Tuesday, January 4, 2022

 #सहजोक्त.

महात्मा कोणाला म्हणावे ? कां म्हणावे ? कोणाला म्हणू नये ? यावर मत मांडण्यासाठी हा लेख लिहीत नाही.


आत्मा म्हणजे जन्मलेला जीव . महात्मा म्हणजे अंगभूत थोरवी व  कर्तृत्वाने  मोठेपणा लाभलेला जीव. "जया अंगी मोठेपण तया यातना कठीण" हे सहण्याची तयारी असली की महात्मेपणा येतो.  


संस्कृत सुभाषिते मानवी व्यक्तिमत्वांना घडविणारी मनोविकासकं  असतात.  काही सुभाषिते तर 'वर्तनशास्त्राचे' सूत्र उलगडणारी समुपदेशकं असतात. 'महात्मा' शब्दाला ग्लॅमर मिळण्यापूर्वी देखील काही सुभाषिते रचलेली आढळतात. पुढील श्लोकात "महात्मा"  शब्दाची व्याख्याच सांगितली आहे जणू. 


विपदि धैर्यमधाभ्युदये क्षमा

 सदसि वाक्पटुता युधि विक्रमः। 

यशसि चाभिरुचिर्व्यसनं श्रुतौ प्रकृतिसिद्धमियं हि महात्मनाम् ॥


Patience in adversity, magnanimity in ascendancy, eloquence in assembly, bravery in battle,

 aspiration for eminence

  and engrossment in the Scriptures are the self-evident attributes of great men.


विपत्ति में धैर्य, अभ्युदय में सहिष्णुता, सभा में वाक् चातुरी, युद्ध में वीरता,

यश में उत्कण्ठा, वेद-शास्त्रों विषयक अनुराग, 

ये गुण महानुभावों के स्वभाव में ही पाये जाते हैं।


विपदि धैर्यम् म्हणजे संकटात धैर्य ,

अभ्युदये क्षमा म्हणजे  परमोत्कष काळात क्षमाशीलता ,

सदसि वाक्पटुता  म्हणजे सभेत वाक्पटुत्व ,

युधि विक्रमः म्हणजे युद्धात पराक्रम , 

यशसि च अभिरुचिः  म्हणजे यशाच्या शिखरावर असताना सदभिरुची (म्हणजे उत्तम छंदांची जपणुक),

व्यसनं श्रुतौ म्हणजे ज्याला वेदांचा व्यासंग आहे ,   ही सर्व लक्षणं  उपजत  महात्म्यांची आहेत . 


तर एकूण काय ? वरील पैकी काही लक्षणं स्वतःमध्ये आढऴली तर  बिंधास्त  स्वतःला 'महात्मा' समजा !  

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Monday, January 3, 2022

 #सहजोक्त.

पंचतंत्रातील एक श्लोक असं  सांगतो  की  सत्ता , पैसा ,तारुण्य व सौंदर्य या चारही गोष्टी डोक्यात हवा जाण्यास मदत करणाऱ्या असतात . 

 सत्ता म्हटले की प्रत्येकवेळी राजकीय सत्ता डोळ्यासमोर  आणू  नये.  संस्था , कार्यालय वा  घरातील सत्तेमुळेही   डोक्यात हवा जाते.  हे व्यवहारात , समाजात सर्रास आढळते. सत्ताकेंद्रबिंदूसाठीच परस्परां मधील रस्सीखेच , शीतयुद्ध होते. श्रेयवाद  हा ही  प्रतिष्ठेचा असतो.  

 न् याच श्रेयवादातून कोणाला तरी बाजूला टाकणे , कोणाबद्दल ग्रह करून  घेणे , कोणाची लायकी ठरवून त्याला योग्य संधीच मिळू न देणे ,  त्याच्या न्याय्य अधिकारांपासून वंचित ठेवणे असे नाना प्रकार सामाजिक व्यवहारात घडतात.   

