Friday, April 16, 2021

#सहजोक्त~ भाग ६

 #सहजोक्त~ भाग ६


जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।

पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥6॥

 भारत न् रावणाची लंका यांच्या मध्ये विशाल समुद्र होता. ज्यावर वानरांच्या सहायाने रामाने सेतू बांधला.  जणु लंकेचे द्वीप सेतूने सांधले.  आणि लंकेवर विजय मिळविला.  शरीराचा भार उचलणारे पाय . पायांना नीट हालचालीला आवश्यक असा सांधा म्हणजे दोन्ही गुडघे. तर अशा या दोन्ही गुडघ्यांचे रक्षण सेतु रचणारा राम करतो.

 पोटरीला संस्कृतमध्ये जंघा म्हटले आहे.   

दहा तोंडांच्या रावणाचा नाश करणारा राम ,  माझ्या पोट-यांचे रक्षण करो.

श्रीराम हे साक्षात विष्णुचे अवतार.त्यांच्या पायांची सेवा लक्ष्मी करते. लंकेवर विजय मिळविल्यावर  ते राज्य न् सर्वच ऐश्वर्य बिभिषणाला देऊन श्रीराम अयोध्येला परतले.  बिभिषणाला सर्व ऐश्वर्य देणारे श्रीराम , माझ्या पाऊलांचे रक्षण करो.  

आणि अशा प्रकारच्या सर्वच विशेषणांसह असलेला श्रीराम माझ्या संपूर्ण शरीराचे रक्षण करो. 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


Thursday, April 15, 2021

#सहजोक्त~ भाग ५.

 



सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।

उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥5॥

सुग्रीव वानर  हा  रामाचा भक्त होता. सुंदर मान असलेला तो सुग्रीव. डोके व धड यांना जोडणारा जरासा उंच व निमुळता , सडपातळ भाग म्हणजे मान . मान जशी सडपातळच उत्तम व तेच स्वास्थ्याचे लक्षण होय.  तशीच कंबरही कंबरच असावी कमरा नको.  कटी म्हणजे कंबर .   कंबरेचा आकार जसजसा  बेढब होत जातो तसं तसं स्वास्थ्य अवघड होत जाते. कंबरेचे (म्हणजे स्वस्थयुक्त शरीरातील कटीचे) रक्षण सुग्रीवाचा ईश , श्रीराम यांनी करावे. 

सक्थि म्हणजे नितंबांच्या खाली जोडून असलेला सांध्यापासून तर गुडघ्याच्या मागच्या बाजू पर्यंतचा पायांचा भाग .  डोक्यानंतर सर्वात जास्त भार पेलणारा भाग हाच असतो. रामाच्या वानरसेनेतही अतिशय जबाबदारीचे काम हनुमंताने सहज पार पाडले होते. तर शरीराच्या हा भागाचे रक्षण हनुमानाच्या प्रभुरामाने करावे. 

उरु म्हणजे गुडघ्याच्या वरचा पायांचा समोरचा भाग . (मागचा भाग सक्थीमध्ये येतो) मराठीत आपण मांडी म्हणतो . रक्ष म्हणजे राक्षसांचा विनाश करणारा रघुकुलभूषण राम , माझ्या मांड्यांचे रक्षण करो. 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, April 14, 2021

#सहजोक्त~ भाग ૪



करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।

मध्यं पातु  खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥4॥ 

 पाणिग्रहण  हा  सोळा संस्कारांपैकी एक संस्कार आहे. विवाहसमयी वधुपिता स्वकन्येचा हात वराच्या हाती देतो, याला पाणिग्रहण म्हणतात.  धर्म-अर्थ-कामादी बाबींमध्ये एकमेकांना पूरक असणारी साताजन्माची मैत्री , जणु जीवा-शिवाची गाठ ठरावी  ; याचे प्रतीक म्हणजे "पाणिग्रहण".  

