Tuesday, January 26, 2016

कालाय तस्मै नम:

शिक्षणावर बोलू काही

एक १२ वी पास झालेला मुलगा इंजिनीअरिंग कॉलेजात जातो, फॉर्म भरतो. परतताना तिथल्या सुरक्षा कर्मचार्‍याला विचारतो, ‘भैया कॉलेज कैसा है?’ तो सांगतो ‘अरे एकदम बढिया. मी याच कॉलेजातून पास झालोय्!’ एक बीटेक् झालेला बेरोजगार इंजिनीअर नोकरीसाठी वणवण भटकतो पण नोकरी मिळत नाही. शेवटी पोटाची भूक भागवायला सर्कशीत भरती होतो. तेथे त्याला माकडाची झूल पांघरून काम करावे लागते. एकदा माकडचेष्टा करता करता तो वाघाच्या समोर निपचित पडतो. त्याला साक्षात मृत्यू समोर दिसू लागतो. सर्व प्रेक्षक श्‍वास रोखून बघत असतात. वाघ जवळ येतो..... आणि.... त्याच्या कानात म्हणतो ‘भिऊ नकोस मी एमटेक्‌‌ आहे.’

१९७० चे दशक इंजिनीयर साहेबांचे घर कोठे आहे? गावातले चार जण नेऊन सोडतात. १९८० चे दशक इंजिनीयर साहेबांचे घर कोठे आहे? या इथून गेल्यावर पलीकडच्या गल्लीत तेथे.... १९९० चे दशक इंजिनीयर साहेबांचे घर कोठे आहे? यावर उत्तर कोणत्या इंजिनीयरचं. इथे चार लोक इंजिनीयर आहेत त्यापैकी कोणते? नंतर २००० चे दशक, प्रश्‍न तोच, इंजिनीयर साहेबांचे घर कोठे आहे? अहो, कोणता इंजिनीयर म्हणताय्? इथं खूप जण इंजिनीयर आहेत. तुम्ही नीट पूर्ण नाव व पत्ता सांगा. २०१० चे दशक ‘काय इंजिनीयर म्हणता काय?’ कोणालाही दगड मारा, ज्याला लागेल तो इंजिनीयरच असेल खात्रीने. इंजिनीयर साहेबांचे घर विचारता का? हा हा हा हा ते तिथे पुलाखाली बसले आहेत ते सगळे इंजिनीयरच आहेत. इंजिनीयरला घर असतं का राजा? हे पुलाखाली बसलेले सर्व इंजिनीयरच आहे.

असे अनेक जोक्स सोशल मीडियावर फिरत असतात. सगळे खळखळून हसतात या जोकवर पण सध्याची शिक्षण क्षेत्राची विदारक परिस्थिती यातून अधोरेखित होते आणि भविष्याचा विचार करताना नुसते अंतर्मुखच नव्हे हताशही व्हायला होते.
पूर्वी इंग्रजी साम्राज्याला हवे असलेले कारकून मिळण्यासाठी ‘शिक्षण’ सुरू झाले. आज कथित समाजसुधारक, शिक्षणमहर्षी, थोर विचारवंत, देशभक्त बिझिनेसमन यांच्या सात पिढ्या सुखेनैव जगाव्यात म्हणून संपूर्ण ‘व्यवस्था’ चालवल्या जातेय्.
चालायचंच!!

‘कालाय तस्मै नम:! मेरा भारत महान्’

- डॉ. प्रज्ञा देशपांडे
९३७१५७४३३०

‘तो’ जाणण्याचे शिक्षण

भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने विचारले, तुझा ‘तो’ इथे आहे का? प्रत्येक वस्तूत, खांबात, चराचरात ‘तो’ भरला आहे असे छोट्या प्रल्हादाने सांगितले.
‘ओम् पूर्णमद: पूर्णमिदम् पूर्णात् पूर्ण मुदच्यते

| पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते!’

या उपनिषदातील प्रार्थनेत सुद्धा चराचरात व्यापूनही ‘तो’ पूर्णपणे उरलेला आहे. असा ‘तो’. प्राचीन काळी संपूर्ण शिक्षण ‘तो’ समजण्यासाठीच असे. ‘त्याला’ समजून घेणे, ‘त्याला’ प्राप्त करणे, ‘त्याच्यात’ समरस होणे ‘त्याच्यातच’ विलीन होणे, ‘तो’ म्हणजे ‘मी’. ‘मी’ म्हणजेच ‘तो.’ ‘तो’ जाणून घे असेच शिक्षण मिळायचे. श्‍वेतकेतूला झालेला स्वशिक्षणाचा गर्व पाहून त्याला विचारले, असे काय आहे ज्याला जाणल्याने हे सर्व आपोआप समजते व ज्याच्या अज्ञानामुळे बाकी सर्व ज्ञान शून्यवत् ठरते, या विषयीचे तुझे शिक्षण झालेय् का? त्याने ‘नाही’ उत्तर दिल्यावर पित्याने ‘त्याच्या’ विषयी ज्ञान दिले.

आजही ‘त्याच्या’ साठीच शिक्षण घेतले जाते. सर्व जीवन ‘त्याच्या’तूनच निर्माण होते. ‘त्याच्यासाठीच’ संसार होतो. ‘त्यातच’ जीवनाचा विलय होतो. आजही ‘तोच’ चराचरात व्यापलाय. व्यापून पुन्हा पूर्णपणे ‘तोच’ उरलाय ‘तो’ असेल तरच ‘व्यक्ती’ ठरतो. ‘तो’ नसेल तर सर्व शून्य. आजच्या विद्यार्थिवर्गासमोरही हाच प्रश्‍न मोठा ठरतोय् की ‘असे काय असेल ज्याच्यामुळे इतर सर्व ज्ञान स्वत:हून कळते किंवा ज्याच्या अभावाने असलेले ज्ञान शून्य होते?’

