Monday, October 23, 2017

#सहजोक्त



परवा खूप दिवसांनी लहानपणीची मैत्रिण दिवसभर रहायला आली . इतके वर्षांचे साठवलेले ,मनाच्या कोप-यातले अनेक विषय अलगद  निघत होते ,गप्पा रंगत होत्या . ती पत्रकार मी  शिक्षक .  त्यामुळे फंडू आदर्शवादापासून व्यवहारिक वास्तवापर्यंत सर्व स्तरावरील सर्व विषयांच्या सगळ्या पातळ्यांवर गप्पा हाणत होतो. अनायासे अद्वैत नि शरद बाहेर गेले होते. म्हणजे "होल वावर वॉज अवर्स "!   कोण कसे रिऍक्ट होतात.यावर गाडी आली. कोणी उगाच स्पर्धा करतात , अकारण  वैर करतात. कोणी अकारण मन दूषित करतात . कोणी टोळकं बनवून वाळीत टाकतात असे एक ना अनेक  विषयांवर मस्त मनमुराद चर्चा झाली.
 बोलतांना ती म्हणाली ,," अग ,आपण आपलं सरळ ल्यूडो खेळल्यासारखं  आयुष्यात आलेलं दान समजून ,स्वीकारून पुढे जात असतो. पण काही लोक ठरवून बुद्धिबळाचा पट मांडून प्यादे जमवतात , वजीर स्वत: होतात , कोणाला घोडा,कोणाला उंट ,कोणाला काय काय करून वापरतात नि आपल्याला टॅकल करून  संपवण्याचा डाव आखतात. आपण गाफिल कधी सापडतोच यांच्या कटात मग आपले अतोनात नुकसान होते ."
तिचे बोलणे ऐकून मी विचारात पडली. खरच कितीदा आपण असे अवचित फसलो ? याचा हिशेब करू लागली. लख्ख  दिसू लागले एकेक प्रसंग. खरोखर सगळ्यांना आपुलकीने ,समानतेने ,न्यायाने वागवतांना ,सांभाळून घेण्याच्या नादात आपण  स्वत:लाच कितीदा डावलले ? याची मोजदाद कठीण होऊन बसली. मी चिंतनात व्यग्र झाली. तशी ती परत  म्हणाली ,"काय मिळतं त्यांना असे वागून ?" "अ ? हो ना!,खरेय!" असं काहीतरी बोलली नि पुन्हा विचारविवर्तात गढून गेली.. . . . . . .      .
इतकी बुद्धिमत्ता, येवढं कर्तृत्व केवळ दुस-याची रेष कमी करायला वा त्याला अपमानित करायला किंवा स्वत:च्या जपणूकीसाठी दुस-याचा बळी द्यायला वापरतांना यांचे मन कसे धजावते ? इतकं कसं सरावतं निर्ढावलेपण कि संवेदनाच संपून जातात. कोणतं यश मिळतं असं दुस-याला असहाय, लाचार करून  स्वत:चा मोठेपणा मिरवण्यात?  खरच हीच कर्तृत्वाची परिसीमा आहे कि मानसिक विकृती ? ... .. . .  . .
पुन्हा तिने तंद्री भंग केली . "काय विचार करतेय?" तिने विचारले. मी म्हटलं ,"अगं प्रयत्न करूनही आपल्याला ते बुद्धिबळ जमेल कां? निरपेक्ष सर्जनशील मन असे कारस्थानं करेल तर सर्जनशीलता संपणार नाही कां? आपण आपलं आपल्या स्वभावानुसार  वागावं ग साधं सरळ ,सकारात्मक  . . त्यांचे संस्कार ,त्यांचे वर्तन ,त्यांचे डावपेच त्यांना लखलाभ .. .  त्यांनी कितीही मात दिली ,तात्कालिक फायदा लुटला . . सोड आपण त्यांचा विचारच करू नये. . आपण आपली मुंगीची गती नि प्रयत्नवाद कधीच सोडू नये. .  . . हे केवळ तत्त्वज्ञान नाही हं सांगत.  . .  अनेक प्रसंग आले नि गेले .  . मी याच पद्धतीने वागते. कधी मला पण  निराशा येते , सारं व्यर्थ आहे वाटतं मग .  मी मार्ग बदलवते नि पुन्हा ध्येयाकडे संथ-सातत्याने चालू लागते. . कोणी सोबत असो नसो .  कोणी मला हारवले याचा आनंद घेऊ दे वा मी संपल्याची खुशी मिळवू दे. . मी आधीपण तीच  होती ,आताही तीच आहे ,पुढेही तीच नि तशीच राहील. सरळ ,कार्यरत ,सकारात्मक. . .   बुद्धिबळाचा डाव मांडून विजयी होऊन एकटं उरण्यापेक्षा , एकट्यानेच ल्यूडोसारखं पाऊल पुढे पुढे टाकत आपल्यासह सगळ्या "आपल्यांना" घेत  समूहाने विजय साजरा करणं केव्हाही छानच ना !
नाही विजय मिळाला तरी समाधान नक्कीच मिळतं बघ. तीच तृप्ती चेहरा सांगतो ,तुमचं सहज वागणं समजतं जगाला . . कोणी कितिही लपवलं तरी तुमच्या सच्चेपणाचा धाक असतोच त्या तशा कर्तृत्ववान लोकांवर . .  . . कुणी निंदा कुणी वंदा आमुचा स्वहिताचा धंदा सोडू नये.  . .
..  . . .  मी स्वगत बोलत होती ,  ती ऐकत होती .  शेवटी म्हणाली ,"खरय ग तुझं .  . ज्ञानेश्वरांचे पसायदान ,शंकराचार्यांचे निर्वाणाष्टक म्हणूनच भावतात ,रुजतात मनात . .. . .  . . आपला सकारात्मकतेचा मूळ पिंड  सोडूच नये. हेच खरं . .

