Monday, July 25, 2022

चिंतनात्मक लेख.

 


१   वनस्पती  

यस्यां समुद्र उत सिन्धुरापो 

नानावीर्या अौषधीर्या बिभर्ति ।

गिरयस्ते पर्वता हिमवन्तोऽ-रण्यं 

ते पृथिवी स्योनमस्तु॥

 अशा प्रकारचे समुद्र ,पर्वत ,वनस्पती जंगल युक्त पृथ्वीचे वर्णन  ऋषींनी अथर्ववेदात (१२।१।३,२,११)  केले आहे. 

'अन्न-वस्त्र-निवारा', ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत असे समाजशास्त्र म्हणते. वरील तीनही गरजा वनस्पतींशिवाय अपूर्ण आहेत , असे म्हटले तर वावगे ठरू नये. मानवी अन्नाचा मोठा भाग वनस्पतीजन्य आहे जसे भाजी ,फळे ,धान्य आदी . वस्त्र ही गरज सुद्धा वनस्पतींपासूनच पूर्ण होते  बव्हंशी. कापुस ,ताग ,बांबु इत्यादी झाडांपासून पूर्वापार वस्त्र निर्माण केल्या जातात. मानवी उत्क्रांतीपासून ते आज वर मानवाने निवारा म्हणून वृक्षांचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष उपयोग केला आहे ,भविष्यातही  करणारच आहे.  अशा प्रकारे सर्व प्रकारे वनस्पतींवर आधारलेले  मानवी जीवन वनस्पतींनी सांभाळले ,जोपासले व भरभराटीला नेले आहे ,यात दुमत नाही. 


 अश्मयुगापासून ते आताच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत मानव आणि वनस्पती यांचा अतिप्राचिन  परस्पर संबंध विविध आयामांतून अभ्यासण्या सारखा आहे.  

 १) वैज्ञानिक आयाम  

 विज्ञानयुगाच्या सुरुवाती पासून वनस्पतींचा अभ्यास करणा-या विद्याशाखेला "वनस्पती शास्त्र" असे म्हणतात. या विद्या शाखेत वनस्पतींचे वर्गीकरण पासून ते अंतररचना ,कार्य ,उपयोग इत्यादींचा अभ्यास होतो .विज्ञानाच्या प्रगतीसह या शाखेचाही विकास झाला व पुढे त्याच्या अनेक शाखा-उपशाखा विकसित झाल्या. आजमितीला त्यांची संख्या डझनाहून अधिक असण्याची शक्यता आहे.  "वनस्पतींना जीव असतो ,त्यांनाही भावभावना असतात" हा वनस्पतीशास्त्रातील मूलभूत सिद्धांत डॉ. जगदीशचंद्र बसु या भारतीय शास्त्रज्ञानी १८९७ मध्ये मांडला. आजही जागतीक स्तरावर वनस्पतीशास्त्र व त्याच्या सर्व शाखांमधील भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान उल्लेखनीय व महत्वपूर्ण आहे. 

 

 २)पर्यावरणीय आयाम  

 विज्ञानयुगाचा एक नकारात्मक परिणाम म्हणून मध्यय़ुगाच्या उत्तरकाळी भौतिक सुबत्ता वाढीमुळे वसाहतवाद ,यांत्रिकीकरण,युद्ध ,स्पर्धा आदी मानवी दोष उद्भवले. याच मानवी दुर्गुणांमुळे वृक्षतोड,निर्वनीकरण आदी वाढीला लागले . परिणामस्वरूप प्रदूषण ही समस्या निर्माण झाली.  याच समस्येवर मात करण्यासाठी मग पर्यावरण शास्त्र निर्माण झाले. वृक्षसंवर्धन ,संरक्षण हा पर्यावरणशास्त्राचा एक महत्वपूर्ण भाग आहे.

 आदीम काळापासून अनेक वर्षांपर्यंत भारतीयांच्या अंगवळणी असलेला  "इकोफ्रेंडली" हा शब्द  सध्याच्या काळात परवलीचा झाला. विविध देशांतील सांस्कृतिक ,पारंपारिक मनोभूमी लक्षात घेऊन जनजागृती करून  वृक्ष-संवर्धानाचे कार्य याच विद्याशाखेच्या प्रगत शाखांद्वारे सुरु आहे. 

 

 ३) सामाजिक आयाम .

 मानवी समूह देश-काल-परिस्थितीत स्वतःचे जीवनमान सांभाळत काही रुढी-परंपरा जपतात. या सामजिक रूढीपरंपरांतून सभोवतालच्या मानवी जीवनासह वृक्ष-पशु-पक्षी आदी मानवेतर जीवने देखील समृद्ध होतात. अनेक सामाजिक मान्यतांमुळे बरेचदा पर्यावरणावर बरावाईट परिणाम होतो.  भारत हा विविधतेने नटलेला समृद्ध देश आहे.  येथे सामाजिक विविधता विपुलतेने आढळते तद्वत् वृक्षादी पर्यावरणाचे रक्षणासंबंधी सुद्धा वैविध्य आढळते. भारतातील अनेक आदीम जमातींमध्ये झाडांचे महत्व आढळून येते. तुळस ,दुर्वा ,बेल ,पळस ,केळ ,आंबा ,नारळ,कमळ ,नागवेल  आदी वनस्पती त्यांच्या धार्मिक महत्वामुळे समाजमान्य व संरक्षित आहेत.

 "शेतातील पहिले पीक देवतेला समर्पित करून सृष्टी देवतेविषयी कृतज्ञता दर्शविणे " हीच भावना भारताच्या विविध भागात वेगवेगळ्या नावांने उत्सवस्वरूपात साजरी केली जाते. जसे आसामात बिहू ,केरळात अोणम ,महाराष्ट्रात दिवाळी व अक्षय तृतीया इत्यादी. या उत्सवांच्या निमित्त्याने वनस्पतींचे महत्व जाणून घेणे इष्ट . 

 भारतात ऋतु-काळ-स्थानानुसार अनेक सणसमारंभ समाजात रूढ झाले आहेत. जसे होळी ,संक्रांत ,पोळा , हादगा-भुलाबाई-भोंडला ,दसरा ,नवरात्र ,दिवाळी  , पीकपेरणीचा सण इत्यादी.कृषिसंस्कृतीशी निगडित असलेल्या या सर्व सणांमधून मानवाचे निसर्गाशी असलेले मुळ बंध जाणून घेणे आजच्या आधुनिक युगात जास्त गरजेचे आहे. या सर्व सणांद्वारे समृद्ध पर्यावरण,खाद्यसंस्कृती ,मानवाचा मानवांशी आंतरसंबंध निकोप वाढावा हेच या सणांचे मुळ उद्दिष्ट असावे. पुढे पुढे या सणांना  विशिष्ट धर्माशी जोडण्याचा प्रयत्नातून मूळ उद्दिष्ट हरवल्या सारखे झाले . 

 महाराष्ट्रात " देवरायी " नावाचा पर्यावरणरक्षक असा अद्वितीय सामाजिक उपक्रमही धर्माशी जोडल्या गेला. महाराष्ट्राच्या काही भागात देवासाठी मोकळी जागा सोडली जायची . अशा जागांवर विविध वृक्ष उगवायचे ,वृक्षांमुळे पशु-पक्षी-किटक यांचा अधिवास तयार होई. मानवाला प्रतिबंधित केले असल्यामुळे अशा देवरायी ह्या सर्वोत्तम पर्यावरणीय अधिवास व जैवविविधतेची उदाहरणे ठरत होत्या. "देवाची भूमी "या सामाजिक भावनेमुळे तिचे रक्षण आपसूक होत असे. अशा देवरायींमुळे स्वाभाविकच आजुबाजुचे मानवी जीवन निरोगी व निसर्गसंपन्न होत असे. 

 ૪) आर्थिक आयाम .

 जीवन जगण्यासाठी "आर्थिक गरज" महत्वपूर्ण आहे. वनस्पतींमुळे आर्थिक हित जोपासल्या जाते. शेती ,फळबागा ,उपवन ,वन यांच्या द्वारे माणसाला जीवनमान उंचावणारे धन-पैसा प्राप्त होतो. वृक्ष-वनस्पती हे जवळ जवळ सर्वच भारतीयांचे आर्थिक उलाढालीचे प्रत्यक्ष स्रोत आहेत. 

 ५) धार्मिक आयाम 

 धारणात् धर्मः  म्हणजे समाजाला धारण करणारा धर्म . मानवी समाजाला ऐहिक व पारलौकिक सुख मिळवून देणारा ,मानवाची मानसिक-भावनिक जडण-घडण करणारा धर्म . जगात अनेक धर्म आहेत. ऋग्वेदात (,"एकं सद्विप्राः  बहुधा  वदन्ति ।"१।१૪६।૪६) म्हटल्या प्रमाणे सर्वच धर्म वनस्पतींचे रक्षण करावे अशीच शिकवण देतात.  भारतातील काही प्रमुख धर्मांत वृक्ष-संरक्षण विषयक काय दृष्टीकोण आहे ,याचा थोडक्यात धांडोळा घेऊ या. (येथे धर्माचा क्रम अकारविल्हे नुसार दिला आहे. )

 अ) इस्लाम  धर्म 

भारताबाहेर उगम पावलेला आणि आता भारतातही प्रस्थापित झालेला  इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कुराण (२२।१८) मध्ये  "सूर्य ,चंद्र,तारे ,पर्वत ,झाडे व चरजीव ,अल्लाने निर्माण केले " ,  असे म्हटले आहे. मुहंमद पैगंबरांच्या अनेक उद्धरणांतून  वृक्षांचे महत्व सांगितलेले दिसून येते.  हजरत मुसाला पैगंबरांच्या शुभ सूचना  वृक्षामार्फत मिळाली असा उल्लेख आहे. हादिस अल् बुखारी यात "पैगंबरांनी स्वतःला खजूरवृक्ष म्हटले आहे".   तुळस या झाडाला रेहान म्हणतात व जो 'जन्नत का पौधा' आहे असे मानतात. 

