Saturday, December 30, 2017

सहजोक्त

#सहजोक्त .
श्रद्धा-अंधश्रद्धा
वेदांमध्ये *श्रद्धासूक्त* आहेत.
*श्रद्धया कृतम् इति श्राद्धम्* असे मानतात. शिष्याला उपदेश करतात पहिले *श्रद्धस्व* असे सांगतात. भग्वद्गीतेतही *श्रद्धावान् लभते ज्ञानम्* असे म्हटले आहे. *धम्मपदातही* श्रद्धेचे महत्व मानले आहे. श्रद्धा महत्वाचीच आहे. त्याचे आलंबन योग्य वा अयोग्य असू शकते. ते सापेक्षही असू शकते .पण श्रद्धेशिवाय ज्ञान अशक्यच.
*अंधश्रद्धा* हा शब्द मराठीत *लोकनायक बापुजी अणे* यांनी आणला म्हटले तर वावगे ठरू नये. *तिलकयशोर्णव*या त्यांच्या संस्कृत महाकाव्यात "अंधश्रद्धजना: एते नित्यं* *धूर्तै: वंचिता:*" असा उल्लेख आलाय.

श्रद्धा- अंधश्रद्धा ह्या भावनाच आहेत. बरेचदा एखाद्याची श्रद्धा दुस-यासाठी अंधश्रद्धा ठरू शकते. अनेकदा *आपला तो सोन्या दुस-याचा तो कार्टा* अशी अवस्था *श्रद्धा-अंधश्रद्ध* या बद्दल असते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Monday, December 25, 2017

#सहजोक्त



अहंकार आपला असेल तर स्वाभिमान, जवळच्याचा असेल तर गर्व ,नावडत्याचा असेल तर माज ! अहं म्हणजे मी. मीपणा म्हणजेच अहंकार !
तसं बघितलं तर जन्माला आल्यापासून माणूस स्वतःच्या अस्तित्वाला जपत असतो.
 पहिले शरीरभान मग मनोभान मग पुढे वैश्विक भान . . !
 मी>माझं : आम्ही>आमचं मग आपण>आपलं असा उदार प्रवास सुरु होतो.
अहंभाव लहानपणीच असतो असं नाही. उलट लहानपणीचा अहंभाव निरागस, लवचिक असतो.
जसे जसे मोठे व्हावे (वय-अनुभव,पद,पैसा,सत्ता  इत्यादी कोणत्याही दृष्टीने ) अहंकाराची पुटंच्या पुटे चढत जातात. "मला कशाचाच अभिमान नाही" असाही अहंकर असतो.
मोठ्यांच्या अहंकारामुळे प्रत्येक वेळी घर ,समाज भरडल्या जातो. पुराणकाळापासून ते इतिहासापर्यंत येवढेच कशाला वर्तमानकाळातही याची अनेक उदाहरणे सगळ्यांना माहितच असतात. ही उदाहरणेही नेमकी  दुस-यांचीच असतात. "अापण"मात्र "तसे" अहंकारी अजिबातच नसतो!! हे म्हणजे अगदी फिरत्या चाकावरच्या स्थिर मुंगळ्यासारखं असतं !!
तसं बघितलं तर हे जग आणि आपण स्वत:  "मी"पणानेच जोडले आहोत ना ? "आप मर गये डूब गयी दुनिया " हे खरे नाही कां?
"मी" समजणे नि "मीपणा" मिरवणे यात फरक आहे. मीपणा सर्वसमावेशक व्यापक करीत समष्टीपर्यंत वाढविला तर . . .  . .  .. ..   .
तर जगात प्रश्नच उरणार नाहीत. मग जग तरी उरेल कां? हा "अहं"प्रश्न !!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Sunday, December 24, 2017

#सहजोक्त.



मनात विचार येतात. बरेचदा कार्यकारण भाव नसतानाही वेगवेगळ्या विषयावर अवचित सुचते. त्या सुचलेल्यातील काही शब्दबद्ध होतात. काही नष्ट होतात. मनात शब्द जुळणी होऊन ती नोटपॅडवर टंकणे हा ही मोठा सुयोगच असतो.
मनाजोगा विषय, मनासारख्या शब्दांतून सहज उतरले की सहजोक्त होते. भगवान् गौतम बुद्धाच्या 'उदानापासून' प्रेरणा घेत  सहजोक्तचा  उगम झाला.
सहजोक्तात काय ?  त्यात एक लय असते ,गवसलेला सूर असतो ,सर्वांना जुळवणारा  ताल असतो. मनापासून उतरलेले ते शब्दचित्र असते. त्यात कोणताही रंग असू देत ,संगतीत कमी नसते. प्रत्येक रंग त्याच्या त्याच्या प्रमाणात सुसंगतच असतो. सरमिसळ करतानाही अतिक्रमण न होता एकरंग होतात.
असं सहज सुचलेलं ,आयास-सायास नसलेलं हे सहजोक्त. यातून कोणाला ज्ञान द्यावे ,कोणाला माहिती सांगावी ,मनातील बोच व्यक्त करावी वा कुठलीशी उणीव व्यक्त करावी असा कुठलाच उद्देश नसतो. इतकेच काय ? कुणाला आनंद द्यावा हा ही उद्देश नसतो. निव्वळ सहज ,अगदी सहज ,फक्त सहजच लिहिले असते. जसे झाड ,फुलांनी बहरते ते त्याच्याच विकासाचा ,व्यक्तिमत्त्वाचा भाग असते ;तसेच हे सहजोक्त.
म्हणून ते जेव्हा सुचते ,पूर्ण शब्दांकित होते व टंकल्या जाते तेव्हाच ते सर्वांसमोर प्रकाशित होते.
प्रत्येक विचारात, कृतीत, अभिव्यक्तीत हेतू असवाच ,हा आग्रह कां? मनाचे काही कप्पे निरपेक्ष ,निखळ , निरागस ,निस्संदिग्ध असयलाच हवेत. अन् तेच सहजोक्त मधून चितारते इतकंच.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे

#चित्रकविता


Saturday, December 23, 2017

#कविता



#कविता
देवकी सारखा त्याग नाही जमणार मला ।
यशोदेचा वात्सल्यपान्हा कसा पाझरणार पुन्हा॥

राधेची रमणीयता कुठून बरे आणू ?
मीरेची भक्ती तरी कशी आंगी बाणू ?।

तू घडवलेस देवा ,तशीच मी आहे ।
तुझ्याशिवाय दुजा मला  ठाव नाही रे ॥

चराचरात तुझेच रूप सदा मी पाहते ।
तुझ्यातच सारं जग मला माझे मिळते ॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, December 22, 2017

#शब्दचिंतन .



२२/१२/२०१७
आज जागतिक गणित दिवस . तसं कुठलेच गणित मला जमले नाही. शब्दावर अन् शब्दांमागे असलेल्या भावनांवरच माझं जास्त प्रेम. मग आज "गणित" या शब्दाचाच सांगोपांग विचार करवा असे वाटले म्हणून हा लेखनप्रपंच .
 दैनिक व्यवहारात आपण खालील शब्द सहज  वापरतो.
 जसे
 ‎गण = हा  शब्द ,समूह या अर्थाने प्रचलित आहे. ,
 ‎याच शब्दला जोडून  गणमान्य ,गणप्रमुख ,गणनायक असे
 ‎गणन = मोजण्याची प्रक्रिया  या अर्थाने  गणना = मोजदाद ,गनती(हिंदी शब्द)
 ‎गणित = मोजलेले या अर्थी मूळ शब्द . पण प्रचलित आहे तो गणित नावाची ज्ञानशाखा म्हणून .,
 ‎नगण्य = न मोजण्या योग्य, गण्य म्हणजे मोजण्या लायक . बरेचदा जनभाषेत नकारार्थी रूप जास्त प्रचलित होते.
 ‎गणनीय= मोजण्या लायक  ,
 ‎गणक = गणना म्हणजे मोजदाद करणारा .
 ‎संगणक = योग्य मोजदाद करणारा.
 ‎प्रगणक = वेगाने मोजणारा .
 ‎वरील सर्व शब्द  गण् =मोजणे या अर्थी असलेला हा मूळ धातूपासून तयार होतात.
 ‎या शिवाय "गणती नसणे " ," न गिनणे" , "खिजगणतीत नसणे " असे वाक्प्रचार पण ऐकण्यात असतात.
 ‎शब्द  निर्मितीचेही गणित समजणे गरजेचे आहे.
 ‎©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
 ‎
 ‎

Monday, December 18, 2017

#शब्दचिंतन


कधी कधी चूक काय नि बरोबर काय ,कळेनासे होते. बरेचदा भाषा-व्याकरणाचे नियम वेगळे असतात नि व्यवहारात वेगळाच शब्द असतो. मग गोंधळ होतो.
 "शास्त्रात् रूढिः बलीयसी" म्हणूनच म्हटले जाते.
काही प्रचलित शब्द   बघा . .
प्राथमिक ,निरलस दुरवस्था , अनसूया ,पारंपरिक .
अजून शोधले तर अजून सापडतील.
वर लिहिलेले हे शब्द व्याकरण दृष्ट्या निर्दोष आहेत. पण समाजात यांचे उच्चारण व लेखन बहुतांश वेळा अयोग्य केल्या जाते.पुढे निर्दोष शब्द दिला आहे व त्याच्या समोर प्रचलित दोष काय ते सांगितले आहे.
जसे
प्राथमिक = प्रार्थमिक ,इथे अकारण एक जास्त रफार उच्चारला जातो.
निरलस = निरालस , निर् +अलस =निरलस हे जरी खरं असलं तरी म्हणताना 'निरालस' म्हणतात.
अनसूया =अन्+असूया . पण बरेच जण अनुसया असेच म्हणतात. याला तद्भव म्हणावे की विकृत ??
पारंपरिक = 'इक ' प्रत्ययान्त शब्द भाषेत अनेक आहेत . हा प्रत्यय लागताना मूळ शब्दात काही बदल होतात पण ते समानच असतात. जसं इथेच पाहू.
परंपरा + इक= पअरंपरिक.
स्वभाव + इक= स्वाभाविक
प्रथम + इक = प्राथमिक
मध्यम +इक = माध्यमिक
परिवार +इक = पारिवारिक
वरील उदाहरणात मूळ शब्दातील सुरवातीच्या अकाराचा आ-कार झाला.
भूगोल +इत = भौगोलिक
भूमिती +इक = भौमितिक
भूति +इक = भौतिक
वरील उदाहरणात उकाराचा ओ-कार झाला.
इतिहास +इक = ऐतिहासिक
नीती + इक = नैतिक
इह +इक = ऐहिक
वरील उदाहरणात इकाराचा ऐ-कार झाला.
मूळ शब्द काय ? त्याचे परिवर्तन कसे ? हे जाणून घेतले तर दोषपूर्ण उच्चारण व लेखन टाळाता येऊ शकेल.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...