 'आपला तो सार्थ अभिमान , दुसऱ्याचा  मात्र माज '  ,  

' आपला तो सर्व सर्वसमावेशी स्वभाव , दुसऱ्याची मात्र हेकट वृत्ती ' 

   'आपण फारच परोपकारी  दुसरा  मात्र कंजूस भारी'   

   'आपला तो रास्त दृष्टिकोण , दुसऱ्याचा मात्र टोकाचा दुराग्रह '  

     एक ना अनेक वागण्याच्या तऱ्हा अनुभवता येतात जगात. 

 वृत्ती म्हणून  'मी , बरोबर ' हे ठिक पण  "मीच, बरोबर" हे अयोग्य आहे.  पण लक्षात कोण घेतो ? 

  जगताना जे ताण अनुभवाला येतात , त्यातले अनेक  अशाच वृत्तीमुळे  असू शकतात.

  

संहतिः श्रेयसी पुंसां विगुणेष्वपि बन्धुषु

तुषैरपि परिभ्रष्टा न प्ररोहन्ति तण्डुलाः ॥


 तांदूळ पेरला तर रुजत , उगवत नाही .  तुष्याचे आवरण असलेला धान उगवतो.   निकृष्ट म्हणून काढून टाकलेले तुसे नसल्यामुळेच तांदूळ उगवत नाही .  तांदुळाला दुसरं आवरण लावूनही पेरता येत नाही.  

 आज  आर्थिक बोझ वाटणारे  किंवा तुल्यप्रतिष्ठ नसलेले  अथवा व्यवहारिक फायद्याचे नसलेले , संबंध  ताणताना किंवा टाळताना हेच लक्षात घेतले तर ? 

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, December 3, 2021

#शब्दचिंतन -सहजोक्त.


शब्दचिंतन

इंग्रजीतील फ्रेंड शब्दासाठी अनेक पर्यायी शब्द आहेत.जसे मित्र ,सखा,सवंगडी,वयस्य,जीवलग ,यार ,साथी,

मितवा,सहचर ,,सुहृद ,दोस्त इत्यादी इत्यादी.

पैकी यार-दोस्त हे नक्कीच फारसी-अरबी शब्द .

मितवा हा हिंदी शब्द अर्थात मित पासून मितवा ,गोडवा जास्त ना! मित शब्द नक्कीच मित्र पासून तयार झालाय. 

क्षेत्र,गोत्र,नेत्र ,वक्त्र,श्रोत्र ,स्तोत्र ,गात्र ,पात्र, ,शास्त्र, पवित्र,जनित्र या सगळ्या शब्दांमध्ये 'त्र 'साधनदर्शक प्रत्यय आहे.तसाच मित्र शब्द असावा का?? नेत्र म्हणजे नेण्याचे साधन ,वक्त्र म्हणजे बोलण्याचे साधन मग मित्र म्हणजे मोजण्याचे साधन ?? मनाची मोजमाप करायचे साधन तर नव्हे ??

सखा -सखी ज्याच्याशी सख्य असते.अतिशय जवळचा ,एक दिल -एक जान  असा जो तोच सखा.मित्र अनेक असू शकतात पण सखा दुर्लभच.

सवंगडी ,मराठमोळा शब्द. बालवयाचे ,एकत्र खेळणारे ते सवंगडी. 

वयस्य तर हमखास समवयस्कच हवेत. आबालवृद्ध कोणीही चालेल पण समवयस्कच हवेत.

जीवलग ,ज्याच्यावर जीव जुळलाय ,जीव लागलेला तो जीवलग. 

प्रत्येक मित्र सखा असेलच असे नाही तसेच  सखा  जीवलग होणे ही  विरळच . 

सुहृद् ,,ज्याचे हृदय सुंदर आहे तो .अर्थात जो मनातून आवडतो त्याचं ह्रदय सुंदरच असणार ना !

सहचर म्हणजे जो सोबत असतो . सहचर मित्रच असण्याची गरज नाही .सहकारी जसे सोबत काम करतात तसे सहचर सोबत विचरण करतात.साथ देतो तो साथी. 

