Thursday, July 5, 2018

#सहजोक्त..


मय्या मोरी....२
बाळकृष्ण ,नटखट कन्हैय्या ,यशोदेचा कान्हा म्हणजे जनमानसावर गारूड करणारं दैवत. कृष्ण देव आहे ,कृष्णकथा धार्मिक वाङ्मय आहे ; इत्यादी सारे मान्य वा अमान्य  केले तरी ; त्याचे प्रत्येक वयातील वेगवेगळे वर्तन ,त्याच्या बद्दलच्या कथा मनाला प्रभावित करतातच. कृष्णाचे बाळरूप तर मनमोहक ,आल्हादक वाटते. कृष्णाचे बाळरूप इतके लोकप्रसिद्ध आहे की त्याच्या कथेवर टिव्ही मालिका ,चित्रपट इतकेच नाही तर सोशलमिडिया ,युट्य़ूब आदी सगळी कडे कृष्णाचे आख्यान ,कथा , विविध रूपात दिसत असतात.
कृष्णाच्या त्या बाललीला कितीही वेळा ,कोणत्याही स्वरूपात ऐकल्या वा पाहिल्या तरी आवडतातच .
कृष्णाच्या बाललीलांवर प्रत्येक भाषेत ,विपुल साहित्य निर्माण झाले आहे.
कृष्ण एक सावळा , चंचल , हजरजबाबी व बुद्धिमान  बालक आहे. तो तसा वसुदेव-देवकी यांचा मुलगा ;यशोदा-नंद यांनी त्याला वाढवले.
लहानसा कृष्ण, गायी चरायला ,आपल्या सवंगड्यांना घेऊन  वनात जात असे. गरीब घरातले न् कृष्णावर अतोनात विश्वास असलेले ते बाळगोपाल ,कृष्णाला तारणहार समजून  सगळ्या अडचणी ,दुःख त्याला सांगत. तोही यांच्यासाठी  क्षमतेहून जास्त प्रयत्न करी न् त्यांचा विश्वास अबाधित ठेवी.
प्रत्येकालाच हवीहवी अशी अवखळ ,निरागस ,उत्साही बाल्यावस्था कृष्णचरित्रात अनुभवायला मिळते.



काल ऐकलेले कृष्ण भजन ,कृष्णलीलांसाठी तर आहेच पण मानवी भावभावनांचे मनोमय वर्णन यात केले आहे.

मैया मोरी मै नहि माखन खायो
मैया मोरी मै नहि माखन खायो |
भोर भयो गैयन के पाछे, मधुवन  मोहे पठायो ।
चार पहर बंसीबट भटक्यो, साँझ परे घर आयो ॥
मैं बालक बहियन को छोटो,छींको किहि विधि पायो ।
ग्वाल-बाल सब बैर परे हैं,बरबस मुख लपटायो ॥
तू जननी मन  की अति भोरी, इनके कहि पतिआयो ।
जिय तेरे कछु भेद उपजिहै है, जानि परायो जायो ॥
यह लै अपनी लकुटि कम्बलिया, तुने बहुतहि नाच नचायो ।
'सूरदास' तब हँसी जसोदा, लै उर कंठ लगायो ॥

