Friday, March 16, 2018

#शब्दचिंतन

#शब्दचिंतन.

" तारतम्य" हा शब्द कानी आला नि विचारचक्र सुरु झाले. बोलताना सहज उपयोगात आणतात हा शब्द. तारतम्य म्हणजे पोच ,विवेक ,वागण्यातील समज ,प्रगल्भता  अशा अनेक अर्थच्छटा त्यातून अपेक्षिल्या जातात.
मुळात हा तद्धित प्रकारातील भाववाचक शब्द आहे. 'तर-तम' या दोन प्रत्यय़ांपासून तो तयार झालाय.  तुलना करताना जो प्रत्यय योजतातात तो "तर" प्रत्यय.
उदाहरणार्थ उत्तर ,अधिकतर ,उच्चतर,लघुतर ,महत्तर ,प्रियतर हे मुळातील तत्सम शब्द तर पुढे मराठीकरणात तयार झालेले बद्तर ,बेहत्तर इत्यादी.
सर्वोच्चता दाखवणारा "तम" हा प्रत्यय आहे. उदाहरणार्थ उत्तम,सर्वोत्तम ,महत्तम ,लघुत्तम , प्रियतम,दीर्घतम इत्यादी .
याच दोन प्रत्ययांचे समानार्थी दोन प्रत्यय आहेत ;
तर =इयस्   नि तम=इष्ठ
दोन्हीची उदाहरणार्थ श्रेष्ठ ,ज्येष्ठ ,कनिष्ठ ,गरिष्ठ ,
श्रेयस् ,प्रेयस् कनियस्
मराठीकरण झालेले स्वादिष्ट ,चविष्ट ,गप्पिष्ट ,कोपिष्ट  इथे मुळातील प्रत्ययातही मराठीकरण केलेय.
तर हे दोन प्रत्यय "तर-तम" इंग्रजीतील " ER-EST" ( comparative & superlative degree)  आहेत.
"याहून अधिक चांगले नि सर्वात चांगले" हे कळून वागण्याची पात्रता म्हणजे तारतम्य .कोणत्याही परिस्थितींत स्वार्थापुरता नाही तर सर्वबाजूने अधिक चांगले काय? सर्वोत्तम काय?  हे कळण्याची लायकी विकसित करणे म्हणजेच तारतम्य !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
नागपुर.

Tuesday, March 13, 2018

#सहजोक्त



# अभंग...
अनेक वर्षांपूर्वी जेव्हा मी क्लासेस घ्यायची ,नोकरी नव्हती.एका विद्यार्थीनीने त्यांच्या घरी जी उपासना चालायची त्यातील एक अभंग मला कॅसेटद्वारे ऐकवला.त्या अभंगाने मला इतके खोलवर भारवून टाकले की आजही ते सूर ,तो अर्थ मला आतून शांत करतो. गणेशपुरी आश्रमाच्या स्वामी चिद्विलासानंदा यांच्या इंग्रजीवळणाच्या उच्चारातून गायलेला तो अभंग. मी तसाच पाठ केला .फार प्रयत्न न करता तो सहज आत्मसात झाला. संत तुकारामांचा फक्त आठ अोळींचा तो अभंग. जेव्हाही मनावर मळभ येतात ,तेव्हा सहज मनातून आळवल्या जातो.
माझी आजी मला तो नेहमी गायला सांगायची.तिच्या मते त्या गायनात अतिशय आर्तता आहे.आजीची माया दुसरे  काय?
तो अभंग असा...
देव माझा मी देवाचा
हीच माझी सत्य वाचा ॥
देह देवाचे देऊळ
आत बाहेर निर्मळ ॥१॥
देव पाहाया मी गेलो
तेथे देवच होऊन गेलो ॥२॥
तुका म्हणे धन्य झालो
माझे विठ्ठल भेटलो ॥३॥
शब्द साधे. अर्थ सोपा .चाल बाहेरून आत नेणारी. आशय आचरायला फ़ारच कठीण.
पण जेव्हाही "देव माझा "  नि "मी देवाचा" हे मनातून  समजते तेव्हा खुप मोकळं ,आनंदी वाटते.
बरेचदा शब्दार्थ कळतात. पण जितके जितके त्या शब्दांचे सखोल चिंतन करावे तितके नवे नवे काही अनुभूतीला येते की जे व्यक्त करायला शब्द तोकडे पडतात. व्यक्तिमर्यादा.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Monday, March 12, 2018

#सहजोक्त..