 श्रीरामाने जनकनंदिनी सीतेचे पाणिग्रहण केले होते. सीतेच्या मुक्ततेसाठीच लंकेवर विजय मिळविला होता. राम-सीतेचे अभिन्नत्व सर्वच भारतीयांना मान्य आहे. म्हणूनच  श्रीरामाला सीताराम, सियाराम म्हटल्या जाते.   सक्षमपणे जबाबदारी निभवणारे  सियाराम माझ्या हाताचे रक्षण करो.

जानकी-स्वयंवराची अटच होती की जमदग्निपुत्र परशुरामाने जनकराजा जवळ ठेवलेले शिवधनुष्य जो उचलून धरेल त्याला जानकी माळ घालेल. श्रीराम ते शिवधनु तर उचलतात.  प्रत्यंचेला हात लावत असता नेमके  ते  तुटते. त्यामुळे कोपिष्ट असे परशुराम भयंकर क्रोधित होतात. इतक्या कोपलेल्या ऋषिश्रेष्ठांना संतुष्ट करण्याचे कठिण कार्य श्रीराम सहज करतात. मन समजून घेणे , रागवलेल्या मनाला शांत करणे , दुस-याच्या मनात स्वतःविषयी ममत्व न् आनंद निर्माण करणे "रामा"ला सहज जमत होते. तर अशा रामाने माझ्या हृदयाचे रक्षण करावे.

मध्य म्हणजे शरीराचा मधला पोकळ भाग. खर-दूषण नावाचे रावणाचे सावत्रभाऊ यांचा नाश रामाने केला होता. म्हणून राम हा  "खरध्वंसी" आहेच. "खर" या शब्दाचा अजून एक अर्थ तीक्ष्ण , उग्र  , तीव्र असाही आहे.  पोट , आतडी आदी भागात कोणतीही तीव्रता , उग्रता , तीक्ष्णता नकोच नको. तर माझ्या मध्यभागातील तीव्रतेला ध्वस्त , नष्ट करण्याचे काम रामाने करावे.  

 आईच्या पोटात असताना प्रत्येकाला नाभीद्वारे जीवन लाभत असते. नाभी हा प्रत्येक मानवाला त्याच्या आईशी जुळलेला असण्याची आठवण करून देणारा अवयव आहे. जन्मापूर्वीचे  मातृ-उदरातील जीवन व जन्मोत्तर बाहेरील जीवन याची सांगड दर्शवणारा अवयव नाभीच होय. 

  साक्षात ब्रह्मदेवाचा पुत्र , श्रीरामाचा परमभक्त तसेच परमज्ञानी , अस्वलराज जाम्बवान यांना  श्रीरामाशिवाय दुसरा कोणी आश्रय नव्हता.    शिवाय त्रेतायुगातील रामभक्त जाम्बवान द्वापरयुगात कृष्णाला स्वकन्या देतो. दोन युगात देवतेच्या भक्तीची अखंडता दर्शवणारा जाम्बवान हा एकमेव भक्त  आहे. एकीकडे  स्वतःच्या भक्तीने दोन युगाची सांगड घालणारा जाम्बवान , तर दोन जीवनाची सांगड दर्शवणारी नाभी . माझ्या नाभीचे रक्षण  जाम्बदाश्रय रामाने करावे. 

  वज्रपंजर कवचातील विशेषणांचे जितके सखोल चिंतन करावे तितके ते अधिकाधिक अर्थ खुलवत जाते , हे मात्र खरे. 

  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.






Tuesday, April 13, 2021

#सहजोक्त~भाग ३

 #सहजोक्त ~ भाग ३

काल दोन श्लोक झाले होते. आता पुढे पाहू. 

जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।

स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥3॥


जीभ , जिचे अस्तित्व वैखरी प्रकटीकरणासाठी  महत्त्त्वाचे आहे.  विद्यांचा संग्रह असलेला राम माझ्या जिभेचे रक्षण करो. 'जिभेवर सरस्वती नांदते' , असं हुशार व्यक्तीचे वर्णन करताना म्हणतात.