ही दिवाळी करोखर दिवा उजळून गेली अंतरीचा !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 ‎

Monday, October 2, 2017

सहजोक्त


#सहजोक्त

संक्रमण>संसर्ग>लागण
हे रोगराईाठी वापरलेले शब्द वाटतात.
पण तसं नाही.चांगल्या -वाईट, प्रवृत्ती-कृती यांचाही संसर्ग>संक्रमण>लागण होत असते ना !
आपण निराश असलो तर जगही निराश भासते.
आपण खुश असलो तर जग खुश दिसते.
निराशावादाने नकारात्मकता पसरते.
संशयीवृत्तीने पछाडले की संशयकल्लोळ होतो.
अहंकाराने व्यापले की सर्वत्र अहंकारच दिसतो.
जसे विचार तसे आचार.
जसा आचार तसा प्रभाव व परिणाम.
सकारात्मक रहाल तर तेच हजारपट होऊन तुमच्या जवळ येणार.
EVERY ACTION HAS EQUAL AND OPPOSIT REACTION.
जैसी करनी वैसी भरनी
पेराल तेच उगवेल.
करावे तसे भरावे.
हे सगळं सगळं माहितच आहे .मग मनात निराशाभाव कां???
निराशात्मक/कलुषित भाव तसेच प्रतिसाद देतील.
चला .
आज आत्ता ताबडतोप आपण आतून आनंदी होऊ या.आपला आनंद कोण्या व्यक्ती/ वस्तु/ बाह्यालंबनावर आधारित नको.

सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो.
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो.
स्वतत्त्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो
पुन्हा न मन हे मळो, मती सदुक्त मार्गी वळो॥
..
मोरोपंतांच्या केकावलीचा अर्थ घेतांना "सुसंगती"म्हणजे चांगली संगत हा च घेतात साधारणपणे.
पण इथे सुसंगती = coordination >विसंगत नसलेले ,अनुरूप ,तर्कसंगत असा अर्थ जास्त प्रभावी वाटतो. आपल्या अवतीभवती कोणत्याही मनोवृत्तीचे लोकं असू देत ;त्यांची कृती मला सुसंगत ठरू दे, हे महत्वाचे.
"सुजनवाक्य कानी पडो"म्हणजे समोरच्याच्या मनात काहीही असो ,वाक्य सुजनच असावे.रामदास स्वामी म्हणतात "सर्वा मुखी मंगल बोलवावे ".
म्हणजे त्यांची इच्छा असो वा नसो ,वृत्ती असो वा नसो आपली प्रतिसादात्मक कृती इतकी प्रभावी असावी की त्यांच्या तोंडून "मंगलच" निघावे, सुजनवाक्यच कानी पडावे ,वाईट ऐकू नयेच.
मानवी बुद्धीला जन्मापासून नकारात्मकतेचीच सवय असते ,तोच बुद्धीचा कलंक होय.तो झडलाच पाहिजे.
विषय म्हणजे भौतिक सुखात लिप्त होणे ,त्याच आठवणींत रेंगाळणे.तोच चाळा बुद्धीला लागतो ,तो अावडेनासा होऊ दे."स्वतत्त्व" हृदयाला कळू दे.दुस-यांचा मोठेपणा सहज कळतो पण "आपण" कोण ते कळत नाही.आपण आपल्यावर मनापासून प्रेमच करीत नाही,दुस-याने प्रेम करावे असे अपेक्षितो . ~दुसरोंकी जय से पहले खुद की जय करे~ हे लक्षात ठेऊन आचरावे.स्वत:ला स्वत: स्वीकारणे फार अवघड.एक तर न्यूनगंडात जगतो वा अहंगंडात.कोणताही गंड न बाळगता 'मी' समजून घेत 'मी'शी एकरूप व्हावे ना !विपश्यनाच ना ती!!!
याच्या पुढची पायरी म्हणजे दुरभिमान गळून जाऊदे.जे क्षणभंगूर आहे ,पद-प्रसिद्धी-पैसा-सत्ता यांच्या पलीकडे माणुसकी .तीच चिरंतन.मग अभिमान कशासाठी??तोच दुरभिमान गळून जावा.गळणे स्वाभाविक प्रवृत्ती आहे."अति झालं न् उतू गेलं" असं व्हावं दुरभिमानाचही."मी दूर केला माझा अभिमान "म्हटले की कर्तृत्व आले आपल्या कडे. नकोच उपाध्या ,गळू दे सारे,सडके फ़ळ गळावे तसे.
एकदाचे हे सगळे करून मन निर्मळ झाले की पुन्हा मळू नयेच कारण स्वच्छ कपड्यावर डाग लवकर पडतात.निर्मळ मन सदुक्त मार्गावर चालू दे.
सत्+उक्त  . सद् म्हणजे चांगले /सत्य इतके नाही तर अस्तित्वात असलेले. जे जे उत्तम उदात्त मंगल तेच सत्  तेच टिकाऊ बाकी टाकाऊ.
तर मन सदुक्त मार्गावर चालू देत.
तर आजपासून आपण जगात वावरतांना सकारात्मक/मंगल विचारांचे संक्रामक बनून वागू या. आज आपण अल्पसंख्य असू कदाचित् पण नक्की बहुसंख्य होऊ लवकरच."एकोSहं बहुस्याम्" हे चिरंतन सत्य आहे.
चला तर संक्रमण करूया सद्विचारांचे , लगण करू मांगल्याची ;सद्विचारांचा संसर्ग वाढवू या.
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, September 30, 2017