खूप दिवसात डोक्यातील विचार कागदावर नेमके उतरत नव्हते. सारखं काय काय बॅकलॉग कामं पूर्ण करणं सुरू होतं . कॉलेज ते घर न् घर ते कॉलेज इतकं गुंतून गेलेली की लिहायचेही जमत नव्हते. अर्थात खंत नव्हती पण थोडं चुकचुकल्या सारखं वाटत होतं .
असंच एक दिवस कॉलेजला निघाली . नेहमीचा अतिवर्दळीचा रस्ता. कारमध्ये एफेम बँडचा रेडिअो सुरु. एक गाणं कानावर पडलं . अन् विचारचक्र गरगरू लागले. शेवटी त्यावर लिहूच ,असं ठरवलं.

हे अगदी खरय की भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीने तिच्या आरंभापासून ते आता पर्यंत सगळ्याच भारतीयांवर प्रभाव ठेवलाय.
हिंदी चित्रपट कथा असो वा गीत ; त्याचे मूल्यमापन कोणी कसे करावे हे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य . पण हे साहित्य नक्कीच दखलपात्र आहे यात शंका नाही.
समाजाने पटकथांना खाद्य पुरविले हे जितके खरे तितकेच हे ही खरे अाहे की सिनमाने जनमानसाला दिशा (काही बाबतीत दशा) दाखविली. समाज~सिनेमा हे अन्योन्य नाते आहे यात दुमत नाही.
तसं बघितले तर साहित्य हे समाजाचा आरसा असते. जे समाजात तेच साहित्यात प्रतिबिंबित होते.  तीच बाब सिनेसाहित्यालाही लागू होते.
पूर्वीच्या काळातील सिनेसाहित्यातील प्रतिमाने आता पारच बदललेली आढळतात.
चूक-बरोबर,योग्य-अयोग्य ,नैतिक-अनैतिक अशा चाचण्या न लावता तटस्थ पहाणी केली तरी "जमाना बदल गया है!" हे अगदी कबूल करावेच लागेल.
त्या दिवशी कानावर पडलेलं गाण्याचे बोल असे  होते  ....

तू बन जा गली बनारस की
मैं शाम तलक भटकू तुझमें ॥धृ॥
तेरी बातें चटपट चाट सी हैं
तेरी आँखें गंगा घाट सी हैं
मैं घाट किनारे सो जाऊं..
फिर सुबह सुबह जागूं तुझमें
॥१॥
तीन कडव्यांचं हे गाणं !
प्रेयसीचे सानिध्य हवे ,तिचे मोहक सौंदर्य ,तिच्या रमणीय हालचाली यांचे वर्णन पूर्वापार सिनेगीतांचा उपजीव्य विषय आहे. त्यासाठी कविकल्पित ते वास्तविक अशी अनेक प्रतिमाने आजवर योजलेली ऐकली.
या दशकातील एका गाण्याचे बोल सहज आठवले "टेलिफोनधुन में हसनेवाली. . ." ! तेही गाणं पहिल्यांदा ऐकल्यावर मी कल्पना करून पाहिली की "एखादी रमणी टेलीफोनच्या रिंगसारखी हासली तर किती हास्यास्पद वाटेल ?"
तेच भाव वरील गाणं ऐकल्यावर मनात आले.
अशोक कुमार यांच्या तरूणपणीचे गाणे होते ," मै बन की चिडिया बन के बन बन बोलू रे. "!
प्रियकर-प्रेयसीला एकमेकांच्या सहवासात कोणत्याही निमित्त्याने रहावेसे वाटते ;हेच या गीतातून सुचवायचे होते. आजच्या काळात ते वरच्या गीतातून सुचवले आहे अन् आजच्या काळातील तरुणाई सारखेच शब्द गाण्यात आले की ,तू बन जा गली बनारस की
मैं शाम तलक भटकू तुझमें "
भावना त्याच ! पण प्रतिमानं बदललीत.
पूर्वी प्रेयसी म्हणजे अमृत ,माधुर्याची मूर्ती असं वर्णन असायचे तर नंतरच्या काळात ,"समुंदर में नहाँ के अौर भी नमकिन हो गयी हो ।" इतका चवीचा फरक पडला ! मग काय पुढची चव "चटपटा" होणे नैसर्गिकच की !  प्रेयसीचे बोलणे मधुर नव्हे तर "तेरी बातें चटपट चाट सी हैं " असं झालं !
प्रेमात पडल्यावर सतत एकमेकांच्या गुडबुकात रहाण्याची खटपट पूर्वीपासूनच होती . तेव्हा ," जो तुमको है पसंद वही बात करेंगे ,तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे "इतकं  "त्वमेव शरणं मम " होतं . तर या गाण्यात "तेरा दिल बहलाऊं डांस करूँ मैं यूँही तुझे रोमांस करूँ " असं व्यक्त होतोय.
एकूण काय ? मानवी भावना आदिम काळापासून  त्याच ,तशाच आहेत. फरक पडला तो व्यक्त होण्याच्या रितीचा ,शब्दांचा व त-हेचा ,इतकंच !!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Thursday, March 8, 2018