 कंठ , ज्यातून चारही प्रकारची वाणी उत्पन्न होतात. परा ,मध्यमा , पश्यन्ती व वैखरी या त्या चार वाणी आहेत.  भरत हा कैकेयीपुत्र होता. कैकेयीच्या कृतीला त्याची सहमती तर नव्हतीच.  उलट तो तिला शिक्षा देऊ इच्छत होता. केवळ रामच्या आज्ञेने भरताने कैकेयीला सन्मानाने सांभाळले . मनात द्वेष , लोभ वगैरे काहीही न ठेवता केवळ कर्तव्यभावनेनी त्याने सांभाळ केला.  नको त्या विकारांना कंठातच लुप्त करावे , चारही वाचांपर्यंत येऊच देऊ नये. म्हणून गळ्याचे रक्षण भरताकडून वंदिल्या जाणारा राम करतो. 

 स्कंध म्हणजे खांदे. भार सावरायला सहायभूत स्कंध असतात. खांदे मजबूत असेल तर कठीणातील कठीण जबाबदारी लीलया पेलता येते. राक्षसांवर यशस्वी विजय मिळविण्यासाठी दिव्य-आयुध मिळाले होते रामाला. रामाचे खांदे ते दिव्यत्व पेलण्यास समर्थ होते. दिव्यत्वाने दबून , भारावून जाणारे नव्हते. उलट स्वतःच्या आंतरिक क्षमतांनी दिव्यत्वाला  बळकट करणारे होते.  दिव्य-आयुधांचा उपयोग उठसूट करणारा हा नाही ,  हे माहीत असल्यामुळे तर रामाला दिव्यायुध मिळाले.  प्रत्येकाला जबाबदारी असते , तसेच ती पार पाडायची आंतरिक क्षमतासुद्धा असते. तर जबाबदारीचे प्रतीक म्हणजे खांदे यांचे रक्षण दिव्य-आयुधांसह असलेला राम करो. 

 भुजा म्हणजे बाहु . समर्थ खांद्यांना जोड भक्कम भुजांची असते.  भग्न+ईश+कार्मुक म्हणजे शंकराचे धनुष्य ज्याने सहज तोडले ते रामाचे बाहू  माझ्या बाहुंचे रक्षण करोत. 

 🙏श्रीरामार्पणमस्तु🙏

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे










Monday, April 12, 2021

#सहजोक्त भाग २



नमस्कार . आज गुढीपाडवा. नवसंवत्सराचा पहिल‍ा दिवस.

आजपासून चैत्र-नवरात्र आरंभ होते. 

रामरक्षेतील वज्रपंजर नामक कवचातील काही श्लोकांचे  आजपासून नवरात्रभर  यथामती निरूपण  करणार आहे.  वज्रपंजरकवच मूळात अकरा श्लोकांचे आहे. त्यातील पहिला श्लोकार्ध हा असा 

*रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम्‌* ।

सर्व प्रकारच्या पापांची शत्रू  असलेली तसेच सर्व इच्छा पूर्ण करून देणारी अशी रामरक्षा ; विद्वानांनी म्हणायलाच हवी.   ही अपेक्षा व्यक्त केल्यावर आता  डोक्यापासून ते पायापर्यंत एकेक अवयवाचे नाव घेत , रामानी त्या अवयवाचे रक्षण करावे असे पुढच्या साडेपाच अोळीत मांडले आहे. अवयवाचे नाव व रक्षण करण्यासाठी धावा करताना रामाचे एकेक विशेषण घेतले आहे. 

शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥1॥

माझ्या  डोक्याचे /मस्तकाचे/ शिराचे रक्षण राघव म्हणजे रघुकुलात जन्मलेल्या रामाने करावे. भाल म्हणजे कपाळ. त्याचे रक्षण दशरथात्मज म्हणजे दशरथाचा पुत्र राम याने  करावे.