#सहजोक्त

#सहजोक्त

=शोध स्वत:चा=
कालचा दिवस जरा समाधान देऊन गेला.
आजही, याकाळातही उच्चशिक्षण सोपे नाही. पिएच्डी  करावे हे जुने स्वप्न होतं .त्यानुसार डॉ. स्मिता होटे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी केली २००८ मध्ये . झपाटून कामाला लागले. कॉलेज-घर-सामाजिक कार्य सारं करून  २०१०ला सादर केला प्रबंध . २०१२ला पदवी मिळाली.
आजकाल आनेकजण ही पदवी मिऴवतात . मग मी वेगळं काय केलं ? प्रबंधाचा समाजाला ,लोकांना उपयोग काय ? असे प्रश्न मनात येत होते. काल ईमेलवर पत्र आले नि मनाला  या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली  .
कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना पिएच्डी करण्यासाठी अभ्यास रजा देत नाहीत वरून अधिक कामे लादतात. शिवाय या पदवीमुळे इन्क्रिमेंट वगैरे मिळत नाही. उलट "आम्ही तुमच्यासारखे पिएच्डी नाही बॉ"! असे आपुलकीचे बोल कानी पडतात.

तरीही मी "ही पदवी मिळवायचीच " असे ठरविले होते. विषय होता ,"विभिन्न राज्यातील माध्यमिक स्तरावरील क्रमिक संस्कृत पाठ्यपुस्तकांचे तौलनिक अध्यायन" .
भारतातील १८ राज्यांची शालेय संस्कृत पुस्तके गोळा केली. यासाठी मदतीला धावले श्रीकांतजी देशपांडे काका ,विद्याभारती संघटन मंत्री. त्यांच्या नेटवर्क मुळे सगळी पुस्तके मिळाली.
आज माझा प्रबंध NCERTने संदर्भसाहित्य म्हणून मागवला. इतकी मोठी संस्था याच विषयावर शोधकार्य करीत आहे. त्यांच्या प्रकल्पाचा सगळा खर्च केंद्रशासन करते. यंत्रणा त्यांच्या दिमतीला अाहे.
 मी तेव्हा  स्वबळावर केलाय याचा आज आनंद आहे.
आज कृतकृत्य वाटत आहे.देवाची कृपा ,गुरुजनांचे आशीर्वाद,स्नेहींच्या सदिच्छा नि घरच्यांची भक्कम साथ यामुळेच  हे शक्य झाले.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे

Wednesday, September 13, 2017

#चिंतन.

#चिंतन.
          भाषा . अभिव्यक्तीचे साधन. व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग. भाषा ही प्रवाही , कालौघानुसार परिवर्तनशील असते. काळ-समाज-व्यवसायावरून भाषेत अंतर पडते.
           भाषेचे मूळ अक्षरे आहेत. अक्षरांपासून शब्द तयार होतात. शब्दांचे वाक्य. वाक्यातून साहित्य. वाक्यातून व्यवहार. व्यवहार नि साहित्य दोन्ही ही भाषेला समृद्ध करतात.