#सहजोक्त




अगाधजलसञ्चारी गर्वं नायाति रोहितः।

 अंगुष्ठोदकमात्रेण  शफरी *फर्फरायते*।।

राजा विक्रमादित्य एकदा *सर्वस्वदक्षिणयज्ञ* करू इच्छितो.सर्व तयारी करवतो.सगळ्यांना निमंत्रण देतो.समुद्राला निमंत्रण देण्यास एका दूताला पाठवतो. तोही जातो ,रितीने निमंत्रण देतो. समुद्र त्याला चार रत्न देतो व म्हणतो ,"माझ्यावतीने राजाला दे ".
 दूत परततो.तोवर यज्ञ समाप्त होऊन सगळी संपत्ती दान केलेली असते राजाने.दूत राजाला ते चार रत्न देतो नि प्रत्येकाचे वैशिष्ट्य सांगतो
,(१) जे म्हणाल ते सुग्रास जेवण देते
.(२) चतुरंग सेना देते.
(३)पैसा देते .
(૪) दागदागिने देते.
दूताला राजा म्हणतो,
" तू नव्हतास ,यज्ञदक्षिणाकाळ संपला .या रत्नांपैकी जे घ्यायचे ते तू घे ".
दूत म्हणतो ,
"घरी जाऊन घरच्यांना विचारून सांगतो."
राजा होकार देतो.दूत घरी जातो . पत्नी-मुलगा-सून सगळ्यांना हकिकत सांगतो. प्रत्येकजण वेगवेगळे रत्न इच्छितो. एकवाक्यता उरत नाही. दूत दुसरे दिवशी राजाला इत्थंभूत सांगतो.
राजा त्याला चारही  रत्न देऊन टाकतो.

महानता कशात असते ?
खरे अौदार्य कोणाते?
निस्पृहता कोणती?
सहज श्रेष्ठत्व कोणाते असते ?

सर्वस्व देऊनही *देण्याची* क्षमता असलेला राजा विक्रमादित्य .आपल्याला आलेली चारही रत्ने सहज ,मनात किल्मिष न आणता देऊन टाकतो.
कारण

"क्रियासिद्धि: सत्वे भवति महतां नोपकरणे"!

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, February 23, 2018

#सहजोक्त.

 मनसोक्त .

दरवर्षीच तसा वाढदिवस असतो. पण यंदाचा वाढदिवस चिरस्मरणात राहील. अखिलभारतीय संस्कृतसंगोष्ठी -विद्याभारती द्वारा आयोजित..जगन्नाथपुरी अोरिसा येथे आहे. काल नागपुरातून निघाली. आज १०वाजता येथे पोहचली.
निसर्गाने भरभरून संपन्न केलेला हा जगन्नाथाचा प्रदेश. कृष्ण तसा माझा लाडका देव . क्रश का काय म्हणतात ना तसं या देवाबद्दल आहे. याचे प्रत्येक रूप मनाला मोहवते. पण आज याच्या प्रदेशात आल्यापासून मन एका वेगळ्याच परिपूर्त भावनेने भारले आहे.
अजून त्याची भेट झाली नाही . पण आज भेट तर घेणारच .
हा इथला देव अजूनच भावतो. कारण इतर ठिकाणी तो यशोदा  राधा ,रुक्मिणी ,सत्यभामा ,बालगोपाळांसह असतो. इथे मात्र तो भाऊ बळराम व बहिण सुभद्रा यांच्या सह आहे.
जगात भावाबहिणीच्या प्रेमाचं हे एक अनोखं मंदिर आहे. प्रणव-प्रज्ञा-प्रबोध तसेच बलभद्र-सुभद्रा-कृष्ण . लहानपणी मोहप्याच्या उत्सवात प्रणव-प्रबोध कृष्ण व्हायचे .आजी-आत्या मला सुभद्रा म्हणून  नटवून तयार कराययची. तेव्हापासून कृष्णाचं हे रूप अधिक मनाच्या जवळचे वाटतं.
आज सुयोग जुळून आला, त्यांच्या दर्शनाचा.
इथे वातावरण अतिशय प्रसन्न आहे. इथले लोक सुद्धा साधे नि मनमिळावू आहे.
संस्कृत+पुरीधाम याला च सोने पे सुहागा म्हणतात कां?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

#सहजोक्त.