 मस्तक/शिर म्हणजे शरीराचे उत्तम अंग .  चांगले काही घडले की शिर अभिमानाने ताठ होते तर  चुकीचं  घडलं की शिर शरमेने झुकते.  रामाचा वंश  सूर्यवंशी इक्ष्वाकु असा होता. या वंशात अनेकानेक नरोत्तम र‍ाजे/महाराजे निपजले. रघुराजा ही याच वंशाचे न् रामाचे पणजोबा  होते. त्यांच्या अफाट पराक्रमाने इक्ष्वाकु वंश पुढे रघुवंश ठरला न् पुढच्या पिढ्या रघुची संतती म्हणजे र‍ाघव ठरली.  शरीरात जसे मस्तक महत्त्वाचे न् प्रतिष्ठित तसेच इक्ष्वाकुंमध्ये राघव राम ! म्हणून  शिरो मे राघवः पातु । 

भालप्रदेश म्हणजे ललाम म्हणजे कपाळ.  "काय लिहून ठेवले आहे भाळी , कळत नाही ? , असं म्हणतात. भाळ म्हणजे कपाळ ज्यावर जन्मल्याच्या पाचव्या दिवशी सटवाई नशीब लिहिते , असे मानतात.  कपाळ जसा दैवदर्शक म्हणजे भाग्य दर्शवणारा अवयव आहे तसाच शोभा वाढवणाराही भाग आहे. म्हणून तर कोणी सर्वोत्तम कामगिरी करणारा "ललामभूत" ठरतो.  तर हा अवयव नेमका दशरथात्मजाने राखावा.  कारण दशरथपुत्र र‍ाम चारही पुत्रांमध्ये स्वतःच्या त्यागादी आदर्श वागणुकीतून  ललामभूत ठरला .


कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।

घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥2॥

दृष्टी मग ती आंतरिक असो वा बाह्य , तिचे रक्षण कौसल्यापुत्र रामाने  करावे .  तर श्रुती म्हणजे कान व श्रुती म्हणजे ज्ञान. कानांचे रक्षण विश्वामित्रांचा प्रिय शिष्य रामाने करावे.   सुयोग्य विशेषणांचे चयन कसे असावे ? याचा वस्तुपाठ ह्या   साडेपाच अोळी आहेत.

 प्रत्येकाने आईच्या डोळ्याने जगाकडे पाहिले तर जग कधीच वाईट नसेल.   म्हणूनच तर डोळ्यांचे रक्षण कौसल्यापुत्र रामाने करावे. विश्वामित्रांसारखा शिस्तबद्ध , ज्ञानी , वात्सल्यनिधी असूनही कर्तव्यकठोर असा गुरु लाभणं भाग्यातच असावं लागतं. माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे कसब अशा गुरुमुळे अनायास लाभते.  माहिती गोळा करण्याचा प्राथमिक स्रोत म्हणजे ज्ञानाचे प्रवेशद्वार  कान होत. म्हणून कानांचे रक्षण विश्वामित्राचा प्रियशिष्य र‍ाम करतो. 