 आ) ख्रिस्ती धर्म 

युरोपात उद्गम पावलेला ख्रिस्ती धर्माचा बायबल हा पवित्र धर्मग्रंथ आहे. जगभरात पसरलेल्या या धर्माचा ख्रिस्मस हा सण जगभरात साजरा होतो.या सणात सजविला जाणारा ख्रिसमसट्री भारतातही सर्वज्ञात  आहे.   बायबलच्या न्यायिनो ९.८ NHT  यात "सर्व झाडांनी अॉलिव्हच्या झाडाला राजेपद दिले" असा उल्लेख आहे.  यहोवाच्या यशयाहमधील अनेक भजनांत वृक्षांचा सन्मानपूर्वक उल्लेख आहे. 

ई) जैन धर्म 

भारतीय विचारपरंपरेत भारतभूमीतून निर्माण झालेला जैन धर्म अहिंसावाद ,अनेकान्तवाद इत्यादी सद्ययुगाला उपकारक अशा अनेक सिद्धांतांचा जनक आहे. जैनांचे चोवीस तीर्थंकर होऊन गेले . या चोवीस तीर्थंकरांचे  वृक्ष चिह्न म्हणून चोवीस झाडांचा उल्लेख आहे.आद्य तीर्थंकर ऋषभदेव यांचे वटवृक्ष हे चिन्ह आहे तर अंतीम तीर्थंकर महावीर यांचे सालवृक्ष हे चिन्ह आहे.  मुळातच अहिंसावादी अशा या धर्मात वृक्ष संवर्धन वेगळा सांगायची गरजच नाही. 

उ) बौद्ध धर्म 

 संपूर्ण जगाला अहिंसेचा आर्य अष्टांगिकमार्ग दाखविणारा अस्सल भारतीय मुशीतून निर्माण झालेला  धर्म म्हणजे बौद्ध धर्म . गौतमाला प्रथम ध्यान ,द्वितीय ध्यान शेतात जांभळाच्या झाडाखाली  व अंतीम संबोधी पिंपळाच्या झाडाखाली मिळाली. पालीभाषेतील *त्रिपिटक* ग्रंथांमध्ये भगवान बुद्धांचे उपदेश संग्रहित केले आहेत. भगवान गौतम बुद्धाचा जन्म लुंबिनी वनात झाला.   त्यांचे सर्व जीवनयापन  धर्म-प्रसार करताना वन-उपवनातून प्रवास करीत संपूर्ण प्रांतात ,नगरांत झाले. त्रिपिटकांमध्ये विशेषतः मझ्झिम निकायात अौषधी वनस्पतींचे वर्णन आले आहे. राजा बिंबिसार व भगवान बुद्ध यांचा राजवैद्य असलेला जीवक-कुमारभृत्य हा वनस्पतींपासून अौषधे तयार करण्यात अतिशय निष्णात होता. याच्या ज्ञानाचा सन्मान म्हणून अष्टांग-आयुर्वेदातील बालरोग-शाखा  ,कौमारभृत्य नावाने अोळखल्या जाते. चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे शिलालेख इतिहासात प्रख्यात आहेत. त्यातही अनेक ठिकाणी वृक्षारोपण व संगोपनासाठी राजाज्ञा दिलेली आढळते.  

   अशा प्रकारे निसर्गासह नेहमीच साहचर्य बाळगणारा हा धर्म , वृक्ष-वनस्पतींसाठी उदारमतवादीच राहिला आहे. 

   ए) हिंदु धर्म 

  "आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः" 


, जगात जे जे मंगलमय आहे ते माझ्यात येऊ दे ,अशी मूळभावना घेत जगणारे भारतीय बहुसंख्य लोक हिंदु-आचार- पद्धतीचा स्वीकार करतात. निरीश्वरवादी ते अनेकेश्वरवादी , सगुणसाकार ते निर्गुण निराकार  इत्यादी  प्रकार-उपप्रकार या धर्मात सामावले आहेत. या धर्मांत अनेक देवता व त्यांचे आराध्य वृक्ष विख्यात आहेत, जसे शंकराला बेल ,गणपतीला दुर्वा ,विष्णुला तुळस इत्यादी. या धर्मात नित्यनैमित्तिक उपसनांमध्ये वृक्षाला अतिशय महत्वपूर्ण स्थान आहे. 

  भगवद्गीतेत स्वतः भगवान कृष्ण म्हणतात ,"मासानां मार्गशीर्षोऽहम् ऋतूनां कुसुमाकरः"। अर्थ असा की "मी  महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आहे (यात वनसृष्टीला नवजीवन लाभते ) तर ऋतुंमध्ये फुलांना  बहर येणारा वसंतऋतू मी आहे." 

  हिंदूधर्मातील कोणतीही पूजा-व्रतवैकल्ये फुले-फळे-पाने यांच्या शिवाय पूर्ण होत नाही. सुपारी ,नारळ ,केळ,आंबा ,तुळस ,बेल ,दुर्वा याशिवाय अनेक वनस्पतींचा उपयोग वेगवेगळ्या पूजांमध्ये केल्या जातो. अर्थात पूजा नीट करण्यासाठी ही सर्व वृक्षराजी परिसरात असायलाच हवी. अशा प्रकारे वृक्षाला स्वतःच्या सामाजिक-धार्मिक-कौटुंबिक जीवनात महत्वपूर्ण स्थान देणारे हिंदु हे नेहमीच वनस्पती-संगोपकच असतात. 

  ६)सांस्कृतिक आयाम 

" जगा व जगू द्या"  हे सर्वसमावेशक तत्व प्रत्यक्षात आचरणात आणणारे आम्ही भारतीय ,संपूर्ण विश्वात आमच्या एकमेवाद्वितीय संस्कृतीमुळे विशेष ठरतो.

जगातील विविध  धर्म निर्माण होण्यापूर्वी पासून  गंगा-यमुना-सरस्वती-गोदावरी-नर्मदा-सिंधु-कावेरी आदी नद्यांच्या काठी उगम पावलेली आपली भारतीय संस्कृती तिच्या समृद्ध व वैविध्यपूर्ण  वारश्यामुळे जगात आदरणीय ठरली आहे. 

 आसेतु-हिमाचल पसरलेला आपला देश, या संस्कृतिक बंधामुळे एकसंध आहे. 

 एखाद्या देशाचा सांस्कृतिक वारसा जाणून घ्यायचा असेल तर तेथील लोककला , पुरातत्व-स्थळे , गड-किल्ले-लेणी-वास्तु-मंदीर आदी बघणे जसे गरजेचे आहे तसेच साहित्य मग ते मौखिक वा लिखित स्वरूपात असो यांचाही विचार करायला हवा. 

 भारतातील अनेक मंदिरे- लेण्या येथे वृक्षाचे शिल्प आहेतच , अजिंठा आदी लेणींमध्ये रंग तयार करण्यासाठी वनस्पतींचा स्रोत उपयोगात आणला होता असे म्हणतात. 

 भारतात अनेक प्रकारच्या लोककला आहेत.वादन-नर्तन-चित्रकला आदी अनेक कलांमध्ये वनस्पतींचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने कसा होतो हे बघणे फार रंजक ठरेल. 

 भारतातील अनेक प्रांतात पारंपरिक पध्दतीने वस्त्र निर्माण करणे व त्याला रंगवणे हे सारे वनस्पतींच्या सहायानेच केले जाते. 

 मौखिक  वाङ्मयातून मानव-वनस्पती यांचे संबंध दर्शवणारे विपुल साहित्य आढळून येते. यांचे संकलन करणे सुद्धा मनोरंजक उपक्रम ठरेल. 

 लिखित साहित्यातून तर वनस्पतीसृष्टीच्या मनोरम वैविध्याचा परिचय होतो.  

 संपूर्ण भारताच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा विचार करता ,सांस्कृतिकसंपन्नतेत आपण काकणभरसरस आहोत यात शंका नाही.महाराष्ट्रात होऊन गेलेल्या  रामदेवराय-कृष्णदेवराय ,वाकाटक ,सातपर्णी आदी राजवटींनी महाराष्ट्राची भूमी सुजल-सुफल व सस्य श्यामल केली. शिवरायांनी तर कृषिक्षेत्र ,सिंचनक्षेत्र ,वनक्षेत्र यांच्यासाठी विशेष धोरणच राबवले होते. 

 महाराष्ट्रातील लोकहितदक्ष राजवटीं शिवाय  इथल्या संतपरंपरा ,विविध सांप्रदाय आणि वारकरी पंथ आदींमुळे साहित्यातून तर वृक्षप्रेम दिसतेच शिवाय वर्तणुकीतूनही वृक्षप्रेम दिसून येते.  "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे "म्हणणारे तुकोबा काय किंवा "कांदामुळा भाजी अवघी विठाई माझी" म्हणणारे  संत सावता महाराज काय ; पर्यावरणाशी एकरूप झालेली थोर मंडळी होती. 

अशा प्रकारे सांस्कृतिक आयामामुळे वृक्ष-संवर्धन होण्यास सहाय्य होते. 


वर आपण विविध आयामांमुळे वनस्पती-विश्वावर काय परिणाम होतो  हे थोडक्यात पाहिले.

आधुनिक विज्ञान जसे वनस्पती विषयक अभ्यास करते तसाच अभ्यास आपल्या पूर्वजांंनी अनेक वर्षांपूर्वी करून ठेवला आहे. या दोहोंचा दृष्टिकोण जरी भिन्न असला तरी दोहोंच्याही अभ्यासाचे महत्व कमी  होत नाही.

प्राचीन भारतीयांचे हे ज्ञान मुख्यतः संस्कृत ,पाली ,प्राकृत आदी भाषांमध्ये आहे. आता आपण थोडक्यात काही ग्रंथाचा परिचय करून घेऊ .ह्या पैकी ब-याचशा  ग्रंथांचा आधारभूत विषय वनस्पती हा नसून इतर विषय आहेत , हे लक्षात घेतले पाहिजे . 

