नमः सभायै ........ मुळात मानवी मन हे आनंदाने ओतप्रोत भरलेलच सकारात्मक असत...काळाच्या ओघात दुनियादारीच्या रेट्यात ते प्रदूषित होतं....तर मुळच्या आनंदी सकारात्मकतेला वाढविणारे स्वतः आनंदात्मक राहून आनंद पसरविणारे मन लेखनाची उर्मी देते त्यातून वाचकांना आनंद मिळावा यासाठी हा लेखनानंद .......
Saturday, July 21, 2018
Sunday, July 15, 2018
Saturday, July 14, 2018
#सहजोक्त.
झाडाख्यान .........
"निसर्ग लहरी झाला आहे ,बदलला आहे" ; अशा आशयाची वाक्य जेव्हा कानावर पडतात तेव्हा मी त्यांना "चेतनगुणोक्तिची" उदाहरणे मानते. मानवी भावभावनांचे आरोपण निर्जीव वस्तु वा निसर्गावर करणे म्हणजे चेतनगुणोक्ती.
निसर्ग कधीच बेभरोश्याचा ,लहरी नसतो. ही गुणवैशिष्ट्ये मानवाची असतात अन् तेच निसर्गावर अारोपित होतात.
"मानव हा बुद्धिमान प्राणी आहे ,निसर्गाची श्रेष्ठ कलाकृती आहे",असे म्हणत मानवच स्वतःची पाठ थोपटून घेतो कारण बाकी चराचर सृष्टी स्वसर्जनात इतकी मग्न आहे की मानव काय विचार करतो हे त्यांच्या गावी पण नसते.
किती तरी गुणं निसर्गाकडून आत्मसात करायला पाहिजेत. पहिले म्हणजे नैसर्गिक वागणे. शरीरधर्माला अनुसरून कुठेही दांभिकता ,वंचकता न करता सरळ सरळ जगणे.वाघ न् हरिणाचा भक्षक-भक्ष्य संबंध आहे . पण म्हणून वाघ चोवीसतास खायखाय करीत नाही ना सुटत ? किंवा दिसलं हरीण की खा ,असेही करीत नाही.
मुंगस न् साप यांचे हाडवैर आहे. क्षणोक्षणी वैरातून हिंसा वा कायम द्वेष यांच्यातही पहायला मिळत नाही.
"तडजोड तीही स्वतःला त्रास न करून घेता", हा ही मोठा गुण निसर्गाकडून शिकण्यासारखा आहे.
मानवी हव्यासापोटी जंगलकटाई,नद्या अडवून बांध वा धरणे बांधणे इत्यादी मानवी उपक्रमांमुळे खरे तर प्राणी ,झाडे निर्वासित होतात ,नद्यांची स्वाभाविक स्थिती बदलते. तरी तो निसर्गच आहे म्हणून पूर्ववत नाही पण प्राप्त परिस्थितीतही स्वधर्म (म्हणजे स्वाभाविक वर्तन ) न सोडता वागतो.
माझ्या अंगणात जुई (हिंदीत जुही) चा वेल आहे. अंगण छोटेच आहे न् त्यात जाई-मोगरा यांची कमान केली आहे. चमेलीचा वेल काढून टाकला ,गुलाबाचा वेल खुरटला होता म्हणून काढला. मात्र हा जुईचा वेल वाढवायला तशी जागा अपुरीच पडत होती. मग तो झाडासारखा कंपाऊंडच्या जाळीशी झुपका करून वाढू दिला. सहज कालपरवा पाहिले तर त्या नाजुक वेलाने सर्व अडथळे दूर करून भिंतीचा आधार घेत वरच्या गॅलरीवर स्वतःला प्रस्थापित केले. वा-याच्या झुळुकी सरशी छान डोलणारा तो वेल ,कालियामर्दनानंतर वेणु वाजवत निरागस हसणा-या बालमुकुंदाप्रमाणे वाटला मला !
वेलाला ना हात ना पाय ना डोळे तरी त्याची ती जिजीविषा (जगण्याची इच्छा) व विजिगिषा (जिंकण्याची) पाहून भारावल्या सारखे झाले.
बर ; जिंकण्याची इच्छा करत असतांना कोणालाही नमवावे ,हरवावे ही वृत्ती त्या वेलात दिसली नाही. हा वेल बहरला ,उंच झाला ,समोर गेला अशी असूया बाजूच्या मोठ्या जास्वंदीलाही वाटली नाही.
खरोखर झाडे ,पशुपक्षी ,एकूणच निसर्ग यांच्याकडून किती शिकण्यासारखे आहे ना ?
मानवाला उगाच वाटते की तोच चराचरातील सर्वोत्तम घटक आहे !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
Saturday, July 7, 2018
#सहजोक्त.