     जगात अनेक भाषा आहेत. प्रत्येक भाषेचे स्वत:चे वैशिष्ट्य असतेच.भाषांच्या अभ्यासाला भाषाविज्ञान म्हणतात. भाषाविज्ञान ही पाश्चात्यांची देण आहे ,यात दुमत नाही.
     भाषाविज्ञानात ध्वनि ,रूप आदिंचा विचार केल्या जातो.विविध भाषांची समानस्थळे , विभिन्नता ,वैशिष्ट्य ,वैविध्य यांचा व्यवस्थित ,रितसर अभ्यास करण्याचे हे शास्त्र होय. भाषाविज्ञानाने मानवी दृष्टिकोण विशाल होण्यास मदत होते. तसे बघता हे शास्त्र बरेच अलीकडचे आहे.
     भारतीय ज्ञानपरंपरा अतिशय प्राचीन आहे. वेद व वेदवाङ्मय हे भारतीय ज्ञानाचे मूळ स्रोत आहेत.
     वेद चार भागात विभागले आहेत.  चारही वेद  पाठ असलेले चतुर्वेदी . तीन वेद पाठ असलेले त्रिवेदी ,दोन वेद पाठ असलेले  द्विवेदी.
आज ही केवळ अडनावे आहेत. वेद शिकण्यासाठी जे सहायीभूत विषय आहेत त्यांना वेदांगे असे म्हणतात.
 वेदांगे सहा आहेत.वेदांगात जो निष्णात तो मिश्र.
 मिश्र ही पदवी होती प्राचीन काळी ,आज अडनाव आहे. वेदांगे पुढील प्रमाणे.
     शिक्षा =उच्चारण शास्त्र
     कल्प = यज्ञ मांडणी करण्यासाठी मोजमाप
     छंद = वृत्त ,पद्य लयीत व सुरात म्हणण्यासाठी  रचनाशास्त्र
     ज्योतिष = काळ-वेळ ,ग्रह-तारे , भूगोल-खगोल ,यांचे गणित ज्यांच्या योग्य मेळातून यज्ञ निर्विघ्न व्हावा.
     व्याकरण =  शब्दानुशासन  . शब्दांचे नियमन ,संयोजन , आयोजन ज्यात केले जाते. ते व्याकरण.
     निरुक्त = शब्दव्युत्पत्ती शास्त्र.निरुक्त म्हणजे सोप्या भाषेत प्राचीन भाषाविज्ञान . निरुक्ताचे रचनाकार यास्काचार्य होय.
     ज्योतिष व व्याकरण तसे जनसामान्यांनाही माहित असलेले विषय.
मात्र निरुक्त तितके माहित नसते. खरं तर दैनंदिन जीवनात जे शब्द वापरतो त्यांचे मूळ शोधणे हा रंजक विषय होय. वेदांमधील शब्दांचे समानार्थी कोष निघंटू नावाने अोळखल्या जातो. हा जगातील प्राचीनतम कोश होय.
     निरुक्त हा विषय मोठा रंजक आहे.
     त्यात शब्द कसे तयार झाले ते उलगडून सांगितले आहे. वेदांगांवर सविस्तर लिहायला हवेच .या लेखात जस्ट ट्रेलर!
     काही शब्दांची व्युत्पत्ती पाहू.
     शाखा =  ख म्हणजे आकाश नि श म्हणजे झोपणारे.   आकाशात झोपतात त्या म्हणून  त्यांना श‍ाखा म्हणतात.

     हस्त =   कोणावर उगारायला वा कोणापासून वाचायला जो आड येतो तो हात.
     छात्र =  गुरुचे दोष जो झाकून नेतो तो छात्र.
  पुत्र =  पुम् नामक नरकातून पितरांना वाचवतो ,तो पुत्र.
  अन्य =न आनेय इति परक्याला आणू नये या अर्थाने मूळ शब्द आता अन्य ,दुसरा ,परका या अर्थाने रूढ आहे.
  कर्ण = कृन्त् नावाच्या मूळ धातू पासून तयअर झालेला हा शब्द. कानाचे द्वार कापलेले असते म्हणून.
  अक्षी = डोळे या अर्थी असलेला हा शब्द.चक्ष् या पाहणे अर्थी धातूपासून तयार झाला आहे.अजून एका मता नुसार हा शब्द अञ्ज् लेपणे या अर्थाच्या धातूपासून तयार झालाय कारण डोळा प्रकाशाने वस्तूला लेपतो मगच ती दिसते.
  हृद = हृद् ,आवाज करणे या अर्थी असलेल्या धातूपासून तयार झालेला शब्द . याचा अर्थ मोठी विहीर हा होतो.
  चित्त = चित् विचार करणे या अर्थी असलेल्या धातूपासूनथयार झालाय हा शब्द. चित्त नेहमी विचार करते.
  आदित्य = किरणांच्या द्वारे जो पृथ्वीवरील रस शोषून घेतो तो आदित्य.
  राजा = राज् ,सत्ता गाजवणे या अर्थी असलेल्या धातूपासून  हा शब्द तयार झाला.
  सेना =  स+इन . जिला स्वामी ,नेता आहे ती. किवा जी समान गतीने चालते ती.
   
असे अनेक शब्दांची व्युत्पत्ती निरुक्तात सांगितली आहे. एकूणच निरुक्त वाचणे म्हणजे भाषिक प्रगल्भता प्राप्त करणे होय.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
   
   
   
     

#सहजोक्त.