 या सर्व शब्दांना समानार्थी म्हणतात.पण हे योग्य नाही.  इतक्या अर्थच्छटा आहेत यात. पण लक्षात कोण घेतो?? इथे माणसाच्या भावच्छटांंना जाणणे दुरापास्त तिथे शब्दच्छटा कोण बघणार??

  दाखवेगिरीच्या ,जाहिरातच्या जमान्यात गरजही कोणाला पडलीय  सख्य जपण्याचे वा जीव लागण्याचे ......

  मग काय मित्र ,सखा,वयस्य,,जीवलग काहीही म्हणाना ! "बोलाचीच कढी बोलाचाच भात " नाही कां??

  © डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, October 8, 2021

#सहजोक्त ....रेणुकामानसपूजा

             ॥ श्रीरेणुका-मानसपूजा ॥

अनादी निर्गुण मूळशक्तिरूपा

प्रकटली मातापुरी जगदंबा

कनवाळु जननी भक्तवत्सला  

माऊली परशुरामाची रेणुका  ॥१॥ 


मातृतीर्थी जावे , शुचिर्भूत व्हावे

मानसार्घ्य देऊन ध्यान करावे

मिटल्या डोळ्यात रूप साठवावे

रेणुकाचिंतनी रममाण व्हावे ॥२॥


माऊली रेणुका गडावर राहे

भक्तांची आतूर वाट ती  पाहे

सिंहासनावरि बैसोनि असते

बाळाच्या कल्याणा आई तत्परते ॥३॥


धूपदीप गंध, सुगंधी उटणे

 हिरवा-चूडा नि मळवट शोभे  

 भरजरी पातळ, कंठी दागीणे

 सौभाग्या ऐश्वर्या किमपी न उणे ॥૪॥

 

 षोडश पक्वान्ने, बहुवीध फळे

 नैवेद्याच्या राशी नि तांबूल वीडे

मंदिर आईचे फुलांनी सजले 

भक्तांच्या आनंदा उधाण आले ॥५॥


स्मरण , चिंतन नि मानसी ध्यान

वादन , नर्तन , आरार्तिक्य गान

आराधना नित्य अर्पुनिया भान

करावी आईची , सांडी अभिमान ॥६॥


ऐसी मानसपूजा नित्य करावी

संसारी वर्तनी सदा सर्वकाळी

करती-करविती तीच माऊली

साक्षीभावे राही भक्तांच्या ठाई  ॥७॥ 


'आई आई आई' ऐसा

नित्य करिते मी धावा 

 तुझ्या कृपेचा ग आता

 बाई  मागते  जोगवा

 तुजवर मी टाकला 

सारा भार जगदंबा

 निजहृदयी मजला

 देई गे ठाव  वत्सला ॥८॥

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.













 

 




 

Monday, August 16, 2021

#सहजोक्त.

 #शब्दचिंतन.

शब्द तयार होतात वर्णांपासून.  नाम , क्रियारूप इत्यादि  प्रकार शब्दांचे असतात. शब्दांना अर्थ असतो. 

दैनिक वापरात अनेक वर्षे असलेला शब्द कसा तयार झाला असेल ?  याचा विचारही मनात येत नाही.  अनेक शब्द मूळधातूपासून  तयार झालेले कृदन्त वगैरे असते.  पण  आपल्याला लक्षातही येत नाही . तसेच माझे झाले. 

काल  एक शास्त्रग्रंथ वाचताना "अध्याय" या शब्दाची व्युत्पत्ती वाचनात आली.  व्युत्पत्ती  वाचली न् डोक्यात लख्ख प्रकाश पडला . 

   अध्याय म्हटलं की  'धार्मिक ग्रंथातील एक भाग '  असं  सामान्यपणे वाटते. 

   'न् अशा प्रकारे त्यांच्या जीवनातील तो अध्याय संपला' ,   'न् अशा प्रकारे त्यांच्या जीवनातील ते प्रकरण संपले'  अशी वाक्यरचना  मराठीत रूळलेले आढळतात.   इथे   अध्याय आणि प्रकरण हे दोनही शब्द वरपांगी  समान वाटतात.   नाही कां ? 