"मन मोठं असलं की सारं सामावतं" असा डायलॉग होता एका सिरियलमध्ये. हे विश्वचि माझे घरं , ही अनुभूती यायला विश्वात फिरायला हवे ना? घरालाच विश्व मानले वा आपल्याच भावविश्वात गुरफ़टले तर कसं होईल ?
काल पुरी येथे आली. भारतातून ३० जणं संस्कृतसंगोष्ठीसाठी येथे आलेय. येथे व्यवस्था बघण्याचे दायित्व "सरस्वती विद्यामंदिर" यांच्याकडे आहे. या शाळेचे सर्व विषयाचे अध्यापक व्यवस्थेत गुंतले आहेत. ते संस्कृत भाषक नाहीत. त्यातील बरेच जण उडिया भाषा बोलतात.
काही गोष्टी येथे विशेषत्वाने जाणवल्या. येथे स्त्रीशिक्षिकेला "गुरुमा" म्हणतात तर पुरुषशिक्षकाला "गुरुजी". रस्त्यावरून जाताना जरी शिक्षक दिसले तर जवळ येऊन पादस्पर्श करून "प्रणाम" म्हणतात. इथे सामान्य माणसं प्रेमळ व साधे आहेत.
उडिया भाषेत मराठीसारखेच बरेच शब्द आहे.जसे
"ळ'  हा वर्ण या भाषेत आहे. मराठीपेक्षा जास्त तो योजतात. जसे काळिंदी ,काळांश ,काळ ,लीळा जळ इत्यादी . आज मराठीत आपण जल ,लीला ,काल,कालांश ,कालिंदी  योजतो. उडियाभाषेत
आपल्यासारखेच मावशी ,काका इत्यादी म्हणत‍ात. आपण जसं मुलांना लाडाने पिलू म्हणतो तसं इथे  "पिला". (महर्षी कणादाने अणुसाठी "पिलु" शब्द योजला होता. ) मराठीसाम्राज्य बंगाल पर्यंत पसरले होते . त्याचा तर हा परिणाम नाही ना?
उडिया भाषा पालीभाषेशी सुद्धा साम्य बाळगून आहे. पूर्ण ला ते पालीसारखं पुण्ण म्हणतात. इथेही फक्त "स" उच्चारतात'श,ष' . इतकेच नाही तर श्री च्या ऐवजी "स्री" उच्चारतात.
तशी बंगाली वळणाचीही वाटते. कारण व च्या ऐवजी ब, अन् यच्या ऐवजी ज चा उच्चार जास्त करतात. वीणा ऐवजी बीना ,यदि  ऐवजी जदि असे.

संस्कृतसारखी पण वाटते.  बहुवचनी क्रियापदांसाठी संस्कृतसारखं "अन्ती"  "अन्तु" असं योजतात.  अच्छन्ती (आहेत) ,नहन्ती (नाही अाहेत ) आसन्तु (यावे) ,बसन्तु (बसा)

वर्षानुवर्ष शब्दांचे वळण ,उच्चारण थोडे थोडे भिन्न करता करता काळाच्या अोघात वेगवेगळ्या भाषा तयार झाल्या असाव्यात ,नाही कां?
या संगोष्ठीसाठी भारतातील वेगवेगळ्या प्रांतातून लोक आले आहेत. त्यांचे संस्कृत उच्चारण त्यांच्या त्यांच्या प्रांतिक वैशिष्ट्याला धरून आहे. पण संस्कृतातून  संवाद होतोय. भारतीय भाषांमधिल भाषिक समानता या निमित्त्याने  प्रखरतेने   अधोरेखित होते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Monday, February 19, 2018

#शब्दचिंतन.


अर्थ-सार्थ--निरर्थ-अनर्थ.-व्यर्थ-स्वार्थ-परार्थ-परामार्थ-यथार्थ-कृतार्थ......वगैरे वगैरे...