#सहजोक्त.
कालच्या उच्चांकाचा सतत ढिंडोरा पिटवून उद्याचा फायदा करून घ्यावा हे मला जमलेच नाही॥

सर्वांशी मनापासून समतेने वागण्यामुळे अनेक चढेल झालेत हे  कळतं पण माझा स्वभाव नाही वळत॥

सगळ्यांना भावनिक जपताना कित्तेकदा आतून  मन-भावना कोलमडून पडलेले असहायतेने  स्वत:ला अनुभवले ॥

मी नव्हे आपण हे तत्व रुजवताना सर्रास ढकलून निघून गेलेल्या आपल्यांना मी जवळून पाहिलय ॥

थोड्या पदासाठी वा महत्वासाठी सरळ सरळ प्रतारणा करणारे अनेक दिसले मला ॥

चालत्या गाडीला खीळ घालणारे   तोंडपूजे नि पायखिचे अनेक आलेत वाटेत ॥

उगाच जळणारे ,उगाच मरणारे , उगाच येलणारेही बहूत गवसले प्रवासात ॥

आपुलकी दाखवत  घंटोंशी गप्पा मारणारे, केसाने हळूच  गळा कापताना पाहिले ॥

दुनियेचे रंगढंग पाहिले , अनुभवले पण तसे व्हायचे कधीच जमले नाही ॥

माझ्या एकटीच्या मार्गावर पावला पुरता प्रकाश करीत संथ तटस्थतेने सहज चालतेय मी ॥

अशीच समोरही चालत राहील ही तर नियती माझी नि कृपा गुरुची ॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.





Wednesday, September 6, 2017

#चिंतन.

 #चिंतन.
आजचा विद्यार्थी -चक्रव्युहात फसलेला  अभिमन्यू .

अभिमन्यू  ,कोवळा पण उत्साहसंपन्न वीर योद्धा . अोढून आलेल्या प्रसंगाला धैर्याने सामोरे जातो . चक्रव्यूहात सगळ्या थोर महान् दिग्गज तेही जवळच्या नातेवाईकांविरुद्ध एकाकी लढत होता . मदत करणारे मार्गदर्शक जवळ नव्हते. पराक्रमाची शर्थ केली त्याने  , अनुभवाची कमी  , अपूर्ण ज्ञान पण ध्येयासक्ती अफाट . बरीच झुंज दिली पण शेवटी गारद झाला दुनियादारीच्या रगाड्यात .

हे सगळं आठवायचे कारण आजचीे शिक्षणव्यवस्था  , ट्युशनचे महाभारत नि आजचा अभिमन्यू विद्यार्थी .  कोणे एके  काळी सहायक , पूरक म्हणून सुरू झालेला हा उपक्रम संपूर्ण व्यवस्थेला गिळंकृत करणारा अमरवेल ठरत आहे .
 आजचा काळ प्रचंड संक्रमणाचा काळ आहे . सामाजिक , राजकीय ,  सांकृतिक , कौटुंबिक
 सा-यांचा परिणाम शिक्षणक्षेत्रावर होतांना दिसतो आहे . यातच शिक्षणक्षेत्राचे प्रचंड अपयश दडले आहे . ज्या क्षेत्राने समाजाला दिशा द्यायची तेच आज दिशाहीन वाटू लागले . जो तो घटक भाराभिभूत , संभ्रमित तात्त्विक आदर्शवादी होऊ पाहतो आहे . 'परोपदेशे पांडित्य' सुचविणारे अनेक सोकॉल्ड शिक्षणतज्ज्ञ , स्वनामधन्य मान्यवर आज या क्षेत्रात प्रचंड वाढले आहेतच.
 जागतिक स्पर्धा , वेगवान् परिवर्तने , नव्या युगाची आव्हाने नि वर्षानुवर्षांच्या रूढींवर चाललेले शिक्षण यांचा परिपाक म्हणजे आजची संक्रमणावस्था नि संभ्रमण . या सगळ्यांच्या गलबल्यात एकाकी लढणारा वा हारलेला अभिमन्यू रूपी आजचा विद्यार्थी .
 परिस्थिती गंभीर चिंतनीय आहेच . सुदैवाने शासनाने अनेक ठोस पावले भराभर उचलले आहेतच .  पण क्षेत्राच्या अंगी भिनलेले अनेक विकार सहज बदलतील असे नाही.  उलट  चांगल्या बदलांना स्वत:च्या क्षुद्र स्वार्थासाठी वाटेल तसे बदलतील . छोटं उदाहरण देऊन स्पष्ट  करते.  काही वर्षांपूर्वी सातत्यपूर्ण संर्वंकष मूल्यमापन पद्धत
  सा-या भारताप्रमाणे महाराष्ट्रात लागू केली होती .  मुलांचे दैनिक निरीक्षण करणे , त्यांच्या प्रगतीची नोंद ठेवणे , कलागुणांची नोंद करणे. जे कमी आहे ते योग्य रितीने वाढविणे इत्यादि बाबी अपेक्षित होत्या .
 पण इतके वर्षांचे फलित काय तर दैनिक बोंबाबोंब !
 शालेय शिक्षणाची ही अवस्था तर कनिष्ठ महाविद्यालय किंवा उच्चमाध्यमिक स्तराची त्याहूनही भयंकर गती आहे .
 मूळात ११ व  १२ वी  हा अत्यल्पसंख्याक घटक असून अतिदुर्लक्षित आहे.  यातही दोन प्रकार आढळतात. एक वरिष्ठ महाविद्यालयास जोडलेला तर दुसरा शाळेला जोडलेला . शिक्षणविभाग रूपी इंजिन समान असून एक एक्सप्रेस गाडी तर दुसरी मालगाडी इतका दोहोंशी वागण्यात भेदभाव आहे. काही वर्षांपूर्वीच्या माजी शिक्षणमंत्र्यांच्या कृपेने त्यात अजून एक वर्ग तयार झाला , तो म्हणजे कायमविना अनुदानित म्हणजे सामान्य भाषेत रोजंदारी शिक्षक . आधीच अल्पसंख्याक त्यात असंघटीत, मग काय ? मुका बिचारा कुणीही हाका !