पुन्हा झाडाख्यान ...
माझ्या कॉलोनीतच माझे घर न् माझं माहेर आहे. त्यामुळे जन्मापासून मी इथेच राहाते. माझ्या लहानपणापासून आठवते की माझ्या माहेरी अंगणात पारिजातक ,लालचाफ़ा ,पांढरा देवचाफा ,आईस्क्रिम फ्लॉवर ,बटमोगरा , लाल एक्झोरा ,पिवळा एक्झोरा ,गुलबाक्षी ,काटेकोरांटी,अबोली ,चमेली ,
मोगरा ,गुलाब ,शेवंती ,मधुमालतीचे मोठे झाड तर मागच्या अंगणात जास्वंद ,अडुळसा ,शेवगा (मुंगणा) ,बेल ,डाळिंब ,स्वस्तिक अशी झाडं होती.
उन्हाळ्यात मी ,मीरा ,अपू मागच्या अंगणात स्वस्तिक व जास्वंदाच्या झाडाखाली खेळायचो.
वेग-स्पर्धा याचा स्पर्शही आमच्या बालपणी आम्हाला नव्हता. श्रावणापासून ते अश्विन महिन्यातील भुलाबाई पर्यंत या फुलझाडांची फुले व पत्र्या म्हणून पाने सतत लागायची. ही झाडं छान परिचयाची झाली आहेत लहानपणापासून !
आज आठवायचे कारण ,बरेच दिवसांनी आईकडे फुरसतीत गेली होती.
दाराजवळ असलेले डेरेदार मधुमालतीचे झाड बहरून आले आहे. दार उघडून आत शिरतांना ते झाड
येणा-या जाणा-यांवर फुलं उधळते. पांढरी नाजुक फुले ,त्याचा मस्त-धुंद सुगंध अन् त्या फुलांवर दिवसभर रुंझी घालणारे भुंगे नि फुलपाखरे !
आज ते झाड तसेच बहरलेले पाहिले अन् बालपण आठवले.
- ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
Thursday, July 5, 2018
#सहजोक्त..
मय्या मोरी....२
बाळकृष्ण ,नटखट कन्हैय्या ,यशोदेचा कान्हा म्हणजे जनमानसावर गारूड करणारं दैवत. कृष्ण देव आहे ,कृष्णकथा धार्मिक वाङ्मय आहे ; इत्यादी सारे मान्य वा अमान्य केले तरी ; त्याचे प्रत्येक वयातील वेगवेगळे वर्तन ,त्याच्या बद्दलच्या कथा मनाला प्रभावित करतातच. कृष्णाचे बाळरूप तर मनमोहक ,आल्हादक वाटते. कृष्णाचे बाळरूप इतके लोकप्रसिद्ध आहे की त्याच्या कथेवर टिव्ही मालिका ,चित्रपट इतकेच नाही तर सोशलमिडिया ,युट्य़ूब आदी सगळी कडे कृष्णाचे आख्यान ,कथा , विविध रूपात दिसत असतात.
कृष्णाच्या त्या बाललीला कितीही वेळा ,कोणत्याही स्वरूपात ऐकल्या वा पाहिल्या तरी आवडतातच .
कृष्णाच्या बाललीलांवर प्रत्येक भाषेत ,विपुल साहित्य निर्माण झाले आहे.
कृष्ण एक सावळा , चंचल , हजरजबाबी व बुद्धिमान बालक आहे. तो तसा वसुदेव-देवकी यांचा मुलगा ;यशोदा-नंद यांनी त्याला वाढवले.
लहानसा कृष्ण, गायी चरायला ,आपल्या सवंगड्यांना घेऊन वनात जात असे. गरीब घरातले न् कृष्णावर अतोनात विश्वास असलेले ते बाळगोपाल ,कृष्णाला तारणहार समजून सगळ्या अडचणी ,दुःख त्याला सांगत. तोही यांच्यासाठी क्षमतेहून जास्त प्रयत्न करी न् त्यांचा विश्वास अबाधित ठेवी.
प्रत्येकालाच हवीहवी अशी अवखळ ,निरागस ,उत्साही बाल्यावस्था कृष्णचरित्रात अनुभवायला मिळते.
काल ऐकलेले कृष्ण भजन ,कृष्णलीलांसाठी तर आहेच पण मानवी भावभावनांचे मनोमय वर्णन यात केले आहे.