काय हा योगायोग? वैदिक संस्कृतीतही ‘तो’ आणि आजही ‘तोच’ महत्त्वाचा आहे. प्राचीन काळी भारत ‘सोनेकी चिडिया’, ‘सोन्याचा धूर’ निघणारा देश होता. देशविदेशातील विद्वान ‘ज्ञानगुरू’ म्हणून भारताला मानायचे. मग आज भारताचे ‘ते’ दिवस का नाही?

कारण ‘तो’. पण ‘तो’ म्हणजे कोण? वैदिक संस्कृतीत ‘तो’ म्हणजे ब्रह्मम होते. संपूर्ण शिक्षण ब्रह्मपर, आत्मोन्नतिपर होते. ऐहिक व्यवहार सुख हे त्या ज्ञानाचे दुय्यम फळ होते. आजही ‘तो’ आहेच. तो म्हणजेच अर्थ म्हणजेच पैसा; इतकाच काय तो बदल. आजचे शिक्षण केवळ पैसे कमविण्यासाठीच असते. पैसा असेल तर सर्व ‘ज्ञान’ ज्ञान ठरते. पैसे नाही तर खरं ज्ञान असूनही शून्य ठरते. शिक्षण क्षेत्रात झालेल्या या छोट्या बदलामुळे तेव्हाचा भारत आणि आजच्या भारतात एवढा फरक पडलाय्. काय प्रभाव आहे न ‘त्या’चा?

डॉ. प्रज्ञा देशपांडे
९३७१५७४३३०

असून अडचण, थांबून खोळंबा

शिक्षणावर बोलू काही

शिक्षण क्षेत्र म्हणजे देवघरातील समईची ज्योत असे म्हणतात. आज सिंगल / डबल / ट्रिबल बेडरूमचा फ्लॅट असू दे, देवघराची जागा, स्वयंपाक घरातील सिंकच्या वरच्या रॅकमध्ये, फारच झाले तर

एखाद्या कोपर्‍यात, नाहीतर खचक्यात केली जाते. देवाजवळ समई लावूनही मोठा इलेक्ट्रिक दिवा, विद्युत माळा हव्यातच. आजच्या संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे असेच झाले आहे ‘असून अडचण, थांबून खोळंबा.’

पूर्व प्राथमिकपासून तर संशोधनपर शिक्षण क्षेत्रात शिक्षक वर्ग असतो. अनुदानित/विना अनुदानित संस्था असतात. सर्व आहे पण... सरकारी दृष्ट्या शिक्षकांचे पगार व त्यांचे कामकाजाचे तास

व्यस्त प्रमाणात आहे. मग शिक्षण सेवक, कॉण्ट्रॅक्ट पद्धतीचे प्राध्यापक पद इत्यादी शैक्षणिक रोजंदारी याच क्षेत्रात खपते आहे. शिवाय उन्हाळा-दिवाळीच्या सुट्या सवार्र्ंच्याच डोळ्यात सलतात. अनेक कारणांनी ‘शिकविणे’ हे प्राथमिक कर्तव्य फक्त कागदापुरतेच उरते. मग शिक्षकांना शिक्षणेतर इतर कामी लावले जाते. काही शिक्षकही थोड्या मोबदल्यासाठी अशा कामी स्वत:ला गुंतवून घेतात. जनगणना, बीएलओ, निवडणूक शिवाय सरकारी गरजेनुसार इतर कामं. प्राचीन काळी म्हण होती ‘मागता येत नाही भिक, तर मास्तरकी शिक.’ आजही सो कॉल्ड सन्मान सोडला, तर शिक्षकी पेशाची अवस्था तशीच आहे. का? याला कोण जबाबदार?
शिक्षक? व्यवस्था? नेत्यांच्या संस्था? या सर्व प्रश्‍नांकडे नको वळायला. पण... ही सत्य परिस्थिती आहे की शिक्षण क्षेत्राची अवस्था आजकालच्या फ्लॅटमधील देवघरांसारखी झाली आहे. ड्राईंगरूम, बेडरूम, टॉयलेट्स यावर वारेमाप इंटेरियर खर्च होतो. बाल्कनीसुद्धा ‘प्रसन्न’ ठेवतात. डायनिंग हॉल सुद्धा स्पेशियस हवा. मग स्वयंपाकघरातील छोटा कोपरा देवांच्या नशिबी.

खरे तर सर्वच क्षेत्राला ऊर्जा देणारे क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र. प्रश्‍न नुसत्या बाह्य देवघराचा नाही, तर आतील देवाचा पण आहे. गेल्या काही वर्षांत खरोखर सन्माननीय शिक्षकांचे दाखले वानगीदाखल दुर्मिळ झाले आहेत. प्राचीन काळातील गुरू-शिष्य परंपरेलाच अजून पुढे ठेवावे लागते. चाणक्य, द्रोणाचार्य, दादोजी कोंडदेव इत्यादींवर बॅनच आहे. ‘आदर्श’ पुरस्कार प्राप्त शिक्षक तरी आदरणीय ठरतात का? ज्या समाजात घोटाळे सुद्धा ‘आदर्श’ आहेत तेथे कोणता पेशा आदर्श ठरू शकेल का, हा प्रश्‍नच आहे. जोपर्यंत देवाला देवत्व मिळत नाही, घरात देवघराला मध्यवर्ती स्थान मिळत नाही तोपर्यंत घराचे मांगल्य अनुभवता येणार नाही. आजकाल प्लास्टिकचे हार, रेडिमेड धुपबत्ती, रेकॉर्डेड पूजा विधी, मंत्रआरतीमुळे ‘इन्स्टण्ट’ मंगलमय वातावरण तयार होते, पण ते हृदयाच्या मुळापर्यंत भिडत नाही. तद्वत शिक्षक-शिक्षण क्षेत्रासाठी मुळापर्यंत पोहोचणारे उपाय केल्या जाणार नाहीत, तोपर्यंत ‘सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना’ शक्य नाही.