 सुकुमार असे चारही र‍ाजकुमार  उपनयन संस्कारानंतर सुखासीन व सुरक्षित राजेशाही जीवन सोडून गुरुगृही आश्रमात गेले. तिथे गुरुच्या आज्ञेवरून  तपाचरणात विघ्न आणणा-या राक्षसांना  ठार केले.  श्वास ज्या अवयवाने घेतात ते घ्राण म्हणजे नाक. आश्रमसंस्कृतीचा श्वास म्हणजे यज्ञयागज्ञानदानादी कार्य . हे कार्य ज्या रामामुळे सुरळीत झाले तो मखत्राता (यज्ञ-रक्षक)  आमच्या नाकाचे रक्षण करो.   कौसल्या महाराणी होती तर कैकेयी पट्टराणी. सुमित्रा मात्र अनसूय सेवेकरी व ममतामूर्ती होती. पतीच्या नजरेत ,घरात-राज्यात कुठेही प्रथमप्राधान्य न मिळताही स्वतःला लाचार न करून घेता , सतत समाधानी रहाण्याचं व्रत सोप नाही. दोन्ही मुलगे दोन्ही सवतींच्या मुलांसह अतिशय वेगवेगळ्या परिस्थितीत असतानाही , चिंताक्रांत न होता संयमाने स्वतःसह आजुबाजूच्यांना धीर देण्याचे कठीण कार्य सुमित्रा करीत होती.  सामान्यांचा  चेहरा भोगलेले सुखदुःख दाखवून देतो , सुमित्रेचा नाही.  तर असा चेहरा सुमित्राचा लाडका पुत्र राम रक्षण करतो. 

॥ इति द्वितीयो भागः श्रीरामार्पणमस्तु॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.



Sunday, April 11, 2021

#सहजोक्त -रामनवरात्र

 


आज प्रतिपदा लागते आहे. पण चैत्राची सुरुवात उद्यापासून आहे. 

चैत्रमास , त्यातील शुद्ध नवमीला श्रीरामाचा जन्म झाला. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून र‍ामनवरात्र असते. 

काही स्तोत्र , मंत्र , अभंग , कवने न् स्तवने नित्यपाठांतरात असायला हवी. त्यातील मुख्य असे ,'रामरक्षा स्तोत्र' होय.

आमच्या घरी आमच्या लहानपणापासून 

घरातील वडीलधारी मंडळी सायंकाळी उच्च आवाजात देवासमोर काही निवडक स्तोत्र म्हणत असत. ती ऐकून ऐकून विनासायास मुखोद्गत झाली. सासरी आल्यावर वेगळे घर , वेगळे वळण यात बरेच वर्ष तो शिरस्ता मोडला. पण गेल्या लॉकडाऊन पासून ते जुने नित्यपठणाचे स्तोत्रे म्हणून पाहायला सुरुवात केली . आणि ती सुदैवाने कंठगत व्हायला वेळ लागला नाही.   अशाच काही निवडकांपैकी "रामरक्षा" ही महत्त्वाची. 

शब्दांचा , अर्थाचा विचार करण्याचा स्वभाव स्वस्थ बसू देत नाही. अनायसे गुढीपाडव्यापासून ,नवसंवत्सराच्या आरंभदिनापासून रामरक्षेतील  "वज्रपंजर नावाचे कवच " मला जसे भावले , उमजले  तसे यथाशक्ती मी  या नवर‍ात्रात मांडू इच्छिते. 

 हे छोटेसे कार्य का असेना ; तो बुद्धी देणारा राम नक्कीच माझ्या हातून पूर्ण करून घेईल , अशी  इच्छा रामचरणी बाळगते. 

 

वज्रपंजर रामरक्षाकवच. 

रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम्‌ ।

शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥4॥

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।

घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥5॥

जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।

स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥6॥

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।

मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥7॥

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।

उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥8॥

 


जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।

पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥9॥

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत्‌ ।

स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्‌ ॥10॥

पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।

न दृष्टुमति शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥11॥

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्‌ ।

नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥12॥

जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाऽभिरक्षितम्‌ ।

यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥13॥

वज्रपंजरनामेदं यो रामकवचं स्मरेत्‌ ।

अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम्‌ ॥14॥


या पहिल्या भागात रामरक्षेतील वज्रपंजर-कवचाचा  सलग भाग देत आहे. 

 पुढच्या प्रत्येक भागातून ते श्लोक सविस्तर स्पष्टीकरणासह देण्याचा प्रयत्न करीन .