मैया मोरी मै नहि माखन खायो
मैया मोरी मै नहि माखन खायो |
भोर भयो गैयन के पाछे, मधुवन मोहे पठायो ।
चार पहर बंसीबट भटक्यो, साँझ परे घर आयो ॥
मैं बालक बहियन को छोटो,छींको किहि विधि पायो ।
ग्वाल-बाल सब बैर परे हैं,बरबस मुख लपटायो ॥
तू जननी मन की अति भोरी, इनके कहि पतिआयो ।
जिय तेरे कछु भेद उपजिहै है, जानि परायो जायो ॥
यह लै अपनी लकुटि कम्बलिया, तुने बहुतहि नाच नचायो ।
'सूरदास' तब हँसी जसोदा, लै उर कंठ लगायो ॥
कृष्ण व बाळगोपाळांच्या खोड्यांनी बेजार गोपिका ,यशोदेला येऊन त्याच्या कागाळ्या सांगतात. वैतागलेली ,चिडलेली यशोदा बाळकृष्णाला रागावते ,शिक्षा करते. या भजनात ती त्याला ,"तू लोणी कां चोरलेस ?" विचारते. खरे तर त्याने चोरी केली आहेच . पण तरी तो म्हणतो ,"मी चोरी केली नाही "!
मग काय ? आपले निर्दोषत्व सिद्ध करायला लहानसा ,गोजिरा ,निष्पाप चेह-याचा बाळकृष्ण एकटाच स्वतःची वकिली करतो आहे.
पहिला तर्क देतो की ,"मला भल्या पहाटेपासून गायी घेऊन तू मधुवनात पाठवते ,पूर्ण चार प्रहरभर वंशीवटाच्या जवळ मी भटकतो.अगदी सायंकाळी घरी परततो. (प्रहर म्हणजे साधारण तीन तास . दिवसरात्र म्हणजे अष्टोप्रहर त्याला अर्धावेळ म्हणजे चारप्रहर )
इथे कृष्ण सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतो आहे की मी बिचारा ,प्रचंड कष्ट करतो ,राबराब राबतो ,मला वेळच कुठे आहे ,भानगडी करायला ? .
पहिला लाडीगोडीचा प्रयत्न यशोदेला तितकासा प्रभावित करीत नाही.
मग दुसरा डाव वकिली डावपेचाप्रमाणे ,अधिक भावनिक. "अग आई ,मी वयाने लहान ,माझे बाहू छोटे-छोटे ,उंच लटकवलेल्या शिंक्यतलं लोणी मी कसं बरं काढू शकणार ? अग ही बालगोपाल मंडळी माझा राग करतात ,वैर धरतात ; बघ ना माझं तोंड त्यांनी उगाच लोण्यानी माखलं ,मला फसवायला. "
प्रत्यक्ष तोंडाला लोणी लागले आहे ,चोरी तर केलीच आहे पण एकदा "नाही केली" म्हटले ना ; मग तेच खरे करून दाखवायचे ! "मी बिचारा साधाभोळा ,छोटासा ,निरागस !बाकीची मित्रमंडळी जळतात बघ ! उगाच फसवतात ग "!
पुन्हा य़शोदेला भावनिक साद . तरी 'बात कुछ बनी नही ।'
मग तिसरी चाल ! आता आईला पटवायचेच !! म्हणतो कसा ,"आई ,तू ना मनाची फारच भोळी आहेस . कोणाच्याही म्हणण्यात लगेच येते" असं बोलूनही आई हवी तशी पटली नाही. मग काय ? सरळ वारच ! "जाऊ दे ,तुझ्या मनात माझ्यासाठी प्रेमच नाही आहे ,तू मला तुझा सख्खा समजत नाहीच ;तसाही मी तुला परकाच आहे ,जा !!!"
इतके बोलून थांबला नाही तर पुढे अजून म्हणतो कसा ? "जा मग ,घे परत ; तू दिलेली काठी नि घोंगडी ! आजवर फार नाचवलस तू तुझ्या तालावर !!"
अन् ते गोड-गोजिरं बाळ फुरंगटून बाजूला उभं राहिलं !!
स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करायला निघालेला कान्हा तिच्या ममतेवरच प्रश्न चिह्न लावतो आहे ,वर बालसुलभ भोळेपणाचा आव !
खरं काय आहे ? हे जाणणारी मातृहृदयी यशोदा हसली न् त्याला आपल्या कुशीत घेऊन गळ्याशी बिलगून घेतले .आपल्या कृतीतून त्याच्या सगळ्या आरोपांचे खंडण केले तिने.
हे भजन कृष्णाच्या बाळलीलेवर आधारित आहे .पण मानवी स्वभावाचे कंगोरे चपखल दर्शवणारे आहे. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सारेच जण कधी ना कधी स्वतःला वाचविण्यासाठी असे बहाणे ,कांगावे ,हतखंडे ,डावपेच वापरतात तेव्हा मनात येते ,"मैय्या मोरी......मै नही माखन खायो !"