- डॉ. प्रज्ञा देशपांडे
९३७१५७४३३०

शिक्षणाच्या नावाने

आज एकूणच भारतात कृतीपेक्षा उक्तीला जास्त प्रसिद्धी मिळताना दिसतेय्. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. शिक्षणाने काम साध्य व्हावे म्हणून बोलणे, लिहिणे, चर्चा करणे यावर प्रचंड मंथन चालू आहे. अतिआदर्शवादी शिक्षण योजना आखल्या जातायत्. पण कृतीतून फलद्रूप किती झाल्या? याचा हिशोब करायलाही कोणालाच वेळ नाही.


पूर्वी ११ मॅट्रिक होते. आता १० वी मॅट्रिक. आता १० वी नंतर विषय निवडीचे स्वातंत्र्य आहे. पूर्वी ८ वी पासून विषय निवडीचे स्वातंत्र्य होते. पूर्वी १० वी नंतर बीएएमएस हा सात वर्षांचा डिग्री कोर्स, तर ३ वर्षांचा इंजिनीअरिंगचा डिप्लोमा कोर्स होता. १२ वी नंतर पाच वर्षांच्या इंटरर्नशिपसह एमबीबीएस करता येत होते. चार वर्षांच्या इंजिनीयरिंगनंतर एमबीए न करताही चांगल्या नोकर्‍या मिळत व आता १२ वीनंतर एंटरन्स, मग प्रवेश. केवळ एमए करून सिनिअर कॉलेजात प्राध्यापक झालेले आजही समाजात ज्येष्ठ नागरिक आढळतील. आता मात्र एमए, पीएचडी शिवाय नेट, सेट करूनही नोकर्‍यांची वानवा. नुसत्या बीएड. डीएडने नोकरी लागण्याचा जमाना गेला. आता नोकरीसाठी पण पुन्हा परीक्षा.

खरंच आता ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्याय् की काय? पूर्वी साक्षरता एवढी नव्हती म्हणून नोकर्‍या लागायच्या. हा एक लाडका समज. आता मात्र नोकर्‍या कमी झाल्याय् का? पूर्वी एवढी बेकारी नव्हती. आताच एवढे बेकारीचे पीक कसे काय आले?

आज जिकडे पहावे तिकडे भ्रष्टाचार बोकाळलाय्. भ्रष्टाचार करणारे कोणी अशिक्षित नाही तर उलट शिक्षित, उच्चशिक्षित आहेत. मग खरंच ‘शिक्षण म्हणजे मानवी उन्नयनाचे साधन.’ असे म्हणता येईल का?
अशा पुस्तकी व्याख्या शब्दांचे बुडबुडेच नव्हे का? आज सर्व क्षेत्रात ‘सॅचुरेशन’, सर्व क्षेत्रात आंतरिक असंतोष आढळून येतो. प्रत्येक ज्ञानक्षेत्र दुसर्‍याच्या ज्ञानक्षेत्रात घुसखोरी करतायत्. इंजिनीअर मॅनेजमेंट कोर्स करतो, बँकेत लागतो. डॉक्टर मॅनेजमेंट कोर्स करतो हॉस्पिटल चालवायचा ठेका घेतो.

डी फॉर्म झालेला उमेदवार लायसन्स भाड्याने देऊन अजून एखाद्या डिप्लोमाच्या आधारे दुसरीकडे नोकरी करतो. शिक्षक नोकरीसह ट्युशन घेतात. नाही तर विमा पॉलिसीज् काढतात. गुंडा ठेकेदार होतो. ठेकेदार बिल्डर होतो, बिल्डर लिडर होतात, लिडर हिरो होतात, हिरो समाजसेवक होतात, समाजसेवक बिझनेसमॅन होतात. एकूणच काय तर कुणीही, केव्हाही, काहीही होतो. बक्कळ पैसा कमावतो आणि सफल ठरतो. जणू त्याच्याचसाठी शिक्षण घेतात सर्वजण, अशी स्थिती आहे.
एकूणच सद्य:परिस्थिती पाहता शिक्षणाच्या व्याख्या, थोर शिक्षणशास्त्रज्ञांचे शैक्षणिक विचार हे फक्त परीक्षेत मार्क मिळण्यासाठी पाठ करावे लागतात किंवा भाषण लेखनात उल्लेख करायला कामी येतात, असे सामान्यांना वाटले तर गैर काय?