 साधारणपणे १२वी नंतर विविध पदवी-अभ्यासक्रम असतात . म्हणजे ११ नि १२ हा शैक्षणिक स्तर शालेयशिक्षण व पदवीशिक्षण यांना जोडणारा दुआ आहे .  पण फार वर्षांपासून या स्तराकडे गांभीर्याने कोणीच पाहिले नाही.
  ना पेशा म्हणून लागलेल्या शिक्षकांनी , ना पालकांनी ना संस्थाचालकांनी , ना शिक्षण विभागाने  व वक्रदृष्टीने पाहिले ते अख्ख्या शिक्षण- यंत्रणेच्या मुळावर उठलेल्या ट्युशनच्या धंद्याने .
  शिक्षक ही वृत्ती नसून पेशा आहे हेच इतके वर्ष समाजाच्या अंगी भिनले आहे.  या सगळ्या कारणांमुळे सगळ्यात मोठे नुकसान विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे होते आहे.  पर्यायाने वर्तमान पालकांचेच आर्थिक स्वरूपात प्रत्यक्ष नुकसान होते आहे . या स्तराला शिकविणा-या शिक्षकांचा बौद्धिक  -हास होतोय तो वेगळा .
  आज या स्तरात शिकणा-या विद्यार्थ्याची अवस्था अभिमन्यू सारखी झाली आहे यात शंकाच नाही .
  क्लास ,कॉलेज ,करियर यांच्या चक्रव्यूहात तो पुरता अडकलाय. कित्तेक वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे खच्चीकरण , अवमूल्यन , अवप्रतिष्ठा , उपेक्षा त्यांनी स्वत:  तर केलीच आहे  शिवाय शासनातील भ्रष्ट घटक , संस्थाचालक ,  माजलेले ट्युशनसम्राट  तसेच अधिकार व कर्तव्य यांची गफलत झालेला समाज  हेही घटक या अधोगतीला कारणीभूत आहेत .
 जेवढे जेवढे या चक्रव्यूहातून सुटण्याचा प्रयत्न करावा तितकं अधिक फसल्या जात आहे.

 आता एकेका घटकांचा विचार करू.

 शिक्षक =
 आज उच्चमाध्यमिक शिक्षक म्हणजे असून अडचण नसून खोळंबा झालाय. शिकवायची इच्छा आहे पण विद्यार्थी नाहीत . विद्यार्थी आहेत तर शाळा-कॉलेजने लादलेल्या शिक्षणेतर कामात गुंतलेला असतो .  त्यामुळे काम नाही नि पगार भरपूर म्हणून शाळेचे इतर घटक प्रचंड जळतात . इकडे विषय ज्ञान गंजते म्हणून शिक्षकांची तगमग होते . प्रवेशाच्या वेळीच पालक सांगतात , अमूक ट्युशन लावल्या आहेत तर कॉलेज नाही केले तर चालेल ना ?
 ट्युशन शिक्षक सांगतात , "कॉलेजच्या मास्तरला १२वीचे ही येत नाही . ते काय फक्त बोर्डाच्या पेपरापुरता कामाचे . तसेही त्यांना तुम्हाला पास करावेच लागेल , काही ऐकू नका त्यांचे ".
 अशा रितीने सारीकडून नडल्या गेलेला असतो या स्तरावरचा शिक्षक . खरे तर  पदव्युत्तर पदवी व शिक्षणशास्त्र पदवी ही किमान  अर्हता आहे या स्तरावर नोकरी मिळविण्याची . उलट ट्युशनच्या शिक्षकांच्या पदव्या नि अनुभव तपासायची गरज आहे .  पण. . .
 उच्चमाध्यमिक शिक्षकांनी उपलब्ध विद्यार्थ्यांना मनापासून शिकविले तर हळूहळू उपस्थिती सुधारेल .  हा सुखद अनुभव आजकाल येतो आहे .ही अच्छे दिनची सुरवात आहे .