एकाच मूळापासून तयार झालेले शब्द.अर्थ हा मूळ कृदन्त. "अर्थ्"या मूळधातूपासून झालेला.
त्या मुळधातूचा अर्थ "इच्छा करणे" हा आहे.
तसेही जिथे इच्छा असते त्यातच अर्थ असतो.
अर्थ चा एक अर्थ पैसा हाही आहे .अन् तो तर स्वत: सिद्धपण आहे. "जोवर पैसा तोवर बैसा" खरेच असते व्यवहारात. पैसा नाही म्हणजे काहीही अर्थ नाही.

शब्दांना अर्थ असावा ,ही जुनी,भाबडी समजूत आजकाल खोटी ठरतेय.
जुन्याकाळी 'नामकरण' करतांना अर्थपूर्ण नाव बघून मग ठेवायचे. आता 'नेट लावून'अर्थ शोधतात.....प्रगती...दुसरे काय?

देवादिकांपासून चराचरातील प्रत्येक नाव सार्थच होते. वानगी दाखल काही नामे पाहू.
राम- रम् म्हणजे रमणे ,ज्यात मन रममाण होते ,तो राम.
कृष्ण- कृष्-कर्ष् =ओढणे ,खिचणे . जो चित्त खेचून घेतो ,तो कृष्ण.
राधा-राध् म्हणजे ऐश्वर्य . जिच्यात ऐश्वर्य आहे ती राधा.
माधच-मा म्हणजे लक्ष्मी. धव म्हणजे पती. माधव म्हणजे लक्ष्मीपती.
विष्णु -विश् म्हणजे शिरणे. जो चराचरात शिरलाय ,,भिनलाय तो विष्णु.
शंकर -शम् म्हणजे शांत/कल्याण . जो शमन करतो,कल्याण करतो ,तो शंकर.
दुर्गा- "दुर् "उपसर्गाचा अर्थ 'कठिण' असा आहे. जी जाण्यास कठिण ती दुर्गा. (जिला पटवणे सोपे नाही, ती दुर्गा.)
खग- ख म्हणजे आकाश. ग म्हणजे जाणारा. आकाशातून जाणारा खग.
गंगा- जी सतत गतिशील आहे ती. समोर समोर जाणारी.
अरुन्धती -जिला कोणी अडवू शकत नाही , नि जी कोणासाठी अडत नाही.

अश्या प्रकारे पाहात गेले तर प्रत्येक शब्द सार्थ ठरतो. खरेच सार्थच असतात शब्द.फक्त समजून घ्यायला इच्छा -पात्रता असावयास हवी. अर्थाचेही तीन स्तर असतात.सामान्यांना पहिल्याही स्तरातील अर्थ कळला तरी त्यांचे आयुष्य "सार्थ" होऊ शकते.प्रत्येकाने सखोल असणे गरजेचे नाहीच.

तर अर्था सह म्हणजेच स-अर्थ म्हणजे सार्थ.

मग अर्था विना म्हणजे निर-्अर्थ म्हणजे निरर्थ.

अन्-अर्थ चा मात्र अर्थ संकट / धोका असा रूढ झालाय. अनर्थकारी चिंतन नकोच.

व्यर्थ- वि-अर्थ म्हणजे ज्यातून अर्थ निघून गेलाय तो.यावरही व्यर्थ कशाला चिंता ?

स्वार्थ- हा फ़ारच महत्वाचा. "स्व" म्हणजे आपण. स्व साठी अर्थ ,म्हणजे स्वार्थ . "आप मर गये, डूब गयी दुनिया"आपणच नसू तर कशालाच काही अर्थ नाही ना! म्हणून स्वार्थ पहिले साधावा...(काहींना उपजत जमतो.)

परार्थ- पर म्हणजे परका. दुस-यासाठी करणे म्हणजे परार्थच ना. परोपकार..

परमार्थ- परम् म्हणजे श्रेष्ठ . ज्यातून मोठा,गहन अर्थ निघतो, तो परमार्थ.

यथार्थ- यथा म्हणजे जसे अहे तसे. म्हणजे वास्तव. म्हणून यथार्थ ज्ञान गरजेचे.

कृतार्थ - कृत म्हणजे केलेले. जे केले त्यामुळे श्रेय मिळाले की कृतार्थ होणारच ना!

अर्थ शोधता शोधता इतके शब्दार्थ उकलले. अर्थात यासाठीच तर शब्दचिंतन आहे. शब्दांचा अर्थाशी सार्थ संबंध असतोच. अर्थाचे अनर्थ करण्यापेक्षा  चिंतनातून प्रत्येकाने शब्दातील सार्थकत्व शोधावे. हा व्यर्थ खटाटोप नाही.
 "केल्याने होत आहे रे ,आधी केलेचि पाहिजे. "!

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...