- डॉ. प्रज्ञा देशपांडे
९३७१५७४३३०

कितना बदल गया इन्सान

तारीख: 07 Oct 2015 20:35:11
शिक्षणावर बोलू काही
पूर्वी ‘देव अनादी-अनंत अविनाशी’ आहे असे म्हणायचे. आज देवाचे माहीत नाही पण कचरा, प्रदूषण, भ्रष्टाचार व ट्युशन्स मात्र नक्कीच खात्रीपूर्वक अनादी (म्हणजे यांचा उगम कधी झाला ते माहीत नाही), अनंत (म्हणते यांचा अंत कधी होईल ते सांगता येत नाही), अविनाशी (म्हणजे याचा विनाश अशक्यच आहे) आहेत. कचरा, प्रदूषण, भ्रष्टाचार हा आपल्या सदराचा विषय नाही. मात्र शिक्षणाला पूरक म्हणून सुरू झालेली ‘ट्युशन’ संपूर्ण शिक्षण क्षेत्राला व्यापून पुन्हा शिल्लक उरलीय्, यातच तिची महती सामावलीय. पूर्वी फक्त ‘ढ’ मुलांना ट्युशन होती. पूर्वी शाळेपूर्वी वा शाळेनंतर किंवा सुट्ट्यांमध्ये ट्युशन असायच्या. आता ट्युशनमधून वेळ मिळाला तर शाळा-कॉलेज असू शकते. शाळा-कॉलेजमध्ये सत्रानुसार फी भरावी लागते. त्यातही वेगवेगळ्या आरक्षण, सवलतीनुसार फीमध्ये कन्सेशन मिळते. मात्र ट्युशनमध्ये शिकवणे सुरू होण्याआधी अर्धी रक्कम व शिकवणे सुरू झाल्याबरोबर उरलेली रक्कम भरावी लागते. कोणाला कमी कोणाला जास्त असा भेदभाव येथे नाही. कॉलेज-शाळेच्या बेंचवर धूळ असू शकते पण ट्युशनची बेंचेस गुळगुळीत. शाळा-कॉलेजमध्ये लाईट, पंखे सुद्धा ‘लक्झुरी’ समजावे तर ट्युशनमध्ये एसी, सेंट्रल कुलिंग असणारच. शाळेत गुरुजी घसा खोेकलून फळा-खडूच्या धुळीत शिकवितात येथे मात्र ग्लासबोर्ड, ई-लर्निंग इत्यादींची रेलचेल.

शाळेत, कॉलेजमध्ये उपस्थितीला ‘ढेंगा’ दाखविणारे सर्व विद्यार्थी ट्युशनमध्ये नियमित, दररोज बायोमेट्रिक करवितात. पूर्वी शाळा-कॉलेजमध्ये ऍडमिशन झाल्यावर ट्युशनमध्ये प्रवेश घेतला जाई. आता ट्युशनवाल्यांनी सांगितलेल्या शाळा-कॉलेजात प्रवेश घेतला जातो. शाळा-कॉलेजात पन्नासच्यावर विद्यार्थी संख्या असली तर ‘शिक्षकांचे पुरेसे लक्ष नसते’ अशी तक्रार करणारे पालक दीडशे ते दोनशेच्या ट्युशनला पाल्याला सहज पाठवतात. मुलांच्या वह्या नियमित तपासत नाहीत, अशी शाळेच्या पालकसभेत ओरड करणारे पालक वह्यांवर चेक ऍन्ड सिनचे ठप्पे मारणार्‍या वा सरळ छापील नोट्स देणार्‍या ट्युुशनला ‘ग्रेट’ समजतात. शाळेत कधी कोणत्या कार्यक्रमात ‘अध्यक्षीय भाषण’ लांबले तर उशीर झाला तर ‘अभ्यासाचा बहुमूल्य वेळ फालतू वाया गेला’ अशी ओरड करणारे विद्यार्थी ट्युशन टिचरचे ‘बर्थ डे’ सेलिब्रेशन प्लानिंग आठवड्यापासून ट्युशननंतर तासन्‌तास थांबून करतात. स्वत: पेपर तपासून विद्यार्थ्यांच्या चुका भर वर्गात समजावून दिल्या तर शाळेच्या शिक्षकाने ‘प्रेशर’ दिल्यामुळे विद्यार्थी ‘बरेवाईट’ करण्याची भीती वाटते. पण ट्युशनमध्ये तपासनिकांकडून तपासलेले पेपर सर्वांसमोर दाखवितात, भर वर्गात नापास विद्यार्थ्यांची नाव घेतात तेव्हा हे ‘प्रेशर’ कुठे जाते कळत नाही? परीक्षा शुल्क १०० रुपयांवरून १५० रुपये केले तरी ओरडणारे पालक दरवर्षी हजारोंनी वाढणार्‍या ट्युशन फीबद्दल मूग गिळून गप्प का? पूर्वी ट्युशनचा पत्ता विचारला तर ‘अमुक एका बंगल्याच्या बाजूला’ असा असे. आता मात्र लोक पत्ता सांगताना ‘या प्रख्यात ट्युशन क्लासच्या बाजूला’ असे सांगतात. खरंच! कितना बदल गया इन्सान!!!

- डॉ. प्रज्ञा देशपांडे
९३७१५७४३३०

Sunday, December 6, 2015

स्त्री - त्रिकालभिनंदनार्हा !

‘‘स्त्रियश्चरित्रं पुरुषस्य भाग्यम्’’ 

हे वाक्य ऐकल्याबरोरबर मनात अर्थ केला जातो की, -स्त्रीचे सत्शीलत्व पुरुषाकरिता भाग्यच होय’. म्हणजेच सुशील स्त्री पुरुषाला दैवानेच लाभते! परंतु माझ्यामते या उक्तीचा अर्थ असा नाहीच. चरित्र म्हणजे वर्तन. स्त्रीचे चरित्र म्हणजे वर्तन अर्थात अनुकूल वर्तन पुरुषाकरिता भाग्यप्रद होय असेच या उक्तीतून अभिप्रेत आहे असे मला वाटते.स्त्रीचे वर्तन बरेचदा अनाकलनीय असते. दुसर्यांसाठी अनाकलनीय परंतु तिच्यासाठी ते मनःपूत म्हणजे तिच्या मनाला योग्य वाटेल असेच असते. मनःपूत म्हणजे स्वैर नाही उलट मुक्त, स्वतंत्र असे वर्तन होय. कसे? तर गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा इत्यादी वैदिक स्त्रिया ज्याप्रमाणे मनःपूत वागत असत त्याप्रमाणे.