 शासनातील भ्रष्ट घटक =

 "तळे राखील तोच पाणी चाखेल " या म्हणीची सत्यता पटवून देण्यासाठीच सरकारी कचेरीचा जन्म झाला कि काय असे सामान्यांना वाटते .  तरी बरे आजकाल तंत्रज्ञान व माहितीचा अधिकार आहे  . पूर्वी सुद्धा चांगले लोक होते , आताही आहेत . पण काही  निवडक नि नग मंडळींमुळे संपूर्ण यंत्रणेवर संशय येतो .
 स्थानिक शाळा-कॉलेजाची  अद्ययावत माहिती स्थानिक शासन प्रणालीला पुरेपुर माहित असते. तरी  देखिल भूगोल नसलेल्या,  सोय़ीसुविधा नसलेल्या संस्थेला मान्यता देणे , क्षमतेपेक्षा जास्त भरती झाली तरी तपासणीत पास करणे .  कोणी कोणाशी कितीत टायप केला ? हे माहित असून सहीसलामत सोडणे.  वृत्तपत्रांमध्ये राळ उडवली गेली किंवा वरून बडग्या आला तरी थातूतमारूर कारवाई करीत खाल्ल्या अन्नाला जागणे असे अनेक सुरस प्रकार या यंत्रणेत बघायला मिळतात . बरेचदा यांच्याच आशीर्वादाने स्थानिक ट्युशन लॉबी तणासारखी फैलते .

 संस्थाचालक =
 स्वातंत्रोत्तर काळात शिक्षण देणे हे व्रत होते आता हॉटधंदा आहे.  व 'धंदे में सब जायज है ' !  काही तुरळक शैक्षणिक संस्था सोडल्या तर सामान्यांना या धंदेवाईक शैक्षणिक संस्थानिकांचा अनुभव येतोच येतो .  सरकार कोणाचेही येऊद्या यांची स्वत:ची  दुकानदारी अभंग राखण्यात यश मिळवितातच ते . "महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहाती" हे वाक्य जणु नसानसातून भिनलेली ही जमात , शाळेतील शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्या पर्यंत शासनाच्या ख-या योजना , शासनाची खरी भूमिका पोहचूच देत नाहीत . सर्व लाभ वरचेवर लाटून बाकी घटकांना कसाबसा जिवंत ठेवतात . सुशिक्षित बेरोजगारांचे लाचार लोंढे यांचे सहज बळी ठरतात यांचे . विद्यार्थी तर आपण कोणत्या षडयंत्रात अडकलो आहे हे समजण्यापूर्वीच दुस-या मोठ्या (इंजिनिअरिंग/मेडिकल प्रवेश) वर्तुळात अलगद अडकला असतो. पालकांविषयी स्वतंत्र लिहावे लागेल.
 पैसा-सत्ता यांच्या जोरावर ही संस्थानिक मंडळी प्रभावशाली ठरतात . मग "बळी तो कान पिळी" होणारच .