१) वेद वाङ्मय=  वेद ,हे जगातील प्राचीन ज्ञानग्रंथांपैकी एक आहेत. वेद हा भारतीयांचा  मूळ  सांस्कृतिक-ठेवा आहे. 

प्राचीन ऋषी-मुनी वनात राहून निसर्गचिंतन करीत असत. त्यातून त्यांनी निसर्गपोषक-पूरक अशी जीवनशैली विकसित केली होती.  वेदांचाच एक भाग म्हणजे आरण्यके होत ,जी अरण्यात राहूनच शिकावी असा दंडक होता.  वेदांत अनेक ठिकाणी वनस्पतींचा आदराने उल्लेख केलेला आढळतो. 

ऋग्वेदात अश्वत्थ वृक्षापासून भांडे बनविणे ,अन्न प्रक्रिया ,प्रकाश संश्लेषण आदींचा उल्लेख आहे.वेदांमध्ये  पिंपळ ,सोमलता,अपामार्ग ,पाटा,पृश्निपर्णी,ऋषभ,मधुला,शमी,गुग्गुळ ,उदुंबर ,दर्भ ,अश्वत्थ,शतावर,

अजश्रुंगी ,आदी वृक्षांही उल्लेख आहे. 

 "नमः वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः (यजु.१६।१७)" 

"अौषधीरिति मातरस्तद्वो देवीरूपब्रुवे (यजु.१२।७८)

"अतस्त्वं देव वनस्पते शतवल्शो विरोह ।

सहस्रवल्शा वि वयं रुहेम ॥ (यजु.५।૪३)  [हे वनस्पती  अौषधी , आम्ही तुमचा प्रभाव जाणतो, तुम्ही शेकडो शाखांनी वाढा , ज्यामुळे आम्ही हजारो शाखांमध्ये वाढू .] 

अथर्ववेदात अौषधी-वनस्पती ,कृषी विषयक माहिती आहे. 

ऋग्वेदात वृक्ष ,अोषधी (अौषधी वनस्पती) व वेली असे तीन प्रकारात वनस्पतींचे विभाजन  केले आहे . 'करीर' नावाचा निष्पर्ण वनस्पतींचा विशेष वर्ग दिला आहे. अथर्ववेदात हेच आठ वर्गात विभाजन केले आहे.

"वेद व वेदांग हे सर्व विश्वाचे ज्ञानभंडार आहे," अशी परंपरावाद्यांची श्रद्धा आहे. आज आधुनिक परिप्रेक्ष्यातून या प्राचीन विद्यांचा पुनर्विचार व मांडणी होणे गरजेचे आहे. 

२)अमरकोश =  समानार्थी शब्दांचा हा प्राचीन कोश आहे. यात वृक्षासाठी काही पर्यायी शब्द दिले   वरवर वाचताना ते समानार्थी वाटतात .पण या प्रत्येक शब्दातून झाडाचा एकेक गुण दिसून येतो. जसे पादप (मुळांनी पाणी पिणारा ), महिरूह (जमीनीवर उगवणारा) ,शाखी (फांद्या असलेला) ,विटपी (कक्षीगत कोंब असलेला) , तरु ((जमीन फोडून बाहेर येणारा) ,वृक्ष( छाटल्या जाणारा) . म्हणजे त्याकाळी साहित्यातूनही वनस्पतींचे गुणधर्म मांडलेले आढळतात .

३)महाभारत = श्रीव्यासांनी रचलेले हे महाकाव्य. याचा मुख्यविषय जरी पांडव विजय असला तरी  यातील काही भागांमध्ये (भीष्मपर्व ,शांतिपर्व , अनुशासनपर्व आदी)  वनस्पतींविषयी मार्गर्शनपर  भरपूर साहित्य आहे.  

वक्त्रेणोत्पलनालेन यथोर्ध्वं जलमादते ।

तथा पवनसंयुक्तः पादैः पिबति पादपः ॥(महाभारत-शांतिपर्व-अध्याय१८૪, श्लोक १६) यात  मुळांद्वारे वा-याच्या सहायाने वृक्ष पाणी पितात असे स्पष्ट  सांगितले आहे . आधुनिक वनस्पतीशास्त्रात याला *अॉस्मॉसिस* म्हणतात.

याच अध्यायात १८ व्या श्लोकात प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया ध्वनित होते. 

"तेन तज्जलमादत्तं जरयत्यग्निमारुतौ ।

आहारपरिणामाच्च स्नेहो वृद्धिश्च  जायते ॥" 

वृक्ष व जलाशयांचे महत्व जाणून युधिष्ठिराला पितामह भीष्म सांगतात ,

"तस्मात् तडागे सद्वृक्षा रोप्याः श्रेयोऽर्थिना सदा ।

पुत्रवत्परिपाल्याश्च पुत्रास्ते धर्मतः स्मृताः ॥" 

भीष्मांनी वृक्षांना धर्मपुत्र मानले आहे.  

वनस्पतींना जीव आहे , त्या श्वास घेतात ,त्यांना भावना आहेत असे महाभारताच्या शांतिपर्वात सुचवले आहे. 

૪) वृक्षायुर्वेद =  पांडुलिपीत उपलब्ध झालेला हा  ग्रंथ  सुरपाल यांनी रचला आहे असे म्हणतात. त्यांच्या विषयी याहून अधिक माहिती उपलब्ध नाही. या ग्रंथात साठ पृष्ठ असून  ३२५ श्लोकामधून  वृक्ष संबंधी महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे. या ग्रंथात १७० वृक्षांचे सविस्तर-सांगोपांग विवरण केले आहे. या ग्रंथात बीज निर्मिती ,खरेदी ,रक्षण ,रोपण ,जमिनीचे प्रकार ,मशागत ,सिंचन व त्याचे प्रकार ,उद्यान विद्या  आदींवर प्रकाश टाकला आहे. 

५) बृहत्संहिता =  वराहमीहिर हे थोर शास्त्रज्ञ भारतात (५०५इ.स.)  होऊन गेले.  त्यांचा १०६ अध्यायांचा बृहत्संहिता हा ग्रंथ  विश्वकोशा सारखा असून विख्यात आहे.यात खगोल ,गणित , पर्जन्यमान ,वास्तुशास्त्र ,या शिवाय अत्तर निर्मिती , रत्न -मोती , लग्न-परिवार व परस्पर संबंध आदीं शिवाय  वृक्षसंबंधीही माहिती दिलेली आहे. बृहत्संहितेच्या ५५व्या अध्यायातील सहाव्या श्लोकात कलम करण्याचे तंत्र सांगितले आहे. 

"अजातशाखान्  शिशिरे ,जातशाखान् हिमागमे ।

वर्षागमे च सुस्कंधान् , यथा दिक्स्थान् प्ररोपयेत् ॥"  

याचा अर्थ असा की शाखाहीन वृक्षावर शिशिर ऋतुत ,नुकत्याच शाखा तयार झालेल्या झाडावर शीतकाळी तर परिपूर्ण वाढलेल्या शाखांच्या झाडावर पावसाळ्यात कलम करावी.

६) शारंगधर पद्धती = तेराव्या शतकात शारंगधर रचित भल्या मोठ्या ग्रथाचे नाव शारंगधर पद्धती हे आहे. १६३ विभागांमध्ये विभागलेल्या ६३०० श्लोकांचा हा ग्रंथ आयुर्वेद शाखेचा प्रमुख ग्रंथ आहे. यातील एक भाग म्हणजे "उपवनविनोदः" हा होय.  या अध्यायात वृक्षचिकित्सा व उपचार हा मुख्य विषय आहे. या अध्यायाच्या १७५व्या श्लोकात असे म्हटले आहे की , 

"नराणामिव वृक्षाणां वातपित्तकफ़ाद्गदाः ।

सम्भवन्ति निरूप्यातः कुर्यात्तद्दोषनाशनम् ॥" मानवांप्रमाणेच झाडांमध्येही वात-पित्त-कफ-दोषांमुळे रोग निर्माण होतात ,हे जाणून उपचार करावेत . 

७) मझ्झिम निकाय =  पाली त्रिपिटकाचा महत्वाचा भाग म्हणजे मझ्झिमनिकाय. यात अनेक ठिकाणी भगवान बुद्धांनी अौषधी वनस्पतींची उपयोगिता सांगून त्यांचे रक्षण करावे , हे सांगितले आहे.

८)स्फूट ग्रंथ =  सुभाषितरत्नभांडागार , पंचतंत्र ,जातककथा ,  पुराणवाङ्मय ,मनुस्मृती ,अभिजात संस्कृत साहित्य आदी विविध ग्रंथातूनही वृक्षांसंबंधी माहिती मिळते.


वर उल्लेखलेल्या ग्रंथांशिवाय  आयुर्वेदाचे अनेक ग्रंथांमध्ये वनस्पतींविषयी भरपूर माहिती आलेली आहे. मानवी आरोग्यासाठी वृक्ष उपयुक्त असल्यामुळे वृक्षांना आयुर्वेदात महत्वाचे स्थान दिले आहे. 

या शिवाय 

• पाराशर संहिता 

• कश्यपीयकृषिसूत्र

• पराशर तंत्र 

• कृषितंत्र 

आदी अनेक ग्रंथ वृक्ष विषयक माहिती देतात.

"छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे ।

फलान्यपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषाः इव ॥" 

स्वतः उन्हात राहून दुस-यांना सावली व फळे देणारे वृक्ष हे सत्पुरूषच आहेत. 

अशा प्रकारे  मानवांचे मानवत्व सर्व प्रकारे जोपासणारे वृक्षवनस्पतींचा  भारतीय दृष्टिकोणातून अभ्यास  करणे गरजेचे आहे. 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.