लोपामुद्रा अगस्तीऋषींची पत्नी होती. विवाहसमयी दोघांमध्येही अलिखित संकेत ठरला होता की‘दोघांनीही एकमेकांचा मान सांभाळायचा’ दोघेही ब्रह्मवेत्ते होते. एकमेकांसह त्यांचा संसार उत्तम चालू होता. एकदा अगस्तिऋषी यात्रेला जाण्यास निघाले. लोपामुद्रेने विचारले कुठे निघालात? सर्व शिष्यांसमोर अगस्तींनी जे उत्तर दिले त्यामुळे तिच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली. लोपामुद्रा काहीच बोलली नाही. ऋषी निघून गेले. इकडे मानभंग झालेली  लोपामुद्रा कावेरीनदी रुपाने आश्रमाजवळून वाहू लागली. अगस्ती परतल्यावर त्यांना त्यांच्या चूकीच्या वागणूकीचा पश्चात्ताप झाला. पण आता वेळ निघून गेली होती. अशीच एक कथा मराठी वारकरी संप्रदायातही आहे. राका-बाका हे दोघे पतीपत्नी होते. दोघेही पांडुरंगाचे भक्त. दिवसरात्र विठ्ठलभक्तीत मग्न राहात होते. एकदा लाकडं आणण्यासाठी दोघेही जंगलात गेले. राकाला सोन्याचा दागिना दिसला. त्याला वाटले की  बाका स्त्री आहे, तिला दागिन्याचा मोह होईल. मग ती ईश्वरभक्तीपासून दूर होइल. असा विचार करुन त्याने दागिन्यावर माती  लोटली. दुरुन हे सर्व ती बघत होती. बाका विचारते, ‘‘हे काय चाललं आहे?’ राका स्वतःच्या मनातले विचार सांगतो. त्यावर बाका म्हणजे, ‘आहा रे, तुमची विठ्ठलभक्ती, माती आणि सोनं यात भेद करता होय?’’स्त्रिया अशा मनःपूत स्वतंत्र वचार करतात व स्वतःच्या विचारांनीच वागतात. म्हणून पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांना अनुकूल वर्तन करणारी स्त्री लाभणे त्यांच्या दृष्टीने भाग्यकारकच ठरते ना. म्हणून पुरुषमानसिकतेनुसार ‘स्त्रियश्चरित्रम् पुरुषस्य भाग्यम्’ ठरते.


केवळ भारतीय समाजातच नाही तर सर्व जगात स्त्रीला अबला म्हटल्या जाते. कां? खरे तर मानसिक दृष्टया महिला पुरुषांपेक्षा जास्त सुदृढ असतात. प्रेमभंगामुळे अनेक पुरुष ‘देवदास’ होतात, महिला मात्र खचत नाहीत. एखादी स्त्री दुर्दैवाने विधवा झाली तर ती कशीबशी आपल्या लेकरांना वाढवते. घरी-दारी जे जमेल, झेपेल ते काम करुन मुलांना सन्मानाने वाढवते. तिचं जीवन कितीही  दुःखमय असले तरी ती व्यसनात गुरफटत नाही. या उलट एखादा पुरुष विधूर झाल्याबरोबर दुसरं लग्न करुन मोकळा होतो. अथवा व्यसनात बुडून स्वतःची कर्तव्य, दुःख विसरण्याचा प्रयत्न करतो. शारीरिक दृष्ट्या सुध्दा स्त्री हृदय पुरुषहृदयापेक्षा बळकट असते. म्हणूनच ती प्रसववेदना सहन करु शकते. तसेच हृदयविकार सुध्दा स्त्रियांना कमी होतो. स्त्रीचा मेंदू एकावेळी चार कार्य करु शकतो. हेच पुरुषाचा मेंदू दोनच कार्य करु शकतो. स्त्री स्वतःच्या वजनापेक्षाही अधिक वनज उचलू शकते. पुरुष हे करु शकत नाही. स्त्री गर्भ विपरीत परिस्थितीतही वाढतो, पुरुषगर्भ गळून पडण्याची शक्यता जास्त असते. स्त्रियांमध्ये समायोजन शक्ती जास्त असते.अशी मनस्विनी स्त्री कठीण पण कोमल असते. कशी? तर बीजांकूराप्रमाणे. बीजांकूर कसा नाजूक, कोमल असतो. पण तरी कठीण भूकवच भेदून जमिनीबाहेर येतो. तशीच स्त्री शरीराने कोमल असून मनाने कणखर होऊन कठीण परिस्थितीवर मात करीत सन्मानाने जगते.


परचक्राच्या सतत आक्रमणामुळे मूळात सहिष्णु असलेली भारतीय संस्कृती बदलली. वैदिक काळात दिसून येणारे स्त्रीस्वातंत्र्य पुढे लुप्त होत गेले. स्त्री म्हणजे बंदिनी, रुढी-परंपरा,संस्कृती संस्कार इत्यादींच्या बन्धनात जखडलेली स्त्री,  म्हणजे बंदिनीच. पण बरेचदा हे बन्धन कुटुंबाच्या प्रेमामुळे, कर्तव्यभावनेने तिनेच स्वेच्छेने स्वीकारलेले असते. प्रत्येक स्त्री स्वतःची लक्ष्मणरेखा स्वतः निश्चित करते. त्यानंतर ती स्वतःच कधीही लक्ष्मणरेखा ओलांडत नाही. म्हणूनच आजही समाजात पुरुषांपेक्षा स्त्रियावंर अधिक विश्वास ठेवला जातो.स्त्रियांमध्ये अग्नीप्रमाणे स्वहा आणि स्वधा अशा दोन शक्ती असतात. स्वहा म्हणजे स्वतःहून आहूती होण्याची क्षमता तर स्वधा म्हणजे स्वतःला धारण करण्याची क्षमता. कोणतीही स्त्री स्वतःच्या कुटुंबासाठी स्वत्व अर्पण करण्यासही सिध्द होते. उलट परिस्थितीत ती कशाही प्रकारे स्वत्व राखते. पुराण काळापासून आजवरच्या अनेक स्त्रियांच्या उदाहरणातून हे सिध्दच झाले आहे. दुर्गा, चण्डिका, अहल्या, मन्दोदरी, सीता, कुन्ती, गांधारी, द्रौपदी, जिजाबाई, झाशीची राणी, दुर्गावती इत्यादी.