 *रामरामेति रामेति*

 *रमे रामे मनोरमे*।

 *सहस्रनामतत्तुल्यं*

 *र‍ामनामवरानने।।*

 🙏बुद्धी दे रघुनायका🙏

 ©  डॉ. प्रज्ञा देशपांडे.


Sunday, April 4, 2021

#सहजोक्त.

  


मराठी  भाषा व संस्कृती अतिशय प्राचीन  व समृद्ध आहे. तिचा अभिमान सर्वच मराठीजनांना असणे स्वाभाविक आहे.

 हा अभिमान कोणी कसा जोपासावा न् व्यक्त करावा ? हे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य !

 शरीराचा ताप मोजायला तापमापक असते पण भावना मोजायचे यंत्र नसते. कधी-कधी  हा भाषिक-अभिमान डोकेदुखी ठरतो.   आजकाल "आम्ही म्हणू तीच मराठी, बाकीच्यांची अशुद्ध /भेसळयुक्त". हा भाव काहीजणांमध्ये  फारच तीव्र असतो. 



नुकतीच होळी , धुळवड व रंगपंचमी होऊन गेली.  या दरम्यान , 'रंगपंचमी वेगळी ,  आपल्यात रंगपंचमीलाच रंग खेळतात , होळीचे दुसरे दिवशी  हिंदीभाषक विशेषतः सिनेमाप्रभावाने रंग खेळतात' , वगैरे अर्थाच्या अनेक पोस्ट सोशलमिडियावर पडलेल्या पाहिल्या. 

त्यावरून सहज विचार आले न् ते शब्दात मांडले.

मूळात  भाषेतील शब्दांना अव्याप्ति-अतिव्याप्ती , सामान्यीकरण-वैशेषीकरण असू शकते.

जसे   तेल म्हणजे तिळापासून बनलेले  या मूळ-अर्थाने असलेल्या शब्दाचे सामान्यीकरण करून व्याप्ती वाढवत वाढवत खोबरेल-तेल , जवस-तेल वगैरे शब्द तयार झाले. मेथी+कैरी यांचा खाद्यपदार्थ मेथंबा झाला , त्याचेच सामान्यीकरण "पेरूचा मेथंबा" , या पदार्थाने झाले. 

वर्षाऋतूपासून सुरू होणारे संवत्सर म्हणून वर्ष हा मूळ शब्द तयार झाला . त्याची अतिव्याप्ती होत , चैत्रापासून काय किंवा जानेवारीपासून काय , सुरु होणारे 'संवत्सर' जनरीतीने 'वर्ष'च ठरते. 


तसेच काहीसे इथे आहे. होलिकादहन झाल्यावर दुसरे दिवशी तिथली  र‍ाख अंगाला लावणे व  होळीच्या निखा-यांवर पाणी तापवून स्नान करणे अशी जुनी रुढी होती. तिचेच उत्सवीकरण होऊन त्याच दिवशी परस्परांना पाण्याने भिजवणे , राख (आजकाल रंग) एकमेकांवर उडवणे (म्हणून धुळवड) सुरु झाले . यालाच सर्वसामान्य रंगपंचमी म्हणू लागले. "रंगपंचमी" या शब्दाचे इथे सामान्यीकरण झाले. "पंचमी" ही तिथी पौर्णिमेनंतर साधारणपणे पांच दिवसांनी येते वगैरे 'तिथी-वार-नक्षत्र' असे पंचांग सामान्यांच्या डोक्यात येत नाही. त्यामुळे  'आम्ही दुसरे दिवशी रंगपंचमी साजरी केली' , या वाक्यात गैर असे काही वाटून घ्यायची गरज नाही.  होळीनंतर येणा-या पंचमीला लहानमुलांना गुलाल लावतात , अोवाळतात न् गाठी घालतात , त्याला 'शिवशिमगा' म्हणतात. मराठमोळ्या उत्सवांच्या विविध चालिरीती   दर बारा कोसावर बदललेल्या आढळल्यास नवल ते काय ?  वैविध्यपूर्ण , नांदती न् ऐश्वर्यवती सुसंस्कृती असलेली ही मराठीची नगरी आहे. 