#सहजोक्त.

 



भवानि त्वं दासे मयि वितर दृष्टिं सकरुणामिति स्तोतुं वाञ्छन् कथयति भवानि त्वमिति यः । 

तदैव त्वं तस्मै दिशसि निजसायुज्यपदवीं मुकुन्दब्रह्मेन्द्रस्फुटमुकुटनीराजितपदाम् ॥


माझ्या आईच्या तोंडून मी हा श्लोक अनेकदा ऐकला होता. नेमकं सौंदर्यलहरी  चाळताना हा श्लोक   वाचला न् आईच्या तोंडातून ऐकलेला श्लोक परत जाणवला. 


  आदि शंकराचार्यांनी रचलेल्या सौंदर्यलहरी या काव्यातील बावीसवा श्लोक आहे हा.  शंकराचार्यांचे  काव्य प्रासादिक न् दिव्य  होय.  जगदंबेची आळवणी करणारे हे काव्य छानच आहे असे या काव्याचे उपासक म्हणतात.  

  मला मात्र हा श्लोक आईचा आशीर्वादच वाटतो.    

 

 =>> श्लोकाचा अन्वय  व शब्दार्थ =>  

  भवानि  => हे भवानि 

  त्वं => तू 

  दासे मयि  => तुझा द‍ास असलेल्या माझ्यावर 

  सकरुणां दृष्टिं   =>  करुणामय दृष्टी 

   वितर => ठेव .

इति => असे 

स्तोतुं वाञ्छन् => स्तुती करू इच्छिणारा 

यः => जो (कोणी) 

भवानि => "हे भवानी

 त्वम् = तू"  

 इति =>  (फक्त  इतकेच ) असे  

कथयति  =>   म्हणतो .

 तदैव => त्याच वेळी 

तस्मै => त्या ( म्हणणाऱ्यास )   मुकुन्दब्रह्मेन्द्रस्फुटमुकुटनीराजितपदाम् =>  मुकुंद -ब्रह्मदेव-इंद्रादींच्या तेजस्वी मुकुटांनी जिच्या पावलांचे नीराजन केले आहे  अशी

निज सायुज्य पदवीम् =>  स्वतःची खास आंतरिक जवळीकीची पदवी  

त्वं => तू 

दिशसि => निर्माण करून देतेस . 


ह्या श्लोकाचा अर्थ  'अप्रबुद्ध' श्री. अण्णासाहेब पाळेकर यांच्या पुस्तकातून घेतला आहे , तो असा - 

 =>  हे भवानी ! तू मज दासावर करुणार्द्र दृष्टि टाक अशी स्तुती करण्याच्या इच्छेने 'हे भवानी ! तू' ,  इतके शब्द म्हटले नाही तोच तू इंद्र , ब्रह्मदेव, विष्णु ह्यांच्या भास्वर मुकुटांनी ज्याची पावले देदीप्यमान झाली आहेत असे आत्मसायुज्यपद त्याला अर्पण करतेस. 

  असं म्हणतात की ,श्रीविद्येच्या उपासकांच्यासाठी हा ग्रंथ  आहे. या ग्रंथाच्या प्रत्येक श्लोकावर एक यंत्र आहे. तसे याही श्लोकावर 'श्रीयंत्र' आहे.

 अर्थात   श्रीविद्येच्या उपासकांचा तसा अनुभव असेल.  हा सर्वस्वी श्रद्धेचा विषय आहे. दुसऱ्यांच्या श्रद्धेचा आदर करावा , असे आई सांगायची .  

 श्रीविद्या-उपासना हा माझा प्रांत नाही. 

  केवळ माझी आई म्हणायची म्हणून  हा श्लोक माझ्यासाठी तिचे 'वात्सल्यरूप' आहे .    याच   भावनेने  श्लोकावर लिहिले आहे.

  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 


Sunday, July 17, 2022

सहजोक्त.

 

नर्मदेतील गोटा.

"अहो , तो नर्मदेचा गोटा आहे . तुम्ही कितीही छान शिकवा , याच्या डोक्यावरूनच जाणार !" असे

 वाक्प्रचार  व्यवहारात कानी पडतात. 

 नर्मदा नदीतील गोटे बहुधा  गुळगुळीत वाटोळे असतात.  त्यामुळे त्यांस खांचाकोपरे काही नसल्यामुळे चिखल , रेती वगैरे काही चिकटत नाही .  शिवाय पाण्यात असेपर्यंत ओला, बाहेर  काढल्यावर ठणठणीत कोरडा असतो. 

म्हणजे नर्मदेतील दगडा प्रमाणेच एखादी व्यक्ती  सल्लामसलत (उपदेश) ऐकेपर्यंत मनप्रवृत्ति एक प्रकारची (पण) मागाहून त्यांतील काही  शिल्लक न राहणारी .  त्याला सांगितलेली गोष्ट कधीच  मनात साठवत  , गुंतवत नाही नाही तसेच त्याला काही कळतही नाहीं .  एकंदरित 

'नर्मदेतील गोटा' ,  या वाक्प्रचाराचा अर्थ , निर्बुद्ध , काहीही  समजून घेण्यास अपात्र' असा जरासा नकारात्मक अर्थ आहे.  

  हा वाक्प्रचार कसा बर रूढ झाला असावा ? कारण तो गोटा   नर्मदेच्या पात्रात  असे पर्यंतचे हे सर्व वर्णन बरोबरच आहे. 

  पण  पात्रातून बाहेर आल्या नंतर ?

   त्या टणक , गुळगुळीतपणा , काहीही झिरपू न देणे तसेच  लिप्त न होणे या सर्व 'गुणांमुळे'  नर्मदेतील गोट्यांचे बाण (शिवाचे बाण)  किंवा मूर्त्या बनवतात. 

   

"नर्मदेतील गोटा"  हा वाक्पचार न समजता , दृष्टान्त समजावा की काय ? 

१) एखाद्या क्षेत्रात तुम्ही "दगड" असाल पण दुसरी कडे "देव"  ठरू शकता.     

२) नदीला प्रतिसाद न देणारा , तिच्या पाण्याला सतत अवरोध करणारा दगड . नदीही जुमानत नाही , तिचा वेग कमी करत नाही . हळूहळू दगडाचे खाचकोपरे याच सतत घर्षणाने झिजतात. गुळगुळीत गोटा होऊन पुढे देवत्व  पावतो. म्हणजे विरोध त्यांचाच करा की ज्यांच्या विरोधातूनही तुमची प्रगती होईल. 


३)  नर्मदेतील अति पाषाणांनी तिचा वेग सतत प्रवाही व आवेगी असतो. अखंड  उत्साही प्रवाहिततेमुळे नदीला तीर्थाचे महात्म्य लाभते.   

 अ) म्हणजे पाषणमनोवृत्तीचे कोणी सहवासात असतील तरी तुमचे कार्य अखंड सुरूच ठेवा. त्यांच्या अवरोधाने तुमच्या गतीला आवेग येईल . न् अखंड गतिशील , प्रवाहिततेने  तुमचा महिमा वाढेल. 

ब) आपल्या वागण्यातून विरोधकालाही असं घडवा की तोही थोर व्हावा.  आपण मात्र परत आपल्या सहजप्रवृत्तीने निरालस वागत रहावे.

 तर अशी  ही नर्मदा न् असा हा  दगड! 

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

 

 


Wednesday, May 25, 2022

#सहजोक्त.

 #तोच चंद्रमा नभात.....

मराठी साहित्य त्याच्या उत्तम साहित्यगुणांनी कायमच श्रेष्ठ ठरले आहे.  मराठी कविता सुद्धा याच साहित्याची देण आहेत. काही काही कवितांचे भावगीत म्हणून ध्वनिमुद्रण झाले न् त्या कविता अक्षरशः अजरामर झाल्या. मराठीत अशा अनेक कविता आहेत.  

आता हेच बघा ना . शांता शेळके यांनी लिहिलेले , सुधीर फडके यांनी  यमन-रागात गायलेले व संगीत दिलेले   विख्यात मराठी भावगीत . हे भावगीत न ऐकलेला मराठीमाणूस विरळच असेल.  


तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी एकान्ती मजसमीप तीच तूही कामिनी !

नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे छायांनी रेखियले चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहिनी ॥१॥

सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे? मीही तोच, तीच तूही, प्रीति आज ती कुठे? 

ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी॥२॥

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणावाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी॥३॥

 

  सुधीर फडकेंच्या आवाजातील तपःपूत आर्तता , पार्श्वसंगीताच्या कातर सुरावळी आणि गीतातील शब्द , या तिघांचाही मेळ असा काही जुऴला आहे की आंतरिक एकात्म सहज साधलंय त्यातून !   

  श्रुंगार हा रसांचा राजा म्हटल्या जातो . श्रुंगार रसाचा स्थायी भाव "रती" म्हटल्या जातो.  श्रुंगार रसाचे दोन भेद आहेत . (१) संयोग श्रुंगार  म्हणजे ज्यात दोहोंचे मिलन वर्णिल्या जाते. (२) विप्रलंभ श्रुंगार म्हणजे ज्यात वियोग  दर्शविला जातो. 

  हे गीत श्रुंगार-रसाचे आहे असं सामान्यतः मानतात. पण खरेच ते तसे आहे कां ?  

   शांताबाईंच्या उत्तमोत्तम काव्यांपैकीचे हे एक काव्य !  या गीतात , नायिकेला उद्देशून नायकाच्या भावना  शब्दातून व्यक्त झाल्या आहेत . शब्द आणि  भावनांची सुबक गुंफण यात दिसते.  