कृष्ण व बाळगोपाळांच्या खोड्यांनी बेजार गोपिका ,यशोदेला येऊन त्याच्या कागाळ्या सांगतात. वैतागलेली ,चिडलेली यशोदा बाळकृष्णाला रागावते ,शिक्षा करते. या भजनात  ती त्याला ,"तू लोणी कां चोरलेस ?" विचारते. खरे तर त्याने चोरी केली आहेच . पण तरी तो म्हणतो ,"मी चोरी केली नाही "!
मग काय ? आपले निर्दोषत्व सिद्ध करायला लहानसा ,गोजिरा ,निष्पाप  चेह-याचा बाळकृष्ण एकटाच स्वतःची वकिली करतो आहे.
पहिला तर्क देतो की ,"मला भल्या पहाटेपासून गायी घेऊन तू मधुवनात पाठवते ,पूर्ण चार प्रहरभर  वंशीवटाच्या जवळ मी भटकतो.अगदी सायंकाळी घरी परततो. (प्रहर म्हणजे साधारण तीन तास . दिवसरात्र म्हणजे अष्टोप्रहर त्याला अर्धावेळ म्हणजे चारप्रहर  )
इथे कृष्ण सहानुभूती  मिळविण्याचा प्रयत्न करतो आहे की मी बिचारा ,प्रचंड कष्ट करतो ,राबराब राबतो ,मला वेळच कुठे आहे ,भानगडी करायला ? .
पहिला लाडीगोडीचा प्रयत्न यशोदेला तितकासा प्रभावित करीत नाही.
मग दुसरा डाव वकिली डावपेचाप्रमाणे ,अधिक भावनिक.  "अग आई ,मी वयाने लहान ,माझे बाहू छोटे-छोटे  ,उंच लटकवलेल्या शिंक्यतलं लोणी मी कसं बरं काढू शकणार  ? अग ही बालगोपाल मंडळी माझा राग करतात ,वैर धरतात ; बघ ना माझं तोंड त्यांनी उगाच लोण्यानी माखलं ,मला फसवायला. "
प्रत्यक्ष तोंडाला लोणी लागले आहे ,चोरी तर केलीच आहे पण एकदा "नाही केली" म्हटले ना ; मग तेच खरे करून दाखवायचे !  "मी बिचारा साधाभोळा ,छोटासा ,निरागस !बाकीची मित्रमंडळी जळतात बघ  ! उगाच फसवतात ग "!
पुन्हा य़शोदेला भावनिक साद . तरी 'बात कुछ बनी नही ।'
मग तिसरी चाल ! आता आईला पटवायचेच !! म्हणतो कसा ,"आई ,तू ना मनाची फारच भोळी आहेस . कोणाच्याही म्हणण्यात लगेच येते" असं बोलूनही आई हवी तशी पटली नाही. मग काय ? सरळ वारच ! "जाऊ दे ,तुझ्या मनात माझ्यासाठी प्रेमच नाही आहे ,तू मला तुझा सख्खा समजत नाहीच ;तसाही मी तुला परकाच आहे ,जा !!!"
इतके बोलून थांबला नाही तर पुढे अजून म्हणतो कसा ? "जा मग ,घे परत ; तू दिलेली काठी नि घोंगडी !  आजवर फार नाचवलस तू तुझ्या तालावर !!"
अन् ते गोड-गोजिरं बाळ फुरंगटून बाजूला उभं राहिलं !!
स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करायला निघालेला कान्हा तिच्या ममतेवरच प्रश्न चिह्न लावतो आहे ,वर बालसुलभ भोळेपणाचा आव !
 खरं काय आहे ? हे जाणणारी  मातृहृदयी यशोदा हसली न् त्याला आपल्या कुशीत घेऊन गळ्याशी बिलगून घेतले .आपल्या कृतीतून त्याच्या सगळ्या आरोपांचे खंडण केले तिने.
 हे भजन कृष्णाच्या बाळलीलेवर आधारित आहे .पण मानवी स्वभावाचे कंगोरे चपखल दर्शवणारे आहे. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सारेच जण कधी ना कधी स्वतःला वाचविण्यासाठी असे बहाणे ,कांगावे ,हतखंडे ,डावपेच वापरतात तेव्हा मनात येते ,"मैय्या मोरी......मै नही माखन खायो !"
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment

#सहजोक्त

. क्षमा शस्त्रं करे यस्य  दुर्जनः किं करिष्यति।  अतृणे पतितो वह्निः  स्वयमेवोपशाम्यति॥ ज्याच्या हातात क्षमा नावाचे शस्त्र आहे, त्याचे दुर्जन...