म्हटले आहे. *धम्मपदातही* श्रद्धेचे महत्व मानले आहे. श्रद्धा महत्वाचीच आहे. त्याचे आलंबन योग्य वा अयोग्य असू शकते. ते सापेक्षही असू शकते .पण श्रद्धेशिवाय ज्ञान अशक्यच.
*अंधश्रद्धा* हा शब्द मराठीत *लोकनायक बापुजी अणे* यांनी आणला म्हटले तर वावगे ठरू नये. *तिलकयशोर्णव*या त्यांच्या संस्कृत महाकाव्यात "अंधश्रद्धजना: एते नित्यं* *धूर्तै: वंचिता:*" असा उल्लेख आलाय.

श्रद्धा- अंधश्रद्धा ह्या भावनाच आहेत. बरेचदा एखाद्याची श्रद्धा दुस-यासाठी अंधश्रद्धा ठरू शकते. अनेकदा *आपला तो सोन्या दुस-याचा तो कार्टा* अशी अवस्था *श्रद्धा-अंधश्रद्ध* या बद्दल असते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Monday, December 25, 2017

#सहजोक्त



अहंकार आपला असेल तर स्वाभिमान, जवळच्याचा असेल तर गर्व ,नावडत्याचा असेल तर माज ! अहं म्हणजे मी. मीपणा म्हणजेच अहंकार !
तसं बघितलं तर जन्माला आल्यापासून माणूस स्वतःच्या अस्तित्वाला जपत असतो.
 पहिले शरीरभान मग मनोभान मग पुढे वैश्विक भान . . !
 मी>माझं : आम्ही>आमचं मग आपण>आपलं असा उदार प्रवास सुरु होतो.
अहंभाव लहानपणीच असतो असं नाही. उलट लहानपणीचा अहंभाव निरागस, लवचिक असतो.
जसे जसे मोठे व्हावे (वय-अनुभव,पद,पैसा,सत्ता  इत्यादी कोणत्याही दृष्टीने ) अहंकाराची पुटंच्या पुटे चढत जातात. "मला कशाचाच अभिमान नाही" असाही अहंकर असतो.
मोठ्यांच्या अहंकारामुळे प्रत्येक वेळी घर ,समाज भरडल्या जातो. पुराणकाळापासून ते इतिहासापर्यंत येवढेच कशाला वर्तमानकाळातही याची अनेक उदाहरणे सगळ्यांना माहितच असतात. ही उदाहरणेही नेमकी  दुस-यांचीच असतात. "अापण"मात्र "तसे" अहंकारी अजिबातच नसतो!! हे म्हणजे अगदी फिरत्या चाकावरच्या स्थिर मुंगळ्यासारखं असतं !!
तसं बघितलं तर हे जग आणि आपण स्वत:  "मी"पणानेच जोडले आहोत ना ? "आप मर गये डूब गयी दुनिया " हे खरे नाही कां?
"मी" समजणे नि "मीपणा" मिरवणे यात फरक आहे. मीपणा सर्वसमावेशक व्यापक करीत समष्टीपर्यंत वाढविला तर . . .  . .  .. ..   .
तर जगात प्रश्नच उरणार नाहीत. मग जग तरी उरेल कां? हा "अहं"प्रश्न !!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Sunday, December 24, 2017

#सहजोक्त.



मनात विचार येतात. बरेचदा कार्यकारण भाव नसतानाही वेगवेगळ्या विषयावर अवचित सुचते. त्या सुचलेल्यातील काही शब्दबद्ध होतात. काही नष्ट होतात. मनात शब्द जुळणी होऊन ती नोटपॅडवर टंकणे हा ही मोठा सुयोगच असतो.
मनाजोगा विषय, मनासारख्या शब्दांतून सहज उतरले की सहजोक्त होते. भगवान् गौतम बुद्धाच्या 'उदानापासून' प्रेरणा घेत  सहजोक्तचा  उगम झाला.
सहजोक्तात काय ?  त्यात एक लय असते ,गवसलेला सूर असतो ,सर्वांना जुळवणारा  ताल असतो. मनापासून उतरलेले ते शब्दचित्र असते. त्यात कोणताही रंग असू देत ,संगतीत कमी नसते. प्रत्येक रंग त्याच्या त्याच्या प्रमाणात सुसंगतच असतो. सरमिसळ करतानाही अतिक्रमण न होता एकरंग होतात.
असं सहज सुचलेलं ,आयास-सायास नसलेलं हे सहजोक्त. यातून कोणाला ज्ञान द्यावे ,कोणाला माहिती सांगावी ,मनातील बोच व्यक्त करावी वा कुठलीशी उणीव व्यक्त करावी असा कुठलाच उद्देश नसतो. इतकेच काय ? कुणाला आनंद द्यावा हा ही उद्देश नसतो. निव्वळ सहज ,अगदी सहज ,फक्त सहजच लिहिले असते. जसे झाड ,फुलांनी बहरते ते त्याच्याच विकासाचा ,व्यक्तिमत्त्वाचा भाग असते ;तसेच हे सहजोक्त.
म्हणून ते जेव्हा सुचते ,पूर्ण शब्दांकित होते व टंकल्या जाते तेव्हाच ते सर्वांसमोर प्रकाशित होते.
प्रत्येक विचारात, कृतीत, अभिव्यक्तीत हेतू असवाच ,हा आग्रह कां? मनाचे काही कप्पे निरपेक्ष ,निखळ , निरागस ,निस्संदिग्ध असयलाच हवेत. अन् तेच सहजोक्त मधून चितारते इतकंच.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे

#चित्रकविता


Saturday, December 23, 2017

#कविता



#कविता
देवकी सारखा त्याग नाही जमणार मला ।
यशोदेचा वात्सल्यपान्हा कसा पाझरणार पुन्हा॥

राधेची रमणीयता कुठून बरे आणू ?
मीरेची भक्ती तरी कशी आंगी बाणू ?।

तू घडवलेस देवा ,तशीच मी आहे ।
तुझ्याशिवाय दुजा मला  ठाव नाही रे ॥

चराचरात तुझेच रूप सदा मी पाहते ।
तुझ्यातच सारं जग मला माझे मिळते ॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...