   काव्यप्रकाश नामक ग्रंथात एक श्लोक आहे , तो असा - 

 ‘यः कौमारहरः स एव हि वरस्ता एव चैत्रक्षपास्ते चोन्मीलितमालतीसुरभयः प्रौढाः कदम्बानिलाः ।

सा चैवास्मि तथापि तत्र सुरतव्यापारलीलाविधौ रेवारोधसि वेतसीतरुतले चेतः समुत्कण्ठते॥  

या श्लोकात -चैत्ररात्री ,  उमलत्या मालती फुलांचा सुगंध  , तो घनदाट कदंबवृक्ष  , तीच नायिका आणि नायक , त्याच त्यांच्या श्रुंगारलीला  वगैरे असूनही नायिकेला नर्मदेतीरीचे त्यांचे मीलन स्मरत आहे - असे वर्णन आहे. 

या श्लोकाचा विस्तारित , सुसंस्कृत आणि कुलीन भावानुवाद , या गीतातून आपल्याला अनुभवायला मिळतो.  बरीच उदाहरणे अशी आहेत की संस्कृतसाहित्यातून कल्पना / प्रसंग घेऊन त्यावर संस्कृत साहित्यापेक्षाही सरस  मांडणी मराठीत आढळते. (जगद्विख्यात उदाहरण आपल्या ज्ञानेश्वरीचेच आहे.) हे गीतही त्याच पठडीतले !  

 

 काव्यप्रकाशात नायिका धीटपणे व्यक्त होतेय तर शांताबाईंच्या घरंदाज काव्यात नायक  धीटाई करतोय. 

 

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी एकान्ती मजसमीप तीच तूही कामिनी !

या दोन पंक्तीतही वरील श्लोकाप्रमाणे  चंद्र , चैत्राची रात्र  , एकांत आणि संगतीला नायिका आहे.  

पण काव्यात प्रणयी-शब्द-साज चढवावा तो शांताबाईंनीच !   चैत्रयामिनी व कामिनी हे शब्द  यमक जुळवायलाच घेतले , असे नाही .  यामिनी म्हणजे रात्र . पण अर्थच्छटा अशी की  जिच्यातून प्रहर सहज सरतात ती म्हणजे यामिनी.  सहाजिक आहे , प्रेयसी सह एकांतात असता रात्र भरकनच सरणार ! इथे 'यामिनी' शब्दाहून समर्थ-समर्पक शब्द अशक्यच !   तसेच सहचरीसाठीही "कामिनी" शब्द केवळ यमक जुळवायला नव्हे !   [अतिशयेन कामः अस्या अस्ति इति । काम + इनिः + ङीप् । ) अतिशयकामयुक्ता नारी । इत्यमरः]   जिची  स्वतःची कामेच्छा जागृत आहे अशा मनस्थितीतील पत्नी  म्हणजे कामिनी.  इथे काव्याची सरसता , शब्दांची श्रीमंती  , शब्दांतील अर्थांचे ऐश्वर्य वगैरे दीपवून जाते. 


नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे छायांनी रेखियले चित्र तेच देखणे 

जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहिनी ॥१॥

प्रणयी जीवांना जे जे हवं ते सारं यात वर्णिलं आहे. नीरवता  , धुंद चांदणं , सावल्यांची सुरेख रेखाचित्रे  , तोच जाईचा मांडव न् तीच त्या फुलांच्या सुगंधाची मोहिनी !    संस्कृतश्लोकात "मालती" म्हटले आहे. इथं या काव्यात फक्त एकच छोटीशी चूक आहे .  चैत्रात जाई उमलत नाही , फार फार मोगरा असू शकतो.  पण हरकत नाही , वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने अचूक नसेल तरी प्रणयीभावनांच्या दृष्टीने अतिशय अलवार वर्णन ठरतेय. जाईची फुलं नाजुक व मंद-धुंद सुवासिक असतात. त्यांचे उमलणे आणि कामिनीचे उमलणे यातील मदधुंदता  सुंदरच टिपली आहे शांताबाईंनी ! 

इथंवर हे काव्य हळुवार प्रणयी विकसित होतय आणि......  

सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे? मीही तोच, तीच तूही, प्रीति आज ती कुठे? 

ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी॥२॥

 सारं सारं तसेच , अगदी तसेच आहे.  नायकही तोच नि नायिकाही तीच आहे. पण कां बरे ती धुंदी , ती  प्रीती दिसत नाहीय ? ती आर्तताही नाही न् उघड्या डोळ्यांनी बघावं असं हे स्वप्नही नाही . 

 कां ? कां ?  कां ? 

  वरच्या श्लोकातील संयोग श्रुंगार इथे संपलाय . पण विप्रलंभ श्रुंगारही स्पष्ट नाही.  

  मानवी वर्तनाची मानसिकता या कडव्यात व पुढच्या कडव्यात अधोरेखित होते. 

  

  त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा

 वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी॥३॥

 नायक-नायिकेचे  मन जुळलेलेच आहे. दोघेही एकांती जवळच आहेत. सारं वातावरण प्रणयी आहे. परंतु नवथरतेची नाविन्यता आता संपली आहे. सरावाने नवतेवर मात केली आहे.  हेही मान्यच ! असा अनुभव सर्वच दंपतींना येतो. 

  "भंगल्या सुरातून  गीत व सुकलेल्या फुलातून गंध कधीच मिळत नाही." असे म्हणत शांताबाईंना नेमकं काय सुचवायचे आहे ?   सर्व काही स्वाधीन , स्वामित्वातील असूनही कां असा विसंवादी सूर ?  

   शेवटच्या दोन ओळींतून केलेला अनपेक्षित रसभंग , या काव्याला वेगळ्याच उंचीवर नेतो की हळुवार उमलणाऱ्या संवेदनेचा व्यावहारिक मनोभंग करतो ? हे ज्याचे त्यानेच ठरवावे.

   ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

 






  



















#सहजोक्त.

 बालयोगिनी मुक्ताबाई.

 "निवृत्ति-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई-एकनाथ-नामदेव-तुकाराम" , या गजरात टाळ-मृदंगाच्या संगतीने  वारकरी पंढरपुरास जातात. संतांच्या मंदियाळीत स्त्री-संत तसेही कमीच , त्यातही नाम-गजरांमध्ये स्थान मिळविलेल्या मुक्ताबाई , या अद्वितीयच होय. 

 पैठण जवळील आपेगावच्या  कुळकर्णी  विठ्ठलपंत नि रुक्मिणीदेवी यांच्या पोटी चार अलौकिक  संतरत्ने निर्माण झाली. उच्च-अध्यात्मिक साधक असलेल्या मायबापाच्या पोटी जन्माला आलेली ही चारही भावंडे , जन्मजात विवेकी सिद्ध अशीच होती.  अपत्यांच्या नामकरणातूनही आई-बाबांचा अध्यात्मिक-अधिकार उमजतो. साधकाला सातत्यपूर्ण उपासनेतून संसारातील मायारूपी फोलपणा समजला की 'निवृत्ती' लाभते , निवृत्तीनंतर दृढोपासनेने 'ज्ञान'प्राप्ती होते. निवृत्तिपर आचरणासह परिपूर्ण ज्ञानाने  साधक मोक्ष'सोपाना'रूढ होतो , अशी सर्वांगिण तयारी झालेला साधक जीवन'मुक्त' होतो .  विठ्ठलपंत-रुक्मिणीबाई यांनी  अपत्यांची नावे अनुक्रमे  निवृत्ति-ज्ञानदेव-सोपान-मुक्ता अशी ठेवली. 

  अभंग-आख्यान-कीर्तन-प्रवचने तसेच संत-अभ्यासकांचे साहित्य इत्यादींतून  कवडश्याप्रमाणे  "मुक्ताबाई" यांचे चरित्र  वाचकांना कळते.  नावाप्रमाणेच मुक्ताबाई जीवनमुक्त बालयोगिनी होत्या.  

  


यावनीसत्तेची नांदी सुरु होण्यापूर्वीचा तो काळ! यच्चयावत् जनता अनिष्टरूढी , गतानुगतिक कर्मकांडीय संभ्रमात  वावरत होती.  ख-या ज्ञानाला अोहोटी लागली होती. भक्तीचा बाजार भरला होता. विवेकी-सामंजस्य जणु लोप पावले होते.  अशा कालावधित गुरुच्या आज्ञेने सन्यासवृत्ती सोडून गृहस्थाश्रमात परतलेले थोर साधक विठ्ठलपंत व त्यांची तितकीच साध्वी पतिव्रता पत्नी रुक्मिणीबाई यांच्या पोटी 

अनुक्रमे शके   ११९५ , ११९७ , ११९९ व १२०१ मध्ये ही चार भावंडे जन्माला आली.   तीन भावंडांची लाडकी बहिण मुक्ताबाईं शके १२०१ म्हणजे इ. स. १२७९ (काहींच्या मते १२७७) मध्ये जन्मली .    

तत्कालीन समाजाच्या भ्रामक रुढीप्रियतेने विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंना  छळ-छळ छळले होते. संन्याश्याची पोरे म्हणून या भावंडांनाही समाज त्रास देत असे. समाजाने जणू वाळीतच टाकलेले हे कुटुंब ! अपत्यांना संस्कार व ज्ञान देण्यास दोघेही माता-पिता जागरुक होते. मुलांचे वडिलांजवळ शिक्षण सुरुच होते. सर्व कुटुंबीय मिळून त्र्यंबकेश्वराला प्रदक्षिणा घालण्यास जात असत. त्याच काळात निवृत्तीनाथांना गहनीनाथांचा गुरुमंत्र मिळाला. निवृत्तिनाथ आठ वर्षांचे होत आले तसे  आई-बाबांना त्यांचा उपनयन संस्कार व्हावा असे वाटू लागले. पण आळंदीतील कोणीच ब्रह्मवृन्द यासाठी तयार होई ना .  अनेक धर्मसभांमध्ये विठ्ठलपंत विनविण्यास जात. पण कोणीही होकार देत नसत. त्यातच आळंदीच्या ब्रह्मवृंदांनी देहान्त प्रायश्चित्त घेण्यास सांगितले , त्यानुसार दोहोंनी इंद्रायणीत देहत्याग केला न् चारही भावंडं अनाथ झाली. त्यावेळी त्यांची वयं अनुक्रमे १० , ८ , ६  व ૪ होती . मातृपितृच्छत्र विरहित कोवळ्या बालकांनी एकमेकांना सांभाळले.  या सगळ्यांची अध्यात्मिक योग्यता तत्कालिन सगळ्या धर्ममार्तंडांहून अधिक होती  यात शंका नाही.  