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
Wednesday, July 4, 2018
#सहजोक्त.
मय्या मोरी -१
आज सकाळी एफेमबँडवर अनुप जलोटाच्या आवाजातील भजन ऐकायला मिळाले. अनुप जलोटाचे गाण्याच्या मध्ये मध्ये कडव्यांबद्दल
निवेदन . आहहा सकाळ छानच उगवली म्हणा .
गाण्यातील भाव ,सूर-ताल तर उत्तमच आहे. तो तर आवडतोच मला; पण
"शब्द धन आम्हा शब्दची सामर्थ्य ।
शब्दांनीच होई जीवन हे सार्थ "॥
अशी वृत्ती असल्यामुळे ; शिवाय कोणत्याही काव्यातून ध्वनित होणारे अर्थ शोधण्यात मौज वाटते. मग काय ? सकाळी सकाळी आवडतं गाणं न् दिवसभर चिंतायला नवा विषय ! आज "मजा आ गया।"
मैया मोरी मै नहि माखन खायो
मैया मोरी मै नहि माखन खायो |
भोर भयो गैयन के पाछे, मधुवन मोहे पठायो ।
चार पहर बंसीबट भटक्यो, साँझ परे घर आयो ॥
मैं बालक बहियन को छोटो,छींको किहि विधि पायो ।
ग्वाल-बाल सब बैर परे हैं,बरबस मुख लपटायो ॥
तू जननी मन की अति भोरी, इनके कहि पतिआयो ।
जिय तेरे कछु भेद उपजिहै है, जानि परायो जायो ॥
यह लै अपनी लकुटि कम्बलिया, तुने बहुतहि नाच नचायो ।
'सूरदास' तब हँसी जसोदा, लै उर कंठ लगायो ॥
सूरदासाची ब्रजभाषा आहे. मराठीची जशी प्रमाण मराठी न् व-हाडी , खानदेशी ,बंजारा बोली असातात तशी हिंदीसुद्धा आपण ऐकतो ,बोलतो ती प्रमाण हिंदी-खडीबोली तर अवधी ,ब्रज,मैथिली या तिच्या बोली भाषा आहेत. बोली भाषेला एक प्रकारचा ठसका न् गोडवा असतो. या गाण्यातही तो जाणवतो. यातले काही शब्द तर संस्कृतशी साधर्म्य बाळगणारे दिसतात ठळकपणे.
जसे
>पाछे
पश्चात् (संस्कृत ) > पच्छ (अपभ्रंश) >पाछे (ब्रज) पिछे (हिंदी)
किहि >
किं हि (संस्कृत )> किहि (ब्रज)> किस(हिंदी)
पतिआयो>
प्रत्यय= विश्वास (संस्कृत )> पत्यय (अपभ्रंश) पतिआय (ब्रज)
उपजिहै >
उपजायते (संस्कृत ) > उपजिहै (ब्रज) >उपजा है (हिंदी) >उपजला (मराठी )
लकुटि>
लकुटः (संस्कृत )> लकुटि (ब्रज)> लाठी (हिंदी/मराठी)
भाषा-अंतर काळाच्या अोघात होत जाते ; काळाच्या अोघात मधल्या कड्या लुप्त होतात. कालाय तस्मै नमः।
हे भजन आवडायचं अजून एक कारण म्हणजे त्यातील मानवी भावनांचा मनोव्यापार ! त्यावर पुढच्या भागात लिहीन .
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
Subscribe to:
Comments (Atom)
#सहजोक्त
. क्षमा शस्त्रं करे यस्य दुर्जनः किं करिष्यति। अतृणे पतितो वह्निः स्वयमेवोपशाम्यति॥ ज्याच्या हातात क्षमा नावाचे शस्त्र आहे, त्याचे दुर्जन...
-
१૪.०३२०१७ # अभंग... अनेक वर्षांपूर्वी जेव्हा मी क्लासेस घ्यायची ,नोकरी नव्हती.एका विद्यार्थीनीने त्यांच्या घरी जी उपासना चालायची त्यातील...
-
#आई अंबे तू झोपी नको जाऊ ..... कवी कविता करतात , ते अंतःप्रेरणेने. ती अंतःप्रेरणा बहुतेकदा त्यांच्या भावविश्वातील व्यक्ति-वस्तु-प्रसंग वगैर...
-
🙏 चौथी माळ 25/09/2025🙏 पद आली आई भवानी स्वप्नांत ॥ धृ० ॥ श्रीवरदा सुप्रसन्न मूर्ति । जशी विज चमके गगनांत ॥ १ ॥ सरळ भांग, निळ भुजंगवेण...



