Sunday, April 1, 2018

#सहजोक्त.



"उकिरड्याचेही भाग्य पालटते मग आपण तर माणुस आहोत" ,माझ्या सासुबाई असं नेहमी म्हणायच्या.
सकाळी पटांगणात फिरताना उगवलेल्या सूर्याला नमस्कार करीत होते. मोठ्या इमारतीमागून सूर्याची स्वारी वर येत होती.ती इमारत पाहून   मनातचक्र सुरु झाले   न् सासुबाईचे ते  वाक्य आठवले.

जन्मापासून ते आजवर मी जेथे रहाते तो रहिवासी भाग असून उच्चमध्यमवर्गीय लोकांची ती वस्ती आहे. माझ्या बालपणी हा भाग अगदी साधा  संथ पण एकमेकांविषयी स्नेहाळ जिव्हाळा बाळगणारा होता. सर्वांच्या घरी साधारणपणे समान परिस्थिती होती.
घरात बेडरूम नावाची गोष्टच नव्हती.पुढचे आंगण पहिली खोली ,माजघर ,देवघर,स्वयंपाकघर ,व्हरांडा ,बाहेर संडास-बाथरूम,मागचं आंगण अशी सगळीकडे समान रचना होती. सगळ्यांकडे  रेडिअो ,सायकल असायची.बैठकीत चार खुर्च्या ,पलंग ,टेबल क्वचित कोणाकडे सोफ़ा. सगळेच जण महिन्याच्या सुरुवातीला भरल्या खिशाचे तर शेवटी रिकाम्या खिशाचे असत. घरोघरी साधारणपणे घरी बनवलेले पदार्थ होते. लिव्हिंगसँडर्डच्या भंपक कल्पना नव्हत्या.आमच्या कॉलोनीत आंतरराष्ट्रिय स्तरावर नावाजलेल्या विद्वानांसह स्थानिक पातळीवर प्रभावी व्यक्तिमत्त्वे व कोणतीही अोळख नसलेले सामान्य लोकंही गुण्यागोविंदाने रहात होते. त्यांचे त्यांचे क्षेत्र कॉलनीतील सहजीवनात दडपण वा विसंवादी ठरत नव्हते. सगळ्यांचे कुटंबजन चारचौघांत कोणताही गंड न बाळगता न् न जाणवून देता मिसळत असत.
मी व माझे दोन भाऊ. कॉलनीत आमच्या वयाची बच्चेकंपनी भरपूर.कॉलनीत भरपूर वृक्षराजींसह मोठं पटांगण , त्यामुळे शाळा सुटल्यावर खेळायला संपन्न वातावरण होते. घरचेही दिवेलागणी पर्यंत रागावत नसत.
अशा अनेक कारणांनी प्रोफ़ेसर्स कॉलोनी नावाचा आमचा भाग आम्हाला खुपच आवडायचा. कॉलनीत जवळजवळ प्रत्येक घरी तीन वा चार क्वचित त्यांच्यावर मुले होतीच होती. पण दोनतीन घरं त्याला अपवाद होती. त्यातील एक घर थोर गणितज्ज्ञ मंगळगिरी यांचेही होते .मंगळगिरी आजोबा व आजी  दोघेही  सगळ्यांशी मिसळून वागत . हळदीकुंकू -दसरा,सोनं वाटप यासारख्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असे. आडव्या रांगेतील सेन यांचे घर त्यामानाने अतिशय अलिप्त होते.

कॉलनीत त्यावेळी घरोघरी संक्रांत-चैत्रगौर यांचे हळदीकुंकु साजरे केले जाई. त्याप्रसंगी आई कागदावर कॉलनीतील सगळ्या काकू-आजींची नावे लिहून देत असे . मग मी ,मीरा ,अपर्णा घरोघरी तो कागद व पेन्सिल घेऊन फिरत असू. प्रत्येक घरातून सही आलीच पाहिजे असा आईचा आग्रह!
कागद हाती पडल्याबरोबर मी अोरडायची ,"सेनकडे जाणार नाही !!" कारण त्यांच्याकडे दोन आजीच होत्या न् त्यांचं बंगाली वळणाचं मराठी किंवा हिंदी मला कळायचं नाही.मग आई मीराला सांगायची अन् तिच्यासोबत मग अस्मादिक तेथे जायला तयार व्हायचे.
सेनच्या घराशी तसा कोणाचाच घरोबा नव्हता. दोन वयस्क बंगाली  स्त्रियांशिवाय तेथे कोणीच नव्हतं. त्या दोघी एकमेकांच्या नणंद-भावजया होत्या. नणंद म्हणजे प्राध्यापक सेन मॅडम ,त्यांचाच तो बंगला . त्यांची भावजय त्यांच्या सोबत रहात असे. त्या दोघीजणी शिष्ट नव्हत्या पण तरी सुद्धा कोणात मिसळत नसत. येता-जाता तोंडावर तोंड पडले की त्या मोठ्यांशी बोलत. आमच्या सारख्या मुलांशी त्या बोलत नसत किंवा आम्हीच त्यांच्या वा-याला उभे राहत नसू.सेनचे घर नि घरातील मंडळी या विषयी एक गुढ वलय वाटायचे आम्हाला.
आमच्या लहानपणी घरोघरी काय किंवा रस्त्यावर काय विद्युत प्रगती झालेली नव्हती. घरात एखादी ट्यूबलाईट व बाकी पिवळे बल्ब असत. तेच रस्त्यावरही अगदी टोकांवर पिवळे पथदीप असत ,ज्यावर प्रचंड किडे कायमच असत.  कॉलनीत घरोघरी भरपूर झाडं ,कॉलनीतील मोकळ्या जागांवरही झाडे असत . त्यामुळे दिवेलागणी नंतर रातकिड्यांचे आवाज ,लुकलुकणारे काजवे,डराव-डराव करणारे बेडकं ,रंग बदलणारे सरडे ,खेकडे ,गोगलगाई ,पैसा नावाच्या लाल अळ्या ,विविध रंगी फुलपाखरे ,मैना ,चिमण्या ,कावळे ,पोपट आदी पक्षी;  त्यां-त्या सिझनमध्ये सहज दिसायचे.