आजचा काळ विज्ञान तन्त्रज्ञानाचा काळ आहे. या तंत्रयुगातही स्त्रीमन,स्त्रीवर्तन,स्त्रीभावना मानसोपचार तज्ज्ञांच्याही संशोधनाचा विषय ठरतो. अजून तरी स्त्रीमन समजून घेणारे यंत्र विकसित झालेले नाही.सांख्य दर्शनानुसार ‘प्रकृतीच माया निर्माण करते. मायेत अडकलेला पुरुष संसार करतो. तो ज्ञानानेच मायाबंधनातून मुक्त होऊ शकतो. म्हणजेच पुरुषाला मुक्त होण्यासाठी सुध्दा प्रकृतीची आवश्यकता असतेच प्रकृतीशिवाय पुरुष सचेतन असूनही निष्क्रिय असतो.


मूळात जड असलेली (निर्जीव असलेली) प्रकृती, सचेतन परंतु निष्क्रिय पुरुषाला सक्रिय करुनच ज्ञानमार्गापर्यंत नेते. मगच तो पुरुष मोक्षमार्गावर जाऊ शकतो.’ मानवी जीवनातही स्त्रीच पुरुषाला प्रेरणा देते. कार्य करवून घेते. प्रोत्साहन देते. स्त्रीसाठीच, स्त्रियांमुळेच स्त्रियांच्या सहकार्यानेच पुरुष कार्यरत होतात. रामायण, महाभारत स्त्रिसाठीच घडले नां.स्त्रीमहिमा जाणूनच शब्दप्रभुंनी शक्ती, युक्ती, दया, क्षमा, शांती, लक्ष्मी, विद्या, भावना, बुद्धी, सत्तासुंदरी इत्यादी अनेक सुंदर शब्द स्त्रीलिंगामध्येच योजले असतील काय?स्वतःच्या उदरातून पुरुषाला जन्म देणारी, त्याचे लालन पालन करणारी, त्याचा अहंकार, अस्मिता जोपासणारी, स्वतःवर रुढीबंधने लादून घेणारी, पुरुषाला प्राधान्य देऊन स्वतःकडे दुय्यमत्व सहज घेणारी, इतकेही करुन आपण काही विशेष करतोय असं न दाखविणारी स्त्री खरोखरच त्रिकालभिनंदनीय नाही काय?

सौ. प्रज्ञा शरद देशपांडे
हडस कनिष्ठ महाविद्यालय
नागपूर.

Tuesday, November 17, 2015

माणसाला जीवन जगण्यासाठी काय लागते ?

माणसाला जीवन जगण्यासाठी काय लागते ? निस्संशयपणे----अपूर्णता , अज्ञान, गैरसमज, स्वप्न------हेच खरे आहे.  स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा , गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा.-----कित्तेकदा हे गाणे ऐकले अन् अचानक अर्थ गवसला , की मानवी सुखाची परिसीमा अपूर्णता, अज्ञान, गैरसमज, स्वप्न यातच सामावलेली आहे.

                                                           अपूर्णता हीच पूर्णता

मानवी जीवनात एवढेच कशाला संपूर्ण विश्वात अपूर्णते एवढे पूर्ण काहीही नाही. निसर्गाने सृष्टीतील कोणताही जीव परिपूर्ण बनविलेला नाही . जीवसृष्टी स्त्रीलिंगी, पुल्लिंगी यात विभागलीय. जेथे उभयलिंगी वा नपुंसकलिंगी जीव आहे तेथे अपरिहार्यपणे पूर्णत्व आहे असे म्हणू शकतो.पण उत्क्रांत होताना उभयलिंगी जीव अल्पतर होत गेले . म्हणजे पूर्णत्वापासून अपूर्णत्वाकडेच वाटचाल दिसतेय.          

असे म्हणतात कि मानवीमेंदू 1/6 टक्केच कार्यरत असतो. म्हणजे अपूर्णमेंदुच मानवीजीवन चालवतो.आजवर कोणत्याही मानवाने 100 टक्के मेंदूचा वापर करून जीवन व्यतीत केलेय असे सिद्ध झाले नाही. जगद्विख्यात नोबेल पारितोषिकविजेते भौतिकशास्त्रज्ञ आईनस्टाईन म्हणतात,माझ्या कार्यक्षम मेंदूचा फक्त 25 टक्के उपयोग मला करता आला. म्हणजे अपूर्णता जीवनसाफल्याची पूर्णता होय. अपूर्णतेमुळेच एक जीव दुस-या जीवाचा आसरा, सहारा घेत असतो.एक प्रजाती   दुस-या प्रजातीला पूरक ठरते म्हणजे कोणताच जीव परिपूर्ण नाही हेच खरे.         दुनियेत आढळणारी विविधता, जैवविविधता ही अपूर्णतांची विविधरूपे वा आविष्कार नव्हेत का? गुलाबाला सुगंध,रंग दिला पण काटेही दिले. मोग-याला रंग नाही, विड्याच्या पानाच्या वेलीला(नागवेलीला) फुले नाहीत , चंदनाला फळे नाहीत, हत्तीला चपळता नाही , सशाला शिंग नाही, हरिणाला भारदस्तपणा नाही, मोराला आवाज नाही, कोकिऴेला रूप नाही; खरंच अपूर्णतेमुऴे सृष्टी किती परिपूर्ण, उपयुक्त, मोहक, रमणीय झालीय ना। पूर्णता असती तर दुस-या कशाचीही गरजच नसती ना।    