सर्वात लहान , लौकिक-व्यवहारात अजाण , अबोध अशा मुक्ताबाई  जनरीतीच्या वणव्याने  लवकरच प्रगल्भ व परिपक्व झाल्या , त्यांचे बालपण संपूनच गेले.  निवृत्तिनाथांनी तिन्ही भावंडांना गुरुदीक्षा दिली. 

 वारकरी-संप्रदायाचा पाया रचणारे , भागवत्धर्म-पताका रोवणारे , ज्ञानेश्वरीकार  ज्ञानियांचा राजा , संत ज्ञानेश्वर या सर्व भावंडांहून  अधिक प्रख्यात  वाटतात. परंतु संत ज्ञानेश्वरांच्या तीनही भावंडांची योग्यता त्यांच्याच तोडीची होती , यात शंका नाही. या भावंडांनी ज्ञानेश्वरांना पूरक नि आश्वासक वातावरण अवती-भवती  सतत ठेवले , शिवाय पाठीमागे वा सोबत राहून स्वतःच्या आत्मिक प्रगतीसह समाजाच्या अाध्यात्मिक प्रगतीची कास धरली.  

 बालयोगिनी मुक्ताबाईंनी वयाने लहान असूनही आपल्या मोठ्या भावंडांना मायेने सांभाळले. मुक्ताबाईंचे अवघे आयुष्य जेमतेम   अठरा वर्षांचे होते.  विविध अभंग , संतसाहित्यातून वेचून बघितल्यास मुक्ताबाईंचा जीवनपट अंदाजे थोडक्यात असा मांडता येईल. (घटनाक्रम आणि वय ऐतिहासिक सत्य पुराव्यांवर आधारित असेलच असे नाही .) साधरणपणे  वयाच्या चौथ्या वर्षी आई-वडिलांचा मृत्यू , वयाच्या साडेचार-पाचव्या वर्षी पैठणच्या धर्मपीठासमोर काही कूट अभंग  रचून म्हटले ,वयाच्या सहाव्या वर्षी ज्ञानदेवांच्या पाठीवर मांडे भाजून निवृत्ति दादाला खाऊ घालणे , विसोबा खेचरांचे गर्वहरण ,  वयाच्या   आठव्या वर्षी ताटीचे अभंग सांगून ज्ञानदेवांना लडिवाळ उपदेश ,   नऊ ते अकरा वर्षे पर्यंत भावंडांसह  वारी न्  पंढरपुरात संतमेळाव्यात नामदेवांना उपदेश , गोरोबा काकांकडून भक्तसाधकांच्या तयारीची परीक्षा करवून घेतली ,   बाराव्या वर्षी चांगदेवांचे गर्वहरण व मुक्ताईंनी  त्यांचा शिष्य म्हणून  स्वीकार करणे , चांगदेवांना  उपदेश करणे.  पुढे ज्ञानदेवांनी भावार्थदीपिका व अमृतानुभवाची रचना करणे , नंतर नामदेवांसह तीर्थाटनास जाणे .  ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे एकवीसावे वर्षी संजीवन समाधी घेतली  ,  त्यानंतर  काहीच दिवसांत   सोपानदेवांनी 'सासवड' येथे तर मुक्ताईंनी अठराव्या वर्षी 'मेहूण' येथे  वैशाख कृष्ण दशमी , रविवार शके १२१९ मध्ये तापी-नदीकाठी समाधी घेतली.  तीनही भावंडांना समाधी देऊन मग गुरु निवृत्तिनाथांनी  शके १२१९ ज्येष्ठ वद्य द्वादशीला  ब्रह्मगिरी पर्वतावर 'त्र्यंबकेश्वर'  येथे समाधी घेतली.  

 काय विलक्षण योग म्हणावा !  एका वर्षांमध्ये  चारही भावंडांनी  योगबलाने संजीवन समाधी घेतली. मुक्ताबाईंच्या  सदेह-मुक्त-समाधीचे वर्णन संत नामदेवांनी स्वतःच्या गाथेत असे केले आहे ,

 

 "कडाडली वीज निरंजनी जेव्हा l

मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली l

वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई l

झाली मुक्ताबाई स्वरूपाकार l

एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी l

जेव्हा निरंजनी गुप्त झाली l

गेले निवारुनी आकाश आभुट l

नामा म्हणे कोठे मुक्ताबाई l"


अशा प्रकारे बालयोगिनी मुक्ताई यांचा जीवनपट छोटासा पण विलक्षण असाच आहे.  


श्रीकृष्णाची अत्यल्पजीवी बहिण योगमाया जशी  ज्ञानयोग-सौदामिनी होती , तद्वत  अत्यल्प साहित्य-निर्मिती , अल्पायुषी जीवन असूनही मुक्ताईने  संपूर्ण वारकरी सांप्रदायात  अढळ गुरुपद स्वतःच्या कर्तृत्वाने प्राप्त केले आहे , यात शंका नाही. 

मुक्ताबाईंच्या जीवनातील चार प्रसंग त्यांच्यातील तेजस्वी-योगिनीचा सविस्तर परिचय  करून देतात . ते चार प्रसंग पुढील प्रमाणे , 

प्रसंग १ =>  आई-वडिलांच्या मायेला पारखे झालेली ही भावंड , एकमेकांना सावरत होती. भावंडांमधील वडिलभाऊ निवृत्तिदादाला एकदा मांडे खायची इच्छा झाली . साधक-योगी जरी असले तरी वय तसे कोवळेच होते ना त्या भावंडांचे ! मुक्ताबाई लागली मांड्याच्या तयारीला , त्यासाठी हवा होता खापराचा तवा . मग काय ? बिचारा छोटा जीव  गावात ,"सगळीकडे खापराचा तवा देता कां ?" विचारत फिर-फिर  फिरला . कोणालाही साधी कीव आली नाही. उलटपक्षी विसोबा चाटी यांनी  , या भावंडांना  तवा मिळूच नये अशी सोय केली . आता कसे मांडे खातात , बघू या गंमत!  म्हणून  लपून पाहू लागले. इकडे मांडे करता येणार नाही म्हणून मुक्ताबाई रडू लागली.  तेव्हा ज्ञानदादा मदतीला धावला. त्याने मुक्ताबाईला मांडे करायला सांगितले न् ते योगबलाने स्वतःच्या पाठीवर भाजायला सांगितले.  सर्व भावंडे आनंद‍ाने मांडे खाऊन तृप्त झाली. इकडे गावातील विघ्नसंतोषी लोकं स्तंभित झाले.  भावंडांची योगसिद्धता पाहून विसोबा शरण आले. ज्ञानेश्वरांनी त्यांना उपदेश केला . सोपानदेव व मुक्ताबाईंनी त्यांना 

बोध केला. संतसाहित्याच्या एका मतप्रवाहानुसार  विसोबा खेचर  हे सोपानदेवांचे शिष्य , तर  दुस-या मतानुसार  मुक्ताबाई या विसोबांच्या गुरु होत.  

प्रसंग २=>   पैठणचे  धर्मपीठ गाजवून  परत येताना भावंडांनी गावोगावी कीर्तन-प्रवचने केली. पुणतांबे गावी आले असता , चौदाशे वर्षांचे  सिद्धयोगी  चांगदेव , गुहेमध्ये ध्यानस्थ होते. समाधीतून बाहेर आल्यावर हे योगी  कलेवरांना जीवदान देत असत. त्यानुसार  गुहेच्या बाहेर अनेक कलेवर  ठेवलेली होती. ज्ञानेश्वरांच्या सांगण्याहून  मुक्ताबाईंनी ती कलेवर जीवंत केली. आणि ती भावंडं पुढील मार्गाला निघाली.  समाधी संपल्यावर चांगदेवांना शिष्यांकडून सारे कळले.  बालवयात चारही योगी भावंडांची साधना बघून चौदाशे वर्षांचे चांगदेव मनातून चांगलेच स्तिमित झाले. इतक्या अधिकारी पण लहान वयाच्या ज्ञानदेवांना नेमकं काय मायना लिहावा , असा संभ्रम पडून कोरेच पत्र पाठविले. ते कोरे पत्र पाहून भावंडांचा अभिप्राय होता की , इतकी तपश्चर्या करूनही चांगदेव कोरेच राहिले. मग ज्ञानदेवांनी पासष्ट श्लोकांची रचना करून त्यांना धाडली, तीच चांगदेव-पासष्टी होय. त्या पासष्ट श्लोकांचा अर्थ चांगदेवांना कळाला नाही.  या भावंडांना भेटायला ते निघाले . 'आपण मोठे योगी' , या भावनेने वाघावर बसून आले. तीनही भावंडांसह भिंतीवर बसलेले ज्ञानेश्वर योगदृष्टीने  त्यांचे हे भाव जाणून भिंतीला 'चल' म्हणतात. ती निर्जीव भिंत भावंडांना घेऊन  चालू लागते. चांगदेवांना हे सर्व पाहून भावंडांच्या योग्यतेची न् स्वतःतील न्यूनाची जाणीव होते .  ते ज्ञानदेवांना शरण येतात. ज्ञानदेवांच्याच  मतानुसार ते मुक्ताबाईंकडून अनुग्रह घेतात.  मुक्ताईने त्यांना पासष्टी  समजावून सांगितली. चौदाशे वर्षे योगतपस्या करून जे साध्य झाले नाही , ते गुरु मुक्ताई यांच्या उपदेशाने क्षणात आकळले. ज्ञानचक्षु उघडले , जणु नवा जन्म झाला . 