सायंकाळानंतर कॉलोनीतील आडव्या रांगेत आम्ही जातच नसू. त्यातल्या त्यात बोबडेंचे घर ही हद्द होती. सेनच्या घराकडे तर बघत पण नसू.
आजी,आई ,मावशी ह्या सेनबायांची चौकशी करीत असत.पुढे पुढे ते एकाट घर पार सुनं सुनं झालं . कारण त्या दोनपैकी एक आजी वारल्या. काही दिवसांनंतर त्या दुस-या आजी कुलुप लावून त्यांच्या मूळगावी परत गेल्या. आता ते घर खरोखर निर्जन झाले.
अाधीसुद्धा त्या घराचे आंगण अोकेबोके होते आता तर अधिकच फावले. त्या घराच्या आंगणात एकही फळाचे झाड नव्हते ना नीटसे फुलाचेही. फक्त कटलेल्या पतंगी वा उसळलेला चेंडू घेण्यासाठी तेथे मुले क्वचित जात असत. वा पावसाळ्यात तुंबलेल्या गडरलाईन मोकळी करायला आलेल्या मजुरांना वाट दाखवायला एखादा उत्सही बंड्या तेथे जाई.
बाकी कितीतरी वर्ष ती वास्तु पडिकच होती.
 म्हणजे बांधल्यापासून ते सेनकुटुंब जाई पर्यंत तसं ती वास्तु नांदती नव्हतीच . इतर घरांत जसे गोकुळ होते तसं तेथे नव्हतच काही.
 ‎ पण नंतरही बरेच वर्ष काहीही हालचाल नव्हती. काही वर्षांनी  बाहेरच्या एका व्यापा-याने ती वास्तु विकत घेतली असे कळले. ती वास्तु तशीच निर्जन राहिली. मग काही वर्षांनी त्या माणसाकडून
 ‎दुस-याने ती खरेदी केली असे कानी आले.
 ‎ पण वास्तूत काही बदल झाला नाही. मधे काही महिने तिथे एक संगणकवर्ग सुरु झाला होता. पण नंतर तिच्या भाळी असलेले निर्जनपण ती वास्तु पुन्हा मिरवू लागली. आश्चर्य म्हणजे पडित वास्तुत काही अनैतिक उद्येग चालतात तसे इथे काहीच होत नव्हतं. चोर,भिकारी सुद्धा तेथे फिरकत नव्हते. तसं त्या वास्तुबद्दल काही आगळवेगळंही कानी येत नव्हतं . पण तरी ती निर्जनच होती.
 ‎आता नव्या मालकाने तेथिल मूळ वास्तु तोडून जमिनदोस्त केली. मग साग्रसंगीत भूमिपूजन केले. त्यानंतर जवळजवळ दोन वर्षे बांधकाम सुरु होते. छान चार मजली मोठी अद्ययावत सुखसोईंनी युक्त इमारत त्या जागी आज उभी आहे .
पण आश्चर्य हेच की आज पाचसहा वर्षे होऊनही तेथे कोणी नांदायला आलेले नाहीच. चौकीदार व त्याचं कुटुंब त्या वास्तुची देखभाल करतो.
ती मोठी इमारत पाहून सारं बालपण व तेव्हाचे ते प्रसंग आठवले.
नशिब ,दैव ,भाग्य,लक हे जसं मानवाला लागू असते तसं एखाद्या स्थावर मालमत्तेला लागू पडते कां ? सहज तरंग उमटले मनावर
सेनचे घर व त्यावरची श्रीमंत इमारत पाहून!!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे .

1 comment:

  1. सुंदर वर्णन मला अस लिखाण फार आवडत।

    ReplyDelete

#सहजोक्त

. क्षमा शस्त्रं करे यस्य  दुर्जनः किं करिष्यति।  अतृणे पतितो वह्निः  स्वयमेवोपशाम्यति॥ ज्याच्या हातात क्षमा नावाचे शस्त्र आहे, त्याचे दुर्जन...