फूल उमलते, भुंगे येतात, परागकण त्यांच्या पायाला लागतात. भुंगे इकडून तिकडे मधासाठी फिरतात,bत्यांच्या फिरण्याने परागकण या फुलांवरून त्या फुलांवर जातात. फुलांची फळे होतात. फळे पिकतात. पक्षी येतात. ते खातात. बिया जमिनीवर पडतात . ऊन्ह-पावसाने त्या रुजतात. त्यातल्या काही जगतात, त्यांची झाडे होतात. पुन्हा फूले, पुन्हा फळे-------अशाप्रकारे या निसर्गचक्रामध्ये नुसते झाड स्वतःला पुन्हा पुन्हा रुजवू शकत नाही, त्यासाठी भुंगा, पक्षी, प्राणी, सूर्यप्रकाश, जमीन,  पाणी, वारा हवेतच. कोणीही स्वयंपूर्ण नाही. म्हणूनच तर विविधतेने नटलेल्या या सृष्टीत रमणीयता आहे.
मानवी जीवन तर अतिशय अपूर्ण असल्यामुऴेच कुटुंब, समाज, राष्ट्र इत्यादिंच्या मदतीने त्याचे जीवन पूर्ण होते.
अपूर्णता हीच खरी पूर्णता होय , नाही का?
           
                                                  अज्ञान हेच मोठे ज्ञान आहे ।

असे म्हणतात कि, अज्ञानात सुख आहे. तिस-या टप्प्यात पोहचलेल्या दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तीला त्याच्या आजाराचे खरे ज्ञान झाले असेल तर उमेद खचून तो वेळे आधीच मरण पावतो. हेच त्याला आजाराबद्दल पहिलेपासून अज्ञानी ठेवले तर जगण्याचे दिवस वाढतात, त्रास जरी झाला तरी उमेद संपत नाही. रुग्णाचे सोडा, परीक्षार्थी बद्दल बघू या. परीक्षाजवळ आल्यावर ,"माझा अभ्यास पूर्ण झालाय" असा विश्वास ज्याच्यात असेल तो सुखाने परीक्षेला सामोरा जातो, मग भलेही त्याचा अभ्यास अपूर्ण असेल. म्हणजे अज्ञान असूनही त्याला समाधान असते म्हणून तो संकटांना सामोरा जातो. लहान, निरागस बालक सहजपणे वडिलांच्या बॉसशी बिनधास्तपणे बोलतो. अज्ञानामुळेच ना.! आजवरचा इतिहास सांगतो कि, किशोरवयीन बालके मोठमोठे पराक्रम करू शकले परिणामाबद्दल अज्ञान , दुसरे काय? स्वतःची कुवत, शक्ती, ताकद, बल पूर्ण ओऴखलेली व्यक्ती अभेद्य, अदम्य, अशक्यप्राय पराक्रम करूच शकत नाही. असले पराक्रम करण्यासाठी "अज्ञानी जिगरच "  कामी येतो. "मला हे सर्व येते" या (गैर का असेना) समजातूनच कोणतीही व्यक्ती कार्य करू शकते. या जगात ज्ञानापेक्षा अज्ञानामुऴे जास्त शोध लागले आहेत. भारतासाठी जगभ्रमण करायला निघालेली वास्कोदगामाची स्वारी दक्षिण अफ्रिकेच्या टोकाला पोहचली, मग कळले हा भारत नाही तर त्याने त्या भूभागाला  "केप ऑफ गुड होप"  म्हटले. भारत शोधायला निघालेला अमेरिगो अज्ञानामुळेच अमेरिकेत पोहोचला, अज्ञानामुळे नवी भूमी मिळाली. स्वतःच्या भूमीत पराभूत झालेला सिकंदर केवळ अनभिज्ञेमुळे स्वतःला जगज्जेता म्हणवून घेऊ शकला ना!

आता हेच बघा ना, डिग्री रूपी ज्ञान घेतले तरी जगरूपी पुस्तक ज्ञात होईल असे नाही. डिग्री मिळाल्यामुळे मी 'ज्ञानी'झालोय ही भावना होणे हेही अज्ञानाचे प्रगटीकरणच नव्हे का?  "पोथी पढे पढे पंडित हूआ न कोई" असे कबीर उगीच म्हणाले असतील काय?  उलट डिग्री घेणे म्हणजे विशिष्ट विषयांचे मर्यादित ज्ञान कमावणे अन् अमर्याद अज्ञानात खुश होणे असा अर्थ होत नाही काय? उलटपक्षी कोणतीही डिग्री न घेणे म्हणजेही विशिष्ट ज्ञानापासून वंचित राहाणे, म्हणजे अंशतः अज्ञानीच राहाणे , होय ना!  एकूण काय, शिका किंवा नका शिकू 'अज्ञान'चिरंतन आहे.
उद्या काय होणार याचे ज्ञान नाही म्हणून आज आपण सुखाने स्वप्न बघू शकतो ना ! आशा, अपेक्षा, स्वप्न जागविणारे अज्ञान हेच मोठे ज्ञान नव्हे का?"

                                           "गैरसमज" समाजधारणेचा पाया!