याचे वर्णन करताना  चांगदेव म्हणतात ,


"चांगा जन्मला माध्यान्ह काळी ।

मायबापे दोन्ही नाहीशी जाली ॥१॥

मुळीच चांगा नाहीसा जाला ।

मुक्ताई म्हणे चांगया भला भला ॥२॥

वटेश्वर चांगा मुळी लागला ।

पोसणा घेतला मुक्ताईने ॥३॥"

चौदाशे वर्षांचे चांगदेवांना  , दहा-अकरा वर्षांच्या मुक्ताईने  आईसारखे सांभाळले , मुक्तिमार्गावर गतिमान केले , ते चांगदेवांच्या अभंगातून  आपल्याला कळते ; 

 "निर्गुणाचे डाहाळी पाळणा लाविला ।

 तेथे सुत पहुडला मुक्ताईचा ॥१॥

 निज निज बाळा न करी पै आळी ।

 अनुहात टाळी वाजविते ॥२॥

 तेथे निद्रा ना जागृती भोगी पै उन्मनी ।

 लक्ष तो भेदुनि निजणा तो ॥३॥

 निभ्रांत पाळी पाळणा विणवुनी ।

 मन हे बांधोनि पवन दोरा ॥૪॥

 एकविस सहस्र सहाशे वेळे बाळा ।

 तोही डोळा स्थिर करी ॥५॥ 

 निद्रा ना जागृती निजसी काई ।

 परियेसी चांगया बोले  मुक्ताबाई ॥६॥ 

 अतिबालवयातच जिचे बालपण संपले ,  सुख-दुःख , मानापमान या सर्वांच्या पलीकडे ती कधीच गेलेली होती , म्हणूनच चांगदेव-मुक्ताई संवादात सांगतात  ,

 "सुखाचे शेवटी दुःख आले भेटी ।

 भेटलियासाठी तेही नुरे ॥१॥

 सुख ते कवण  दुःख ते कवण ।

 दोन्ही अज्ञान करी पारे ॥२॥

 मुक्ताई म्हणे चांगया चेई ।

 स्वयंभू चेईला वटेश्वरी ॥३॥ "

   बालयोगिनी मुक्ताबाई या जन्मजात योगिनीच होत्या  हेच त्यांच्या  अभंगातून  जाणवते.

   चांगदेव हे निर्विवाद  मुक्ताईचे शिष्य होते , तसे  विसोबा खेचरही होते कां ? याबद्दल  संतसाहित्यिकांमध्ये दुमत आहे. चांगदेवांचा एक अभंग  नेमकं काय ध्वनित करतो ? 

   "अविनाश पाळणा अव्यक्ते विणीला ।

   तेथे पहुडला योगिराज ॥१॥

    जो जो जो जो म्हणतसे माया ।

    साकारातीत निजरे चांगया ॥२॥

    सोहं सोहं षट्चक्रन्यासे ।

    तुज परिसे देता , मीच न दिसे ॥३॥

    ऐसी निद्रा तुज लागो दे पुत्रा ।

    मुक्ताई खेचरा उपदेशी मंत्रा ॥૪॥ 

    

    प्रसंग ३ => 

    संत , सिध्द ,योगी  जरी असले तरी ही भावंडं अतिशय कोवळ्या मनाची न् सात्विक होती. तत्कालीन समाजाच्या विखारी असहिष्णुतेने कधीतरी त्यांची मनं पोळली जात. सा-या जगासाठी ज्ञानीयांचा राजा ठरलेले ज्ञानेश्वर एकदा भीक्षा मागण्यास गेले. दूषणे , हलके शब्द , कुटाळक्या आजवर  ते सहनच करीत होते. पण यावेळी आईवरूनही कोणीतरी अपमान केला. वैरागी पण मातृहृदयी ज्ञानदेव खोलवर दुखावले न् तडक कुटीत येऊन ताटी बंद करून स्वतःला कोंडून घेतले. तिघेही भावंडं गोंधळली , दुःखी झाली. त्यावेळी मुक्ताबाईंनी बेचाळीस अभंग रचून ज्ञानेश्वरांना त्यांच्या उद्विग्न मानसिकतेतून बाहेर काढले , इतकेच नाही तर पुढील अजरामर साहित्य-लेखनाची त्यांची मनोभूमी तयार केली.  हेच अभंग पुढे ताटीचे अभंग म्हणून ख्यात पावले. 

    


चिंता क्रोध मागे सारा

ताटी उघडा ज्ञानेश्वरा

योगी पावन मनाचा

साही अपराध जनाचा ।

विश्व रागें झाले वन्ही

संती सुखें व्हावें पाणी॥

शब्द शस्त्रें झालें क्लेश

संती मानावा उपदेश।

विश्व पट ब्रह्मदोरा

ताटी उघडा ज्ञानेश्वरा॥

ब्रह्म जैसें तैशा परी

आम्हा वडील भूतें सारी।

अहो क्रोधें यावें कोठे

अवघे आपण निघोटे॥

जीभ दातांनी चाविली

कोणें बत्तीशी तोडीली।

मन मारुनी उन्मन करा

ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ 

 शोषित-पीडित-वंचित बालकांच्याच काय मोठ्यांच्याही तोंडी इतकी समंजस-विवेकी-भाषा अशक्य वाटते , ही भाषा केवळ सिद्धयोगी , पूर्णब्रह्मस्वरूपी विभूतींचीच असणे स्वाभाविक आहे ! 

 प्रसंग ૪ => "नामदेव गाथा"   हा ग्रंथ तत्कालिन समाजाचे , व्यक्ति-विशेषांचे ,  स्थानांचे यथार्थ चित्रण करणारा  प्रामाणिक ग्रंथ आहे.  नामदेवांनी स्वतःचे सुद्धा अतिशय परखड व वास्तविक वर्णन केले आहे. स्वतः नामदेवांनी अभंगांतून मुक्ताईंच्या अधिकाराविषयी अभंग लिहिले आहेत. एकदा ज्ञानेश्वरादी भावंडे तत्कालिन प्रसिद्ध संतांच्या मेळाव्यात भेटले. प्रथम-दर्शनीच निवृत्तिनाथांनी संत नामदेवांना नमस्कार केला. मग ज्ञानेश्वरांनी व सोपनादेवांनीही केला . कोणी नमस्कार केला की आपणही त्यांना नमस्कार करायचा , अशी वारकरी-सांप्रदायात रीत आहे. नामदेवांनी या तिघांनाही नमस्कार केला नाही , उलट मुक्ताबाई नमस्कार करेल अशी वाट पाहू लागले. निवृत्तिनाथांनी देखिल मुक्ताबाईंना नमस्कार करायला सांगितले. परंतु त्यांनी नमस्कार तर केला नाही , पण सगळ्यांसमोर  जे काही सुनावले ते नामदेवांनी अभंगात मांडले ,


अखंड जयाला देवाचा शेजार l

कारे अहंकार नाही गेला ll

मान अपमान वाढविसी हेवा l

दिवस असता  हाती घेसी दिवा  l

परब्रह्मासंगे नित्य तुझा खेळ l

आंधळ्याचे डोहाळे का बा झाले l

कल्पतरू तळवटी इच्छिती ते गोष्टी l

अद्यापि नरोटी राहिली का l

घरी कामधेनु ताक मागू जाय l

ऐसा द्वाड आहे जगा माजी l

म्हणे मुक्ताबाई जाई ना दर्शना l

आधी अभिमाना दूर करा ll  


संत नामदेवांना बहुतेक सर्व संत मान देत असत. अखंड हरिसंकीर्तनात दंग असलेले नामदेव स्वतःला श्रेष्ठ भक्त समजत होते. त्यांचा अहंकार मुक्ताईंच्या लक्षात आला. अजूनही संत नामदेवांवर गुरुकृपा झाली नव्हती. ही बाब त्यांच्या संतपदासाठी न्यूनत्वाची होती. हे जाणून मुक्ताईंनी योजना केली. संत गोरा कुंभार हे सर्व मंडळीत वयाने नि अधिकाराने थोर . मुक्ताबाईंनी त्यांना सर्व विठ्ठलभक्तांची योग्यता तपासायला सुचवले.  हातात उलथणं घेऊन गोरोबाकाका सर्वांच्या डोक्यावर थापटत होते. जेव्हा नामदेवांची वेळ आली तेव्हा त्यांनी अोरडणे सुरु केले , ते पाहून गोरोबा म्हणाले , 

"गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई ।

सुन्नेभरि नाही भाजियेला ॥" (ना. गा. १३३३.८)

 हे सर्व अपमानास्पद वाटून नामदेव तेथून पळाले , 

 " मागे पुढे पाहे पळत तातडी ।

 आला उठाऊठी पंढरीसी ॥" (ना. गा. १३३६.२)

" नामदेव म्हणे देवा कवणा शरण जाऊ।

कोणा मी होऊ शरणागत ॥" (ना.गा. १३૪७.५) अशी नामदेवांची अवस्था झाली.  ज्ञानदेवांच्या सल्ल्याने विसोबा खेचर यांच्या शरण गेले.  पुढे याच  नामदेवांनी भागवद्धर्म पताका पंजाबा पर्यंत रोवल्या . 

वरील चार प्रसंगातून मुक्ताईंचे स्वतंत्र , मातृहृदयी , कणखर  , धैर्यशील व्यक्तिमत्त्व अधोरेखित होते. कर्तृत्ववान् भावंडांची तितकीच ताकदीची सक्षम बहीण आपल्याला यातून उमजते. 


स्वतः विषयी न सांगणे ,  तत्कालिन समाजाची रीत होती.  त्यामुळे प्रकाशित साहित्याद्वारे प्रख्यात संत  सोडले तर  इतर संत व त्यातही स्त्रीसंत यांच्या विषयी लोक-कथा , संप्रदाय-मान्य वदंता यातूनच माहिती मिळते. कधी कधी ती फारच धूसर असते.  