 खरे तर कोणतीही "भाषा" मुळात बोली म्हणून जनमानसात रुजलेली असते. साधर्म्य बाळगणा-या अनेक बोलींचे प्रमाणीकरण करून एका बोलीला "प्रमाणभाषा" असा दर्जा दिला जातो. ती बोली ज्या भागातील असते , तिथल्या रीतिरिवाजांना एकप्रकारे प्राधान्य दिल्या जाते. म्हणजे "तीच बोली शुद्ध न् बाकीच्या तिच्या बाटिक" , असा दुराभिमान त्या बोलीकरांमध्ये बळावतो न् परिणामी इतर बोलीभाषांना सापत्न्यभाव , हीनपणा येतो . अर्थात हे त्यांच्या अर्धवट संस्कार व ज्ञानाचे द्योतक असते.

 ज्ञानेश्वर-तुकारामादी संतांच्या काळी सुदैवाने बोलींचे प्रमाणीकरण झाले नव्हते वा तसा गाजावाजा नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांच्याच स्वाभाविक बोलीत साहित्य निर्माण केले न् वर्षानुवर्ष ते साहित्य सर्वच मराठीभाषकांना मूर्धन्य झाले. 

 ज्ञानेश्वरीतही छप्पन बोलीभाषांचा उल्लेख आहे.

 आज जे संत-पंत-तंत साहित्य  वा लोकसाहित्य उपलब्ध आहे , त्याचे वाचन केल्यावर बोली-बोलींमधील फरक लक्षात येतो.  व सहज कळते की तेव्हाच्या काळी ज्या त्या  प्रांतातील कवी तेथील बोलीत साहित्यनिर्मिती करीत असे. बोलि-श्रेष्ठत्वाची न् बोली लादण्याची कल्पना नव्हती. म्हणून " मराठा तितुका मिळवावा" सोपे गेले.

 मराठ्यांची सत्ता  कटकेपासून ते अटकेपर्यंत सुखेनैव नांदती होती. नशीब ,  तेव्हा असे कट्टर भाषाभिमानी नक्कीच नसावे  ! 

   रंगपंचमी की धुळवड ? यावरून मराठीपण ठरविणारे कितेक जण आजकाल दिसतात.  दर बारा-कोसावर जशी बोली बदलते तसे सणवार साजरे करण्याच्या रूढीही बदलू शकते  , इतकं साधं समजून घेता येत नाही? 

   बारा बलुतेदारी , ग्रामीण-नागरी , विपन्न-संपन्न , अनवट-मुरलेले , स्त्री-पुरुष इत्यादी पोटभेदांसह प्रांता-प्रांताच्या  चालीरीती   या खरे तर "मराठीच्या" समृद्धतेचा पुरावा आहेत.  त्यांना त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवायचा प्रत्येक बोलीला अधिकार आहे .  त्यावर अतिक्रमण करू नये न् त्यांना हीनपणा देऊ नये  , इतकी तमा "प्रमाण-बोली-वर्चस्ववाद्यांनी" बाळगायला हवी. 

   मराठीच्या काही बोलींमध्ये प्रचलित असलेले काही शब्द हिंदीभाषेत सामान्यपणे योजतात. मग प्रमाण-भाषा अभिमानी "लोक्स"  त्या शब्दाला न् ते शब्द योजणा-यालाही हिणवतात.

   हिंदीभाषेतील वा इतर भाषेंतील  एखादा शब्द असेल न् तोही मराठीने स्वीकारला तर बिघडलं कुठे न् किती ?  पण नाही ; मराठीचे स्वयंभू कर्तेधर्ते सरसावून उठतात.