समज ही ज्ञानातून उपजते तर गैरसमज हा अज्ञानातून! जेवढा मोठा गैरसमज तेवढा सुखी समाज. अख्ख्या गावात माखनचोर, नटखट म्हणून गाजलेला कान्हा यशोदेसाठी साधाभोळाच होता, का?  यशोदेचा गैरसमज दुसरे काय!  आजही मातृत्वाच्या चष्म्यातून बघताना होणा-या (गैर)समजामुळे अख्ख्या आऴीत गाजलेलं बाळं, त्याच्या आईसाठी गुणी श्रावणबाळच असतो. गैरसमजावर आधारित समाजधारणेमुळेच  "आपला तो बाब्या
 दुस-याचा तो कारटा"  ही म्हण रूढ झाली ना! माझ्या सासुपेक्षा तिची सासू प्रेमळ आहे, किंवा उसकी साडी मेरी साडीसे सफेद कैसी,  किंवा other's garden are always green, किंवा (स्वतःची) पत्नी ही क्षणाची एम्टिव्ही अन् आयुष्यभराची डिडिमेट्रो असते किंवा गर्लफ्रेंड वा लिव्हीनपार्टनर बायकोपेक्षा समजदार असते, किंवा आमच्या ह्यांच्यापेक्षा तिचा नवरा जास्त केअरींग आहेत किंवा मराठी शाळांपेक्षा इंग्रजी शाळा गुणवत्तापूर्ण असतात किंवा सरकारी इस्पितळांपेक्षा खाजगी इस्पितळे चांगली सेवा देतात किंवा देशी वस्तुंपेक्षा विलायती वस्तू दर्जेदार असतात किंवा या राजकीयपक्षापेक्षा तो राजकीयपक्ष चांगला आहे, हे सर्व गैरसमज भारतीयांना दररोज जगण्याची नवी उमेद देतात हे सत्य नव्हे का? कुठल्याही क्षेत्रात जा वास्तवापेक्षा प्रतिमा मोठी ठरत नाही का? प्रतिमेच्या प्रेमात पडून (म्हणजे गैरसमजामुळेच)लोकं कोणा कोणाला डोक्यावर घेतात ना! म्हणजे जगण्यासाठी, समाजधारणेसाठी गैरसमज गरजेचे असतात. "तो माझ्यापेक्षा जास्त नशीबवान आहे, त्याला काहीही न कष्टता आयते मिळाते" अशा गैरसमजातून लोकं स्पर्धा, ईर्षा वगैरे करतात, समाज गतिमान होतो. "मी म्हणून सहन करते, दुसरी कोणी असती तर---- ,  मी फार सरळ आहे, माझ्यासारख्या सरळ लोकांची दुनियेला कदरच नाही, माझ्यावाचून पान नाही हालत" इ. इ गैरसमजुतींमुळे लोक संसार करतात, पुढे पुढे करतात, प्रगती करतात. एखादा रंग, खडा, वस्तु, क्रमांक वगैरे माझ्यासाठी "लकी" आहे. अमुक एका महाराजांचे म्हणणे अगदी खरे होते. अमुक ठिकाणचा ताबीज "पॉवरफूल" आहे, अमक्या-तमक्याच्या प्रेअरने रोग दूर होतो अशा अनेक गैरसमजुतींमुळे समाजात हवा, फॅशन, फॅड पसरतात. त्यातून काहींना पोट भरायचा धंदा मिळतो तर काहींना प्रतिष्ठा मिळते तर काहींना मानसिक बळ. मिळो बापडे,जो जे वांछील तो ते लाहो-------. अशाप्रकारे गैरसमज हा समाजजीवनाचा मोठ्ठा आधारस्तंभ आहे हे सिद्धच होते ना!

                                           
  स्वप्न-एक रम्य वास्तव-----

स्वप्न म्हणजे सत्यात न आलेले वास्तवच होय ! शेखचिल्ली, मुंगेरीलाल कां आवडतात? त्यांच्या स्वप्नाळूपणामुळेच. स्वप्न नसते तर क्षणोक्षणी आत्महत्याच झाल्या असत्या. डोळ्यात स्वप्न, मनात इच्छा, भावनांवर ताबा, हातात ताकद, डोक्यात ध्येय,  कृतीत सातत्य असेल तर "करलो दुनिया मुठ्ठी मे" सहज होते. डोके, शरीर जे करु शकत नाहीत , ते केवळ स्वप्नांमुळे पूर्ण होऊ शकते. ज्या डोळ्यात स्वप्न नसतात ते डोळे मृतप्रायच ठरतात. झोपेत, जागेपणी केव्हाही स्वप्न पाहाणे उत्तमच. स्वप्न पहाण्यासाठी झोपलेच पाहिजे, असेही नाही. उलट झोप उडवते तेच खरे स्वप्न. स्वप्न पहाणे व ते प्रत्यक्षात साकारणे यात महद् अंतर आहे. आपापल्या ठिकाणी दोन्हीही चांगलेच. स्वप्न पाहिली नाहीत तर साकारणार कशी? अन् साकारली तर ती स्वप्न कशी?  ते तर वास्तव होईल. वास्तवापेक्षा स्वप्न जास्त रिझवतात.स्वप्न साकार करण्यासाठी केलेला प्रवास अधिक उत्कण्ठावर्धक, सजग, जिवंत, रोमांचक असतो तेवढे वास्तव मनाला भिडत नाही.

आधुनिक शिक्षण पद्धतीत खरे तर असे धोरण असावे की, विद्यार्थ्याला काही नाही शिकवले तरी चालेल, जो तो आपापल्या अज्ञान, गैरसमज, अपूर्णता यातून शिकूनच घेईल पण प्रत्येक बालकाला भरपूर स्वप्न पहायला शिकवा. मोठमोठी स्वप्न त्यांच्या डोळ्यात, डोक्यात जागवा. आजूबाजूला अखंड, निरंतर, अविरत स्वप्नरंजन होऊ द्या. विद्यार्थीच कशाला, संपूर्ण देश स्वप्नमय करा. खरेच, स्वप्ना एवढे रम्य, मनोहर या विश्वात काहीही नाही. खरय ना?

एकूणच काय? मानवाला जगण्यासाठी अन्नवस्त्रनिवा-या पेक्षाही अपूर्णता,अज्ञान, गैरसमज, स्वप्न हेच जास्त उपयुक्त असतात.या चौघांचे कवच लाभलेला माणूस जास्त सकारात्मक,जास्त सुखी असतो.कमतरता,न्यून,उणीव याची जाणीव अजून काही नवे शोधायला प्रेरक ठरते.

डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे, हनुमाननगर, नागपूर

शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...