 ट्यूशन सम्राट =
 आज नव्या व्यवसायाची भरभराट झाली आहे ती म्हणजे "ट्युशन"!   बिनाभांडवलाचा , विना खर्चाचा तरी १०० टक्के नफ्याचा  "दस उंगलीयाँ घी में।"  असा एकमेवाद्वितीय धंदा म्हणजे ट्यूशन .
" मिया का ही सर ,मिया का ही जुता " या न्यायाने विद्यार्थ्यांचेच पैसे , विद्यार्थ्यांचाच वेळ , विद्यार्थ्यांचेच प्रयत्न  मात्र यांचे  नाव-सत्ता-माज . हेच चित्र आजकाल जास्त दिसत आहे.    १०० ते २०० इतके विद्यार्थी एकेका बॅचमध्ये . दोन ते तीन लाख फी प्रत्येक विद्यार्थ्याकडून  अॅडमिशच्या वेळी अर्धी फी नि काहीच महिन्यात उरलेली फी . व्यवसायात पहिले माल व मग किंमत हे सूत्र असते . इथे म्हणजे सारं उलटच . विद्यार्थ्याचा निकाल नीट लागला नाही तर नालायकीचे खापर त्याच्यावरच अलगद फोडले जाते.  इतक्या मोठ्ठ्या समूहात सगळंच समजेल इतका प्रत्येक विद्यार्थी हूशार नसतो. शिवाय दोन वर्ष सतत आठाठ तास दडपणात अभ्यास करणे सा-यांनाच झेपत नाही . विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कुवतीपेक्षा यांना आर्थिक कुवतच अपेक्षित असते.
 पूर्वी शाळा-कॉलेजाच्या वेळे नंतर क्लासेस चालायचे आता हेच ट्यूशनवाले शाळाकॉलेजला वेठीस धरून , त्यांच्याच वेळेत क्लासेस ठेवतात.
 मध्यंतरी एक किस्सा ऐकायला मिळाला . नागपुरातील ब-यापैकी डॉन क्लासशी नागपुरातील नामांकित हूशार कॉलेजने टायप केले.  समसमा संयोगाने दोघेही भरभरून फळले.  मग कॉलेजची खांदेपालट झाली.  नवे प्राचार्य काही डॉनच्या चरणी गेले नाही.  त्यांना वाटले आतापर्यंत आपला दबदबा होता नि आहे देखिल तर मग  डॉनला दुसरा पर्याय काय ? पण इथे अंदाज चुकला.  जे कॉलेज तिस-या वा दहाच्या पुढे होते त्यांनी मधल्या काळात डॉनची मर्जी संपादित केली . अन् नागपूरचे शैक्षणिक चित्र पालटले .  दहा-पंधरा वर्षे निर्विवाद नंबर एकवाले डाऊनमार्केट झाले नि ढप्पू-पप्पूची कॉलेजेस सरसर वर सरकली .  हा महिमा नि प्रभाव पाहून भल्या भल्यांनी नतमस्तक होणे पसंत केले.
 अशा अनेक सुरस कहाण्या शिक्षण क्षेत्रात मोठ्या भक्तिभावाने सांगितल्या जातात.
  ट्यूशनवाल्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे हा स्वतंत्र लेखविषय आहे.  MBA फायनान्सची अॅडव्हांस ब्रांच म्हणून MBA ट्युशन अॅडमिनिस्ट्रेशन वा फायनान्स निघाले तर नवल वाटू नये इतके या क्षेत्राचे अमीट योगदान आहे.
  सपनों का सौदागर म्हणजेच ट्यूशन ! अनिर्बंध ,अमर्याद , अनियंत्रित या शब्दांनाही मर्यादा पडावी इतकं हे क्षेत्र खोल आहे .

  पालक =
  अत्यूच्चशिक्षित ते अशिक्षित पालक असो पाल्यांच्या बाबत सगळे एकजात असहाय नि अव्यवहारी होतात . इथेच शिक्षणक्षेत्राच्या ससेहोलपाटीला सुरवात होते . माझा पाल्य "मोठ्ठा" झाला पाहिजे म्हणजे भौतिक सुख संपत्तीयुक्त एवढेच स्वप्न त्यांचे ,चारित्र्यनिर्माण-सुदृढशरीर-राष्ट्रभक्ती वगैरे नंतर पाहू हीच मानसिकता.
  शाळा-कॉलेजात समजत नाही मग लाव ट्यूशन . तेथेही समजत नाही मग होमट्यूटर . तेही नाही झेपत तर  पुन्हा दुसरे दुकान शोधा.अोता पैसा नि करा हूशार ही मानसिकता !
  थोडा धीर धरणे , थोडा शालेयव्यवस्थेवर विश्वास ठेवणे नि त्यांच्याच कडून शिक्षण करवून घेण्याचा दबाव टाकणे या गोष्टी पालकांनी केल्या  ना तर आजच्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळून समाज सुरळित होईल , शिक्षणक्षेत्रातील हे निराशाजनक चित्र पालटेल.
  पण सुरवात कोणी करावी ? हा मोठाच प्रश्न आहे.

  आजकालच्या शिक्षण समस्येकडे अजून म्हणावे तेवढे सजग व सक्रियतेने समाज पाहात नाही म्हणून समस्या सुटत नाही.
  या लेखातून समस्येविषयी फार सविस्तरपणे लिहिल्या गेले नाही. एका लेखात आटपेल इतकी सोपी ही समस्या नाही. पण किमान थोडी धूळ झटकावी हा या लेखाचा उद्देश.
  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेयशिक्षण समृद्ध करून धनदांडग्यांची दुकाने बंद करण्याची नितांत गरज आहे.
  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
  नागपूर.








Sunday, September 3, 2017

#कविता

#सहजोक्त - कविता.

नवा दिवस उगवला ,नवीन आस जागू दे
नव्या उेमेदीने पुन्हा नवेच स्वप्न पाहू दे
नवी दिशा नवा सूर्य नवेच ध्येय गाठू दे
नव्याच या जगामध्ये नवीनता बहरू दे ॥

नकोच वंचना ही ती नकोच ती याचना
नकोत भास-आभास हे भ्रमविलास ना
नकोच दैन्य, नको दु:ख, नको रे वल्गना
कल्पनेमधिल नको स्वर्ग वा लंका पु्न्हा ॥


अढळ अशा विश्वासाला अढळ श्रद्धा ठेऊ दे
अढळ अभंग अखंड संग नि:संगपणे लाभू दे
अढळ शांती चित्ती सदा अखंड ज्योत तेवू दे
अढळ ह्या जिजीविषेस  मुक्ततेने मुक्ती दे ॥

©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...