काव्यप्रकाश या ग्रंथात उल्लास हा शब्द योजला आहे.

रामायण या ग्रंथात कांड असा शब्द योजला आहे. भगवद्गीतेत अध्याय आहेत. मुद्राराक्षसात अंक आहेत. महाभारतात पर्व , अष्टाध्यायीत अधिकरणं आहेत. 


अशा प्रकारे जुन्या ग्रंथात छोट्या-छोट्या भागांना  अध्याय ,  प्रकरण , उल्लास , आह्निक , कांड , अंक , पर्व ,  पाद , अधिकरण  वगैरे  शब्द  वापरलेले आढळतात.  

ग्रंथाचे  'विषयांशानुसार केलेले विभाग' या अर्थाने हे सर्व समान आहेत असे वाटते. पण तसे नक्कीच नाही.  वर उल्लेखलेल्या प्रत्येक शब्दाची खास , वेगळी  व्युत्पत्ती आहे. न् तेव्हाच्या ग्रंथकारांना  न् अभ्यासकांना त्या त्या शब्दाच्या अर्थच्छटेतील बारकावे नक्कीच परिचयाचे होते. म्हणून आपापल्या ग्रंथातील छोट्या, छोट्या भागांना सरसकट एकच नाव न देता ग्रंथविषयाला अनुसरून  नाव दिले आहे. 

"अध्याय" या शब्दाची व्युत्पत्ती अशी , 

"*अधीयतेऽस्मिन्ननेन वाऽर्थविशेष इत्यध्यायः ।* 

 *तेन अधीयते इत्यध्यायः ।*"  

 म्हणजे  ज्यामुळे , ज्याच्याद्वारे  , ज्याच्याने  अध्ययन केले  जाते तो अध्याय. अधि+ इ धातूचा  अर्थ,   स्मरण करणे / विचार करणे असा होतो. याच धातू पासून अध्ययन-अध्यापन  (मराठीत शिकणे ,शिकवणे या अर्थाने रूढ शब्द) हे शब्द प्रचलित आहेत.   स्वतःहून विचार केल्याशिवाय शिकताच येत  नाही म्हणून अध्ययन म्हणजे 'शिकणे'  इतकाच  गुळगुळीत अर्थ घेऊ नये .   स्वतःहून विचार करण्याची प्रक्रिया   किंवा  विचारान्ती स्मरणात ठेवण्याची क्रिया ,  जेव्हा सुरू होते तेव्हाच खरे 'शिकणे' असते.  या अर्थाने अध्ययन-अध्यापन हे शब्द  समजून घ्यावे . 

  तर "अध्याय म्हणजे ज्याच्या मुळे स्वतःहून विचार करण्याची वृत्ती वाढेल असा  ग्रंथ-भाग" ,  हा  अर्थ जास्त सयुक्तिक ठरेल , होय ना ?  न् या पुढे  "अध्याय" शब्दाचा अर्थपूर्ण वापर करता येईल , असं वाटते.  

  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

  

 

 

Monday, August 9, 2021

#सहजोक्त.

 


.

न केवलं यो महतोऽपभाषते श्रृणोति तस्मादपि यः स पापभाक् ।

 कालिदास विरचित कुमारसंभंवाच्या पाचव्या अंकातील चौदाव्या श्लोकातील हा उत्तरार्ध आहे. 

 महान लोकांविषयी (सज्जन व संतांविषयी) जो  अपशब्द बोलतो  न् जो (परनिंदा) ऐकतो    , तो देखील पापाचा वाटेकरी होतो. 

ऐकणाराच नसेल तर सांगणारा कोणाला सांगेल ?   चुगल्या करणाऱ्या इतकाच चुगल्या ऐकणारा दोषी असतो. 