ज्ञानेश्वरांनी वा सोपानदेवांनी मुक्ताईचा उल्लेख आपल्या अभंगातून केलेला दिसत नाही. निवृत्तिनाथांच्या तुरळक अभंगातून (सकल संत गाथा , निवृत्तिनाथांचे अभंग २६ ,२९ ,३०) मुक्ताईं विषयी थोडेसे कळते. 

 योगी चांगदेव व संत नामदेवांच्या अभंगातून आपल्याला मुक्ताई अधिक उलगडते. 

  सकल संत गाथेतील मुक्ताई-विरचित अभंगातूनही त्यांचे व्यक्तिमत्व जरासे आकळते. 

  उत्तरवर्ती संतसाहित्य-संशोधकांनी अशा संतांवर अधिक अध्ययन करणे सुरू ठेवले आहे , ही एक जमेची बाजू होय.  उत्तरवर्ती अभ्यासकांपैकी एक 

  वामन दाजी ओंक यांनी मुक्ताबाईचे एक हिंदी पद संकलित केले आहे ते असे –

वाहवा साहेबजी l सद्गुरुलाल गुसाईजी

लाल बीज मो उदीला काला, औठ पिठसो निला l

पीत उन्मनी भ्रमर गुंफा रस झुला बाला l

सहस्त्र दल मो अलख लिखाये, आज लौ परमाना l

जहां तहा साधू, दसवा आप ठिकाना l

सदगुरु चेले दोनो बराबर, येक देशमो भाई l

एकसे ऐसे दरसन पायो महाराज मुक्ताई l

 वरील अभंगावरून , मुक्ताबाईंनी मराठी अभंगरचनेबरोबरच काही हिंदी पदेही रचली असावीत  , असे म्हणण्यास वाव आहे.

 संत म्हणजे खरेतर जीवनमुक्त सिद्ध योगीच असतात. संतांना जातीपातीतच काय स्त्री-पुरुष-आदी भेदांमध्ये गोवणे  म्हणजे  बुद्धीभेद करणे होय. वारकरी सांप्रदायातील श्रेष्ठ संतांच्या मांदियाळीतील , मूर्धन्य व  ललामभूत संत बालयोगिनी मुक्ताबाईंचे चरित्र वाचनीय तर आहेच , मननीय व आचरणीयही आहे . 

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे

 नागपूर .

 

 


 



 






     

   

 

 





 

Sunday, May 15, 2022

#सहजोक्त.

 

#बघ हं , हेही दिवस जातील !


काही दशकांपूर्वी समाजसेवक , स्वातंत्र्यसैनिक मोतिलाल छल्लाणी (बाबुजी)   ,  नागपूरात प्रसिद्ध होते. स्वातंत्र्यसैनिकांना सन्मान व पेंशन मिळवून देण्याच्या चळवळीतील हे प्रख्यात नाव होते.


 छल्लाणी काकांचा मुलगा उत्तम चित्रकार , छायाचित्रकार अविनाशदादा म्हणजे शरदचा (माझे पती) मित्र. अविनाशदादा ह्यांनी आईवडिलांचा समाजसेवेचा व सामाजिक संवेदना-सौहार्द्राचा वसा शेवट पर्यंत निभवला. 


अविनाशदादांचे म्हणजेंच बाबुजींचे घर केळीबागरोडवर होते. घरी आरशावर  "बघ बरं , हेही दिवस जातील!" हे वाक्य सुवाच्य अक्षरात लिहिले होते. अविनाशदादाचीच ही कलाकारी होती. 

मला आठवतं की बाबुजींनी त्या वाक्याच्या मागचे तत्त्वज्ञान उलगडून सांगितले होते. 


प्रत्येकाने आरश्यावरच हे वाक्य लिहावं , असं त्यांचं मत होतं .  जेव्हा आपल्या मनात गर्व , माज , अहंकार  येतो व आपण आढ्यतखोर होतो तेव्हा हे वाक्य चेतावणीचे वाक्य ठरते. बघ , जास्त ऊतमात करू नकोस , सर्वांशी माणुसकीने वाग कारण , हे दिवस  जास्त काळ रहाणार नाहीत.  हे दिवसही  नक्कीच निघून जातील . 


तर हेच जेव्हा आपण न्यूनगंडात , निराशेत व दैन्यावस्थेत  असतो तेव्हा हेच वाक्य दिलासा देणारे असते.  बघ बरे ,  हे वाईट दिवसही निघूनच जातीलच . कारण जीवनात कोणतीच गोष्ट स्थिर , चिरंतन  नाही , मग तुझी दयनीय परिस्थितीही पालटणारीच आहे म्हणून नैराश्य झटकून टाक  न्   हातात आलेलं कर्तव्य मनापासून कर . 


तेव्हा त्या वाक्याचे न् त्या मागील तत्त्वाचे गांभीर्य कळत नव्हते. पण आज अनेक उन्हाळे-पावसाळे बघितल्यावर वाटते की खरोखर  वैयक्तिक ,कौटुंबिक , सामाजिक , आर्थिक वा कोणतीही   परिस्थिती असो , ती चिरंतन नाहीच नाही . परिवर्तन हाच सनातन नियम आहे.

 

सखोल विचार केला तर "बघ बरे , हेही दिवस जातील!"  असा अनुभव सर्वांनाच वेगवेगळ्या टप्प्यात आलेलाच असतो , नाही कां ?

 कविकुलगुरु कालिदासाच्या त्रिकालाबाधित श्लोकाचा उल्लेख इथे समर्पक ठरेल.

 कालक्रमेण जगतः परिवर्तमाना । चक्रारपंक्तिरिव गच्छति भाग्य-पंक्ति ।।

(स्वप्नवासवदत्तम्   /१  / ४)

समय के साथ-साथ संसार परिवर्तनशील है । पहिये के अरों के समान भाग्य भी निरन्तर बदलता रहता है । 


बाबुजी छल्लाणीं व अविनाशदादाच्या स्मृतींना विनम्र अभिवादन .  

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, April 27, 2022

#सहजोक्त.

 

सुभाषिते कालातीत असतात. मानवी प्रवृत्तींचे , भावनांचे प्रकटीकरण करणारी  अनेक सुभाषिते आहेत.  

खरा श्रीमंत कोण ?  यावर भरपूर चर्चा , लेखन वगैरे घडू शकते. पण अत्यल्प शब्दात समजावण्याची सुभाषितांची शैली खासच असते.

 आता हेच सुभाषित  बघा ना !

वयमिह परितुष्टा वल्कलैस्त्वं दुकूलैः 

सम इह परितोषो निर्विशेषो विशेष:

 स तु भवति दरिद्रो यस्य तृष्णा विशाला मनसि च परितुष्टे कोऽर्थवान् को दरिद्रः ॥   

शतक-त्रयी रचणारे भर्तृहरी हे प्राचीन काळातील प्रतिष्ठित व सदा विजयी  सम्राट होते.  राजपद सांभाळणारे  भर्तृहरी  व्याकरण , साहित्य विषयांतील तज्ज्ञ रचनाकार होते. "भारतीय शिक्षणातून सर्वांगीण व्यक्तमत्त्व विकास साधायचाच" , सिद्ध करणारे  हे उदाहरण आहे. असो.

"वैराग्यशतकम्" मधला हा श्लोक आहे. 

श्लोकाची पार्श्वभूमी थोडक्यात  अशी -   एक संन्याशी व राजा यांच्यात घडलेला हा प्रसंग . तो राजा खूप दानी व न्यायी असतो.  तर हा संन्याशी देखील आत्ममग्न , संतृप्त व  अतिशय वैराग्यमूर्ती असतो. ऐहिक दृष्ट्या अतिशय दारिद्यावस्थेत असलेल्या या वैराग्याला  सत्पात्री दान करावे , अशी राजा   इच्छितो. तुम्हाला काय हवे ते मागा , मी देतो. असे राजा म्हणतो. त्यावेळी संन्याशी , वरील श्लोक म्हणतो.  श्लोकाचा भावार्थ थोडक्यात असा -  

हे राजा , तू तुझ्या रेशमी वस्त्रांमध्ये खुश आहेस ,  तसा  मी वल्कले घालूनही संतुष्ट आहे.  संतुष्टीचा स्तर  दोघांमध्ये समानच आहे.  त्या संतुष्टीत काहीही भेद नाही. मग दरिद्री कोण ?  तर  ज्याची  हाव मोठी आहे तो.   आत्मतृप्त , आत्मसंतुष्ट , समाधानी व्यक्तींमध्ये  दरिद्री  वा श्रीमंत असा भेद  कसा  बरं असेल ? (कारण समाधानी वृत्ती  ही मनाची अवस्था आहे . )


वरील श्लोकात गरीबीची भलामण केलेली नाही , तसेच श्रीमंतीचा द्वेष केलेला नाही.

आजकाल ब्रँडेड वस्तु , हॉटेलिंग , शॉपिंग करणारी हायफाय जीवनशैली  वगैरे वगैरे असणे म्हणजे सुखी ,  प्रतिष्ठित समजतात.  पण दुर्दैवाने ,"समाधान, संतुष्टी" कोणत्याच मॉलमध्ये विकत मिळत नाही. भौतिक परिस्थिती काहीही असली तरी  मनातून समाधानी , संतृप्त असणे ही  दुर्लभ देणगी आहे. अर्थात , समाधानीवृत्ती  कष्टसाध्य सद्गुण आहे. 

श्रीमंत असो वा गरीब ;   समाधानी  व  निरोगी जीवन जगण्याचे सद्भाग्य विरळांच्याच नशिबी असते.    विकसित  , संपन्न देशात आजकाल satisfaction index मोजण्याचा प्रघात रूढ होत आहे.  भारतीय संस्कृती वा विचारसरणी पहिले पासूनच प्रगत होती , हेच वरील सुभाषित आपल्याला सांगते. नाही कां ? 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 



 

शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...