   "फार फार जुन्या काळी पावाचा तुकडा विहिरींत टाकून गावेच्या गावे बाटवली होती" , असं लहानपणी वाचल्यावर बाटवणा-यांचा प्रचंड राग यायचा , आताशा "ते बाटले"  हे स्वीकारणा-यांची कीव येते. 

   हाच द‍ाखला मराठीभाषेलाही लागू आहे.   विशिष्ट बोलीच्या सार्वत्रिक थोपवण्याच्या वृत्तीमुळे कितीतरी जणं अक्षरशः वाळीत पडले न् बाटगे होऊन परभाषक झाले , हे लक्षात येत कसे नाही ?

 जसे  बडोदा हे गुजराथेतील मराठी संस्थान , तसेच  कर्नाटक , तेलंगणा , आंध्रप्रदेश , अोरिसा  ,बंगाल , मध्यप्रदेश ,माळवा , छत्तीसगड  , सिंध , पंजाब वगैरे प्रांतात मराठी साम्राज्य होते. मराठी संस्कृती तिथे रुजत होती. आजही यांच्यावर असलेली मराठी-छाप अवचित दिसून येते. या सर्वच ठिकाणी स्थानिक बोली न् ज्येते मराठा यांची मराठी बोली यांचा संकर होऊन मराठीची नवी बोली तयार होत होती , होत असावी.  

   

   नेमकी मराठीच्या या शुद्धीकरणाच्या नावानी त्या बोलींची मराठीशी असलेली नाळ सहज खुडण्याचे काम केले गेले कां ? हे बघायला हवे . त्याचा परिणाम म्हणून आज या प्रांतात "मराठी" नगण्य झाली की काय ? हा विचार करायला हवा.  मराठी साम्राज्याला न् संस्कृतिला संकोचित करण्याचे काम अशा चळवळी हिरिरीने करतात की काय ?  असे वाटले तर अजिबात चूक नाही. 

   भाषाप्रमाणीकरण म्हणजे काय ?  तर सोप्या भाषेत , "अनेक बोलीभाषांचा  कॉमनमिनिमम प्रोग्रॅम"!   विविध बोलीभाषांमुळे संवादात अडथळा येऊ नये म्हणून एका बोलीचा स्वीकार करीत इतर बोलीतील  शब्दांचा , मान्यतांचाही सादर समावेश करणे म्हणजे प्रमाणीकरण होय. 

   प्रमाणीकरण भाषेचेच होते असे नाही तर संकल्पनांचेही होते. जसे जुन्याकाळी ,"अष्टपुत्रा सौभाग्यवती भव" म्हणत प्रत्येक कुटुंबात आठ मुलांचे प्रमाण समाजमान्य होते. नंतरच्या काळात चार / तीन वर हे प्रमाण आले. त्यानंतर ," हम दो हमारे दो" झाले . आता त्रिकोणी कुटुंबाची संकल्पना प्रमाणित झाली. 

   तसेच  भाषेतही अधुनिक गरजा लक्षात घेऊन नव्या बोलीशब्दांचा समावेश आदराने करायला हवा. "पुस्तक भेटलं , भाजी भेटली , चहा मांडला , येऊन राहिला " , इत्यादी रचना कानी पडल्यावर लगेच हिणवायची गरज नाही. भले तुम्ही तसे बोलू नका पण त्यांना चिडवू नका . 

 औपचारिक लेखन करताना ही वाक्ये नक्की प्रमाणित करून द्या (शुद्ध नव्हे! )परंतु  बोलणा-याला  न तोडता !  हे  सांगणे काळाची गरज आहे , नाही ?  

 मराठा साम्राज्य आज केवळ महाराष्ट्रपुरते उरले आहे . त्यातही असे भेद करून प्रांतिक अस्मितेला बळ येऊन तिथली बोली प्रमाण करण्याच्या चळवळींना खतपणी आपणच घालत नाही ना ? याचा प्रत्येक मराठीचळवळींनी गांभीर्याने विचार करायला हवा.

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

   

  


शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...