समाजातील कलुषितता कमी करायची असेल तर परनिंदा/चुगल्या/विद्वेष पसरवण्यांचे  साधन बनणे सोडावे लागेल. 

कोणी काय बोलावे ? हे आपल्या हातात नाही . पण आपण काय ऐकावे ? न् काय ऐकूच नये , याची निवड आपल्याच हाती ठेवावी.  याकाळात तर हा गुण नक्की अंगी बाणायला हवा , नाही कां ?

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, July 27, 2021

#सहजोक्त.

 #शब्दचिंतन .

जेव्हा पासून संवाद-साधनांची बहुलता झाली , तेव्हा पासून विविध प्रांतांतील नावांची देवाण-घेवाण सर्रास होऊ लागली.  काही नावे ही त्या त्या प्रांतांची खास होती , जी आताशा सर्वत्र दिसू लागली. 

भाषा ही प्रवाही न् परिवर्तनशील असते . भाषांमधील व्यक्तिवाचक नामांनाही हेच तत्त्व लागू पडते.  

नीतिन , जतीन , सचीन , देवेन  ही नावे  मूळ मराठी निश्चितच नाहीत.  जुन्या काळात अशी नावे मराठी घरात आढळत नाहीत.  बंगाल-क्रांतीचा प्रभाव , आधुनिक साहित्यांची देवाण-घेवाण यामुळे बंगाली नावे ठेवण्याचे प्रचलन वाढले.  त्यातूनच ही नावे आली असावीत.


बंगाल/पंजाब आदी प्रांतात नावाचा संक्षेप करण्याचा प्रघात आहे. या वृत्तीमुळेच बंडोपाध्यायचे बॅनर्जी , मुखोपाध्यायचे मुखर्जी , चटोपाध्यायचे चॅटर्जी सहज प्रचलित झाले व बंगलने स्वीकारले . 

वरील नावांच्या व्युत्पत्ती बाबतीत दोन मत प्रवाह आहेत.

नीतीन्द्र , जतीन्द्र ,सचीन्द्र ,  देवेन्द्र यां नावांचे संक्षेप होऊन   नीतिन , जतिन  वगैरे नावे तयार झाली असावीत. कारण नावांचे संक्षेप करण्याची बंगालीभाषेची वृत्ती. 

किंवा  ही नावे तद्भव अशी आहेत  कारण  ती मूळ संस्कृतातून घेतली आहेत. 

नीति+ इन्  = नीतीन्  (ज्याच्यात नीती आहे ,असा तो नीतीन् ) याचेच मराठीकरण "नीतीन"  झाले.   अशाच प्रकारे बाकी नावांचेही स्पष्टीकरण  देता येईल.

सचीन या नावाचे विशेष  सांगायला हवे. "सच्"  या मूळ धातूचा अर्थ  to understand clearly, to be related, to be connected.  स्पष्टपणे समजणे , संलग्न असणे , जुळले असणे इत्यादी होतो.  आता या धातूपासून अनेक कृदन्त व तद्धित नामे तयार होतात. "सचिव" हा शब्द याच धातू पासून तयार झाला आहे.  सचिव शब्दाचा मूळ अर्थ समजावून घेणारा , स्पष्ट करून देणारा , जुळलेला  इत्यादी होईल. संस्थेचा वा व्यक्तीचा सचिव हेच करणारा असावा , अशी अपेक्षा चूक नाही.   अतिजुन्या काळी र‍ाजेलोकांचे नर्मसचिव असायचे , म्हणजे राजाच्या नाजुक संबंधांना (थोडक्यात लफड्यांना) मदत करणारा !   आताही मोठ्यांचे सगळेच मोठे , आपल्याला कळेलच असे नाही ! 

"सचीन"    या नावातही "सच्" हा धातू आहे. सचीन म्हणजे समजावून घेणारा , समवयस्क  असा व्यक्ती. 


व्यक्ती जन्माला आली की त्याचे आईवडील नामकरण करतात. पण आपल्या नावाचा नेमका काय अर्थ होतो, हे जाणून घेणे योग्य ठरते.  

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...